एकनाथी भागवत – अध्याय २२
॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥
ॐ नमो सद्गुरु खांबसूत्री । चौर्यांशीं लक्ष पुतळ्या यंत्रीं ।
नाचविशी निजतंत्रीं । प्राचीनदोरीस्वभावें ॥ १ ॥
हे ओंकारस्वरूपी, कळसूत्री बाहुल्यांचा खेळ करणाऱ्या सद्गुरो ! तुला नमस्कार असो. चौऱ्यायशी लक्ष बाहुल्या तूं आपल्याला पाहिजे तशा कळसूत्रावर पूर्वसंचिताप्रमाणे नाचवितोस १.
दोरी धरिली दिसो न देशी । परी पुतळ्या स्वयें नाचविशी ।
नवल लाघवी कैसा होशी । अलिप्ततेंसीं सर्वदा ॥ २ ॥
हाती धरलेली दोरी तर दिसू देत नाहींस ; पण बाहुल्या तर स्वतः नाचवितोस. तथापि तूं सदासर्वदा त्यांच्यापासून अलिप्त असतोस, हे तुझे कौशल्य किती अपूर्व आहे बरें ! २.
तेथ जैशी ज्याची पूर्वगती । तें भूत नाचे तैशा रीतीं ।
ते नाचविती चेतनाशक्ती । तुझ्या हातीं वीणहस्तें ॥ ३ ॥
ज्याचे जसें पूर्वकर्म असते, तसा तो जीव नाचत असतो. ती नाचविण्याची चेतनाशक्ति, तुला हात नसूनही तुझ्या हाती आहे ३.
जेवीं कां अचेतन लोहातें । चुंबक खेळवी निजसामर्थ्यें ।
तेवी तूं सकळ भूतांतें । निजसत्तें नाचविशी ॥ ४ ॥
जड लोखंडाला ज्याप्रमाणे आपल्या शक्तीने लोहचुंबक खेळवितो; त्याप्रमाणे आपल्या सामर्थ्याने तूंही सर्व प्राणिमात्रांना नाचवितोस ४.
ऐशीं सदा नाचतीं परतंत्र । तरी अभिमानाचें बळ थोर ।
सत्य मानोनि देहाकार । आम्ही स्वतंत्र म्हणविती ॥ ५ ॥
असे हे जीव परतंत्रपणे जरी नाचत असतात, तरी अभिमानाचा जोर केवढा! देहाचा आकार सत्य आहे हे असे मानून आम्ही स्वतंत्रच आहों असें म्हणतात. ५.
आम्ही सज्ञान अतिज्ञाते । आम्ही कर्मकुशल कर्मकर्ते ।
इतर मूर्खें समस्तें । ऐशा अभिमानातें वाढविती ॥ ६ ॥
आम्ही अतिशय ज्ञानसंपन्न व कर्म करण्यात अत्यंत कुशल, आणि इतर सारे मूर्ख असाच अभिमान वाढवितात ! ६.
एवं देहाभिमानाचेनि हातें । विसरोनि आपुल्या अकर्तृत्वातें ।
स्वयें पावले कर्मबंधातें । जेवीं स्वप्नावस्थे विषबाधा ॥ ७ ॥
अशा प्रकारे देशाभिमानाच्यामुळे आपलें अकर्तेपण विसरून जाऊन स्वप्नावस्थेत विषबाधा झाल्याप्रमाणे कर्मबंधनांत पडतात ७.
स्वप्नीं अतिशय चढलें विख । आतां उतरलें निःशेख ।
तेवीं बंधमोक्ष देख । सत्यत्वें मूर्ख मानिती ॥ ८ ॥
स्वप्नामध्ये अतिशय विष चढले होते, ते आतां अगदी उतरलें असें म्हणावे, त्याप्रमाणे बंध व मोक्ष हे मूर्ख लोक खरे मानतात ८.
हे तुझे खांबसूत्रींची कळा । मिथ्या सत्यत्वें दाविशी डोळां ।
हा अतिशयें अगाध सोहळा । तुझी अतर्क्य लीळा तर्केना ॥ ९ ॥
हा तुझा कळसूत्री खेळ मिथ्या असूनही डोळ्यांना खरा आहे असे भासवितोस. हा तुझा महिमा अपूर्व आहे. तुझ्या अतर्क्य लीलेचा तर्कच करवत नाही ९.
अचेतनीं चेतनधर्म । प्रत्यक्ष दाविशी तूं सुगम ।
हेंचि तुझें न कळे वर्म । करोनि कर्म अकर्ता ॥ १० ॥
अचेतनामध्ये चैतन्याचा धर्म तूं प्रत्यक्ष दाखवून देतोस, हे तुझे मर्म कोणालाही कळत नाही. तूं कर्म करून अकर्ता आहेस १०.
अकर्ताचि तूं होशी कर्ता । कर्ता होत्साता अकर्ता ।
हे तुझी कांबसूत्रता । न कळे सर्वथा कोणातें ॥ ११ ॥
अकर्ता असून कर्ता होतोस आणि कर्ता असून अकर्ता होतोस, ही तुझी कळसूत्रीची कळा कोणाला कधीच कळत नाही ११.
तुझी माया पाहों जातां । तोचि मायेनें ग्रासिला तत्त्वतां ।
असो तुजचि पाहों म्हणतां । तेही सत्त्वावस्था मायेची ॥ १२ ॥
तुझी माया पाहावयास गेले तर ती मायाच पाहणाराला ग्रासून टाकते. तेही असो; पण तुलाच पाहावयास जावें तर ती सत्वावस्थाही मायेचीच होय १२.
ऐसें तुझें खांबसूत्र । अकळ न कळे गा तुझें चरित्र ।
देखों नेदितां निजसूत्र । भूतें विचित्र नाचविशी ॥ १३ ॥
असा तुझा हा कळसूत्री खेळ आहे. तुझे चरित्र अगम्य असल्यामुळे कळणे शक्य नाही. आपलें सूत्र दृष्टीस पडू न देता, प्राणिमात्रांना विलक्षण रीतीने नाचवितोस मात्र! १३.
तुझेनि जग होय जाये । परि म्यां केलें हें ठावें नोहे ।
ऐसा तुझा खेळ पाहें । कोणें काये लक्षावा ॥ १४ ॥
तुझ्यामुळेच जग होते आणि जातें पण ‘मी केलें ‘ असें तुला वाटत नाही. असा तुझा खेळ आहे, तो कोणी कसा पहावा १४.
यापरि खेळ वाढविशी । सवेंचि विकल्पोनि मोडिशी ।
विकार महत्तत्त्वीं सांठविशी । हेंही कर्तृत्व अंगासी न लगत गेलें ॥ १५ ॥
अशा रीतीने खेळ वाढवितोस आणि लागलाच विकल्पाने मोडूनही टाकतोस. महत्तत्त्वाच्या ठिकाणी विकार सांठवून ठेवतोस. पण हेही कर्तृत्व तुझ्या अंगीं लागत नाही १५.
याचें मुख्यत्वें मूळ लक्षण । तुझे कृपेवीण न कळे जाण ।
तुझी कृपा झालिया पूर्ण । जनीं जनार्दन प्रकटे पैं ॥ १६ ॥
ह्याचे मुख्यत्वे मूळ लक्षण तुझ्या कृपेशिवाय कळत नाही. तुझी पूर्ण कृपा झाली तरच जनी जनार्दन प्रगट होतो १६.
जनीं प्रगटल्या जनार्दन । तद्रूप होइजे आपण ।
हे मूळींची निजखूण । तेथ मीतूंपण रिगेना ॥ १७ ॥
आणि जनीं जनार्दन प्रगट झाला म्हणजे आपणही तद्रूपच होतो. हेच त्यांतील मूळबीज आहे. तेथे मीतूंपण राहात नाही १७.
मीतूंपणेंवीण प्रसिद्ध । जनीं जनार्दन निजानंद ।
त्याचे कृपेस्तव विशद । श्रीभागवत शुद्ध वाखाणिलें ॥ १८ ॥
मीतूंपणावांचून जनामध्ये निजानंदरूपी जनार्दन प्रसिद्ध आहे; त्याच्या कृपेमुळेच श्रीमद्भागवत हें नीट रीतीने वर्णन केले जात आहे १८.
तेथ एकविसाव्याचे अंतीं । वेद त्रिकांड लक्ष्यार्थस्थिती ।
ब्रह्म एकचि निश्चितीं । अद्वयस्थिती अविनाशी ॥ १९ ॥
त्यांत एकविसाव्या अध्यायाच्या अंती त्रिकांडात्मक वेदाचा लक्ष्यार्थ म्हणजे सर्वत्र एकच ब्रह्म असून ते अद्वय व अविनाश आहे असे सांगितले १९.
हें वेदार्थसारनिरूपण । ऐकतां उद्धवा बाणली खूण ।
ब्रह्म एकाकी परिपूर्ण । दुजेनवीण संचलें ॥ २० ॥
हें वेदार्थातील सारांशाचे निरूपण ऐकून उद्धवाला खूण पटली की, ब्रह्म हें एकी एकी एक असून ते परिपूर्ण व अद्वैतरूपानेच राहिलेले आहे २०.
वेदवादें ब्रह्म एक । स्वानुभवें तैसेंचि देख ।
तरी ज्ञाते ऋषिजन लोक । केवीं तत्त्वें अनेक बोलती ॥ २१ ॥
वेदवाणीवरून ब्रह्म हे एकच आहे; आणि स्वानुभवाने पाहिले असतांही ते तसेंच दिसते. तथापि मोठमोठे ज्ञाते ऋषि तत्वे अनेक आहेत म्हणतात हे कसे ? २१.
येचि आशंकेलागीं जाण । उद्धवें स्वयें मांडिला प्रश्न ।
परी पोटांतील भिन्न खूण । उगा श्रीकृष्ण न रहावा ॥ २२ ॥
हीच शंका मनांत आणून उद्धवाने प्रश्न विचारण्यास आरंभ केला. पण पोटांतील भाव मात्र निराळा, तो हा की, श्रीकृष्णाने उगीच बसूं नये २२.
मी झालों जी ब्रह्मसंपन्न । हें ऐकतां माझें वचन ।
निजधामा निघेल श्रीकृष्ण । मग हें दर्शन मज कैंचें ॥ २३ ॥
‘मी ब्रह्मस्वरूप झालों’ असें जर मी म्हटले, तर तें ऐकून श्रीकृष्ण निजधामाला जातील, मग हे दर्शन मला कशाचें ? २३.
ऐशिया काकुळतीं जाण । संशयेवीण करी प्रश्न ।
ते आयकोनि श्रीकृष्ण । सुखसमाधान भोगित ॥ २४ ॥
अशा काकुळतीने संशय नसतांही त्याने प्रश्न केला. तो ऐकून श्रीकृष्णाला सुख व समाधान वाटले २४.
तंव कृष्णाचे मनीं आणिक । उद्धव मी दोघे एक ।
मिथ्या वियोगाचें दुःख । हें कळे तंव देख प्रश्न सांगों ॥ २५ ॥
इतक्यांत कृष्णाच्या मनात निराळंच आलें तें असें की, उद्धव व आपण एकच आहोत, वियोगाचे दुःख हे मिथ्या आहे, हे उद्धवाला कळेपर्यंत आम्ही ह्याचे प्रश्न सांगू या २५.
बाविसावे अध्यायीं देख । तत्त्वसंख्या सांगेल आवश्यक ।
प्रकृतिपुरुषविवेक । जन्ममरणद्योतक प्रकारु ॥ २६ ॥
ह्या बाविसाव्या अध्यायामध्ये तत्त्वांची एकंदर संख्या किती हें अवश्य दाखवून देतील; त्यांतच प्रकृतिपुरुषाचा विचार व जन्ममरणाचा प्रकारही सांगतील २६.
आत्मा एक कीं अनेक । आणि तत्त्वसंख्याविवेक ।
हें कळावया निष्टंक । उद्धव देख पूसत ॥ २७ ॥
आत्मा एकच आहे की अनेक आहेत हे कळावे, तसाच तत्त्वसंख्येचा विचारही निश्चितार्थानें कळावा म्हणून उद्धव विचारीत आहे २७.
उद्धव उवाच-
कति तत्त्वावि विश्वेश संख्यातान्यृषिभिः प्रभो ।
नवैकादश पञ्चत्रीण्यात्थ त्वमिह शुश्रुम ॥ १ ॥
[श्लोक १] उद्धव म्हणाला हे प्रभो ! हे विश्वेश्वर ! तत्त्वांची संख्या ऋषींनी किती सांगितली आहे ? आपण तर नुकतीच नऊ, अकरा, पाच आणि तीन म्हणजेच एकूण अठ्ठावीस तत्त्वे सांगितलेली ऐकली. (१)
विश्वात्मका विश्वेश्वरा । विश्वधारका विश्वंभरा ।
विश्वसाक्षी विश्वाकरा । विश्वैकसुंदरा श्रीकृष्णा ॥ २८ ॥
हे विश्वात्मका, विश्वेश्वरा; हे विश्वधारका, विश्वंभरा; हे विश्वसाक्षी, विश्वाकारा; हे विश्वसुंदरा श्रीकृष्णा ! २८.
तुज विश्वात्मक म्हणतां । जड मलिन एकदेशिता ।
आली म्हणशी अज्ञानता । यालागीं प्रभुता उपपादी ॥ २९ ॥
तुला ‘विश्वात्मक’ म्हटले तर जड, मलिन एकदेशीयता व अज्ञानता आली असें म्हणशील, म्हणून तुझे ‘प्रभुत्व’ सांगतों २९.
जड मलिन अज्ञानता । हे मायेस्तव होती तत्त्वतां ।
ते मायेचा तूं नियंता । हे अगाध प्रभुता पैं तुझी ॥ ३० ॥
जड-मलिन- अज्ञानता ह्या खरोखर मायेमुळेच होतात; त्या मायेचाही तूं नियंता आहेस. हेंच तुझें अगाध ‘प्रभुत्व’ होय ३०.
ऐशिया संबोधनद्वारा । विनवूनि स्वामी शारंगधरा ।
तत्त्वसंख्येच्या विचारा । निजनिर्धारा पुसत ॥ ३१ ॥
अशा प्रकारे स्वामी श्रीकृष्णाचा उत्तम गौरव करून उद्धवाने मोठ्या विनयाने तत्त्वसंख्येच्या निश्चयाचा विचार त्याला विचारला ३१.
जे तपःसामर्थ्यें समर्थ थोर । अनागतद्रष्टे ऋषीश्वर ।
त्यांची तत्त्वसंख्या विचित्र । पृथक्पृथगाकारें बोलती ॥ ३२ ॥
(उद्धव म्हणाला) तपःसामर्थ्याने महासमर्थ, भूतभविष्य जाणणारे असे जे मोठमोठे ऋषिवर्य, त्यांनी काढलेली तत्त्वांची संख्या विचित्रच वाटते. ते ती वेगवेगळ्या प्रकारची सांगतात! ३२.
तत्त्वसंख्या इत्थंभूत । एकुणिसाव्या अध्यायांत ।
तुम्हींच निरूपिला तत्त्वार्थ । तोचि वृत्तांत सांगत ॥ ३३ ॥
एकोणिसाव्या अध्यायामध्ये आपणच तत्त्वांचा विचार इत्थंभूत सांगितला आहे. त्यांतील एकंदर तत्त्वांची संख्या आपण मला सांगितली आहे, तीच मी सांगतों ३३.
चौदावे श्लोकींच्या निरूपणीं । हे अठ्ठावीस तत्त्वगणनी ।
सांगितली शार्ङ्गपाणी । मजलागोनी निश्चित ॥ ३४ ॥
चौदाव्या श्लोकाच्या निरूपणांत, हे श्रीकृष्णा ! तत्त्वांची गणना करून ती सारी निश्चयेंकरून अठ्ठावीस आहेत असे आपण सांगितले ३४.
ये तत्त्वसंख्येचा विचार । प्रकृति पुरुष महदहंकार ।
पंच महाभूतें थोर । हा संख्याप्रकार नवांचा ॥ ३५ ॥
ह्या तत्वसंख्येच्या विचारांत-प्रकृति, पुरुष, महत्तत्व व अहंकार आणि श्रेष्ठ अशी पंच महाभूते मिळून नऊ तत्त्वे झाली ३५.
दाही इंद्रियें अकरावें मन । पंच विषय तीन्ही गुण ।
हें अठ्ठावीस संख्यागणन । स्वमुखें आपण निरूपिलें ॥ ३६ ॥
त्यानंतर दहा इंद्रिये, अकरावें मन, पांच विषय आणि तिन्ही गुण मिळून अठ्ठावीस संख्या होत असल्याचे आपणच निरूपण केले ३६.
यापरी गा लक्ष्मीपती । हे मुख्यत्वें तुझी तत्त्वोक्ती ।
आतां ऋषीश्वरांच्या युक्ती । ऐक तुजप्रती सांगेन ॥ ३७ ॥
हे लक्ष्मीपते ! हेच तुझें मुख्य सांगणे आहे. आता मोठमोठ्या ऋषींचे युक्तीवादही मी तुला सांगतों ३७.
तें तूं ऐक गा निश्चित । तुज सांगेन तयाचा अर्थ ।
म्हणोनियां निरूपित । स्वयें मनोगत उद्धव ॥ ३८ ॥
त्याचा अर्थही आपल्याला सांगतों. तो आपण नीटपणे ऐकून घ्यावा. असें म्हणून उद्धव स्वतः त्यांचे म्हणणे सांगू लागला ३८.
म्हणे तत्त्वतां अवधारीं । मी सांगेन एक कुसरी ।
प्रकृतिपुरुषांमाझारीं । विचित्र परी सांगत ॥ ३९ ॥
तो म्हणाला, आपण नीट ऐकावें. मी एक चमत्कार सांगतो. प्रकृतिपुरुषामध्येच एक विचित्र प्रकार आहे ३९.
केचित्षड्विशतिं प्राहुरपरे पंचविंशतिम् ।
सप्तैके नव षट् केचिच्चत्वार्येकादशापरे ॥ २ ॥
केचित्सप्तदश प्राहुः षोडशैके त्रयोदश ।
एतावत्त्वं हि संख्यानामृषयो यद्विवक्षया ॥ ३ ॥
[श्लोक २-३] काहीजण सव्वीस तत्त्वे सांगतात, तर दुसरे काहीजण पंचवीस काहीजण सात, नऊ किंवा सहा म्हणतात काहीजण चार सांगतात, तर काहीजण अकरा ! काहीजण सतरा, काहीजण सोळा, तर काहीजण तेरा सांगतात हे सनातन श्रीकृष्णा ! इतकी वेगवेगळी संख्या ऋषी कशी काय सांगतात ? आपण कृपा करून ते आम्हांला सांगावे. (२-३)
येथ तत्त्वसंख्या मतवाद । ऋषीश्वरांमाजीं विवाद ।
त्या विवादाचे शब्द । ऐक विशद सांगेन ॥ ४० ॥
या तत्त्वांच्या संख्येमध्ये मोठा मतभेद असून मोठमोठ्या ऋषींचे त्यासंबंधानें वादच माजून राहिले आहेत. त्या वादातील सारांशही मी आपल्याला स्पष्ट करून सांगतों ४०.
एक म्हणे तत्त्वें ‘सव्वीस’ । दुजा म्हणे उगा बैस ।
बहु बोलावाया नाहीं पैस । तत्त्वें ‘पंचवीस’ नेमस्त ॥ ४१ ॥
एक म्हणतो, ही तत्त्वे सव्वीस आहेत, दुसरा म्हणतो, गप्प बैस. अधिक बोलावयाला जागाच नाही. सारी तत्त्वे पंचवीसच ठरलेली आहेत ४१.
तिजा म्हणे तुम्हीं येथ । कैसोनि वाढविलें स्वमत ।
तत्त्वें नेमस्तचि ‘सात’ । कैंचीं बहुत बोलतां ॥ ४२ ॥
तिसरा म्हणतो, तुम्ही येथे आपआपला हट्ट कसला घेऊन बसता ? सारी तत्त्वें सातच ठरलेली आहेत. अधिक कोठची सांगतां । ४२.
एक म्हणे हें अभिनव । बोलतां न लाजती मानव ।
वृथा बोलाची लवलव । तत्त्वें ‘नव’ नेमस्त ॥ ४३ ॥
एक म्हणतो, किती आश्चर्य आहे पहा. मनुष्यांना बोलतांना लाजही वाटत नाही. ही शब्दांची बडबड वायफळ आहे. खरोखर तत्वे नऊच ठरलेली आहेत ४३.
तंव हांसोनि बोले एक । सांपे सज्ञान झाले लोक ।
मिथ्या बहु तत्त्वजल्पक । ‘तत्त्वषट्क’ नेमस्त ॥ ४४ ॥
तों आणखी एकजण हासून म्हणतो, सारेच लोक हल्ली शहाणे झाले आहेत ! उगीच वायफळ बडबड चालवितात, तत्त्वे खरी सहाच आहेत ४४.
एक म्हणती परते सरा । नेणा तत्त्वसंख्यविचारा ।
तत्त्वें नेमिलींच ‘अकरा’ । बडबड सैरा न करावी ॥ ४५ ॥
कोणी म्हणतात चला, बाजूला व्हा. तत्त्वसंख्येचा विचार तुम्हांला मुळीच समजत नाही. खरी तत्त्वे अकराच आहेत. व्यर्थ बडबडीत अर्थ नाही ४५.
दुजा म्हणे तत्त्वविचारा । नेणोनि धरिसी अहंकारा ।
पुसोनियां थोरथोरां । तत्त्वें ‘सतरा’ नेमस्त ॥ ४६ ॥
दुसरा म्हणतो, तत्त्वांचा विचार न समजतां उगीच अभिमान मात्र धरतोस. मोठमोठ्यांना विचारले असतां तत्त्वे सतराच असल्याचे सांगतात ४६.
एक म्हणे व्युत्पत्तिबळा । कां व्यर्थ पिटाल कपाळा ।
न कळे भगवंताची लीळा । तत्त्वें ‘सोळा’ नेमस्त ॥ ४७ ॥
एक म्हणतो, विद्वत्तेच्या जोरावर व्यर्थ कपाळफोड का करीत बसतां? भगवंताची लीला कोणालाच कळत नाही. सोळाच तत्त्वं खरी आहेत ४७.
एक म्हणे या गर्वितां पोरां । कोण पुसे तत्त्वविचारा ।
तत्त्वें नेमस्तचि ‘तेरा’ । निजनिर्धारा म्यां केलें ॥ ४८ ॥
कोणी म्हणतो, ह्या गर्विष्ठ पोरांच्या तत्वविचाराला कोण विचारतो? मी तर ठाम तेराच तत्त्वे आहेत असे निश्चित केले आहे ४८.
एक म्हणे सांडा चातुरी । तत्त्वें नेमस्तचि ‘चारी’ ।
दुजा म्हणे या कायशा कुसरी । तत्त्वें निर्धारीं ‘दोनचि’ ॥ ४९ ॥
एक म्हणतो. हे तुमचें पांडित्य पुरे करा; तत्त्वे मूळ चारच आहेत. दुसरा म्हणतो, या म्हणण्यांत काय हाशील ? खरे म्हटले तर तत्त्वे दोनच आहेत ४९.
तिजा म्हणे वाचाट लोक । कोणें धरावें यांचें मुख ।
निजनिर्धारीं तत्त्व ‘एक’ । एकाचा अनेक विस्तार ॥ ५० ॥
तिसरा म्हणतो, हे सारे वाचाळ लोक. ह्यांच्या तोंडाला कोणी लागावें ? वास्तविक तत्व असें एकच असून त्याचेच अनेक विस्तार झालेले आहेत ५०.
एवं मतपरंपरा नाना मतीं । ऋषीश्वरीं वेंचितां युक्ती ।
तुझ्या तत्त्ववादाची निश्चिती । कोणें इत्थंभूतीं मानावी ॥ ५१ ॥
अशा प्रकारे मोठमोठ्या ऋषींनी अनेक युक्ति लढवून निरनिराळी मते प्रतिपादन केली आहेत, तेव्हां तूं जो तत्त्वनिर्णय सांगितलास, तोच निश्चित म्हणून कसा मान्य करावा ? ५१.
तूं निजात्मा परमेश्वर । तुज जाणावया ऋषीश्वर ।
वेंचूनि युक्तिचे संभार । तत्त्वविचार बोलती ॥ ५२ ॥
तूं निजात्मरूपी परमेश्वर आहेस. तुला जाणण्यासाठी मोठमोठ्या ऋषींनी नानाप्रकारचे तर्क चालवून तत्त्वविचार सांगितला आहे ५२.
स्वामीनें सांगितलें तत्त्व एक । ऋषीश्वर बोलती अनेक ।
येचिविषयींचें निष्टंक । मज आवश्यक सांगावें ॥ ५३ ॥
आपण प्रभूंनी तर एकच तत्त्व आहे असे सांगितले. आणि मोठमोठे ऋषि म्हणतात ती अनेक आहेत. तेव्हा यांतील निश्चितार्थ मला सांगावा ५३.
एवं या तत्त्वनिश्चयासी । मज सांगावया योग्य होसी ।
ऐसा विनविला हृषीकेशी । तो उद्धवासी तुष्टला ॥ ५४ ॥
मला ह्या तत्त्वांचा निश्चय सांगण्याला आपणच योग्य आहात. याप्रमाणे श्रीकृष्णाला विनंती केली, तेव्हां तो उद्धवावर प्रसन्न झाला ५४.
जीं जीं ऋषीश्वर बोलती । तीं तीं तत्त्वें सत्य होतीं ।
हें सर्वज्ञ ज्ञाते जाणती । तेचि अर्थीं हरि बोले ॥ ५५ ॥
मोठमोठ्या ऋषींनी जी तत्वे सांगितली आहेत ती सारी खरीच आहेत. हे सर्वज्ञ ज्ञात्यांना माहीत आहे. याविषयींच श्रीकृष्ण सांगतात ५५.
श्रीभगवानुवाच-
युक्तंच सन्ति सर्वत्र भाषन्ते ब्राह्मण यथा ।
मायां मदीयामुद्गृह्य वदतां किं नु दुर्घटम् ॥ ४ ॥
[श्लोक ४] श्रीभगवान म्हणाले उद्धवा ! यांविषयी वेद जाणणारे जे काही सांगतात, ते सर्व खरेच आहे कारण सर्व तत्त्वे सर्वांच्यामध्ये अंतर्भूत आहेत माझ्या मायेच्या आधारावर काय सांगणे अशक्य आहे ? (४)
ज्याचेनि मतें जैसें ज्ञान । तो तैसें करी तत्त्वव्याख्यान ।
या हेतू बोलती ब्राह्मण । तें सत्य जाण उद्धवा ॥ ५६ ॥
ज्याचे ज्ञान जसे असते, त्याप्रमाणे तो तत्त्वे सांगत असतो. उद्ध्वा! याच हेतूनें ब्राह्मण बोलतात तेही खरेच समजावें ५६.
जरी अवघीं मतें प्रमाण । तरी कां करावें मतखंडण ।
उद्धवा तूं ऐसें न म्हणा । ते मी निजखूण सांगेन ॥ ५७ ॥
‘आतां सारीच मते जर खरी, तर मग इतर मतांचे खंडण तरी कां करावें?’ असे मात्र उद्धवा! तूं म्हणू नकोस. त्यांतील हृद्गत मी तुला सांगतों ऐक ५७.
अघटघटित माझी माया । जे हरिहरां न ये आया ।
जे नाथिलें वाढवूनियां । लोकत्रया भुलवीत ॥ ५८ ॥
माझी माया अघटित घटना करणारी आहे. हरिहरालासुद्धा तिचे आकलन होत नसते. कारण ती नसलेली सृष्टि वाढवून त्रिभुवनाला भुरळ पाडते ५८.
ते माया धरोनियां हातें । ऋषीश्वर निजमतें ।
जो जो जें जें बोलेल जेथें । तें तें तेथें घडे सत्य ॥ ५९ ॥
ती माया हाती धरून महर्षि आपल्या मतानें जें जें काही बोलत असतात, तें तें तेथे खरेच होतें ५९.
केवळ दोराचा सर्पाकार । हा श्वेत कृष्ण कीं रक्तांबर ।
ज्यासी जैसा भ्रमाकार । त्यासी साचार तो तैसा ॥ ६० ॥
केवळ दोरच जेथे सर्पाकाराने भासतो, तेथें तो साप पांढरा, काळा, की तांबडा कसला म्हणावा ? तर ज्याला जसा भ्रम होतो, तसा तो त्याला दिसत असतो ६०.
तेवीं आत्मतत्त्व एकचि जाण । अविकारी निजनिर्गुण ।
तेथ नाना तत्त्वांचें व्याख्यान । बोलती ब्राह्मण मायायोगें ॥ ६१ ॥
त्याप्रमाणे आत्मतत्त्व हे एकच आहे, व तें निर्गुण व निर्विकारी आहे; परंतु मायेमुळे ब्राह्मण अनेक तत्त्वांचे प्रतिपादन करतात ६१.
त्या मायेच्या मायिका व्युत्पत्ती । नाना वाग्वाद स्वमतीं ।
त्याच वादाची वादस्थिती । ऐक तुजप्रती सांगेन ॥ ६२ ॥
त्यांचें तें मायात्मक भाषण मायामयच असते. आपल्या मताच्या पुष्ट्यर्थ ते नानाप्रकारे वाग्वाद करतात. ते वाद कसे असतात तेंही मी तुला सांगतों ऐक ६२.
ऐसें बोलोनि श्रीकृष्णनाथ । उद्धवाप्रति साङ्ग निरूपित ।
तत्त्वविचारणा यथार्थ । स्वयें सांगत आपण ॥ ६३ ॥
ह्याप्रमाणे बोलून श्रीकृष्ण यथार्थ तत्त्वविचार उद्धवाला आपण स्वतः सांगू लागले ६३.
हें पांचवे श्लोकींचें नीरूपण । श्रीकृष्णउ द्धवविवरण ।
सांगितलें तत्त्वव्याख्यान । उद्धवा जाण यथार्थ ॥ ६४ ॥
पुढील पांचव्या श्लोकांतील निरूपण म्हणजे उद्धवाला श्रीकृष्णाने विवरण करून सांगितलेलें तत्त्वाचे यथार्थ व्याख्यान आहे ६४.
नैतदेवं यथाऽऽत्थ त्वं यदहं वच्मि तत्तथा ।
एवं विवदतां हेतुं शक्तयो मे दुरत्ययाः ॥ ५ ॥
[श्लोक ५] तुम्ही जे म्हणता, ते बरोबर नाही मी जे सांगतो, तेच बरोबर अशा प्रकारे जगाच्या कारणासंबंधीचा वाद, सोडण्यास कठीण अशा त्रिगुणात्मक वृत्तींमुळे होतो. (५)
माझे मायेचें प्रबळ बळ । तेणें अभिमान अतिसबळ ।
वाढवूनि युक्तीचें वाग्जाळ । करिती कोल्हाळ वाग्वादी ॥ ६५ ॥
माझ्या मायेचे बळ मोठे दांडगे आहे ; त्यायोगे प्रचंड अभिमान उत्पन्न होतो; त्यामुळे विद्वान् लोक युक्तिप्रयुक्तीचे वाग्जाळ माजवून वितंडवाद घालीत बसतात ६५.
प्रबळ शास्त्रश्रवणाभिमान । तुझें वचन तें अप्रमाण ।
मी बोलतों हेंचि प्रमाण । पत्रावलंबन केलें असे ॥ ६६ ॥
त्यांचा शास्त्रश्रवणाभिमान मोठा असतो. ‘तुझे बोलणें तें खोटें, मी म्हणतों हेच खरे आहे, ह्याला माझ्याजवळ ग्रंथाधार आहे’ (असे ते म्हणतात) ६६.
सत्त्वरजादि गुणोत्पत्ती । माझे मायेच्या अनंत शक्ती ।
तेणें गुणक्षोभें विवादती । स्वमतव्याप्तीअभिमानें ॥ ६७ ॥
सत्वरजादि गुणोत्पत्तीमुळे माझ्या मायेच्या अनंत शक्ति आहेत. त्यामुळे ते गुण क्षुब्ध झाले म्हणजे आपलेंच मत खरे अशा अभिमानाने तंडत बसतात! ६७.
यासां व्यत्कराआदासीद्विकल्पो वदतां पदम् ।
प्राप्ते शमदमेऽप्येति, वादस्तमनुशाम्यति ॥ ६ ॥
[श्लोक ६] सत्त्व इत्यादी गुणरूप शक्तींच्या क्षोभामुळेच, केवळ नावरूपात्मक मिथ्या प्रपंच उभा राहिला आहे वादविवाद करणार्यांच्या वादाचा हाच विषय आहे जेव्हा इंद्रिये आपल्या ताब्यात येतात आणि चित्त शांत होते, तेव्हा त्यांची भेदबुद्धी नाहीशी होते आणि वादसुद्धा शांत होतो. (६)
कां गुणक्षोभें अभिमान । विकल्प उपजवी गहन ।
विकल्पें युक्तीचें छळण । करी आपण अतिवादें ॥ ६८ ॥
गुणक्षोभाने झालेला अभिमान भयंकर विकल्प उत्पन्न करतो, आणि अतिवाद करून त्या विकल्पाच्या युक्तीचे खंडन करतो ६८.
सांडितां गुणक्षोभविलास । रजतमांचा होय र्हास ।
सत्त्ववृत्तीचा निजप्रकाश । अतिउल्हास शमदमांचा ॥ ६९ ॥
परंतु हा गुणक्षोभाचा प्रकार टाकून दिला म्हणजे रजाचा आणि तमाचा ऱ्हास होउन सत्त्ववृत्ति प्रकाशित होते. त्यावेळी शम आणि दम यांचा उत्कर्ष होतो ६९.
शमदमांचे निजवृत्ती । संकल्प-विकल्पेंसीं जाती ।
वाद अतिवाद उपरमती । जेवीं सूर्याप्रती आंधारें ॥ ७० ॥
ह्या शमदमाचा प्रभावच असा आहे की, सूर्योदय झाल्याबरोबर अंधकार नाहीसा व्हावा, त्याप्रमाणे विकल्पासहवर्तमान संकल्प व वादप्रतिवाद आपोआपच बंद पडतात ७०.
सर्वज्ञ ज्ञाते जे गा होती । ते नाना तत्त्वांच्या तत्त्वोक्ती ।
स्वयें विवंचूनि जाणती । ऐक तुजप्रती सांगेन ॥ ७१ ॥
म्हणून सर्वज्ञ ज्ञातें असतात ते नानाप्रकारच्या सत्रांसंबंधीं नाना मतांचा विचार करून त्यांतील हृद्गत जाणतात. तेही सुला सांगतो ७१.
परस्परानुप्रवेशत्तत्त्वानां पुरुषर्षभ ।
पौर्वापर्यप्रसंख्यानं यथा वक्तुर्विवक्षितम् ॥ ७ ॥
[श्लोक ७] हे पुरूषश्रेष्ठा ! तत्त्वे एकमेकात प्रवेश करू शकतात, म्हणून तत्त्वांची जितकी संख्या वक्ता सांगू इच्छितो, त्यानुसार कारणे कार्यांमध्ये किंवा कार्ये कारणांमध्ये मिळवून आपली इच्छित संख्या तो सिद्ध करतो. (७)
गुरूपाशीं शास्त्रपाठा । करूनि साधिली निजनिष्ठा ।
ऐक उद्धवा पुरुषश्रेष्ठा । प्रियवरिष्ठा प्रियोत्तमा ॥ ७२ ॥
हे प्रियोत्तम पुरुषश्रेष्ठा उद्धवा ! यथोक्त रीतीने गुरूपाशी शास्त्रपाठ घेऊन आत्मनिष्ठा साध्य करीत असतात. कशी ती ऐक ७२.
तत्त्वगणनेचे जे जे लेख । एकाचें थोडें एकाचें अधिक ।
हा ‘अनुप्रवेश’ वोळख । एकामाजीं एक उपजती ॥ ७३ ॥
तत्त्वांच्या गणनेसंबंधाने जे जे लेख आहेत ते कोणाचे अधिक व कोणाचे उणे आहेत; तत्त्वे एकापासून एक उत्पन्न होतात ह्याला परस्परांचा ‘अनुप्रवेश’ म्हणतात ७३.
तत्त्वांपासूनि तत्त्वें होतीं । कारणरूपें कार्याची स्थिती ।
अंतीं जेथील तेथें प्रवेशती । हे तत्त्वोपपत्ती उद्धवा ॥ ७४ ॥
उद्धवा! तत्त्वापासून तत्त्वें उत्पन्न होतात. कारणरूपानेच कार्याची स्थिति होते; आणि शेवटी ज्यांतली त्यांत ती शिरतात. अशी ही तत्त्वांची उपपत्ति आहे ७४.
पूर्वस्थिति जें तें कारण । त्यापासोनि उपजे तें कार्य जाण ।
हें कार्यकारणांचें लक्षण । तत्त्वविचक्षण बोलती ॥ ७५ ॥
तत्त्वांची जी पूर्वस्थिति तें ‘कारण’ आणि त्यापासून जें उत्पन्न होतें तें कार्य होय. तत्त्वविचारी पुरुष कार्यकारणाचे लक्षण असें सांगत असतात ७५.
येथ वक्त्याचें जैसें मनोगत । तैशी तत्त्वसंख्या होत ।
कार्य-कारण एकत्व गणित । तत्वसंख्या तेथ थोडीच ॥ ७६ ॥
ह्यांत वक्त्याची जशी इच्छा असते, त्याप्रमाणे त्या तत्त्वांची संख्या होते. कार्य व कारण एकच असें जे मानितात, त्यांची तत्त्वसंख्या थोडी होते ७६.
एकचि कार्य आणि कारण । गणितां आणिती भिन्न ।
तेथ तत्त्वसंख्या अधिक जाण । होय गणन उद्धवा ॥ ७७ ॥
उद्धवा! कार्य आणि कारण एकच असतां मोजतांना ती भिन्न भिन्न करतात; त्यामुळेही तत्त्वांची संख्या सहजच अधिक होते ७७.
एवं कार्यकारणें भिन्नभिन्नें । तत्त्वसंख्या थोडी बहुत होणें ।
हीं तत्त्ववक्त्यांचीं लक्षणें । तुज सुलक्षणें सांगितलीं ॥ ७८ ॥
अशा रीतीने कार्य व कारण यांची भिन्न भिन्न प्रकारें गणना केली असतां तत्त्वांची संख्या कमजास्त होते. असे तत्त्व सांगणारांचे प्रकार आहेत ते तुला सांगून दिले ७८.
येचि विषयींची उपपत्ती । स्वयें सांगताहे श्रीपती ।
कार्यकारणनिजयुक्ती । उद्धवाप्रती निवाडे ॥ ७९ ॥
त्याच विषयाची अधिक फोड, आणि कार्यकारणाविषयी आपले स्वतःचे मत श्रीकृष्ण उद्धवाला सांगत आहेत ७९.
एकस्मिन्नपि दृश्यन्ते प्रविष्टानीतराणि च ।
पूर्वस्मिन्वा परस्मिन्वा तत्त्वे तत्त्वानि सर्वशः ॥ ८ ॥
[श्लोक ८] एकाच कारणरूप तत्त्वामध्ये किंवा कार्यरूप तत्त्वामध्ये पूर्णपणे दुसरी तत्त्वे मिसळलेली दिसतात. (८)
आकाशापासूनि वायु झाला । तो गगनावेगळा नाही गेला ।
वायूपासूनि अग्नि झाला । तेथ प्रवेशु आला दोंहींचा ॥ ८० ॥
आकाशापासून वायु उत्पन्न झाला आहे, पण तो काही आकाश सोडून गेला नाही. वायूपासून अग्नि झाला, त्यांत आकाश व वायु ह्या दोघांचाही समावेश झालाच ८०.
अग्नीपासून आला जळरस । त्यामाजीं तिंहीचा रहिवास ।
जळापासून पृथ्वीचा प्रकाश । तीमाजीं प्रवेश चहूंचा ॥ ८१ ॥
अग्नीपासून पाणी उत्पन्न झाले, त्यांत तिहींचेही वास्तव्य झाले. जलापासून पृथ्वी उत्पन्न झाली, तींत चारांचा समावेश झाला ८१.
तैसें कार्य आणि कारण । परस्परें अभिन्न जाण ।
जेवी लेणें आणि सुवर्ण । वेगळेंपण एकत्वें ॥ ८२ ॥
ह्याचप्रमाणे कार्य आणि कारण ही परस्पर अभिन्न म्ह० एकरूपच असतात ; ज्याप्रमाणे दागिना आणि सोनें ही निरनिराळी दिसली तरी एकच असतात ८२.
जेवीं तंतु आणि पट । दोनी दिसती एकवट ।
तेवीं कार्यकारण सगट । दिसे स्पष्ट अभिन्न ॥ ८३ ॥
तंतु आणि वस्त्र ही जशी दोन्ही एकरूप दिसतात, त्याप्रमाणेच कार्यकारणही सारे स्पष्ट एकरूपच दिसते ८३.
सारेचीं नारळें केळीं । परी तीं साकरत्वा नाहीं मुकलीं ।
तेवीं कारणांचीं कार्यें झाली । असतां संचलीं कारणत्वें ॥ ८४ ॥
साखरेची नारळ आणि केळी केली तरी ती साखरेच्या मूळ स्वरूपाला सोडीत नाहीत; त्याप्रमाणे कारणांची कार्ये झाली तरी ती कारणरूपानेच राहिलेली असतात ८४.
जेवीं कां पृथ्वीचा मृत्पिंड । मृत्पिंडीं अनेक भांड ।
होतां गाडगीं उदंड । मृत्तिका अखंड सर्वांमाजीं ॥ ८५ ॥
ज्याप्रमाणे मातीचा गोळा घेतला व त्या गोळ्यापासून अनेक आकाराची गाडगी केली; तरी त्या सर्वामध्ये माती ही अखंड कायमच असते ८५.
तेवीं कारणीं कार्यविशेषु । कार्यासी कारणत्वें प्रकाशु ।
हा परस्परानुप्रवेशु । अनन्य बिलासु अखंडत्वें ॥ ८६ ॥
त्याप्रमाणे कारणामध्ये कार्य असते, कारणामुळेच कार्य प्रगट होते. हा परस्परांचा ‘ अनुप्रवेश’ असून अनन्य एकरूपता नेहमींचीच आहे ८६.
एक कार्य आणि कारण । होय भिन्न आणि अभिन्न ।
तेणें तत्त्वसंख्यालक्ष्ण । घडे जाण न्यूनाधिक ॥ ८७ ॥
एक कार्य आणि एक कारण असे भिन्नभिन्न मानले म्हणजे तत्त्वसंख्येचे मानही कमजास्त होते ८७.
पौर्वापर्यमतोऽमीषां प्रसङ्ख्यानमभीप्सताम् ।
यथा विविक्तं यद्वक्त्रं गृह्णीमो युक्तिसम्भवात् ॥ ९ ॥
[ श्लोक ९] यांची गणती जे जे करू इच्छितात, त्यांनी ज्या कार्याला ज्या कारणामध्ये किंवा ज्या कारणाला ज्या कार्यामध्ये अंतर्भूत करून तत्त्वांची जितकी संख्या स्वीकारली आहे, ते प्रतिपादन युक्तिसंगत असल्यामुळे आम्ही निश्चितपणे स्वीकारले आहे. (९)
म्या सांगितली तैशी जाण । तत्त्वसंख्या अधिकन्यून ।
व्हावया हेंचि कारण । वक्त्याची ज्ञानविवक्षा ॥ ८८ ॥
तत्त्वांची संख्या मी सांगितल्याप्रमाणे कमजास्ती होण्याला सांगणाराची ज्ञानविवक्षा म्ह• इच्छाच कारणीभूत होते ८८.
जैसें ज्यासी असे ज्ञान । जैसा ईप्सित मताभिमान ।
तैसतैसें तत्त्वव्याख्यान । ऋषीश्वर जाण बोलती ॥ ८९ ॥
ज्याचे जसें ज्ञान असते, ज्याला जसा इष्ट मताचा अभिमान असतो, त्या त्याप्रमाणे ते महर्षि बोलत असतात ८९.
जो बोले ज्या मतयुक्ती । तें तें घडे त्या मतसंमतीं ।
हें मी जाणें सर्वज्ञ श्रीपती । यालागीं त्या युक्ती मीही मानीं ॥ ९० ॥
त्याकरितां जो ज्या मताला अनुसरून बोलतो, ते त्याच्या मताप्रमाणे बरोबरच असते. हे मी सर्वज्ञ श्रीहरि जाणतों. त्यामुळे त्यांचेही म्हणणे मी मान्यच करतों ९०.
जें बोलिले ऋषीजन । सव्वीस तत्त्वें विवंचून ।
उद्धवा तुज मी सांगेन । सावधान अवधारीं ॥ ९१ ॥
आतां उद्धवा ! ऋषींनी जी सव्वीस तत्त्वे निवडून काढून सांगितली आहेत, तीही तुला सांगतो, ती लक्ष देऊन ऐक ९१.
अनाद्यविद्यायुक्तस्य पुरुषस्यात्मवेदनम् ।
स्वतो न स्म्भवादन्यस्तत्त्वज्ञो ज्ञानदो भवेत् ॥ १० ॥
[श्लोक १०] जीव अनादी कालापासून अविद्येने युक्त असल्यामुळे तो स्वतःच स्वतःला जाणू शकत नाही म्हणून त्याला आत्मज्ञान करून देण्यासाठी दुसर्या सर्वज्ञाची आवश्यकता आहे अशा रीतीने प्रकृतीची चोवीस तत्त्वे, पुरूष आणि ईश्वर अशी ही सव्वीस तत्त्वे आहेत. (१०)
प्रकृतिपुरुषमहत्तत्त्व येथें । अहंकार आणि महाभूतें ।
इंद्रियें विषयसमेतें । यें तत्त्वें निश्चितें पंचवीस ॥ ९२ ॥
त्यांत प्रकृति, पुरुष, महत्तत्त्व व अहंकार आणि पंच महाभूते; पांच विषयांसहवर्तमान अकरा इंद्रियें ; मिळून पंचवीस तत्वे होतात ९२.
येथ पुरुषाहोनिया भिन्न । जीव वेगळा करूनि जाण ।
तत्त्वसंख्यालक्षण । केलीं संपूर्ण सव्वीस ॥ ९३ ॥
यांत ईश्वराहून जीव भिन्न आहे असे समजून तो वेगळा काढला तर हीच तत्त्वं सव्वीस होतात ९३.
जीवाच्या भिन्नत्वाचें कारण । अनादि अविद्येस्तव जाण ।
घेऊनि ठेला देहाभिमान । कर्मबंधन दृढ झालें ॥ ९४ ॥
अनादिकालापासून जी अविद्या चालत आली आहे; तेंच जीवाच्या भिन्नत्वाचे कारण आहे. त्यामुळेच तो देहाभिमान घेऊन बसतो; आणि कर्माचे बंधन दृढ होते ९४.
अहंकर्तेपणाचा खटाटोप । तेणें अंगीं आदळे पुण्यपाप ।
विसरला निजरूप । विषयलोलुप्य वाढवितां ॥ ९५ ॥
कर्तेपणाच्या अहंकाराने उपदव्याप करीत असतो, यामुळे पापपुण्य येऊन माथ्यावर बसते. आणि विषयाचा लोभ वाढविता वाढविता आत्मस्वरूपच विसरून जातो ९५.
लागलें बद्धतेचें बंधन । न करवे कर्मपाशच्छेदन ।
त्याच्या उद्धारालागीं जाण । ज्ञानदाता सर्वज्ञ ईश्वर ॥ ९६ ॥
बद्धतेचे बंधन पाठीला लागल्यामुळे कर्मपाश तोडता येत नाहीत. म्हणून त्याच्या उद्धारासाठी ज्ञानदात्या सर्वज्ञ ईश्वराची गरज असते ९६.
गुरुद्वारा पाविजे ज्ञान । तेथें ईश्वराचा आभार कोण ।
येथ ईश्वरकृपेवीण । सद्गुरु जाण भेटेना ॥ ९७ ॥
परंतु ‘गुरूपासून जर ज्ञानप्राप्ति होते, तर तेथे ईश्वराचे आभार कसले ‘अथवा कारण तरी काय ?’ असे म्हणशील तर सांगतों की, ईश्वरकृपेशिवाय सद्गुरुही भेटत नाहीं ९७.
झालिया सद्गुरुप्राप्ती । ईश्वरकृपेवीण न घडे भक्ती ।
सद्गुरु तोचि ईश्वरमूर्ती । वेदशास्त्रार्थी संमत ॥ ९८ ॥
तसेंच सद्गुरूची प्राप्ति झाली तरी, ईश्वरकृपेशिवाय त्याची भक्ति घडत नाही. सद्गुरु तोच ईश्वरमूर्ति ही गोष्ट वेदशास्त्रार्थालाही संमत आहे ९८.
गुरु-ईश्वरां भिन्नपण । ऐसें देखे तो नागवला आपण ।
एवं ईश्वरानुग्रहें जाण । ज्ञानसंपन्न होय जीवु ॥ ९९ ॥
गुरूमध्ये आणि ईश्वरामध्ये मितपणा मानील तो बुडालाच म्हणून समजावे. तात्पर्य, ईश्वराच्या अनुग्रहानेंच जीव ज्ञानसंपच होतो ९९.
गुरूंनी सांगितली ज्ञानस्थिती । ते ईश्वरकृपेवीण चित्तीं ।
ठसावेना साधकांप्रती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ १०० ॥
आणखी उद्धवा ! गुरु ज्ञानाचे स्वरूप सांगितलें तरी तें ईश्वराच्या कृपेशिवाय मनात ठसत नाही, हे तू लक्षांत ठेव १००.
जीव नियम्य ईश्वर नियंता । जीव अज्ञान ईश्वर ज्ञानदाता ।
जीव परिच्छिन्न एकदेशिता । ईश्वर सर्वथा सर्वगत ॥ १ ॥
जीव हा नियम्य व ईश्वर हा नियामक म्ह. शास्ता आहे. जीव हा अज्ञानी आहे; आणि ईश्वर ज्ञानदाता आहे. जीव एकदेशीय असल्यामुळे मर्यादित आहे, आणि ईश्वर सदासर्वदा सर्वव्यापक आहे १.
जीव हीन दीन अज्ञान । ईश्वर समर्थ सर्वज्ञ ।
जीवास दृढ कर्मबंधन । ईश्वर तो जाण निष्कर्म ॥ २ ॥
जीव हा हीन, दीन व अज्ञान आहे; ईश्वर सर्वसमर्थ व सर्वज्ञ आहे. जीवाला कर्माचें दृढ बंधन आहे, आणि ईश्वर हा कर्मातीत आहे २.
एवं ईश्वरकृपें जाण । जीवासी प्राप्त होय ज्ञान ।
यालागीं ईश्वराहून । जीव भिन्न या हेतू ॥ ३ ॥
अशा कारणाने ईश्वरकृपेनेंच जीवाला ज्ञान प्राप्त होते. आणि याकरितांच जीव हा ईश्वराहून भिन्न होय ३.
म्हणशी करितां कर्माचरण । जीवासी प्राप्त होईल ज्ञान ।
हें सर्वथा न घडे जाण । जडत्वपण कर्मासी ॥ ४ ॥
आता कदाचित तूं म्हणशील की, कर्माचरण केले म्हणजे जीवाला ज्ञान प्राप्त होईल; पण तसे कधीही होणे नाही. कारण, कर्माला जडत्व आहे ४.
कर्मा जडत्व जाण । त्यासी बहुत अज्ञान ।
त्या कर्मासी अत्यंत बद्धपण । हें सज्ञान जाणती ॥ ५ ॥
कर्माला जडत्व असल्यामुळे त्याला बंधन व अज्ञानही आहे. त्या कर्माला अत्यंत बद्धपणा असल्याचे सज्ञान लोक जाणतात ५.
कर्म स्वरूपें जड अचेतन । त्यासी चेतविता ईश्वर जाण ।
तें न करितां ईश्वरार्पण । ज्ञानदाता कोण कर्मासी ॥ ६ ॥
कर्म हे स्वभावतः जड म्ह• अचेतन असते. त्याला चेतविणारा ईश्वर असतो. याकरितां तें जर ईश्वरार्पण केले नाही, तर त्या कर्माला ज्ञान देणारा कोण ? ६.
कर्मासी जडत्वें नाहीं सत्ता । कर्मक्रियेचा ईश्वर ज्ञाता ।
ईश्वरचि कर्मफळदाता । कर्मचेतविता ईश्वरु ॥ ७ ॥
कर्म जड असल्यामुळे त्याला सत्ता नसते; कर्मक्रियेला जाणणारा ईश्वर असतो; म्हणून कर्माचे फळ देणाराही ईश्वर आणि कर्माला चेतना देणाराही ईश्वरच होय ७.
ज्ञान तोचि ईश्वर । तेणें रचिला हा विस्तार ।
संहारितां तोचि निर्धार । सत्तमात्र ईश्वर जाणावा ॥ ८ ॥
ज्ञान तोच ईश्वर असून त्यानेच हा सृष्टिविस्तार रचला आहे. त्याचा संहार करणाराही सत्तामात्र ईश्वरच आहे ८.
जीवासी ज्ञानसायुज्यता । कां स्वर्गभोगफळदाता ।
अथवा इहलोकें वर्तविता । जीवासी तत्त्वतां ईश्वरु ॥ ९ ॥
जीवाला ज्ञानसायुज्यता म्ह० मोक्ष किंवा स्वर्गफळ देणारा अथवा इहलोकांत वागविणारा खरोखर ईश्वरच होय ९.
यापरी अवश्य जाण । जीव ईश्वर् करितां भिन्न ।
तत्त्वें सव्वीस संपूर्ण । बोलिले ब्राह्मण या हेतू ॥ ११० ॥
याकरितां जीव व ईश्वर हे भिन्न भिन्न मानणेच अवश्यं आहे; या हेतूनेंच ब्राह्मणांनी सारी तत्वें सव्वीस मानलेली आहेत ११०.
पंचवीस तत्त्वांची कथा । ते जीवेश्वरांची ऐक्यता ।
तेही सांगेन मी आतां । त्यांच्या मता संमत ॥ ११ ॥
आता त्यांच्या मताप्रमाणे पंचवीस तत्त्वांचे विवरण म्हणजे जीवेश्वराची ऐक्यता मानणे तीही मी तुला सांगतों ११.
पुरुषेश्वरयोरत्र न वैलक्षण्यमण्वपि ।
तदन्यकल्पनापार्था ज्ञानं च प्रकृतेर्गुणः ॥ ११ ॥
[श्लोक ११] या शरीरामध्ये असणार्या जीव आणि ईश्वरामध्ये किंचितही भेद नाही म्हणून त्यांना वेगळे मानू नये ज्ञान हा सत्त्वगुणात्मक प्रकृतीचा गुण आहे. (अशा प्रकारे २४ जड तत्त्वे आणि एक चेतन पुरूष मिळून २५ तत्त्वे झाली). (११)
जीवेश्वरांची ऐक्यता । सहजचि असे स्वभावतां ।
तेथ अणुमात्र भेदवार्ता । न रिघे सर्वथा निश्चित ॥ १२ ॥
खरें म्हटलें तर जीवेश्वराची ऐक्यता सहजच व स्वाभाविकच आहे. त्यांत अणुमात्रही भेद मानण्याचे कारण नाही, हे अगदी निश्चित होय १२.
स्वभावें पाहतां दर्पण । एकाचें देखिजे दोन्हीपण ।
परी द्विधा नव्हेचि आपण । यापरी जाण जीवशिव ॥ १३ ॥
सहज आरसा घेऊन पाहू लागले असता एका व्यक्तीची दोन रूपें दिसावयास लागतात. पण पहाणारा आपण काही द्विधा होत नाही. त्याप्रमाणेच हे जीव आणि शिव आहेत असें तूं समज १३.
अज्ञानप्रतिबिंब तें जीव । त्याचा द्रष्टा तो सदाशिव ।
तरी ऐक्यतेचें जें वैभव । तो निजस्वभाव मोडेना ॥ १४ ॥
अविद्येत प्रतिबिंबित झालेला तो जीव, आणि त्याचा दृष्य तो सदाशिव होय. तरी उभयतांचे ऐक्य हा त्यांचा जो मूळचा स्वभावधर्म आहे तो काही मोडत नाही १४.
जेवीं दर्पणामाजीं आपण । तेवीं जीवरूपें शिवुचि जाण ।
दोनी चेतनत्वें समान । तेंही लक्षण अवधारीं ॥ १५ ॥
आरशामध्ये ज्याप्रमाणे आपण असतो, त्याप्रमाणे जीवरूपाने शिवच असतो. चैतन्यधनि ते दोन्ही सारखेच असतात. त्याचेही लक्षण ऐक १५,
जैशी चेष्टा कीजे आपण । तेचि प्रतिबिंबीं दिसे जाण ।
तेवीं ईश्वरसत्ता सचेतन । गमनागमन जीवासी ॥ १६ ॥
आपण जशी हालचाल करावी, तशीच हालचाल केलेली प्रतिबिंबांतही दृष्टीस पडते. त्याप्रमाणेच ईश्वरसत्ता ही जीवाला जाण्यायेण्याला कारणीभूत होत असते १६.
जेणें स्वरूपें असे आपण । तद्रूप प्रतिबिंबीं दिसे जाण ।
तेवीं ईश्वरत्व संपूर्ण । असे अविच्छिन्न जीवामाजीं ॥ १७ ॥
जसें आपलें स्वरूप असते; तसेंच प्रतिबिंबांतही दिसते; त्याप्रमाणे जीवामध्येही परिपूर्ण ईश्वरपणा भरलेला असतो १७.
जैसा अग्नि राखां झांकोळिला । तरी अग्नि अग्निपणें असे संचला ।
तेवीं शिवासी जीवभावो आला । परी नाहीं मुकला निजत्वा ॥ १८ ॥
ज्याप्रमाणे अग्नि राखेने झांकलेला असला तरी तो अग्नीच्या रूपानेच असतो, त्याप्रमाणे शिवाला जरी जीवपणा आला तरी तो आत्मस्वरूपापासून निराळा होत नाही १८.
आशकां – “हो कां जीव शिव दोनी एक । तरी एक मलिन एक चोख ।
तैसें सदोख आणि निर्दोख । हे विशेख कां दिसती” ॥ १९ ॥
[आशंका] जीव आणि शिव हे दोन्ही जर एक आहेत, तर एक मलिन व एक शुद्ध; एक सदोष, एक निर्दोष; असे भिन्न भिन्न का दिसतात ? १९.
थिल्लरीं प्रतिबिंबला सविता । त्या प्रतिबिंबाअंगीं सर्वथा ।
थिल्लरिंचे मळ पाहतां । दिसती तत्त्वतां लागलेसे ॥ १२० ॥
[ समाधान ] एखाद्या डबक्यामध्ये सूर्याचे प्रतिबिंब पडते, त्या प्रतिबिंबाला डबक्यांतील सारी घाण लागलेली आहे असेंच दिसण्यांत दिसते १२०.
तेचि निर्वाळोनि पाहतां वेगीं । बिंबप्रतिबिंबनियोगीं ।
सर्वथा मळ न लगे अंगीं । उभयभागीं विशुद्ध ॥ २१ ॥
पण तेंच नीट न्याहाळून पाहिले, तर त्या बिंबाला किंवा प्रतिबिंबाला ती घाण मुळीच लागलेली नसते. ती दोन्ही निर्मळच असतात २१.
आरशाअंगीं टिकले मळ । सुबद्ध बैसले बहुकाळ ।
ते प्रतिबिंबाअंगीं केवळ । दिसती प्रबळ जडलेसे ॥ २२ ॥
आरशाच्या अंगावरच मळ बसलेला असून त्याच्यावर फारा दिवसांत कीट बसले असेल, तर तेच प्रतिबिंबावरही चढलेले आहे असे वाटते २२.
तो मळ जैं पडे फेडावा । तैं आरिसा साहणे तोडावा ।
परी प्रतिबिंब केव्हां । साहणे धरावा हें बोलूं नये ॥ २३ ॥
तो मळ कातून टाकावयाचा असेल, तर आरसाच सहाणेवर घासून स्वच्छ केला पाहिजे, प्रतिबिंब घेऊन सहाणेवर घांसावे असे कधी बोलतां कामा नये २३.
तेवीं सदोष आणि निर्दोष । केवळ अविद्याचि हे देख ।
जीव शिव उभयतां चोख । नित्य निर्दोख निजरूपें ॥ २४ ॥
त्याप्रमाणे सदोष व निर्दोष ही केवळ अविद्याच आहे; जीव आणि शिव हे दोघेही सदासर्वदा आत्मस्वरूपाने निर्दोषच असतात २४.
पाहतां शुद्धत्वें स्फटिक जैसा । जे रंगीं ठेवावा दिसे त्याऐसा ।
स्वयें अलिप्त जैसातैसा । जीव स्वभावतां तैसाचि ॥ २५ ॥
स्फटिक पाहिला तर तो स्वच्छच असतो; पण ज्या रंगावर ठेवावा त्या रंगासारखा दिसू लागतो. तरी तो त्या रंगापासून शुद्ध म्ह० अलिप्तच असतो; त्याप्रमाणेच जीव स्वभावतः अलिप्तच आहे २५.
जीव स्वयें चित्स्वरूप । जे गुणीं मिळे दिसे तद्रूप ।
परी गुणदोष पुण्यपाप । जीवासी अल्प लागेना ॥ २६ ॥
जीव स्वभावतः चित्स्वरूप आहे, पण तो ज्या गुणाशी संलग्न होतो, त्यासारखा दिसतो. तरी गुणदोष किंवा पापपुण्य जीवाला मुळींच लागत नाही २६.
प्रत्यक्ष प्रतिबिंबीं मिथ्यता । दिसे निजबिंबाचिया सत्ता ।
तेवीं जीवशिवांसी अभिन्नता । जाण तत्त्वतां निश्चित ॥ २७ ॥
मूळबिंबाच्या सामर्थ्यानेच प्रत्यक्ष प्रतिबिंबामध्ये गुणांचे मिथ्यात्व दिसते, त्याप्रमाणे जीवामध्ये व शिवामध्ये अभिनव निश्चित आहे २७.
जीवशिवांचें एकपण । तेणें सव्विसांमाजीं जाण ।
एक तत्त्व होतां न्यून । शेष तेंचि पूर्ण पंचवीस ॥ २८ ॥
अशा प्रकारें जीवशिवांचे ऐक्य मानलें असतां सव्वीस तत्त्वांतून एक तत्त्व कमी होऊन बाकी पंचवीसच राहतात २८.
आशंका – “जीवशिवांचें एकपण । ऐसें जें जाणणें तें ‘ज्ञान’ ।
तें एक तत्त्व येथें आन । त्यांमाजीं जाण उपजलें ॥ २९ ॥
[आशंका] ‘मग आतां जीवशिवाचे ऐक्य आहे असें जें जाणणें तें एक ज्ञानच होय. एक नवेंच तत्त्व त्यामध्ये उत्पन्न झाले २९.
तें ज्ञानतत्त्व अंगीकारितां । पंचवीस सव्वीस तत्त्वकथा ।
दोनी मतें होती वृथा” । ऐसें सर्वथा न म्हणावें ॥ १३० ॥
त्या ज्ञानतत्त्वाचा स्वीकार केल्यास पंचवीस व सव्वीस तत्व ही दोन्ही मते व्यर्थ होतात पण असे कधी म्हणता कामा नये १३०.
येथ मूळींचें निरूपण । श्लोकाचे अंतींचा चरण ।
ज्ञान तें प्रकृतीचा गुण । त्यासी वेगळेपण असेना ॥ ३१ ॥
कारण, मूळच्या श्लोकाच्या शेवटच्या चरणांत (‘ज्ञानप्रकृतेर्गुणः ‘.) ज्ञान हा प्रकृतीचा गुण आहे, तो वेगळा नाही, असे निरूपण केलें आहे ३१.
गुणकर्मांच्या खटपटा । प्रपंच अज्ञानें अतिलाठा ।
ज्ञान अज्ञानाचा सत्त्ववांटा । जेवीं कांटेनि कांटा फेडिजे ॥ ३२ ॥
गुणकर्माच्या खटपटीमुखें प्रपंच हा अज्ञानाने फार माजलेला आहे आणि ज्ञान हा अज्ञानाचा सत्त्वांश आहे. काट्यानेच काटा काढल्याप्रमाणे ज्ञानाने अज्ञान घालविले पाहिजे ३२.
शोधित जो सत्त्वगुण । त्या नांव बोलिजे मुख्य ‘ज्ञान’ ।
तेंही गुणांमाजीं पडे जाण । वेगळेंपण नव्हेचि तत्त्व ॥ ३३ ॥
शुद्ध झालेला जो सत्त्वगुण असतो, त्यालाच ‘मुख्य ज्ञान’ असे म्हणतात. ही गुणांमध्येच मोडते. त्याला निराळे तत्त्व म्हणता येत नाही ३३.
ज्ञान स्वतंत्र तत्त्व होतें । तरी नासतीं दोनी मतें ।
तें पडे गुणाअंतौतें । यालागीं दोनी मतें निर्दुष्ट ॥ ३४ ॥
ज्ञान हें जर निराळे तत्त्व झाले असते, तर ही दोन्ही मते व्यर्थ होती; पण ते गुणांमध्येच मोडत असल्याने ती दोन्ही मते निर्दोष आहेत ३४.
तेचि त्रिगुणांची व्यवस्था । तुज मी सांगेन आतां ।
ऐक उद्धवा तत्त्वतां । गुण सर्वथा आविद्यक ॥ ३५ ॥
उद्धवा ! आता मी तुला त्या तीन गुणांची व्यवस्था सांगतो. गुण हे निखालस अविद्यात्मकच आहेत ३५.
प्रकृतिर्गुणसाम्यं वै प्रकृतेर्नात्मनो गुणाः ।
सत्त्वं रजस्तम इति स्थित्युत्पत्त्यन्तहेतवः ॥ १२ ॥
[श्लोक १२] तीन गुणांची साम्यावस्था हेच प्रकृतीचे स्वरूप आहे म्हणून सत्त्व, रज आणि तम हे गुण प्रकृतीचेच आहेत, आत्म्याचे नव्हेत हेच जगाची स्थिती, उत्पत्ती आणि प्रलय यांना कारण आहेत. (१२)
उत्पत्तिस्थितिनिर्दळण । हें त्रिगुणांचें कार्य पूर्ण ।
‘गुणसाम्य’ ते प्रकृति जाण । आत्मा ‘निर्गुण’ गुणातीत ॥ ३६ ॥
उत्पत्ति, स्थिति आणि नाश हे कार्य त्रिगुणांचे आहे. त्या तीन गुणांची जी साम्यावस्था ती प्रकृति होय. आत्मा हा निर्गुण म्ह० गुणातीत आहे ३६.
म्हणशी परमात्मा गुणातीत । परी जीवात्मा गुणग्रस्त ।
हेही गा मिथ्या मात । ऐक वृत्तांत सांगेन ॥ ३७ ॥
आतां तूं म्हणशील की, परमात्मा जरी गुणातीत असला, तरी जीवात्मा गुणांनी प्रस्त आहे की नाही? पण ती गोष्टही खोटी. कसे ते सांगतों ऐक ३७.
चंद्र निश्चळ निजस्वभावें । तो चाले त्या अभ्रासवें ।
दिसे जेवीं सवेग धांवे । तेवीं गुणस्वभावें जीवात्मा ॥ ३८ ॥
चंद्र हा मूळांत निश्चल असतो. पण तो ढगांबरोबर झपाट्यानें चालतो असे दिसते. त्याप्रमाणेच गुणस्वभावामुळे जीवात्मा तसा काही तरी भासतो ३८.
घटामाजी उदक भरितां । घटाकाश भिजेना सर्वथा ।
तेवीं जीवात्मा गुणीं वर्ततां । अलिप्तता गुणकर्मीं ॥ ३९ ॥
घटांत पाणी भरले असतां घटाकाश ओलें होत नाहीं; त्याप्रमाणे जीवात्माही गुणांमध्ये वागत असतांना गुणकर्मामध्ये अलिप्त असतो ३९.
जीव अहंकर्तेपणीं विख्यात । तो केवीं म्हणावा कर्मातीत ।
येचि अर्थीं कृष्णनाथ । विशदार्थ सांगत ॥ १४० ॥
पण जीव हा ‘मी कर्ता’ असा अहंकार धरण्यामध्ये प्रसिद्ध आहे. तो ‘कर्मातीत’ असें कसें म्हणावें? याचाच खुलासा श्रीकृष्ण सांगतात १४०.
सत्त्वं ज्ञानं रजः कर्म तमोऽज्ञानमिहोच्यते ।
गुणव्यतिकरः कालः स्वभावः सूत्रमेव च ॥ १३ ॥
[श्लोक १३] या विवेचनात सत्त्वगुणच ज्ञान आहे, रजोगुणच कर्म आहे आणि तमोगुणच अज्ञान म्हटले गेले आहे तसेच गुणांमध्ये क्षोभ उत्पन्न करणारा ईश्वरच काळ आहे आणि सूत्र म्हणजे महत्तत्त्वच स्वभाव होय. (१३)
सत्त्वगुणास्तव ‘ज्ञान’ । रजोगुणें ‘कर्म’ जाण ।
मोह आलस्ययुक्त गहन । तमीं ‘अज्ञान’ नांदत ॥ ४१ ॥
सत्त्वगुणापासून ज्ञान होते; रजोगुणापासून कर्म होते; आणि तमामध्ये आळसयुक्त मोह व अज्ञान नांदत असते ४१.
सत्त्वादि जे तिन्ही गुण । केवळ प्रकृतीचे हे जाण ।
यांसी स्वतंत्रपण । नव्हेचि जाण या हेतू ॥ ४२ ॥
सत्वादिक जे तिन्ही गुण आहेत ते केवळ प्रकृतीचेच आहेत, म्हणूनच त्यांना स्वतंत्रपणा नाही ४२.
गुणक्षोभक ‘काळ’ देख । तो पुरुषाचा अवलोक ।
पुरुष काळ हा नामविशेख । स्वरूपें एक हे दोन्ही ॥ ४३ ॥
काळ हा गुणांचा क्षोभक आहे. तो पुरुषाचा अवलोक म्ह• ‘ईक्षण’ अथवा पाहणे आहे. पुरुष आणि काळ हा नांवांतच काय तो भेद, स्वरूपतः दोन्ही एकच आहेत ४३.
स्वाभाविक मायेचें स्फुरण । प्रथम कार्य जें निर्माण ।
त्या नांव ‘महत्तत्त्व’ जाण । ‘सूत्र’ ‘प्रधान’ ज्यासी म्हणती ॥ ४४ ॥
आणखी मायेचें जें स्वभावसिद्ध स्फुरण होऊन जे पहिले कार्य निर्माण होते, त्याला ‘महत्तत्व’ असे नाव आहे व त्यालाच ‘प्रधान-सूत्र’ असेही म्हणतात ४४.
यालागीं प्रकृतीहूनि भिन्न । यासी न ये वेगळेंपण ।
हे प्रकृति कार्यकारणीं अभिन्न । तत्त्वविचक्षण मानिती ॥ ४५ ॥
म्हणून त्यालाही प्रकृतीहून मित्रत्व येत नाही, असे विचारी लोक समजतात ४५.
अठ्ठावीस तत्त्वें पूर्वोक्त । हें भगवंताचें निज मत ।
तेंचि अडीचा श्लोकीं सांगत । संख्यातत्त्वार्थ निजबोधें ॥ ४६ ॥
पूर्वी सांगितलेली अठ्ठावीस तत्त्वें हें भगवंताचे मत आहे. ह्याविषयींच पुढील अडीच श्लोकांमध्यें प्रतिपादन करितात ४६.
पुरुषः प्रकृतिर्व्यक्तमहङ्कारो नभोऽनिलः ।
ज्योतिरापः क्षितिरिति तत्त्वान्युक्तानि मे नव ॥ १४ ॥
श्रोत्रं त्वग्दर्शनं घ्राणो जिह्वेति ज्ञानशक्तयः ।
वाक्पाण्युपस्थपाय्वङ्घ्रि कर्माण्यङ्गोभयं मनः ॥ १५ ॥
शब्दः स्पर्शो रसो गन्धो रूपं चेत्यर्थजातयः ।
गत्युक्त्युत्सर्गशिल्पानि कर्मायतनसिद्धयः ॥ १६ ॥
[श्लोक १४-१६] पुरूष, प्रकृती, महत्तत्त्व, अहंकार, आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी ही नऊ तत्त्वे, मी अगोदरच सांगितली आहेत कान, त्वचा, डोळे, नाक आणि जीभ ही पाच ज्ञानेंद्रिये वाणी, हात, पाय, गुदद्वार आणि जननेंद्रिय ही पाच कर्मेंद्रिये. तसेच कर्मेंद्रिये व ज्ञानेंद्रिये असे उभयरूप मन, अशी अकरा इंद्रिये आणि शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे ज्ञानेंद्रियांचे पाच विषय अशा प्रकारे तीन, नऊ, अकरा आणि पाच अशी सर्व मिळून अठ्ठावीस तत्त्वे होतात कम]द्रियांच्या द्वारे होणारी, चालणे, बोलणे, मलमूत्र त्याग आणि काम करणे या पाच कर्मांमुळे तत्त्वांची संख्या वाढत नाही यांना कर्मेंद्रियस्वरूप मानावे. (१४-१६)
प्रकृति पुरुष महत्तत्त्व । महाभूतें अहंभाव ।
अठ्ठाविसांत हीं तत्त्वें नव । इतर वैभव तें ऐक ॥ ४७ ॥
त्या अठ्ठाविसांत प्रकृति, पुरुष, महत्तत्त्व, पंचमहाभूते आणि अहंकार ही नऊ तत्त्वे आहेत. बाकीच्यांचेही माहात्म्य ऐक ४७.
मुख्य ‘ज्ञानेंद्रियें’ पांच जाण । पांच ‘कर्मेंद्रियें’ आन ।
कर्मेंद्रियें ज्ञानेंद्रियांअधीन । स्वतां गमन त्यां नाहीं ॥ ४८ ॥
मुख्य ज्ञानेंद्रिये पांच, दुसरी पांच कर्मेदिये. कर्मेदिये ही ज्ञानेंद्रियांच्या स्वाधीन असतात. त्यांना स्वतःचे चलन नाही ४८.
आंधळें पायीं चालों जाणे । पांगुळ केवळ देखणें ।
अंधें पंगू खांदीं घेणें । परी बोलें वर्तणें देखण्याचेनि ॥ ४९ ॥
आंधळ्याला पायाने चालतां येते; पांगळ्याला फक्त पाहतां येते; आंधळ्याने पांगळ्याला खांद्यावर घेतले, तर पाहणाऱ्याच्या शब्दाप्रमाणेच त्यास चालावे लागते ४९.
तेंवी ज्ञानेंद्रियां कर्मेंद्रियांसी । संगती घडली असे तैशी ।
यालागीं मुख्यत्वें ज्ञानेंद्रियांसी । हृषीकेशी बोलिला ॥ १५० ॥
त्याप्रमाणेच ज्ञानेंद्रियांची आणि कर्मेंद्रियांची सांगड जुळलेली आहे. म्हणून श्रीकृष्णांनी ज्ञानेंद्रियांलाच मुख्यत्व दिले आहे १५०.
उभय इंद्रियां चाळक । तें मनचि गा एकलें एक ।
येणेंचि अकरा इंद्रियें देख । यदुनायक सांगत ॥ ५१ ॥
परंतु दोन्ही इंद्रियांना चालक असें एक मनच आहे. ह्याकरितां श्रीकृष्णांनी इंद्रिये अकरा सांगितली ५१.
इंद्रियविषयनिरूपण । स्वयें सांगताहे नारायण ।
मुख्यत्वें विषय पांच जाण । तयाचें साधन गत्यादिक ॥ ५२ ॥
त्या इंद्रियांच्या विषयांचे निरूपण श्रीकृष्ण स्वतः सांगत आहेत. मुख्य विषय पांच असून त्यांचे साधन व क्रिया इत्यादि भगवान् सांगतात ५२.
रसस्पर्शादि लक्षण । पांचही विषय हे जाण ।
गत्यादि क्रियाचरण । तें जाण साधन या विषयांचें ॥ ५३ ॥
शब्द-स्पर्श-रूप-रस-गंध असे पांच विषय आहेत (हे ज्ञानेंद्रियगम्य होत), गमन-भाषण इ. क्रियाचरण हे त्या विषयांचे साधन होय ५३.
दृष्टि रूपातें प्रकाशी । चरण धांवती तयापाशीं ।
हस्त उद्यत घ्यावयासी । रसस्पर्शसिद्धीसी विषयांचे ॥ ५४ ॥
दृष्टि ही रूपविषय दाखविते; आणि पाय त्याच्याकडे धावत जातात. रसविषय व स्पर्शसुख इ. घेण्याला हात पुढे होत असतात ५४.
एवं उभय इंद्रियीं जाण । विषय पांचचि प्रमाण ।
नव्हे अधिक तत्त्व गणन । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ५५ ॥
मिळून दोन्ही इंद्रियांमध्ये विषय मुख्य पांचच आहेत. त्यांची संख्या वस्तुतः अधिक होतच नाहीं असें श्रीकृष्णांनी सांगितले ५५.
नव एकादश तत्त्वलक्षण । मागां दों श्लोकीं केलें निरूपण ।
येणें श्लोकें परम प्रमाण । विषय जाण पांचचि ॥ ५६ ॥
नऊ आणि अकरा तत्त्वांचे लक्षण पूर्वी दोन श्लोकांत सांगितलेच आहे. या श्लोकांवरून विषय हे पांचच ठरतात ५६.
केवळ ज्ञानेंद्रियीं भोगु नव्हे । कर्मेंद्रियींही भोग न पावे ।
उभयसंयोगें भोग पावे । परी विषय आघवे पांचचि ॥ ५७ ॥
केवळ ज्ञानेंद्रियांना विषयाचा उपभोग घेतां येत नाही; किंवा फक्त कर्मेंद्रियांनाही तो मिळत नाही. दोहोंचा संयोग होतो, तेव्हांच त्यांचा भोग घडतो. पण विषय अवधे पांचच ५७.
इंहीं पांच विषयीं आपण । व्यापिलें चतुर्दश भुवन ।
सुरासुर भुलविले जाण । यांचें गोडपण मारक ॥ ५८ ॥
या पांचच विषयांनी ही चतुर्दश भुवनें व्यापून टाकिलीं आहेत. यांची चटक प्राणघातक असून तिने सुरनरांनाही मोहून टाकले आहे ५८.
जेवीं कां मैंद गोडपणें । संगती लागोनि जीव घेणें ।
तेवीं विषयसंगाचें साजणें । बांधोनि नेणें नरकासी ॥ ५९ ॥
ठक लोक ज्याप्रमाणे स्नेहभावाने सोबतीला राहून संधि सांपडतांच प्राण घेतात, त्याप्रमाणे विषयसंग हा जीवाला बांधून नरकांत टाकतो ५९.
नरकीं निरय भोगिती । तेथही न सोडी विषयासक्ती ।
या विषयांऐसा विश्वासघाती । आन त्रिजगतीं असेना ॥ १६० ॥
नरकांत दुःख भोगतात तरी तेथेसुद्धा विषयासक्ति सोडीत नाहीत. विषयाइतका विश्वासघातकी त्रिभुवनांत मिळायचा नाही १६०.
ते हे पंच विषय प्रमाण । पांचचि परी अतिदारुण ।
ब्रह्मादिक नाडले जाण । इतरांचा कोण पडिपाडु ॥ ६१ ॥
असे हे विषय पांचच आहेत, पण ते महाभयंकर आहेत; त्यांच्यामुळे ब्रह्मदेवासारखे संकटांत पडतात, मग इतरांचा पाड काय ? ६१.
विषयांचें जें गोडपण । तें विखाहूनि दारुण ।
विष एकदां आणी मरण । पुनः पुनः मारण विषयांचें ॥ ६२ ॥
विषयांचा गोडपणा आहे तो विषाहूनही भयंकर होय. कारण विषाने एकदाच मरण येते, विषयांमुळे पुनःपुन्हा मरण ओढवतें ६२.
पुढती जन्म पुढती मरण । हें विषयास्तव घडे जाण ।
संसाराचें सबळपण । विषयाधीन उद्धवा ॥ ६३ ॥
पुन्हा जन्म आणि पुन्हा मरण, हें विषयांमुळेच घडते. उद्धवा ! जन्ममरणरूप संसाराचा जोर विषयाधीनच आहे ६३.
जेथ विषयांचा विषयत्यागु । तेथें उन्मळे भवरोगु ।
त्याचा आंदणा मी श्रीरंगु । ज्यासी विषयभोगु नावडे ॥ ६४ ॥
जेव्हां विषयांचा म्ह. विषयासक्तीचा त्याग होतो, तेव्हांच संसाररूपी रोग उन्मळून पडतो. ज्याला विषयांचे भोग आवडत नाहीत, त्याचा मी श्रीकृष्ण दास होऊन राहतों ६४.
ते हे पंच विषय गा जाण । तुज म्यां केले निरूपण ।
आतां त्रिगुणांचें लक्षण । ऐक सावधान सांगतों ॥ ६५ ॥
असे हे पांच विषय मी तुला सांगितले. आतां तीन गुणांचेही लक्षण सांगतो. तेंही नीट लक्ष देऊन श्रवण कर ६५.
उत्पत्तिस्थितिनिर्दळण । त्रिगुणांस्तव घडे जाण ।
यालागीं स्वयें श्रीकृष्ण । तिन्ही गुण अंगीकारी ॥ ६६ ॥
उत्पत्ति, स्थिति आणि लय हे त्रिगुणांमुळेच होतात. म्हणून श्रीकृष्ण त्या तिन्ही गुणांचा स्वीकार करतात ६६.
अंगीकारूनि तिन्ही गुण । अठ्ठावीस तत्त्वें केलीं पूर्ण ।
हें कृष्णसंमत लक्षण । उद्धवा जाण निश्चित ॥ ६७ ॥
हे तिन्ही गुण जमेस धरून अठ्ठावीस तत्वे त्यांनी पूर्ण केली. उद्धवा ! हेच श्रीकृष्णाच्या मताचें खरें लक्षण आहे, असे निश्चित समजावें ६७.
त्रिगुणगुणेंवीण प्रकृती । सृष्टिसर्जनीं नाहीं शक्ती ।
गुणद्वारा उत्पत्तिस्थिती । संहारी अंतीं स्वकार्यें ॥ ६८ ॥
त्रिगुणांशिवाय प्रकृतीलाही सृष्टि करण्याची शक्ति नाहीं; गुणांच्या द्वारानेच उत्पत्ति, स्थिति आणि अंतीं संहार ही कार्य ती करिते ६८.
तेचि अर्थींचें निरूपण । स्वयें सांगताहे श्रीकृष्ण ।
कार्यकारणलक्षण । यथार्थ जाण विभाग ॥ ६९ ॥
ह्याच अर्थाने कार्यकारणाचे लक्षण आणि यथार्थ विभाग श्रीकृष्ण स्वतः सांगत आहेत ६९.
सर्गादौ प्रकृतिर्ह्यस्य कार्यकारणरूपिणी ।
सत्त्वादिभिर्गुणैर्धत्ते पुरुषोऽव्यक्त ईक्षते ॥ १७ ॥
[श्लोक १७] सृष्टीच्या प्रारंभी कार्य. (अकरा इंद्रिये आणि पंचमहाभूते) आणि कारण. (महत्तत्त्व इत्यादी) यांच्या रूपाने प्रकृतीच असते तीच सत्त्वादी गुणांच्या रूपाने विश्व स्वतःमध्ये धारण करते अव्यक्त परमात्मा या प्रकृतीचा फक्त साक्षी असतो. (१७)
प्रकृतीपासाव विकारमेळा । त्रिगुणांचिया गुणलीळा ।
सात कारणें कार्ये सोळा । ऐक वेगळा विभाग ॥ १७० ॥
प्रकृतीपासूनच सारे विकार, त्रिगुणांच्या साऱ्या लीला, सात कारणे आणि सोळा कार्यें उत्पन्न होतात. त्यांचे निरनिराळे विभागही ऐक १७०.
महदहंकारमहाभूतें । सातही ‘कारणे’ निश्चितें ।
अकरा इंद्रियें विषययुक्तें । जाणावीं येथे ‘कार्यें’ सोळा ॥ ७१ ॥
महत, अहंकार, पंचमहाभूते ही खरोखर सात ‘कारणे’ होत. आणि पंचविषययुक्त अकरा इंद्रिये ही येथे सोळा ‘कार्य’ म्हणून समजावीत ७१.
यापरी निजप्रकृती । रजोगुणातें धरोनि हातीं ।
कार्यकारणांचिया युक्तीं । करी उत्पत्ती सृष्टीची ॥ ७२ ॥
अशा प्रकारची ही प्रवृत्ति रजोगुणाला हाताशी धरून कार्यकारणांच्या युक्तीने सृष्टीची उत्पत्ति करते ७२.
सृजिलिये सृष्टीसी जाण । सत्त्वगुणें करी पालन ।
तमोगुण निर्दळण । प्रकृति आपण स्वयें करी ॥ ७३ ॥
उत्पन्न केलेल्या सृष्टीचे सत्त्वगुणाने पालन करते; आणि तमोगुणानें प्रकृति आपण होऊनच तिचा संहार करते ७३.
पुरुषें न करितां ‘ईक्षण’ । उत्पत्ति स्थिति निर्दळण ।
प्रकृतीचेनि नव्हे जाण । तेंही उपलक्षण अवधारीं ॥ ७४ ॥
परंतु पुरुषाने जर तिच्याकडे पाहिले नाही, तर प्रकृतीच्यानेही उत्पत्ति, स्थिति, संहार होत नाही. त्याचेही कारण श्रवण कर ७४.
हात पाय न लावितां जाण । केवळ कूर्मीचें अवलोकन ।
करी पिलियांचें पालन । तैसें ईक्षण पुरुषाचें ॥ ७५ ॥
हातपाय न हालवितां कांसवी आपल्या दृष्टीनेच जसें पिलाचे पालन करते त्याप्रमाणेच हे पुरुषाचे पाहाणे असते ७५.
कां सूर्याचिया निजकिरणीं । जेवीं अग्नीतें स्रवे मणी ।
तेणें स्वधर्मकर्में ब्राह्मणीं । कीजे यज्ञाचरणीं महायागु ॥ ७६ ॥
किंवा सूर्याच्या किरणामुळे ज्याप्रमाणे सूर्यकांत मण्यांतून आग्न निघतो, आणि त्याच्या योगानेच ब्राह्मण आपल्या स्वधर्मकर्मानें यज्ञयागादिक किंवा मोठमोठे होम करतात ७६.
तैसें हें जाण चिन्ह । येणें होय कार्य कारण ।
चाले स्वधर्मआ चरण । यापरी जाण उद्धवा ॥ ७७ ॥
उद्धवा ! त्याप्रमाणेच हेही लक्षण आहे. ह्याच रीतीने कार्य आणि कारण उत्पन्न होऊन स्वधर्माचरण चालतें ७७.
ऐसें चालता प्रकृतिपर । ब्राह्मण करिती स्वाचार ।
तेणें वृद्धि कर्माचार । परापर उद्धवा ॥ ७८ ॥
प्रकृतीच्या अनुरोधाने चालून ब्राह्मण आपला आचार करीत असतात आणि त्यामुळेच उच्च नीच कर्माची वृद्धि होते ७८.
तेवीं पुरुषाचें ईक्षण । प्रकृति लाहोनि आपण ।
उत्पत्ति-स्थिति-निर्दळण । करावया पूर्ण सामर्थ्य पावे ॥ ७९ ॥
ह्याचप्रमाणे पुरुषाचे ईक्षण मिळवून प्रकृति ही उत्पत्ति, स्थिति व संहार करण्याचे सामर्थ्य पावते ७९.
छायामंडपींचें विचित्र सैन्य । दिसावया दीपचि कारण ।
तेवीं प्रकृतिकार्यासी जाण । केवळ ईक्षण पुरुषाचें ॥ १८० ॥
पडद्यावर दिव्याच्या प्रकाशाने दाखविलेल्या चित्रांतील विचित्र सैन्य दिसायला ज्याप्रमाणे दिवाच कारण असतो, त्याप्रमाणे प्रकृतीच्या कार्याला पुरुषाचे ईक्षणच कारण असते १८०.
जगाचें आदिकारण । प्रकृति होय गा आपण ।
प्रकृति प्रकाशी पुरुष जाण। तो महाकारण या हेतु ॥ ८१ ॥
जगाचे आदिकारण प्रकृति होय; आणि प्रकृति ही पुरुषाकडून प्रकाशिली जात असल्यामुळे पुरुष हा महाकारण होय ८१.
प्रकृति व्यक्त पुरुष अव्यक्त । हे विकारी तो विकाररहित ।
हे गुणमयी गुणभरित । तो गुणातीत निजांगें ॥ ८२ ॥
प्रकृति दृश्य व पुरुष अदृश्य आहे; ही विकारी आहे, तो अविकारी आहे; ही गुणयुक्त आहे, आणि तो स्वतःसिद्ध गुणातीत आहे ८२.
प्रकृति स्वभावें चंचळ । पुरुष अव्ययत्वें अचळ ।
प्रकृति बद्धत्वें शबळ । पुरुष केवळ बंधातीत ॥ ८३ ॥
प्रकृति स्वभावानें चंचल, आणि पुरुष हा अव्यय असल्यामुळे अचळ आहे. प्रकृति ही औपाधिक असल्यामुळे बद्ध आहे; आणि पुरुष हा बंधनापासून अगदी मुक्त आहे ८३.
प्रकृति स्वभावें सदा शून्य । पुरुष केवळ चैतन्यघन ।
प्रकृतीस होय अवसान । पुरुष तो जाण अनंत ॥ ८४ ॥
प्रकृति ही स्वभावतः शून्य म्ह• जड आहे; आणि पुरुष हा केवळ चैतन्यघन आहे. प्रकृतीला अंत आहे; आणि पुरुष हा अनंत आहे ८४.
प्रकृति केवळ निरानंद । यालागीं तेथ विषयच्छंद ।
पुरुष पूर्ण परमानंद । विषयकंदच्छेदक ॥ ८५ ॥
प्रकृति ही आनंदरहित असल्यामुळे तिच्यांत विषयाचा छंद आहे; पुरुष हा पूर्णपणे परमानंदस्वरूप असल्यामुळे विषयाचे मूळच छेदून टाकणारा आहे ८५,
प्रकृतिपुरुषांचें वेगळेंपण । तुज म्यां सांगितलें संपूर्ण ।
हेचि परमार्थाची निजखूण । पुरुष तो भिन्न प्रकृतीसी ॥ ८६ ॥
अशा प्रकारें प्रकृतीचे आणि पुरुषाचे भिन्न भिन्न स्वरूप सारें मी तुला सांगितले. परमार्थातील मुख्य खूण ती हीच की, पुरुष हा प्रकृतीहून भिन्न आहे ८६.
तेंचि जाणावया विशद । नाना मतांचे मतवाद ।
त्या मतांचा मतप्रबोध । तुज मी शुद्ध सांगेन ॥ ८७ ॥
हेच स्पष्ट कळावयासाठी नाना मतांचे मतवाद झाले आहेत. त्या मतांचा शुद्ध प्रबोध मी तुला सांगतों ऐक ८७.
व्यक्तादयो विकुर्वाणा धातवः पुरुषेक्षया ।
लब्धवीर्याः सृजन्त्यण्डं संहताः प्रकृतेर्बलात् ॥ १८ ॥
[ श्लोक १८] महत्तत्त्व इत्यादी प्रकृतीचे कार्य व अहंकारादिकांचे कारण असणारे पदार्थ आदिपुरूषाच्या संकल्पामुळे शक्ती प्राप्त करून घेऊन एकमेकांत मिसळतात आणि प्रकृतीच्या साह्याने ब्रह्मांड निर्माण करतात. (१८)
पुरुषेक्षण झालिया प्राप्त । महदहंकरादि पदार्थ ।
प्रकृतिबळें समस्त । एकत्र होत ब्रह्मांडें ॥ ८८ ॥
पुरुषाचे ईक्षण प्राप्त झाले असतां प्रकृतीच्या सामर्थ्याने महत्तत्त्व-अहंकारादि पदार्थ एकत्र होऊन ब्रह्मांड उत्पन्न होते ८८.
पुरुषावलोकें वीर्यप्राप्ती । लाहोनि ब्रह्मांडांतें धरिती ।
यालागीं यातें ‘धातु’ म्हणती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ८९ ॥
पुरुषाच्या अवलोकनानेच प्रकृतीला वीर्यप्राप्ति होऊन ती ब्रह्मांडाला धारण करते; म्हणूनच उद्धवा ! ह्याला ‘धातु’ असे म्हणतात ८९.
हें सामान्यतां निरूपण । तुज म्यां सांगितलें आपण ।
जे नाना मतवादि जाण । विशेष लक्षण बोलती ॥ १९० ॥
हे मी तुला सामान्य लक्षण सांगितले; परंतु अनेक प्रकारचे मतवादी आहेत, ते तिचे विशेष लक्षणही सांगतात ९०.
सप्तैव धातव इति तत्रार्थाः पञ्च खादयः ।
ज्ञानमात्मोभयाधारस्ततो देहेन्द्रियासवः ॥ १९ ॥
[श्लोक १९] उद्धवा ! जे लोक तत्त्वांची संख्या सात मानतात, त्यांच्या विचारसरणीनुसार आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी ही पंचमहाभूते, सहावा जीव आणि सातवा परमात्मा होय तो जीव व जग या दोहोंचा आधार आहे या सातांपासून देह, इंद्रिये व प्राण उत्पन्न होतात म्हणून ते स्वतंत्र मानले नाहीत. (१९)
पंचवीस सव्वीस तत्त्वगणन । मागां सांगितलें निरूपण ।
आतां साता तत्त्वांचें लक्षण । ऐक सुलक्षण सांगेन ॥ ९१ ॥
पंचवीस आणि सव्वीस तत्त्वांच्या संख्येचे निरूपण मी तुला पूर्वी सांगितले; आतां सात तत्त्वांचे लक्षणही यथार्थ रीतीने सांगतों ऐक ९१.
महाभूतें जीव शिव । हा सातां तत्त्वांचा जाण भाव ।
प्राणेंद्रियसमुदाव । याचिपासाव पैं होत ॥ ९२ ॥
पंचमहाभूते, जीव आणि शिव हें सात तत्त्वांचे स्वरूप आहे. प्राणांचा आणि इंद्रियांचा समुदायही ह्यांच्याचपासून होतो ९२.
महाभूतें अचेतन । यांसी चेतविता जीवजाण ।
त्याचाही द्रष्टा परिपूर्ण । ईश्वर जाण सातवा ॥ ९३ ॥
महाभूतें अचेतन आहेत. त्यांना चेतना देणारा जीव आहे. त्याचाही परिपूर्ण दृष्टा ईश्वर हा सातवा होय ९३.
माया महत्तत्त्व अहं जें येथ । हें सूक्ष्मकारणें निश्चित ।
यांपासोनि स्थूळ भूतें होत । कारणें कार्यांत सबाह्य ॥ ९४ ॥
माया, महत्तत्त्व आणि अहंकार येथे आहेत. ह्यांच्यापासूनच सूक्ष्म कारणे उत्पन्न होतात; आणि त्यांच्यापासून स्थूल भूतें उत्पन्न होतात. कार्यात कारणे सबाह्य व्यापून असतात ९४.
मनइंद्रियादि जें कां येथें । तेंही यांत अंतर्भूतें ।
एवं जाण येणें मतें । पांच महाभूतें नेमिलीं ॥ ९५ ॥
मनइंद्रियादिकांचाही यांतच अंतर्भाव होतो. अशा प्रकारे ह्या मताने पंचमहाभूते नेमली आहेत ९५.
यांसी चेतविता जीव । सर्वनियंता सदाशिव ।
एवं सप्ततत्त्वसमुदाव । तो हा उगव उद्धवा ॥ ९६ ॥
ह्या सर्वांना चेतना देणारा जीव होय: आणि त्या सर्वांचा नियंता सदाशिव होय. उद्धवा ! अशा प्रकारे हा सात तत्त्वांचा समुदाय स्पष्ट झाला आहे ९६.
आतां सहा तत्त्वें ये पक्षीं जाण । तुज मी सांगेन निरूपण ।
जें बोलिले ऋषिजन । तें विवंचन अवधारीं ॥ ९७ ॥
आतां सहा तत्वे म्हणून जो पक्ष आहे, त्याचेही मी तुला निरूपण करतो. त्याविषयी ऋषींचे म्हणणे काय आहे व त्याची संगति कशी तेही सांगतों ऐक ९७.
षडित्यत्रापि भूतानि पञ्च षष्ठः परः पुमान् ।
तैर्युक्त आत्मसम्भूतैः सृष्ट्वेदं समुदपाविशत् ॥ २० ॥
[श्लोक २०] जे फक्त सहा तत्त्वांचा स्वीकार करतात, ते असे म्हणतात की, पाच महाभूते आणि सहावा परमात्मा तो परमात्मा आपण निर्माण केलेल्या पंचमहाभूतांनी युक्त होऊन देह इत्यादींची सृष्टी निर्माण करतो आणि त्यामध्ये जीवरूपाने प्रवेश करतो. (२०)
पाहें पां पंच महाभूतें । पुरुषें सृजिलिया येथें ।
स्वयें प्रवेशला तेथें । यालागीं त्यातें ‘षट्’ म्हणती ॥ ९८ ॥
पंचमहाभूतें ही पुरुषच निर्माण करून तोही त्यांतच प्रवेश करतो, म्हणून त्याला सहावें तत्त्व म्हणतात ९८.
ज्यांचेनि मतें तत्त्वें चारी । तयांची ऐक नवलपरी ।
जो देखे प्रत्यक्षाकारीं तोचि धरी तत्त्वार्थ ॥ ९९ ॥
आतां ज्यांच्या मताने चारच तत्त्वे आहेत, त्यांचाही चमत्कार ऐक. तो जो प्रत्यक्ष साकार पदार्थ पाहातो, त्यालाच तो तत्व असें समजतो ९९.
चत्वार्येवेति तत्रापि तेज आपोऽन्नमात्मनः ।
जातानि तैरिदं जातं जन्मावयविनः खलु ॥ २१ ॥
[श्लोक २१] काहीजण आत्म्यापासून तेज, जल आणि पृथ्वीची उत्पत्ती झाली आहे, म्हणून ही चारच तत्त्वे आहेत असे म्हणतात कारण सर्व कार्यांचा जन्म यांच्यापासूनच आहे. (२१)
प्रत्यक्ष देखिजेती नयनीं । अग्नि आप आणि अवनी ।
तींचि सत्यत्वें मानी । मतज्ञानी मतवादी ॥ २०० ॥
अग्नि, जल आणि पृथ्वी ही प्रत्यक्ष डोळ्याला दिसतात, तीच खरी तत्त्वे होत; असे ते मतवादी मानतात २००.
या स्थूळातें चेतविता । तो आत्मा घेतला चौथा ।
या तिहींवीण साकारता । न घडे सर्वथा सृष्टीसी ॥ १ ॥
आणि ह्या स्थूलांना चेतविणारा जो आत्मा तो चौथा धरतात. या तिन्हीशिवाय सृष्टीला साकारता कधीच यावयाची नाही १.
नाम रूप क्रिया कारण । सृष्टीसी मुख्यत्वें यांचेनि जाण ।
यालागीं भूतें तीनचि प्रमाण । बोलतें लक्षण तें ऐसें ॥ २ ॥
सृष्टीला मुख्यत्वेकरून ह्यांच्याचमुळे नाम, रूप, क्रिया व कारण प्राप्त होत असतात. म्हणून तीनच भूतें प्रमाणभूत होत, असे त्यांचे म्हणणे आहे २.
एवं भूतें तीन आत्मा चौथा । हे चौं तत्त्वांची व्यवस्था ।
आतां सतरा तत्त्वांची कथा । ऐक तत्त्वतां सांगेन ॥ ३A ॥
अशा प्रकारें भूतें तीन आणि आत्मा हा चौथा, ही चार तत्त्वांची व्यवस्था झाली. आतां सतरा तत्त्वांचे प्रकार यथार्थ रीतीने सांगतों ऐक ३A.
संख्याने सप्तदशके भूतमात्रेन्द्रियाणि च ।
पञ्च पञ्चैकमनसा आत्मा सप्तदशः स्मृतः ॥ २२ ॥
[ श्लोक २२] काही लोक पंच महाभूते, पाच तन्मात्रा, पाच ज्ञानेंद्रिये, एक मन आणि एक आत्मा, अशी तत्त्वांची संख्या सतरा सांगतात. (२२)
पंच विषय पंच भूतें । पांच इंद्रियें घेतलीं येथें ।
मन आत्मा मेळवूनि तेथें । केलीं निश्चितें सतरा हीं ॥ ३B ॥
पांच विषय, पांच महाभूतें, पांच इंद्रिये, व त्यांत मन व आत्मा ही दोन मिळवून सतरा तत्त्वं निश्चित ठरविलीं आहेत. ३B
यापरी तूं गा जाण । सोळा तत्त्वांचें निरूपण ।
तेथेंचि त्रयोदशलक्षण । स्वयें नारायण सांगत ॥ ४ ॥
अशाच प्रकारे पुढे सांगितलेले सोळा तत्त्वांचे निरूपणही लक्षात आण. त्याच ठिकाणी तेरा तत्त्वांची लक्षणेही स्वतः श्रीकृष्ण सांगतील ४.
तद्वत् षोडशसंख्याने आत्मैव मन उच्यते ।
भूतेन्द्रियाणि पञ्चैव मन आत्मा त्रयोदश ॥ २३ ॥
[श्लोक २३] जे तत्त्वांची संख्या सोळा सांगतात, ते आत्म्यामध्येच मनाचाही समावेश करतात जे लोक तेरा तत्त्वे मानतात, ते म्हणतात की, पाच महाभूते, पाच ज्ञानेंद्रिये, मन, जीवात्मा आणि परमात्मा. (२३)
सतरा तत्त्वांचें निरूपण । तुज सांगीतलें संपूर्ण ।
त्यांत मन आत्मा एक जाण । तेंही लक्षण अवधारीं ॥ ५ ॥
सतरा तत्त्वांचे सर्व निरूपण तुला सांगितले. त्यांत मन व आत्मा ही एकच आहेत. त्याचे लक्षण ऐक ५,
जेवीं कां कथा सांगतां आपण । स्वभावें हात हाले जाण ।
तेवी मनाचें चंचळपण । स्वभावें जाण होतसे ॥ ६ ॥
आपण कथा सांगतांना ज्याप्रमाणे हात आपोआपच हालतात, त्याप्रमाणे मनाची हालचालही आपोआपच होत असते, हे लक्षात आण ६.
राजा सिंहासनीं बैसला । तो राजत्वें पूज्य झाला ।
वसंत खेळतां धांविन्नला । तरी काय मुकला राज्यपदा ॥ ७ ॥
राजा सिंहासनावर बसला म्हणूनच तो राजेपणाच्या थोरवीला चढला, आणि वसंतऋतूंत क्रीडेसाठी धावत असला म्हणून त्याचा राजेपणा नाहीसा झाला, असें होतें काय? ७.
जेवीं काळें क्षोभला अतिथोर । तरी तो बोलिजे सागर ।
कां निश्चळ राहिलिया नीर । तरी समुद्र समुद्रत्वें ॥ ८ ॥
एकाद्या वेळी समुद्र अतिशय खवळला तरी त्याला समुद्रच म्हणतात, आणि त्याचे पाणी संथ असले तरीही समुद्रपणानें तो समुद्रच असतो ८.
तेवीं मनपणें अतिचंचळ । कां आत्मत्वें निजनिश्चळ ।
दोहींपरी अविकळ । जाण केवळ परमात्मा ॥ ९ ॥
त्याप्रमाणे मनाच्या रूपाने अत्यंत चंचलपणा आला, किंवा आत्मस्वरूपाने निश्चलपणा आला, तरी दोहोंमध्ये जो परमात्मा असतो त्याचे स्वरूप काही बदलत नाहीं ९.
यालागीं मनाचें जें मनपण । आत्मसाक्षात्कारेंवीण ।
कोणासी न कळेचि गा जाण । हें मुख्य लक्षण मनाचें ॥ २१० ॥
ह्याकरितां मनाचे जे स्वरूप आहे, तें आत्मसाक्षात्काराशिवाय कोणालाच कळत नाही. हेंच मनाचे मुख्य लक्षण होय २१०.
मनआत्म्यांचें उभयऐक्य । तेंचि सतरांमाजीं उणें एक ।
उरलीं तीं आवश्यक । सोळा हीं देख निजतत्त्वें ॥ ११ ॥
मन आणि आत्मा ह्यांचे ऐक्य झाल्यामुळे सतरांमध्ये एक कमी केले, म्हणजे बाकीची जी सोळा तत्वें राहतात, तीच खरी तत्त्वे होत ११.
पांच इंद्रियें पंच महाभूतें । अकरावें मन ठेवूनि तेथें ।
जीव शिव दोनी घेऊनि येथें । केलीं निश्चितें तेराचि ॥ १२ ॥
तसेंच पांच इंद्रिये, पांच महाभूतें, आणि त्यांतच मन हें अकरावें धरून त्यांतच जिवाचा व शिवाचा अंतर्भाव करून सारी तत्त्वे तेराच म्हणूनही ठरविली आहेत १२.
आणिकही नाना तत्त्वमतें । मागां पुशिलीं तुवां मातें ।
तीहीं सांगेन मी तूतें सुनिश्चितें उद्धवा ॥ १३ ॥
उद्धवा ! आणखीही ह्या तत्त्वांसंबंधाने पुष्कळ प्रकारची मते आहेत. तीही तूं पूर्वी मला विचारली होतींस, ह्याकरिता त्यांचाही निर्णय मी तुला सांगतों १३.
एकादशत्व आत्मासौ महाभूतेन्द्रियाणि च ।
अष्टौ प्रकृतयश्चैव पुरुषस्च नवेत्यथ ॥ २४ ॥
[श्लोक २४] अकरा संख्या मानणारे पाच महाभूते, पाच ज्ञानेंद्रिये आणि एक आत्मा मानतात काहीजण पाच सूक्ष्म भूते, मन, बुद्धी, अहंकार, पुरूष ही नऊ तत्त्वे मानतात. (२४)
अकरा तत्त्वें बोलिलीं येथें । पांच इंद्रियें पंच महाभूतें ।
जीव शिव आणि मनातें । एकत्वें येथें गणिलीं देख ॥ १४ ॥
अकराच तत्त्वे म्हणून जी म्हणतात, त्यांत पांच इंद्रिये, पांच महाभूते, आणि जीव, शिव आणि मन ही तीन एकाच रूपाची आहेत असें धरून अकरा संख्या मानिली आहे १४.
दृति मृदु आणि पिंवळा । एकत्वें जेवीं चांपेकळा ।
सुवास सुस्वाद सुनीळा । एकत्र मेळा आम्रफळीं ॥ १५ ॥
सुगंध, मृदुता आणि पिवळेपणा ही चांफ्याच्या कळीत जशी एकत्र असतात; किंवा सुवास, गोडी आणि उत्तम रंग ही सारी जशी एका आंब्यामध्येच एकत्र असतात १५;
तेवीं जीव शिव आणि मन । तिन्ही एकरूपचि जाण ।
जेवीं हेममणी संपूर्ण । हेमसूत्रीं सज्ञान ओंविती ॥ १६ ॥
किंवा ज्याप्रमाणे सोन्याचे सर्व मणी सोन्याच्याच सुतांत ओंवतात; त्याप्रमाणे जीव, शिव आणि मन ही तिन्ही एकरूपच आहेत १६.
पंच इंद्रियें पंच महाभूतें । जीव शिव मन एकात्मते ।
एकादश तत्त्वें येथें । जाण निश्चितें या हेतू ॥ १७ ॥
पांच इंद्रियें, पांच महाभूतें व जीव, शिव आणि मन मिळून एक, अशी अकरा तत्त्वे एवढ्याच हेतूने मानिलेली आहेत १७.
प्रकृति पुरुष महदहंकार । पंच महाभूतें अविकार ।
सकळ विकारसंभार । यामाजीं साचार अंतर्भूत ॥ १८ ॥
आणखी प्रकृति, पुरुष, महत, अहंकार व अविकृति अशी पांच महाभूते, ह्या नवांमध्ये सर्व विकारसमुदायांचा अंतर्भाव होतो १८.
एवं ऋषिश्वरांच्या व्युत्पत्ती । तत्त्वविवक्षा उपपत्ती ।
नव तत्त्वसंख्यायुक्ती । जाण या रीतीं उद्धवा ॥ १९ ॥
अशा प्रकारें, उद्धवा! ऋषिवांचे तत्त्वांसंबंधाने विचार असल्यामुळे ते ह्या तत्त्वांची संख्या नऊही मानतात १९.
एक बोलती निजज्ञानी । प्रकृति पुरुष तत्त्वें दोनी ।
आन पाहतां जनींवनीं । तिसरें नयनीं दिसेना ॥ २२० ॥
तसेच कोणी आत्मज्ञानी असतात ते प्रकृति आणि पुरुष ही दोनच तत्त्वे आहेत असे मानतात. कारण, ह्यांच्याशिवाय तिसरे तत्त्व जनांत किंवा वनांत कोठेच कांहीं डोळ्यांना दिसत नाहीं २२०.
जे निश्चयें अतिनिष्टंक । ते म्हणती तत्त्व एक ।
एक तेंचि अनेक । अनेकीं एक निश्चित ॥ २१ ॥
ह्याहूनही ज्यांचा निश्चय अधिक दृढतर असतो, ते म्हणतात की, एकच तत्त्व आहे. तें एकच तत्त्व अनेक रूपांनी भासते. खरोखर पाई गेलें तर सर्वांमध्ये एकच तत्त्व भरलेले आहे २१.
जेवीं सुवर्णाचें भूषण । भूषणीं स्वयें सुवर्ण ।
तेवीं अनेकीं एकपण । एकत्वें जाण निश्चित ॥ २२ ॥
ज्याप्रमाणे सोन्याचा एकादा दागिना केला तरी त्या दागिन्यामध्येही मूळ सोने असतेच त्याप्रमाणे अनेकांमध्येही ऐक्यरूपाने खरोखर एकच तत्त्व असते २२.
जेवीं उंसाची निजगोडी । गूळसाकरेच्या मोडी ।
तेचि दिसे चढोवढी । तेंवी तत्त्वपरवडी निजतत्त्वें ॥ २३ ॥
ज्याप्रमाणे उसाची मूळची गोडी असते तीच गूळ आणि साखर ह्यांच्यामध्ये चढत्या प्रमाणाने असलेली दृष्टीस पडते, त्याप्रमाणेच आत्मतत्त्वाचे सारे तत्वप्रकार झालेले आहेत २३.
त्या जाणावया निजतत्त्वातें । ऋषीश्वरांचीं बहुत मतें ।
मी स्वल्पचि बोलिलों येथें । येरवीं अगणितें ग्रंथांतरीं ॥ २४ ॥
त्या आत्मतत्त्वाला जाणण्यासाठी श्रेष्ठ ऋषींची मतेही पुष्कळच आहेत. त्यांतली फारच थोडी मी येथे सांगितली, नाही तर ग्रंथांतरी असंख्यात आहेत २४.
इति नानाप्रसंख्यानं तत्त्वानामृषिभिः कृतम् ।
सर्वं न्याय्यं युक्तिमत्त्वाद्विदुषां किमशोभनम् ॥ २५ ॥
[श्लोक २५] ऋषींनी अशा प्रकारे निरनिराळ्या पद्धतींनी तत्त्वांची गणना केली आहे सगळ्यांचे म्हणणे युक्तिसंगत असल्यामुळे उचितच आहे नाहीतरी विद्वानांना काय शोभत नाही ? (२५)
येथ सर्वज्ञ ज्ञाते होती । ते नाना मतें तत्त्वयुक्ती ।
विवंचोनियां उपपत्ती । विभागूं जाणती यथार्थें ॥ २५ ॥
पण त्यांत जे सर्वज्ञ असे ज्ञानी असतात, ते अनेक प्रकारच्या मतांचा विचार करून व तत्त्वांचे खरें स्वरूपही लक्षात आणून त्यांचे यथार्थ विभाग कसे करावयाचे हे जाणतात २५.
निजतत्त्व जाणावया जाण । करितां तत्त्वविवंचन ।
सर्वथा न लगे दूषण । तत्त्वें अधिकन्यून बोलतां ॥ २६ ॥
आत्मतत्त्व जाणण्यासाठी तत्त्वांचा विचार करतांना कमीजास्ती तत्त्वे आहेत असे म्हटले म्हणून मुळीच दोष लागत नाही २६.
वस्तुतां विकारांच्या ठायीं । ज्ञात्यासी बोलावया विशेष नाहीं ।
विकार ते प्रकृतीच्या ठायीं । आत्मा शुद्ध पाहीं अविकारी ॥ २७ ॥
खरे पाहूं गेलें तर विकारांमध्ये ज्ञात्याला विशेष बोलण्यासारखे काहीच नसते. कारण, विकार असतात ते प्रकृतीच्या ठिकाणी असतात. आत्मा हा शुद्ध अविकारीच आहे २७.
प्रकृतीहूनि आत्मा भिन्न । यालागीं तो अविकारी जाण ।
विकार प्रकृतीमाजीं पूर्ण । हें मुख्य लक्षण तत्त्वांचें ॥ २८ ॥
प्रकृतीहून आत्मा हा भिन्न आहे, म्हणून तो अविकारीच आहे हे लक्षात ठेव, सर्व विकार प्रकृतीमध्येच आहेत, हेच तत्त्वांचे मुख्य लक्षण होय २८.
प्रकृतीहूनि वेगळेपण । पुरुषांचें जाणावया आपण ।
यालागीं उद्धवा जाण । तत्त्वविवंचन साधावें ॥ २९ ॥
ह्याकरितां उद्धवा! प्रकृतीहून पुरुषाचे निराळेपण कळण्याकरितां आपण तत्वाचा विचार करावा २९.
हें ऐकोनि कृष्णवचन । उद्धव चमत्कारला जाण ।
प्रकृतिपुरुषांचें भिन्नपण । देवासी आपण पुसों पां ॥ २३० ॥
हे कृष्णाचे भाषण ऐकून उद्ध्वाला चमत्कार वाटला आणि त्याने असा विचार केला की, प्रकृति आणि पुरुष ह्यांचा भिन्नपणा आपण देवालाच विचारावा ३०.
उद्धव उवाच-
प्रकृतिः पुरुषश्चोभौ यद्यप्यात्माविलक्षणौ ।
अन्योन्यापाश्रयात्कृष्ण दृश्यते न भिदा तयोः ।
प्रकृतौ लक्ष्यते ह्यात्मा प्रकृतिश्च तथाऽऽत्मनि ॥ २६ ॥
[श्लोक २६] उद्धव म्हणाला – हे कृष्णा ! जरी स्वरूपतः प्रकृती आणि पुरूष हे एकमेकांपासून सर्वथैव वेगळे आहेत, तरीसुद्धा ते एकमेकांमध्ये मिसळून गेल्यामुळे त्यांच्यामध्ये काही फरक दिसत नाही प्रकृतीमध्ये पुरूष आणि पुरूषामध्ये प्रकृती आहे, असेच वाटते. (२६)
प्रकृति पुरुष भिन्नभिन्न । येचि अर्थीं उद्धवें जाण ।
साडेतीन श्लोकीं अगाध प्रश्न । देवासी आपण पुसत ॥ ३१ ॥
प्रकृति आणि पुरुष भिन्न भिन्न कसे? ह्याच अर्थाचा गहन प्रश्न उद्धवाने साडेतीन श्लोकांनी देवाला विचारला ३१.
प्रकृतीहूनि पुरुष भिन्न । हें ऐकोनि देवाचें वचन ।
प्रकृतिपुरुषांवेगळा श्रीकृष्ण । हा द्रष्टा संपूर्ण दोहींचा ॥ ३२ ॥
प्रकृतीहून पुरुष हा भिन्न आहे हे देवाचे भाषण ऐकून उद्धव मनांत म्हणाला, तर मग प्रकृति. पुरुषांहून वेगळा असा हा श्रीकृष्ण दोहोंचाही साक्षी आहे असे झाले ३२.
म्हणे श्रीकृष्ण श्रेष्ठा । हे प्रकृतिपुरुषांची चेष्टा ।
तूं वेगळेपणें देखणा द्रष्टा । सुरवरिष्ठा श्रीपती ॥ ३३ ॥
म्हणून तो म्हणाला, हे श्रेष्ठ श्रीकृष्णा ! देवाधिदेवा ! लक्ष्मीपते! ह्यावरून प्रकृति आणि पुरुष ह्यांचे हे व्यापार वेगळेपणाने पाहणारा तूं एक निराळाच साक्षी आहेस असें होतें ३३.
प्रकृति पुरुष दोनी भिन्न । एक जड एक चेतन ।
हें मजही कळतसे जाण । परी वेगळेपण लक्षेना ॥ ३४ ॥
कारण, प्रकृति आणि पुरुष ही दोन्ही भिन्नभिन्नच आहेत. एक जड आहे आणि एक चैतन्यरूपी आहे, हे मलासुद्धा समजतें. पण ती वेगळी कशी, हे समजत नाही ३४.
जैसा तप्तलोहाचा गोळ । दिसे अग्नीचि केवळ ।
तेवीं प्रकृतिपुरुषांचा मेळ । दिसे सबळ एकत्वें ॥ ३५ ॥
ज्याप्रमाणे तापलेला लोखंडाचा गोळा हुबेहब अग्नीसारखाच दिसतो, त्याप्रमाणे प्रकृतीची आणि पुरुषाची सांगड ऐक्यरूपाने अगदी दृढ बांधलेली दिसते ३५.
जेवीं बीज धरोनियां पोटेंसीं । निकणू कोंडा वाढे कणेंसीं ।
तेंवी प्रकृति जाण पुरुषेंसी । अभिन्नतेसीं जडलीसे ॥ ३६ ॥
ज्याप्रमाणे बीज पोटांत ठेवून कणरहित कोंडा वाढतो, त्याप्रमाणे प्रकृतीही पुरुषाबरोबर अगदी एकजीव झालेली आहे ३६,
कां नारळ चोख धरोनि पोटीं । निरस कठिण वाढे नरोटी ।
तेवीं पुरुषयोगें प्रकृति लाठी । झाली सृष्टी अनिवार ॥ ३७ ॥
किंवा उत्तम खोबरें पोटांत धरून ज्याप्रमाणे नीरस व कठीण अशी करवंटी मोठी होते, त्याप्रमाणे पुरुषाच्या बळावर प्रकृतीही मोठी होऊन अनिवार सृष्टि उत्पन्न झाली आहे ३७.
कणावेगळा कोंडा न वाढे । तेवीं पुरुषवेगळी प्रकृति नातुडे ।
हें प्रकृतिपुरुषांचें बिरडें । तुजवेगळें निवाडें निवडेना ॥ ३८ ॥
दाण्याशिवाय जसा कोंडा वाढत नाही, त्याप्रमाणे पुरुषाशिवाय प्रकृतीही दृष्टिगोचर होत नाही. तेव्हां हें प्रकृति-पुरुषांचे कोडें तुझ्याशिवाय कोणासही नीट सुटत नाही ३८.
जेवीं कां शिंपीचे अंगीं । जडली रुपेपणाची झगी ।
तेवीं पुरुषाच्या संयोगीं । प्रकृति जगीं भासत ॥ ३९ ॥
शिंपीच्या आंगीं ज्याप्रमाणे रुप्याची कांति जडलेली असते, त्याप्रमाणे जगामध्ये पुरुषाच्या संगतीने प्रकृतीचाही भास होतो ३९.
तीक्षण रविकरसंबंधीं । भासे मृगजळाची महानदी ।
तेवीं पुरुषाच्या संबंधीं । प्रकृति त्रिशुद्धी आभासे ॥ २४० ॥
प्रखर सूर्यकिरणांच्या योगाने मृगजळाची मोठी नदी असल्याचा भास होतो, त्याप्रमाणे पुरुषाच्या योगाने खरोखर प्रकृतीचा भास होतो २४०.
जेवीं कां नभीं नीलिमा । वेगळी न दिसे सांडूनि व्योमा ।
तेवीं प्रकृति-पुरुषोत्तमां । वेगळीक आम्हां दिसेना ॥ ४१ ॥
ज्याप्रमाणे आकाशांतील निळसरपणा आकाशाहुन कांहीं निराळा दिसत नाही, त्याप्रमाणे प्रकृति व पुरुषोत्तम ह्यांमध्ये आम्हांला वेगळेपणा दिसत नाही ४१.
मुख्य देहाचें जें देहपण । तेंचि प्रकृतीचें बाधकत्व जाण ।
या देहाहोनियां भिन्न । पुरुषाचें भान दिसेना ॥ ४२ ॥
मुख्य देहाचें जें देहपण आहे, तीच प्रकृतीची बाधकता होय. पण ह्या देहाहून भिन्न असें पुरुषाचे भान दिसतच नाही ४२.
अहंप्रत्ययें आत्मा म्हणती । तेही देहाकारें स्फुरे स्फूर्ती ।
देहावेगळी आत्मप्रतीती । न दिसे निश्चितीं गोविंदा ॥ ४३ ॥
‘मी’ ह्या अनुभवाला आत्मा असे म्हणतात, पण ती स्फूर्तीसुद्धा देहाच्या आकारामुळेच होते. हे गोविंदा! देहाहून निराळी अशी आत्म्याची प्रतीति कांहीं खरोखर प्राप्त होत नाही ४३.
डोळा सांडूनि दृष्टि उरे । वातीवेगळा दीप थारे ।
तैं देहावेगळा आत्मा स्फुरे । साचोकारें गोविंदा ॥ ४४ ॥
हे गोविंदा! डोळ्यांशिवाय जर दृष्टि राहील, वातीशिवाय जर दिवा टिकेल, तरच खरोखर देहाशिवाय आत्म्याचे स्फुरण होईल ४४.
जिव्हेवीण रसस्वादू । श्रोत्रेंवीण ऐकवे शब्दू ।
तैं देहावेगळा आत्मबोधू । होय विशदू गोविंदा ॥ ४५ ॥
गोविंदा! जिव्हेशिवाय जर रुचि कळेल, कानांशिवाय जर शब्द ऐकावयाला येईल, तरच देहाशिवाय आत्म्याचा बोध स्पष्ट होईल ४५.
कांटेवीण फणस आतुडे । कां सोपटेंवीण ऊंस वाढे ।
तैं देहावेगळा आत्मा जोडे । वाडेंकोडें गोविंदा ॥ ४६ ॥
हे गोविंदा ! काट्याशिवाय जर फणस सांपडेल, किंवा चिपाडाशिवाय जर ऊस वाढेल, तरच खरोखर देहाशिवाय आत्मा सांपडेल ४६.
तुम्हींच सांगीतली निजात्मखूण । नरदेह ब्रह्मप्राप्तीचें कारण ।
शेखीं देहावेगळें आत्मदर्शन । केवीं आपण प्रतिपादां ॥ ४७ ॥
ब्रह्मप्राप्तीला कारण नरदेह आहे, हे आत्मज्ञानांतील मर्म तुम्हीच सांगितलेत आणि शेवटीं देहाशिवायच आत्मदर्शन होते असे प्रतिपादन कसे करतां? ४७.
आणि आत्म्यावेगळी प्रकृति । सर्व प्रकारें न ये व्यक्ती ।
रूपावेगळी छाया केउती । कैशा रीतीं आभासे ॥ ४८ ॥
आत्म्याशिवाय प्रकृति तर कोणत्याही प्रकारे व्यक्त स्वरूपाला येत नाही. स्वरूपाशिवाय छाया ही निराळी कशी कोणत्या रीतीने भासणार ? ४८.
गोडीवेगळी साकर होये । परिमळवेगळा कापूर राहे ।
तैं आत्म्यावेगळी पाहें । प्रकृति लाहे अभिव्यक्ती ॥ २४९ ॥
गोडीपासून साखर जर वेगळी होईल, सुगंधापासून कापूर निराळा होईल, तर आत्म्याशिवायही प्रकृति दृष्टीस पडेल ४९.
गगनावेगळा घट राहे । तंतूवेगळा पट होये ।
तैं आत्म्यावेगळी पाहें । प्रकृति लाहे अभिव्यक्ती ॥ २५० ॥
आकाशाशिवाय जर घडा राहील, तंतूशिवाय जर वस्त्र होईल, तर आत्म्याशिवायही प्रकृति दृष्टीस पडेल २५०.
गोडीवेगळा वाढे ऊंस । कणेंवीण जैं वाढे भूस ।
तैं आत्म्यावेगळी रूपस । माया सावकाश व्यक्तीसी ये ॥ ५१ ॥
गोडीशिवाय जर ऊंस वाढेल, दाण्याशिवाय जर भूस येईल, तर आत्म्याशिवाय मूर्तिमंत मायाही यथास्थितपणे आकाराला येईल ५१.
प्रकृतिलक्षणीं आत्मा लक्षिजे । आत्मेनि प्रकृतीसी प्रकाशिजे ।
अनादि दोनी इये योग जे । वेगळा लाहिजे बोध केवीं ॥ ५२ ॥
आत्म्याचे स्वरूप कळतें तें प्रकृतीच्या लक्षणांवरूनच कळते आणि आत्मा हाच प्रकृतीला प्रगट करतो. ह्यांचा संयोग हा अनादिकालापासून चालत आला आहे. मग त्यांचा बोध वेगवेगळा होणार कसा? ५२.
प्रकृतीहूनि आत्मा भिन्न । सर्वथा आम्हां न दिसे जाण ।
येचि अर्थींची विनवण । उद्धव आपण करीतसे ॥ ५३ ॥
प्रकृतीहून आत्मा भिन्न असा मुळीच आम्हांला दिसत नाही. ह्याच अर्थाची विनंति उद्धव आपण होऊन करीत आहे ५३.
एवं मे पुण्डरीकाक्ष महान्तं संशयं हृदि ।
छेत्तुमर्हसि सर्वज्ञ वचोभिर्नयनैपुणैः ॥ २७ ॥
[श्लोक २७] हे कमलनयना ! अशा प्रकारे, यांची भिन्नता आणि अभिन्नता पाहून माझ्या अंतःकरणामध्ये फार मोठा संशय निर्माण झाला आहे हे सर्वज्ञा ! आपल्या युक्तिसंगत वाणीने माझ्या या संशयाचे निराकरण करा. (२७)
कमलानाभा कमलानना । कमलालया कमलधारणा ।
कमलिनीवासस्थाना । कमलनयना श्रीकृष्णा ॥ ५४ ॥
हे कमलनाभा! हे कमलवदना! हे कमलधामा !हे कमलधरा ! हे कमलिनीनिवासा! हे कमलनयना श्रीकृष्णा! ५४.
प्रकृतिपुरुषयोग अवघड । योग्यां न कळे भिन्न निवाड ।
या संशयाचें अतिजाड । हृदयीं झाड वाढलें ॥ ५५ ॥
प्रकृति आणि पुरुष ह्यांचा संबंध फार कठीण आहे. त्याचा स्पष्ट निर्णय योग्यांनाही कळत नाही. ह्याच संशयाचा जगड्व्याळ वृक्ष हृदयामध्ये फोफावून राहिला आहे ५५.
ह्रदयीं संदेहाचीं मूळें । प्रकृतिभूमीं विकल्पजळें ।
संशयवृक्ष तेणें बळें । वाढला अहंफळें सदा फळित ॥ ५६ ॥
हृदयामध्ये संशयरूपी मुळे उत्पन्न झाली, ती प्रकृतिरूपी भूमीत पडून त्यांवर विकल्पाचे पाणी पडले, त्याच्या जोरावर हा संशयरूपी वृक्ष फोफावला आणि त्याला अहंकाररूपी फळेच फळे सर्वकाळ बहरून राहिली ५६.
ज्या वृक्षाचीं सदा फळें खातां । जीव न राहे सर्वथा ।
तेणें संशयाची अधिकता । उसंतू चित्ता पैं नाहीं ॥ ५७ ॥
त्या वृक्षाची फळे नेहमी खाल्ल्याशिवाय ह्या जीवाला चैन म्हणून कधी पडतच नाही. आणि त्यामुळे संशय अधिकाधिकच बळावून चित्ताला विश्रांति म्हणून कधी मिळतच नाही ५७.
ऐशिया वृक्षाचें छेदन । कृपेनें करावें आपण ।
सोडूनि ज्ञानतिखवाग्बाण । करीं निर्दळण निजांगें ॥ ५८ ॥
तेव्हा अशा या वृक्षाला आपण कृपा करून तोडून टाकावे. ज्ञानाचे तीव्र बाण सोडून तूं स्वतःच त्याची पाळेमुळे खणून टाक ५८.
योगयागशास्त्रपाठें । करितां धर्मकर्मकचाटें ।
या वृक्षाचें पानही न तुटे । हें कठिणत्व मोठें गोविंदा ॥ ५९ ॥
हे गोविंदा! कितीही योगसाधनें व याग केले, कितीही शास्त्रपठण केले, किंवा धर्मकर्माची कितीही यातायात केली तरी या वृक्षाचे एक पानही तुटत नाही, हे मोठे संकट आहे ५९.
या वृक्षाचें करितां छेदन । ब्रह्मा झाला संदेहापन्न ।
तुवां हंसगीत सांगोन । उद्धरिला जाण सुपुत्र ॥ २६० ॥
या वृक्षाला तोडता तोडतां ब्रह्मादेवही पुन्हा संशयांत पडला, म्हणूनच तूं हंसगीत कथन करून आपल्या सत्पुत्राचा उद्धार केलास २६०.
मुख्य ब्रह्मयाची ऐशी अवस्था । तेथ इतरांची कोण कथा ।
या वृक्षाचा छेदिता । तुजवीण सर्वथा आन नाहीं ॥ ६१ ॥
प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचीच जर ही दशा, तर मग इतरांची कथा काय? ह्याकरितां या वृक्षाला तोडणारा खरोखर तुझ्याशिवाय दुसरा कोणीच नाही ६१.
छेद करितां वरिवरी । वासना मुळ्या उरल्या उरी ।
फांफाईल चौगुण्यापरी । अतिशयें भारी बांबळे ॥ ६२ ॥
ह्याला वरवरच जर तोडला, तर त्याची वासनेची मुळे शिल्लक राहतात आणि मग तो पहिल्याहून अतिशय जोमांत वाढून त्याचा विस्तार फारच मोठा होतो ६२.
याचा समूळ मूळेंसीं कंदू । छेदिता छेदक तूं गोविंदू ।
तुजवेगळा संशयच्छेदू । भलता प्रबुद्धू करूं न शके ॥ ६३ ॥
ह्याकरितां ह्याचा मूळ गड्डाच उपटून काढणारा एक तूंच आहेस. तुझ्याशिवाय दुसरा कोणी ज्ञाता या संशयाचा नाश करणारा नाही ६३.
म्हणशी संशय हृदयाच्या ठायीं । तेथ शस्त्रांचा रिगमू नाहीं ।
म्यां छेदावें कैसें कायी । ते अर्थींचे मी पाहीं सांगेन ॥ ६४ ॥
आता तूं कदाचित् असें म्हणशील की, संशय हा हृदयामध्ये उद्भवतो आणि तेथें तर शस्त्र जाऊन पोचत नाही. तेव्हा मी तो कसा काय छेदावा ? तर त्याबद्दलही मी सांगतों ६४.
तुझें ज्ञानचक्र अलोलिक । तुझेनि शब्दतेजें अतितिख ।
समूळ संशयाचें छेदक । तुझें वचन एक गोविंदा ॥ ६५ ॥
तुझ्याच शब्दरूप तेजानें दैदीप्यमान झालेले असें तुझे ज्ञानस्वरूप चक्र मोठे अलौकिक आहे. हे श्रीकृष्णा! संशयाचे समूळ छेदन करणारे एक तुझेच वचन होय ६५.
ऐसें तुझे ज्ञानवचन । तुवां केलिया कृपावलोकन ।
समूळ संशयाचें निर्दळण । सहजेंचि जाण होताहे ॥ ६६ ॥
असें तुझे भाषण ज्ञानस्वरूप असल्यामुळे तूं कृपावलोकन तेवढे केलेंस, की सहजच साऱ्या संशयाचे समूळ निर्दळण होऊन जातें ६६.
तरी तुवां श्रीमुकुंदा । फेडावी माझी संशयबाधा ।
तया उद्धवाचिया शब्दा । गोपीराद्धा सांगेन म्हणे ॥ ६७ ॥
तर हे मुकुंदा! तूं मला या संशयाच्या पीडेपासून मुक्त कर. ह्या उद्धवाच्या भाषणावर गोपींचा आराध्य जो श्रीकृष्ण तो ‘सांगेन’ असे म्हणाला ६७.
असतां बहुसाल सज्ञान । सकळ संशयांचें निर्दळण ।
मीचि कर्ता हें काय कारण । तेंही लक्षण अवधारीं ॥ ६८ ॥
‘सज्ञानी लोक अनेक असूनही सर्व संशयाचा छेदनकर्ता एक मीच आहे’ असे म्हणण्याचे कारण काय ? त्याचा हेतूही ऐकावा ६८.
त्वत्तो ज्ञानं हि जीवानां प्रमोषस्तेऽत्र शक्तितः ।
त्वमेव ह्यात्ममायाया गतिं वेत्थ न चापरः ॥ २८ ॥
[श्लोक २८] भगवन ! आपल्याच कृपेने जीवांना ज्ञान होते आणि आपल्याच अविद्याशक्तीने त्यांच्या ज्ञानाचा नाश होतो या आपल्या मायेचे हे स्वरूप आपणच जाणता दुसरे कोणीही नाही. (२८)
अतर्क्य तुझी मायाशक्ती । त्या आवरूनि आनंदस्फूर्ती ।
दृढ लावूनि विषयासक्ती । तेणें जीव होती अज्ञान ॥ ६९ ॥
तुझी मायाशक्ति अतर्क्य आहे. त्यामुळे ती आनंदाच्या जेवढ्या उसळ्या येतात तेवढ्या साऱ्यांना आवरून ठेवून विषयाची दृढतर आसक्तीच लावून देते. त्यामुळे जीव अज्ञानी होतात ६९.
करितां विषयांचें ध्यान । जीव होय मनाअधीन ।
त्यास मन करी हीनदीन । अतिकृपण जड मूढ ॥ २७० ॥
विषयाचे चिंतन करीत असतां जीव हा मनाच्या स्वाधीन होऊन राहतो आणि ते मन त्याला दीनदुबळा, अत्यंत कृपण, जड व मूढ करून टाकते. २७०.
ऐसे केवळ जीव जे अज्ञान । ते तुझ्या कृपाकटाक्षें जाण ।
झाले गा ज्ञानसंपन्न । हे कृपा पूर्ण पैं तुझी ॥ ७१ ॥
असे निखालस अज्ञानी असलेले जे जीव, ते केवळ तुझ्या कृपादृष्टीनेच ज्ञानसंपन्न झाले आहेत. ही तुझीच परिपूर्ण कृपा होय ७१.
तुझी कृपा झालिया परिपूर्ण । करूनि मायेचें निर्दळण ।
जीव होती ब्रह्म पूर्ण । तुझेनि जाण श्रीकृष्णा ॥ ७२ ॥
श्रीकृष्णा ! तुझी पूर्ण कृपा झाली म्हणजे तुझ्याच सामर्थ्याने जीव हे मायेचे निर्दलन करून पूर्ण ब्रह्माला पोचतात ७२.
म्हणशी माझे गांठीं जाण । नाहीं ज्ञान ना अज्ञान ।
तरी तूं ज्ञानदाता आपण । झालासी पूर्ण तें ऐक ॥ ७३ ॥
आता ह्यावर कदाचित तूं म्हणशील की, माझ्या गांठीला. ज्ञानही नाही आणि अज्ञानही नाही. तरीपण तूच स्वतः पूर्ण ज्ञानदाता झालेला आहेस. कसे ते सविस्तर ऐक ७३.
धातासवितासनत्कुमारांसी । नारदप्रल्हादअं बरीषांसी ।
कालीं उपदेशिलें अर्जुनासी । ऐसा तूं होसी ज्ञानदाता ॥ ७४ ॥
ब्रह्मदेव, सूर्य, सनत्कुमार, नारद , प्रल्हाद , अंबरीष ह्यांना व प्रसंगी अर्जुनाला सुद्धा तूं उपदेश केला आहेस. असा तूं ज्ञानदाता आहेस ७४.
म्हणसी बहुत असती सज्ञान । त्यांसी पुसोनि साधावें ज्ञान ।
तुजवेगळें मायेचें नियमन । त्यांचेनि जाण कदा नोहे ॥ ७५ ॥
आतां तूं म्हणशील की, जगामध्ये ज्ञानसंपन्न लोक पुष्कळ आहेत, त्यांना विचारून ज्ञान संपादन करावें. पण तुझ्याशिवाय मायेचें नियमन त्यांच्याने कधीच होत नाहीं ७५.
मायेची उत्पत्तिस्थिती । मायानिर्दळणी गती ।
तूं एक जाणता त्रिजगतीं । यालागीं श्रीपती कृपा करीं ॥ ७६ ॥
मायेची उत्पत्ति, स्थिति आणि मायेच्या निर्दळणाचा प्रकार जाणणारा त्रिभुवनामध्ये एक तूंच आहेस. म्हणून हे श्रीपते ! कृपा कर ७६.
यापरी उद्धवें विनंती । करूनि प्रार्थिला श्रीपती ।
तो प्रकृतिपुरुषविभाग युक्तीं । उद्धवाप्रती सांगेल ॥ ७७ ॥
अशा प्रकारे उद्धवाने विनंतिरूपाने श्रीकृष्णाची प्रार्थना केली. तेव्हां तो आतां उद्ध्वाला प्रकृतिपुरुषाचे विभाग विशद करून सांगेल ७७.
जेवीं सूर्यापाशीं मृगजळ । कां गगनीं उपजे आभाळ ।
काचभूमिके दिसे जळ । तैशी प्रकृती सबळ पुरुषापाशीं ॥ ७८ ॥
सूर्यापासून ज्याप्रमाणे मृगजळ उत्पन्न होते, किंवा आकाशापासून जसें अभ्र उत्पन्न होते; किंवा काचेच्या जमिनीमध्ये जसा पाण्याचा भास होतो, त्याप्रमाणे पुरुषापासून ही महाबलाढ्य प्रकृति उत्पन्न होते ७८.
यापरी स्वयें श्रीकृष्ण । प्रकृतिपुरुषनिरूपण ।
समूळ सांगताहे आपण । तो म्हणें सावधान उद्धवा ॥ ७९ ॥
अशा प्रकारे स्वतः श्रीकृष्ण आपण होऊनच प्रकृति-पुरुषांचे निरूपण समूळ सांगत आहेत. ते म्हणाले, ‘उद्धवा ! नीट लक्ष दे’ ७९.
श्रीभगवानुवाच-
प्रकृतिः पुरुषश्चेति विकल्पः पुरुषर्षभ ।
एष वैकारिकः सर्गो गुणव्यतिकरात्मकः ॥ २९ ॥
[श्लोक २९] श्रीभगवान म्हणाले उद्धवा ! प्रकृती आणि पुरूष म्हणजेच शरीर आणि आत्मा या दोघांमध्ये फार फरक आहे कारण गुणांच्या क्षोभाने सृष्टी उत्पन्न होते म्हणून ती विकारांनी युक्त आहे. (२९)
प्रकृति पुरुष हे दोनी । सदा अत्यंत वेगळेपणीं ।
जैसा दिवस आणि रजनी । एक लोपोनि एक प्रबळें ॥ २८० ॥
हे पहा! प्रकृति आणि पुरुष ही दोन्ही निरंतर अत्यंत भिन्नच आहेत. ज्याप्रपाणे दिवस व रात्र ह्यांपैकी एकाचा लोप झाला म्हणजे दुसरें प्रकट होतें २८०.
दिवस लोपतांचि जाण । अंधकारेंसीं परिपूर्ण ।
घेऊनियां ताराग्रहगण । रात्री आपण उल्हासे ॥ ८१ ॥
दिवस अस्ताला गेला, की परिपूर्ण अंधकाराने युक्त अशी रात्र नक्षत्रे आणि सारे ग्रह ह्यांच्या समुदायासह मोठ्या उत्साहाने प्रकट होते ८१.
तेवीं लोपतां पुरुषांचे भान । घेऊनि कार्येंसीं कारणगुण ।
ज्ञानाज्ञानेंसीं परिपूर्ण । प्रकृति जाण थोरावे ॥ ८२ ॥
त्याप्रमाणे पुरुषाचे भान लुप्त झाले, की प्रकृति ही कार्यासह सत्त्वादि गुण घेऊन आणि ज्ञान व अज्ञान यांनी परिपूर्ण होऊन प्रबळ होते, हे लक्षात ठेव ८२.
येथ मुख्यत्वें जो देहाकार । तेंचि प्रकृतीचें दुर्ग थोर ।
तेथें ठेविला ठाणेदार । देहअ हंकार महायोद्धा ॥ ८३ ॥
ह्यांत मुख्यत्वेकरून देहाचा जो आकार असतो तोच प्रकृतीचा मोठा किल्ला होय. त्यांत देहरूप अहंकार हाच मोठा योद्धा किल्लेदार ठेवलेला असतो ८३.
जो जिवलग विश्वासाचा । प्रकृतीस विश्वास त्याचा ।
तो नेटका झुंझार दुर्गींचा । भरभारू तेथींचा तो वाहे ॥ ८४ ॥
तोच प्रकृतीचा जिवलग व विश्वासू आहे. प्रकृतीला त्याचाच सर्वस्वी विश्वास वाटतो. किल्ल्याच्या तर्फेने मोठा लढणारा काय तो तोच. त्या ठिकाणची सर्व जबाबदारी तोच आपल्या मस्तकावर घेतो ८४.
तेथ अभिमानें आपण । प्रकृतीस निर्भय देऊनि जाण ।
घालूनि सामग्री विकारभरण । दुर्ग दारुण बळकाविलें ॥ ८५ ॥
म्हणून त्या अभिमानानेच आपण होऊन प्रकृतीला अभय देऊन आणि विकारांची सर्व सामुग्री जमवून महाभयंकर किल्ला बळकाविला आहे ८५.
ऐक् उद्धवा पुरुषश्रेष्ठा । निजप्रकृतीचिया निष्ठा ।
देहदुर्गीं अभिमान लाठा । जाहला वरिष्ठा या हेतू ॥ ८६ ॥
हे नरपुंगवा उद्धवा! ऐक. आपल्या प्रकृतीच्या भक्तीनें देहरूप किल्ल्यामध्ये याच कारणाने अभिमान हा प्रबळ होऊन डोईजड होऊन बसतो ८६.
देहदुर्गीं गुण अहंकार । दुर्गसामग्रीविकार ।
अवघी प्रकृतीच साचार । तदाकार भासत ॥ ८७ ॥
देहरूप किल्ल्यामध्ये तीन गुण व अहंकारादि विकार यांची सामुग्री भरलेली असते, ती वास्तविक प्रकृति असून देहाकारच दिसू लागते ८७.
गगनीं गंधर्वनगर जाण । माड्या गोपुरें वन उपवन ।
तैशी प्रकृति आपण । नानाकारें जाण भासत ॥ ८८ ॥
आकाशांत भासणाऱ्या गंधर्वनगरांत माळ्या, शिखरे, अरण्ये, बागा, वगैरे दिसतात, त्याप्रमाणे प्रकृति हीच स्वतः नाना स्वरूपांनी भासमान होत असते ८८.
जैशी मृगजळाची सरिता । दुरोनि दिसे प्रवाहतां ।
तेवीं प्रकृतीची सर्वथा । नानाकारता आभासे ॥ ८९ ॥
मृगजळांतील नदी दुरून मोठ्या प्रवाहाने वहात असलेली दिसते, त्याप्रमाणे प्रकृतीचे नाना आकार भासतात ८९.
ऐसें प्रकृतिदुर्ग महाथोर । तेथें नाना सामग्रीविकार ।
जे जे घाली अहंकार । ते ऐक साचार सांगेन ॥ २९० ॥
अशा प्रकारे हा प्रकृतीचा किल्ला मोठा भयंकर असून त्यांत अहंकार कोणकोणत्या विकारांची सामुग्री आणून घालतो, तेंही नीट रीतीने सांगतों २९०.
ममाङ्ग माया गुणमय्यनेकधा विकल्पबुद्धीश्च गुणैविधत्ते ।
वैकारिकस्त्रिविधोऽध्यात्ममेकं अथाधिदैवमधिभूतमन्यत् ॥ ३० ॥
[श्लोक ३०] उद्धवा ! माझी माया त्रिगुणात्मिका आहे तीच आपल्या गुणांनी अनेक प्रकारच्या भेदवृत्ती निर्माण करते हिची कार्ये जरी अनेक असली तरीसुद्धा त्यांची अध्यात्म, अधिदैव आणि अधिभूत या तीन भागांमध्ये विभागणी केली जाते. (३०)
माझी माया गा आपण । सर्वांगें जाहली तिनी गुण ।
तेही अभिमानें आपण । निजसत्ता जाण आवरिले ॥ ९१ ॥
माझी माया हीच आपण होऊन आपल्याला स्वरूपाने त्रिगुणात्मक झालेली आहे. पण ते तीनही गुण अभिमानाने आपल्या सत्तेने आपल्या ताब्यात ठेविले आहेत ९१.
तेचि देहदुर्गाभंवतीं जाण । त्रिगुणांचें आगड पूर्ण ।
तेथें मांडूनि त्रिपुटीविंदाण । मारा दारुण अभिमान करी ॥ ९२ ॥
त्याच देहरूप किल्ल्यासभोंवार त्या तीन गुणांचा खंदक खणून आणि त्रिपुटीची व्यवस्थित रचना करून अभिमान हा भयंकर मारा करीत सुटतो ९२.
त्या दुर्गाचें दृढ रक्षण । मुख्यत्वें त्रिपुटीचि जाण ।
ते त्रिपुटीचें मूळ लक्षण । तुज मी आपण सांगेन ॥ ९३ ॥
त्या किल्ल्याचे खरोखर संरक्षण करणारी त्रिपुटी होय. त्या त्रिपुटीचे मूळस्वरूपही मी आता तुला सांगतों ९३.
अगा उद्धवा बुद्धिमंता । तुज मी सांगेन ऐक आतां ।
तेथ असती तिनी वाटा । दोनी अव्हाटा एकी नीट ॥ ९४ ॥
हे बुद्धिमता उद्धवा! त्या देहरूपी किल्ल्याला तीन मार्ग असतात, त्यांपैकी दोन आडमार्ग असून एक मार्ग मात्र सरळ आहे. ते सर्व मार्ग मी आता तुला सांगतों, ऐक ९४.
त्या मार्गीची उभारणी । सैन्य रचिलें दाही आरणीं ।
युद्धकार जो निर्वाणीं । तो तेथूनी निरीक्षी ॥ ९५ ॥
त्या मार्गामध्ये अशी व्यवस्था केलेली असते की, दहा ठिकाणी युद्धाकरिता सैन्य उभे केलेले असते आणि शेवटीं जो खरोखर युद्ध करणारा मुख्य वीर असतो .तो तेथून पहात असतो ९५.
तेही मार्ग धरिले चौपाशीं । राखण बैसले तिनी वाटेशीं ।
तेथ रिघावया सायासीं । ज्ञानियासी काय काज ॥ ९६ ॥
ते मार्ग चारी बाजूंनी रोखलेले असतात, आणि तिन्ही वाटांवर रखवालदार असतात. मग अशा ठिकाणी मोठ्या कष्टानें जावयाचे ज्ञानी माणसाला कारण तरी काय? ९६.
आतां असो इतुली परी । देहदुर्गाची थोर भरोभरी ।
म्हणे ऐकें गा यया थोरी । उद्धवातें हरि सांगत ॥ ९७ ॥
तर आता हा प्रकार इतकाच राहू या. देहरूप किल्ल्यावरील सामुग्री मोठी कडक आहे. तिची थोरवीही आतां श्रवण कर. असें म्हणून श्रीकृष्ण उद्धवाला ती थोरवी सांगू लागले ९७.
कार्य कारण कर्तव्यता । कर्म क्रिया अहंकर्ता ।
ध्येय ध्यान विषयध्याता । दुर्ग सर्वथा दृढ केलें ॥ ९८ ॥
कार्य, कारण आणि कर्तव्यता; कर्म, क्रिया आणि अहं हा कर्ता, ध्येय, ध्यान आणि विषयाचे ध्यान करणारा; या त्रिपुटीने हा किल्ला अगदी मजबूत केला आहे ९८.
तेथ भोग्य भोग भोक्ता । कर्म कार्य आणि कर्ता ।
अभिमान जाहला वसता । प्रकृतिसंमतासंयोगें ॥ ९९ ॥
आणि त्यांत भोग्य, भोग आणि भोक्ता, कर्म, कार्य आणि कर्ता; हा अभिमान प्रकृतीच्या संमतीमुळे ठाणे देऊन बसला आहे ९९.
तेथ चोरद्वाराचिया लक्षीं । उघडूनि कामक्रोधखिडकी ।
घाला घालितां एकाएकीं । सकळ लोकीं कांपिजे ॥ ३०० ॥
तो चोरद्वारांतून पहात असतो, आणि कामक्रोधाची खिडकी हळूच उघडून एकाएकी घाला घालतो. तेव्हां सारे लोक थरथर कांपत सुटतात ३००.
त्यांचा घेऊनिया भेदरा । तापस पळाले सैरा ।
लंगोटी सांडिल्याही दिगंबरा । क्रोध थरथरा कांपवी ॥ १ ॥
त्यांची दहशत घेऊन तपस्वी छोक तर सैरावैरा पळव सुटतात. कंगोटी टाकून दिलेल्या दिगंबरांना सुद्धा क्रोध हा थरथरा कांपवून सोडतो १.
लोभयंत्राचे कडाडे । तमधूम दाटे चहूंकडे ।
महामोहाचें गडद पडे । मागेंपुढें दिसेना ॥ २ ॥
लोभरूप तोफखाना सुरू होऊन धार धार आवाज होत असतात, त्यामुळे चोहोकडे अज्ञानाचा धूरच माजून राहतो. महामोहाने दिशा धुंद होऊन मागचे पुढचे काहीच दिसत नाही २.
दुर्गासभोंवतीं नवद्वारें । नवद्वारीं नवही यंत्रें ।
तेणें यंत्रद्वारें । विषय महामारें मारिती ॥ ३ ॥
या किल्ल्याच्या सभोवार नऊ दारदाऱ्या असतात, त्या नऊ दारांमध्यें नऊ तोफा तयार असतात, आणि त्या त्या तोफा डागून विषय हे सारखा भडिमार करीत असतात ३.
देहाभिमानाचें चाळक । मुख्यत्वें मनचि एक ।
तें दुर्धर महामारक । दुर्गअटक तेणें केलें ॥ ४ ॥
देहाभिमानाचे मुख्य चालक म्हटलें म्हणजे एक मन. त्याचा मारा महाभयंकर. ते कशानेच मागें न हटतां सर्व किल्ल्याचा बंदोबस्त आपल्या ताब्यात ठेवते ४.
माळ चढोनि अवचट । पारके रिघती घडघडाट ।
ते दशमद्वाराची वाट । देऊनि कपाट दृढ बुजिलें ॥ ५ ॥
म्हणून शत्रूही एकदम माळ चढून जाऊन झपाट्याने पुढे घुसतात, तो त्या दहाव्या द्वाराचा मार्गही कपाट लावून अगदी पक्का बुजविलेला असतो ५.
यापरी स्वयें मन । दुर्ग पन्नासी आपण ।
त्यासी सबाह्य राखण । घरटी जाण स्वयें करी ॥ ६ ॥
अशा प्रकारे मन हे जातीनिशीं हा देहरूप किल्ला राखून बसते, आणि त्याचे अंतर्बाह्य संरक्षण करण्यासाठी स्वत:च घरटी बांधते, हे लक्षात ठेव ६.
धरोनि कामाचा हात । मन रिगे पारक्यांत ।
मुख्य धुरांसी लोळवीत । इतरांचा तेथ कोण पाडू ॥ ७ ॥
कामाचा हात धरून तेंच मन शुन्यामध्ये मुसंडी मारितें, आणि पुढच्या मुख्य मुख्य वीरांना लोळवून सोडते. मग इतरांचा पाड काय ? ७.
ऐसें मनाचें मारकपण । अनिवार अतिकठिण ।
त्रिविधतापें खोंजूनि जन । हुंबत जाण पाडिले ॥ ८ ॥
ह्याप्रमाणे ह्या मनाचा मारा अनिवार व फार कठीण आहे. त्याने त्रिविध तापाने लोकांना जर्जर करून हाय हाय करावयास लाविलें आहे ८.
देवांपासूनि आधिदैविक । मानस ताप आध्यात्मिक ।
भूतांपासाव तो भौतिक । या नांव देख त्रिविध ताप ॥ ९ ॥
देवांपासून जो ताप होतो तो आधिदैविक; मनापासून जो ताप होतो तो आध्यात्मिक; आणि पंचमहाभूतांपासून जो ताप होतो तो भौतिक; असे तापाचे तीन प्रकार होत ९.
सत्त्वगुणें देख अंतःकरण । रजोगुणें इंद्रियें जाण ।
महाभूतें विषयभान । तमोगुणें जाण प्रसवत ॥ ३१० ॥
महाभूतें ही सत्त्वगुणाने अंत:करण, रजोगुणानें इंद्रियें व तमोगुणाने विषयभाव प्रसवतात हे लक्षात ठेव ३१०.
त्रिविध विकारीं विकारबहुळ । ते हे प्रकृतीच येथें केवळ ।
हेचि दुर्गसामग्री प्रबळ । प्रपंच सबळ येणें जाहला ॥ ११ ॥
आणखी या तीन गुणांपासून दुसरे निरनिराळे विकार उत्पन्न होतात, ते ही प्रकृतीच होय. ही ह्या किल्ल्यावरील जय्यत तयारी आहे, आणि हिच्यामुळेच हा प्रपंच फार फोफावला आहे ११.
संकल्पमहापर्जन्योदकीं । वासनाजीवनें भरलीं टांकीं ।
तेणें जीवनें दुर्गाच्या लोकीं । संसारसुख दुःखीं विचरिजे ॥ १२ ॥
संकल्परूप महापर्जन्याच्या पाण्याने आणि वासनारूप उदकाने येथे टाकींच्या टाकी भरून राहिली आहेत. म्हणून किल्ल्यांत राहणारे लोक तेच पाणी पिऊन संसाराच्या सुखदुःखांत विहार करतात १२.
दुर्गनवद्वारीं समस्तें । आधिदैव आणि आधिभूतें ।
अध्यात्म तें कोण येथें । ऐक निश्चितें सांगेन ॥ १३ ॥
ह्या किल्ल्यांतील सर्व नऊ दारांमध्ये आधिदैव, आधिभूत व अध्यात्म ते कोणतें तेंही निश्चयेंकरून सांगतों १३.
कोणे द्वारीं कोण यंत्र । कोण चेतविता कैसें सूत्र ।
कैसा होतसे विषयमार । तोही निर्धार तूं ऐक ॥ १४ ॥
कोणत्या द्वारांत कोणते यंत्र असते, त्याचा चालक कोण, त्याची रचना कशी, त्याने विषयाचा मारा कसा होतो, त्याचाही प्रकार तूं ऐक १४.
दृग्रूपमार्कं वपुरत्र रन्ध्रे परस्परं सिध्यति यः स्वतः खे ।
आत्मा यदेषामपरो य आद्यः स्वयानुभूत्याखिलसिद्धसिद्धिः
एवं त्वगादि श्रवणादि चक्षुर्जिह्वादि नासादि च चित्तयुक्तम् ॥ ३१ ॥
[श्लोक ३१] जसा, डोळा अध्यात्म आहे, त्याचा विषय रूप हे अधिभूत आहे आणि डोळ्यांमध्ये असलेला अधिदैव अंश सूर्य आहे हे तिघेही एकमेकांच्या आश्रयाने राहातात परंतु आकाशातील सूर्य एक असून तो स्वतःसिद्ध आहे तसाच आत्मासुद्धा तिन्ही भेदांचे मूलकारण असल्यामुळे एकरूप असून त्यांच्याहून वेगळा आहे तो स्वयंप्रकाश असून आपल्या प्रकाशाने सर्व पदार्थांना प्रकाशित करतो त्याचप्रमाणे त्वचा, कान, जीभ, नाक आणि चित्त इत्यादींचे सुद्धा तीनतीन भेद आहेत [त्वचा, स्पर्श, वायू, कान, शब्द, दिशा, जीभ, रस, वरुण, नाक, वास, अश्विनीकुमार, चित्त, चिंतनविषय, वासुदेव.] (३१)
चक्षु इंद्रिय यंत्र थोर । तेथ कामिनीरूपाचा महामार ।
घायें भेदिती जिव्हार । पडले सुरनर कोट्यानुकोटी ॥ १५ ॥
नेत्रेंद्रिय ही एक मोठी तोफ आहे. ती स्त्रीस्वरूपाचा भडिमार करिते आणि त्या तडाक्याने मर्मस्थान भेदल्यामुळे कोट्यवधि सुरवर घायाळ होऊन पडतात १५.
चक्षुगोल इंद्रिय शरीरीं । तेथ अधिदेव सूर्य अधिष्ठात्री ।
देखिल्या रूपाची धारणा धरी । तेंचि निजनिर्धारीं अध्यात्म ॥ १६ ॥
नेत्रगोल हे इंद्रिय शरीरामध्ये असून त्याची सूर्य ही अधिष्ठात्री देवता आहे. म्हणून ते पाहिलेल्या स्वरूपाचा ठसा आपल्यामध्ये ग्रहण करते. तेच खरें अध्यात्म होय १६.
नीलपीतरूपाभरण । दृष्टीं देखिजे दर्शन ।
तेंचि अधिभूत सत्य जाण । दृश्याचें भान दृष्टीसी ॥ १७ ॥
निळे, पिवळे इत्यादि स्वरूपाचा जो भास दृष्टीला कळतो, ते दृष्टीला दृश्याचे भान होणे हेच खरोखर अधिभूत होय १७.
सूर्य अधिदैव सिद्ध आहे । अधिभूत दृष्टी भरलें पाहें ।
शरीरीं चक्षुगोळही होये । परी अध्यात्मतेजेंवीण राहे अंधत्व ॥ १८ ॥
अधिदैव सूर्य सिद्ध आहे, दृष्टीसमोर अधिभूत ठेविलेले आहे, आणि शरीरामध्ये नेत्रगोलही आहेत, पण दृष्टीला अध्यात्मतेज नसले तर आंधळेपणाच राहतो १८.
अधिदैव अधिभूत असतां पाहीं । अध्यात्म तेज जंव दृष्टीसी नाहीं ।
तंव देखणें न घडे कांहीं । अंधत्व ते ठायीं ठसावोनि ठाके ॥ १९ ॥
अधिदैव आणि अधिमूत असूनही दृष्टीला जोपर्यंत अध्यात्मतेज नाहीं, तोपर्यंत कांहींच पहाणे घडत नाही. तेथें अंधत्व कायमच राहातें १९.
अध्यात्म अधिभूत दोनी आहे । जैं अधिदैव सूर्य अस्ता जाये ।
तैं दृष्टीचें देखणें ठाये । स्तब्धत्वें राहे तमामाजीं ॥ ३२० ॥
किंवा अध्यात्म आणि अधिभूत दोन्ही असली आणि अधिदैवरूपी सूर्य जर अस्ताला गेला, तरीही डोळ्यांचे पहाणे अंधारामध्ये लुप्त होतें ३२०.
ते काळीं दृष्टीसी पाहें । स्नेहसूत्र मेळवून लाहे ।
अग्नि जरी केला साह्ये । तरी प्रकाशू नोहे रवीऐसा ॥ २१ ॥
त्या वेळी पदार्थ दृष्टीस पडावेत म्हणून, तेलवात एके ठिकाणी करून अग्नि लावून दिवा जरी पेटविला, तरी त्याचा कांहीं सूर्यासारखा प्रकाश पडत नाही २१.
तेथ चंद्रोदयो जरी जाहला । तो सूर्यसमान नाहीं आला ।
निशा निरसूनि दृष्टीं साह्य जाहला । यालागीं सूर्य बोलिला अधिदैव ॥ २२ ॥
किंवा चंद्रोदय झाला तरी तोसुद्धा सूर्यप्रकाशाची बरोबरी करीत नाही. सूर्य हा रात्रीला नाहीसे करून दृष्टीला साहाय्य करितो म्हणूनच सूर्याला अधिदैव असें म्हणतात २२.
अध्यात्म अधिभूत असतां पाहीं । अधिदैव सूर्य जेथ नाहीं ।
तेथ दृष्टींचे न चले काहीं । तुज म्यां तेंही सांगीतलें ॥ २३ ॥
अध्यात्म आणि अधिभूत ही दोन्ही असली, आणि अधिदैव जो सूर्य तोच नसला, तरीही दृष्टीचे काही चालत नाही, हेही मी तुला सांगितले २३.
अध्यात्म अधिदैव दोनी आहे । अधिभूतें दृश्यदर्शन राहे ।
तैं सत्य ब्रह्मज्ञान होये । जैं गुरुकृपा पाहे पूर्णांशें ॥ २४ ॥
अध्यात्म आणि अधिदैव ही दोन्ही असून जेव्हां गुरूची परिपूर्ण कृपा होते, आणि अधिभूताचे दृश्य दर्शन बंद होते, त्याच वेळी खरोखर ब्रह्मज्ञान प्राप्त होते २४.
येथ जें दृश्याचें दर्शन । तेणें देहबुद्धी दृढ जाण ।
तें दृश्याचें पुशिल्या भान । होय देहेंशीं शून्य संसार ॥ २५ ॥
येथे जे आपल्या दृश्याचे दर्शन होते, त्यामुळे देह हाच काय तो मी, ही देहबुद्धि दृढतर होऊन बसते. ते दृश्याचेंच भान नाहींसें केलें, म्हणजे देहासहवर्तमान संसारच शून्य वाटू लागतो २५.
अधिदैव अध्यात्म अधिभूत । त्रिपुटी बोलिजे हे येथ ।
तुज म्यां सांगीतली साद्यंत । जाण निश्चित विभाग ॥ २६ ॥
याप्रमाणे अधिदैव, अध्यात्म आणि अधिभूत ही त्रिपुटी कशाला म्हणतात ते तुला तिच्यांतील विभागांसह सविस्तर सांगितले २६.
येथूनि त्रिपुटीचें विंदान । दृश्य द्रष्टा आणि दर्शन ।
कर्म कर्ता क्रियाचरण । ध्येय ध्यान ध्यातृत्व ॥ २७ ॥
यावरून त्रिपुटीचे स्वरूप म्हणजे दृश्य, द्रष्टा आणि दर्शन; कर्म, कर्ता आणि क्रियेचे आचरण; ध्येय, ध्यान आणि ध्यातृत्व हे होय २७.
त्रिपुटि म्हणावयाचें कारण । परस्परें सापेक्षपण ।
तें अपेक्षेचें लक्षण । ऐक संपूर्ण सांगेन ॥ २८ ॥
ह्यांना त्रिपुटी म्हणण्याचे कारण हेच की, ती परस्परांशी सापेक्ष आहेत. याकरिता आता त्यांच्या परस्परांतील अपेक्षेचेही लक्षण तुला सविस्तर सांगतों २८.
नानाकारें अतिविलास । येथ देखणी दृष्टी डोळस ।
तेही सूर्येंवीण वोस । हा अनुप्रवेश परस्परें ॥ २९ ॥
नानाप्रकारचे सुखोपभोग असतात व ते पहावयाला दृष्टीही डोळस असते. पण ती दृष्टि सूर्याशिवाय व्यर्थच होते. असा हा परस्परसंबंध आहे २९.
सूर्य आहे डोळा नाहीं । तेथ पाहणें न चले पाहीं ।
हो कां डोळा आहे सूर्य नाहीं । तेथें दृष्टीचें कांहीं चालेना ॥ ३३० ॥
सूर्य असला आणि डोळा नसला, तरीही काही पाहता येत नाही. किंवा डोळा असला आणि सूर्य नसला तरीही दृष्टीचे कांही चालत नाही ३३०.
सूर्य आणि दृष्टी दोनी आहे । परी दृश्य जैं नाहीं होये ।
तैं दोहींचें सामर्थ्य राहे । देखावें काये दृष्टीनें ॥ ३१ ॥
किंवा सूर्य आणि दृष्टि दोन्ही असली, आणि पहावयालाच काही नसेल, तर दोघांचेही सामर्थ्य व्यर्थ होते. कारण, दृष्टीनें पहावयाचे काय ? ३१.
सूर्य प्रकाशी रूपासी । दृष्टीसी रिघोनियां स्वांशेंसीं ।
दाखवी नाना आकारांसी । परस्परानुप्रवेशीं बोलिजे सिद्धी ॥ ३२ ॥
सूर्य हा स्वरूप व्यक्त करितो आणि आपल्या किरणाने दृष्टींत शिरून नानाप्रकारचे आकार दाखवितो. म्हणून पहाण्याचे कार्य परस्परावलंबनानेच सिद्ध होते ३२.
इतुकें करोनियां सविता । नभोमंडळीं अलिप्तता ।
तेवीं जगदाकारें चेतविता । अलिप्त तत्त्वतां चिदात्मा ॥ ३३ ॥
परंतु इतके करूनही सूर्य हा अलिप्तपणेच आकाशमंडळांत असतो. त्याप्रमाणे ह्या विश्वस्वरूपाला व्यक्त करणारा चिदात्मा खरोखर अलिप्तच असतो ३३.
जो जगामाजीं भरला राहे । जगाचा हृदयस्थही होये ।
जग जरी होये जाये । परी तो आहे जैसातैसा ॥ ३४ ॥
तो या सर्व जगामध्ये भरून राहून जगाच्या हृदयांतसुद्धा राहतो, आणि हे सारे जग जरी उत्पन्न झाले व लयास गेले तरी तो जशाचा तसाच असतो ३४.
जेवीं आकाशअ भ्यंतरीं । होतां घटाकाश सहस्रवरी ।
आकाश त्या घटाभीतरीं । प्रत्यक्षाकारीं भरलें दिसे ॥ ३५ ॥
ज्याप्रमाणे आकाशामध्ये हजारों घटाकाशें निर्माण झाली तरी त्या घटांमध्ये आकाश हे प्रत्यक्षरूपाने भरलेले दिसतेंच ३५.
ते घटचि होती जाती । परी आकाश सहजस्थिती ।
तेवीं उत्पत्तिस्थितिअंतीं । अलिप्त श्रीपती चिदात्मा ॥ ३६ ॥
ते घटच होतात आणि जातात, पण आकाश जसें असावयाचे तसेंच असते; त्याप्रमाणे चित्स्वरूप जो परमात्मा श्रीपति, तो उत्पत्ति, स्थिति व लय ह्या अवस्थांमध्ये अलिप्तच असतो ३६.
तो आदीची अनादि आदि । तो बुद्धीची अनादि बुद्धी ।
तो सिद्धीची अनादि सिद्धी । जाण त्रिशुद्धी परमात्मा ॥ ३७ ॥
तो परमात्मा आदीचा अनादि आदि आहे, बुद्धीची अनादि बुद्धि आहे आणि खरोखर सिद्धीची अनादि सिद्धीही तोच परमात्मा आहे ३७.
हा प्रकाशा प्रकाशक । अर्काचाही आदि अर्क ।
स्वयें त्रिपुटीचा द्योतक । अलिप्त एक परमात्मा ॥ ३८ ॥
प्रकाशाचा प्रकाशक तो हा; सूर्याचाही आदिसूर्य तो हा; आणि त्रिपुटीचा द्योतकही हाच परमात्मा असून तो अलिप्त आहे ३८.
हा विवेकाचाही विवेक । हा सुखाचा सुखदायक ।
बुद्धीचा जो बोधक । प्रकाशा प्रकाशक परमात्मा ॥ ३९ ॥
विवेकाचाही विवेक तो हा; सुखाचा सुखदायक तो हाच ; बुद्धीचा बोधक आणि प्रकाशाचा प्रकाशक तो हाच परमात्मा होय ३९.
त्यासी जाणों जातां जाणपणें । वेदांसी जाहलें लाजिरवाणें ।
वेडावलीं स्मृतिपुराणें । न कळे शास्त्रपठणें भांडतां ॥ ३४० ॥
त्याला ज्ञानाभिमानाने जाणावयास जाऊन वेदही लज्जित झाले, स्मृति व पुराणें तर वेडावून गेली. शास्त्रपठणाने वादविवाद करूनही तो कळत नाही ३४०.
देवो देवी आणि देवता । भोग्य भोग आणि भोक्ता ।
नाना त्रिपुटींची त्रिगुणता । जाण सर्वथा प्रकृतीचि हे ॥ ४१ ॥
देव, देवी आणि देवता; भोग्य, भोग आणि भोक्ता; अशी जी नानाप्रकारची त्रिपुटींची त्रिगुणता उत्पन्न होते, ती ही प्रकृतीच होय ४१.
हा आद्य अव्यक्त अतर्क्य । प्रकृतिपर परमात्मा एक ।
यासी जाणावया विवेक । न चले देख आणिकांचा ॥ ४२ ॥
हा एक परमात्मा आद्य, अव्यक्त व अतर्क्य असून प्रकृतीहून भिन्न आहे. ह्याला जाणावयाला इतरांचा विचार चालावयाचा नाही ४२.
याचेनि हा हृदयीं देखिजे । याचेनि हा इत्थंभूत जाणिजे ।
यातें धरोनि हा पाविजे । हेंही लाहिजे कृपें याचेनी ॥ ४३ ॥
ह्याला ह्याच्याच सामर्थ्याने हृदयांत पहावें, ह्याच्याच योगाने ह्याला परिपूर्णत्वाने ओळखावें, ह्यालाच हाताशी घेऊन ह्याला पावावे, आणि तेसुद्धा याच्याच कृपेने प्राप्त होते ४३.
हा स्वप्रकाश सहज निजें । यासी प्रकाशी ऐसें नाहीं दुजें ।
याचेनि प्रकाशें हा देखिजे । याचेनि होइजे याऐसें ॥ ४४ ॥
हा स्वयमेवच स्वप्रकाशित आहे. ह्याला प्रकाशित करील असें दुसरे कोणी नाही. ह्याच्याच प्रकाशाने ह्याला पहावे आणि ह्याच्याच योगाने ह्याच्या स्वरूपांत मिळून जावें ४४.
अधिदैव अध्यात्म अधिभूत । नेत्रद्वारा सांगितलें तेथ ।
तैसेंच अन्य इंद्रियीं व्यावृत्त । देव सांगत संकलितें ॥ ४५ ॥
अधिदैव, अध्यात्म आणि अधिभूत ह्यांचे वर्णन नेत्रद्वारे येथे सांगितले, त्याप्रमाणेच इतर इंद्रियांमध्येही त्यांची व्याप्ति कशी असते, तेही देव संक्षेपानें सांगतात ४५.
योऽसौ गुणक्षोभकृतो विकारः प्रधानमूलान् महतः प्रसूतः ।
अहं त्रिवृन्मोहविकल्पहेतुः वैकारिकस्तामस ऐन्द्रियश्च ॥ ३२ ॥
[श्लोक ३२] त्वचा, स्पर्श, वायू; कान, शब्द, दिशा; जीभ, रस, वरुण; नाक, वास, अश्विनीकुमार; चित्त, चिंतनविषय, वासुदेव प्रकृतीपासून महत्तत्त्व आणि महत्तत्त्वापासून अहंकार उत्पन्न होतो म्हणून हा अहंकार गुणांच्या क्षोभाने उत्पन्न झालेल्या प्रकृतीचेच कार्य आहे अहंकाराचे तीन भेद आहेत, वैकारिक. (सात्त्विक), ऐंद्रिय. (राजस) आणि तामस हा अहंकारच अज्ञान आणि सृष्टीच्या विविधतेचे कारण आहे. (३२)
प्रधानापासाव महदादिद्वारा । नाना विकारांचा पसारा ।
गुणक्षोभें क्षोभूनि पुरा । उठिला उभारा त्रिपुटीरूपें ॥ ४६ ॥
प्रकृतीपासून महत्तत्त्वादिद्वारा अनेक विकार पसरतात, आणि गुणांचा क्षोभ झाल्यामुळे ते विकार पूर्णपणे खवळून त्रिपुटीच्या स्वरूपाने अवडंबर माजते ४६.
जेवीं सूर्यें चक्षुरादि विंदान । तैसेंचि श्रोत्र त्वचा रसना घ्राण ।
हें ज्ञानेंद्रियपंचक जाण । याचें कर्म समान त्रिपुटीरूपें ॥ ४७ ॥
ज्याप्रमाणे सूर्याच्या योगानें नेत्रादि इंद्रियांचे व्यापार चालतात, त्याप्रमाणेच कर्ण, त्वचा , जिव्हा व नाक हे जे ज्ञानेंद्रियपंचक, त्याचेंह, त्रिपुटीच्या रूपाने सारखेच कार्य घडत असते ४७.
येथ कर्मेंद्रियें पांच आन । तीं ज्ञानेंद्रिया अधीन ।
हस्त पाद गुद शिश्न । वाचा जाण पांचवी ॥ ४८ ॥
ह्यांत दुसरी जी पांच कर्मेद्रिये असतात, ती ज्ञानेंद्रियांच्या आधीन असतात. हात, पाय, गुद, शिस्न आणि पांचवी वाणी ४८.
त्यांसी ज्ञानेंद्रियें प्रेरिती । तैं कर्मेंद्रियें कर्मीं वर्तती ।
एवं उभयपंचकस्थिती । जाण निश्चितीं दशेंद्रियें ॥ ४९ ॥
त्यांना ज्ञानेंद्रिये प्रेरणा करतात तेव्हांच ती कर्मेंद्रिये क्रिया करूं लागतात. अशा प्रकारे ही दोन पंचके मिळून दहा इंद्रिये असतात हे लक्षात ठेव ४९.
चित्तचतुष्टयचमत्कार । मन बुद्धि चित्त अहंकार ।
हीं एकचि परी भिन्न प्रकार । जैसा व्यापार तैसें नांव ॥ ३५० ॥
मन, बुद्धि, चित्त आणि अहंकार यांनाच चित्तचतुष्टयचमत्कार असें म्हणतात. ही वस्तुत: एकच आहेत, परंतु प्रकार मात्र भिन्न. जसा ज्याचा व्यापार तसें त्याचे नांव ३५०.
केवळ देहाकारें मीपण । तो सबळ अहंकार जाण ।
संकल्पविकल्प जे गहन । तेंचि मन उद्धवा ॥ ५१ ॥
उद्धवा ! केवळ देहाच्या आकारानेच जो मीपणा प्राप्त होतो, तोच प्रबळ अहंकार होय. गहन असे जे संकल्प आणि विकल्प, तेंच मन ५१.
गतभोगाचें जें चिंतन । तें चित्ताचें लक्षण ।
केवळ निश्चयात्मक जाण । बुद्धि संपूर्ण ती नांव ॥ ५२ ॥
मागील भोगाचे जें स्मरण तेच चित्ताचे स्वरूप होय. आणि एखादा दृढतर निश्चय होणे तीच सर्व बुद्धि होय ५२.
हें गुणक्षोभाचें लक्षण । भोगसाधनें भोग्य जाण ।
त्याहूनि भोक्ता तो भिन्न । तेंही उपलक्षण अवधारीं ॥ ५३ ॥
हे गुणक्षोभाचे जे लक्षण तेंच भोगाच्या साधनाने भोग्य होते. पण भोक्ता असतो तो त्याहून निराळा असतो. त्याचेही लक्षण ऐक ५३.
त्वगिंद्रियीं विषयस्पर्शन । तेथें अधिदैव वायू जाण ।
त्याहूनि परमात्मा भिन्न । चित्स्वरूपें जाण अविकारी ॥ ५४ ॥
त्वचेला विषयांचा स्पर्श होतो. तेथें वायु हा अधिदैव होय. पण परमात्मा असतो तो त्याहून भिन्न असतो. तो ज्ञानस्वरूप असल्यामुळे अविकारीच असतो ५४.
गंधविषयो घ्राणेंद्रियें । तेथ अधिदैव अश्विनौदेव होये ।
आत्मा त्याहूनि वेगळा पाहें । चित्स्वरूपें राहे अविकारी ॥ ५५ ॥
गंधाचा विषय घ्राणेंद्रियाने समजतो. तेथें अश्विनौदेव हे अधिदैव होय. पण आत्मा याहूनही भिन्न असून तो ज्ञानस्वरूपाने अविकारीच राहतो ५५.
रसनेंद्रिय अतिगहन । रसविषयो तेथील जाण ।
वरुण अधिदैवत आपण । आत्मा स्वानंदपूर्ण रसातीत ॥ ५६ ॥
रसनेंद्रिय मोठे श्रेष्ठ आहे आणि रस हा त्याचा विषय आहे. तेथील अधिदैवत स्वतः वरुण आहे. पण आनंदाने परिपूर्ण असा आत्मा त्या रसाहून निराळाच आहे ५६.
श्रवणेंद्रियीं विषयो शब्द । तेथ दिशा अधिदैव प्रसिद्ध ।
शब्दीं निजात्मा निःशब्द । चिदत्वें शुद्ध अविकारी ॥ ५७ ॥
श्रवणेंद्रीयाचा विषय शब्द आहे. तेथें दिशा अधिदैव असल्याचे प्रसिद्धच आहे. पण शब्दामध्ये मूळ आत्मा हा निःशब्दच असून तो ज्ञानरूपाने शुद्ध अविकृतच असतो ५७.
चक्षुरिंद्रियलक्षण । पूर्वीं निरूपिलें जाण ।
हें ज्ञानेंद्रियविंदान । त्रिपुटी संपूर्ण ऐशा रीतीं ॥ ५८ ॥
नेत्रेंद्रियाचें लक्षण पूर्वी सांगितलेंच आहे. ज्ञानेंद्रियांची स्थिति ही अशी आहे. अशाच रीतीने त्रिपुटी बनते ५८.
चित्त इंद्रिय जें कां येथ । चिंतन विषयो त्यासी प्राप्त ।
वासुदेव अधिदैवत । आत्मा अलिप्त चित्तेंसीं ॥ ५९ ॥
यांत चित्त म्हणून जे इंद्रिय आहे, त्याला चिंतनाचा विषय प्राप्त झालेला असतो. तेथे वासुदेव हे अधिदैव असते. पण आत्मा हा चित्ताहून निराळाच ५९.
मनेंद्रिय अतिचपळ । संकल्प विषयो त्याचा प्रबळ ।
तेथ अधिदैव चंद्र निर्मळ । आत्मा केवळ मनातीत ॥ ३६० ॥
मन हे इंद्रिय अत्यंत चंचळ असून संकल्प हा त्याचा दांडगा विषय आहे, आणि तेथें निर्मळ चंद्र हे अधिदैव आहे. पण आत्मा हा मनाहून निराळाच आहे ३६०.
अहंकार इंद्रिय कठिण । तेथील विषयो मीपण ।
रुद्र अधिदैवत जाण । परमात्मा भिन्न अहंकारेंसीं ॥ ६१ ॥
अहंकार हें इंद्रिय मोठे बलवत्तर आहे. मीपणा हाच त्याचा विषय. रुद्र हे त्यांतलें अधिदैव. पण परमात्मा हा अहंकारापासून निराळाच ६१.
बुद्धींद्रिय अतिसज्ञान । बोद्धव्य तेथींचा विषयो जाण ।
ब्रह्मा अधिदैवत आपण । आत्मा चिद्घन बुद्ध्यतीत ॥ ६२ ॥
बुद्धिरूप इंद्रिय आहे ते अत्यंत ज्ञानसंपन्न भाहे. जाणणे हा त्याचा विषय. तेथें ब्रह्मदेव हे अधिदैवत आहे. पण ज्ञानरूप आत्मा हा बुद्धीहून निराळाच आहे ६२.
चित्तचतुष्टय सकारण । त्रिपुटी सांगीतली हे संपूर्ण जाण ।
आतां कर्मेंद्रियांचें लक्षण । ऐक संपूर्ण सांगेन ॥ ६३ ॥
कारणासहवर्तमान सर्व चित्तचतुष्टय व त्याची त्रिपुटी हे सर्व सांगितले. आतां कर्मेंद्रियांचेही सर्व लक्षण सांगेन ते ऐक ६३.
वागिंद्रियीं वाच्य विषयो । अग्नि अधिदैवत तेथील पहा हो ।
तेथ सरस्वतीशक्तीचा निर्वाहो । यासी अलिप्त देवो महामौनें ॥ ६४ ॥
वाणीच्या इंद्रियामध्ये भाषण हा विषय असतो. तेथे अग्नि हे आधिदैव असते पहा. त्यात सरस्वती शक्तीचा निवास असतो. पण आत्मा हा महामौनाने त्यापासून अलिप्तच असतो ६४.
पाणींद्रियीं ग्रहण विषयो । इंद्र अधिदैवत तेथील पहा हो ।
तेथ क्रियाशक्तीचा निर्वाहो । यासी अलिप्त देवो अक्रियत्वें ॥ ६५ ॥
हस्तेंद्रियाचा विषय ग्रहण हा आहे. तेथील अधिदैव इंद्र आहे. तेथें क्रियाशक्ति राहते. पण त्यापासूनही आत्मा हा अक्रियत्वाने अलिप्तच असतो ६५.
पादेंद्रियीं गति विषयो । तेथें उपेंद्र अधिदैवो ।
तेथें गमशक्तीचा निर्वाहो । यासि अलिप्त देवो निश्चलत्वें ॥ ६६ ॥
पाय ह्या इंद्रियाचा गति हा विषय असून तेथे उपेंद्र हे अधिदैव आहे. त्यांत गमनशक्तीची वस्ती आहे. पण निश्चलत्वाच्या योगाने आत्मा हा त्यापासूनही अलिप्त असतो ६६.
गुदेंद्रियीं विसर्ग विषयो । निर्ऋति आधिदैवत तेथील पहा हो ।
क्षरशक्तीचा तेथ निर्वाहो । त्यासी अलिप्त देवो अक्षरत्वें ॥ ६७ ॥
गुर्देद्रियाचा विषय मलोत्सर्ग हा होय. तेथे निऋती अधिदैव आहे. त्यांत क्षरशक्ति राहाते. पण त्यालाही अक्षरपणाने आत्मा अलिप्तच आहे ६७.
शिश्नेंद्रियीं रति विषयो । प्रजापति येथें अधिदैवो ।
आनंदशक्तीचा तेथें निर्वाहो । त्यासी अलिप्त देवो परमानंदें ॥ ६८ ॥
शिस्नेंद्रियाचा विषय रति हा आहे. तेथे प्रजापति हें अधिदैव असून आनंदशक्तीचा तेथें निवास असतो. परंतु परमानंदाच्या योगाने आत्मा त्यालाही अलिप्तच असतो ६८.
ज्ञानकर्मेंद्रियें कर्माचरण । चित्तचतुष्टयाचें लक्षण ।
हें गुणक्षोभाचें कारण । समूळ जाण मायिक ॥ ६९ ॥
ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये ह्यांच्या योगानें कर्माचे आचरण घडते. हेच चित्तचतुष्टयाचे लक्षण होय. गुणक्षोभाचेही कारण तेंच असल्यामुळे ते सर्वच मायिक आहे ६९.
तेंचि गुणक्षोभाचें प्रधान मूळ । प्रकृतिविकारें होय स्थूळ ।
आत्मा अविकारी निर्मळ । अलिप्त केवळ प्रकृतीसी ॥ ३७० ॥
गुणक्षोभाचे मुख्य मूळ तेच. तेच प्रकृतीच्या विकारानें जडरूप होते, आणि आत्मा तर अविकारी व निर्मळ असल्यामुळे प्रकृतीपासून केवळ अलिप्तच असतो ३७०.
जेवीं वृत्तिभूमीसमवेत । गृहीं गृहसामग्री समस्त ।
अभिमानें उपार्जी गृहस्थ । परी तो त्याअतीत आपण जैसा ॥ ७१ ॥
ज्याप्रमाणे एकादा गृहस्थ वडिलोपार्जित भूमीसह सर्व साहित्य मोठ्या अभिमानाने घरामध्ये संपादन करतो. तरी तो तिच्यापासून निराळाच असतो ७१.
तेवीं त्रिगुणक्षोभें अभिमान । वाढवी नाना विकारवन ।
आत्मा वसंत तो भिन्न । तेंचि निरूपण हरि बोले ॥ ७२ ॥
त्याप्रमाणे या तीन गुणांच्या क्षोभानेच अभिमान हा नानाप्रकारांच्या विकारांचे वन माजवितो, परंतु आत्मारूप वसंत असतो तो निराळाच असतो. तेंच निरूपण श्रीकृष्ण सांगत आहेत ७२.
आत्मापरिज्ञानमयो विवादो ह्यस्तीति नास्तीति भिदार्थनिष्ठः ।
व्यर्थोऽपि नैवोपरमेत पुंसां मत्तः परावृत्तधियां स्वलोकात् ॥ ३३ ॥
[ श्लोक ३३ ] आत्म्याच्या अज्ञानामुळे तो आहे किंवा नाही, हा वाद आहे पदार्थांविषयीची भेदबुद्धीही आत्म्याच्या अज्ञानामुळे आहे हे सर्व अर्थशुन्य असूनही ज्ञानस्वरूप अशा मला जे लोक विन्मुख आहेत, त्यांचा हा वाद संपत नाही. (३३)
अहंअध्यासें संसारप्राप्ती । जीवासी लागली निश्चितीं ।
त्या अहंकाराचे निवृत्तीं । भवनिर्मुक्ती जीवासी ॥ ७३ ॥
खरोखर ‘हा मी , ‘हे माझे’ या निदिध्यासानेच जिवाला संसार लागलेला आहे. त्या अहंकाराच्या निवृत्तीनेच संसारांतून जिवाची सुटका होईल ७३.
ऐसा बाधक्त्वें दुर्धर । कैंचा उठिला अहंकार ।
हाही पुसों पाहसी विचार । ऐक साचार सांगेन ॥ ७४ ॥
पण असा हा त्रासदायक असल्यामुळे असह्य होणारा अहंकार उठला तरी कोठून ? असे विचारूं पाहशील तर तेही नीटपणे सांगतों ७४.
स्वस्वरूपातें विसरून । दृढ जें स्फुरे मीपण ।
तोचि अहंकार जाण। विकारें त्रिगुणक्षोभक ॥ ७५ ॥
स्वस्वरूपाला विसरून जें दृढ मीपण स्फुरते, तोच महंकार होय. विकाराने तीन गुणांचा तोच क्षोभ करितो ७५.
जागृतीचा जो विसरू । तोचि स्वप्नसृष्टीचा विस्तारू ।
वस्तुविमूख जो अहंकारू । तोचि संसारू त्रिगुणात्मक ॥ ७६ ॥
जागृतीचे जे विस्मरण, तोच स्वप्नसृष्टीचा विस्तार होय. आणि स्वरूपाला विन्मुख झालेला जो अहंकार, तोच त्रिगुणात्मक संसार होय ७६.
विकारें क्षोभती तिन्ही गुण । हें विस्मरण मोहाचें लक्षण ।
तेणें विकारले तीन गुण । ते विभाग भिन्न अवधारीं ॥ ७७ ॥
विकाराच्या योगानें तीन गुण क्षुब्ध होतात. विस्मरण हें मोहाचे लक्षण होय. त्या विकाराने तीन गुण विकृत केले, म्हणून त्याचे निरनिराळे विभागही ऐक ७७.
मूळीं बोलिला वैकारिकू । तो अहंकार जाण सात्त्विकू ।
तो चित्तचतुष्टयद्योतकू । होय प्रकाशकू अधिदैवें ॥ ७८ ॥
मुळांत ‘वैकारिक’ म्हणून जो म्हटलेला आहे, तोच सात्त्विक अहंकार होय. तोच चित्तचतुष्टयाचा घोतक असून तो अधिदैवांचा प्रकाशक आहे ७८.
सत्त्वापासोनि उपजे मन । मनापासाव विकार गहन ।
यालागीं वैकारिक जाण । सत्त्वगुण बोलिजे ॥ ७९ ॥
सत्त्वापासून मन उत्पन्न होतें व मनापासून प्रचंड विकार उत्पन्न होतात. याकरितांच सत्त्वगुणालाही विकृत गुण असेच म्हणतात ७९.
ज्ञान कर्म उभय पंचक । हा इंद्रियांचा दशक ।
जाहला रजोगुण द्योतक । यालागीं ऐंद्रियक म्हणिपे त्यासी ॥ ३८० ॥
ज्ञानेंद्रियपंचक आणि कर्मेंद्रियपंचक ही दोन्ही मिळून दशेंद्रियें होतात. त्यांना रजोगुण प्रकाशित करितो, म्हणून त्या रजोगुणाला ‘ इंद्रीयसंबंधी’ असे म्हणतात ३८०.
तामस गुण जो कां येथें । आकाशादि पंचीकृतें ।
आवरणरूपें महाभूतें । विषयसमवेतें उपजवी ॥ ८१ ॥
आतां ह्यांत तामस म्हणून जो गुण आहे, तो आकाशादि सूक्ष्म पंचतत्त्वं महाभूतांना आच्छादून राहिलेली असतात त्यांना विषयांसह उत्पन्न करतो ८१.
महाभूतें विषयपंचक । झाला तमोगुण प्रकाशक ।
यालागीं भूतादि देख । यासी आवश्यक बोलिजे ॥ ८२ ॥
अशा रीतीने महाभूते आणि पांच विषय यांचा प्रकाशक तमोगुण होतो, म्हणून त्याला भूतांच्या पूर्वीचा (भूतादि) असें आदरपूर्वक म्हणतात ८२.
एवं त्रिगुणगुणविकारें । काम्यक्र्मसंस्कारें ।
सबळ होऊनि अहंकारें । संसारीं संचरे नाना हेतु ॥ ८३ ॥
अशा प्रकारे तीन गुणांच्या विकाराने आणि काम्य कर्माच्या संस्काराने अहंकाराने प्रबळ होऊन तो अनेक हेतूंनी संसारांत परिभ्रमण करीत राहतो ८३.
या प्रकृतिविकारांपासून । आत्मा अतिशयें भिन्न ।
जेवीं मृगजळातें भरून । अलिप्त भानू नभामाजीं ॥ ८४ ॥
परंतु ह्या प्रकृतीच्या विकारापासून आत्मा हा अतिशय भिन्न आहे. मृगजळाला उत्पन्न करून सूर्य जसा आकाशांत अलिप्त राहतो ८४,
जैसा प्रकाशोनि सर्पाकार । सर्पासी नातळे स्वयें दोर ।
तेवीं प्रकाशोनि संसार । निःसंग निर्विकार निजात्मा ॥ ८५ ॥
सर्पाचा आकार प्रगट करून स्वतः दोर जसा सर्पाला शिवतही नाही, त्याप्रमाणे परमात्माही संसार उत्पन्न करून आपण निःसंग व निर्विकारच असतो ८५.
जेवीं कृष्ण पीत रक्त श्वेत । स्फटिक ठेवितां तेथतेथ ।
जरी तदाकार भासत । तरी तो अलिप्त शुद्धत्वें ॥ ८६ ॥
ज्याप्रमाणे स्फटिक घेऊन तो काळ्या, पिवळ्या, तांबड्या किंवा पांढऱ्या रंगावर उचलून ठेवला तर तो त्या त्या रंगाचा दिसेल, पण तो स्वत: त्या रंगाहून निराळा असा पांढरा शुभ्रच असतो ८६,
तैसा गुणसंगें जीवात्मा बद्ध । दिसे तरी तो अतिशुद्ध ।
हा नेणोनियां निजबोध । करिती विवाद मतवादी ॥ ८७ ॥
त्याप्रमाणे गुणांच्या संसर्गाने जीवात्माही बद्ध आहे असे दिसते, तरी तो अत्यंत शुद्धच आहे. पण हे ज्ञान न समजल्यामुळे भिन्न भिन्न मताभिमानी लोक उगाच वाद करीत बसतात ८७.
एक म्हणती आत्मा देही । एक म्हणती तो विदेही ।
एक म्हणती आत्म्याच्या ठायीं । हे दोन्ही नाहीं सर्वथा ॥ ८८ ॥
कोणी म्हणतात आत्मा हा देहधारी आहे; कोणी म्हणतात तो विदेही आहे; आणि कोणी म्हणतात की, आत्म्याच्या ठिकाणी ही दोन्ही मुळींच नाहींत ८८.
एक म्हणते आत्मा सगुण । एक म्हणती तो गुणविहीन ।
एक म्हणती ते वेगळी खूण । सगुण निर्गुण परमात्मा ॥ ८९ ॥
कोणी म्हणतात आत्मा सगुण आहे; कोणी म्हणतात तो निर्गुण आहे; कोणी म्हणतात त्याचे स्वरूप असें निराळंच आहे की, तो परमात्मा सगुण आणि निर्गुण असा दोन्ही आहे ८९.
एक प्रतिपादिती भेद । एक प्रतिपादिती अभेद ।
एक म्हणती दोन्ही अबद्ध । आमुचें मत शुद्ध देहात्मवादू ॥ ३९० ॥
कोणी द्वैत प्रतिपादन करतात, तर कोणी अद्वैत प्रतिपादन करतात. कोणी म्हणतात, ही दोन्ही असंबद्ध आहेत व आमच्या मताने देहात्मवाद हाच खरा होय ३९०.
एक म्हणती हें मिथ्याभूत । प्रत्यक्ष दिसताहे जो येथ ।
तो प्रपंच मानिती सत्य । हेंचि मत एकाचें ॥ ९१ ॥
कोणी म्हणतात की, हे सर्वच खोटें. येथें जो प्रत्यक्ष दिसतो आहे तो प्रपंच खरा, हेच कोणाचे मत असते ९१.
ऐसे भेदवाद सकळ । विचारितां अज्ञानमूळ ।
आत्मा चिन्मात्र केवळ । भेदातें समूळ छेदक ॥ ९२ ॥
असे जे निरनिराळे प्रकार आहेत, त्यांचा विचार केला म्हणजे ते सारेच अज्ञानमूलक असल्याचे दिसून येते. कारण आत्मा हा निखालस ज्ञानस्वरूप व सर्व भेदांचे निरसन करणारा आहे ९२.
‘आत्मा परिज्ञानमय’ शुद्ध । हें श्लोकींचें मूळ पद ।
तेणें निरसे । अज्ञानभेद । आत्मा शुद्ध बुद्ध चिदात्मा ॥ ९३ ॥
‘आत्मा परिज्ञानमयः’ म्हणजे आत्मा ज्ञानस्वरूप आहे, हेच मूळच्या श्लोकांतील वास्तविक शब्द आहेत. त्यामुळे अज्ञानाचा भेदच राहात नाही. आत्मा हा शुद्ध, बुद्ध व ज्ञानरूपीच असल्याचे सिद्ध होतें ९३.
जेवीं सक्षत्र रजनी । निवटीत प्रकटे तरणी ।
तेवीं सभेद कार्य निरसूनी । प्रकट चित्किरणीं चिद्भानू ॥ ९४ ॥
ज्याप्रमाणे नक्षत्रांसहवर्तमान रात्र नाहींशी करीत सूर्य प्रगट होतो, त्याप्रमाणे भेदांसहवर्तमान कार्याचाही लोप करून ज्ञानसूर्य ज्ञानरूपी किरणांनी प्रगट होता ९४.
तेथ गुणेंसी माया उडे । भेदासहित वाद बुडे ।
मूळासह अज्ञान खुडे । चहूंकडे सच्चिदानंद ॥ ९५ ॥
तेव्हां मायाही गुणांसह नाश पावते, वादही भेदासह मिटतो, अज्ञान मुळासह खुंटते, आणि चहुंकडे सच्चिदानंदच भरून जातो ९५.
आत्मा सच्चिदानंद पूर्ण । तेथ सकळ मिथ्या अज्ञान ।
तें अज्ञाननिरासीं साधन । विवेक सांख्यज्ञान व्यर्थ दिसे ॥ ९६ ॥
आत्मा हा सच्चिदानंदानेंच परिपूर्ण असल्यामुळे त्याच्यापुढे सर्व अज्ञान फोल होऊन जाते. अज्ञानाचा निरास करण्याचे ते एकच साधन होय. विवेक किंवा सांख्य तत्त्वज्ञान व्यर्थ होय असे दिसतें ९६.
तेचि विषयींचें निरूपण । श्लोकार्धें सुलक्षण ।
स्वयें सांगताहे श्रीकृष्ण । साध्यसाधनविभाग ॥ ९७ ॥
त्याच विषयाचे निरूपण अर्ध्या श्लोकामध्ये उत्तम रीतीनें साध्यसाधनाच्या विभागेंकरून श्रीकृष्ण स्वतः सांगत आहेत ९७.
मूळीं समूळ मिथ्या अज्ञान । अज्ञानजन्य विषयभान ।
तें देखोनि भुलले जन । पडिलें विस्मरण स्वस्वरूपीं ॥ ९८ ॥
मुळामध्ये अज्ञान हे समूळ मिथ्या, म्हणून विषयाचे भान हेंही अज्ञानजन्यच होय. पण तेंच पाहून लोक भ्रमात पडल्यामुळे स्वस्वरूपाचे त्यांना विस्मरण पडलें आहे ९८.
मी परमात्मा हृदयस्थ सन्निधी । त्या मजपासोनि उपरमे बुद्धी ।
मग विषयासक्ति त्रिशुद्धी । आवडे उपाधि देह गेह दारा ॥ ९९ ॥
मी परमात्मा प्रत्यक्ष त्यांच्या हृदयांत अगदी जवळ असूनही त्या माझ्यापासून त्यांची बुद्धि पराङ्मुख होते, आणि त्यामुळेच खरोखर विषयासक्ति उत्पन्न होऊन घरदार, बायकामुलें, देह ही उपाधीच त्यांना गोड वाटते ९९.
जें स्वस्वरूपाचें विस्मरण । तें वाढवी तीव्र विषयध्यान ।
तेणें जीवासी जन्ममरण । अनिवार जाण देहाभिमाने ॥ ४०० ॥
स्वस्वरूपाचें जें विस्मरण असते, तेंच विषयाचे चिंतन अतिशय वाढवितें. आणि त्या देहाभिमानानेंच जीवांना अनिवार जन्ममरण प्राप्त होतें ४००.
तो नासावया देहाभिमान । वैराग्ययुक्त ज्ञानध्यान ।
मीचि बोलिलों साधन । समूळ अज्ञानच्छेदक ॥ १ ॥
त्या देहाभिमानाचा नाश करण्याकरितांच मी वैराग्ययुक्त ज्ञानध्यानाचे साधन कसें संपादन करावे हे सांगितले. कारण तेच समूळ अज्ञानाचे छेदक आहे १.
जंववरी अंगीं देहाभिमान । तंव अवश्य पाहिजे साधन ।
निःशेष निरसल्या अज्ञान । वृथा साधन मीही मानीं ॥ २ ॥
जोपर्यंत आंगामध्ये देहाभिमान असतो, तोपर्यंत साधनही अवश्य पाहिजे. अज्ञानाचे निखालस क्षालन झाले, म्हणजे साधन हे व्यर्थ होय हे मलाही मान्य आहे २.
म्हणशी तें कोण पां अज्ञान । जें शुद्धासी लावी जीवपण ।
त्या जीवाअंगीं जन्ममरण । अनिवार जाण वाढवी ॥ ३ ॥
आतां ते अज्ञान कोणतें म्हणशील तर, मूळचे शुद्ध स्वरूप असलेल्याला जें जीवपणा लावून देतें तें. तेच जीवाच्या आंगीं अनिवार जन्ममरण लावून देतें ३.
स्वस्वरूप विसरोनि जाण । देहीं स्फुरे जें मीपण ।
अत्यंत दृढतर अज्ञान । तो देहाभिमान उद्धवा ॥ ४ ॥
उद्धवा ! आत्मस्वरूपाचा विसर पडून देहामध्ये जे मीपण स्फुरते, तेच अत्यंत दृढतर अज्ञान होय. तोच देहाभिमान ४.
गौण नांव त्याचें अज्ञान । येर्हवीं मुख्यत्वें देहाभिमान ।
हें ऐकोनि देवाचें वचन । दचकलें मन उद्धवाचें ॥ ५ ॥
अज्ञान हे त्याचे नांव गौणच होय. एरवीं पाहिले तर देहाभिमान हाच मुख्य होय. हे देवाचे भाषण ऐकून उद्धवाचें मन दचकले ५.
तेचि अर्थींचा प्रश्न । देवासी पुसे आपण ।
कोण्या युक्तीं देहाभिमान । जन्ममरण भोगवी ॥ ६ ॥
म्हणून त्याच अर्थाचा प्रश्न तो आपणच देवाला विचारू लागला. तो असा की, देहाभिमान हा कोणत्या रीतीने जन्ममरण भोगावयास लावतो? ६.
उद्धव उवाच-
त्वत्तः परावृत्तधियः स्वकृतैः कर्मभिः प्रभो ।
उच्च्यावचान् यथा देहान् गृह्णन्ति विसृजन्ति च ॥ ३४ ॥
[श्लोक ३४] उद्धवाने विचारले भगवान ! आपल्याला विन्मुख असलेले जीव स्वतःच केलेल्या कर्मांमुळे उच्चनीच योनींमध्ये जात-येत राहातात. (३४)
सर्वत्र सदा संमुख गगन । त्यासी कदा न घडे विमुखपण ।
तेंवी आत्मा सबाह्य परिपूर्ण । वृत्ति विमुख जाण होय कैसी ॥ ७ ॥
आकाश सर्व ठिकाणी नेहमी सन्मुखच असते. ते कधीही विन्मुख होत नाही. त्याप्रमाणे आत्मा हाही अंतर्बाह्य परिपूर्णच आहे. तेव्हा त्याची वृत्ति विन्मुख कशी होणार ? ७.
जैं जाळीं बांधवे गगन । तैं अक्रिया लागे कर्मबंधन ।
वंध्यागर्भ सटवे जाण । तैसें जन्ममरण मुक्तासी ॥ ८ ॥
जाळ्यात जेव्हा आकाश बांधता येईल, तेव्हां अकर्त्याला कर्माचे बंधन लागेल. वंध्येचा गर्भ सटावणे हे जसें खोटे, तसेच मुक्ताला जन्ममरण हें खोटे आहे ८.
आत्म्यावेगळें कांहीं । रितें तंव उरलें नाहीं ।
तरी ये देहींचा ते देहीं । गमनसिद्धी पाहीं कैसेनी ॥ ९ ॥
आत्म्याशिवाय रिकामें असें जर काही उरलेलेच नाही, तर ह्या देहांतून त्या देहांत जाणे तरी कशाने पडते ९.
पृथ्वी रुसोनि वोसरां राहे । आकाश पळोनि पर्हां जाये ।
तैं देहींचा देहांतरा पाहें । आत्मा लाहे संसरण ॥ ४१० ॥
पृथ्वी रुसली आणि तिने आश्रय द्यावयाचा बंद केला, किंवा आकाशच दूर निघून गेले, तर देहांत असलेला आत्मा दुसऱ्या देहात जाऊ शकेल ४१०.
सात समुद्र गिळी मुंगी । तैं आत्मा उंचनीच योनी भोगी ।
हे अतर्क्य तर्केना मागी । भुलले योगी ये अर्थीं ॥ ११ ॥
मुंगी जर सप्त समुद्र गिळून टाकील, तर आत्म्याला उच्चनीच योनी भोगाव्या लागतील. अर्थात हें अशक्य आहे. ही गोष्ट अतर्क्य आहे. तिच्या संशोधनाबद्दल तर्क चालत नाही. त्याविषयीं योगीसुद्धा भ्रमात पडले ११.
तन्ममाख्याहि गोविन्द दुर्विभाव्यमनात्मभिः ।
न ह्येतत्प्रायशो लोके विद्वांसः सन्ति वञ्चिताः ॥ ३५ ॥
[श्लोक ३५] हे गोविंदा ! ज्या लोकांना आत्मज्ञान नसते, त्यांना या विषयाची कल्पनाही करता येत नाही आणि जगात बहुतेक लोक आपल्या मायेत गुंतल्यामुळे हे जाणत नाहीत म्हणून आपणच मला याचे रहस्य सांगा. (३५)
अभिनव हे तुझी गती । सर्वथा न कळे श्रीपती ।
मायामोहित जे चित्तीं । त्यां तुझी स्थिती नेणवे ॥ १२ ॥
हे श्रीकृष्णा ! तुझी लीला अघटित आहे, ती मुळीच कळत नाही. ज्यांच्या चित्ताला मायेनें भुरळ पडली आहे, त्यांना तुझी स्थिति कळत नाही १२.
तूं आत्मा अद्वितीय अविनाश । तेथ उत्पत्ति स्थिति विनाश ।
नाथिला दाविसी भवभास । हा अतर्क्य विलास तर्केना ॥ १३ ॥
आत्मा हा केवळ अद्वितीय, अविनाश असा असून तूं त्यांत उत्पत्ति, स्थिति व नाश दाखवून मिथ्या संसाराचा भास उत्पन्न करतोस, ही तुझी लीला अर्तक्य आहे. तिच्याविषयीं तर्क चालत नाही १३.
येथ वेदाची युक्ती ठेली । उपनिषदें वेडावलीं ।
पुराणें मुकीं झालीं । अतियत्नें लक्षिली न वचेचि मागी ॥ १४ ॥
ह्यांत वेदाची बुद्धि गुंग झाली, उपनिषदे वेडावून गेली, पुराणें मुकी होऊन बसली. या सर्वांनी नाही नाही तितके यत्न करून पाहिले. पण त्यांत त्यांची गति चालत नाही १४.
तुझे केवळ कृपेवीण । तुझें इत्थंभूत नव्हे ज्ञान ।
ऐसे जड मूढ हरिकृपाहीन । त्यांसी भवबंधन तुटेना ॥ १५ ॥
तुझें इत्थंभूत ज्ञान तुझ्या कृपेशिवाय व्हावयाचें नाहीं. म्हणून हरीच्या कृपेला पात्र न होणारे असे जे जड मूढ लोक असतात, त्यांना संसाराचे बंधन तुटत नाही १५.
तुझे योगमायेची अतर्क्यता । ब्रह्मा भुलविला वत्सें नेतां ।
शिवू भुलविला मोहिनी देखतां । इतरांची कथा ते कोण ॥ १६ ॥
तुझ्या योगमायेची करणी अतर्क्य आहे. तिने वासरे चोरून नेतांना ब्रह्मदेवालाही भुलवून सोडले. मोहनीला पाहतांच प्रत्यक्ष शंकरालासुद्धा भूल पाडली. मग इतरांची कथा काय? १६.
प्रपंचीं अथवा परमार्थी । तुझेनि चालती इंद्रियवृत्ती ।
यालागीं गोविंदनामाची ख्याती । त्रिजगतीं वाखाणिली ॥ १७ ॥
प्रपंचात म्हणा, किंवा परमार्थात म्हणा, इंद्रियांच्या प्रवृत्ति तुझ्यामुळेच चालतात. म्हणूनच गोविंद ह्या नावाची कीर्ति त्रिभुवनामध्ये वर्णिलेली आहे. १७.
सादर कृपापूर्वक आपण । माझा सांगावा अतर्क्य प्रश्न ।
देहीं देहांतरा संचरण । जीवास जन्ममरण तें कैसें ॥ १८ ॥
ह्याकरितां आपण कृपा करून ह्या माझ्या अतर्क्य प्रश्नाचे उत्तर सांगावे की, एका देहांतून दुसऱ्या देहांत जीव कसा जातो? व जीवाला जन्ममरण तरी कसे येतें? १८.
ऐकोनि उद्धवाचा प्रश्न । हांसितन्नला मधुसूदन ।
हें अवघें मायिक जाण । कल्पनाविंदान मनोमय ॥ १९ ॥
हा उद्ध्वाचा प्रश्न ऐकून श्रीकृष्ण हासले आणि म्हणाले की, अरे ! हा सर्व मायिक, केवळ मनोमय कल्पनेचा खेळ आहे १९.
श्रीभगवानुवाच-मनः कर्ममयं नृणामिन्द्रियैः पंचभिर्युतम् ।
लोकाल्लोकं प्रयात्यन्य आत्मा तदनुवर्तते ॥ ३६ ॥
[श्लोक ३६] भगवान श्रीकृष्ण म्हणाले – मनुष्यांचे मन हे कर्मसंस्कारांचा समूह आहे त्या संस्कारांनुसार भोग प्राप्त करून घेण्यासाठी ते मन पाच इंद्रियांसह एका शरीरातून दुसर्या शरीरात जात असते. आत्मा त्यापासून वेगळा असूनही त्याचा अहंकार धरतो त्यामुळे त्याला सुद्धा आपले जाणेयेणे भासू लागते. (३६)
अकरा इंद्रियें पंच म्हाभूतें । हें सोळा कळांचें लिंगदेह येथें ।
मुख्यत्वें प्राधान्य मनाचें तेथें । नाना विषयांतें कल्पक ॥ ४२० ॥
अकरा इंद्रिये आणि पंचमहाभूतें ह्या सोळा कळांचा लिंगदेह होतो, आणि अनेक विषयांची कल्पना करणारे जें मन त्याचेच त्यांत विशेषेकरून प्राधान्य असते ४२०.
येथ लिंगदेह तेंचि मन । मनाआधीन इंद्रियें जाण ।
मनाचेनि देहासी गमन । तेथ देहाभिमान मनासवें ॥ २१ ॥
यांत लिंगदेह तेच मन होय, आणि त्या मनाच्या आधीन इंद्रिये असतात. मनामुळेच देह चालत असतो. त्यांत देहाभिमान असतो तोही मनाबरोबरच असतो २१.
मन ज्यातें सोडूनि जाये । तेथ अभिमान उभा न राहे ।
मनोयोगें अभिमान पाहें । देहाचा वाहे खटाटोप ॥ २२ ॥
मन ज्याला सोडून जाते, तेथें देहाभिमान उभासुद्धा राहात नाही. मनाच्या योगानेच अभिमान हा देहाचा खटाटोप वहात असतो २२.
जेथ विषयासक्त मन । करी शुभाशुभ कर्माचरण ।
तेव्हां होऊनि कर्माधीन । देही करी गमन देहांतरा ॥ २३ ॥
मन जेव्हां विषयासक्त होऊन शुभाशुभ कर्माचरण करते, तेव्हां जीव कर्माधीन होऊन दुसऱ्या देहांत प्रवेश करितो २३.
आत्मा यासी अलिप्त भिन्न । परी देहासवें दावी गमन ।
हें अतिअतर्क्य विंदान । ऐक लक्षण तयाचें ॥ २४ ॥
आत्मा हा देहापासून अगदी भिन्न व अलिप्स असतो, परंतु आपण देहाबरोबरच जातो असे भासवितो. हे त्याचे कौशल्य अद्भुत आहे. त्याचेही लक्षण ऐक २४.
घट जेथ जेथ हिंडों वैसे । आकाश त्यासवें जात दिसे ।
परी ढळणें नाहीं आकाशें । आत्म्याचें तैसें गमन येथें ॥ २५ ॥
घट हा जिकडे जिकडे हिंडू लागतो, तिकडे तिकडे त्याच्याबरोबर घटाकाशही गेलेले दिसते. पण खरोखर आकाश कांहीं हालत नाही. त्याचप्रमाणे या आत्म्याचे जाणे आहे २५.
घटामाजीं भरिजे अमृत । अथवा घालिजे खातमूत ।
आकाश दोहींसीं अलिप्त । तेवीं सुखदुःखातीत देहस्थ आत्मा ॥ २६ ॥
घटामध्ये अमृत भरलें, किंवा मलमूत्र भरले तरी त्या दोहोंपासून आकाश हे अलिप्तच असते, त्याप्रमाणे देहांत राहणारा आत्माही सुखदुःखांपासून निराळाच असतो २६.
घट घायें कीजे शतचूर । परी आकाशीं न निघे चीर ।
तेवीं नश्वरीं अनश्वर । जाण साचार निजात्मा ॥ २७ ॥
घटावर दगड घालून त्याचे शतशः तुकडे केले तरी आकाशाला एक भेगसुद्धा पडत नाही. त्याप्रमाणे नश्वरामध्येच आत्मा हा खरोखर अनश्वर असतो २७.
घट फुटोनि जेथ नाशे । तेथ आकाश आकाशीं सहज असे ।
नवा घट जेथ उपजो बैसे । तों तेथ आकाशें व्यापिजे ॥ २८ ॥
घट फुटून जेव्हां नाश पावतो, त्या वेळी आकाश हें स्वयंसिद्ध आकाशामध्येच असते. किंवा नवा घट तयार व्हावयाला लागला, की त्यालाही आकाश व्यापून टाकतें २८.
तेवीं देहाचें नश्वरपण । आत्मा अखंडत्वें परिपूर्ण ।
आत्म्यासी देहांतरगमन । जन्ममरण असेना ॥ २९ ॥
त्याचप्रमाणे ह्या देहाची अशाश्वती आहे, आणि आत्मा हा अखंडपणाने परिपूर्णच आहे. आत्म्याला दुसऱ्या देहांतही जाणे नाही, आणि त्याला जन्ममरणही पण नाहीं २९.
देहीचें देहांतरगमन । वासनायोगें करी मन ।
तें मनोगमनाचें लक्षण । ऐक संपूर्ण सांगेन ॥ ४३० ॥
जीवाचे एका देहांतून दुसऱ्या देहांत जाणे हें वासनेच्या योगाने मनच करितें. तें मन जीवासह दुसऱ्या देहांत कसे जातें तें सारे लक्षण सांगेन, ऐक ४३०.
ध्यायन्मनोऽनुविषयान् दृष्टान्वानुश्रुतानथ ।
उद्यत्सीदत् कर्मतन्त्रं स्मृतिस्तदनुशाम्यति ॥ ३७ ॥
[श्लोक ३७] कर्माच्या अधीन असणारे मन नेहमी या किंवा परलोकांशी संबंधीत विषयांचे चिंतन करीत असते जेव्हा ते नव्या विषयाचे चिंतन करते, तेव्हा ते पहिला विषय विसरते त्यावेळी त्याची अगोदरच्या विषयांची स्मृतीसुद्धा नाहीशी होते. (३७)
श्रुतदृष्टविषयांचें ध्यान । निरंतर वाढवी मन ।
तीव्र धारण दारुण । अन्य स्फुरण स्फुरेना ॥ ३१ ॥
मन नेहमी पाहिलेल्या व ऐकलेल्या विषयांचा निदिध्यास वाढवीत असते. तो त्या मनाचा निदिध्यास फार कठीण व अत्यंत भयंकर असतो. त्यापुढे त्याला दुसरे काही सुचत म्हणून नाही ३१.
आवडत्या विषयांचें ध्यान । अंतकाळीं ठसावे जाण ।
तेव्हां तदाकार होय मन । सर्वभावें आपण तन्निष्ठा ॥ ३२ ॥
अंतकालच्या वेळी आवडत्या विषयाचेच ध्यान मनात ठसून राहते, तेव्हां मन तदाकार बनते. ते सर्वभावाने त्यांत मिळून जातें ३२.
तेव्हां भोगक्षयें जाण । मागल्या देहाचा अभिमान ।
सहजेंचि विसरे मन । पुढील ध्यान एकाग्रतां ॥ ३३ ॥
तेव्हां ते भोग संपले की, मन हे सहजच पूर्वीच्या देहाचा अभिमान विसरून जाते, आणि पुढील देहाचेच एकाग्रतेने ध्यान करीत राहते ३३.
विषयवासनारूढ मन । निजकर्मतंत्रे जाण ।
देहांतरीं करी गमन । तेथ सप्राण संचरे ॥ ३४ ॥
विषयवासनेवर लुब्ध झालेले मन, आपल्या कर्मानुसार प्राणांसहवर्तमान दुसऱ्या देहांत संचार करिते ३४.
मागील सांडिल्या देहातें । सर्वथा स्मरेना चित्तें ।
पुढें धरिलें आणिकातें । हेंही मनातें स्मरेना ॥ ३५ ॥
पूर्वी सोडलेला जो देह असतो, त्याचे चित्ताला मुळींच स्मरण होत नाही. आणि आपण पुन्हा दुसरा देह धारण केला आहे, याचीही मनाला आठवण होत नाही ३५.
विषयाभिनिवेशेन नात्मानं यत्स्मरेत्पुनः ।
जन्तोर्वै कस्यचिद्धेतोर्मृत्युरत्यन्तविस्मृतिः ॥ ३८ ॥
जन्म त्वात्मतया पुंसः सर्वभावेन भूरिद ।
विषयस्वीकृतिं प्राहुर्यथा स्वप्नमनोरथः ॥ ३९ ॥
[श्लोक ३८, ३९] नवीन देहाच्या विषयात तल्लीन झाल्यामुळे जीवाला, पहिल्या देहाचे विस्मरण होते कोणत्याही कारणाने आपल्या अगोदरच्या शरीराविषयी मुळीच आत्मीयता नसणे. (किंवा त्याला पूर्णपणे विसरणे) म्हणजेच मृत्यू होय. (३८)
हे उदार उद्धवा ! मनुष्य जेव्हा नव्या शरीराचा पूर्णपणे आपलेपणाने स्वीकार करतो, तोच त्याचा जन्म होय ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये किंवा मनोरथ करताना माणूस नव्या शरीराचा आपले म्हणून स्वीकार करतो. (३९)
विषयाभिनिवेशें मन । ज्या स्वरूपाचें करी ध्यान ।
तद्रूप होय आपण । पूर्वदेहाचें स्मरण विसरोनियां ॥ ३६ ॥
मन हे विषयलोलुपतेने ज्या स्वरूपाचे चिंतन करीत असते, त्यामध्येच ते स्वतः पूर्वदेहाची आठवण विसरून तद्रूप बनून राहते ३६.
तेंचि विस्मरण कैसें । निजबालत्व प्रौढवयसें ।
निःशेख नाठवे मानसें । पूर्वदेह तैसें विसरोनि जाय ॥ ३७ ॥
तें पूर्वदेहाला कसे विसरतें ? तर आपण प्रौढ वयांत आलों म्हणजे आपले लहानपण आपणांला जसे मुळीच आठवत नाही, त्याप्रमाणेच तेही आपल्या पूर्वीच्या देहाला विसरून जातें ३७.
ऐसें अत्यंत विस्मरण । त्या नांव देहाचें मरण ।
त्या विसरासवें जाण । चेतना सप्राण निघोनि जाये ॥ ३८ ॥
अशा प्रकारचे जें निखालस विस्मरण, त्याचेच नांव देहाचे मरण होय. त्या विस्मरणाबरोबरच चेतना प्राणांसह निघून जाते ३८.
जेव्हां चेतना जाय सप्राण । तेव्हां देहासी ये प्रेतपण ।
त्या नांव उद्धवा मरण । जन्मकथन तें ऐक ॥ ३९ ॥
चेतना प्राणांसह निघून गेली म्हणजे देहाला प्रेतपणा प्राप्त होतो. उद्धवा! त्याचंच नाव मरण होय. आतां जन्माची गोष्ट ऐक ३९.
स्न्नेहें द्वेषें अथवा भयें । अंतकाळीं जें ध्यान राहे ।
पुरुष तद्रू्पचि होये । जन्मही लाहे तैसेंचि ॥ ४४० ॥
मृत्युसमयीं स्नेहाने, द्वेषाने किंवा भयाने जो निदिध्यास राहतो, तद्रूपच तो होतो, आणि त्याला तसलाच जन्म प्राप्त होतो ४४०.
भरत करितां अनुष्ठान । अंतीं लागलें मृगाचें ध्यान ।
तो मृगचि झाला आपण । ध्यानानुरूपें मन जन्म पावे ॥ ४१ ॥
जडभरत अनुष्ठान करीत असतां अंतकालीं त्याला स्नेहाने मृगाचे ध्यान लागले, त्यामुळे तो स्वत:च मृग झाला. कारण, त्याच्या निदिध्यासाप्रमाणे त्याचे मन जन्मास आलें (भागवत स्कं.५ अ. ८१९) ४१.
भयास्तव भृंगाचें ध्यान । कीटकी करितां जाण । ते तद्रूओअ होय आपण । ध्यानानुरूपें मन जन्म पावे ॥ ४४२ ॥अळी ही भीतीने कुंभारणीचें ध्यान करीत असतां ती स्वतः तद्रूप होते. कारण ध्यानाप्रमाणेच मन जन्मास येते ४२.
द्वेषें ध्यातां श्रीकृष्णासी । तद्रूपता झाली पौण्ड्रकासे ।
जैसें दृढ ध्यान मानसीं । ते गति पुरुषासी त्रिशुद्धी ॥ ४४३ ॥
पौंडूकानें द्वेषाने श्रीकृष्णाचे ध्यान केले, त्यामुळेच त्याला तद्रूपता प्राप्त झाली. ह्यावरून मनाला ज्या विषयाचा दृढतर निदिध्यास लागलेला असतो, तशाच प्रकारची खरोखर पुरुषाला गति प्राप्त होते ४३.
वाढवूनियां संभ्रम । अंतकाळीं आवडे सप्रेम । जेथें ध्यान ठसावें मनोरम । तेंचि जन्म पुरुषासी ॥ ४४४ ॥संसाराचा पसारा आपणच वाढवून ठेविलेला असल्यामुळे अंतकालींही तो सर्व प्रेमाचा आवडता विषय होऊन राहातो. पण त्यांतही जेथें विशेषतः ध्यान बसते, त्याच स्वरूपाचा जन्म पुरुषाला येतो ४४.
मग तेणें ध्यानानुभवें । जैसा कांहीं आकारू संभवे ।
तेथ देहाभिमान पावे । ‘हें मी आघवें’ म्हणोनी ॥ ४५ ॥
मग त्या चिंतनाच्या सामर्थ्याप्रमाणे जशा आकाराचा देह प्राप्त होतो, तशाच देहाचा अभिमान उत्पन्न होतो. आणि ‘हा सारा देह मीच’ असें तो समजतो ४५.
येथ मन आणि अभिमान । स्वरूप एक कार्यें भिन्न ।
हें चित्तचतुष्टयलक्षण । जाणती सज्ञान एकात्मता ॥ ४६ ॥
ह्यांत मन आणि अभिमान ह्यांचं स्वरूप पाहूं गेलें तर एकच असते, पण कार्य मात्र भिन्न असतात. हे चित्तचतुष्टयाचं स्वरूप ज्ञानी लोक एकात्मतेने जाणत असतात ४६.
दैवयोगें त्या देहाचें । बरवें वोखटें घडे साचें ।
तैं अभिमान घेऊनि नाचे । जन्म पुरुषाचें या नांव ॥ ४७ ॥
त्या देहाचे बरे किंवा वाईट दैवयोगाप्रमाणेच वस्तुतः होत असते. पण तो देहाचाच अभिमान घेऊन नाचत असतो. ह्याचंच नांव पुरुषाचा जन्म ४७.
परी हें देह नव्हे आन । हेंही स्मरेना तें मन ।
पूर्वील जो देहाभिमान । तोचि येथ जाण आरोपी ॥ ४८ ॥
पण हा देह पूर्वीचा नव्हे, हा दुसरा आहे, हेही त्याच्या मनाला स्मरत नाही. ह्यामुळे पूर्वीचा जो देहाभिमान असतो, तोच ह्या ठिकाणीही धरून बसतो ४८.
येचि अर्थींचा दृष्टांत । स्वयें सांगताहे श्रीकृष्णनाथ ।
जेवीं स्वप्न आणी मनोरथ । विसरवित निजदेहा ॥ ४९ ॥
ह्याच अर्थाचा दृष्टान्त श्रीकृष्ण स्वतः सांगत आहेत. ज्याप्रमाणे स्वप्नात किंवा मनोराज्यांत आपल्या देहाचे भान नसते ४९;
स्वगृहीं दरिद्री निद्रित । तो स्वप्नीं होय अमरनाथ ।
मग उर्वशीप्रमुख अप्सरांत । असे मिरवत ऐरावतीं ॥ ४५० ॥
एकादा भिकारी आपल्या घरांतच निजलेला असतो आणि तो स्वप्नामध्ये इंद्र होतो; मग तो ऐरावतावरून उर्वशीसारख्या मोठमोठ्या अप्सरांमध्ये मिरवतो ४५०;
तें दरिद्रदेह माझें गेलें । हें अमरदेह प्राप्त झालें ।
ऐसें स्वप्नीं नाहीं आठवलें । तैसें जन्म झालें जनासी ॥ ५१ ॥
आपला पूर्वीचा भिकार देह गेला, हा नवा देवाचा देह आपणांला प्राप्त झाला, असें कांहीं स्वप्नांत त्याला स्मरत नसते; त्याप्रमाणेच लोकांच्या जन्मांची स्थिति आहे ५१.
मजूर राउळींचें घृत नेतां । तो तुरुंगीं चढे मनोरथा ।
मन नाचूं लागे उल्हासतां । स्वकल्पिता कल्पना ॥ ५२ ॥
एकादा मजूर देवळांतील तुपाची घागर घेऊन जात असतां मनामध्ये मनोराज्य करीत असतो की, मी घोड्यावर बसलो आहे आणि त्याच स्वकल्पित कल्पनातरंगांतच मन उल्हासाने नाचू लागते ५२.
सबळ वारूचें उड्डाण । म्हणूनि उडूं जातां आपण ।
पडोनि घृतकुंभ होय भग्न । पुसती जन काय झालें ॥ ५३ ॥
इतक्यांत त्या मनोराज्यांतच घोड्याने उंच उडी मारिली असें वाटून तो स्वतःही उडी मारतो, तेव्हा त्याच्याजवळची तुपाची घागर पडून तिचे तुकडे होऊन जातात, आणि मग लोक विचारूं लागतात की, ‘हे काय झाले ?’ ५३.
बळें उडाला माझा घोडा । परी स्मरेना तो फुटला घडा ।
बंदीं पडला रोकडा । नेणे बापुडा मनोरथें ॥ ५४ ॥
तो त्या मनोराज्यांतच म्हणतो की, ‘माझ्या घोडयाने जोराने उडी मारली. ‘ पण तुपाची घागर फुटली व त्या अपराधामुळे तो खरोखर बंदीतही पडला, तरी देखील त्याला मनोराज्यामुळे त्याचे भानही नसते ५४.
येथवरी तीव्र जें विस्मरण । त्या नांव देहाचें मरण ।
अतिउद्यत जें मनाचें ध्यान । तेंचि जन्म प्राण्यासी ॥ ५५ ॥
येथपर्यंतचे त्याचे जे तीव्र विस्मरण, त्याचंच नांव देहाचे मरण होय आणि मनाचा जो तीव्र निदिध्यास तेंच प्राण्याचें जन्म होय ५५.
एवं आत्म्यासी जन्ममरण । तें केवळ भ्रमाचें लक्षण ।
तेचि अर्थींचें निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ५६ ॥
तात्पर्य, आत्म्याला जन्म किंवा मरण म्हणणे हे केवळ भ्रमाचे लक्षण होय. त्याच अर्थाचें निरूपण श्रीकृष्ण स्वतः सांगत आहेत ५६.
स्वप्नं मनोरथं चेत्थं प्राक्तनं न स्मरत्यसौ ।
तत्र पूर्वमिवात्मानमपूर्वं चानुपश्यति ॥ ४० ॥
[श्लोक ४०] नव्या स्वप्नामध्ये किंवा मनोरथ करताना पहिले स्वप्न किंवा मनोरथ जीवाला मुळीच आठवत नाही त्याचप्रमाणे नव्या शरीराचा स्वीकार केल्यावर जीव आपण पूर्वीचेच असूनही नव्यानेच उत्पन्न झालो आहो, असे मानतो. (४०)
स्वप्न देखत्या पुरुषासी । विसरोनि निजदेहासी ।
स्वप्नींच्या देहगेहांसी । साभिमानेंसीं वाढवी ॥ ५७ ॥
स्वप्न हे पाहाणाऱ्या पुरुषाला देहभान विसरावयास लावून स्वप्नांतील घरादारांचाच पसारा त्याच्या अभिमानासह वाढवितें ५७.
जागृतिदेहो राहिला तेथें । स्वप्नदेहो पावलों येथें ।
एवं पूर्व अपूर्व दोहींतें । न स्मरे चित्ते पुरुष जैसा ॥ ५८ ॥
जागृतींतील देह तिकडे राहिला, आणि येथे आपल्याला स्वप्नदेह प्राप्त झाला आहे, अशा प्रकारे पूर्वीच्या व सांप्रतच्या दोन्ही देहांना जसा पुरुष स्मरत नाही ५८,
जागृति आणि देखिलें स्वप्न । या दोहीं देहांसीं देखता भिन्न ।
तेवीं जन्म आणि मरण । जीवासी जाण असेना ॥ ५९ ॥
जागृति व पाहिलेले स्वप्न अशा दोन्ही स्थितीतील देहांना पाहणारा त्यांच्याहून भिन्नच असतो; त्याप्रमाणेच जीव हा जन्म व मरण ह्या अवस्थांहून भिन्न आहे. म्हणजे जीवाला जन्म आणि मरण ही दोन्ही नाहींत ५९,
एवं देहासी जन्म नाश । आत्मा नित्यमुक्त अविनाश ।
स्वप्नमनोरथविलास । तैसा बहुवस संसार ॥ ४६० ॥
तात्पर्य, जन्म आणि मृत्यु हे फक्त देहालाच आहेत. आत्मा आहे तो नित्य मुक्त व शाश्वत असून स्वप्नांतील मनोरथांच्या तरंगांप्रमाणे संसार हा अनेक प्रकारांनी विस्तारलेला आहे ४६०.
देहासी जन्म स्थिति मरण । यांसी मनचि गा कारण ।
मनःकल्पित संसार जाण । तेंचि श्रीक्रुष्ण सांगत ॥ ६१ ॥
देहाला उत्पत्ति, स्थिति आणि लय होण्याला मनच कारण आहे. म्हणून संसार आहे तो मनःकल्पित आहे. तेच श्रीकृष्ण सांगतात ६१.
इन्द्रियायनसृष्ट्येदं त्रैविध्यं भाति वस्तुनि ।
बहिरन्तर्भिदाहेतुर्जनोऽसज्जनकृद्यथा ॥ ४१ ॥
[श्लोक ४१] मनाच्या निरनिराळ्या देहांविषयीच्या अभिमानामुळे आत्म्याच्या ठिकाणी उत्तम, मध्यम व अधम असा नसलेलाच भेद उत्पन्न होतो तसाच आतबाहेर हा भेद उत्पन्न होतो जसा दृष्ट पुत्राला जन्म देणारा पिता त्या मुलामुळे लोकांचा शत्रू किंवा मित्र बनतो. (४१)
मनें कल्पिली सकळ सृष्टी । मनःकृत इंद्रियकामाठी ।
मनें वाढविली त्रिपुटी । कर्मकसवटी विभाग ॥ ६२ ॥
सर्व सृष्टि मनानेच कल्पिली आहे. इंद्रियांचे सर्व व्यापार मनामुळेच होतात, आणि कर्माच्या कसोटीच्या विभागाप्रमाणे मनानेच ही त्रिपुटी वाढविलेली आहे ६२.
अधिदेव अध्यात्म अधिभूत । हें त्रैविध्य मनःकृत ।
वस्तु अखंडचि तेथ । त्रिधा भासत कल्पना ॥ ६३ ॥
अधिदैव, अध्यात्म व अधिभूत हे तीन प्रकारही मनानेच केलेले आहेत. खरोखर आत्मवस्तु ही अखंड असूनही तीन प्रकारच्या कल्पनेचा भास होतो ६३.
जैसें भांडें कुंभार करी । तेथ नभ दिसे तदाकारीं ।
गगन सर्वथा अविकारी । तें दिसे विकारी भांडयोगें ॥ ६४ ॥
ज्याप्रमाणे कुंभार गाडगे तयार करतो त्या वेळी त्यांतले आकाशही त्याच आकाराचे दिसू लागते, खरे म्हटले तर आकाश हें निखालस निर्विकार आहे तरी त्या गाडग्याच्या योगाने तेही विकृत झालेले दिसते ६४,
तेवीं आत्मा अविकारी नित्य शुद्ध । तेथ मनःकल्पित त्रिविध ।
नानापरींच्या त्रिपुटी विविध । वाढविला भेद तो ऐक ॥ ६५ ॥
तद्वत् आत्मा हा अविकृत, नित्य आणि शुद्ध असाच आहे. त्याला मन हें तीन प्रकारचा कल्पिते आणि त्या नानाप्रकारच्या त्रिपुटींनीच अनेक प्रकारचा भेद वाढतो. तो कसा वाढतो तें ऐक ६५.
कार्य कर्म आणि कर्ता । ध्येय ध्यान आणि ध्याता ।
ज्ञेय ज्ञान आणि ज्ञाता । या मनःकल्पिता त्रिविध ॥ ६६ ॥
कार्य, कर्म आणि कर्ता; ध्येय, ध्यान आणि ध्याता; ज्ञेय, ज्ञान आणि ज्ञाता ; ह्या तीन त्रिपुटी मनानेच कल्पिलेल्या आहेत ६६.
अहं कोहं सोहं भेद । त्वंपद तत्पद असिपद ।
सत् चित् आणि आनंद । हेही संबंध मायिक ॥ ६७ ॥
‘अहं’ म्हणजे मी, ‘कोहं’ म्हणजे मी कोण अशी आशंका, व ‘सोहं’ म्हणजे परब्रह्म तोच मी, असा हा भेद; किंवा ‘त्वं’ म्हणजे जीव, ‘तत् ‘ म्हणजे ब्रह्म, आणि ‘असि’ म्हणजे तूं आहेस, ही पदें; किंवा सत, चित् व आनंद हे संबंध ही सर्व मायिक होत ६७.
असंताचिये निवृत्ती । संतत्व प्रतिपादी वेदोक्ती ।
जडाचिये समाप्ती । चिदत्व बोलती वस्तूसी ॥ ६८ ॥
असत् म्हणजे मिथ्या अशी जी माया, तिचा निरास करण्यासाठी वेदवाणीही सतचे प्रतिपादन करिते आणि जडाचा लय होण्यासाठी आत्मवस्तूलाच चैतन्यतत्त्व असें म्हणतात ६८.
करितां दुःखाचा छेद । वस्तूसी म्हणती परमानंद ।
एवं सच्चिदानंद । जाण प्रसिद्ध मायिक ॥ ६९ ॥
दुःखाचा निरास करतांना परब्रह्मालाच परमानंद असें म्हणतात. म्हणून सच्चिदानंद हाही उघडच मायिक ठरतो ६९.
असंत मिथ्या मायिक पाहीं । तैसें तत्त्व कोण ठेवीं ठायीं ।
जडासीचि ठाव नाहीं । तेथ चिदत्व कायी संपादे ॥ ४७० ॥
असत् हे मिथ्या असल्यामुळे मायिक आहे. तसलें तत्त्व ठिकाणावर ठेवणार कोण? जडालाच जर मुळी ठिकाण नाहीं, तर तेथे चैतन्याचे तत्त्व तरी हातीं कसें लागणार ? ४७०.
जेथ नाहीं दुःखसंबंध । तेथ कोण म्हणे आनंद ।
एवं वस्तूच्या ठायीं सच्चिदानंद । मायिक संबंध या हेतू ॥ ७१ ॥
जेथें दुःखाचा मुळीच संबंध नाही, तेथे आनंद असें म्हणणार कोण ? म्हणून परब्रह्माच्या ठिकाणी सच्चिदानंद हा संबंध लावणे हेही मायिकच होय ७१.
जेथ जें भासे संसारभान । त्रिगुणत्रिपुटी विंदान ।
तें सर्व मायिक मनःकृत जाण । आत्मा तो भिन्न गुणातीत ॥ ७२ ॥
जेथें संसाराचे भान होतें तो त्रिगुणाच्या त्रिपुटीचाच खेळ होय. म्हणून तेही सर्व मायिक व मनःकृत होय, हे लक्षात ठेव. आत्मा आहे तो गुणांहून निराळाच आहे ७२.
आत्मा नित्य मुक्त शुद्ध बुद्ध । तेथ भासें जो त्रिविध भेद ।
तो मनःकृत गुणसंबंध । जाण प्रसिद्ध मायिक ॥ ७३ ॥
आत्मा हा नित्य, मुक्त, शुद्ध आणि ज्ञानस्वरूपच आहे. त्यांत जो तीन प्रकारचा भेद दिसून येतो, तो मनाने केलेला गुणसंबंधी भेद आहे. म्हणून उघडच मायामय ठरतो ७३.
पुरुष श्रोत्रिय सदाचार । त्यासी स्त्री करी व्यभिचार ।
तेणें दोषी म्हणती भ्रतार । तैसा भेदप्रकार आत्म्यासी ॥ ७४ ॥
एकादा पुरुष अग्निहोत्री असून सदाचारी असतो. पण त्याची स्त्री जर व्यभिचार करील, तर त्यामुळे तिचा नवरा दोषी आहे असे लोक म्हणतात, तसाच हा आत्म्याच्या भेदांचा प्रकार आहे. म्हणजे आत्मा वास्तविक अलिप्त असून गुणांचे दोष त्याच्यावर आरोपिलेले असतात ७४.
जेवीं स्वप्नामाजीं नर । एकला होय संसार ।
तो निद्रायोगें चमत्कार । तैसा भेदप्रकार मायिक ब्रह्मीं ॥ ७५ ॥
स्वप्नांत ज्याप्रमाणे एकटाच पुरुष सर्व संसार बनतो, पण तो सर्व चमत्कार वास्तविक निद्रेमुळे होतो, तसाच भेदाचा मायिक प्रकार ब्रह्मामध्येही आहे ७५.
जडाजड देहभेद । परिच्छिन्नत्वें जीवभेद ।
हा स्वप्नप्राय मायिक बोध । आत्मा नित्य शुद्ध अद्वितीय ॥ ७६ ॥
जड आणि अजड हे देहांतील भेद; किंवा निराळा केलेला जीवाचा भेद; हा स्वप्नाप्रमाणेच मायेचा भास होय. आत्मा हा नित्य, शुद्ध आणि अद्वितीय असाच आहे ७६.
ऐसे मायाविभेदनिष्ठ जन । त्यांसी वैराग्यसिद्ध्यर्थं जाण ।
काळकृत जन्ममरण । तेंचि निरूपण हरि बोले ॥ ७७ ॥
असे मायेने केलेल्या भेदावरच निष्ठा ठेवून रहाणारे जे लोक आहेत, त्यांना वैराग्य प्राप्त व्हावे म्हणूनच काळाने जन्ममरण लावून दिले आहे. त्याचेच वर्णन श्रीकृष्ण करितात ७७.
नित्यदा ह्यङ्ग भूतानि भवन्ति न भवन्ति च ।
कालेनालक्ष्यवेगेन सूक्ष्मत्वात्तन्न् दृश्यते ॥ ४२ ॥
[श्लोक ४२] उद्धवा ! काळाची गती सूक्ष्म असल्यामुळे क्षणोक्षणी प्राण्यांच्या शरीरांशी उत्पत्ती आणि नाश असूनही ते दिसून येत नाहीत. (४२)
म्हणे ऐक बापा उद्धवा । स्थावरजंगमादि देहभावा ।
काळाचिया काळप्रभाव । लागला नीच नवा जन्ममृत्यू ॥ ७८ ॥
ते म्हणाले, बा उद्धवा! ऐक. स्थावर व जंगम आदिकरून जी जी देहस्वरूपे आहेत, त्यांना काळाच्या प्रभावाने नित्य नवा जन्ममृत्यु लागलेलाच आहे ७८.
अतिसूक्ष्म काळगतीसीं । काळ ग्रासीतसे जगासी ।
या अंगींच्या जन्ममृत्यूंसी । नेणवे जीवासी मायामोहें ॥ ७९ ॥
काळ आपल्या अगदी सूक्ष्म गतीने साऱ्या जगाला प्रासून टाकीत असतो. हे आंगास चिकटलेले जे जन्ममृत्यु, ते मायेच्या मोहामुळे जीवांना समजू शकत नाहीत ७९.
निजमाता बाळवयासी । प्रकटावयवीं लाडवी पुत्रासी ।
तेचि माता प्रौढवयसेंसी । होय त्या पुत्रासी सलज्ज ॥ ४८० ॥
आई आपल्या लहान मुलाचे सर्व अवयव उघडे नागडे असताही त्याच्या बालपणी त्याला लाडिकपणे खेळविते, पण तीच आई तो मुलगा मोठा झाला म्हणजे त्याला लाजते ४८०.
ते बाल्यावस्था काळें नेली । हे प्रौढवयसा नवी आली ।
यालागीं माता सलज्ज झाली । हे काळें केली घडामोडी ॥ ८१ ॥
ती बाल्यदक्षा काळाने नेली, आणि ही नवी प्रौढ दशा प्राप्त झाली, म्हणून आईसुद्धा लाजूं लागली. ही सर्व घडामोड काळाने केलेली आहे ८१.
ऐसा नित्य नाश नित्य जन्म । भूतांसी करी काळ सूक्ष्म ।
या जन्ममृत्यूंचें वर्म । नेणती संभ्रम भ्रांत प्राणी ॥ ८२ ॥
हा सूक्ष्म काळ प्राणिमात्रांना अशा रीतीने नित्य नवा नाश व नित्य नवा जन्म देत असतो, पण भ्रमाने भ्रांत झालेले प्राणी या जन्ममृत्यूचे वर्म जाणत नाहीत ८२.
जो अवस्थाभाग काळें नेला । त्यासवें तो देहचि गेला ।
पुढें वयसा नवी पावला । तो काळें आणिला नवा देहो ॥ ८३ ॥
आयुष्यातील अवस्थेचा जो भाग काळ घेऊन जातो, त्याबरोबर तो देहच जातो. पुढे नवें वय आले म्हणजे काळाने त्याला नवा देहही दिला असे समजावयाचे ८३.
ऐसा संभव आणि असंभवो । नीच नवा काळकृत पहा वो ।
यालागीं त्रिविधविकारीं देहो । स्वयें स्वयमेवो देखिजे ॥ ८४ ॥
अहो ! असा हा काळाने केलेला उद्भव आणि नाश नित्य नवाच असतो पहा ! म्हणूनच देह हा तीन प्रकारांनी युक्त आहे, हे आपले आपणच पहावे ८४.
अतर्क्य काळाची काळगती । भूतें जन्ममृत्यु पावती ।
ते अलक्ष्य गतीचे अर्थीं । दृष्टांत श्रीपति दावीत ॥ ८५ ॥
काळाची काळगति अतर्क्य आहे, त्यामुळे प्राण्यांना जन्ममरण प्राप्त होते. त्या अत्यंत गहन काळगतीविषयींच श्रीकृष्ण दृष्टान्त दाखवून देतात ८५.
यथार्चिषां स्रोतसां च फलानां वा वनस्पतेः ।
तथैव सर्वभूतानां वयोऽवस्थादयः कृताः ॥ ४३ ॥
[श्लोक ४३] कालाच्या प्रभावाने ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत, नद्यांचे प्रवाह किंवा झाडावरील फळांच्या अवस्था बदलत असतात, त्याचप्रमाणे सर्व प्राण्यांच्या शरीराचे आयुष्य, अवस्था इत्यादीसुद्धा बदलत असतात. (४३)
नित्य नूतन दीपज्वाळा । होतां जातां न दिसती डोळां ।
सवेग वाहतां जळकल्लोळा । यमुनाजळा न देखिजे ॥ ८६ ॥
दिव्याच्या ज्वाळा क्षणोक्षणी नव्या नव्या उत्पन्न होतात, पण त्या नवीन उत्पन्न होत असतांना व पूर्वीच्या नाश पावत असतांना डोळ्यांना दिसत नाहीत. यमुनेंतील पाण्याचा प्रवाह मोठमोठ्या लाटांनी वेगाने वाहत असला, म्हणजे त्या प्रवाहांतील पाणी क्षणोक्षणी नवें नवें येऊन जात आहे असे दिसत नाही ८६.
फळ न सांडितां वृक्षदेंठ । कडवट तुरट आंबट ।
तेचि गोड होय चोखट । ऐशी अतर्क्य अदृष्ट काळसत्ता ॥ ८७ ॥
फळ हे वृक्षाचा देठ न सोडता स्वतः कडवट, तुरट, आंबट किंवा उत्तम गोडही होते. अशी काळाची अदृष्ट सत्ता अतर्क्य आहे ८७.
तोचि काळ देहासरिसा । नित्य नूतन लागला कैसा ।
बाल्य तारुण्य वृद्धवयसा । देहदशा पालटी ॥ ८८ ॥
तोच काळ देहाबरोबर नित्य नवा कसा उत्पन्न होतो? याचे उत्तर असे की, तो बाल्य, तारुण्य व वार्धक्य अशा देहाच्या अवस्था बदलीत असतो ८८.
मूढ कुशळ अशक्तता । अवस्था नाशीत ये अवस्था ।
तेथ ‘मी तोचि’ हें तत्त्वतां । स्फुरे सर्वथा कैसेनी ॥ ८९ ॥
याशिवाय मूढ, चतुर, अशक्तपणा अशी नवीन नवीन अवस्था पूर्वीच्या अवस्थेचा नाश करून उत्पन्न होत असते. तेव्हां ‘पहिला तोच खरोखर मी’ हे तरी स्मरण कोणत्या कारणाने होते ? ८९.
ऐसें कल्पील तुझें मन । ते अर्थींचें निरूपण ।
अखंड स्फूर्तीचें कारण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ४९० ॥
अशीही कल्पना तुझ्या मनात येईल. असें म्हणून स्वतः श्रीकृष्ण त्या विषयाचे निरूपण करतांना अखंड स्फूर्तीचे कारण सांगत आहेत ४९०.
सोऽयं दीपोऽर्चिषां यद्वत् स्रोतसां तदिदं जलम् ।
सोऽयं पुमानिति नृणां मृषा गीर्धीर्मृषायुषाम् ॥ ४४ ॥
[श्लोक ४४] त्याच ज्योतीचा हा दिवा आहे, प्रवाहातील पाणी तेच आहे, असे समजणे आणि म्हणणे जसे खोटे आहे, त्याचप्रमाणे विषयचिंतनामध्ये आपले आयुष्य व्यर्थ घालविणार्या अविवेकी पुरूषांचे तोच हा मनुष्य असे म्हणणे आणि समजणे सर्वथैव खोटे आहे. (४४)
दीपज्वाळा होती जाती । अग्नी जैसा पूर्वस्थिती ।
यालागीं तोचि दीपू म्हणती । ऐशा युक्ती उद्धवा ॥ ९१ ॥
उद्धवा! दिव्याच्या ज्वाळा जरी नवीन नवीन उत्पन्न होतात व पूर्वीच्या नाश पावतात, तरी त्यांतील अग्नि पूर्वीप्रमाणेच एकसारखा असतो, एवढ्याकरितांच त्याला ‘दिवा’ म्हणतात. अशी ही योजना आहे ९१.
प्रवाह वाहती कल्लोळ । परी अखंड एकचि जळ ।
यालागीं म्हणती सकळ । तेंचि जळ या हेतू ॥ ९२ ॥
किंवा पाण्याच्या प्रवाहामध्ये जोराने मोठमोठ्या लाटा वहात असतात, तरी पाणी असते ते अखंड एकच असते. म्हणूनच सर्व लोक त्याला ‘पाणी’ असे म्हणतात ९२.
तेवीं देहीं वयसा होती जाती । आत्मा अखंड अनुस्यूती ।
तोचि मी हे स्फुरे स्फूर्ती । या उपपत्ती उद्धवा ॥ ९३ ॥
त्याचप्रमाणे उद्धवा! देहामध्येही वयपरत्वे निरनिराळ्या अवस्था होतात व जातात, तरी आत्मा असतो तो अखंड सर्वव्यापीच असतो. याच कारणाने ‘तोच मी’ अशी स्फूर्ति स्फुरण पावते ९३.
म्हणसी मीपणें अहंकार रूढ । तोही अज्ञानत्वें जडमूढ ।
त्यासी प्रकाशक आत्मा दृढ । मीपणें अखंड वस्तुत्वें स्फुरे ॥ ९४ ॥
आता तू म्हणशील की, ‘मीपणाने अहंकार रूढ झाला आहे.’ पण त्याचे उत्तर असे की, तोही अज्ञानपणामुळे जड मूढच होय. त्याचा दृढ़ प्रकाशक आत्माच आहे. तेव्हा तोच नेहमीं परब्रह्मस्वरूपाने स्फुरण पावतो ९४.
येथ देहासीचि जन्ममरण । आत्मा अखंडत्वें परिपूर्ण ।
येथ देहात्मबुद्धीचें जें मीपण । ते वाचा जाण् अतिमिथ्या ॥ ९५ ॥
परंतु हें जें जन्ममरण असते, ते देहालाच असते. आत्मा हा सर्वव्यापित्वामुळे परिपूर्णच आहे. देह हाच आत्मा व तोच मी असे जे म्हणतात, ते म्हणणे मिथ्या होय ९५.
विषयांची विषयसिद्धी । देहीं जे कांहीं देहबुद्धी ।
तेही मिथ्या जाण त्रिशुद्धी । भवबंधीं स्थापक ॥ ९६ ॥
विषयांची कार्यसिद्धि होणे, किंवा देहाच्या ठायीं ‘मी’पणा असणे, ही खरोखर मिथ्याच होय. त्याच्या योगाने संसारबंधनांत मात्र गुंतावयास होते ९६.
कर्मभूमीं नरदेहाऐसें । निधान लाधलें अनायासें ।
तेथींचेनिही आयुष्यें । जे विषयविलासें विगुंतले ॥ ९७ ॥
कर्मभूमीत नरदेहासारखा लाभ अनायासे झाला असता, त्यांतील आयुष्यामध्ये जे विषयसुखांत गुंतून पडले ९७.
तो अमृत विकूनि कांजी प्याला । रत्नें देऊनि कोंडा घेतला ।
पर्वत फोडूनि टोळ धरिला । गज विकिला इटेसाठीं ॥ ९८ ॥
ते त्यांचे कृत्य अमृत विकून टाकून पेज प्याल्याप्रमाणे, किंवा रत्ने देऊन कोंडा घेतल्याप्रमाणे, किंवा पर्वत फोडून टोळ धरल्याप्रमाणे किंवा विटकरासाठी हत्ती विकून टाकल्याप्रमाणे होय ९८.
डोळे फोडूनि काजळ ल्याला । नाक कापूनि शिमगा खेळला ।
तैसा नरदेहा नाडला । नाश केला आयुष्याचा ॥ ९९ ॥
डोळे फोडून मग त्यांत काजळ घातले, किंवा नाक कापून मग शिमगा खेळला, अशा प्रकाराने त्यांनी नरदेहाची विटंबना केली व आयुष्याचा नाश केला म्हणून समजावें ९९.
वेंचितां धन लक्षकोटी । आयुष्यक्षणाची नव्हे भेटी ।
तेंही वेंचिलें विषयासाठीं । हतायु करंटीं अतिमूढें ॥ ५०० ॥
लाखों किंवा कोट्यवधि धन खर्च केले, तरी आयुष्याचा एक क्षणही मिळावयाचा नाही. असे ते आयुष्यही जी माणसें विषयासाठी खर्च करतात, ती आपल्या आयुष्याचा नाश केलेली, कपाळकरंटी व अत्यंत मूढ होत! ५००.
मुख्य देहोचि काल्पनिक जाण । तेथील काल्पनिक अभिमान ।
तें हें देहबुद्धीचें मीपण । लावी दृढ बंधन जगासी ॥ १ ॥
देह हाच मुळी काल्पनिक आहे असे समज. तेव्हा त्यांतील अभिमानही काल्पनिकच होय. तोच हा देहबुद्धीचा मीपणा आणि तोच जगाला दृढ बंधन लावून देतो १.
तें सांडितां देहाचें मीपण । कैंचें जन्म कैंचें मरण ।
तेव्हां संसारुचि नाहीं जाण । भवबंधन मग कैंचें ॥ २ ॥
तें देहाचे मीपणच सोडून दिले, तर मग जन्म कशाचा आणि मरण तरी कशाचे ? त्या वेळी संसारच नाही असे समज. मग संसारबंधन कोठचे , २.
जैसा मिथ्या बागुलाचा भेवो । बाळक सत्य मानिला पहा हो ।
तैसा मृषा काल्पनिक देहो । सत्यत्वें पहा हो मानिला ॥ ३ ॥
अहो! असें पहा की, बागुलाचे भय खोटे असते, पण तें मुखाने खरें मानिलें, त्याप्रमाणे देहही केवळ खोटा व काल्पनिक आहे. पण अहो! त्यालाच अज्ञानी लोकांनी खरा मानिला ३.
मिथ्या देहो आणि देहबुद्धी । त्यासी पुढें कैसी जन्मसिद्धी ।
मिथ्याभूतासी नव्हे वृद्धी । तेविखींची विधि हरि बोले ॥ ४ ॥
देह आणि देहबुद्धि ही दोन्ही मिथ्याच आहेत असें जो मानितो, त्याला पुढे जन्मसिद्धि कशाची! कारण मिथ्यारूप पदार्थाची वृद्धि होतच नाही. याविषयींचा प्रकार श्रीकृष्ण सांगतात ४.
मा स्वस्य कर्मबीजेन जायते सोऽप्ययं पुमान् ।
म्रियते वामरो भ्रान्त्या यथाग्निर्दारुसंयुतः ॥ ४५ ॥
[श्लोक ४५] तो अविवेकी मनुष्यही वास्तविक कर्मबीजापासून उत्पन्न होत नाही की मरतही नाही परंतु भ्रमामुळे आत्मा अमर असूनही त्याला तसे वाटते जसा लाकडाशी संयोग झाल्याने अग्नी पेटतो किंवा वियोगाने विझतो असे वाटते वास्तविक अग्नी नित्य आहे. (४५)
देहात्मवादें देहाभिमान । जनीं वासनाबीज गहन ।
तेणें स्वसंकल्पें आपण । मानी जन्ममरण नसतेंचि ॥ ५ ॥
देहात्मवादानें देहाभिमान उत्पन्न होतो, तेणेकरून लोकांमध्ये गूढ वासनाबीज उद्भवते व त्या आपल्या वासनांच्या संकल्पानेच मनुष्य स्वतः नसत्याच जन्ममरणाला सत्य मानूं लागतो ५.
तेणें देहाभिमानें आपण । अहं कर्म कर्ता क्रियाचरण ।
निष्कर्मा कर्मबंधन । अमरा जन्ममरण आरोपी ॥ ६ ॥
त्या देहाभिमानामुळेच क्रियाचरण करणारा कर्मकर्ता तो मी असे मानून निष्कर्माला कर्मबंधन आहे व अमराला जन्ममरण आहे असें मानितो ६.
थिल्लराचेनि जाहलेपणें । त्यांत सूर्याचें जन्म मानणें ।
थिल्लरनाशें सूर्याचें जिणें । नासलें म्हणे बाळक ॥ ७ ॥
डबक्यांत साचलेल्या पाण्यामध्ये प्रतिबिंबरूपाने सूर्य दिसतो, ह्या कारणाने त्या डबक्यांतच सूर्य जन्मास आला, व डबक्यांतील पाणी आटून गेलें म्हणजे सूर्याचे आयुष्य नाश पावलें असें मूल म्हणत असते ७.
तेवीं अजन्म्यासी जन्मकर्म । मानिती तो मायिक भ्रम ।
येचिविषयीं पुरुषोत्तम । दृष्टांत सुगम सांगत ॥ ८ ॥
त्याप्रमाणे अजन्म्याला जन्म-कर्म आहे असें मानितात तो केवळ मायेचा भ्रम होय. ह्याविषयीं श्रीकृष्ण सुलभ दृष्टान्त सांगतात ८.
जैसा अग्नि अजन्मा अव्यक्त । त्यासी काष्ठीं जन्मला म्हणत ।
दिसे काष्ठाकारें आकारवंत । काष्ठनाशें मानीत नाश त्यासी ॥ ९ ॥
वस्तुतः अग्नि अजन्मा असून अव्यक्त आहे, पण तो लाकडांतच उत्पन्न झाला असे म्हणतात. तो त्या लाकडाच्या आकारानेच आकारवंत दिसत असतो. म्हणून लाकडे संपली, की अग्नीही नाश पावला असें मानितात ९.
येथ देहासीच जन्मनाश । आत्मा नित्य अविनाश ।
देहअवस्था नवविलास । स्वयें हृषीकेश सांगत ॥ ५१० ॥
त्या लाकडाप्रमाणेच येथे जन्म आणि नाश हे देहालाच आहेत. दृष्टान्तांतील अग्नीप्रमाणेच आत्मा हा नित्य असून अविनाशी आहे. त्या देहाच्या अवस्था नऊ असतात, त्याही स्वतः श्रीकृष्ण सांगतात ५१०.
निषेकगर्भजन्मानि बाल्यकौमारयौवनम् ।
वयोमध्यं जरा मृत्युरित्यवस्थास्तनोर्नव ॥ ४६ ॥
[श्लोक ४६] उद्धवा ! गर्भाधान, गर्भवृद्धी, जन्म, बाल्य, कुमारावस्था, तारूण्य, म्हातारपण आणि मृत्यू या नऊ अवस्था शरीराच्याच आहेत. (४६)
देहींच्या अवस्था त्या नव । ऐक तयांचाही स्वभाव ।
भिन्नविभागवैभव । यथागौरव सांगेन ॥ ११ ॥
देहाच्या नऊ अवस्था आहेत, त्यांचीही स्थिति ऐक. त्या भिन्नभिन्न विभागांचा विस्तारही यथायोग्य सांगतों ११.
पितृदेहीं पावोनि शुक्रत्व । तेथूनि जननीजठर प्राप्त ।
त्या नांव निषेक बोलिजेत । देहींची हे येथ प्रथमावस्था ॥ १२ ॥
पित्याच्या देहांत शुक्ररूप पावून तेथून ते मातेच्या उदरांत जाणे याला ‘निषेक’ असे म्हणतात. हीच या देहाची पहिली अवस्था होय १२.
जननीजठरीं रुधिरयुक्त । मुसावोनि खोटी होत ।
क्षणक्षणां वृद्धी प्राप्त । गर्भ ते येथ दुजी अवस्था ॥ १३ ॥
नंतर मातेच्या उदरांत रक्तयुक्त होऊन गोठून पिंड होतो. आणि तो क्षणोक्षणी मोठमोठा होत जाऊन त्याला गर्भाचे स्वरूप येते. ही देहाची दुसरी अवस्था होय १३.
प्रसूतिवाताच्या आघातीं । उदराबाहेर उत्पत्ती ।
त्या नांव जन्म बोलती । जाण निश्चितीं तिजी अवस्था ॥ १४ ॥
नंतर प्रसूतिवायूच्या आघाताने पोटांतून बाहेर उत्पन्न होणे ह्याला ‘जन्म’ असें म्हणतात. ही देहाची तिसरी अवस्था आहे हे नीट लक्षात ठेव १४.
अतिशयें आवडे स्तनपान । मुख्यत्वें माताचि प्राधान्य ।
रुदनाचें बळ संपूर्ण । तैं चौथी जाण बाल्यावस्था ॥ १५ ॥
स्तनपान हेच अतिशय आवडते, माता हीच काय ती मुख्यतः श्रेष्ठ आणि संपूर्ण बळ काय ते रडण्याचे, ही देहाची चौथी ‘बाल्यावस्था’ होय, असे समज १५.
मळमूत्रीं लोळे अज्ञान । गूढेंद्रिय विवेकशून्य ।
गोड गोजिरें कलभाषण । पंचहायन बाल्यावस्था ॥ १६ ॥
केवळ अज्ञान असल्यामुळे मलमूत्रांत लोळतो; सर्व इंद्रियांची शक्ति गुप्त असते; विचार मुळीच ठाऊक नाहीं; मधुर, कोमल असें बोबडे बोलणे; ही पंचवार्षिक ‘बाल्यावस्था’ होय १६.
इंद्रियीं चेतना वाढत । परी पोटीं नाहीं विषयस्वार्थ ।
खेळावरी आसक्त चित्त । ते पांचवी येथ कुमारवस्था ॥ १७ ॥
नंतर इंद्रियांमध्ये शक्ति वाढत जाते; परंतु अंगी विषयाचा स्वार्थ नसतो, खेळावरच चित्त आसक्त असते, ही या देहाची पांचवी ‘कुमारावस्था’ होय १७.
याउपरी तरुणपण । इंद्रियसामर्थ्य संपूर्ण ।
मी शहाणा मी सज्ञान । देहीं देहाभिमान मुसमुशी ॥ १८ ॥
यानंतर तारुण्यावस्था. त्यांत इंद्रियांना परिपूर्ण शक्ति येते, आणि शहाणा काय तो मी असा देहामध्ये देहाभिमान मुसमुसूं लागतो १८.
तेथ स्त्रीकाम आवडे चित्तीं । धनकामाची अतिप्रीती ।
देहगेहांची आसक्ती । नामरूपांची ख्याती लौकिकीं मिरवी ॥ १९ ॥
त्या वेळी मनांत स्त्रीची वासना आवडू लागते, द्रव्यलोभ अतिशय आवडतो, घरादारावर प्रेम जडते, आणि लौकिकांत आपल्या नावारूपाची कीर्ति मिरवू लागतो १९.
श्रीमदें गर्वितमानस । स्त्रीपुत्रांचा अतिउल्हास ।
तृष्णा दुर्धर अतिसोस ।कामक्रोधांचा बहुवस वळसा भोंवे ॥ ५२० ॥
संपत्तीच्या मदाने मनाला गर्व चढलेला असतो, बायकामुलांचाच उल्हास वाटतो; आशा अनिवार होऊन अधिकाधिक भोग भोगावेसे वाटतात; आणि कामक्रोधांचे मोठे चक्र सभोंवार फिरत राहातें ५२०.
न साहे नोकिलेपण । ‘तूं म्हणतां टाकी प्राण ।
ते सहावी अवस्था जाण । तरुणपण अनर्थ ॥ २१ ॥
कोणी अपमान केलेला सहन होत नाही ; ‘ तूं ‘ म्हटलें की जीव द्यायला उठतो. असें अनर्थकारक ‘तरुणपण’ ही देहाची सहावी अवस्था होय २१.
पंधरापासोनि पंचवीस । पूर्ण तरुणपणाचा पैस ।
तेथ नानाविकारी मानस । नांदवी सावकाश देहाभिमान । २२ ॥
पंधरा वर्षापासून पंचवीस वर्षेपर्यंत पूर्ण तरुणपणाचा भर असतो. त्यांत नानाप्रकारच्या विकारांनी व्याप्त झालेलें मन भरपूर देहाभिमान उत्पन्न करून ठेवतें २२.
चाळिसांपासोनि साठीवरी । देहीं उत्तरवयसा पुरी ।
झुरडी पडों लागे शरीरीं । इंद्रियशक्ती करी प्राशन काळ ॥ २३ ॥
नंतर चाळीस वर्षांपासून साठ वर्षेपर्यंत देहाची उतरती कळा पूर्ण सुरू होऊन शरीरावर चिरम्या पडू लागतात, आणि काळ ह्या इंद्रियांची शक्ति नष्ट करूं लागतो २३.
क्षीणपणाचा सुमुहूर्त । काळ आरंभ करी जेथ ।
ते हे उत्तरावस्था येथ । जाण निश्चित सातवी ॥ २४ ॥
जेव्हां योग्य वेळी शरीर क्षीण करण्यास काळ प्रारंभ करतो, तीच ही ह्या देहाची खरोखर सातवी ‘उत्तरावस्था’ होय हे लक्षात ठेव २४.
तिची हातधरणी जरा । कांपवीतसे सुभटां नरां ।
भोग न साहे शरीरा । इंद्रियव्यापाराहारासी ॥ २५ ॥
त्या अवस्थेचा हात धरून पुढे येणारी जरा ( वार्धक्यावस्था) ही मोठमोठ्या शूरवीर पुरुषांना कांपवून सोडते. इंद्रियांचे सुखविलासी व्यापार व उत्तमोत्तम आहार हे उपभोगही शरीराला सहन होत नाहीत. २५.
अस्तव्यस्त केला शरीरवेश । दांताळी पाडिली वोस ।
भेणें पालटे केश । धाकें सीस कांपत ॥ २६ ॥
त्या जरेनें शरीराची रचना सारी अस्ताव्यस्त केलेली असते. दांतांच्या जागी खिंडी पडलेल्या असतात, भयाने केस पांढरे होऊन जातात व धाकाने मस्तक लटलटा कापू लागते २६.
शरीर जरा करी क्षीण । तरी विषयावस्था अतिगृहन ।
चिंता अनिवार दारुण । तृष्णा अपूर्ण सर्वदा ॥ २७ ॥
वार्धक्य हें शरीराला अगदी क्षीण करून टाकतें, तरी विषयाची इच्छा दांडगी ! चिंता अनिवार आणि भयंकर ! आशा तर अपुरीच! २७.
तेज सांडूनि जाय नयना । टाळी पडोनि ठाती काना ।
मुखीं लागे चोरपान्हा । तरी देहाभिमाना वाढवी ॥ २८ ॥
तेज डोळ्यांना सोडून जाते, कानाला दट्ट्ये बसतात, तोंडांतून लाळ गळते, तरी तो देहाभिमानाला वाढवीतच असतो २८.
जरा पावलिया निजसंधी । अनिवार येती आधिव्याधी ।
महामोहें व्यापिजे बुद्धी । विवेक त्रिशुद्धीं बुडाला ॥ २९ ॥
जरा योग्य वेळी प्राप्त झाली की मानसिक व शारीरिक दुखणी उद्भवतात, महामोहाने बुद्धि गुरफटून जाते आणि विचार तर मुळी नाहींसाच होतो’ २९.
पायां पडे वेंगडी । आधार टेंकण लांकुडी ।
वाचा लफलफी जडत्वें गाढी । हाले होंटाची जोडी उंदिरप्राय ॥ ५३० ॥
चालतांना पायांत पाय अडखळू लागतात म्हणून आधाराला काठी घ्यावी लागते, जीभ जड झाल्यामुळे बोलतांना शब्द स्पष्ट उमटत नाही, आणि दोन्ही ओठ उंदरासारखे लवलव हालत असतात ५३०.
डोळां चिपडीं तोंड भरे । नाकींची लोळी वोठीं उतरे ।
मुखींचे लाळेचिया धारें । थिबबिबिजे उरें चिकटोनी ॥ ३१ ॥
डोळ्यांत चिपडे वाढतात. तोंडांत लाळ भरते, नाकातून येणारा शेंबूड खाली ओठावर वहात असतो, तोंडांतील लाळेची धार गळल्यामुळे उरावर सारे चिकट झालेले ३१.
चुंबन मागेना तोंडाप्रती । ती थुंका म्हणोनि दूर पळती ।
उसंत नाहीं खोकल्याहातीं । श्वास कास उठती अनिवार ॥ ३२ ॥
मुखाचे चुंबनसुद्धा मागत नाही, कारण तें देणारी जी स्त्री, तीच ‘ काय घाणेरडा थुका हा !’ असे म्हणून लांब पळून जाते. खोकल्यामुळे एक क्षणभरही स्वस्थपणा मिळत नाही. दम लागतो आणि खोकल्याच्या अनिवार चळी उठतात ३२.
शरीरीं थरकंप उठी । तरी देहाभिमान दृढ पोटीं ।
अवघ्याते म्हणे धाकुटीं । सांगे जुनाट गोष्टी मोठमोठ्या ॥ ३३ ॥
अंग लटलटत कांपत असते, तरीही पोटामध्ये देहाभिमान दांडगा ! सर्व लोकांना तो ‘कालची पोरें’ असें म्हणून मोठमोठ्या जुन्या गोष्टी सांगत बसतो ३३.
अधोवाताचें वावधान । अनिवार सुटे जाण ।
जीवें जितां विटंबण । हे जरा जाण आठवी अवस्था ॥ ३४ ॥
अपानवायूचे वाद्य तर अपरंपार वाजू लागते. ह्याप्रमाणे जिवंत असतांनाच जीवाची विटंबना करणारी जी ‘ जरा’, तीच ह्या देहाची आठवी अवस्था होय ३४.
जेवीं सुईमागें दोरा जाण । तेवीं जरेसवें असे मरण ।
जरा शरीर पाडी क्षीण । तंव वाजे निशाण मृत्यूचें ॥ ३५ ॥
ज्याप्रमाणे सुईच्या मागे दोरा असतो, त्याप्रमाणे जरेबरोबर मरण हे लागलेलेच असते. जरा शरीर क्षीण करिते, तेव्हां मृत्यूचे निशाण फडकू लागते ३५.
देहींच्या तुटल्या नाडी । वाचा हों लागे बोबडी ।
तरी देहाची धरी गोडी । अधिक आवडी स्त्रीपुत्रांची ॥ ३६ ॥
देहांतील नाड्या पोकळ होऊन तोंडाची बोबडी वळू लागते. तरी देहाची आवड धरतोच. बायकामुलांची आवड तर पहिल्याहून अधिक वाढते ३६.
मजमागें हें अनाथें । कोण सांभाळीळ यांतें ।
पोटासी धरोनि त्यांतें । रडे बहुतें आक्रोशें ॥ ३७ ॥
माझ्या पश्चात् ही अनाथ होतील. ह्यांना कोण सांभाळील ? असें म्हणून त्यांना पोटाशी धरून मोठा हंबरडा फोडून रडू लागतो ३७.
द्रव्यलोभ अतिकठिण । अंतीं न वेंची आपण ।
दूरी करूनि इतर जन । सांगे उणखूण ठेव्याची ॥ ३८ ॥
द्रव्याचा लोभ मोठा कठीण. अंतकालींही तो स्वत: खर्च करीत नाही. इतर माणसांना दूर पाठवून, फक्त आपल्याच विश्वासाच्या माणसांना आपला गुप्त ठेवा ठेवल्याची नीट खूणखाण सांगून ठेवतो ३८.
नवल वासनाविंदान । विसरोन देहाचें स्मरण ।
सर्वस्वें जे धरिजे आठवण । तेंचि आपण दृढ होय ॥ ३९ ॥
वासनेचा चमत्कार फार आश्चर्यकारक आहे ! देहाचे स्मरण विसरून सर्वस्वेकरून जी आठवण धरिलेली असते, तद्रूपच तो स्वतः होतो ३९.
या देहाची निःशेष आठवण । ते नाठवणें सवेंचि जाण ।
चेतनासहित जाय प्राण । या नांव मरण देहाचें ॥ ५४० ॥
या देहाची जी संपूर्ण आठवण होती, ती तत्काळ नाहीशी होते, आणि चेतनेसहित प्राण निघून जातो. ह्याचंच नांव देहाचे ‘मरण’ होय (ही नववी अवस्था) ५४०.
एवं गर्भादि मरणांता । या देहींच्या नव अवस्था ।
येथ आत्म्याची अलिप्तता । स्वभावतां देहासी ॥ ४१ ॥
अशा प्रकारें गर्भापासून मरणकालापर्यंत या देहाच्या नऊ अवस्था आहेत. ह्या देहापासून आत्म्याची सहजच अलिप्तता असते ४१.
देहअवस्था विकारवंता ।आत्मा अलिप्त अविकारता ।
म्हणसी देहविकारा जडता । यासी विकारता घडे केवीं ॥ ४२ ॥
जो विकारी असेल, त्यालाच देहाच्या अवस्था असतात. आत्मा अविकारी असल्यामुळे तो अलिप्तच असतो. आतां तूं म्हणशील की, देह हा जड आहे, त्याला विकारीपणा कसा घडतो? ४२.
सूर्य थापटूनि जन । कदा नुठवी आपण ।
तो प्रकाशतांचि जाण । सहजें जन चेवती ॥ ४३ ॥
सूर्य आपण होऊन केव्हाही लोकांना थापटून उठवीत नाही. तो उदयास येतांच लोक आपोआपच जागे होतात हे लक्षात आण ४३.
त्या जनाची कर्मकर्तव्यता । सूर्याअंगीं न लगे सर्वथा ।
तेवीं प्रकाशोनि विकारता । अलिप्त तत्त्वतां निजात्मा ॥ ४४ ॥
ह्यामुळे त्या लोकांचे क्रियाकर्म सूर्याच्या अंगाला मुळींच लागत नाही. त्याप्रमाणे विकार प्रगट करूनही आत्मा खरोखर अलिप्तच असतो ४४.
झालिया सूर्यकिरण प्राप्त । जेवीं अग्नि स्रवे सूर्यकांत ।
तेणें याग कां दाघ होत । त्या कर्मातीत सूर्य जैसा ॥ ४५ ॥
सूर्यकिरण पडू लागले की ज्याप्रमाणे सूर्यकांत मणि आपल्या अंगांतून अग्नि उत्पन्न करूं लागतो, मग त्या अग्नीपासून यज्ञकार्य किंवा आग लावणे ही दोन्ही कार्ये घडतात, पण त्या कर्मापासून सूर्य हा निराळाच असतो ४५.
तेवीं चित्प्रकाशें मन । शुभाशुभ कर्में करी जाण ।
त्या मनोविकारा चिद्भा न । अलिप्त जाण निजात्मा ॥ ४६ ॥
त्याप्रमाणेच चैतन्याच्या प्रकाशाने मन हे शुभाशुभ कर्में करीत असते, हे लक्षात ठेव. परंतु चैतन्यसूर्य असा जो आपला आत्मा, तो त्या मनोविकारापासून अलिप्तच असतो ४६.
येथ मनःकृत विकार पूर्ण । मनःकृत कर्माकर्म जाण ।
मनःकृत जन्ममरण । स्वर्गनरकगमन मनःकृत ॥ ४७ ॥
म्हणून येथे सारे विकार हे मनानेच केले आहेत. कर्माकर्म हेही मनानेच केलेले आहे असे समज. जन्ममरण हेही मनानेच केलेले आहे आणि स्वर्गनरकांत जाणे हेही मनःकृतच होत ४७.
मनःकृत लक्ष्यालक्ष्य । मनःकृत बंधमोक्ष ।
तेंचि निरूपण प्रत्यक्ष । श्रीकृष्ण अध्यक्ष सांगत ॥ ४८ ॥
लक्ष्यालक्ष्य ही मनानेच केलेलें, व बंध आणि मोक्ष हेही मनानेच केलेले आहेत. तेच निरूपण प्रत्यक्ष श्रेष्ठ श्रीकृष्ण सांगत आहेत ४८.
एता मनोरथमयीर्ह्यन्यस्योच्चावचास्तनूः ।
गुणसङ्गादुपादत्ते क्वचित्काश्चिज्जहाति च ॥ ४७ ॥
[श्लोक ४७] जीवापासून वेगळे असलेल्या शरीराच्या या निरनिराळ्या काल्पनिक अवस्था आहेत परंतु अज्ञानामुळे, गुणांच्या संगतीने आत्मा यांना आपल्या समजतो किंवा विवेक जागृत झाल्यावर त्यांना सोडूनही देतो. (४७)
संसारविकाराचें भान । अभिमानयुक्त करी मन ।
स्वर्गनरक गमनागमन । देहाभिमान भोगवी ॥ ४९ ॥
अभिमानाने युक्त झालेले जे मन, तेंच संसारविकाराचा भास करीत असते, आणि स्वर्ग-नरकांच जाणे येणे हेही देहाभिमानच घडवितो ४९.
आत्मा याहूनि सहजें भिन्न । चिन्मात्रैक चिद्घन ।
तेथ आतळों न शके मन । शुद्धीं अभिमान असेना ॥ ५५० ॥
ह्याहून आत्मा हा स्वभावतःच भिन्न आहे. तो ज्ञानमय असून ज्ञानस्वरूप आहे. त्याला मन स्पर्शसुद्धा करू शकत नाही, आणि शुद्ध तत्त्वामध्ये अभिमानही असत नाही ५५०.
मन अभिमान प्रसवे माया । अभिमानें गुण आणिले आया ।
गुणीं मायिक केली काया । विकारसामग्रियासमवेत ॥ ५१ ॥
मन आणि अभिमान ह्यांना मायाच उत्पन्न करिते, अभिमानानेच गुणांना उदयास आणिलें आहे, आणि त्या गुणांनी मायात्मक विकारसामुग्रीसह हा देह तयार केला आहे ५१.
जैशी देहापाशीं छाया । तैशी स्वरूपीं मिथ्या माया ।
जेथ जन्ममरणेंसीं काया । रिघावया ठावो नाहीं ॥ ५२ ॥
देहाजवळ जशी छाया असते, त्याप्रमाणेच आत्मस्वरूपामध्ये मिथ्यारूप माया असते. अशा आत्मस्वरूपांत जन्ममरणासह हा देह शिरावयाला जागाच नाही ५२.
आत्मा शुद्ध काया मलिन । काया जड आत्मा चिद्घन ।
अज अव्यय आत्मा परिपूर्ण । जन्ममरण देहासी ॥ ५३ ॥
आत्मा हा शुद्ध असून देह हा मलिन आहे. तसेंच देह हा जड आहे आणि आत्मा चैतन्यस्वरूप आहे. आत्मा हा अजन्मा, अव्यय आणि परिपूर्ण आहे. जन्ममरण आहे ते देहाला आहे ५३.
तिनी गुण तिनी अवस्था । कार्य कर्म अहंकर्ता ।
हें देहाभिमानाचे माथां । आत्मा सर्वथा अलिप्त ॥ ५४ ॥
तीन गुण, तीन अवस्था, कार्य, कर्म, मी कर्ता असा अभिमान, हे सर्व देहाभिमानाचे विकार आहेत. आत्मा हा सर्वथा अलिप्तच आहे ५४.
यापरी विकारांहून । आत्मा चिद्रूपें सहज भिन्न ।
म्हणशी जीवास देहाभिमान । तेंही कथन अवधारीं ॥ ५५ ॥
अशा प्रकारें आत्मा हा स्वभावसिद्धच चैतन्यस्वरूप असल्यामुळे तो विकारांहून भिन्नच आहे. आता तूं म्हणशील की, ‘जीवालाच देहाभिमान आहे, तर त्याचीही गोष्ट ऐक ५५.
जीव अलिप्त मायागुणीं । एक सांगेन ते काहाणी ।
स्फटिक ठेविजे जैशा वर्णीं । तद्रूपपणीं तो भासे ॥ ५६ ॥
जीव हा मायेच्या गुणांपासून अलिप्त असतो, त्याचाही प्रकार सांगतो ऐक, स्फटिक हा ज्या रंगावर ठेवावा, त्याच रंगाप्रमाणे तो दिसतो ५६.
हो कां तद्रूपपणेंही दिसतां । स्फटिक अलिप्त निजशुद्धता ।
तेवीं सत्त्वादि गुणीं क्रीडतां । जीव तत्त्वतां अलिप्त ॥ ५७ ॥
पण तो जरी त्या रंगाचा दिसला, तरी स्फटिक हा मूळचाच शुद्ध असल्यामुळे त्या रंगापासून भिन्नच असतो. त्याप्रमाणे सत्त्वादि गुणांमध्ये खेळत असतांही जीव हा खरोखर अलिप्तच असतो ५७.
स्फटिक काजळीं दिसे काळा । परी तो काळेपणावेगळा ।
तेवीं तमोगुणें जीवू मैळा । दिसोनि निराळा तमेंसीं ॥ ५८ ॥
स्फटिक हा काजळावर ठेवला तर तो काळा असल्यासारखा दिसतो, पण तो काळेपणापासून वेगळाच असतो. त्याप्रमाणे तमोगुणाने जीव मलिन झालेला दिसला, तरी तो तमोगुणापासून निराळाच असतो ५८.
स्फटिक आरक्तीं आरक्तकिळा । दिसोन आरक्ततेवेगळा ।
तेवीं रजोगुणीं राजसलीळा । भोगूनि वेगळा जीवात्मा ॥ ५९ ॥
तोच स्फटिक तांबड्या रंगावर नेऊन ठेवला तर त्याची तांबडी प्रभा दिसू लागते; पण तरीही तो तांबडेपणापासून निराळाच असतो. त्याप्रमाणे जीवाने रजोगुणांत राहून राजस लीला केल्या, तरी ते सर्व भोगून जीवात्मा हा निराळाच असतो ५९.
स्फटिक श्वेतवर्णीं दिसे श्वेत । परी तो श्वेतपण अलिप्त ।
तेंवी सत्त्वीं दिसे ज्ञानवंत । गुणज्ञानातीत जीवात्मा ॥ ५६० ॥
पांढऱ्या रंगावर स्फटिक ठेवला तर तो पांढरा दिसतो, पण तो त्या पांढऱ्या रंगाहून भिन्नच असतो. त्याप्रमाणे जीवात्मा हा सत्त्वगुणांत असला म्हणजे मोठा ज्ञानसंपन्न आहेसा दिसतो, तरी पण तो गुणापासून आणि ज्ञानापासून वेगळाच असतो ५६०.
त्रिगुण गुणेंसीं अलिप्तता । दाविली जीवशिवांची तत्त्वतां ।
देहीं असोनि निःसंगता । ऐक आतां सांगेन ॥ ६१ ॥
ह्याप्रमाणे तीन गुणांपासून खरोखर जीवात्म्याची अलिप्तता कशी असते ती दाखवून दिली. आतां तो देहांत असूनही मुक्त कसा असतो तेंही सांगतो ऐक ६१.
जेवीं घटामाजील जीवन । घटीं चंद्रबिंब आणी जाण ।
तेवीं शुद्धासी जीवपण । देहाभिमान देहीं देखे ॥ ६२ ॥
ज्याप्रमाणे घटांत असलेले पाणी चंद्राचे प्रतिबिंब घटांत आणिते, त्याप्रमाणे जीवपण असते तेच शुद्ध आत्म्याला देहामध्ये देहाभिमानाच्या रूपाने पहाते ६२.
घटनिश्चळत्वें बिंब निश्चळ । घटचंचलत्वें तें चंचळ ।
तेवीं देहाच्या अवस्था सकळ । मानीं केवळ जीवात्मा ॥ ६३ ॥
घट निश्चल असला तर बिंबही निश्चल असते. घट हालला तर बिंबही हालते. त्याप्रमाणे या सर्व अवस्था खरोखर देहाच्या असून जीवात्मा त्या आपल्याच आहेत असें मानीत असतो ६३.
घटीं कालविल्या अंजन । तरी तें काळें होय जीवन ।
परी बिंबप्रतिबिंबा जाण । काळेपण लागेना ॥ ६४ ॥
घटामध्ये काजळ कालविले तर ते सर्व पाणी काळे होऊन जाते. पण त्याच्या आतील बिंबाला किंवा प्रतिबिंबाला काही काळेपणा लागत नाही ६४.
तेवीं देहाची सुखदुःखकथा । कां पापपुण्यादि जे वार्ता ।
नाहीं जीवशिवांच्या माथां । देह अहंता ते भोगी ॥ ६५ ॥
तशीच देहाच्या सुखदुःखांची गोष्ट किंवा पापपुण्यांची गोष्ट जीवाच्या किंवा आत्म्याच्याही माथ्यावर येत नाही. अहंकारामुळे देहच ते सर्व भोगीत असतो ६५.
ये घटींचें जळ ते घटीं भरित । चंद्रबिंब असे त्याहीआंत ।
तेवी या देहींचा त्या देहीं जात । जीवात्मा म्हणत या हेतू ॥ ६६ ॥
ह्या घड्यांतले पाणी त्या घड्यांत भरले. तर त्याच्यांतही चंद्रबिंब दिसतच असते. त्याप्रमाणे ह्या देहांतील जीव त्या देहांत जातो, म्हणूनच त्याला जीवात्मा असे म्हणतात ६६.
चंद्र गगनीं अलिप्त असे । तो मिथ्या प्रतिबिंबें घटीं भासे ।
तेवीं वस्तु वस्तुत्वें सावकाशें । जीवू हें पिसें देहात्मता ॥ ६७ ॥
चंद्र हा आकाशामध्ये अलिप्तच असतो. तो मिथ्याच प्रतिबिंबरूपानें घटामध्ये भासमान होतो. त्याप्रमाणे आत्मतत्त्व हे परब्रह्मस्वरूपाने स्थिर असून देहात्मसंयोगानेच हे जीवाचें वेड त्याला लागलेले असते ६७.
त्रिगुणगुणीं गुणातीत । देही देहसंगा अलिप्त ।
जीव शिव दोनी येथ । तुज म्यां साद्यंत दाखविले ॥ ६८ ॥
ह्याप्रमाणे देह धारण करणारा जीव हा तीन गुणांपासूनही भिन्न असून देहसंगापासूनही अलिप्तच असतो. अशा प्रकारे जीव आणि शीव हे दोन्ही मी तुला साद्यंत दाखवून दिले ६८.
हें नेणोनियां समस्त । देहात्मवादें जाहले भ्रांत ।
स्वर्गनरकादि आवर्त । योनी भोगवीत अभिमान ॥ ६९ ॥
पण हे सारे लोकांना न समजल्यामुळे देहात्मवादाने ते भ्रांतीत पडले आहेत. त्यामुळे अभिमान हा त्यांना स्वर्गनरकादि भोवऱ्यात घालून नानाप्रकारच्या योनी भोगावयास लावतो ६९.
द्विजदेह आरंभूनि येथ । परमेष्ठिदेहपर्यंत ।
स्वर्गसुख देहें समस्त । भोगवी निश्चित पुण्याभिमान ॥ ५७० ॥
पुण्याभिमान असतो तो ब्राह्मणाच्या देहापासून आरंभ करून ब्रह्मदेवाच्या देहापर्यंत सर्व प्रकारचे स्वर्गसुख निश्चयानें भोगवितो ५७०.
याहूनियां अधोमुख येथ । द्विजत्वाहूनि खालते जात ।
नाना दुःखयोनी भोगवित । जाण निश्चित पापाभिमान ॥ ७१ ॥
पण पापाभिमान असतो तो ह्याहीपेक्षा अधोमुख होऊन ब्राह्मणापेक्षा खालच्या जातीत जन्म घेत घेत अनेक प्रकारच्या दुःखयोनी भोगवितो ७१.
येथ पापपुण्यकर्माचरण । तें वाढविताहे जन्ममरण ।
यांत विरळा सभाग्य जाण । जन्ममरणच्छेदक ॥ ७२ ॥
पाप व पुण्य ह्यांचे कर्माचरण हेच जन्ममरण वाढविते. त्यामध्येही जन्ममरणाला छेदून टाकणारा विरळाच एकादा भाग्यवान् असतो ७२.
ज्यांसी निष्काम पुण्याचिया कोडी । जिंहीं स्वधर्म जोडिला जोडी ।
ज्यांसी भूतदया गाढी । ज्यांची आवडी द्विजभजनीं ॥ ७३ ॥
ज्यांनी निरिच्छपणाने पुण्याच्या राशी जोडलेल्या असतात, ज्यांनी स्वधर्माची जोड मिळविलेली असते, ज्यांच्या अंत:करणांत प्राणिमात्रांची अत्यंत दया असते, आणि ब्राह्मणभजनामध्ये ज्यांची आवड असते ७३,
जे अहिंसेसी अधिवास । ज्यांचें अद्वैतपर मानस ।
जे सारासारराजहंस । जन्ममरणांचा त्रास घेतला जिंहीं ॥ ७४ ॥
जे अहिंसेचे माहेरघर आहेत, ‘वसुधैव कुटुंबकं’ असें ज्यांचे मन अद्वैतयुक्त आहे, सारासार विचाराचे जे राजहंस, आणि ज्यांना जन्ममरणांचा कंटाळा आलेला ७४,
जे उपनिषदर्थचातक । जे जीवजनकाचे शोधक ।
जे निजात्मतत्त्वसाधक । जे विश्वासुक भावार्थीं ॥ ७५ ॥
जे उपनिषदांचा अर्थ चातकाप्रमाणे उत्सुकतेनें ग्रहण करणारे, जे जीवाच्या उत्पादकाला शोधणारे, जे आत्मतत्त्वाचे साधक, आणि जे खरे खरे भावार्थी ७५,
ज्यांसी संतचरणीं सद्भावो । जे गुरुवचनीं विकले पहा हो ।
त्यांसी देहीं विदेहभावो । मत्कृपें पहा हो पावती ॥ ७६ ॥
संतचरणांवर ज्यांची पूर्ण भक्ति, आणि अहो ! जे गुरुवचनाला विकलेले, ते माझ्या कृपेने ह्याच देहांत विदेहता पावतात पहा ! ७६.
तेही निजबोधें देहाची बेडी । तोडूनि जन्ममरणाची कोडी ।
उभवूनि सायुज्याची गुडी । परापरथडी पावले ॥ ७७ ॥
तेच आत्मज्ञानाच्या योगानें देहाची बेडी तोडून, जन्ममरणाचे कोट्यवधि फेरे चुकवून सायुज्याची गुढी उभारून पैलतीराला पोचले असे समजावें ७७.
त्यांसी संसाराचे आवर्त । सर्वथा गेले न लगत ।
जेवीं बुडण्याचा संकेत । मृगजळाआंत असेना ॥ ७८ ॥
मृगजळामध्ये ज्याप्रमाणे बुडण्याची गोष्ट नाही, त्याप्रमाणे संसाररूप सर्व भोवरे त्यांना स्पर्श न करितांच निघून गेले ७८.
ऐसे प्राप्तपुरुष येथ । संसारीं नाहींत गा बहुत ।
हिंडतां अवघ्या जगांत । एकादा कदाचित देखिजे ॥ ७९ ॥
पण मुक्त पुरुष संसारामध्ये फार असत नाहीत. सारें जग धुंडाळावे तेव्हां कदाचित् एकादा दृष्टीस पडला तर पडतो ७९.
असो देखिल्याही त्यातें । कोण आहे ओळखतें ।
उद्धवा जाण निश्चितें । आत्मा येथें दिसेना ॥ ५८० ॥
असो. परंतु तसा जरी दृष्टीस पडला, तरी त्याला ओळखणारा कोण आहे ? कारण, उद्धवा ! तेथेसुद्धा खरोखर आत्मा हा दिसत नाहींच ५८०.
जरी निकट भेटला ज्ञाता । त्याचा देह देखिजे वर्ततां ।
परी भीतरील निजात्मता । न दिसे सर्वथा कोणासी ॥ ८१ ॥
ज्ञानसंपन्न मनुष्य जरी अगदी जवळ येऊन भेटला, आणि त्याचा देह प्रपंचात वागतांना दृष्टीस पडला, तरी आतील आत्मा कांही कधी कोणाला मुळींच दिसत नाहीं ५८१.
आत्मा गेला आला म्हणती । शेखीं येणेंजाणें न देखती ।
तेच विषयींची उपपत्ती । स्वयें श्रीपती सांगत ॥ ८२ ॥
आत्मा गेला-आला असे म्हणतात मात्र, पण शेवटी त्याचे जाणेयेणे कोणी पहात नाही. त्याचीच उपपत्ति श्रीकृष्ण सांगत आहेत ८२.
आत्मनः पितृपुत्राभ्यामनुमेयौ भवाप्ययौ ।
न भवाप्ययवस्तूनामभिज्ञोद्वयलक्षणः ॥ ४८ ॥
[श्लोक ४८] पित्याने पुत्राच्या जन्मावरून आणि पुत्राने पित्याच्या मृत्यूवरून आपापल्या जन्ममृत्यूचे अनुमान करावे जन्म आणि मृत्यू असणार्या वस्तूंना जाणणारा आत्मा या दोन्ही लक्षणांनी युक्त असत नाही. (४८)
म्हणती पित्याचा आत्मा गेला । यालागीं पितृदेह नासला ।
परी पैल तो आत्मा गेला । ऐसा नाहीं देखिला कोणींही ॥ ८३ ॥
पित्याचा आत्मा गेला, म्हणून पित्याचा देह नाश पावला असे म्हणतात. पण तो आत्मा देहांतून निघून पलीकडे गेलेला काही कोणीही पाहिलेला नाही ८३.
म्हणती पुत्रजन्मे आत्म्यासी जन्म । करितां पुत्राचें जातककर्म ।
देखिजे देहाचा संभ्रम । आत्मा दुर्गम दिसेना ॥ ८४ ॥
कोणी म्हणतात की, पुत्र जन्मास आला की आत्मा जन्माला येतो. पण पुत्राचे पुत्रावण वगैरे करतांना त्यांत देहाचाच गौरव केलेला दिसत असतो. आत्मा दुर्गमच असतो, तो काही दिसत नाही ८४.
येथ आत्म्यासी येणेंजाणें । सर्वथा नाहीं पूर्णपणें ।
देहासीचि जन्ममरणें । येणेंजाणें दृष्टांतें ॥ ८५ ॥
म्हणून ह्या जगावर आत्म्याला खरेखुरे येणेजाणें मुळीच नाही. या दृष्टान्तावरून देहालाच जन्ममरण आहे, आणि देहालाच येणेजाणें आहे असे सिद्ध होते ८५.
प्रत्यक्ष देहासी जन्मनाश । आत्मा साक्षित्वें अविनाश ।
येचि अर्थीं विशद विलास । स्वयें हृषीकेश सांगत ॥ ८६ ॥
देहालाच जन्म व मृत्यु असलेला प्रत्यक्ष दिसतो. आत्मा हा साक्षीरूपाने अविनाशीच आहे. याच अर्थाचे विवेचन विशद करून स्वतः श्रीकृष्ण सांगत आहेत ८६.
तरोर्बीजविपाकाभ्यां यो विद्वाञ्जन्मसंयमौ ।
तरोर्विलक्षणो द्रष्टा एवं द्रष्टा तनोः पृथक् ॥ ४९ ॥
[श्लोक ४९] झाडाचे बी आणि त्याची परिपक्वता पाहाणारा माणूस त्यावरून त्याचा जन्म आणि विनाश पाहातो या दोन्ही गोष्टी पाहाणारा जसा झाडाहून वेगळाच असतो, तसा शरीराचे जन्ममृत्यू पाहाणारा सुद्धा शरीराहून वेगळा असतो. (४९)
बीजपरिपाकें वाढले वृक्षीं । पर्वत त्या वृक्षाचा साक्षी ।
तो पर्वत वृक्षच्छेदनें नव्हे दुःखी । तेवीं द्रष्टा साक्षी देहाचा ॥ ८७ ॥
पर्वतावर बीजाची उत्पत्ति व वाढ झाल्यामुळे वाढलेल्या वृक्षाच्या ठिकाणी पर्वत हा त्या वृक्षाचा साक्षी असतो. पण तो वृक्ष तोडला म्हणून त्या पर्वताला काही दुःख होत नाही. त्याप्रमाणेच द्रष्टा हा देहाचा साक्षी आहे ८७.
द्रष्टा साक्षी देहमात्रासी । ते देहधर्म न लगती द्रष्ट्यासी ।
तो देहीं असोनि विदेहवासी । भवबंध त्यासी स्पर्शेना ॥ ८८ ॥
प्रत्येक देहाला द्रष्टा हा साक्षीभूत आहे पण त्या देहाचे धर्म काही दृष्याला लागत नाहीत. तो देहांत असून विदेहीच असतो. म्हणून त्याला संसारबंधनाचा स्पर्शही होत नाही ८८.
हा अर्थ नेणोनि अविवेकी । अतिबद्ध जाहले ये लोकीं ।
तोचि अर्थ पांच श्लोकीं । श्रीकृष्ण स्वमुखीं सांगत ॥ ८९ ॥
परंतु हें रहस्य न जाणतां अविवेकी लोक ह्या जगामध्ये अगदी जखडून पडले आहेत. हाच प्रकार पांच श्लोकांमध्ये श्रीकृष्ण स्वमुखाने सांगत आहेत ८९.
प्रकृतेरेवमात्मानमविविच्याबुधः पुमान् ।
तत्त्वेन स्पर्शसंमूढः संसारं प्रतिपद्यते ॥ ५० ॥
[श्लोक ५०] अज्ञानी पुरूष, प्रकृती आणि आत्म्याचे हे वास्तविक रूप न कळल्यामुळे विषयभोगांनाच खरे सुख मानून त्यातच गुरफटून जातो आणि जन्ममरणरूप संसारचक्रात सापडतो. (५०)
कर्माकर्मकर्तेपण । आत्म्यासी सर्वथा नाहीं जाण ।
येचि अर्थींचें निरूपण । मागां संपूर्ण सांगीतलें ॥ ५९० ॥
कर्म, अकर्म किंवा कर्तेपणा ही आत्म्याला मुळीच नाहीत, हे लक्षात ठेव. या अर्थाचे सर्व निरूपण पूर्वी सांगितलेच आहे ९०.
आत्मा नातळे तिन्ही गुण । देही देहातीत जाण ।
प्रकृतीहून पुरुष भिन्न । हें निजात्मज्ञान जो नेणे ॥ ९१ ॥
आत्मा हा या तिन्ही गुणांना शिवत नाही. देहांत असणारा आत्मा देहाहून भिन्नच असतो. कारण, पुरुष हा प्रकृतीहून निराळा आहे. हे आत्मज्ञान ज्याला समजत नाही ९१,
तोचि संसाराचा आपण । घरजांवई झाला जाण ।
देहाभिमानासी संपूर्ण । एकात्मपण मांडिलें ॥ ९२ ॥
तोच स्वतः संसाराचा घरजावई होऊन बसला असे समज. देहाभिमानाशी त्याने सर्वस्वी ऐक्य करून घेतले आहे असे समजावे ९२.
विषयभोग तोचि पुरुषार्थ । ऐसें मानूनियां निश्चित ।
शुभाशुभ कर्मीं येथ । भोगवीत नाना योनी ॥ ९३ ॥
विषयाचे सुख हाच काय तो पुरुषार्थ, असा मनाचा कृतनिश्चय’ असल्यामुळे तोच ह्या जगामध्ये शुभाशुभ कर्माच्या योगाने नाना योनी भोगावयास लावतो ९३.
विषयभोग अभिमानें जाण । पुढती जन्म पुढती मरण ।
नाना योनीं आवर्तन । देहाभिमान भोगवी ॥ ९४ ॥
विषयसुखाच्या अभिमानानेच पुन्हा जन्म आणि पुन्हा मरण असे नाना प्रकारच्या योनीमध्ये देहाभिमानच फेरे खावयास लावतो ९४.
तें नाना योगीं गर्भदुःख । देहाभिमानें भोगिती मूर्ख ।
तेंचि नाना तत्त्वांचें रूपक । यदुनायक सांगत ॥ ९५ ॥
पण त्या अनेक योनीतील गर्भवासाचे दु:ख मूर्ख लोक त्या देहाभिमानानेच भोगीत बसतात. ह्याकरिता त्याच नाना तत्त्वांचे रूपक श्रीकृष्ण सांगतात ९५.
सत्त्वसङ्गादृषीन् देवान् रजसासुरमानुषान् ।
तमसा भूततिर्यक्त्वं भ्रामितो याति कर्मभिः ॥ ५१ ॥
[श्लोक ५१] जेव्हा जीव आपल्या कर्मानुसार जन्ममृत्यूच्या चक्रात भटकत असतो, तेव्हा सात्त्विक कर्मांच्या आसक्तीने ऋषी, देव या योनींमध्ये, राजस कर्मांच्या आसक्तीने मनुष्य, असुर या योनींमध्ये आणि तामस कर्मांच्या आसक्तीने भूतप्रेत, पशुपक्षी इत्यादी योनींमध्ये जन्म घेतो. (५१)
देहाभिमानाचिये स्थिती । त्रिगुण गुणांचीं कर्में होती ।
तेणें त्रिविध संसारप्राप्ती । ऐक निश्चितीं उद्धवा ॥ ९६ ॥
उद्धवा ! देहाभिमान असल्यामुळे ह्या तीन गुणांची कर्में घडत असतात, आणि त्यांच्या योगाने खरोखर तीन प्रकारचे संसार मागे लागतात ९६.
न करितां कृष्णार्पण । सात्त्विक कर्म कीजे आपण ।
तेणें क्षोभें सत्त्वगुण । उत्तम देह जाण उपजवी ॥ ९७ ॥
ते असे-कृष्णार्पण न करता आपण सात्त्विक कर्म केले, तर तेणेकरून सत्त्वगुण क्षुब्ध होऊन उत्तम देहांत जन्मास घालतो ९७.
सत्त्वाच्या अतिउत्कर्षगतीं । देवऋषि ब्रह्मऋषि होती ।
सत्त्वाच्या समसाम्यस्थितीं । कल्पायु जन्मती आजानुबाहो ॥ ९८ ॥
आणि त्या सत्त्वगुणाचा अत्यंत उत्कर्ष झाला म्हणजे देवर्षि, ब्रह्मर्षि होऊन त्या सत्त्वगुणाच्या समसाम्य स्थितीने ते आजानुबाहु व कल्पापर्यंत जगणारे असे दीर्घायुषी होतात ९८.
सत्त्वगुणें क्रियायुक्त । स्वर्गीं देव होती स्वर्गस्थ ।
भोगक्षयें अधःपात । या योनीं जनित सत्त्वगुणें ॥ ९९ ॥
सत्वगुणयुक्त कर्म घडले म्हणजे ते स्वर्गातील देव होऊन राहतात, आणि तेथील भोग भोगल्यामुळे पुण्य संपलें म्हणजे त्यांना अधःपात घडून ते पुन्हा ह्या योनीत जन्म घेऊन सत्त्वगुणसंपनच होतात ९९.
आश्रयूनि राजस गुण । करितां राजस कर्माचरण ।
तेणें क्षोभला रजोगुण । योनि कोण उपजवीं ॥ ६०० ॥
राजस लोकांनी रजोगुणाचा आश्रय करून राजस कर्माचरण केले असता तेणेकरून तो राजसगुण क्षुब्ध झाला, म्हणजे तो कोणत्या योनीत जन्मास घालतो ? ६००.
राजस कर्म ब्रह्मीं अर्पिती । ते दैत्यही भगवद्भ क्त होती ।
जे रजउत्कर्षें भोग वांछिती । ते असुर होती महायोद्धे ॥ १ ॥
तर जे लोक राजस कर्म ब्रह्मार्पण करतात, ते दैत्यांत जन्मास येऊनही भगवद्गक्त होतात. आणि जे रजोगुणाच्या उत्कर्षाने सुखोपभोगाची इच्छा करतात, ते महायोद्धे असे असुर होतात १.
रजोगुणें स्वकर्माचरण । तेणें कर्में जन्मती ब्राह्मण ।
रजतारतम्यें जाण । चारी वर्ण जन्मती ॥ २ ॥
जे रजोगुणानेच स्वकर्माचरण करतात, ते त्या कर्मानंच ब्राह्मणजन्म पावतात. आणि याच रजोगुणाच्या कमीजास्त मानाने चारही वर्ण जन्मास येतात २.
तामसाचे संगतीं जाण । करितां तमिष्ठ कर्माचरण ।
तेणें क्षोभला जो तमोगुण । तो नीच योनी दारुण उपजवी ॥ ३ ॥
तामसाच्या संगतीने तामस कर्माचरण केले, तर त्यामुळे जो तमोगुण क्षुब्ध होतो, तो भयंकर अशा नीच योनीत जन्मास घालतो ३,
भूत प्रेत पिशाचक । तिर्यग्योनि असंख्य ।
वृक्ष पर्वत पाषाण देख । या योनी अनेक भोगवी ॥ ४ ॥
व भूत, प्रेत, पिशाच, पशु, पक्षी, पाषाण, इत्यादि अगणित योनी भोगावयास लावतो ४.
आशंका – कर्म त्रिगुणात्मक साचार । परी कर्मफळभोक्ता ईश्वर ।
हा वेदशास्त्रें विचार । केला निर्धार तुम्हींही ॥ ५ ॥
[आशंका] – कर्म हैं खरोखर त्रिगुणात्मक आहे, परंतु कर्मफळांचा भोक्ता ईश्वर आहे, हा निश्चय वेदशास्त्रांच्या आधाराने आपणही केलाच ५.
देहसाक्षित्वें आत्मा निराळा । ऐसा गतश्लोकीं केला निर्वाळा ।
जैं कर्मफळभोक्ता कर्मावेगळा । तैं कर्मफळा केवीं भोगी ॥ ६ ॥
देहाचा साक्षीभूत जो आत्मा तो निराळाच आहे, असा गेल्या श्लोकांत आपणच सिद्धांत ठरविला. तेव्हा कर्मफळाचा भोक्ता जर कर्माहून वेगळा आहे, तर तो कर्मफळाला भोगतो कसा ? ६.
ऐसें आशंकेचें अंतर । जाणोनियां शार्ङ्गधर ।
तेचि अर्थींचें उत्तर । विशद साचार सांगत ॥ ७ ॥
अशा प्रकारच्या आशंकेनें युक्त असे उद्धवाचे अंत:करण जाणून श्रीकृष्ण त्याच अर्थाचे उत्तर खरोखर विशद करून सांगत आहेत ७.
नृत्यतो गायतः पश्यन् यथैवानुकरोति तान् ।
एवं बुद्धिगुणान्पश्यतन्ननीहोऽप्यनुकार्यते ॥ ५२ ॥
[श्लोक ५२] जेव्हा मनुष्य एखाद्याला नाचतानागाताना पाहून स्वतःसुद्धा त्याचे अनुकरण करू लागतो, त्याप्रमाणे जीव स्वतः निष्क्रिय असूनही बुद्धीच्या गुणांचे अनुकरण करू लागतो. (५२)
कलाकुशल सभानायक । त्यापुढें रंग होता कौतुक ।
गात्या नाचत्याचे तालथाक । स्वयें देख अनुकरे ॥ ८ ॥
सभापति कलाकुशलतेंत निपुण असला आणि त्याच्यापुढे मोठ्या आनंदाने नाचरंग होऊ लागला, तर त्या गाणाराच्या व नाचणाराच्या तालसुराप्रमाणे तोही ताल धरतो ८.
तेंचि अनुकार म्हणशी कैसें । प्रकृति केवळ जडांशें ।
जाणपण आत्म्यासी असे । येणें विन्यासें भोक्ता म्हणती ॥ ९ ॥
आता तो ताल कसा धरिला जातो असें म्हणतील, तर प्रकृति ही केवळ जडाचा अंश आहे, आणि आत्मा हा जाणता आहे. म्हणूनच त्याला भोक्ता असें म्हणतात ९.
सभेसी बैसल्या निश्चळा । रंगींच्या अनुकरे थाकताळा ।
तेवीं प्रकृति पुरुष वेगळा । तो प्रकृतीची लीळा अनुकरे ॥ ६१० ॥
सभेंत स्वस्थ बसलेला असतो, तो सुद्धा नृत्यगायनांतील तालसुरांप्रमाणे ठेके देत असतो. त्याप्रमाणे प्रकृतीहुन पुरुष हा वेगळा असूनही प्रकृतीच्या लीलेला अनुसरतो ६१०.
आशंका – प्रकृतिच्छंदें अनुकारता । गुणकर्मांचा फळभोक्ता ।
आत्मा झाला जैं तत्त्वतां । तैं नित्यमुक्तता भंगली ॥ ११ ॥
[आशंका] – प्रकृतीच्या नादाने तिचे अनुकरण करणारा आत्मा जर खरोखर गुणकर्माचा भोक्ता होईल, तर त्याची नित्यमुक्तता नाहीशी होईल ११.
जो करी कर्मफळस्वादन । त्यासी लागे कर्मबंधन ।
कर्मास्तव जन्ममरण । आत्म्यासी जाण लागलें ॥ १२ ॥
कारण जो कर्मफळाचा उपभोग घेईल, त्यालाच कर्माचे बंधन लागेल, आणि त्या कर्मापासून आत्म्यालाही जन्ममरण लागलें असें म्हणावे लागेल १२.
नित्यमुक्त अविकारी । या गोष्टी राहिल्या दूरी ।
आत्मा जाहला संसारी । गुणविकारीं अतिबद्ध ॥ १३ ॥
आणि तसे झाले तर आत्मा हा नित्यमुक्त व विकारातीत आहे, ह्या गोष्टी लांबच राहिल्या. अर्थात् आत्मा हा संसारी, गुणविकारी आणि अत्यंत बद्ध असा झाला १३.
उद्धवा तूं ऐसऐशी । आशकां झणीं धरिशी ।
आत्मा अलिप्त गुणकर्मांसी । दृष्टांतेंसीं हरि सांगे ॥ १४ ॥
उद्धवा ! अशी तूं शंका कदाचित् घेशील . परंतु आत्मा हा गुणकर्मापासून अलिप्त आहे, हेच श्रीकृष्ण आणखी दृष्टान्ताने सांगतात १४.
यथाम्भसा प्रचलता तरवोऽपि चला इव ।
चक्षुषा भ्राम्यमाणेन दृश्यते भ्रमतीव भूः ॥ ५३ ॥
यथा मनोरथधियो विषयानुभवो मृषा ।
स्वप्नदृष्टाश्च दाशार्ह तथा संसार आत्मनः ॥ ५४ ॥
[श्लोक ५३-५४] जलाशयामधील पाणी हलण्याने त्यात प्रतिबिंबित झालेली झाडेसुद्धा हालत असल्यासारखी दिसतात किंवा डोळे फिरविले असता पृथ्वीसुद्वा फिरताना दिसते, किंवा जसे मनातील विचार अथवा स्वप्नातील पाहिलेले पदार्थ सर्वथैव खोटे असतात, त्याचप्रमाणे, हे उद्धवा ! आत्म्याचा विषयानुभवरूप संसारसुद्धा खोटा आहे. (५३-५४)
जेवीं गंगातीरींचा तरू । जळीं वाहतां देखे नरू ।
तेवीं मायागुणानुकारू । भासे विकारू आत्मत्वीं ॥ १५ ॥
ज्याप्रमाणे एकादा मनुष्य नदीच्या काठावर असलेला वृक्ष पाण्यातून वहात जात आहे असे पाहतो, त्याप्रमाणे मायेच्या गुणाच्या संसर्गानं आत्म्याच्या ठिकाणीही विकार असल्याचा भास होतो १५.
ज्याचे डोळां भवंडी सबळ । तो भंवतां देखे भूमंडळ ।
तेवीं मायिक विकारमेळ । मिथ्या केवळ आत्म्यासी ॥ १६ ॥
ज्याच्या डोळ्यांना अतिशय भोवंड येते, त्याला सारी पृथ्वीच फिरत आहे असे भासते. त्याप्रमाणे या मायेच्या विकारांचा जो समुदाय आहे, तो आत्म्यालाही मिथ्याच आहे १६.
जो अश्वारूढ होऊनि पाहे । जळीं प्रवाहासंमुख राहे ।
तो देखे मी जळीं प्रवाहें । ऐसा मिथ्या होये अनुभवू ॥ १७ ॥
जो घोड्यावर बसून पाण्याच्या ओघाच्या समोर राहून पाहतो, त्याला आपण पाण्यांतच वहावतो आहों असा भास होत असतो १७.
तेवीं आत्मा नित्य निर्विकार । तेथ मायावी गुणसंभार ।
कल्पनायोगें साचार । मानिती नर मनोमय ॥ १८ ॥
त्याप्रमाणे आत्मा हा नित्य निर्विकारच आहे व त्यांत अनेक गुण आहेत ते मायात्मक आहेत. ते खरोखर कल्पनामयच असल्यामुळे मनोमय असतांही लोक खरेच मानितात १८.
आब्रह्यस्तंबपर्यंत । नाना योनी विकारवंत ।
कर्म क्रिया फळभोग येथ । जाण निश्चित मनोजन्य ॥ १९ ॥
ब्रह्मदेवापासून तो गवताच्या काडीपर्यंत ज्या असंख्य योनी आहेत, त्या विकारवंतच आहेत आणि त्यांत कर्म, क्रिया, फळाचे भोग हे सारे खरोखर मनापासूनच उत्पन्न झालेले आहेत १९.
ऐसें सांगतां हरि सांवळा । तेणें उल्हास उद्धवजीवाला ।
तया आनंदाच्या कल्लोळां । उद्धवचि लीला पोखित ॥ ६२० ॥
घनश्याम जे श्रीकृष्ण त्यांनी याप्रमाणे सांगितले. तेव्हां उद्धवाच्या अंत:करणाला अतिशय आनंद झाला आणि त्या आनंदाच्या भरांत उद्धवही तशाच लीला करूं लागला ६२०.
निववावया उद्धवाचा ताप । स्वयें सांगे तो विश्वतोमुख ।
जेणें उद्धवां बहु हरिख । तेंचि श्रीकृष्ण देख सांगतसे ॥ २१ ॥
उद्धवाच्या मनाचा ताप दूर करावा म्हणूनच सर्वज्ञ असे श्रीकृष्ण स्वतः ज्ञानोपदेश करीत होते. यामुळे उद्धवाला जेणेकरून आनंद होईल असेंच निरूपण श्रीकृष्ण करीत असत २१.
आत्मा निजमुक्त अविकारी । तो संकल्पें कीजे विकारी ।
असंसारी परीसंसारी । मनोविकारीं मानिजे ॥ २२ ॥
आत्मा हा नित्यमुक्त व अविकृतच आहे. तो संकल्पानेच विकारी झाला असे वाटते. तो खरोखर असंसारीच आहे. पण मनोविकारांनीच त्याला संसारी असें मानितात २२.
ऐसें दुजयावीण कांहीं । कथा वार्ता सांगतां नाहीं ।
एक श्रोता दुसरा वक्ता पाहीं । यालागीं येही उपाये ॥ २३ ॥
अशा प्रकारे तेथे दुसरे कोणीच नसल्यामुळे कथा वार्ता कांहींच सांगता येत नाही. श्रोता आणि वक्ता दोन असतील तरच तसे करता येईल २३.
जेवीं एकटा क्रमेना पंथ । मी राजा करी मनोरथ ।
परचक्र कल्पूनि तेथ । होय उद्यत युद्धासी ॥ २४ ॥
ज्याप्रमाणे एकटांच मनुष्य चालतांना कंटाळला, आणि त्याला वाट सरेनाशी झाली, म्हणजे तो आपण राजाच आहो असें मनोराज्य चालवितो आणि तेथें परचक्र आले आहे अशी कल्पना करून युद्धाला तयार होतो २४.
तो युद्धआ्वेश कडकडाट । तेणें सत्राणें उडे उद्भ>ट ।
अडखळूनि आदळे पोट । म्हणे मी घायवट पडिलों कीं ॥ २५ ॥
आणि त्या युद्धाचें त्याला इतकें स्फुरण येते की, सांगतां सोय नाही. त्या हिरहिरीसरशी तो ताड ताड उड्या मारू लागतो. इतक्यांत पाय कशाला तरी अडखळून पडतो व पोट आपटते, तेव्हां म्हणतो की मी जखमी होऊन पडलों २५.
मिथ्या भ्रमें पडला भुली । चालतां चालतां मृगजळीं ।
उतरावया पैलतीरीं । बुडी वहिली देतसे ॥ २६ ॥
अशा प्रकारे तो खोट्याच भ्रमाने तो भ्रांतीत पडतो, आणि चालता चालतां मृगजळांतून पलीकडे जाण्याकरितां तत्काल त्यांत बुडी देतो २६.
गंधर्वनगरीं प्रचंड । माड्या सोपे उदंड ।
क्षणामाजीं विरस चंड । वितंड करी निर्वाळा ॥ २७ ॥
किंवा आकाशांत मोठमोठाले ढग उठले म्हणजे त्यांत हवे तितके सोपे व माड्या दिसू लागतात, परंतु जोराचा वारा सुटला की एका क्षणांत तेथे शून्याकार होऊन जातो २७.
तेवीं संसार हा काल्पनिक । तेथील सुख आणि दुःख ।
मिथ्या केवळ मायिक । जाण निष्टंक निजभक्तां ॥ २८ ॥
त्याप्रमाणे संसार हाच मुळी काल्पनिक असल्यामुळे त्यांतील सुखदुःखही माझ्या भक्तांना केवळ मायिकच वाटते २८.
दाशार्हवंशीं जन्मलासी । तूं उत्तम दशा पावलासी ।
यालागीं म्हणे हृषीकेशी । उद्धवासी दाशार्ह ॥ २९ ॥
दाशार्ह वंशामध्ये जन्म घेऊन तूं उत्तम स्थितीला पोचला आहेस, म्हणून श्रीकृष्णांनी उद्धवाला ‘ दाशार्ह ‘ असे म्हटले २९.
जेवीं का स्वप्नभोग जाण । स्वप्नीं सत्य मानी आपण ।
तेवीं संसार हा दीर्घ स्वप्न । मायिक जाण मिथ्यात्वें ॥ ६३० ॥
स्वप्नांतील सुखापभोग असतात ते ज्याप्रमाणे आपण स्वप्नांमध्ये खरेच मानितों, त्याप्रमाणे संसार हें एक दीर्घ स्वप्नच आहे; म्हणून ते मिथ्या व केवळ मायिक होय ६३०.
जागा झालिया स्वप्न वृथा । निरहंकारीं संसार मिथ्या ।
हे ब्रह्मज्ञानाची मुख्य कथा । जाण तत्त्वतां उद्धवा ॥ ३१ ॥
जागे झाले म्हणजे स्वप्न खोटें, त्याप्रमाणे निरहंकारामध्ये संसारही मिथ्याच आहे. उद्धवा ! हीच काय ती ब्रह्मज्ञानांतील मुख्य गोष्ट आहे हे लक्षात ठेव ३१.
संसार तो कल्पनामात्र । आत्मा निर्विकार चिन्मात्र ।
जेवीं मृगजळ भरी भास्कर । तेवीं संसार करी आत्मा ॥ ३२ ॥
सूर्य ज्याप्रमाणे मृगजल भरतो, त्याप्रमाणेच आत्मा हा संसार करतो. यावरून संसार हा केवळ कल्पनामय असून आत्मा हा निर्विकार व ज्ञानरूप आहे ३२.
उद्धवा तूं म्हणशी आतां । ऐकतां तुझे मुखींची कथा ।
संसार मिथ्या तत्त्वतां । तरी साधनावस्था कां सोसावी ॥ ३३ ॥
ह्यावरून उद्धवा ! तूं आतां कदाचित् असें म्हणशील की, हे तुझ्या तोंडचे भाषण ऐकून संसार हा सर्व मिथ्याच आहे, मग साधन करावयाच्या भरीला तरी का पडावें ? ३३.
जेवीं वंध्यापुत्राचें लग्न । करावया कोणी न करी यत्न ।
कां मृगजळीं बांधोनि धरण । पाट जाण कोणी काढीना ॥ ३४ ॥
वांझोटीच्या मुलाचे लग्न करावयाला जसे कोणी झटत नाही, किंवा मृगजळाचे धरण बांधून त्याचा कोणी पाट काढीत नाही ३४.
तेवीं मिथ्या संसारबंधन । तेथ श्रवण मनन चिंतन ।
विवेक वैराग्य ज्ञान ध्यान । वृथा कां जन सोशिती ॥ ३५ ॥
त्याप्रमाणे संसारबंधनच जर मुळी मिथ्या आहे, तर मग श्रवण, मनन, चिंतन, विवेक, वैराग्य, ध्यान, यांचा खटाटोप तरी लोक व्यर्थ कां करितात ३५.
उद्धवा बागुलाचें भय खोटें । परी बाळकासी सत्य वाटे ।
तेवीं मिथ्या संसारकचाटें । जीवीं प्रकटे बद्धता ॥ ३६ ॥
उद्ध्वा ! बागुलाचे भय पाहूं गेलें तर खोटेंच असते, पण मुलाला ते खरेंच वाटत असते. त्याप्रमाणे संसाराच्या खोट्या संकटानेंच जीवाला बंधन प्राप्त होते ३६.
तेचि अर्थींचा दृष्टांत । स्वयें श्रीकृष्ण सांगत ।
मिथ्या सांसरिक येथ । भ्रमें बाधीत भ्रांतासी ॥ ३७ ॥
त्याच अर्थाचा दृष्टान्त श्रीकृष्ण स्वतः सांगत आहेत. कारण, संसारासंबंधी जी दुःखे आहेत, ती भ्रमिष्ट लोकांना भ्रमानेंच पीडा देत असतात ३७.
अर्थें ह्यविद्यमानेऽपि संसृतिर्न निवर्तते ।
ध्यायतो विषयानस्य स्वप्नेऽनर्थागमो यथा ॥ ५५ ॥
[श्लोक ५५] जशी स्वप्नातील अनर्थपरंपरा ते पाहात असेपर्यंत नाहीशी होत नाही, त्याचप्रमाणे विषय खरे नसूनही जो जीव त्यांचेच चिंतन करीत राहातो, तोपर्यंत त्याचे हे संसारचक्र थांबत नाही. (५५)
विचारें पाहतां मिथ्या स्वप्न । तेथील विषयसेवन ।
सुखदुःखें बाधिती गहन । ऐक लक्षण तयाचें ॥ ३८ ॥
विचाराने पाहिले तर स्वप्नं हें मिथ्याच असते, तरी त्यांतील विषयाच्या सेवनाने सुखदुःखांची अत्यंत बाधा होते. त्याचाही प्रकार ऐक ३८.
स्वप्नीं पुत्रलाभ राजसन्मान । तेणें सुखें ओसंडे आपण ।
कां झालिया धनहरण । तेणें दुःखे दारुण आक्रंदे ॥ ३९ ॥
स्वप्नांत पुत्र होतो किंवा राजा सत्कार करतो, पण त्याच आनंदाने स्वप्न पहाणारा आपणही फुगत असतो. किंवा त्यांतच आपले सारे द्रव्य गेले तर त्या दुःखानेही आपण रडू लागतो ३९.
त्यासी जागें न करितां । स्वप्नसुखदुःखबाधकता ।
निवर्तेना सर्वथा । जाण तत्त्वतां उद्धवा ॥ ६४० ॥
ह्याकरितां उध्दवा ! त्याला जर आपण जागे केले नाही, तर स्वप्नांतील ती सुखदुःखांची पीडा खरोखर कधीच सुटत नाहीं हें लक्षात ठेव ६४०.
तेवीं विषयासक्त जन । ज्यांसी अखंड विषयध्यान ।
ज्यांचें विषयीं सदा मन । देहाभिमान गोंवीत ॥ ४१ ॥
त्याप्रमाणे जे लोक विषयासक्त असतात, ज्यांना निरंतर विषयाचेच ध्यान असते, देहाभिमान हा ज्यांचे मन सदासर्वदा विषयांतच गोंवीत असतो ४१.
तयांसी देखावया उपावो । जयां विषयसक्ति होय वावो ।
येचि अर्थींचा दृष्टांत पहा वो । स्वयें सांगे देवो उद्धवासी ॥ ४२ ॥
त्यांना ज्या उपायांनी विषयासक्ति नाहीशी होईल असे उपाय कोणते? अहो ! ह्याच अर्थाचा दृष्टान्त स्वतः श्रीकृष्ण उद्धवाला सांगत आहेत ४२.
न करितां श्रवण मनन । न साधितां विवेकज्ञान ।
न धरितां वैराग्य पूर्ण । भवभय जाण तुटेना ॥ ४३ ॥
श्रवण व मनन केले नाही, विचाराने ज्ञान साधले नाही, किंवा परिपूर्ण वैराग्य धरले नाही, तर संसाराचे भय तुटत नाही ४३.
संसार मिथ्या तोंडें म्हणतां । न तुटे सुखदुःखभयव्यथा ।
जन्ममरणादि अवस्था । अहंममता सुटेना ॥ ४४ ॥
पण संसार हा मिथ्या आहे असे फक्त तोंडानेच म्हटल्याने काही सुखदुःखांचे भय तुटत नाही, किंवा जन्ममरणांचा फेरा व अहंममता काही सुटत नाहींत ४४.
ऐसे अज्ञान जन । तिंहीं अवश्य करावें साधन ।
विवेकें वैराग्य धरितां पूर्ण । भवबंधन निवारे ॥ ४५ ॥
असे जे अज्ञानी लोक असतील, त्यांनी अवश्य साधन करावें. विवेकाने परिपूर्ण वैराग्य धारण केले म्हणजे संसारबंधन नष्ट होतें ४५.
यालागीं उद्धवा जाण । सकळ साधनांचे कारण ।
जेणें हाता चढे ब्रह्मज्ञान । तें वैराग्य पूर्ण साधावें ॥ ४६ ॥
याकरितां उद्धवा! सर्व साधनांचे मूळ आणि ज्याच्या योगाने ब्रह्मज्ञान हाताला चढतें तें वैराग्य पूर्णपणे साध्य करावें ४६.
ऐक विरक्तीची मागी । जैशी धढधडीत आगी ।
तैसें वैराग्य व्हावें अंगीं । तैं प्राप्तीलागीं अधिकारू ॥ ४७ ॥
आतां विरक्तीचा मार्ग कसा असतो तो ऐक. तर आग जशी धडाडते, त्याप्रमाणे अंगांत वैराग्य बाणले पाहिजे. तेव्हांच ब्रह्मप्राप्तीसाठी अधिकार प्राप्त होतो ४७.
ऐसे मुमुक्षु जे पुरते । परम कृपेचेनि हातें ।
सद्गुरु थापटोनि ज्यांतें । करी अद्वैतें जागृत ॥ ४८ ॥
असे जे कोणी पूर्ण मुमुक्षु असतात, व ज्यांना पूर्ण कृपेच्या हाताने सद्गुरु थापटून जागे करतात ४८,
ज्यासी देहादिभेदपुष्टी । मिथ्या माया गुणत्रिपुटी ।
ब्रह्मानंदें कादली सृष्टी । स्वप्नवत् दृष्टीं संसारू ॥ ४९ ॥
ज्यांना देहादिकांच्या अभेद भावाने पुष्टि येते, मायेच्या गुणांची त्रिपुटी मिथ्या भासते, ब्रह्मानंदाने सृष्टि भरून जाते, व ज्यांच्या दृष्टीला संसार केवळ स्वप्नवत् भासू लागतो ४९,
येव्हडी ही परम प्राप्ती । वैराग्यविवेकें चढे हातीं ।
तेंचि वैराग्य उद्धवप्रती । स्वयें श्रीपती सांगत ॥ ६५० ॥
एवढा अप्रतिम लाभ ज्या वैराग्यविवेकाने हाती लागतो, तेंच वैराग्य उद्ध्वाला स्वतः श्रीकृष्ण सांगत आहेत ६५०.
तस्मादुद्धव मा भुङ्क्ष्व विषयानसदिन्द्रियैः ।
आत्माग्रहणनिर्भातं पश्य वैकल्पिकं भ्रमम् ॥ ५६ ॥
[श्लोक ५६] म्हणून उद्धवा ! या नाठाळ इंद्रियांनी विषयांचा उपभोग घेऊ नकोस आत्म्याच्या अज्ञानामुळे भासणारा हा भेदभ्रम आहे, असे समज. (५६)
विषयांची जे आसक्ती । ते बाधक परमार्थप्राप्ती ।
विषय सांडीं सांडीं निश्चितीं । परतोनि हातीं नातळें ॥ ५१ ॥
विषयाची असक्ति असते. तीच परमार्थप्राप्तीला बाधक होते. ह्याकरिता खरोखर विषयच सोडून दे, आणि पुन्हा त्यांना हातही लावू नको ५१.
आसक्त वृत्ति इंद्रिययोग । अतिलोलुप्यें विषयभोग ।
तोचि मुख्यत्वें भवरोग । यालागीं त्याग करावा ॥ ५२ ॥
वृत्ति आसक्त झाली म्हणजे ती इंद्रियांना चिकटून बसते, आणि तिला अत्यंत लुब्ध झाल्याने विषयाचे भोग भोगावेसे वाटतात. हाच संसाराचा मोठा रोग होय. ह्याकरिता त्याचा त्याग करावा ५२.
विखें रांधिलें परमान्न । तें ग्रासमात्र हरी प्राण ।
विष एकदां मारक जाण । विषय पुनःपुनः मारक ॥ ५३ ॥
उत्तम पक्वान्न असले, आणि त्यांत विष घातलेले असले, तर त्याचा एक घास खाल्ला तरी प्राण जातो. पण विषाने एकदाच प्राण जातो, आणि विषय हे पुन्हा पुन्हा जीव घेत असतात ५३.
म्हणसी प्रारब्धें भोग येती । ते त्यागिले केंवी जाती ।
विषयत्यागाची युक्ती । वैराग्यस्थिती घडे केवीं ॥ ५४ ॥
आतां तूं म्हणशील की, प्रारब्धानुसार भोग येत असतात, याकरिता त्यांचा त्याग कसा घडेल ? आणि विषयत्यागाचा उपाय सांपडून वैराग्य कसे प्राप्त होईल? ५४.
प्रारब्धें विषयभोग येती । ते साधका दुःखरूप होती ।
वणवां मृगें आहाळती । तैशी स्थिती भोगणें ॥ ५५ ॥
प्रारब्धानेंच विषयभोग येतात, आणि तेच साधकाला दुःख देतात. वणव्यांत सांपडलेली हरणे जशी होरपळतात, त्याप्रमाणेच त्यांनाही ती स्थिति भोगावी लागते ५५.
व्याघ्रमुखीं सांपडे गाये । तैसा भोगी चरफडीत जाये ।
ऐसेनि अनुतापें पाहें । वैराग्य होये अनिवार ॥ ५६ ॥
वाघाच्या तोंडात गाय सांपडल्याप्रमाणे तो विषय भोगणारा जेव्हा चरफडतो, तेव्हां त्या अनुतापाने अनिवार वैराग्य उत्पन्न होते ५६.
वैराग्य जाहलिया धडपुडें । सद्गुरुकृपा हाता चढे ।
तेणें गुरुकृपाउजियेडें । संसार उडे द्वंद्वेंसीं ॥ ५७ ॥
खरें खरे वैराग्य उत्पन्न झाले, की सद्गुरूची कृपा हाती लागते आणि गुरुकृपेच्या प्रभावानेंच द्वंद्वासहवर्तमान सारा संसार नाहीसा होतो ५७.
झालिया गुरुकृपा सुगम । सर्वत्र ठसावे परब्रह्म ।
तेथ जन्ममरण कैंचे कर्म । भवभ्रम असेना ॥ ५८ ॥
गुरुकृपा साध्य झाली, की जिकडे तिकडे परब्रह्मच दिसू लागते. मग तेथें कर्म कशाचं, आणि जन्ममरण तरी कशाचें? संसाराच्या भ्रमाचे सारें नांवच नाहीसे होते ५८.
तेथ वाती लावूनि पाहतां । संसार दिसेना मागुता ।
जेवीं निभ्रमें पाहों जातां । न लगे हाता रज्जुसर्प ॥ ५९ ॥
त्या वेळी दिवा लावून पाहिले तरी फिरून संसार म्हणून कसला तो दिसत नाही. ज्याप्रमाणे भ्रम नाहीसा झाल्यानंतर पाहूं गेलें असतां दोरीचा साप हाती लागत नाही ५९,
भवंडिचेनि वेगवशें । भिंगोरी नीट उभी दिसे ।
तेवीं भ्रमाचेनि आवेशें । संसार भासे सत्यत्वें ॥ ६६० ॥
किंवा भिंगरी वेगाने गरगरां फिरत असली म्हणजे ती सारखी उभीच आहे असे वाटते, त्याप्रमाणे भ्रमाचा बहर असतो तोपर्यंत संसार हाच खरा असा भास होतो ६६०.
केवळ जो निबिड भ्रम । संसार हें त्याचें नाम ।
येर्हवीं निखिल परब्रह्म । तेथ जन्मकर्म असेना ॥ ६१ ॥
निखालस परिपूर्ण जो भ्रम असतो, त्याचंच नांव संसार. बाकी परब्रह्म पाहिले तर ते शुद्धच आहे. तेथें जन्मही नाही आणि कर्मही नाही ६१.
ऐसें जरी झालें ब्रह्मज्ञान । तरी प्रारब्ध भोगावें गा जाण ।
जेवीं कुलाल भांडें ने आपण । परी चक्रभ्रमण राहेना ॥ ६२ ॥
अशा प्रकारचे ब्रह्मज्ञान जरी प्राप्त झाले, तरी कुंभाराने मडके काढून नेले असतांही त्याचे चाक जसे फिरतच असते, त्याप्रमाणे प्रारब्ध भोग हे भोगावेच लागतात ६२.
वृक्ष समूळ उपडल्या जाण । उपडितां न वचे सार्द्रपण ।
तेवीं होतांचि ब्रह्मज्ञान । प्रारब्ध जाण सोडीना ॥ ६३ ॥
वृक्ष हा मुळासकट उपटून काढता येतो, पण त्याचा ओलेपणा असतो तो काही उपटून काढता येत नाही. त्याप्रमाणे ब्रह्मज्ञान झाले तरी प्रारब्ध कांही त्याला सोडीत नाहीं ६३.
त्या प्रारब्धाचिये गती । विषयभोग जरी येती ।
तेथ उपावो न करावा निवृत्ती । निजशांती साहावें ॥ ६४ ॥
त्या प्रारब्धानुसार जर विषयभोग येऊन अंगावर पडले, तर त्याचा प्रतिकार करण्याच्या खटपटीत पडूं नये. शांतवृत्तीने ते सारे सहन करावे ६४.
विषयभोग आलियाही जाण । निजशांति धरोनि संपूर्ण ।
सुखें वर्तती साधुजन । विवेकसंपन्न क्षमावंत ॥ ६५ ॥
जे विवेकसंपन्न व क्षमाशील साधु असतात, ते विषयभोग आले तरी अंगामध्ये परिपूर्ण शांति ठेवून आनंदाने वागत असतात ६५.
हाता आलिया निजशांती । संसार बापुडा तो किती ।
तेचि शांतीची स्थिती । स्वयें श्रीपती सांगत ॥ ६६ ॥
शांतीच हातांत आली, तर मग संसार तो बिचारा किती? त्याच शांतीचे लक्षण स्वतः श्रीकृष्ण सांगतात ६६.
जें निजशांतिचें कल्याण । जेणें जीव पावे समाधान ।
तें अतिगोड निरूपण । दों श्लोकीं श्रीकृष्ण सांगत ॥ ६७ ॥
शांतीने आपलें जें कल्याण होते, ज्याच्या योगाने जीवाला समाधान प्राप्त होते, त्याचे अत्यंत गोड निरूपण श्रीकृष्ण दोन लोकांनी सांगत आहेत ६७.
क्षिप्तोऽवमानितोऽसद्भिः प्रलब्धोऽसूयितोऽथवा ।
ताडितः सन्निबद्धो या वृत्त्या वा परिहापितः ॥ ५७ ॥
निष्ठितो मूत्रितो वाज्ञैर्बहुधैवं प्रकम्पितः ।
श्रेयस्कामः कृच्छ्रगत आत्मनाऽऽत्मानमुद्धरेत् ॥ ५८ ॥
श्लोक ५७-५८] दुर्जनांनी धक्के मारून बाहेर हाकलले, अपमान केला, उपहास केला, निंदा केली, मारपीट केली, बांधून ठेवले, उपजीविकेचे साधन काढून घेतले, अंगावर थुंकले, मूत्रविसर्जन केले किंवा निरनिराळ्या प्रकारे त्रास देऊन चित्त विचलित करण्याचा प्रयत्न केला किंवा अशा तर्हेचे कोणतेही संकट असले, तरी ज्याला आपले कल्याण करून घेण्याची इच्छा आहे, त्याने आपल्या विवेकबुद्धीने त्या अडचणींपासून स्वतःचे रक्षण करावे. (५७-५८)
देहाभिमानी तामस जन । अतिदुष्ट जे दुर्जन ।
तिंहीं साधूंसी करितां छळण । शांतीस्तव सज्जन क्रोधी नव्हती ॥ ६८ ॥
देहाभिमान बाळगणारे असे जे तामसी, अत्यंत दुष्ट व दुर्जन असतात, त्यांनी साधूंचा छळ केला, तरी त्या साधूंजवळ शांति असल्यामुळे ते कधीही क्रोधाच्या आधीन होत नाहीत ६८.
अल्पउपद्रवीं जाण । न येती क्रोधा सज्ञान ।
तैसें नव्हे अतिनिर्वाण । पीडा दारुण करितांही ॥ ६९ ॥
जे ज्ञानसंपन्न असतात, ते अल्पस्वल्प उपद्रवानें क्रोधाला येत नाहीत. किंवा त्यांचा अतिशय छळ केला, तरीही ते अत्यंत कोपायमान होत नाहीत ६९.
कायिक वाचिक मानसिक । त्रिविध पीडा देतां देख ।
साधु निजशांतीं नेटक । जाणोनि विवेक ते साहती ॥ ६७० ॥
कायिक, वाचिक आणि मानसिक अशा तीन प्रकारच्या पीडा आहेत. परंतु साधु पुरुष आपल्या शांतवृत्तींतच अढळ असल्यामुळे ते सर्व विवेक जाणून सहन करतात ६७०.
उजू बोलतां शुद्ध युक्ती । आक्षोपूनि हेडाविती ।
झिडकावूनियां निर्भर्त्सिती । अपमानिती सभेसी ॥ ७१ ॥
साधूंनी केवळ युक्तीने सरळ भाषण केले तरी लोक त्यावर आक्षेप घेऊन त्यांचा उपहास करतात, त्यांना झिटकारून त्यांची निर्भसना करतात, इतकेच नव्हे, तर भर सभेतही त्यांचा अपमान करतात ७१.
शब्दीं शब्दाचे करूनि छळ । म्हणती दुष्ट दुर्जन दुःशीळ ।
अपवित्र अमंगळ । नष्ट चांडाळ हा एक ॥ ७२ ॥
शब्दांनीच शब्दच्छळ करून हा दुष्ट आहे, दुर्जन आहे, दुःशील आहे. अपवित्र भाडे, अमंगल आहे, नष्ट चांडाळ आहे, असे म्हणतात ७२.
ऐशा दुर्जनांच्या दुष्टोक्ती । साधु साहे निजशांती ।
ते शांतीची उपपत्ती । विवेकस्थिती अवधारीं ॥ ७३ ॥
अशी दुर्जनांनी किती जरी दुष्ट भाषणे केली, तरी साधु आपल्या शांत वृत्तीनें तें सर्व सहन करीत असतो. ती शांति उत्पन्न होण्याचे कारण, आणि विवेकाचे स्वरूप ही ऐक ७३.
पराची जिव्हा वोठ हालती । माझ्या अंगीं ते न रुपती ।
यालागीं क्रोध न ये चित्तीं । निजशांती ढळेना ॥ ७४ ॥
दुसऱ्याची जीभ आणि ओठ हालतात ते काही माझ्या आंगांत रुतत नाहीत, असा त्याचा समज असल्यामुळे त्याच्या मनांत क्रोध म्हणून येतच नाही. आणि त्याची शांतीही ढळत नाहीं ७४.
सभेसी सन्मानें पूजितां । लोटूनि घातला खालता ।
हाणोनियां चरण्घाता । नेला परता अपमानें ॥ ७५ ॥
सभेत सन्मानाने त्याची पूजा केली, किंवा बैठकीवरून खाली लोटून दिले, किंवा त्याला लाथा मारल्या, त्याचा अपमान करून पलीकडे ढकलला ७५,
सन्मानें जेथ पूजूं नेती । तेथ केवळ असे क्षिती ।
अपमानें जेथ लोटिती । तेथही क्षिती तेचि पैं ॥ ७६ ॥
तरी तो म्हणतो की, जेथे माझा सन्मान करून पूजा करावयाला नेतात, तेथेही पृथ्वीच असते, आणि अपमान करून जेथें ढकलून देतात, तेथेही तीच पृथ्वी असते ७६.
येथ मान अपमान । कल्पना मनाची जाण ।
ऐसेनि विवेकें सज्जन । द्वेषीना जन निजशांती ॥ ७७ ॥
अशा प्रसंगी मान झाला किंवा अपमान झाला तरी ती केवळ मनाची कल्पनाच होय. असा विचार करून सज्जन असतो तो शांत वृत्तीमुळे कोणाचाच द्वेष करीत नाही ७७.
प्रलोभूनि नाना युक्ती । धनें ठकवूनियां निर्भर्त्सिती ।
धनलोभ केवळ अधःपाती । त्याची निवृत्ती जिंहीं केली ॥ ७८ ॥
अनेक प्रकारच्या युक्तींनी साधूला लोभाच्या पाठीमागे लावून फसवितात व त्याचे द्रव्य घेऊन आणखी वर निर्भत्सना करितात, तेव्हां साधु असे समजतो की, द्रव्यलोभ हा निखालस अधःपाताला नेणारा आहे, म्हणून ते द्रव्यच ज्यांनी नेलें ७८,
त्यांसी निंदितांचि जाण । दोषी होइजे आपण ।
यालागीं क्रोधा न ये मन । शांति संपूर्ण ढळेना ॥ ७९ ॥
त्यांची निंदा केली तर आपणालाही दूषणच लागेल. म्हणून त्याच्या मनाला क्रोध येत नाही व पूर्ण शांतींत अंतर पडत नाही ७९.
शुद्ध बोलती शास्त्रार्थ । अर्थ तितुका अनर्थ ।
त्या अनर्था जो करी निवृत्त । त्यातें द्वेषित ते मूर्ख ॥ ६८० ॥
साधु अशी समजूत करून घेतो की, ‘अर्थ आहे तितका अनर्थ’ असा तर स्पष्ट शास्त्रार्थच सांगतात. मग त्या अनर्थापासून साधूला जो निवृत्त करितो, त्याचा द्वेष करितात ते मूर्ख होत ६८०.
सद्गुणीं दोष आरोपिती । नानापरी निंदा करिती ।
तेणें हित मानिती चित्तीं । तारक निश्चितीं हे माझे ॥ ८१ ॥
अज्ञानी लोक सद्गुणांवर दोषारोप करतात, अनेक प्रकारची निंदा करतात, आणि त्यांतच आपले हित आहे असें मनांत समजतात, तेच माझे खरोखर तारक होत ८१.
मातेचे जे करतळ । ते वरिवरी क्षाळिती बाह्य मळ ।
हे जनक माझे केवळ । सबाह्य मळ सकळ जिव्हाग्रें धुती ॥ ८२ ॥
मातेचे हात माझ्या आंगावरील बाहेरचा मळ तेवढाच धुवून काढतात, पण हे तर माझ्या बापासमान होत. कारण हे माझा आंतला व बाहेरचा. मळही जिव्हाग्राने धुवून काढतात ८२.
ऐशियांचें करितां छळण । हितास नाडिजे आपण ।
कोणाचे न बोले दोषगुण । तेणें शांति जाण थोरावे ॥ ८३ ॥
अशांचा छळ केला, तर आपणच आपल्या हितावर पाणी सोडल्यासारखे होईल, असा विचार करून तो साधु कोणाचे दोष किंवा गुण उच्चारीत नाही. म्हणूनच त्याच्या आंगांत शांति वाढलेली असते ८३.
चाले जेणें जीविकास्थिती । धन धान्य क्षेत्र वृत्ती ।
छळें बळें हिरोनि नेती । तेणेंही चित्तीं क्षोभ नुपजे ॥ ८४ ॥
ज्याच्या योगाने उपजीविका चालते, ते द्रव्य , धान्य किंवा शेतवाडी छळ करून बलात्कारानें कोणी हिसकावून घेतली, तरीसुद्धा साधूच्या मनात राग उत्पन्न होत नाही ८४.
येथ लाभालाभ दैवाधीन । त्यासी देतेंघेतें तेंचि जाण ।
यालागीं द्वेषीना जन । शांतीचा गुण न सांडी ॥ ८५ ॥
इहलोकांत लाभ होणे किंवा न होणे हे केवळ दैवाधीन आहे, त्यांना देणारे किंवा नेणारे तेंच आहे, असे म्हणून तो कोणाचाच द्वेष करीत नाही आणि शांतीचा गुण सोडीत नाही ८५.
वृत्ति घेऊनि उगे नसती । अन्यायी म्हणॊनि बांधिती ।
एक तोंडावरी थुंकिती । एक माथां मुतती अतिदुष्ट ॥ ८६ ॥
बरें, दुष्ट लोक साधूची शेतवाडी घेऊन देखील गप्प बसत नाहीत. तो मोठा अन्यायी आहे असे ठरवून त्याला बांधितात, कोणी तोंडावर थुकतात व जे कोणी अत्यंत दुष्ट असतात ते डोक्यावर मुततात ८६.
एक ताडिती पाडिती । एक नानापरी गांजिती ।
तरी अंगींची ढळेना शांती । विवेक सांगाती सज्जना ॥ ८७ ॥
कोणी मारतात, कोणी पाडतात, कोणी अनेक प्रकारचा छळ करतात. पण सज्जनांजवळ निरंतर विवेक असल्यामुळे त्यांच्या आंगची शांति ढळत नाही ८७.
थुंका आणि जें मूत । तें देहाचिमाजीं उपजत ।
देहींचें देहास लागत । क्षोभ तेथ कोण मानी ॥ ८८ ॥
थुका आणि मूत हें जे आहे ते देहापासूनच उत्पन्न होते, आणि ते देहांतले देहालाच लागते, त्याचा राग कोण मानितो? ८८.
थुंका आणि जें मूत । जैसें देहीं उपजे देहाचें अपत्य ।
देहाचें देहावरी खेळत । दुःख तेथ कोणांचें ॥ ८९ ॥
थुंका आणि मूत ही देहापासूनच जसें मूल उत्पन्न व्हावे त्याप्रमाणे उत्पन्न होतात आणि ती देहाची देहावरच खेळतात. त्यांत दुःख कसले ? ८९.
धरितां मारितां म्हणे देख । देहो तितुका पांचभौतिक ।
मारिता मारिजता दोनी एक । कोणाचें दुःख कोणासी ॥ ६९० ॥
साधूला कोणी धरले किंवा मारले तर तो म्हणतो की, ‘हे पहा ! देह आहे तितका पंचमहाभूतांपासून झालेला आहे. अर्थात् मारणारा आणि मार खाणारा दोन्ही एकच होत. तेव्हां कोणी कोणाचे दुःख मानावे ?’ ६९०.
ऐशी सविवेकें ज्यासी शांती । चारी मुक्ती त्याच्या दासी होती ।
त्याचा अंकिला मी श्रीपती । यावरी प्राप्ती ते कायी ॥ ९१ ॥
अशा विचाराने ज्याला शांति प्राप्त होते, त्याच्या चारीही मुक्ति दासी होऊन राहतात. मी प्रत्यक्ष श्रीकृष्णही त्याचा चाकर होतो. यापेक्षा अधिक लाभ तो कोणता ? ९१.
तेथ केवळ जो मोक्षार्थी । तेणें सर्वस्वें पाळावी शांती ।
ते दुःखसागरावर्तीं । होय तारिती सुखरूप ॥ ९२ ॥
त्यांत जो केवळ मोक्षार्थीच आहे, त्याने तर सर्वस्वेकरून शांति पाळावी. म्हणजे दुःखरूप समुद्राच्या भोवऱ्यातून तीच सुखरूपतेने तारील ९२.
वैराग्य योग ज्ञान ध्यान । त्याचें फळ तें शांति जाण ।
ते शांति साधूनि संपूर्ण । आपणिया आपण उद्धरिती ॥ ९३ ॥
वैराग्य, योग, ज्ञान किंवा ध्यान यांचे जें फळ तीच शांति होय. ती शांति पूर्णपणे साध्य करून साधु आपला आपणच उद्धार करून घेतात ९३.
यालागीं उद्धवा जाण । साहोनि द्वंद्वांचें काठिण्य ।
शांति साधूनि संपूर्ण । ब्रह्म परिपूर्ण पावावें ॥ ९४ ॥
ह्याकरिता उद्धवा ! असे समज की, शीत-उष्ण, सुख-दुख इत्यादि द्वंद्वांतील कठिणपणा आहे तो सहन करून परिपूर्ण शांति साधावी आणि पूर्णब्रह्मस्वरूपाला पोचावें ९४.
पूर्ण ब्रह्म पावल्यापाठीं । जन्ममरणाची खुंटे गोठी ।
परमानंदें पडे मिठी । भवभयाची तुटी तैं होय ॥ ९५ ॥
पूर्णब्रह्माला पोचल्यानंतर जन्ममरणाची गोष्टच खुंटते; आगि परमानंदाची मिठी पडली की, त्याच वेळी संसारभय नष्ट होते ९५.
ऐकोनि श्रीकृष्णाचे बोला । उद्धव अत्यंत चाकाटला ।
द्वंद्वबाध जो ऐकिला । तो न वचे साहिला आम्हांसी ॥ ९६ ॥
हें श्रीकृष्णाचे भाषण ऐकून उद्धव अतिशय चकित झाला. तो म्हणाला, ही जी एवढा वेळ सुखदुःखादि द्वंद्वांची पीडा ऐकली, ती आपल्याला काही सहन होणार नाही ९६.
ऐकिल्या नाहीं ये शांतीच्या गोष्टी । मा केवीं देखिजेल दृष्टीं ।
ऐशी शांति ज्याच्या पोटीं । तो पुरुष सृष्टीं नसेल ॥ ९७ ॥
असल्या ह्या शांतीच्या गोष्टी आपण कधी कानांनी ऐकलेल्यासुद्धा नाहीत, मग डोळ्यांनी कशा पहाणार? अशी शांति ज्याच्या अंतःकरणांत राहील, असा तो पुरुष या साऱ्या पृथ्वींतसुद्धा नसेल ९७.
मागें ऐकिली ना देखिली । ऐशी शांति त्वां कैंची काढिली ।
हे ऐकतां तुझी बोली । भयें दचकली बुद्धि माझी ॥ ९८ ॥
हे कृष्णा ! पूर्वी कधी ऐकिली , नाहीं की पाहिली नाही अशी ही शांति तूं काढलीस तरी कोठून ? हें तुझे भाषण ऐकून माझी बुद्धि तर भयाने अगदी गांगरून गेली आहे ९८.
ऐशी शांति ज्यासी आहे । तो मागें झाला ना पुढें होये ।
देवो बोलिला निजनिर्वाहें । तें दुःसह होये आम्हांसी ॥ ९९ ॥
अशी शांति ज्याला लाभली आहे, असा मागे कोणी झाला नाही व पुढे कोणी व्हावयाचाही नाही. देवांनी जो निग्रह सांगितला तो आम्हांला साधणे परम दुर्घट आहे ९९.
ज्या सांगीतले द्वंद्वांसी । ते अतिदुःसह योगियांसी ।
केवीं साहवे आम्हांसी । तेंचि देवासी पूसत ॥ ७०० ॥
ज्या द्वंद्वाचे वर्णन तूं सांगितलेंस, तें द्वंद्व योग्यालासुद्धा सहन होणे कठीण. मग आम्हांला कसे सहन होईल ? तेंच देवाला विचारीत आहे ७००.
उद्धव उवाच-
यथैवमनुबुध्येयं वद नो वदतां वर ।
सुधुःसहमिमं मन्ये आत्मन्यसदतिक्रमम् ॥ ५९ ॥
विदषामपि विश्वात्मन् प्रकृतिर्हि बलीयसी ।
ऋते त्वद्धर्मनिरताशान्तांस्ते चरणालयान् ॥ ६० ॥
इति श्रीमद्भा्गवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां एकादशस्कन्धे द्वाविंशोऽध्यायः ॥ २२ ॥
[ श्लोक ५९-६०] उद्धव म्हणाला भगवन ! हे ज्ञान देण्यात आपणच कुशल आहात दुर्जनांची अशी कृत्ये मला मुळीच सहन होत नाहीत म्हणून मला अशा रीतीने हे सांगा की, जेणेकरून मी हे आचरणात आणू शकेन. (५९)
हे विश्वात्मन ! जे आपल्या चरणांना शरण आलेले असून भागवत धर्माच्या आचरणात कायम मग्न असतात, अशा शांतचित्त लोकांशिवाय अन्य कोणाही विद्वानांनासुद्धा स्वभाव बदलता येत नाही. (६०)
जे सांगों जाणती वेदशास्त्रार्था । ते वक्ते म्हणिपती तत्त्वतां ।
त्या वक्त्यांमाजीं तुझी श्रेष्ठता । मुख्य वेदांचा वक्ता तूं होसी ॥ १ ॥
जे लोक वेदशास्त्राचा अर्थ पूर्णपणे जाणून घेऊन सांगू शकतात, त्यांनाच खरोखर वक्ते असें म्हणतात. त्या वक्त्यांमध्ये तूं श्रेष्ठ आहेस. कारण वेदांचा मुख्य वक्ता असा तूंच आहेस १.
शास्त्रें लाहोनि तुझी युक्ती । तुझी तुज प्रतिपादिती ।
ते परोक्षवादें थोंटावती । श्रुति ‘नेति नेति’ परतल्या ॥ २ ॥
शास्त्रे ही तुझीच युक्ति घेऊन तुझेच वर्णन करतात, पण परोक्षवादाने तीही कुंठित होतात. वेद तर ते नव्हे, ते नव्हे ‘ असें म्हणून मागे सरतात २.
त्या तुझे मुखींच्या ज्ञानोक्ती । कृपेनें ऐकोनि कृपामूर्ती ।
श्रवणाचें भाग्य वानूं किती । जे ऐकती ते धन्य ॥ ३ ॥
त्या तुझ्याच तोंडच्या ज्ञानाच्या उक्ति, हे कृपामूर्ते ! तुझ्याच कृपेनें ऐकावयाला मिळतात, तेव्हां या माझ्या कानाचे भाग्य काय वर्णन करावें? जे ऐकतात ते धन्य होत ३.
ऐसऐशिया अतियुक्तीं । उद्धवें प्रार्थिला श्रीपती ।
हात जोडूनि परम प्रीतीं । म्हणे विनंती अवधारीं ॥ ४ ॥
अशा प्रकारच्या अनेक युक्तींनी उद्धवाने श्रीकृष्णाची प्रार्थना केली आणि अत्यंत प्रेमाने हात जोडून म्हणाला की, माझी विनंति ऐक ४.
स्वामी बोलती अतिअगाध । हें बोलणें परम शुद्ध ।
माझे बुद्धीसी नव्हे बोध । पराचे अपराध कोण साहे ॥ ५ ॥
देवांनी भाषण केले ते फार खोल आहे. हें भाषण अत्यंत पवित्र आहे. पण माझ्या अंत:करणांत त्याचा बोध होत नाही. कारण, दुसऱ्याचे अपराध सहन करणार कोण? ५.
सोसावे पराचे अपराध । तेंही कठिणत्वें अतिविरुद्ध ।
हा दुःसह महाबोध । कैसेनी द्वंद्व सहावे ॥ ६ ॥
दुसऱ्याचे अपराध सहन करावयाचें तें कर्म महाकठीण असून मानवी स्वभावाच्या अगदी विरुद्ध आहे. तेव्हा हा महान् उपदेश आचरणांत आणणे अत्यंत कठीण आहे. कारण द्वंद्व कोणत्या उपायाने सहन करितां येईल ? ६.
उत्तमें केलिया अपराधा । कोटींमाजीं साहे एकादा ।
परी नीचाची विरुद्ध बाधा । कोणीही कदा न साहे ॥ ७ ॥
एकाचा मोठ्या मनुष्याने कधी काळी अपराध केला, तर कोट्यवधि मनुष्यातून एकादा तरी कोणी तो अपराध सहन करील. परंतु एकाचा हलकट मनुष्याने केलेला छळ कोणीही कधीं सहन करणार नाही ७.
ज्याचें न व्हावें दर्शन । ज्यासी करूं नये नमन ।
त्याचे मस्तकीं वाजतां चरण । साहेल कोण गोविंदा ॥ ८ ॥
ज्याचें कीं तोंडसुद्धा पाहूं नये, ज्याला कधी नमस्कार करणेही उचित नव्हे, त्याने जर डोक्यावर लाथा मारल्या, तर श्रीकृष्णा! त्या कोण बरें सहन करील? ८.
ज्याचा निःशेष जाय प्राण । तोचि साहे हें कठिण ।
जो होय सचेतन । त्यासी सर्वथा जाण न साहवे ॥ ९ ॥
ज्याच्या शरीरातून प्राण पूर्णपणे निघून गेलेला असेल तोच हा असा अपमान सहन करील. परंतु जो जिवंत आहे त्याला हे कधीच सहन व्हावयाचे नाही ९.
इतरांची कायसी कथा । सज्ञान जे कां तत्त्वतां ।
तेही अतिक्रमू न साहती अल्पतां । मा अपमानता कोण साहे ॥ ७१० ॥
इतरांची गोष्ट कशाला? परंतु खरोखर जे ज्ञानी असतात ते देखील स्वतांची आज्ञा कोणी थोडीशी मोडली तरी तेही सहन करीत नाहीत, मग अपमान सहन करणार कोण ? १०.
क्रोध जाहला कपिलामहामुनीसी । तेणें भस्म केलें सगरांसी ।
नारदें कुबेरपुत्रांसी । वृक्षत्वासी आणिलें ॥ ११ ॥
कपिल महामुनीलाही क्रोध आला होता, म्हणून त्याने सगरांना शाप देऊन त्यांचे भस्म करून सोडले. नारदांनी कुबेराच्या मुलाला शापून वृक्ष करून सोडले ११.
दुर्वासाची सांगतां गोठी । त्याची कथा आहे मोठी ।
कोप आला शृंगीचे पोटीं । मेल्या सर्पासाठीं शापिलें ॥ १२ ॥
दुर्वासाची गोष्ट सांगावयाला गेले तर त्याची ती हकीकत कितीतरी मोठी आहे. शृंगी ऋषीच्या अंत:करणांत कोप आला आणि पित्याच्या गळ्यात मृतसर्प घालणान्या परीक्षितीला त्याने शाप दिला १२.
मुख्यत्वें शांति सनकादिकांसी । द्वारीं आडकाठी केली त्यांसी ।
वैकुंठीं क्षोभूनि आवेशीं । जयविजयांसी शापिलें ॥ १३ ॥
सनकादिकांच्या ठिकाणी मुख्यतः शांति असावयाची. पण तेही वैकुंठास गेले असता त्यांस आंत जाण्यास जयविजयांनी आडकाठी केली, म्हणून रागाच्या भरात त्यांनी जयविजयांना शाप दिला १३.
सज्ञानाची ऐशी स्थिती । मा इतरांची कोण गणती ।
परापराधसहनशांती । दुर्लभ त्रिजगतीं गोविंदा ॥ १४ ॥
ज्ञानसंपन्न लोकांची ही स्थिति, मग त्यांच्यापुढे इतरांचा पाद काय ? गोविंदा ! दुसऱ्याचे अपराध सहन करण्याइतकी शांति त्रिभुवनांतही दुर्लभ आहे १४.
प्रकृति निजगुणीं सबळ । ते अल्पें क्षोभवीं तत्काळ ।
साधु सज्जन केवळ । करी विकळ अशांती ॥ १५ ॥
प्रकृति ही आपल्या गुणांनी प्रबळ झालेली आहे. ती थोड्याशा कारणाने देखील गुणांना तत्काळ धुन्ध करिते. निखालस साधु व सज्जन असतात, त्यांनाही हा क्रोध विकल करून सोडतो १५,
ज्यासी तुझी पूर्ण भक्ति घडे । ज्यासी तुझी पूर्ण कृपा जोडे ।
जो तुझे चरणीं अखंड जडे हे शांती ॥ १६ ॥
ज्याला तुझीच परिपूर्ण भक्ति घडते, ज्याला तुझ्याच पूर्ण कृपेचा लाभ होतो, तुझ्या चरणाच्या ठिकाणी जो अखंड लीन होतो, त्यालाच असली शांति प्राप्त होते १६.
तूं विश्वात्मा त्रिजगतीं । चोरी न चले तुजप्रती ।
मज हीं द्वंद्वें न साहवती । तूंही श्रीपती जाणसी ॥ १७ ॥
तूं तर त्रिभुवनामध्ये विश्वात्मा आहेस. तुझ्यापुढे काही चोरी चालावयाची नाही. मी आपले खरेच सांगतों की, हा दुजाभाव किंवा द्वंद्वे मला सहन करता येणार नाहीत. श्रीकृष्णा ! हे तूही जाणतोसच १७.
परम पावन निजशांती । अतिनिंद्य ते अशांती ।
ऐसें व्याख्यान जे ज्ञाते करिती । तेही न साहती द्वंद्वांतें ॥ १८ ॥
शांति ही अत्यंत पवित्र आहे, क्रोध हा अत्यंत निंद्य आहे, असे प्रतिपादन शहाणे लोक करीत असतात पण त्यांनासुद्धा द्वंद्व खपत नाहींत १८.
द्वंद्वें दुःसह सर्वार्थीं । तेथें माझा पाड किती ।
एवं द्वंद्वसहिष्णुतेची युक्ती । मज कृपामूर्ती सांगावी ॥ १९ ॥
ही सर्वस्वी दुःसहच आहेत. तेथे माझी ती कथा काय ? याकरितां हे कृपामूर्ते ! द्वद्वे सहन करता येण्याचा उपाय मला सांगावा १९.
सकल साधनें वश्य होती । परी हे सहिष्णुता न ये चित्तीं ।
ते मी लाभें निजशांती । ऐशी कृपा निश्चितीं करावी ॥ ७२० ॥
दुसरी कोणतीही साधनें असली तरी ती साध्य करावयास येतील, पण ही सहिष्णुता मात्र मनांत भरत नाही. याकरितां तशा प्रकारचीच शांति मला प्राप्त होईल अशी कृपा खरोखर करावी २०.
मी शांतीचें लाभें कल्याण । ऐशी कृपा करावी परिपूर्ण ।
म्हणोनि धरिले श्रीचरण । उद्धवें आपण निजभावें ॥ २१ ॥
मला शांतीच्या योगानें प्राप्त होणाऱ्या कल्याणाचा लाभ होईल अशी कृपा पूर्णपणे करावी. असे म्हणून उद्धवाने स्वतः भक्तिभावाने श्रीकृष्णाचे चरण धरिले २१.
ऐकोनि उद्धवाची विनंती । संतोषला कृपामूर्ती ।
जेवीं चातकाचिया तृषार्ती । गर्जोनि त्रिजगती निववी मेघ ॥ २२ ॥
ही उद्ध्वाची विनंति ऐकून कृपामूर्ति श्रीकृष्णाला मोठा संतोष झाला, आणि चातकाच्या तृषेसाठी मेघ जशी गर्जना करून त्रिभुवनाला पर्जन्यवृष्टीने तृप्त करितो २२,
तेवीं भक्तवचनासरिसा । उल्हासला कृष्ण कैसा ।
उद्धवाचिया निजमानसा । शांतीचा ठसा घालील ॥ २३ ॥
त्याप्रमाणे भक्ताची विनंती ऐकल्याबरोबर आनंदित झालेला श्रीकृष्ण उद्धवाच्या अंत:करणावर शांतीचा ठसा कसा उमटवील २३.
उद्धवप्रश्नाचें प्रत्युत्तर । उदार सुंदर गुणगंभीर ।
उघडोनि शांतीचें भांडार । स्वयें शार्ङ्गधर सांगेल ॥ २४ ॥
उदार, सुंदर व गुणगंभीर असा शार्ङ्गधर आतां शांतीचे भांडार खुले करून स्वतः उद्धवाच्या प्रश्नाचे उत्तर देईल २४.
नवल सांगती ते ठेव । युक्तिचातुर्यवैभव ।
निजशांतीस पडे खेंव । ऐसें अपूर्व सांगेल ॥ २५ ॥
श्रीकृष्णाची सांगण्याची ती पद्धति आश्चर्यकारक असेल. युक्ति व चातुर्य यांचे जणूं काय ते वैभवच. जेणेकरून शांतीला मिठीच पडेल अशी अपूर्व युक्ति तो सांगेल २५.
श्रीकृष्णमुखींच्या ज्ञानोक्ती । ऐकतां स्वयंभ प्रकटॆ शांती ।
ते ऐकावया उद्धव चित्तीं । जाहला निश्चितीं सावध ॥ २६ ॥
श्रीकृष्णाच्या मुखांतील ज्ञानपूर्ण शब्द ऐकून शांति ही स्वत:च मूर्तिमंत प्रगट होते. तेव्हां असलं भाषण ऐकावयाला उद्धवही खरोखर मनामध्ये सावध होऊन बसला २६.
जेवीं गजग्रहणाविखीं पंचानन । साटोप धरी आपण ।
तेवीं शांति साधावया जाण । सावधान उद्धव ॥ २७ ॥
ज्याप्रमाणे हत्तीला धरण्याविषयी सिंह आपण होऊन टपून बसतो, त्याप्रमाणे शांतीचा लाभ घेण्यासाठी उद्धवही सावध होऊन बसला २७.
जळीं तळपतांचि मासा । कवडा झेलूनि ने आकाशा ।
तेवीं शांतीचिया आमिषा । उद्धव तैसा तळपत ॥ २८ ॥
पाण्यामध्ये मासा चकाकला, की बहिरी ससाणा त्याला आकाशांत नेतो, त्याप्रमाणे शांतीच्या आमिषाने उद्धवही तसाच टपून राहिला २८.
तें भिक्षुगीतनिरूपण । पुढिले अध्यायीं श्रीकृष्ण ।
निजशांति बाणे संपूर्ण । तेंचि लक्षण सांगेल ॥ २९ ॥
तेच ‘भिक्षुगीता’चे निरूपण श्रीकृष्ण पुढल्या अध्यायामध्ये करील, आणि ज्याच्या योगानें अंतःकरणांत परिपूर्ण शांति बिंबते तेंच लक्षण सांगेल २९.
ज्यांसी परमार्थाची चाड । तिंहीं सांडूनि साधनकवाड ।
शांतिसाधनीं श्रद्धा वाड । अतिदृढ राखावी ॥ ७३० ॥
ज्यांना परमार्थांची इच्छा असेल, त्यांनी इतर साधनांची द्वारे सोडून देऊन या शांतिसाधनावरच दृढतर मोठी श्रद्धा ठेवावी ७३०.
श्रीकृष्ण सांगेल शांति पूर्ण । उद्धव तया अर्थीं सावधान ।
एका विनवी जनार्दन । श्रोतां अवधान मज द्यावें ॥ ७३१ ॥
आतां श्रीकृष्ण शांतीचे सविस्तर विवेचन करील, म्हणून त्यासाठी उद्धवही लक्ष लावून बसेल. याकरिता जनार्दनरूपी एकनाथही श्रोत्यांना विनंती करतात की, आपणही मजकडे लक्ष द्यावें ७३१.
इति श्रीभागवते महापुराणे एकादशस्कंधे
श्रीकृष्णोद्धवसंवादे एकाकारटीकायां द्वाविंशोऽध्यायः ॥ २२ ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥ ६० ॥ ओव्या ॥ ७३० ॥