एकनाथी भागवत – अध्याय ०३

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥
ॐ नमो जी श्रीगुरुराया । म्हणोनि सद्‌भावें लागें पायां ।
तंव मीपण गेलें वायां । घे‍ऊनियां तूं पणा ॥ १ ॥
सार्थ श्रीएकनाथी भागवत – अध्याय तिसरा : ‘हे सद्‌गुरुराया ! तुला नमस्कार असो.’ असें म्हणून जो तुझ्या पायां पडावे तों ‘तूंपणा घेऊन मीपणा’ व्यर्थ जातो. १

नवल पायांचे कठिणपण । वज्रें न तुटे लिंगदेह जाण ।
त्याचेंही केलें चूर्ण । अवलीळा चरण लागतां ॥ २ ॥
सद्‌गुरु चरणांचा कठिणपणा विलक्षण आहे. जें सूक्ष्म शरीर वज्रानेही तुटत नाहीं, त्याचेंही तूं आपल्या चरणस्पर्शाने सहज लीलेने चूर्ण करतोस. २

पायीं लागतांचि बळी । तो त्वां घातला पाताळीं ।
पायीं लवणासुरा रवंदळी । अतुर्बळी निर्दाळितां । ३ ॥
बळीला तुझा पाय लागतांच त्याला तूं पाताळांत घातलेस. अति बलिष्ठ अशा लवणासुराचाही तूं नुसत्या पायाने संहार केलास. ३

पाय अतिशयेंसीं तिख । काळियासी लागतां देख ।
त्याच्ं शोषोनियां विख । केला निर्विख निःशेष ॥ ४ ॥
तुझे पाय अतिशय तीक्ष्ण आहेत. ते कालिया सर्पाला लागतांच त्याचें सर्व विष शोधून घेऊन तूं त्याला पूर्णपणे विषरहित केलेस. ४

पाय अतिशय दारुण । शकटासी लागतां जाण ।
त्याचें तुटलें गुणबंधन । गमनागमन खुंटलें ॥ ५ ॥
शकट या नांवाचा कंसाचा एक अनुचर होता. त्यानें श्रीकृष्णाला मारण्यासाठीं शकट म्ह० गाडीचे रूप घेतलें होतें. परंतु त्याला श्रीकृष्णाचा चरणस्पर्श होतांच त्याचें सर्व भवबंधन तुटले व जन्म-मरणातून सुटून तो मुक्त झाला. (भागवत स्कंध १०. अ. १२ यांत ही कथा आहे.) ५

पायांचा धाक सबळां । पायें उद्धरिली अहल्या शिळा ।
पाय नृगें देखतां डोळां । थित्या मुकला संसारा ॥ ६ ॥
मोठ्या समर्थांनाही तुझ्या पायांचा धाक आहे. रामावतारीं गौतमाच्या शापाने शिळा होऊन पडलेल्या अहिल्येला तुझा पाय लागतांच तिचा उद्धार झाला. नृग नावाच्या राजाने एकदा पुष्कळ गोप्रदानें दिली. त्यांतील एका ब्राह्मणास दान केलेली गाय चुकून राजाच्या गायींच्या कळपात शिरली. राजाला ही गोष्ट कळली नव्हती, त्यामुळें त्यानें ती गाय दुसऱ्या एका ब्राह्मणाला दान दिली. तेव्हा पहिल्याने दान घेणाऱ्या ब्राह्मणानें क्रोधाने त्या राजाला ‘तू सरडा होशील’ असा शाप दिला. तो राजा सरडा होऊन पडला असतां श्रीकृष्णाच्या चरणस्पर्शाने मुक्त झाला. (ही कथा महाभारत अनु० अ० ७० यांत आहे.) ६

आवडी पाय चिंतिती दास । त्यांच्या मनुष्यधर्मा होय नाश ।
पायें यमलोक पाडिला वोस । पायें जीवास जीवघात ॥ ७ ॥
जे तुझे भक्त मोठ्या प्रेमाने तुझ्या पायाचे चिंतन करतात, त्यांच्या जन्म-मरणांचा नाश होतो. तुझ्या पायांनी यमपुरी ओसाड करून टाकली. कारण तुझे पाय जीवाचे जीवपणच नाहींसे करतात. ७

पायवणी शिरीं धरिलें शिवें । तो जगातें घेतु उठिला जीवें ।
त्यासी राख लाविली जीवेंभावें । शेखीं नागवा भंवे श्मशानीं ॥ ८ ॥
तुझ्या चरणाचे तीर्थ म्ह० भागीरथी शंकराने मस्तकावर धारण करतांच तो सृष्टीचा प्राण घ्यावयास उठला. पण तुझ्या पायांनी मोठ्या प्रेमाने त्याला राख फासली. तेव्हां तो दिगंबर होऊन स्मशानांत हिंडू लागला. ८

ऐसें पायांचें करणें । शिवासी उरो नेदी शिवपणें ।
मा जीवांसी कैंचें जीवें जिणें । हें मानितें मानणें उरों नेदी ॥ ९ ॥
असा तुझ्या चरणांचा प्रताप आहे. तो शंकराचे शिवत्व जर राहू देत नाहीं, तर मग जीवाचे जीवत्व कसें राहू देईल ? मानणे व मानणारे हे दोन्ही उरत नाहींत, ९

ऐसा जाणोनियां भावो । एका एकपणीं ठेला ठावो ।
तेथेंही पायांचा नवलावो । केला एकपणा वावो वंदनमात्रें ॥ १० ॥
असा भाव जाणून एकनाथ एकत्वाने राहिला आहे. पण तेथेंही तुझ्या पायांनी चमत्कार केला. त्या पायांना वंदन करितांच त्याचें एकत्वही नाहीसे झालें. १०

तेथें कवणें कवणासी वानणें । कवणें कवणासी विनविणें ।
कवणें कवणासी देणें घेणें । मीतूंचें जिणें जीवें केलें ॥ ११ ॥
तेव्हां कोण कोणाची स्तुति करावी ! आणि कोणी कोणाला विनवावें ! कोण कोणाला देणार व घेणार ! कारण ‘मी तू’ यांचें जिणे जीवासह निघून गेले, ११

तेव्हां देव आणि भक्तु । जाहलासी मा तूंचि तूं ।
तेथें मीपणाची मातु । कोणें कोणांतु मिरवावी ॥ १२ ॥
तेव्हां मग देव आणि भक्त दोन्ही तूंच झालास. तेथें ‘मीपणाचा’ डौल कोणी कोणापुढे मिरवावयाचा ! १२

ऐशिया पदीं वा‍ऊनि तत्त्वतां । करवितोसी ग्रंथकथा ।
तेव्हां माझेनि नांवें कवि कर्ता । तूंचि वस्तुतां सद्‍गुरुराया ॥ १३ ॥
अशा पदाला पोचवून तू ही ग्रंथकथा माझ्या नांवानें करवीत आहेस, पण हे सद्‌गुरुराया ! वास्तविक तूंच कवी व कर्ता आहेस ! १३

माझें नामरूप आघवें एक । तेंही जनार्दनु झाला देख ।
ऐसें एकपणाचें कौतुक । आत्यंतिक श्रीजनार्दना ॥ १४ ॥
माझें नांव व रूप सर्व एक जनार्दन झालें आहे. असें श्रीजनार्दनस्वामींच्या ऐक्याचे कौतुक मोठे विलक्षण आहे. १४

तेणें कौतुकेंचि आतां । माझेनि नांवें कवि कर्ता ।
हो‍ऊनि स्वयें रची ग्रंथा । यथार्थता निजबोधें ॥ १५ ॥
त्या कौतुकानेच ते स्वत: कवी व ग्रंथकर्ता होऊन आतां आपल्या लीलेने यथार्थ आत्मज्ञानाने युक्त असा ग्रंथ माझ्या नावे रचीत आहेत. १५

तेथें द्वितीयाध्यायाचे अंतीं । दूस्तर माया उत्तम-भक्तीं ।
निरसोनियां भजनस्थिती । भगवत्प्राप्ती पावले ॥ १६ ॥
दुसऱ्या अध्यायाच्या शेवटीं उत्तम भक्तांनी दुस्तर मायेचे उलघन करून भजनाच्या योगाने भगवत्‌प्राप्ती करून घेतली, १६

कैशी दुस्तर हरीची माया । पुसावया सादरता झाली राया ।
अत्यादरेंकरोनियां । म्हणे मुनिवर्या अवधारीं ॥ १७ ॥
असें वर्णिले. ‘ती हरीची माया दुस्तर कशी !’ हें विचारण्यासाठी परीक्षितीराजा फार उत्सुक झाला व मोठ्या आदराने म्हणाला कीं, हे मुनिवर्या ! ऐक. १७.

श्रीराजोवाच –
परस्य विष्णोरीशस्य मायिनामपि मोहिनीम् ।
मायां वेदितुमिच्छामो भगवन्तो ब्रुवन्तु नः ॥ १ ॥
दुसऱ्या अध्यायांत ( श्लोक ४८) ‘हें सर्व जगात विष्णूची माया आहे, असें पहाणारा’ इत्यादि म्हटले आहे यास्तव राजा आता त्या मायेविषयीच प्रश्न करीत आहे –
राजा उवाच – राजा म्हणाला, भगवन्तः परस्य विष्णोः ईशस्य – अहो पूज्य मुनीहो, सर्व श्रेष्ठ, व्यापक ईश्वराच्या – मायिनां अपि मोहिनीं मायां – मायाव्यांनाही मोह पाडणाऱ्या मायेला – वेदितुं इच्छाम नः ब्रुवन्तु – आम्ही जाणण्याची इच्छा करतो, आम्हांला सागा. [ मोठमोठ्या मायाव्यांनाही मोह पाडणाऱ्या परमात्म्याच्या मायेला जाणण्याची मला इच्छा आहे, यास्तव आपण मला ती सांगा. ] १.

तृतीयाध्यायीं निरूपण । राजा करील चारी प्रश्न ।
माया आणि तिचें तरण । ब्रह्म तें कोण – कर्म तें कैसें ॥ १८ ॥
तेथें प्रथम मायेचा प्रश्न । रायें पुशिला आपण ।
तेचि अर्थींचें निरूपण । मायेचें लक्षण राजा बोले ॥ १९ ॥
या तृतीय अध्यायामध्ये राजाने माया, तिचे उलंघन, ब्रह्मा व कर्म यांविषयी चार प्रश्न केले आहेत. त्यानें प्रथम मायेविषयीं प्रश्न केला. १८-१९

सुरांमाजीं श्रेष्ठ हृषीकेशी । ब्रह्मादि शिवु वंदिती ज्यासी ।
त्या श्रीविष्णूची माया कैसी । जे मायिकांसी व्यामोही ॥ २० ॥
सर्व देवांमध्ये हृषीकेश श्रेष्ठ आहे. ब्रह्मदेवादि देव व शंकरही त्याला वंदन करतात. त्याची मायाव्यांनाही मोह पाडणारी माया कशी आहे, २०

कैशी मायिकां माया मोही येथें । ब्रह्मा शिवु मानिती चितें ।
आम्ही पूर्ण मायेचे नियंते । शेखीं माया मयांतें निजमोहें मोही ॥ २१ ॥
ती मोठमोठ्या मायाव्यांनाही मोह कशी पाडते म्हणून विचाराल, तर सांगतो. ब्रह्मा, शिव इत्यादि मोठमोठेही ‘आम्ही मायेचे नियंते आहो’ असें आपल्या मनांत समजतात. पण ती त्यांनाही मोहित करते. २१

ब्रह्मा मोहिला शिवाचे लग्नीं । वीर्य द्रवे पार्वती देखोनी ।
महादेवो महाज्ञानी । देखतांचि मोहिनी निजवीर्य द्रवलें ॥ २२ ॥
ब्रह्मा, महादेव इत्यादि महाज्ञानी सुद्धा मायावश होऊन पार्वती, मोहिनी, इत्यादि स्त्रियांना पहाताच कसे गडबडले तें पुराणांतरी प्रसिद्ध आहेच. २२

जे सज्ञाना छळी लवलाह्या । जीतें श्रुति म्हणती ‘अजया’ ।
ते हरीची दुर्धर माया । विवंचूनियां मज सांगा ॥ २३ ॥
यास्तव जी माया ज्ञानी पुरुषांनासुद्धा हां हां म्हणतां ठकविते, जिला श्रुति अजा म्हणते, ती हरीची माया दुर्धर आहे. आपण मला तिचे विवेचन करून सांगा. २३

म्हणाल दुर्धर मायेचि बाधकता । ते बाधूं न शके अनन्य भक्तां ।
तुवांही भजावें भगवंता । मिथ्या मायेची कथा कां पुसशी ॥ २४ ॥
तुम्ही म्हणाल कीं मायेची बाधकता जरी दुर्धर आहे तरी ती अनन्य भक्तांना कांहीं करूं शकत नाहीं. यास्तव तूही भगवंताचे भजन कर, मिथ्यामायेची वार्ता कशाला विचारितोस ! २४

तेचि अर्थींचें निरूपण । राजा साक्षेपेंसीं आपण ।
मुनींचें ऐकावया गुह्य ज्ञान । विदग्ध प्रश्न आदरें पुसतु ॥ २५ ॥
या प्रश्नाचें उत्तर राजा पुढील श्लोकामध्ये देणार आहे. मुनीचे गुह्यज्ञान ऐकण्यासाठीं तो चतुर राजा आदराने हे प्रश्न करीत आहे. २५

नानुतृप्ये जुषन्युष्मद् वचो हरिकथामृतम् ।
संसारतापनिस्तप्तो मर्त्यस्तत्तापभेषजम् ॥ २ ॥
अरेपण, राजा, वर सांगितलेल्या लक्षणांनी युक्त असा भागवत बनून तूं कृतार्थ हो. अनेक प्रश्न विचारण्यांत काय अर्थ आहे ! असें ते मुनि म्हणतील म्हणून राजा म्हणतो –
संसारतापनिस्तप्तः मर्त्य: अहं – संसारतापांनी अत्यंत संतप्त झालेला मी मानव, – तत् तापभेषजम् हरिकथामृतं – त्या तापाचें औषध असें, हरिकथामृत, – युष्मत् वचः जुषन् न तृप्यते – तुमचे वचन सेवन करणारा तृप्त होत नाहीं. [ संसारसंतापांनीं संतप्त झालेला हा मानव – जनकराजा त्या तापाची शांति करणारे जणुं काय औषधच असें हरिकथामृतरूप तुमचें वचन ऐकत असतांना तृप्त होत नाही, त्यामुळें असें प्रश्न करीत आहे. ] २.

सेवितां तुमचें वचनामृत । पुरें न म्हणे माझें चित्त ।
आस्वादितां शब्दीं शब्दार्थ । श्रवण क्षुधार्त अधिक जाहले ॥ २६ ॥
पण, अहो महाराज, तुमचे हें वचनामृत सेवन करीत असतांना माझें चित्त ‘पुरे’ असें म्हणत नाहीं. कान शब्दांतील शब्दार्थाचा स्वाद घेत असतांना अधिकच क्षुधार्त झाले आहेत. २६

अद्‌भुत कथा अतिसुरस । श्रवणीं श्रवणा अधिक सोस ।
रसना म्हणे हा अतिगोड रस । डोळ्यां उल्हास हें अपूर्व रूप ॥ २७ ॥
आपली अतिसुरस अदृमुत कथा ऐकण्याविषयी कानांचा सोस फारच वाढला आहे. रसना म्हणते हा फार गोड रस आहे. डोळ्यांना हें अपूर्व रूप आहे असें वाटतें. २७

घ्राण म्हणे हा निजगंधु । सुमनीं सुमना अतिसुगंधु ।
वाचा म्हणे हा शब्दु । परमानंदु अनुवादे ॥ २८ ॥
घ्राण म्हणते हा स्वाभाविक गंध आहे. पुष्पादिकांतील गंध यापासूनच उत्पन होतो. वाचा म्हणते हा शब्द परमानंदाचाच अनुवाद करतो. २८

नवल निरूपणाचा यावा । भुजां स्फुरण ये द्यावया खेवा ।
आलिंगन जीवींच्या जीवा । निजसद्‌भावा होतसे ॥ २९ ॥
आपल्या निरूपणांतील मोहिनी विचित्र आहे. हात याला आलिंगिण्यास तयार होतात व जीव सद्भावाने स्वरूपांत तन्मय होतो. २९

तुमच्या कथा सुनिश्चितीं । दिव्यौषधि भवरोग छेदिती ।
त्रिविध तापांची निवृत्ती । जड मूढ प्राकृतीं ऐकता भावें ॥ ३० ॥
खरोखर तुमच्या कथा या दिव्य औषधी आहेत. त्या संसाररोगाचा उच्छेद करतात. जड, मूढ, व प्राकृत लोकसुद्धा जर त्या कथा श्रद्धेने ऐकतील तर त्यांच्याही त्रिविध तापांची निवृत्ति होईल. ३०

राजा परमार्थें साकांक्ष । देखोनि सार्थक कथेंचे लक्ष ।
हरीधाकुटा अंतरिक्ष । निरूपणीं दक्ष बोलता झाला ॥ ३१ ॥
राजा परमार्थाचा अत्यंत लोभी आहे व त्याच्या प्रश्नांची उत्तरे दिल्यास आपल्या कथनाचे सार्थक होईल, असें जाणून निरूपणामध्ये दक्ष असलेला हरीचा धाकटा भाऊ अंतरिक्ष असें बोलला. ३१.

श्रीअन्तरीक्ष उवाच –
एभिर्भूतानि भूतात्मा महाभूतैर्महाभुज ।
ससर्जोच्चावचान्याद्यः स्वमात्रात्मप्रसिद्धये ॥ ३ ॥
मायेचे स्वरूपतः निरूपण संभवत नसल्यामुळें सृष्ट्यादि कार्यांच्या द्वारा तिचे निरूपण करण्यासाठीं अंतरिक्ष या नांवाचा क्रषभपुत्र म्हणाला –
महाभुज – हे आजानुबाहो ! – स्वमात्रात्मप्रसिद्धये – आपली उपासना करणार्‍या जीवांना उत्तम सिद्धि प्राप्त व्हावी याकरिता – भूतात्मा – सर्वांचा कारणभूत असा – आद्यः – आदिपुरुष – एभिः महाभूतैः – पंचमहाभूतांच्या योगे – उच्चावचानि भूतानि ससर्ज – लहानमोठी शरीरे उत्पन्न करता झाला. ॥ ३ ॥ [ ज्या सक्तीने भूतांचा आत्मा होऊन उत्पन्न केलेल्या या आकाशादि पंचमहाभूतांनी उच्च-नीच भौतिक शरीरे उत्पन्न करिता झाला ती भगवानाची माया होय, असा सोळाव्या श्लोकातील ‘एषा माया भगवत:’ या चरणाशी पुढील सर्व श्लोकांचा संबंध आहे. त्यांनीं तीं प्रणिशरीरें कशासाठी उत्पन्न वेलीं ? ‘स्वमात्रात्मप्रसिद्धये’ जो स्वतःची उपासना करतो तो स्वमाता, त्या आत्म्याच्या म्ह. जीवाच्या अत्यंत सिद्धी- साठी त्यानें प्राणिशरीरें उत्पन्न केली किंवा स्वांशभूत जे जीव, त्यांच्या मात्राप्रसिद्धीसाठी म्ह० विषयभोगासाठी व आत्म प्रसिद्धीसाठी म्हणजे मोक्षासाठी त्यानें भूतांना उत्पन्न केलें. कासा वेदस्तुतीमध्यें पूर्वी तसें सांगितलें आहे. ] ३.

अंतरिक्ष म्हणे राया । तुवां पुशिली हरीची माया ।
तो प्रश्नचि गेला वायां । बोलणें न ये आया बोलक्याचे ॥ ३२ ॥
अंतरिक्ष म्हणतो हे राजा, तूं हरीची माया विचारलीस, पण तुझा तो प्रश्न फुकट गेला. कारण ही माया मोठ्या वक्त्याच्याही भाषणाच्या आटोक्यात येत नाहीं. ३२

वंध्यापुत्राचा जन्मकाल । रायें आणविला तत्काल ।
राशिनक्षत्र-जाति-कुल । सांगों जातां विकल वाचा होय ॥ ३३ ॥
वंध्यापुत्राचा जन्मकाल आणवून त्यावरून त्याची रास, नक्षत्र, कुल, जाति हें सर्व वर्तवूं लागल्यास त्या ज्योतिषाची योग्यता जशी फुकट जाते तसाच या राजाने हा प्रसंग आणला आहे. ३३

मृगजळाची पव्हे बरवी । गंधर्वनगरीं घालावी ।
वारा वळूनि सूत्रस्वभावीं । वाती लावावी खद्योततेजें ॥ ३४ ॥
गंधर्वनगरामध्ये – आकाशांत भासणाऱ्या नगराकार आकृतीत जशी मृगजलाची सुंदर पाणपोयी घालावी, वार्‍याचे सूत काढून त्याची वात करून ती काजव्याच्या ज्योतिवर लावावी, ३४

निजच्छायेचें शिर फोडा । आकाशाची त्वचा काढा ।
शिंपीं आंधारु खरवडा । बागुलाचा रांडवडा निजशस्त्रें कीजे ॥ ३५ ॥
आपल्या छायेचे शीर तोडावे, आकाशाची त्वचा काढावी, शिंपीने अंधाराला खरवडून काढावे, बागुलबुवाला आपल्या हातांतील शस्त्राने मारून त्याच्या स्त्रियांना विधवा करावे, तसाच हा मायेविषयी प्रश्न आहे. ३५

वांझेचे सुने पुत्र झाला । तेथ भीष्मस्त्रियेसी पान्हा आला ।
तेणें पयःपानें तो मातला । घरभंगु केला दिगंबराचा ॥ ३६ ॥
वांझेच्या सुनेला पुत्र झाला, त्याला पाहून भीष्माच्या स्त्रीला पान्हा आला, तिचे दूध पिऊन तो मत्त झाला आणि त्यानें संन्याशाच्या घराचा भंग केला. ३६

जातीं लहान दळावा वारा । अश्वशृंगें आकाश चिरा ।
नपुंसकाचीं नातोंडें घरा । सूर्योदयीं अंधारा लपों आलीं ॥ ३७ ॥
वाऱ्याला जात्यांत घालून बारीक दळावें, घोड्याच्या शिंगाने आकाशाला भोंसकावे, नपुंसकाच्या नातवंडानी सूर्योदय झाल्यावर सूर्याच्या घरांतील अंधारांत लपावयास यावें, ३७

गुंजेचे निजतेजें दिवी । हनुमंतलग्नीं लावावी ।
या सोहळियालागीं विकावी । वोसगांवीं निजच्छाया ॥ ३८ ॥
हनुमानाच्या लग्नांत गुंजेच्या दिव्यांनी घरभर प्रकाश पाडावा, त्या सोहळ्यासाठी ओसाड गावात आपली छाया विकावी, ३८

आकाशाचिं सुमनें । सुवासें कीं वासहीनें ।
हें विवंचिती जे देखणे । ते मायेचें सांगणें सांगोत सुखें ॥ ३९ ॥
किंवा आकाशपुष्पे सुवासिक आहेत किंवा गंधरहित आहेत याचा विचार करावा इत्यादि गोष्टी जे ज्ञाते पुरुष करूं शकतात, ते मायेचे वर्णन खुशाल करोत. ३९

एवं मायेचें जें बोलणें । तें सांगतांचि लाजिरवाणें ।
नुपजत्याचें श्राद्ध करणें । तैशी सांगणें महामाया ॥ ४० ॥
याप्रमाणे मायेविषयी बोलणे वक्त्याला लाजिरवाणे आहे. ते जन्मास न आलेल्या पुरुषाचे श्राद्ध करण्यासारखे आहे. ४०

माया म्हणवी येणें भावें । जे मी कदा विद्यमान नव्हें ।
यालागीं अविद्या येणें नांवें । वेदानुभवें गर्जती शास्त्रें ॥ ४१ ॥
माया म्हणजे जी केव्हाही विद्यमान नाहीं ती. म्हणूनच शास्त्रे वेदानुभवानें तिला अविद्या म्हणतात. ४१

भ्रम तो मायेचें निजमूळ । भ्रांति हेंचि फूल सोज्ज्वळ ।
भुली तें इचें साजुक फळ । विषय रसाळ सदा फळित ॥ ४२ ॥
भ्रम हेंच मायेचे मूळ, भ्रांति हेंच तिचे उज्ज्वल फूल व भूल हेंच तिचे स्वादिष्ट फल. ती विषयरूप रसाळ फळें नेहमी प्रसवते. ४२

हे नसतेनि रूपें रूपा आली । सत्यासत्यें गरोदर जाहली ।
तेथें असत्याचीं पिलीं । स्वयें व्याली असंख्य ॥ ४३ ॥
ही माया नसत्या रूपाने रूपाला आली, सत्य आणि असत्य यांनी गरोदर झाली, व स्वतः असत्याची असंख्य पिले व्याली. ४३

वासनाविषयगुणीं । गुंफिली मिरवे वेणी ।
मीपणाच्या तरुणपणीं । मदनमोहिनी चमके ॥ ४४ ॥
विषयगुणांनी गुंफलेली वासनावेणी ती मिरविते व मीपणाच्या तरुणपणी तीं मदनमोहिनी चमकू लागते. ४४

मृगजळींच्या मुक्ताफळीं । मस्तकीं बाणली जाळी ।
गगनाच्या चांपेकळीं । मिरवे वेल्हाळी अतिसौंदर्यें ॥ ४५ ॥
मृगजळांत झालेल्या मुक्ताफळांचीं-मोत्यांची जाळी मस्तकावर धारण करून आकाशांत झालेल्या चांफ्याच्या कळ्यांनीं ती सुंदरी अतिशय सौंदर्यानें मिरवते. ४५

रज्जुसर्पमाथ्याचा मणी । काढूनि ले‍इली ते लेणीं ।
शुक्तिकारजत-पैंजणीं । चाले रुणझुणी खळखळत ॥ ४६ ॥
रज्जू सर्पाच्या मस्तकांतील मणी काढून त्याचे अलंकार लेवून शिंपीवर भासलेल्या रुप्याचे पैंजण घालून छुम छुम अवाज करीत, ४६

शशाविषाणपादुका । ले‍ऊनि ते चाले देखा ।
तिसी तो अहंकरु सखा । अतिनेटका ज्येष्ठपुत्र ॥ ४७ ॥
सशाच्या शिंगाच्या पादुका पायांत घालून ती चालते. तिला अहंकार हा अतिशय प्रिय व फार सुंदर ज्येष्ठ पुत्र झाला. ४७

कुळविस्तारालागीं पाहीं । ममता व्याली ठायीं ठायीं ।
मोहो उपजवूनि देहीं । घरजांवई त्या केला ॥ ४८ ॥
कुलविस्तारासाठीं ती ठिकठिकाणीं ममतलो व्याली. मोहाला आपल्याच ठिकाणी उपजवून तिने त्याला घरजावई केले. ४८

अहंमोहममतायोगें । जग विस्तारले अंगें ।
स्थूळ सबळ प्रयोगें । ममता निजअंगें वाढवी ॥ ४९ ॥
अहंता आणि ममता याच्यां योगानेंजगत् स्वतःच विस्तार पावलें. ममतेने त्याला आपल्या सबलप्रयोगानें स्वत: वाढविले. ४९

संकल्पविकल्पांचीं कांकणें । बाणोनि मन दिधलें आंदणें ।
घालोनि त्रिगुणाचें ठाणें । माया पूर्णपणें थोरावें ॥ ५० ॥
संकल्पविकल्पांचीं कंकणें बांधून मन त्या ममतेला आंदण दिले आणि त्रिगुणांचें ठाणे बसवून माया पूर्णपणे वृद्धि पावली. ५०

ऐशी मिथ्या मूळमाया । वाढली दिसे राया ।
ते कैसेनि ये आया । सांगावया अनिरूप्य ॥ ५१ ॥
हे राया, अशी ही मिथ्या मूळमाया वाढलेली दिसते. ती अनिरूप्य आहे. तेव्हां तिचे वर्णन कसें करतां येईल ! ५१

संत म्हणों तरी ते नासे । असंत म्हणों तरी आभासे ।
आधीं असे पाठीं नासे । ऐसीही नसे निजांगें ॥ ५२ ॥
ती सत् म्ह० स्वरी आहे असें म्हणावे तर नाहीशी होते. असत् म्ह० मिथ्या म्हणावी तर भासते, आधीं असते व मागून नाहीशी होते, असेही तिचे निश्चित स्वरूप नाहीं. ५२

जैसें मृगजळाचें ज्ञान । दिसे तरी तें मिथ्या पूर्ण ।
तैसें आभासे भवभान । ते माया जाण नृपनाथा ॥ ५३ ॥
मृगजळाचे ज्ञान जरी झालें तरी तें मृगजल पूर्णपणे मिथ्याच. त्याच न्यायाने हें संसाराचे भान होतें, पण ती माया आहे असें तूं जाण. ५३

श्रुतिशास्त्रां मायामाग । पुसतां आरोगिती मूग ।
मायेसी साचाचें अंग । पाहतां चांग दिसेना ॥ ५४ ॥
मायेमध्ये सत्वाचा नुसता लेश तरी असेल म्हणून म्हणावे तर तोही नीटसा दिसत नाहीं. ५४

मृगजळाची महानदी । कोण गिरिवर उद्‌बोधी ।
हें सांगावया नाकळे बुद्धी । तेवीं मायासिद्धी अनिर्वाच्य ॥ ५५ ॥
मृगजलाची महानदी कोणत्या पर्वतांतून उगम पावली हें बुद्धि सांगू शकत नाहीं. तशीच मायेची सिद्धि अनिर्वाच्य आहे. ५५

आरसां काय प्रतिबिंब असे । जो पाहे तोचि आभासे ।
तेवीं आपुलेनि संकल्पवशें । माया उल्हासे नसतीचि ॥ ५६ ॥
आरसा स्वतः कांही प्रतिबिंब थोडाच आहे ! पण पहाणाराला त्यांत स्वतःचेंच प्रतिबिंब दिसते. तशीच नसलेली माया आपल्या संकल्पाने विकास पावते. ५६

रज्जुसर्प जीत धरिला । त्याचें कौतुक पाहों चला ।
ऐसे बोलती जे बोला । ते मायेचा सोहळा सांगोत सुखें ॥ ५७ ॥
‘अहो, आम्ही रज्जु-सर्पाला जिवंत धरले आहे, त्याची गंमत पहावयास चला’असें जे बिचारे म्हणतात ते मायेचा सोहाळा खुशाल सांगोत. ५७

उडवों जातां आपुली छाया । सर्वथा न उडवे ज्याची तया ।
तेवीं तरतां दुस्तर माया । जाण राया निश्चितीं ॥ ५८ ॥
आपल्या छायेला उडवू लागलें असतां ती ज्याची त्याला कधीच उडवून लावितां येत नाहीं, त्याचप्रमाणें या दुस्तर मायेचेंही कोणालाच उल्लंघन करतां येत नाहीं. ५८

अग्निसंकल्पु सूर्यीं नसे । शेखीं सूर्यकांतींही न दिसे ।
तळीं धरिलेनि कापुसें । अग्नि प्रकाशे तद्योगे ॥ ५९ ॥
आपण अग्नीला उत्पन्न करावे, असा सूर्य कांहीं संकल्प करीत नाहीं. सूर्यकांतांतही अग्नि दिसत नाहीं, पण खालीं कापूस धरला असतां अग्नि व्यक्त होतो. ५९

तेवीं शुद्ध ब्रह्मीं संकल्पु नाहीं । शेखीं न दिसे केवळ देहीं ।
माझारीं वासनेच्या ठायीं । देहाभिमानें पाहीं संसारु भासे ॥ ६० ॥
तसेंच शुद्ध ब्रह्मामध्ये संकल्प नाहीं, शेवटीं केवल देहामध्येही तो नाहीं. पण त्यांतील वासनेमध्यें देहाभिमानानें संसार भासतो. ६०

जागृतिदेहाचा विसरु पडे । सवेंचि स्वप्नदेह दुजें जोडे ।
तेणें मिथ्या प्रपंच वाढे । स्वप्नीं स्वप्न कुडें कदा न मने ॥ ६१ ॥
जागृतींतील देहाचा विसर पडतो. लगेच दुसरा स्वप्नदेह मिळतो, त्यामुळें मिथ्या प्रपंच वाढतो. स्वप्नांत स्वप्न खोटे आहे, असें स्वप्नद्रष्टा केव्हांही मानीत नाहीं. ६१

सुषुप्ती देहाचा असंभवो । तेथ नाहीं भवभावो ।
जन्ममरण तेंही वावो । संसारसंभवो देहाभिमानें ॥ ६२ ॥
सुषुप्तींत तर देहाचा असंभवच आहे. त्या अवस्थेंत संसाराचे नांवही नाहीं. जन्म आणि मरण हेही खोटेच आहे. देहाभिमानानें संसार संभवतो. ६२

तेवीं आत्मतत्त्वाचा विसरू । तेणें मी देह हा अहंकारू ।
तेणें अहंकारें संसारू । अतिदुस्तरू थोरावे ॥ ६३ ॥
आत्मत्वाचा विसर पडला म्हणजे ‘मी देह’ हा अहंकार उद्भवतो व त्यामुळें दुस्तर संसार वृद्धि पावतो. ६३

जेवीं मृगजळीं मिथ्या मासे । तेवीं ब्रह्मीं प्रपंचु नसे ।
तो निरसावया कैसें । साधनपिसें पिशाचा ॥ ६४ ॥
मृगजलात जसे मिथ्या मासे असतात, तसाच ब्रह्मामध्यें हा प्रपंच आहे. तेव्हा त्या प्रपंचाचे निरसन करण्यासाठीं पिशाचाप्रमाणें असलेल्या या जीवाला साधनाचे वेड कसें लागणार ! ६४

दोनीच अक्षरें माया । जंव गेलों सांगावया ।
तंव श्लोकार्थ दुरी ठेला राया । वाढला वायां ग्रंथु सैरा ॥ ६५ ॥
हे राजा, मायेची दोनच अक्षरे, पण तीं जेव्हां सांगावयास लागलो तेव्हां हा श्लोकाचा अर्थ तसाच राहिला व ग्रंथ भलतीकडेच वाढत गेला. ६५

माया पाहों जातां हर्षें । सज्ञानही झाले पिसे ।
नांवारूपांचिये भडसें । कल्पनावशें माया वाढे ॥ ६६ ॥
मायेला पाहूं लागलें असतां सज्ञानही वेडे झाले. नामरूपांच्या भरानें कल्पनावशात माया वाढते. ६६

मायेचें मुख्य लक्षण । राया तुज मी सांगेन खूण ।
आपली कल्पना संपूर्ण । ते माया जाण नृपवर्या ॥ ६७ ॥
हे राजा, मी तुला मायेचे मुख्य लक्षण ओळखण्याची खूण सांगतो. आपली सर्व कल्पना ही मायाच आहे, असें तूं समज. ६७

निजहृदयीची निजआशा । तेचि माया गा मुख्य क्षितीशा ।
जो सर्वथा नित्य निराशा । तों पूज्य जगदीशा पूर्णत्वें ॥ ६८ ॥
आपल्या मनांतील जी आशा तीच मुख्य माया आणि जो सर्वप्रकारे सदा निरिच्छ असतो तोच जगदीशाला पूर्णपणे पूज्य होतो. ६८

आतां कांहीं एक तुझ्या प्रश्नीं । माया सांगों उपलक्षणीं ।
सर्गस्थित्यंतकारिणी । त्रिविधगुणीं विभागे ॥ ६९ ॥
आता ज्याअर्थी तूं प्रश्नच केला आहेस, त्याअर्थी उपलक्षणांनीं मी तुला सांगतो उत्पत्ति, स्थिति व संहार करणारी ही माया तीन गुणांनी विभाग पावते. ६९

जेवीं सूर्यासी संकल्पु नसे । तरी नसतां त्याच्या ठायीं दिसे ।
जेव्हां कां निजकिरणवशें । अग्नि प्रकाशे सूर्यकांतीं ॥ ७० ॥
ज्याप्रमाणें सूर्याला संकल्प नसतो, पण तो नसतांनाही त्याच्या ठिकाणीं दिसतो. कारण त्याच्या किरणांमुळे सूर्यकांत-मण्यातून अग्नि प्रकट होतो. ७०

तेवीं शुद्धस्वरूपीं पाहीं । संकल्पमात्र कांहीं नाहीं ।
नसतचि दिसे ते ठायीं । ते जाण विदेही मूळमाया ॥ ७१ ॥
त्याप्रमाणें शुद्धस्वरूपामध्यें संकल्प म्हणून कांहीं नाहीं, पण तो नसतांनाही प्रतीतीला येतो, हीच मूळ माया होय. ७१

स्वरूप निर्विकल्प पूर्ण । तेथ मी म्हणावया म्हणतें कोण ।
ऐसेही ठायीं स्फुरे मीपण । ते मुख्यत्वें जाण मूळमाया ॥ ७२ ॥
आत्मरूप सर्वथा निर्विकल्प आहे. त्यात ‘मी’असें म्हणावयास दुसरें आहे कोण ! पण अशाही ठिकाणीं मींपण स्फुरते. मूळ माया मुख्यत्वेकरून हीच आहे. ७२

तया मीपणाच्या पोटीं । म्हणे मजचि म्यां पहावें दिठीं ।
मजसीं म्यां सांगाव्या गोठी । अत्यादरें भेटी माझी मज हो‍आवी ॥ ७३ ॥
त्या मीपणामुळे मींच आपल्याला आपल्या दृष्टीने पहावे, मींच माझ्याशी गोष्टी सांगाव्या, मोठ्या आदराने माझीच मला भेट व्हावी, ७३

मज माझी अतिप्रीती । माझी मज हो‍आवी रती ।
माझ्याचि म्यां घे‍ऊनि युक्ती । मज माझी प्राप्ति मद्‍बोधें व्हावी ॥ ७४ ॥
माझी मजवर फार प्रीति आहे, माझी माझ्या ठिकाणींच अत्यंत रति असावी, माझ्याच युक्तीने मीं माझें ग्रहण करून माझ्याच बोधाने माझी मला प्राप्ति व्हावी, ७४

म्हणे मज मियां आलिंगावें । मज मियांचि संभोगावें ।
मज मियांचि संयोगावें । नियोगावें स्वामिसेवकत्वें सर्वदा ॥ ७५ ॥
मीं मलाच आलिंगावे, मीं मलाच भोगावे, मींच माझ्याशी संयुक्त व्हावें. स्वामी आणि सेवक या नात्याने मींच मला सर्वदा कार्यांत योजावें, ७५

ऐकें आजानुबाहो नृपनाथा । ऐसें आठवलें भगवंता ।
तो आठवो जाला स्रजिता । महाभूतां भौतिकां ॥ ७६ ॥
असें भगवंताला आठवले ती आठवणच सृष्टीकर्ता झाला. महाभूतें, सर्व भौतिक शरीरे, ७६

चारी वर्ण चारी खाणी । चारी युगें चारी वाणी ।
चारी पुरुषार्थ चहूं लक्षणीं । मुक्तीची मांडणी मांडली चतुर्धा ॥ ७७ ॥
चार वर्ण, जरायुजादि चार जाति, चार युगें, परा, पश्यन्ति, मध्यमा व वैखरी या चार वाणी; धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ; सलोकता, समीपता, सरूपता व सायुज्यता या चार मुक्ति; अशी चार प्रकारे ७७

उभारूनि तिन्ही गुण । आठवो रची त्रिभुवन ।
तेणें मांडूनि त्रिपुटीविंदान । कर्मही संपूर्ण त्रिधा केलें ॥ ७८ ॥
तीन गुणांची उभारणी करून ती आठवणच त्रिभुवन रचते. त्यानें त्रिपुटींची रचना करून कर्मांचेही विहित, निषिद्ध व अकर्म असे तीन भाग केले. ७८

एवं एकपणीं बहुपण । रूपा आणी मूळींची आठवण ।
परी बहुपणीं एकपण । अखंडत्वें पूर्ण तें कदा न भंगे ७९ ॥
याप्रमाणें ती मूळची आठवण एकत्वामध्यें अनेकत्वाला व्यक्त करते. तरीपण त्या अनेकत्वांतील एकत्वच अखंड असतें. त्याचा केव्हाही भंग होत नाहीं. ७९

जीं जीं कुंभार भांडीं करी । आकाश सहजेंचि त्यांभीतरीं
तेवीं महाभूतें भौतिकाकारीं । समन्वयें हरि सर्वदा सर्वीं ॥ ८० ॥
कुंभार जें जें भांडे करतो, त्यांत आकाश सहजच असतें, त्याप्रमाणें महाभूते व भौतिक शरीर या सर्वांमध्यें हरि अखंड एकरूप असतो. ८०

राया जाण येचि अर्थीं । बोलिलें उपनिषदांप्रती ।
एकाकी न रमते या श्रुती । द्वैताची स्फुर्ति भगवंतीं स्फुरली ॥ ८१ ॥
यासाठींच हे राजा, उपनिषदांमध्यें ‘म्हणून ब्रह्मा एकाकी रममाण होत नाहीं. त्याच्या ठिकाणी द्वैताची स्मृति झाली’ असें सांगितलें आहे; ८१

किंबहुना एकपणें समस्तें । रूपा आलीं महाभूतें ।
तींचि हरीची माया येथें । जाण निश्चितें नृपनाथा ॥ ८२ ॥
किंबहुना एकत्वाने समस्त महाभूतेस्वरूपाला प्राप्त झाली. हीच हरीची माया आहे, असें तूं निश्चयानें जाण. ८२

भूत-भौतिक स्फुरे जे स्फूर्ती । ते प्रकाशूं न शके माया स्वशक्तीं ।
मायाप्रकाशकु चिन्मूर्ती । अखंडत्वें भूताकृतीं प्रवेशला भासे ॥ ८३ ॥
पण मायेपासून जी भूतभौतीक कार्ये झाली, त्यांना माया चैतन्यप्रकाशयुक्त करूं शकत नाहीं. म्हणून मायेचा प्रकाशक जो चिन्मूर्ति परमात्मा तो भूताकृतींत अखंडत्वानें प्रवेश केलेला भासतो. ८३

मुख्य मायेचें निजलक्षण । प्रकाशी परमात्मा चिद्‍घन ।
तोचि भूतीं भूतात्मा आपण । प्रवेशलेपण नसोनि दावी ॥ ८४ ॥
चिद्‌घन परमात्मा जिला प्रकाशित करतो ती माया, हें मायेचे मुख्य लक्षण आहे. तोच स्वतः भूतांतील भूतात्मा आहे. वस्तुतः तो भूतांत प्रविष्ट झालेला नसूनही मी यांत प्रविष्ट झालो आहें असें दाखवितो. ८४

एवं सृष्टानि भूतानि प्रविष्टः पञ्चधातुभिः ।
एकधा दशधात्मानं विभजन्जुषते गुणान् ॥ ४ ॥
एवं पंचधातुभिः – याप्रकारे पंचमहाभूतांच्या योगे – सृष्टानि भूतानि – उत्पन्न केलेल्या भूतांत – प्रविष्टः – अंतर्यामी रूपाने प्रविष्ठ झालेला भगवान् – आत्मानं – आपल्याला – एकधा दशधा – एक व दहा प्रकारे – विभजन् सन् – विभागणारा होऊन् – गुणान् जुषते – विषयांचे सेवन करतो. ॥ ४ ॥ [ याप्रमाणे जीवांवर उपकार करण्यासाठी आकाशादि पंचमहाभूतांनी उत्पन्न केलेल्या भौतिक शरीरांत अंतर्यामीरूपानें प्रविष्ट झालेला तो परमात्मा आपला मन या रूपाने एकधा आणि पांच ज्ञानेंद्रिये व पांच कर्मेंद्रिये या रूपाने दशधा विभाग करून आकाशादि भूतांच्या शब्दादि विषयांचे जीवांकडून सेवन करवितो. किंवा त्या प्रविष्ट झालेल्या आत्म्याला शब्दादि विषयांचा विभाग करून देणारा तो संतुष्ट होतो, असा याचा भावार्थ. ] ४.

ऐशीं स्रजिलीं भूतें महाभूतें । जीं जड मूढ अचेतें ।
त्यांसी वर्तावया व्यापारार्थें । विभागी आपणातें तत्प्रवेशीं ॥ ८५ ॥
याप्रकारे भूते व महाभूते उत्पन्न केलीं. तीं जडमूढ व चेतनारहित असल्यामुळें त्यांच्या सुखदुःखादि अनुभवासाठी तोच उत्पादक परमात्मा त्यांत प्रवेश करून आपलाच विभाग करता झाला. ८५

पंचधा पंचमहाभूतें । तें कार्यक्षम व्हावया येथें ।
पंचधा विभागें श्री‍अनंतें । प्रविशिजे तेथें तें ऐक राया ॥ ८६ ॥
पांच महाभूते व त्यापासून उत्पन्न झालेले पांच भौतिक देह आपआपली कार्य करण्यास समर्थ व्हावी, म्हणून त्यांत पाच प्रकारांनीं विभाग करून श्रीअनंत कसा प्रवेश करतो, तें ऐक. ८६

गंध रूपें पै पृथ्वीतें । प्रवेशोनि श्री‍अनंतें ।
पूर्ण क्षमा आणोनि तीतें । चराचरभूतें वाहवी स्वयें ॥ ८७ ॥
गंधरूपाने पृथ्वीमध्ये प्रवेश करून व तिच्या ठिकाणी पूर्ण क्षमा आणून तिने आपल्या पाठीवर चराचर भूते वहावी असें केलें. ८७

पृथ्वी प्रवेशला भगवंतु । यालागीं ते आवरण-जळांतु ।
उरलीसे न विरतु । जाण निश्चितु मिथिलेशा ॥ ८८ ॥
भगवान पृथ्वीमध्यें प्रविष्ट झाला म्हणूनच पृथ्वी जलांत इतका दीर्घकाल तशीच राहिली आहे, विरून गेली नाहीं. ८८

धरा धरी धराधर । यालागीं विरवूं न शके समुद्र ।
धराधरें पृथ्वी सधर । भूतभार तेणें वाहे ॥ ८९ ॥
पृथ्वीला अनंताने धारण केलें आहे, त्यामुळें समुद्र तिला विरवू शकत नाहीं. अनंतामुळे पृथ्वी दृढ झाली आहे व त्यामुळेंच ती या सर्व भूतांचा भार आपल्या पाठीवर वहाते. ८९

स्वाद रूपें उदकांतें । प्रवेशोनि श्री‍अनंतें ।
द्रवत्वें राहोनियां तेथें । जीवनें भूतें जीववी सदा ॥ ९० ॥
भगवान रसरूपानें उदकांत प्रवेश करून व द्रवरूपानें त्यांत राहून त्या जीवनसंज्ञक जलाने सर्व भूतांना सर्वदा जिववितो. ९०

जीवनी प्रवेशे जगज्जिवन । याकारणें आवरण तेंचि जाण ।
न शोषितां उरे जीवन । हें लाघव पूर्ण हरीचें ॥ ९१ ॥
त्या जीवनांत जगज्जीवन प्रवेश करीत असल्यामुळेंच तेंच त्यांचें आवरण आहे, असें तूं समज. त्यामुळेंच जलतत्त्व सर्वथा सुकून जात नाहीं, तर जगाच्या आरंभापासून अंतापर्यंत तसेंच रहाते. खरोखर हें हरीचे माहात्म्य आहे. ९१

तेजाचे ठायीं रूप । प्रवेशला हरि सद्‌रूप ।
यालागीं नयनीं तेज अमूप । जठरीं देदीप्य जठराग्नि जाहला ॥ ९२ ॥
सद्‌रूप हरि तेजामध्ये रूप होऊन प्राण्यांच्या नेत्रांत विपुल तेज व उदरांत प्रदीप्त जठराग्नि झाला. ९२

रूपयोगें लवलाहीं । हरि प्रवेशे तेजाच्या ठायीं ।
तें आवरण-वायूमाजीं पाहीं । न मावळे कांहीं यालागीं राया ॥ ९३ ॥
हरि रूपाच्या योगाने तेजामध्ये प्रवेश करतो, तेंच वायूंतील तेजाचे आवरण आहे. त्यामुळें तेज कधीं मावळत नाहीं. ९३

वायूमाजीं स्पर्श योगें । प्रवेशु कीजे श्रीरंगें ।
यालागीं प्राणयोगें । वर्तती अंगें अनेक जीव ॥ ९४ ॥
भगवातू वायूमध्यें स्पर्शगुणानें प्रवेश करतो. म्हणून अनेक जीव प्राणबलानें सशरीर वावरतात. ९४

वायूच्या ठायीं हृषीकेश । स्पर्शरूपें करी प्रवेश ।
यालागीं वायूचा ग्रास । सर्वथा आकाश करूं न शके ॥ ९५ ॥
याप्रमाणे हृषीकेशाने वायूमध्यें स्पर्शगुणानें प्रवेश केल्यामुळें आकाश वायूचा सर्वथा ग्रास करूं शकत नाहीं. ९५

शब्द गुणें हृषीकेश । आकाशीं करी प्रवेश ।
यालागीं भूतांसी अवकाश । सावकाश वर्तावया ॥ ९६ ॥
हृषीकेश आकाशांत शब्दगुणानें प्रवेश करतो, म्हणून सर्व भूतांना यथेष्ट संचार करावयास अवकाश मिळतो. ९६

शब्दगुणें गगनीं । प्रवेशला चक्रपाणी ।
यालागीं तें निजकरणीं । लीन हो‍ऊनि जा‍ऊं न शके ॥ ९७ ॥
भगवान शब्दगुणानें त्यांत प्रविष्ट झाल्यामुळें आकाश आपल्या कारणांत लीन होऊन जात नाहीं. ९७

महाभूतीं निरंतर । स्वाभाविक नित्य वैर ।
येरांतें ग्रासावया येर । अतितत्पर सर्वदा ॥ ९८ ॥
या महाभूतांचे सतत स्वाभाविक वैर आहे. त्यांतील एक भूत दुसऱ्या भूतास खावयास सर्वदा तत्पर असतें. ९८

जळ विरवूं पाहे पृथ्वीतें । तेज शोषूं पाहे जळातें ।
वायु प्राशूं धांवे तेजातें । आकाश वायूतें गिळूं पाहे ॥ ९९ ॥
जल पृथ्वीला विरवू पहाते, तेज जळाला सुकविण्यास तत्पर असतें. वायु अग्नीला विझवावयास धावतो, आकाश वायूला गिळून टाकण्याच्या विचारांत असतें, ९९

तेथ प्रवेशोनि श्रीधर । त्यांतें करोनियां निर्वैर ।
तेचि येरामाजीं येर । उल्हासें थोर नांदवी ॥ १०० ॥
पण श्रीधर त्यांत प्रवेश करून त्यांना परस्पर निर्वैर करतो आणि त्यांना परस्परांमध्यें मोठ्या उल्हासाने नांदवितो. १००

एवं पंचभूतां साकारता । आकारली भूताकारता ।
तेथें जीवरूपें वर्तविता । जाहला पैं तत्त्वता प्रकृतियोगें ॥ १०१ ॥
याप्रमाणे पंचभूतांना शरीररूपानें साकारता आणली आणि त्यांत जीवरूपानें प्रवेश करून तो भगवानच प्रकृतिवशात् त्यांना वर्तविता झाला. १

त्यासी ब्रह्मांडीं पुरुष हें नांव । पिंडीं त्यातें म्हणती जीव ।
हा मायेचा निजस्वभाव । प्रतिबिंबला देव जीवशिवरूपें ॥ १०२ ॥
त्याला ब्रह्मांडामध्यें पुरुष व शरीरांत जीव हें नांव आहे, हा मायेचा निजस्वभाव आहे. देवच जीव-शिवरूपानें तिच्यामध्यें प्रतिबिंबित झाला. २

शिवीं जे योगमाया विख्याती । जीवीं तीतें अविद्या म्हणती ।
हेचि मायेची मुख्यत्वें भ्रांती । स्वप्नस्थिती संसारू ॥ १०३ ॥
तिला शिवामध्ये योगमाया व जीवामध्ये अविद्या म्हणतात. मुख्यत्वानें मायेची भ्रांति हीच आहे, त्यामुळें संसार स्वप्नासारखा मिथ्या आहे. ३

ज्यातें म्हणती दीर्घस्वप्न । तो हा मायावी संसार संपूर्ण ।
निद्रेमाजीं दिसे जें भान । तें जीवाचें स्वप्न अविद्यायोगें ॥ १०४ ॥
त्याला दीर्घस्वप्न म्हणतात. तोच हा संपूर्ण मिथ्या संसार आहे. झोपेमध्ये जें भान होतें तें अविद्येमुळे जीवाचे स्वप्न आहे, ४

येथ जागा जाहल्या मिथ्या स्वप्न । बोध जाहलिया मिथ्या भवभान ।
हें अवघें मायेचें विंदान । राया तूं जाण निश्चित ॥ १०५ ॥
या स्वप्नांत तें खरें असतें, पण जागे होतांच तें मिथ्या स्वप्न होतें. त्याच न्यायाने आत्मसाक्षात्कार होतांच त्यापूर्वी सत्य असलेला संसार मिथ्या होतो. राजा, हें सर्व मायेचे कार्य आहे, असें तूं निश्चयानें जाण. ५

आतां जीवाची विषयावस्था । विषयरसीं विषयभोक्ता ।
एकधा दशधा विभागता । आ‍ईक नृपनाथा सांगेन ॥ १०६ ॥
आतां मी तुला जीवाची विषयावस्था सांगतो. तो आपलाच एकधा व दशधा विभाग करून विषयभोक्ता कसा होतो, तें मी तुला सांगतो ६

एकधा भागें अंतःकरण । स्वयें झाला जनार्दन ।
मन-बुद्धि-चित्त-अहंस्फुरण । चतुर्धा जाण विभागें ॥ १०७ ॥
स्वत: जनार्दनच एका भागाने अंतःकरण झाला, त्या अंतःकरणाचे मन, बुद्धि, चित्त व अहंकार असे चार भाग आहेत. ७

जीव आपुल्या परिपूर्णता । अहं म्हणे निजात्मता ।
तेथ मायेची अतिलाघवता । देहात्मता दृढ केली ॥ १०८ ॥
जीव आपली परिपूर्णता व स्वाभाविक सत्ता, यांना उद्देशून ‘अहं’ असें म्हणतो. पण ही माया आपल्या चातुर्याने त्या अहंकारामध्येच देहात्मता दृढ करती झाली, ८

अहंकारु वाढवितां देहात्मता । विसरे आपुली चिद्‌रूपता ।
तो विसरू वाढवी विषयचिंता । तेचि चित्त तत्त्वतां महामाया ॥ १०९ ॥
आणि ‘देहच मी’ हा अहंकार तिने वाढविला असतां जीव आपली चिद्‌रूपता विसरतो, तो विसरच विषयचिंता वाढवितो. हे महाराजा, खरोखर विषयचिंतन हेंच चित्त आहे. ९

देहअहंता अतिचपळ । तीतेंच म्हणती मन चंचळ ।
नाना संकल्पविकल्पजाळ । वाढवी प्रबळ भय-शोक-दुःख ॥ ११० ॥
देहाहंकार फार चपळ आहे. त्यालाच चंचल मन म्हणतात. तें अनेक संकल्पविकल्पांचें जाळे पसरतें. त्याच्या योगाने असह्य भय, संताप व दुःख वाढविते ११०

देह अहंतेचे शहाणपण । तिये नांव गा बुद्धि जाण ।
ते बुद्धीनें निश्चय केला पूर्ण । आम्हा जन्ममरण अनिवार ॥ १११ ॥
देहाभिमानाचे जें शहाणपण तीच बुद्धि होय. त्या बुद्धीनें आमचे जन्म-मरण अनिवार्य आहे असा पूर्ण निश्चय केला. ११

एवं देहाभिमानाचे माथां । चित्तचतुष्टय अवस्था ।
मुख्य संसाराचा कर्ता । जाण तत्त्वतां देहाभिमानु ॥ ११२ ॥
याप्रमाणे देहाभिमानाच्या मस्तकावर अंतःकरणचतुष्टयाचा आरोप होतो. म्हणून हे राजा, देहाभिमानच संसाराचा मुख्य कर्ता आहे, असें तूं जाण. १२

अहंकार धरी सोहंपण । तैं चित्तीं प्रगटे चैतन्यघन ।
तेव्हां मनही होय उन्मन । बुद्धीचा निश्चयो पूर्ण परब्रह्मीं ॥ ११३ ॥
पण अहंकार देहाभिमान सोडून ‘सोहं’असा आत्माभिमान धरला असतां चित्तांत चैतन्यघन परमात्मा प्रकट होतो. त्या वेळीं मनही आपलें संकल्पविकल्पात्मक शरीर सोडते. पूर्णपरब्रह्माविषयी बुद्धीचा निश्चय होतो. १३

समूळ मावळल्या अभिमान । कैंची बुद्धि कैंचें मन ।
बुडे चित्तचें चित्तपण । ब्रह्म परिपूर्ण कोंदाटे ॥ ११४ ॥
कारण देहाभिमान समूळ मावळल्यावर कोठची बुद्धि व कोठचें मन ! चित्ताचे चित्तपणही नाहीसे होतें. मग पूर्ण परब्रह्म सर्वत्र प्रतीत होतें. १४

एकधा विभाग अंतःकरण । त्याची उणखूण निजलक्षण ।
राया सांगितलें संपूर्ण । आतां दशधा लक्षण तें ऐक ॥ ११५ ॥
राजा, याप्रमाणे मीं तुला आत्म्याचा एकधा विभाग जें अंतःकरण त्याचें लक्षण सांगितलें. त्यावरून त्याचा तुला प्रत्यय येइल. आता त्याच्या दशधाविभागाचें लक्षण ऐक. १५

दशधा इंद्रियें अचेतन । तयांतें चेतविता नारायण ।
दशधारूपें प्रवेशोन । इंद्रियवर्तन वर्तवी ॥ ११६ ॥
दहा इंद्रिये हाच दशधा विभागआहे. पण तो अचेतन-जड आहे. नारायणच दहा शक्तींच्या रूपाने त्यांत प्रवेश करून त्यांना सचेतन करतो व प्रत्येक इंद्रियाकडून आपलें कार्य करवितो. १६

दृष्टीमाजी झाला देखणें । दृष्य प्रकाशी दृश्यपणें ।
ऐसेनि प्रकाशकपणें । दृश्याभरणें दाखवी ॥ ११७ ॥
तो नेत्रामध्यें दर्शनशक्ति म्ह. रूप पाहाण्याची शक्ति सर्व दृश्याला दृढत्याने प्रकशित करतो. याप्रमाणे प्रकाशाने तो दृश्याचे सौंदर्य दाखवितो. १७

श्रवणीं झाला तो ऐकणें । शब्द प्रकाशी शब्दलक्षणें ।
मग अर्थावबोधकपणें । शब्दविंदानें ऐकवी ॥ ११८ ॥
कानामध्ये तो ऐकण्याची शक्ति होऊन शब्दरूपानें शब्दाला प्रकाशित करतो आणि अर्यज्ञानाच्या रूपाने शब्दसमूहाला ऐकवितो. १८

रसीं रसस्वादु नारायण । रसने तोचि रसस्वादन ।
यापरी नानारससेवन । करवी जनार्दन जनांमाजीं ॥ १९ ॥
नारायण जिव्हेमध्यें रसग्रहणशक्ति होऊन रसनेच्या द्वारा तोच रसाचा आस्वाद घेतो आणि याप्रमाणे जनार्दन जीवाकडून अनेक रसाचे सेवन करवितो. १९

सुमनीं श्रीहरी सुगंध । घ्राणी तोचि जाणे गंधावबोध ।
यापरी सुमनमकरंद । भोगवी गोविंद निजांगयोगें ॥ १२० ॥
तोच नाकातील गंधग्रहणशक्ति होऊन पुष्पातील सुगंध जाणतो. अशाप्रकारें तो गोविंद आपल्या स्वरूपाने जीवाकडून पुष्पांतील सुगंध भोगवितो. १२०

शीत-उष्ण-मृदु-कठिण । स्पर्श प्रकाशिता नारायण ।
त्वचेमाजीं तोचि स्पर्शज्ञ । यपरी जगजीवन भोगवी स्पर्श ॥ १२१ ॥
शीत, उष्ण, मृदु, कठिण इत्यादि स्पर्शांना प्रकट करणाराही नारायणच आहे. तोच सर्व प्राणिशरीरांतील त्वचेमध्ये स्पर्शग्रहणशक्तीरूपानें राहून जीवाकडून स्पर्श भोगवितो. २१

वाचेचा वाचकु कमळापती । तोचि प्रकाशी शब्दपंक्ती ।
नाना शब्दार्थव्युत्पत्ति । वदवी निश्चितीं वाचाळपणें ॥ १२२ ॥
वागिंद्रियाकडून शब्दोच्चार करविणाराही हा कमलापतिच आहे. तोच शब्दसमूहाला प्रकट करतो. त्यांतील मूळ शब्द व प्रत्यय यांचा स्पष्ट उच्चारही खरोखर तोच जीवाकडून वाचाळपणे करवितो. २२

करांच्या ठायीं देती घेती । अकर्तेनि कर्तव्यशक्ती ।
चरणा आचरणें निगुती । गमनस्थिती गोविंदें ॥ १२३ ॥
हातांतील देणे व घेणे या कर्तव्यशक्तीही त्या अकर्त्याच्याच आहेत. पायांचा संचार व स्थिति म्हणजे थांबणे ही शक्तीही गोविंदाचीच आहे. २३

उपस्थसुखाची सुखप्राप्ती । तेणें सुखें सुखावे श्रीपती ।
स्त्रीपुरुषमैथुनव्युत्पत्ती । प्रकाशी अतिप्रीतीं पुरुषोत्तमु ॥ १२४ ॥
उपस्थाच्या द्वारा होणाऱ्या सुखाची प्राप्ति या नारायणामुळेंच होते. त्या सुखानेच तो सुखी होतो. स्त्री-पुरुषसंयोगापासून होणारे सुखभाव हा पुरुषोत्तमच मोठ्या प्रीतीने प्रकट करतो. २४

गुदाचे ठायी जें का क्षरण । तेंही अक्षरें होय जाण ।
यापरी निजात्मा परिपूर्ण । दशधा आपण विभागला देहीं ॥ १२५ ॥
पायुतील मलत्यागसामर्थ्यही हें अक्षरब्रह्मच आहे, असें तूं समज. याप्रमाणे हा परिपूर्ण परमात्मा प्रत्येक प्राणिशरीरांत दहाप्रकारें विभागला आहे. २५

यापरी गा देहयोगें । विलासे विषयसंभोगें ।
भोग्य भोक्ता उभय भागें । प्रकाशूनि अंगें स्वयें भोगी ॥ १२६ ॥
राजा, वर वर्णन केल्याप्रमाणें हा परमात्माच देहसंबंधानें विषयानुभव घेतो. भोक्ता व भोग्य अशा दोन प्रकारच्या विभागाने प्रकट होऊन तो स्वतःच शरीरद्वारां सर्व भोग भोगतो. २६

जेवीं साळईच्या रुखा । साळईचि बीज देखा ।
साळईचि शाखोपशाखा । न विकारितां असका वृक्ष होये ॥ १२७ ॥
ज्याप्रमाणें साळईच्या वृक्षाचे साळईच बीज आहे व साळईच त्याच्या शाखा व उपशाखा आहेत. पण तो जेव्हां विकार न पावतां बीजावस्थेत असतो तेव्हाही तो सर्व वृक्षरूप असतोच. २७

जेवीं कां ऊंस बीजीं पडे । तो बाहेर ऊंसपणेंचि वाढे ।
जरी भिन्न भिन्न कांडें चढे । तरी मागें पुढें रस एकु ॥ २८ ॥
किंवा ज्याप्रमाणें ऊसाचे वाढे जमिनींत लावले जातें व त्यापासून पुढें तें ऊंस या रूपानेच वाढत जातें, त्याची निरनिराळी कांडी जरी वरवर चढू लागतात तरी त्यांत मागें व पुढें सर्वत्र एक रसच असतो, २८

तेवीं विषय आणि करणें । प्रकाशूनि एकपणें ।
मग विषयरस सेवणें । जीवपणें स्वयें सेवी ॥ २९ ॥
त्याप्रमाणें विषय आणि इंद्रिये या दोहोंनाही एकत्वाने प्रकट करून हा परमात्माच मग जीवत्वाने स्वत: विषयरसाचे सेवन करतो. १२९.

गुणैर्गुणान् स भुञ्जान आत्मप्रद्योतितैः प्रभुः ।
मन्यमान इदं सृष्टमात्मानमिह सज्जते ॥ ५ ॥
सः प्रभुः – तो जीव – आत्मप्रद्योतितैः – अंतर्यामी आत्म्याने प्रकाशित केलेल्या – गुणांनी गुणान् भूजानः – इंद्रियांनी विषयांना भोगणारा – इदं सृष्टः – उत्पन्न झालेल्या या शरीराला – आत्मानं मन्यमानः – आत्मा मानणारा – इह सज्जते – शरीरादिकांचे ठिकाणी आसक्त होतो. ॥ ५ ॥ [ आणि तो शरीरांत प्रवेश करून विषयभोग घेणारा जीव अंतर्यामीनें प्रकाशित केलेल्या इंद्रियांनी विषयाचा भोग घेणारा असा होत्साता या उत्पन्न केलेल्या शरीरादिकांना आत्माच समजून त्यात आसक्त होतो. ] ५.

इंद्रिया आणि विषयांसी । सहजें अंतर्यामी प्रकाशी ।
जीव सेवूनि त्या विषयांसी । पावे आसक्तीसी अहंभावें ॥ १३० ॥
अंतर्यामी इंद्रिये व विषय यांना स्वभावतःच प्रकाशित करतो. जीव त्या विषयांचे सेवन करून अहंभावाने आसक्त होतो आणि म्हणतो कीं, १३०

म्हणे हे विषय कैसे गोड । माझ्या देहाचें पुरे कोड ।
तंव इंद्रियांची खवळे चाड । विषय वाड भोगावया ॥ १३१ ॥
हे विषय किती गोड आहेत ! हे माझ्या देहाचे कोड पुरवितात. पण या मिथ्या भावनेमुळे इंद्रियांची विषयभोगाविषयीची प्रीति क्षुब्ध होते. १३१

इंद्रियां विषयांची आसक्ती । देहाभिमानें वाढे वृत्ती ।
मावळोनि मूळींची स्फूर्ती । मोहममतास्थिति दृढ वाढे ॥ १३२ ॥
इंद्रिये विषयासक्त झाली असतां देहाभिमान अतिशय वाढतो. त्यामुळें मूळची आत्मस्फूर्ति पार मावळून जाते. मीच परमात्मा आहें, हें स्वरूपभान तो विसरतो आणि मोह व ममता अतिशय वाढते. १३२

मग मी म्हणे देहातें । देहसंबंधीं जें तें आप्तें ।
विषयांचिये लोलुपते । उसंतु चित्तें असेना ॥ १३३ ॥
नंतर तो देहाला मी असें म्हणतो देहसंबंधी- भार्या- पुत्रांना आप्त मानतो आणि विषयांच्या लोभामुळे त्याच्या चित्ताचे समाधान नाहीसे होतें. ३३

प्रकृतिस्वभावें कर्म जाहलें । तें तें म्हणे म्यां केलें ।
देहअहंतेचें नाथिलें । काविरें चढलें अनिवार ॥ १३४ ॥
प्रकृतीच्या स्वभावानें जें जें कर्म होतें तें मींच केलें असें हा म्हणतो. पण या मिथ्या देहाभिमानाने त्याच्या चित्तांत अनिवार क्षोभ उद्भवतो. ३४

देहअहंता अति‍उद्धट । तेथें मोहममता अतिदुर्घट ।
तेणें जन्ममरणांची वाट । घडघडाट प्रवाहे ॥ १३५ ॥
देहाहंकार अतिशय भयंकर आहे. त्यामुळें होणारा मोह व ममता ही तर फारच अनिवार्य आहेत. त्यामुळें जन्म-मरणाचा प्रवाह अविच्छिन्न वहात राहतो. १३५.

कर्माणि कर्मभिः कुर्वन् सनिमित्तानि देहभृत् ।
तत्तत्कर्मफलं गृह्णन् भ्रमतीह सुखेतरम् ॥ ६ ॥
कर्मभिः समिनित्तानि कर्माणि कुर्वन् – कर्मेंद्रियांनी वासनायुक्त कर्मे करणारा, – तत्त कर्मफलं सुखेतरं गृह्णन् – त्या त्या कर्माचे सुखदुःखात्मक फल ग्रहण करणारा, – अयं देहभृत् – हा देहधारी जीव – इह भ्रमति – या जन्ममरणरूप संसारात भ्रमण पावतो. ॥ ६ ॥ [ कमेंद्रियांनीं वासनासह कर्मे करणारा व पूर्व पुण्यपापकर्माचे सुख-दुःखरूप फल भोगणारा असा हा देहधारी जीव या संसारांत भ्रमण करीत रहातो व त्यांतून मुक्त होत नाही. ] ६.

मनीं धरोनि विषयकाम । कर्मेंद्रियीं करितां कर्म ।
तेथें निपजती धर्माधर्म । बाधक परम पुरुषातें ॥ १३६ ॥
मनांत विषयवासना धरून कमेंद्रियांनीं कर्मे केली असतां तेथें धर्म व अधर्म उत्पन्न होतात, तेच परम पुरुषार्थाला प्रतिबंध करणारे आहेत. ३६

कल्पिला फळभोग घडे । त्यासारिखें देह धरणें पडे ।
देहें देहाची खाणी उघडे । मरणही वाढे तैसेंचि ॥ ३७ ॥
ज्या फलभोगाचा संकल्प करावा त्यासारखा देह धारण करावा लागतो. एका देहाने अनेक देहांच्या जन्माची व मरणाची अनेक निमित्ते उत्पन्न केली जातात. ३७

फळाशा कर्म अतिदारुण । अमरां आणी अमित मरण ।
अजन्म्या अंगीं जन्म पूर्ण । पुनः पुनः जाण आदळती ॥ ३८ ॥
फलाच्या इच्छेने केलेले कर्म फार भयकंर आहे. तें अमरांनाही मरण देते व जन्मरहित आत्म्यालाही पुनः पुनः जन्म घ्यावयास लावते. ३८

एवं स्वर्ग आणि संसारा । जन्ममरणांच्या येरझारा ।
नाना योनि अपारा । निजकर्मद्वारा स्वयें भोगी ॥ ३९ ॥
याप्रमाणे स्वर्ग आणि संसार यांत जन्म-मरणांच्या येरझारा सुरू होतात. आपल्या कर्मामुळे हा स्वतः अनेक अपार योनी भोगतो. ३९

डोळे बांधोनि जुंपिला घाणा । तेलियाचा ढोरु जाणा ।
करकरीतु परिभ्रमणा । अविश्रम जाणा भोंवतसे ॥ १४० ॥
तेल्याच्या घ्राण्याला डोळे बांधून जुंपलेला बैल त्या घ्राण्याभोंवतीं एकसारखा फिरत रहातो. १४०

तेवीं बांधोनि ज्ञानाचे डोळे । भोगूं जातां निजकर्मफळें ।
तंव जन्ममरणांचे सोहळे । भोगी आगळे अनिवार ॥ १४१ ॥
त्याप्रमाणें ज्ञानाचे डोळे बांधून रूपकर्माची फळें भोगू लागलें असतां जीवाला जन्म-मरणाचें असंख्य अनिवार्य सोहाळे भोगावे लागतात. ४१

उदो‍अस्तांचेनि प्रमाणें । जैसें सूर्यासी पडे भंवणें ।
तैशीं हीं जन्ममरणें । अतिदारुणें स्वयें सोशी ॥ १४२ ॥
उदय व अस्त यांच्या योगाने सूर्याला जसे पृथ्वीच्या भोंवतीं नित्य फिरावे लागतें, (असें दिसते) त्याप्रमाणें हा जीवही अति भयंकर जन्म-मरणांची परंपरा स्वतः सोसतो. ४२

शिणशिणों जंव जन्म कंठी । सवेंच मरण ये त्यापाठीं ।
जैसीं जावळी फळें एक देठीं । तैशा जन्ममरणकोटी भोगी स्वयें ॥ १४३ ॥
हा अनेक प्रकारचे शीण करून आपल्या जन्माचा एकेक दिवस जो कंठीत आहे, तोच मरणही तितकेच त्याच्या जवळ जवळ येत जातें. जुळी फळें जशी एकाच डेखाला लागलेली असतात, तशीं एकाच देहाला चिकटून राहिलेली जन्म-मरणे हा स्वतः भोगतो. १४३.

इत्थं कर्मगतीर्गच्छन् बह्वभद्रवहाः पुमान् ।
आभूतसम्प्लवात्सर्ग प्रलयावश्नुतेऽवशः ॥ ७ ॥
तो कितीवेळ भ्रमण करतो तो काळ सांगतात –
इत्थं बहु अभद्रवहाः – अकलाण व ताप देणार्‍या – कर्मगतीः गच्छन् – कर्ममूलक योनीस जाणारा – पुमान् अवशः – जीव परतंत्र, कर्माच्या अधीन झालेला – आभूतसंप्लवात् – भूतांचा, जगाचा प्रलय होईपर्यंत – सर्गप्रलयौ अश्नुते – जन्ममृत्यूचे सेवन करतो. ॥ ७ ॥ ! [ याप्रमाणे अनेक अकल्याणांचा; अनुभव देणाऱ्या कर्मफलांस प्राप्त होणारा पुरुष कर्मपराधीन होऊन प्रलयापर्यंत जन्म मरणपरंपरेंत भ्रमण करीत रहातो. ] ७.

होता पूर्णत्वें जो स्वतंत्र । तो झाला कर्मपरतंत्र ।
नानाकर्मगतिपात्र । दुःखसुखक्षेत्र सदा वाहे ॥ १४४ ॥
जो पूर्वी पूर्णत्वानें स्वतंत्र होता, तोच कर्मपरतंत्र आणि अनेक कर्मगतींना पात्र होऊन सुख व दुःख ही फळे देणाऱ्या क्षेत्रांत सदा राबत रहातो. ४४

मानोनि विषयांचें सुख । देखतदेखतां घेतलें विख ।
त्याचें अगणित असुख । जन्मकोटी दुःख सोशितां न सरे ॥ १४५ ॥
विषयांचे सुख मानून तो विषयभोगरूप विषच जाणुनबुजून प्राशन करतो. त्यापासून उत्पन्न होणार दुःख कोट्यवधि जन्मी जरी सोसले तरी सरत नाहीं. ४५

दुःखावरी दुःखांचे आवर्त । मोहशोकांचे गर्तीं पडत ।
आतियातनेमाजीं बुडत । सदा उकडत काळाग्नीं ॥ १४६ ॥
दुःखावर दुःखे कोसळून त्यांच्या भोवऱ्यात सापडून तो मोह व शोक यांच्या गर्तेत पडतो व अत्यंत यातनेमध्यें बुडतो आणि काळाग्नीमध्यें सर्वदा उकळत असतो. ४६

ऐसे सोशितां दुःख-शोक । पुढें अवचितां एका‍एक ।
महाप्रळयाचा भडका देख । निकट सन्मुख अंगी वाजे ॥ १४७ ॥
याप्रमाणें दुःख-शोक सोशीत असतां पुढें अकस्मात् महाप्रलयाचा भडका उठतो. त्यांतून त्याच्यापुढे भयंकर आवाज निघू लागतो. ४७

तेथें मागें न वचे काढिला पावो । पुढें निघावया नाहीं वावो ।
निजकर्में बांधिला पहा वो । प्रळयाचा घावो मस्तकीं वाजे ॥ १४८ ॥
तेथें मागें पाऊल घेता येत नाहीं व पुढें पाऊल टाकण्यासही अवकाश नसतो. आपल्या कर्मांनी तो बांधला जातो व प्रलयाचा घाव त्याच्या मस्तकावर बसतो. ४८

ऊत्पत्तिस्थितिप्रकरण । तुज सांगितलें संपूर्ण ।
आतां प्रळयाचें लक्षण । सावधान अवधारीं ॥ १४९ ॥
याप्रमाणे उत्पत्ति- स्थितीचें प्रकरण तुला संपूर्ण सांगितलें. आतां प्रलयाचे लक्षण सावधान चित्ताने ऐक. १४९.

धातूपप्लव आसन्ने व्यक्तं द्रव्यगुणात्मकम् ।
अनादिनिधनः कालो ह्यव्यक्तायापकर्षति ॥ ८ ॥
याप्रमाणे मायामयी सृष्टि सांगून आतां लयाचें वर्णन सांगण्यास आरंभ करतो –
धातूपप्लवे आसन्ने सति – पंचमहाभूतांच्या नाशाचे कारण प्राप्त झाले असतां – अनादिनिधनः कालः द्रव्यगुणात्मकं – ज्याला आदि व अंत नाहीत असा काल स्थूल-सूक्ष्मभूतात्मक – व्यक्तं अव्यक्ताय – कार्यरूप जगाला अव्यक्त अशा ईश्वररूपामध्ये घेऊन जाण्याकरता – अपकर्षति ही – आकर्षित करतोच. ॥ ८ ॥ [ आदि- अंतरहित काल पंचमहाभूतांच्या नाशाचे निमित्तप्राप्त झालें असतां द्रव्य म्ह० स्थूल व गुण म्ह० सूक्ष्म एतद्‌रूप कार्याला कारणांत लीन करण्यासाठीं आकर्षण करतो. ] ८.

सूर्योदयेंसीं दिवसस्थिती । लोटल्या अवश्य पावे राती ।
तेवीं झालिया उत्पत्तिस्थिती । प्रळयाची प्राप्ती अवश्य पावे ॥ १५० ॥
सूर्योदय होऊन दिवस संपला म्हणजे रात्र जशी अवश्य येते, तशीच उत्पत्ति व स्थिति झाल्यावर प्रलयाची प्राप्ति अवश्य होते. १५०

एवं पावल्या प्रळयवेळु । खवळे अनादिनिधन काळु ।
तो महाभूतेंसीं भूगोळु । नाशार्थ प्रबळु प्रताप मांडी ॥ १५१ ॥
याप्रमाणे प्रलयकाळ समीप आला म्हणजे आदिअंतरहित काळ खवळतो. तो महाभूतांचा भोक्ता त्यांच्या नाशासाठी मोठा प्रबळ प्रताप आरंभितो. ५१

तेथ जें जें स्थूळाकारें व्यक्त । तें तें करूं लागे अव्यक्त ।
जेवीं पेरिलें पिकोनि शेत । स्वये वाळत उष्णकाळीं ॥ १५२ ॥
सृष्टीमध्यें जें जें कांहीं स्थूल आकाराचे दृश्यजात असतें तें तें सर्व तो अव्यक्त करूं लागतो. ज्याप्रमाणें पेरलेले शेत पिकले म्हणजे तें आपणच उन्हाळ्यांत वाळत जातें, ५२

तृणादि नाना बीजें क्षितीं । स्वभावें वार्षिये विरूढती ।
तेचि शारदीये नानाव्यक्ती । सफळितें होती सुपुष्ट ॥ १५३ ॥
गवत वगैरे अनेक प्रकारची बीजे स्वभावतःच पावसाळ्यांत पृथ्वीवर उगवतात, आणि तींच शरदऋतूंत नाना प्रकारच्या फलपुष्पांनी युक्त व अत्यंत पुष्ट होतात, ५३

तेचि ग्रीष्माच्या अंतीं । फळमूळ मोडोनि व्यक्ती ।
बीजें लीन होती क्षितीं । कैशी काळगती संसारा ॥ १५४ ॥
पण ग्रीष्म ऋतूच्या शेवटीं त्यांच्या झाडांचा व फळांचा मूळचा आकार नाहीसा होऊन तीं पुनः पृथ्वीमध्यें लीन होतात. तशीच संसाराची कालगति आहे. ५४

जेवीं वसंताचे ऐलीकडी । वृक्षांसी होय पानझडी ।
तेवीं ब्रह्मादिकांची परवडी । काळ झोडी निजसत्ता ॥ १५५ ॥
ज्याप्रमाणें वसंतऋतूच्या पूर्वी झाडाची पाने गळू लागतात, त्याचप्रमाणें ब्रह्मादिकांचाही प्रकार आहे. काळ त्यांनाही आपल्या सत्तेने झोडून काढतो. ५५

जेवीं कां वाळलिया शेत । कृषीवळु मळुं लागे समस्त ।
तेवीं व्यक्ताचें अव्यक्त । काळ त्वरित करूं लागे ॥ १५६ ॥
ज्याप्रमाणें शेतकरी वाळलेल्या सर्व शेताची मळणी करूं लागतो, त्याप्रमाणेंच काळ व्यक्त जगताला सत्वर अव्यक्त करूं लागतो. ५६

तेच अव्यक्त करिती स्थिती । राया सांगेन तुजप्रती ।
काळाची क्षोभक शक्ती । प्रळयाचे प्राप्तीपूर्वीं पावे ॥ १५७ ॥
हे राजा, तीच व्यक्तसृष्टीला अव्यक्त करण्याची स्थिति मी तुला सांगेन काळाची क्षोभ करणारी शक्ति प्रलयाच्या पूर्वी प्रकट होते. १५७.

शतवर्षा ह्यनावृष्टिर्भविष्यत्युल्बणा भुवि ।
तत्कालोपचितोष्णार्को लोकांस्त्रीन्प्रतपिष्यति ॥ ९ ॥
नाशाचे हेतु सांगतात –
भुवि शतवर्षा – या पृथ्वीवर शंभर वर्षे – अत्युल्बणा ही – अगदी महाभयंकर – अनावृष्टिः भविष्यति – आवर्षण होईल – तत्कालोपचितोष्णार्क – जांची उष्णता तत्काळ वाढली आहे असा सूर्य – त्रीन् लोकान् प्रतपिष्यति – स्वर्ग, मृत्यु व पाताळ या तिन्ही लोकांना तापवील. ॥ ९ ॥. [ भूलोकीं शंभर वर्षें पाऊस पडणार नाहीं. त्यामुळें सूर्याची उष्णता अतिशय वाढेल व तो त्रैलोक्याला जाळील. ] ९.

काळक्षोभाचिये दृष्टि । शतवर्षें अनावृष्टी ।
तेणें अत्युल्बणें आटे सृष्टी । पृथ्वीच्या पोटीं कांही नुरे ॥ १५८ ॥
काळाची दृष्टि क्षुब्ध होतांच शंभर वर्षे अनावृष्टि होते. त्यामुळेच सर्व सृष्टीचा भयंकर नाश होतो. पृथ्वीवर काडीही उरत नाहीं. ५८

प्राणिमात्र निमाले देख । वनें वाळूनि जाहली राख ।
बिंदुमात्र न मिळे उदक । यापरी लोक आटिले काळे ॥ १५९ ॥
सर्व प्राणिमात्र मरण पावतात. वनें वाळून त्यांची राख होते. थेंबभरही पाणी मिळेनासे होतें. याप्रमाणे काळ सर्व लोकांला आटवितो. ५९

तंव द्वादशादित्यमेळा । मंडळीं झाला एकवेळां ।
तेथींच्या किरणीं प्रबळा । त्रैलोक्य सकळा संतप्त केलें ॥ १६० ॥
त्या वेळीं बारा आदित्यांचा समुदाय एकाच वेळीं नभोमंडळांत प्रकाशू लागतो. त्यांच्या प्रखर किरणांनी सगळे त्रिभुवन संतप्त होतें. १६०

येती उष्णाचिया आह्या । होती पर्वतांच्या लाह्या ।
तेणें धरातळ लवलाह्या । भस्म झालें राया महाउष्णें ॥ १६१ ॥
उष्णतेच्या ज्वाळा भडकू लागतात. त्यामुळें पर्वत लाह्यांसारखे तडातड फुटतात. हे राजा, त्या भयंकर उष्णतेने ही सर्व पृथ्वी भस्म होते. १६१.

पातालतलमारभ्य सङ्कर्षणमुखानलः ।
दहन्नूर्ध्वशिखो विष्वग्वर्धते वायुनेरितः ॥ १० ॥
पातालतलं आरभ्य – पाताळापासून आरंभ करून – जगत् दहन् सन् – जगाला जाळीत – वायुना ईरितः ऊर्ध्वशिखः – वायूच्या प्रेरणेने ज्याच्या ज्वाला वर जातात त्याप्रमाणे – संकर्षणमुखानलः विष्वक् वर्धते – शेषाच्या मुखातील अग्नि चोहोकडे पसरतो. ॥ १० ॥ [ शेषाच्या मुखांपासून निघालेला अग्नि आपल्या उर्ध्वज्वालांनीं पाताळाच्या तळापासून आरंभ करून सर्वांना जाळीत सुटतो आणि वायूच्या साह्यानें तो सर्वत्र पसरतो. ! १०.

उष्णें तापले पृथ्वीतळ । पोळलें शेषफणामंडळ ।
तैं सहस्रमुखें विषानळ । अग्निकल्लोळ वमिता झाला ॥ १६२ ॥
त्या महाउष्णतेनें सर्व पृथ्वी तापून जाते, त्यामुळें सर्व शेषाचे फणामंडळ पोळतें. तें आपल्या हजारों मुखांनीं विषाग्नीच्या ज्वाळांचा भडकाच ओकू लागतें. ६२

पाताळतळींहूनि देखा । ऊर्ध्वमुख अग्निशिखा ।
जाळितचि तिहीं लोकां । उठिला भडका अनिवार ॥ १६३ ॥
पाताळांतून ऊर्ध्वमुख अग्निज्वाळा तिन्ही लोकांना जाळू लागतात. त्यामुळें अनिवार भडका उठतो. ६३

क्षोभें दिधला फूत्कारा । सहस्रमुखें सुटला वारा ।
तो साह्य झाला त्या वैश्वानरा । जाळीत दिगंतरा वाढला वणवा ॥ १६४ ॥
शेष अशा क्षोभामुळे आपल्या सहस्रमुखानें सुस्कारे टाकू लागतो. त्यामुळें भयंकर वारा सुटतो. तो अग्नीला साह्य होतो आणि सर्व दिगंतराला जाळीत वणवाच भडकलेला दिसतो. १६४.

संवर्तको मेघगणो वर्षति स्म शतं समाः ।
धाराभिर्हस्तिहस्ताभिर्लीयते सलिले विराट् ॥ ११ ॥
सांवर्तकः मेघगणः – प्रलय करणारा मेघांचा समुदाय – हस्तिहस्ताभिः धाराभिः – हत्तीच्या सोंडांसारख्या प्रचंड धारांनी – शतं समाः – शंभर वर्षे – वर्षति स्म – वृष्टि करतो. – विराट् सलीले लीयते – ब्रह्मांड त्या पाण्यात लीन होते. ॥ ११ ॥ [ त्यानंतर प्रलयकर्ता मेघसमूह हत्तीच्या सोडेएवढाल्या धारांनी, बिंदूने नव्हे, शंभर वर्षें दृष्टि करतो व त्यामुळें सर्वत्र पाणीच पाणी झालें असतां स्कूल सृष्टि त्यांत लीन होते. ] ११.

स्वर्ग आणि पाताळतळा । कवळूनि उठिल्या अग्निज्वाळा ।
तंव प्रळयकर्त्या मेघमाळा । क्षोभल्या त्या काळा अतिदुर्धरा ॥ १६५ ॥
स्वर्ग आणि पाताळतळ यांना कवटाळून अग्नीच्या ज्वाळा भडकल्या, म्हणजे त्या अति दुर्धर प्रसंगीं प्रलय करणाऱ्या मेघांच्या पंक्ति क्षुब्ध होतात. ६५

म्हणाल तेथ मोठमोठे । वर्षों लागले थेंबुटे ।
तैसें नव्हे गा कडकडाटें । एकी धार सुटे अनिवार ॥ १६६ ॥
आतां तुम्ही म्हणाल कीं मेघ मोठमोठ्या थेंबानी वृष्टि करूं लागत असतील, तर तसें नव्हे बरें. हे राजा, ते प्रलयमेघ भयंकर गर्जना करून एकधारेनें अनिवार्य वृष्टि करीत सुटतात. ६६

इतर पर्जन्याच्या धारा । त्य तैशा नव्हती नृपवरा ।
ऐक प्रमाणाच्या निर्धारा । तो समयो महावीरा अतिदुस्तर ॥ १६७ ॥
इतर सामान्य पर्जन्याच्या धारा जशा असतात तशा त्या नसतात. तर मग त्यांचें प्रमाण काय असतें, म्हणून म्हणशील तर सांगतो. हे महावीरा, तो प्रसंग फार भयंकर आहे. ६७

जैशी कां मदगजाची सोंड । तैशा धारा अतिप्रचंड ।
शत वर्षेंवरी अखण्ड । पर्जन्य वितंड पैं वर्षें ॥ १६८ ॥
जशी मदोन्मत्त हत्तीची सोंड असते तशा धारांनी ते वृष्टि करतात आणि ती शंभर वर्षेपर्यंत एकसारखी अखंड चालते. ६८

विजु निजतेजें नभ जाळी । कडकडाटे दे आरोळी ।
काळाची बैसे दांतखिळी । ऐसा प्रलयकाळीं मेघ खवळे ॥ १६९ ॥
विजा आपल्या तेजाने आकाशाला जाळतात, त्यामुळें भयंकर कडकडाट होऊं लागतात. ते ऐकून काळाचीही दातखिळी बसते. प्रलयकाळीं मेघ इतके खवळतात कीं, ६९

तेणें उलथलें जळ सैंघ । जेथोनि वर्षत होते मेघ ।
त्यांतेंही विरवूनि सांग । जळमय चांग त्रिलोक्य झालें ॥ १७० ॥
त्यामुळें मोठमोठे सर्व जलाशय एकरूप होतात, फार काय, पण जेथून मेघ वर्षाव करीत असतात तेथपर्यंत पाण्याचे पूर वाढून त्या वृष्टि करणाऱ्या मेघांनाही बुडवून वर जातात, त्यामुळें सर्व त्रैलोक्य जलमय होतें. १७०

अनिवार वर्षतां वेग । जेथें मेघांचेंही विरे आंग ।
य नांव सांवर्तक मेघ । अति‍अमोघ वर्षावो ॥ १७१ ॥
अनिवार्य वेगाने वर्षाव करीत असतां ज्यात मेघांचेंही अंग लोपून जातें, त्यालाच सांवर्तक मेघ म्हणतात. ७१

तीर्थ क्षेत्र पवित्रोदक । सरिता समुद्र झाले एक ।
हारपले चंद्रसूर्यादिक । तिनी लोक बुडाले ॥ १७२ ॥
तीर्थे, क्षेत्रे, पवित्र उदक, नद्या, समुद्र इत्यादि सर्व एक होतात. त्या जलपूरांत चंद्र-सूर्यादिक व तिन्ही लोक बुडून जातात. ७२

ऐशिया एकार्णवाचे ठायीं । विराट विराला गा पाहीं ।
साकार उरे ऐसें कांहीं । उरलें माहीं नृपनाथा ॥ १७३ ॥
अशा एकरूप समुद्रांत विराटाचा देहही विरघळतो. सारांश हे राजा ! त्या वेळीं आकारयुक्त असें कांहीं एक उरत नाहीं. १७३.

ततो विराजमुत्सृज्य वैराजः पुरुषो नृप ।
अव्यक्तं विशते सूक्ष्मं निरिन्धन इवानलः ॥ १२ ॥
नृप ! – हे राजा ! – ततः वैराजः पुरुष – त्यानंतर ब्रह्मांडशरीरी विराट पुरुष – विराजं उत्सृज्य – आपल्या ब्रह्मांडरूप शरीराला सोडून – निरिंधनः अग्नि इव – ज्यात काष्टे नाहीत अशा अग्निप्रमाणे – सूक्ष्मं अव्यक्तं विशते – कोणत्याही प्रकारे व्यक्त म्हणजे प्रकट न होणार्‍या सूक्षब्रह्मांत प्रविष्ट होतो. ॥ १२ ॥ [ स्थूल सृष्टि, या उपाधीचा लय झाल्यामुळे तिच्यावर ‘मी’ असा अभिमान ठेवणारा विराट पुरुष आपल्या स्थूल सृष्टिरूप शरीराचा त्याग करून काष्ठरहित अग्नीप्रमाणें आपल्या सूक्ष्मकारणात प्रवेश करतो. ‘अहोपण, प्रळयकाली हिरण्यगर्भासह सर्व ब्रह्मोपासक परमपदांत लीन होतात, इत्यादि अर्थाची ‘ब्रह्मणा सह ते सर्वे’ इत्यादि स्मृति व अधिकारी जीव अधिकार संपेपर्यंत आपल्या अधिकारावर अवस्थित होतात, इत्यादि अर्थाचा ‘यावत् अधिकार’ (ब्र. सू. ३.३.३२) न्याय, यांवरून वैराजसंज्ञक हिरण्यगर्भाचा, तो परम भागवत असल्यामुळें मोक्षच होणें युक्त आहे, इतर जीवांप्रमाणे त्यानें केवल कारणांत प्रवेश करणें युक्त नाहीं’ असें म्हणाल तर तें खरे आहे. पण अश्वमेधादि पुण्यकर्मांनी सत्यलोकी गेलेल्याही अभक्तांची पुनरावृत्ति श्रुत आहे. त्यामुळें हिरण्यगर्भालाही अभक्तत्व असल्यास त्याचाही प्रकृतीतच लय होईल व पुनरुत्पत्तिही होईल, असें मोक्षाचे दुर्लभत्व सुचविण्यासाठी येथें हें सांगितले आहें. त्यामुळें पूर्वोक्त श्रुति व न्याय यांच्याशी विरोध येत नाहीं. किंवा ब्रह्म कोणत्याही प्रमाणाचा विषय होत नसल्यामुळें तेंच येथील अव्यक्त आहे. हिरण्यगर्भाचा त्यांत प्रवेश होत असल्यामुळें हा मोक्षच सांगितला आहे असें समजावे. ] १२

प्रळयकाळीं अतिगहिंसु । अगाध उसळे जलोल्हासु ।
स्थूळाचा करितां नाशु । विरे निःशेषु विराटु ॥ १७४ ॥
प्रलयकालीं जलमय झालेल्या सृष्टींत जगाचा भयंकर कल्लोळ उसळतो. त्यामुळें सर्व स्थूल पदार्थांचा नाश होतो. स्थूलवृष्टी हें विराट पुरुषाचे शरीरही त्यांत निःशेष विरघळून जातें. ७४

विराटाच वैराज पुरुषु । तो अव्यक्तीं करी प्रवेशु ।
जेवीं इंधननाशें हुताशु । करी रहिवासु निजकरणीं ॥ १७५ ॥
त्यानंतर त्या विराट शरीराचा अभिमान वैराजपुरुष काष्ठाचे भस्म केल्यावर अग्नि जसा आपल्या कारणरूप सामान्य तेजांत लीन होतो, त्याप्रमाणें अव्यक्तांत लीन होतो. ७५

जें ब्रह्मलोकनिवासी होती । त्यांसी महाप्रळयाचे अंतीं ।
ब्रह्मयासवें सर्वांसी क्रममुक्ती । ऐसें स्मृति-श्रुतींचें दृढ वाक्य ॥ १७६ ॥
जे ब्रह्मलोकांमध्ये रहाणारे असतात त्यांना महाप्रलयाच्या शेवटीं ब्रह्मदेवासह क्रममुक्ति मिळते, असें श्रुतीचें निश्चित वाक्य आहे. ७६

वैराजपुरुष नाम वदंती । हिरण्यगर्भातें म्हणती ।
त्यासी प्रळयीं प्रवेशु अव्यक्तीं । तैं इतरांची गति श्रुतिवाक्यें कैसी ॥ १७७ ॥
वैराजपुरुषाला हिरण्यगर्भ म्हणतात, तो प्रलयसमयीं जर अव्यक्तामध्ये लीन होऊं लागला तर ‘ब्रह्मदेवासह सर्व ब्रह्मलोकनिवासी क्रममुक्तीला प्राप्त होतात,’ असें सांगणाऱ्या श्रुतीची व्यवस्था कशी लागते ? ७७

विदेहें पुशिली मायेची स्थिती । ते मायेची ऐशी दुर्धर शक्ती ।
जे न करिती भगवद्‌भक्ती । त्यां ब्रह्म्यासवें मुक्तीं घडों नेदी ॥ १७८ ॥
असें कोणी विचारील म्हणून अंतरिक्ष सांगतो. विदेहानें मायेची स्थिति विचारली; पण त्या मायेची अशी दुर्धरशक्ति आहे कीं, जे भगवद्‍भक्ति करीत नाहींत, त्यांना ती हिरण्यगर्भासह मुक्त होऊं देत नाहीं. ७८

जालिया ब्रह्मसदनप्राप्ती । नकरितां भगवद्‌भक्ती ।
अतिशयें दुर्लभ मुक्ती । भक्तीपाशीं मुक्ती दासी जैशी ॥ १७९ ॥
ब्रह्मलोकाची प्राप्ति जरी झाली तरी भगवद्‌भक्ति न केल्यास मुक्ति अतिशय दुर्लभ होते. कारण भक्तीपाशीं मुक्ति दासीसारखी रहाते. ७९

न करितां भगवद्‌भजन । ब्रह्म्यासीही मुक्ति नव्हे जाण ।
मा इतरांचा ज्ञानाभिमान । पुसे कोण परमार्थीं ॥ १८० ॥
अहो, भगवद्‌भजन न केल्यास स्वत: हिरण्यगर्भालाही जर मुक्ति मिळत नाहीं, तर मग परमार्थामध्ये इतरांच्या ज्ञानाभिमानाला कोण विचारतो ? १८०

ज्यासी जेथ पदाभिमान । त्यासी तेंचि दृढबंधन ।
यलागीं दुर्लभपण । मोक्षासी जाण तिहीं लोकीं ॥ १८१ ॥
ज्याला ज्या पदाचा अभिमान असतो, त्याला तेंच दृढबधन होतें. म्हणून तिन्ही लोकी मोक्षाला दुर्लभत्व आहे. ८१

सांडोनियां पदाभिमान । अंगें सदाशिवु आपण ।
नित्य वसवी महाश्मशान । भगवद्‌भजनीं निजनिष्ठा ॥ १८२ ॥
साक्षात् शंकरही आपल्या कैलासपदाचा अभिमान सोडूनच भगतवद्‌भजनात पूर्णनिष्ठा ठेवून काशीक्षेत्रांतील महाश्मशानांत वास करतो. ८२

यालागीं ज्यांसी ब्रह्मलोकप्राप्ती । तेथही जे करिती भगवद्‌भक्ती ।
त्यांसीच प्रळयाच्या अंतीं । परममुक्ती नृपवर्या ॥ १८३ ॥
म्हणून ब्रह्मलोकाची प्राप्ति झाल्यावर तेथेंही जे ब्रह्मचिंतनरूप भगवद्‌भक्ति करतात त्यांनाच प्रलयाच्या अंती परम मुक्ति मिळते ८३

ब्रह्मलोकीं ज्यां नाहीं हरिभक्ती । तेही पावती पुनरावृत्ती ।
ऐशी मायेची दुर्धर शक्ती । न करितां भक्ती मुक्ति कैंची ॥ १८४ ॥
आणि ब्रह्मलोकीं जे हरिभक्ति करीत नाहींत ते पुनः जन्म घेतात. मायेची अशी दुर्धर शक्ति आहे. भक्ति न केल्यास मुक्ति कोठची ? ८४

येचि अर्थीं ब्रह्म्याचें वचन । दों श्लोकीं बोलिला आपण ।
ज्ञानाभिमानियां पतन । भक्तां भवबंधन कदा न बाधी ॥ १८५ ॥
याच अर्थाचे ब्रह्मदेवाचे एक वचन आहे. अंतरिक्ष पुढील दोन श्लोकांत त्याचाच अनुवाद करीत आहे. ज्ञानभिमान्यांचें पतन होतें आणि भक्तांना भवबंधन कधींही बाधा करीत नाहीं, असा त्या वचनांचा थोडक्यांत सारांश आहे. १८५.

[ ब्रह्मादिकृतगर्भस्तुतिश्लोकौ ]
येऽयेऽरविन्दाक्ष विमुक्तमानिनस्त्वय्यस्तभावादविशुद्धबुद्धयः ।
आरुह्य कृच्छ्रेण परं पदं ततः पतन्त्यधोऽनादृतयुष्मदङ्घ्रयः ॥ ३२ ॥
अरविंदाक्ष – हे कमलनयना – ये अन्ये – जे दुसरे – विमुक्तमानिनः – कित्येक आपल्याला मुक्त मानणारे – अनादृतयुष्मदंघ्रयः – व तुझ्या चरणकमलांचा अनादर करणारे – त्वयि अस्तभावात् अविशुद्धबुद्धयः – तुझ्या ठिकाणी श्रद्धा न ठेवल्यामुळे बुद्धिभ्रष्ट झालेले – कृच्छ्ररेण परं पदं आरुह्य – मोठया कष्टाने श्रेष्ठ पदवीला प्राप्त होऊन – ततः अधः पतंति – तेथून खाली पडतात. ॥ १०.२.३२ ॥

तथा न ते माधव तावकाः क्वचिद्‌भ्रश्यन्ति मार्गात्त्वयि बद्धसौहृदाः ।
त्वयाभिगुप्ता विचरन्ति निर्भया विनायकानीकपमूर्धसु प्रभो ॥ ३३ ॥
[ भा- स्कं १० अ २ ]
माधव – हे लक्ष्मीपते – तावकाः त्वयि बद्धसौहृदाः – तुझे म्हणविणारे व तुझ्या ठिकाणी दृढ प्रीती ठेवणारे जन – तथा मार्गात् क्वचित् न भ्रश्यन्ति – आपल्या मार्गापासून तसे कधीही भ्रष्ट होत नाहीत – प्रभो – हे समर्था – त्वया अभिगुप्ताः निर्भयाः ते – तू रक्षिलेले निर्भय असे ते जन – विनायकानकिपमूर्धसु विचरंति – विघ्नकर्त्याचे सैन्य बाळगणार्‍याच्या मस्तकावर पाय देत फिरतात. ॥ १०.२.३३ ॥

न करितां भगवद्‌भक्ती । सज्ञानाही नातुडे मुक्ती ।
तेचि अर्थींच्या दृष्टांतीं । ब्रह्म्याची उक्ती दाविली येथें ॥ १८६ ॥
भगवद्‌भक्ति केल्यावाचून ज्ञानालाही मुक्ति लाभत नाहीं, याच अर्थी ब्रह्मदेवाचें वचन दृष्टान्त म्हणून सांगितलें आहे. ८६

जन्मामाजी ब्राह्मणपण । तेही वेदशास्त्रसंपन्न ।
न करितां भगवद्‌भजन । अचूक पतन तयांसी ॥ १८७ ॥
जन्मामध्यें ब्राह्मणजन्म व तोही वेदशास्त्रसंपन्न जरी असला तरी भगवद्‌भजन न केल्यास त्याला नियमानें पतन प्राप्त होतें. ८७

भक्तां सर्वभूतीं भगवद्‌भावो । तेथ विघ्नांसी नाहीं ठावो ।
तयां अपावचि होय उपावो । भावार्था देवो सदा साह्य ॥ १८८ ॥
भक्तांचा सर्वभूतांमध्ये भगवद्‍भाव असतो. त्यामुळें त्यांच्या ठिकाणीं विघ्नांना अवकाशच मिळत नाहीं. त्यांचा जो अपाय तोच उपाय होतो. कारण भक्ताला देव सदा साह्य करतो. ८८

भक्तीवीण मुक्तीचा सोसु । करितां प्रयत्‍न पडे वोसु ।
असो हें वैराजपुरुषु । करी प्रवेशु अव्यक्तीं ॥ १८९ ॥
भक्तीवांचून मुक्तीचा सोस धरल्यास तो व्यर्थ प्रयत्न होतो. असो, हा विराटयुरुष अव्यक्तांत प्रवेश करतो. ८९

अव्यक्तीं वैराजाचा प्रवेशु । होतांचि महाभूतविलासु ।
हों लागे भूतां र्‍हासु । तो अनुप्रवेशु ऐक राया ॥ १९० ॥
त्यांत त्याचा प्रवेश होतांच महाभूतांचा विलास सुरू होतो. भूतांचा भास होतो. त्यांचा प्रकार मी तुला सांगतो, तो ऐक. १९०.

वायुना हृतगन्धा भूः सलिलत्वाय कल्पते ।
सलिलं तद्धृतरसं ज्योतिष्ट्वायोपकल्पते ॥ १३ ॥
याप्रमाणे विराटदेहाचा लय सांगून महत्तत्त्वापासून पृथ्वीपर्यंत त्याच्या कारणांचा उत्पत्तीच्या उलटक्रमानें लय सांगतात –
वायूना हृतगंधा भूः – वायूने जिचा मुख्य गुण गंध आहे तोच हरण केला आहे ती पृथ्वी – सलिलत्वाय कल्पते – उदकरूपास पावते. – तद् हृतरसं सलिलं – त्या वायूनेच ज्याचा रस हा गुण आहे असे ते जल – ज्योतिष्ट्वाय उपकल्पते – तेजोरूपास प्राप्त होते. ॥ १३ ॥

हृतरूपं तु तमसा वायौ ज्योतिः प्रलीयते ।
हृतस्पर्शोऽवकाशेन वायुर्नभसि लीयते ॥ १४ ॥
ज्योतिः तु प्रलयकालीनेन तमसा – तेज तर प्रलयकाळच्या तमाने – हृतरूपं सत् – ज्योतीच्या रूप या गुणाचे हरण करून ते – वायौ प्रलीयते – वायूच्या ठिकाणी लीन होते. – वायुः अवकाशेन – आकाशाने वायूचा – हृतस्पर्शः नभसि लीयते – स्पर्श हा गुण हरण केला आणि तो आकाशात लीन झाला. ॥ १४ ॥ [ वायु गंध व रस यांचें हरण करतो, हें प्रसिद्धच आहे. प्रलयवापूनें पृस्वींतील गंधाचे हरण केलें असतां तिच्यातील विशेष नष्ट झाल्यामुळें ती जलांत लीन होते. त्याचप्रमाणें जलांतील रसाचे हरण केलें असतां तें तेजांत लीन होतें. तम रूपाला झाकून टाकते हें प्रसिद्ध आहे. प्रलयकालच्या तमानें रूपाचा नाश केला असतां तेज बाधून लीन होतें. वायूचे कारण असें जें आकाश त्यानें वायूच्या स्पर्शाचे हरण केलें असतां तो आकाशांत लीन होतो. शब्दाचा कालानेच नाश होतो, हें प्रसिद्ध आहे. कालरूपी आत्म्याने म्ह ० ईश्वराने ज्याच्या गुणाचे हरण केलें आहे असें आकाश तामस अहंकारातच लीन होतें. १३- १४.

प्रळयवायूचा क्षोभक क्रोधु । तेणें पृथ्वीचा हरिला गंधु ।
तंव तेही विरोनियां प्रसिद्धु । एकवदु जळ जाहलें ॥ १९१ ॥
प्रलयवायूचा क्षोभ करणारा जो क्रोध त्यानें पृथ्वीचा गंध हरण केला असतां ती विरघळून जाऊन एकरूप जल होतें. ९१

क्षोभला वायु असमसाहस । तो हरी जळाचा जळरस ।
तेव्हां जळाचा होतसे र्‍हास । सावकाश प्रळयमहातेजीं ॥ १९२ ॥
त्यानंतर तो भयंकर क्षुब्ध झालेला वायु जळांतील रसाचे हरण करतो. त्यामुळे जलाचा प्रलयकालच्या महातेजांत लय होतो. ९२

त्या तेजाचा निजसंभ्रम । वायुबळें ग्रासीत तम ।
तेव्हां प्रळयवायु परम । भरोनि व्योम कोंदाटे ॥ १९३ ॥
त्या तेजाच्या क्षोभाला तम म्ह० अंधकार वायुबळानें ग्रासून टाकतो. त्याबरोबर आकाश प्रलयवायूनें दाट भरून जातें ९३

त्या प्रळयवायूचा स्पर्श । चपळतेसी सर्व ग्रास ।
करूनि ठाके अवकाश । तेव्हां वायूतें आकाश निःशेष ग्रासी ॥ १९४ ॥
त्याच्या स्पर्शाला व चपलतेला अवकाश ग्रासून सोडतो. त्यामुळें वायूचाही आकाशांत निःशेष लय होतो. ९४

कालात्मना हृतगुणं नभ आत्मनि लीयते ।
इन्द्रियाणि मनो बुद्धिः सह वैकारिकैर्नृप ।
प्रविशन्ति ह्यहङ्कारं स्वगुणैरहमात्मनि ॥ १५ ॥
नभः कालात्मना – कालात्मा परमेश्वराने आकाशाचा – हृतगुणं आत्मनि लीयते – हरीचा शब्द गुण हरण करीत तो तामस अहंकारामध्ये लीन झाला. – नृप ! – हे राजा ! – इंद्रियाणि बुद्धिः च – इंद्रिये आणि बुद्धिः – राजसं अहंकारं प्रविशति ही – राजस अहंकाराप्रत प्रविष्ठ होतातच – वैकारिकैः सह मनः – इंद्रियांच्या देवतांसह मन – अहं स्वगुणैः सह – अहंकार आपल्या कार्यभूत सत्त्वादि गुणांसह – आत्मनि लीयते – महत्तत्त्वामध्ये लीन होते. ॥ १५ ॥ [ इंद्रिये व बुद्धि राजस अहंकारांत व मन वैकारिक देवांसह सात्त्विक अहंकारांत लीन होतें, याप्रमाणे आपल्या त्रिविध कार्यासह अहंकार महत्तत्त्वामध्यें लीन होतो आणि शेवटी तो महार आत्माही प्रकृतीमध्ये लीन होतो, असे समजावे. ] १५.

आकाशाचा जो शब्दगुण । तो प्रळयकाळु गिळी संपूर्ण ।
तंव क्षोभला तामसाभिमान । तो करी प्राशन गगनाचें ॥ १९५ ॥
आकाशाच्या शब्दगुणाला प्रलयकाल सबंध गिळून टाकतो. इतक्यांत तामस अभिमान क्षुब्ध होतो. तो आकाशाला ग्रासतो. ९५

दश इंद्रियांचा गोंदळा । राजसाभिमानीं रिघाला ।
चित्तचतुष्टयाचा मेळा । तोही प्रवेशला सात्त्विकाभिमानीं ॥ १९६ ॥
दहा इंद्रियांचा गोंधळ राजस अभिमानांत शिरतो. चित्तचतुष्टयाचा मेळा सात्त्विक अभिमानांत प्रवेश करतो. ९६

इंद्रियअधिष्ठात्रीं दैवतें । तीहीं मिळोनियां समस्तें ।
प्रवेशलीं सात्त्विकातें । जाण निश्चितें नृपनाथा ॥ १९७ ॥
इंद्रियांच्या ज्या अधिष्ठातृदेवता त्याही सर्व मिळून सात्त्विक अहंकारांत लीन होतात, असें तूं निश्चयानें जाण. ९७

ते तिनी अहंकार त्रिगुणेंसीं । प्रवेशती महतत्त्वासीं ।
महत्तत्त्व मिळे मायेसी । जेवीं कन्या संततीसीं माहेरा ये ॥ १९८ ॥
हे तिन्ही अहंकार त्रिगुणांसह महत्तत्त्वांत प्रवेश करतात. ज्याप्रमाणें कन्या बाळंतपणांस माहेरी येते त्याप्रमाणें महत्तत्त्व मायेला मिळतें. ९८

जेवीं कुकडीचीं पिलीं । कुकडी पांखांतळी घाली ।
मग ते स्वयें दिसे एकली ॥ तेवीं माया उरली कल्पांतीं ॥ १९९ ॥
ज्याप्रमाणें कोंबडी आपल्या पिलांना पंखाखाली लपवून ठेवते आणि मग ती स्वत: एकटीच दिसते त्याप्रमाणें कल्पांतीं माया एकटीच उरते. ९९

एवं उत्पत्तिस्थितिप्रळयांत । त्रिविध भागें दाविली येथ ॥
ते गुणमयी माया निश्चित । मिथ्याभूत आभासे ॥ २०० ॥
याप्रमाणे उत्पत्ति, स्थिति आणि प्रलय यासाठीं तीन भागांनीं माया दाखविली. खरोखर ती त्रिगुणात्मिका माया मिथ्यारूपानें भासते. २००

जेवीं लेंकुरें खेळतां खेळासी । दिवसा म्हणती जाहली निशी ।
तेवींचि पूर्णस्वरूपापाशीं । देखती मायेसी त्रिविध कल्पता ॥ २०१ ॥
ज्याप्रमाणें मुले खेळ खेळत असतां दिवसाला रात्र झाली असें म्हणतात, त्याचप्रमाणे पूर्ण स्वरूपामध्ये अज्ञलोक मायेची त्रिविध कल्पना करतात. २०१.

एषा माया भगवतः सर्गस्थित्यन्तकारिणी ।
त्रिवर्णा वर्णितास्माभिः किं भूयः श्रोतुमिच्छसि ॥ १६ ॥
सर्गस्थित्यंतकारिणी – उत्पत्ति-स्थिति-लय करणारी – भगवतः – भगवंताची – एषा त्रिवर्णा माया – ही त्रिगुणात्मिका माया – अस्माभिः वर्णिता – आम्ही सांगितली. – भूयः किं श्रोतुं इच्छसि – आता आणखी काय ऐकण्याची इच्छा आहे. ॥ १६ ॥ [ हे राजन्, भगवानाची त्रिगुणात्मिका जगदुत्पत्ति-स्थिति-लय करणारी ही माया मीं तुला सांगितली. पण मायेचे वर्णन ऐकून भयभीत झालेल्या राजाला तिच्या निवृत्तीचा उपाय ऐकण्याची आकांक्षा व्हावी म्हणून अंतरिक्ष ‘तूं आणखी काय ऐकण्याची इच्छा करतोस’ असें विचारू लागला. १६.

उत्तम मध्यम अधम जन । तिन्ही अवस्था त्रिभुवन ।
त्रिविध कर्में तीन गुण । हें जाण विंदान मायेचें ॥ २०२ ॥
उत्तम, मध्यम, अधम असे तीन प्रकारचे लोक; जागृति, स्वप्न व सुषुति या तीन अवस्था; भूलोक, स्वर्गलोक व पाताळलोक हें त्रिभुवन, संचित, क्रियमाण व प्रारब्ध असें त्रिविध कर्म; सत्त्व, रज आणि तम हे तीन गुण; २

ध्येय ध्याता ध्यान । पूज्य पूजक पूजन ।
ज्ञेय ज्ञाता आणि ज्ञान । हेही त्रिपुटी पूर्ण मायेची ॥ २०३ ॥
ध्येय, ध्याता, ध्यान; पूज्य, पूजक, पूजन; ज्ञेय, ज्ञाता, ज्ञान इत्यादि हें सर्व मायेचे कार्य आहे. ३

दृश्य द्रष्टा आणि दर्शन । कर्म कर्ता क्रियाचरण ।
भोग्य भोक्ता भोजन । हे त्रिपुटी पूर्ण मायेची ॥ २०४ ॥
दृश्य द्रष्टा, दर्शन, कर्म, कर्ता, क्रियाचरण, भोग्य भोक्ता, भोजन इत्यादि हें सर्व मायेचे कार्य आहे. ४

शब्द श्रोता आणि श्रवण । घ्रेय घ्राता आणि घ्राण ।
रस रसना रसस्वादन । हे त्रिपुटी जाण मायेची ॥ २०५ ॥
शब्द,श्रोता, श्रवण, घ्रेय, घ्राता, घ्राण, रस, रसना, रसस्वादन इत्यादि हें सर्व मायेचे कार्य आहे. ५

कर क्रिया आणि कर्ता । चरण चाल चालता ।
बोल बोलणें बोलता । हे त्रिविधावस्था मायेची ॥ २०६ ॥
कर, क्रिया, कर्ता. चरण, चाल, चालणे, बोल, बोलणे बोलता इत्यादि हें सर्व मायेचे कार्य आहे. ६

अहं सोहं जडमूढता । साधक साधन साध्यता ।
देवी देवो परिवारदेवता । हेही त्रिविधता मायेची ॥ २०७ ॥
अहं, सोहं, जडमूढता, साधक, साधन, साध्यता; देवी, देव, परिवारदेवता; ७

देह देही देहाभिमान । भव भय भवबंधन ।
मुक्त मुमुक्षु अज्ञान । हेंही विंदान मायेचें ॥ २०८ ॥
सुख दुःख जडत्व पूर्ण । आधी समाधी व्युत्थान ।
उत्पत्ति स्थिति निधन । इंहीं लक्षणीं संपूर्ण माया विलसे ॥ २०९ ॥
देह, देही, देहाभिमान इत्यादि सुख, दुःख, जडत्व वगैरे या सर्व लक्षणांनीं माया विकास पावते. ८-९

नभी निळिमा पूर्ण भासे । शेखी निळिमेचा लेशही नसे ।
तेवीं स्वरूपीं माया आभासे । मिथ्यावेशें मायिक ॥ २१० ॥
आकाशांत सर्व ठिकाणी नीलत्वाचा भास होतो. पण प्रमाणाने विचार करूं लागलें असतां तेथें त्याचा लेशही नसतो. त्याचप्रमाणें आत्मस्वरूपामध्ये मायेचा आभास होतो; पण ती मिथ्या आहे. २१०

जेवीं प्रत्यक्ष दिसे मृगजळ । परी तें निधाघचि केवळ ।
तेवीं स्वरूपीं माया प्रबळ । मूळीं निर्मूळ आभासे ॥ २११ ॥
मृगजल प्रत्यक्ष दिसते. पण तें रखरखीत उन्ह असतें. तशीच स्वरूपांत प्रबळ माया दिसते. पण ती वस्तुतः निर्मूल असते. ११

हे मिथ्या माया कल्पनावशें । प्रबळ बळें भासली दिसे ।
नासूं जातां नाशिजे ऐसें । सत्यत्वें नसे निजांग ॥ २१२ ॥
ही मिथ्या माया कल्पनावशात् अतिशय बलाढ्य आहे, असा भास होतो. म्हणून तिचा नाश करावयास जो जावे तो तिच्यामध्यें सत्यत्वानें कांहींच नसतें. १२

नांवरूपाचिया भडसें । ब्रह्मादिक केले पिसे ।
मिथ्या त्रिपुटीविन्यासें । ज्या बांधिलें दिसे त्रिलोक्य ॥ २१३ ॥
तिने नामरूपाच्या भपक्याने ब्रह्मादिकांना वेड लावलें आहे. मिथ्या त्रिपुटीच्या रचनेने तिने त्रैलोक्य उभारलें आहे, असें दिसतें. १३

जेवीं रूपासवें दिसे छाया । नाशितां नातुडे नाशावया ।
तेवीं स्वरूपीं मिथ्या माया । अतिदुर्जया देवांसी ॥ २१४ ॥
जशी दीपाबरोबर सावली दिसावी, पण तिचा नाश करूं म्हटलें तर ती हातीं लागत नाहीं तशीच ही स्वरूपी मिथ्या माया आहे. ती देवांना अतिशय दुर्जय आहे. १४

जेवीं देहासवें मिथ्या छाया । तेवीं ब्रह्मीं मिथ्या माया ।
कल्पनायोगें वाढली वायां । यालागी अजया वेदशास्त्रें म्हणती ॥ २१५ ॥
जशी देहाची छाया, तशीच ब्रह्मांतील मिथ्या माया. ती कल्पनेने वृथा वाढली आहे. म्हणूनच वेदशास्त्रें तिला अजया-अजिंक्य म्हणतात. १५

राया कल्पना वाढे जे ठायीं । तेंचि मायेचें दृढ मूळ पाहीं ।
जो निर्विकल्प निजदेहीं । त्यासी माया नाहीं तिहीं लोकीं ॥ २१६ ॥
हे राजा, जेथे कल्पना वाढते तेथेंच मायेचे दृढमूळ आहे, असें तूं समज. जो स्वतःच्या देहाविषयीही निर्विकल्प-आस्थाशून्य असतो, त्याला या त्रिभुवनांत माया कोठेच दिसत नाहीं. १६

कल्पिती कल्पना जे राया । तेचि जाण मुख्य माया ।
आणीक रूपकें सांगावया । नातुडे माया निरूपणीं । २१७ ॥
जी कल्पना करते तीच मुख्य माया आहे, असें तू जाण. मायेचे निरूपण करतांना याहून अधिक रूपक व दृष्टान्त सांगावयास नकोत. १७

तेचि त्रिविध मुख्यलक्षणीं । माया सांगितली विवंचोनी ।
आतां कोण्या अर्थींचे श्रवणीं । अत्यादरु मनीं वर्ते राया ॥ २१८ ॥
हे जनका, याप्रमाणे मीं तुला मायेचे त्रिविधत्व मुख्य लक्षणांनी वर्णन करून सांगितलें. आतां आणखी तुला काय ऐकण्याची इच्छा आहे ! १८

माया दुस्तर दारुण । ऐकूनि ऋत्विज ब्राह्मण ।
थरारले सभाजन । राजाही पूर्ण विस्मित जाहला ॥ २१९ ॥
मायेचे हें भयंकर वर्णन ऐकून यज्ञातील ऋत्विज् व इतर सभाजन भयभीत झाले. राजालाही अतिशय विस्मय वाटला. १९

नवल मायेचे रूपक । नाशूं न शकतीच ज्ञाते लोक ।
जिया गोंविले ब्रह्मादिक । इतरांचा देख पाडु कोण ॥ २२० ॥
मायेचे लक्षण अतिशय आश्चर्यकारक आहे. ज्ञाते लोकही तिचे निवारण करूं शकत नाहींत. अहो, जिने ब्रह्मादिकांनाही आपल्या जाळ्यांत गोंविलें, तेथें इतरांचा काय पाड ! २२०

माया आक्रमूनि शिवासी । तोही आणिला जीवत्वासी ।
ते माया तरवे दीनासी । तो उपावो यासी पुसों पां ॥ २२१ ॥
तिने शिवावरही आपल्या कल्पनेचा अम्मल बसवून त्याला जीवत्व आणलें. तेव्हां अशा त्या प्रबल मायेचे सामान्यजनांना कोणत्या उपायाने उल्लंघन करतां येईल तें आपण यांस विचारावे, २१

सुखोपायें दीन जन । दुस्तर माया तरती पूर्ण ।
तदर्थीं राजा आपण । अत्यादरें प्रश्न श्रद्धेनें पुसे ॥ २२२ ॥
असा विचार करून जनक राजा मोठ्या आदराने व श्रद्धेने मायेच्या उल्लंघनाचा सर्व जनांस सुलभ असा उपाय विचारू लागला. २२२.

श्रीराजोवाच –
यथैतामैश्वरीं मायां दुस्तरामकृतात्मभिः ।
तरन्त्यञ्जः स्थूलधियो महर्ष इदमुच्यताम् ॥ १७ ॥
याप्रमाणें अंतरिक्षाकडून अनुकंपा केला गेलेला राजा मायेच्या निवृत्तीचा उपायच विचारू लागला –
महर्षे ! – हे महामुने ! – अकृतात्मभिः – ज्याचे अंतकरण स्वाधीन झालेले नाही अशा पुरुषांना – एतां दुस्तरां – तरून जाण्यास कठीण अशा या – ऐश्वरीं मायां – ईशरी मायेला – स्थूलधियः – ज्यांची स्थूल, म्हणजे शरीराच्या ठिकाणी धी म्हणजे अहंबुद्धी आहे अशांना – यथा अंजः तरंति – ज्यायोगे सहज तरून जातील – इदं उच्यताम् – ते सांगावे. ॥ १७ ॥ [ पूर्वी दुसऱ्या अध्यायांत ‘तन्माययातो बुध आभजेत् तम्’ या वचनाने भक्तीच मायेतून तारून नेणारी आहे. तथापि केवल भक्ति हाच एक तिच्या तरणाचा उपाय आहे कीं, आणखीही एखादा उपाय आहे ? हें जाणण्यासाठी येथें जनकानें पुनः प्रश्न केला आहे.’ एकूण शरीरच मी’ अशी ज्यांची दृढभावना असते ते ईश्वराच्या या दुस्तर मायेला अनायासाने कसे तरून जातात, तें मला सांगा. १७.

अतिदुस्तर हरीची माया । आ‍इकोनि हांसें आले राया ।
लटकीच परी देहाभिमानियां । बाधावया दृढ जाहली ॥ २२३ ॥
हरीची माया अशी अति दुस्तर आहे. हें ऐकून राजाला हसूं आलें. अहो, ती लटकीच असूनही देहाभिमानी पुरुषांना दृढ बद्ध करावयास तयार झाली. २३

माया दुस्तर शास्त्रप्रसिद्धी । तेथ बाळेभोळे स्थूळबुद्धी ।
सुखें तरती कोणे विधीं । तो सांग त्रिशुद्धी उपावो ॥ २२४ ॥
माया अतिशय दुस्तर आहे अशी शास्त्रप्रसिद्धि आहे. पण स्थूलबुद्धि भाळेभोळे लोकही अनायासानं तिचें उल्लंघन करूं शकतील असा उपाय मला सांगा. २४

ज्यासी वश्य नाही निजमन । आणि भवाब्धि तरावया भाव पूर्ण ।
ऐसे भोळे भाविक जन । त्यांसी मायातरण सुगम सांगा ॥ २२५ ॥
त्यांचें मन तर त्यांच्या स्वाधीन नाहीं, पण भवसागर तरून जाण्याची तीव्र इच्छा. अशा भोळ्या भावीकजनांसाठीं मायातरणाचा सुगम उपाय सांगा. २५

मागां कवी बोलिला संकलितीं । तन्माययाऽतो बुध आभजेति ।
गुरु-ब्रह्म अभेदस्थिती । करितां भक्ती माया तरिजे ॥ २२६ ॥
पूर्वी कविमहर्षीनें (अ २ लोक ३७) ‘तन्मायया०’ इत्यादि लोकार्थांत गुरु व ब्रह्म यांची अभेदाने भक्ति केली असतां मायेचे उल्लंघन करतां येते असें थोडक्यांत सांगितलें आहे. २६

तें भक्तीचें स्पष्ट लक्षण । विशद हो‍आवया श्रवण ।
पुढती मायेचें तरण । पुसावया कारण मुख्य हेंचि ॥ २२७ ॥
यास्तव त्या भक्तीचे लक्षण स्पष्टपणे श्रवण करण्यासाठीं मी हें आपणांस विचारीत आहे. कवीने जें पूर्वी सांगितलें होतें तेंच माझ्या या प्रश्नाचें मुख्य कारण आहे. २७

तो मायातरणोपायविधी । सुगम सांगावया त्रिशुद्धी ।
अंतरिक्षाधाकुटा सुबुद्धी । प्रबुद्ध प्रज्ञानिधी बोलता जाहला ॥ २२८ ॥
राजाचा हा प्रश्न ऐकून अंतरिक्षाचा अतिशय बुद्धिमान कनिष्ठ भ्राता प्रबुद्ध मायातरणाचा सुलभ उपाय त्याला सांगू लागला. २२८.

श्रीप्रबुद्ध उवाच –
कर्माण्यारभमाणानां दुःखहत्यै सुखाय च ।
पश्येत्पाकविपर्यासं मिथुनीचारिणां नृणाम् ॥ १८ ॥
दुःखहत्यै सुखाय च – दुःखाच्या नाशाकरिता व सुखाच्या प्राप्तीकरिता – कर्माणि आरंभमाणानां – कर्मे वा उद्योग आरंभणार्‍या – मिथुनीचरणां नृणां च – व दांपत्य जीवन अनुसरणार्‍या मनुष्यांना – पाकविपर्यासं पश्येत् – फलाचा विपर्यास म्हणजे विचारांच्या उलट फलप्राप्ती होते ती पहावी. ॥ १८ ॥ [ दुःखाचा प्रतीकार व सुखाची प्राप्ति यांसाठी विविध कर्मांचा आरंभ करणाऱ्या व पतिपत्नी इत्यादि भावाने परस्पर संबद्ध होऊन प्रवृत्त होणाऱ्या मनुष्यांच्या फळाचा विपर्यास कसा होतो, त्याचा विचार अवश्य करावा. ] १८.

मुख्य मायेचें तरण । प्रबुद्धचि जाणे पूर्ण ।
प्रबुद्ध जाहलिया आपण । मायेचें विंदान न तरतां तरती ॥ २२९ ॥
मुख्य मायेच्या तरणाचा उपाय पूर्ण ज्ञानीच जाणतो. स्वतः ज्ञानी झाल्यावर मायेचे उलघन करण्यास फार कष्ट करवे लागत नाहींत. २९

मनीं विषयाचा छंदु । तो केवळ महाबाधु ।
विषयत्यागी तो प्रबुद्धु । तोचि विशदु भावो आ‍इका ॥ २३० ॥
मनांत विषयांचा नाद असणें हा फारच मोठा प्रतिबंध आहे. जो विषयांचा त्याग करतो, तोच ज्ञानी होय. आतां हाच आशय अधिक विशद करून सांगतो. २३०

विषयीं लोभलें अत्यंत मन । तेथ नव्हतां वैराग्य पूर्ण ।
कदा नव्हे मायेचें तरण । वैराग्यार्थ जाण विषय निंदी ॥ २३१ ॥
विषयासक्त मनामध्ये वैराग्य व ज्ञान यांचा उदय कधींही होत नाहीं. वैराग्यासाठी शास्त्रें व ज्ञानी पुरुष विषयाची अशी निंदा करतात. ३१

केवळ नश्वर विषय देख । तेंचि मानिती परम सुख ।
तें सुखचि दुःखदायक । स्त्रीकामें मुख्य माया बाधे ॥ २३२ ॥
विषय क्षणभंगुर आहेत; पण अविवेकी त्यालाच परम सुख मानतात. पण तें सुखही दुःख देणार आहे. स्त्रीविषयक इच्छेने मुख्य माया दुःख देते. ३२

वेंचुनि धनाचिया गांठी । सुखार्थीं स्त्री बैसविली पाटीं ।
तेचि भोगवी दुःखकोटी । जगीं माया लाठी स्त्रीकामें ॥ २३३ ॥
आपल्या पदरचे धन खर्चून सुखासाठी स्त्रीला आणून पाटावर बसविले पण तीच स्त्री या कामी पुरुषाला अनेक दुःखे भोगावयास लावते. स्त्री-कामना हीच या जगातील ! जबरदस्त माया आहे. ३३

स्त्रीकामें प्रपंचु सबळ । स्त्रीकामें दुःख प्रबळ ।
स्त्रीकामें मायेसी बळ । स्त्रीकामें मोहिलें जग ॥ २३४ ॥
तिच्यामुळेंच प्रपंच सबळ होतो. दुःख प्रबल होते, मायेला बळ चढते तिच्यामुळेंच सर्व जगत मोहित झालें आहे. ३४

आवडीं स्त्री बैसवितां पाटीं । ते प्रपंचाच्या वाढवी कोटी ।
महामोहाच्या पाडूनि गांठी । दुःखसागरीं लोटी स्त्रीकामु ॥ २३५ ॥
स्त्रीला मोठ्या आवडीने गृहदेवता करून पाटावर बसविले असतां ती प्रपंचाच्या कोटी वाढविते आणि स्त्रीकाम महामोहाच्या गांठी मारून पुरुषाला दुःखसागरांत लोटितो. ३५

जे नवमास वाहे उदरांत । ते माता करूनि अनाप्त ।
स्त्रियेसी मानिती अति‍आप्त । ऐशी माया समर्थ स्त्रीकामें ॥ २३६ ॥
जी माता नऊ महिने आपल्या उदरांत वहाते, तिला दूर करून मूढ स्त्रीला परम आप्त मानतात. स्त्रीकामानें माया अशी समर्थ झाली आहे. ३६

जे तोंडींचें पोटींचें खाववित । जे सदा सोशी नरकमूत ।
ते मातेहूनि स्त्री आप्त । जाहली जगांत मायामोहें ॥ २३७ ॥
जी आई आपल्या तोंडातील व पोटातील घास काढून याला खाऊ घालते व बाळपणी याच्या मल-मूत्रांचे लेप सहन करते, तिच्याहूनही स्त्री या जगांत मायामोहानें आप्त झाली आहे. ३७

स्त्रिया मेळवितां असंख्य मिळती । परी माता न मिळे त्रिजगतीं ।
ऐसें जे सज्ञान जाणती । तेही आप्त मानिती स्त्रियेतें ॥ २३८ ॥
‘स्त्रिया मिळवूं लागल्यास असंख्य मिळतील, पण माता त्रिभुवनांत एकही मिळणार नाहीं’ असें जे ज्ञानी जाणतात, तेही स्त्रीला परम आप्त मानतात. ३८

मातेतें भजतां भुक्तिमुक्ती । स्त्रियेतें भजतां नरकप्राप्ती ।
ऐसें जे शास्त्रज्ञ जाणती । तेही माता उपेक्षिती स्त्रीकामें ॥ २३९ ॥
मातेची सेवा केल्यास ऐहिक सुख व मोक्ष ही दोन्ही मिळतात आणि स्त्रीचें भजन केल्यास नरक प्राप्त होतो, असें जाणणारे शास्त्रज्ञसुद्धां स्त्रीच्या नादाने मातेची उपेक्षा करतात. ३९

एवं स्त्रीकामाचिया व्याप्ती । माया व्यापिली त्रिजगतीं ।
सज्ञानही पाडले भ्रांतीं । स्त्रीकामसक्ती महामाया ॥ २४० ॥
याप्रमाणे स्त्रीकामाच्या व्याप्तीनें माया त्रिभुवनास व्यापून राहिली आहे. सज्ञानही भ्रांतींत पडले आहेत. खरोखर स्त्रीविषयासक्ति हीच महामाया आहे. २४०

मानूनि विषयांचे सुख । काम्य कर्म करितां देख ।
तेणें अतिदुःखी होती लोक । दुःखदायक काम्य कर्म ॥ २४१ ॥
विषयांचे सुख मानून काम्यकर्म केल्यास लोक अति दुःखी होतात. यास्तव काम्यकर्म दुःखदायक आहे. ४१

कामिनीकामें गृहासक्ती । प्राणी प्राणांतें स्वयें शिणविती ।
त्या श्रमाची निदानस्थिती । सांगेन तुजप्रती राजाधिराजा ॥ २४२ ॥
स्त्रीच्या इच्छेने गृहावरील आसक्ति वाढून प्राणी स्वत: मरेपर्यंत शीण भोगतात. हे राजा, मी तुला त्या श्रमाचे निदान सांगतो. ४२

निर्मळ जळें भिंती धुतां । जळाचीच नासे निर्मळता ।
हात माखती धुतले म्हणतां । भिंतीही तत्त्वतां निदळ केली ॥ २४३ ॥
स्वच्छ पाण्यानें भिंत धुवू लागल्यास जलाचीच निर्मलता नाहीशी होते, हातही चिखलाने माखतात आणि भिंतीवरील माती गेल्यामुळें त्याही निर्बल होतात. ४३

तेवीं विषयांचेनि सुखें सुख । न पावतीच ब्रह्मादिक ।
विषयाचा जे मानिती हरिख । ते परममूर्ख पशुदेही ॥ २४४ ॥
त्याचप्रमाणे विषयांच्या सुखाने ब्रह्मादिकही सुखी होत नाहींत. पण अशा विषयांचा जे हर्ष मानतात ते परम मूर्ख नराकार पशूच आहेत. २४४.

नित्यार्तिदेन वित्तेन दुर्लभेनात्ममृत्युना ।
गृहापत्याप्तपशुभिः का प्रीतिः साधितैश्चलैः ॥ १९ ॥
-त्याचप्रमाणे कर्मांनी संपादन केलेलेही द्रव्यादि पदार्थ सुखाचे हेतु होत नाहींत, असें पहावे हें सांगतो –
नित्यार्दितेन दुर्लभेन – निरंतर दुःखच देणार्‍या व मिळण्यास कठीण अशा – आत्ममृत्युना – आपल्या मृत्युरूप – वित्तेन साधितैः – द्रव्याने मिळविलेल्या – चलैः गृहापत्याप्तपशुभिः – चंचल अशा गृह, अपत्य, आप्त, पशु यांत – का प्रीतिः – काय सुख आहे बरे ! ॥ १९ ॥ [ सतत दुःख देणाऱ्या, दुर्लभ व आपल्या मृत्युरूप वित्तानें व मोठ्या कष्टाने संपादन केलेल्या अनित्य गृहादिकांनीं आपलें कोणतेंही अभीष्ट साधणार नाहीं, असा सतत विचार करावा. ] १९.

तरिदिवसु निजनिकटें । मरणेंसीं घेतां झटें ।
कवडीची प्राप्ती न भेटे । प्राणांतकष्टें द्रव्य जोडे ॥ २४५ ॥
अहोरात्र, स्वतःच्या आवडीने, मरेमरेतों मेहनत करूनही कवडीची प्राप्ति होत नाहीं, तथापि तो प्राणान्त कष्ट करून कसेबसे धन जोडतो. ४५

एवं कष्टलें जोडलें धन । तें महादुःखाचें जन्मस्थान ।
अर्थ अनर्थाचें अधिष्ठान । निजात्ममरण निजमूळ ॥ २४६ ॥
पण याप्रमाणे मोठ्या कष्ट मिळविलेलेंही धन महादुःखाला कारण होतें. तें अनर्थाचे मूळ आहे, स्वतःच्या नाशाला स्वतःच धाडलेले मूळ आहे. ४६

द्रव्य नसतां उपायें शिणवी । जाहलिया संरक्षणीं आधी लावी ।
रात्रिदिवस हृद्रोग जीवीं । अविश्वासें नांदवीं धनलोभु ॥ २४७ ॥
द्रव्य नसलें म्हणजे अनेक उपायांनी हा आपल्याला शिणवितो. तें मिळाले म्हणजे त्याला त्याच्या रक्षणाची भयंकर चिंता लागते. त्याच्या जीवाला अहोरात्र हृद्रोग लागतो. धनलोभ त्याला अविश्वासानेंच नांदवितो. ४७

मायबापांशीं चोरी करवी । स्त्रीपुत्रांसी कलहो लावी ।
सुहृदांतें दूरी दुरावी । हे द्रव्याची पदवी स्वाभाविक ॥ २४८ ॥
आईबापांपासून चोरून ठेवणे, स्त्री-पुत्रांत कलह लाविणें आणि परम मित्रांसही दूर सारणे हा द्रव्याचा स्वाभाविक धर्म आहे. ४८

द्रव्यापाशीं आधिव्याधी । द्रव्यापाशीं दुष्ट बुद्धी ।
द्रव्यापाशीं सलोभ क्रोधीं । असत्य निरवधी द्रव्यापाशीं ॥ २४९ ॥
द्रव्यापाशीं अतिविकल्प । द्रव्यापाशीं वसे पाप ।
द्रव्यापाशीं अतिसंताप । पूर्ण दुःखरूप ते द्रव्य ॥ २५० ॥
द्रव्यापाशीं आधि, व्याधि, दुष्ट-बुद्धि, लोभ, क्रोध व परमावधीचे असत्य, अति विकल्प, पाप व अति संताप हे दोष नित्य रहातात. त्यामुळें द्रव्य सर्वथा दुःखरूप आहे. ४९-२५०

हें दानें त्यागितां फळ गोमटें । लोभियां नरका ने हटेंतटें ।
द्रव्या‍ऐसे गा वोखटें । आन न भेटे तिहीं लोकीं ॥ २५१ ॥
दानाकडे त्याचा विनियोग केल्यास त्यापासून पुण्य लागतें, पण लोभ्यांना तें बळजबरीने दुःखात लोटते. यास्तव हे जनका, द्रव्यासारखी वाईट वस्तु या त्रिभुवनांत दुसरी नाहीं. ५१

नळिया चणियांचे आशा । वानरें मुठीं धरणें तोचि फांसा ।
तेवीं द्रव्यदाराभिलाषा । नरदेहदशा अधःपातीं ॥ २५२ ॥
वानराने चण्याच्या आशेनें पाशाजवळ येऊन त्याची नळी जो हातांत धरावी, तोच तो पाशांत अडकतो, त्याचप्रमाणें द्रव्य व स्त्री यांच्या अभिलाषाने नरदेहाची दुर्दशा होऊन त्याचा अधपात होतो. ५२

द्रव्य सहसा न मिळे पाहीं । मिळेतरी अनीति अपायीं ।
यालागीं द्रव्याच्या ठायीं । सुख नाहीं त्रिशुद्धी ॥ २५३ ॥
अगोदर जीवापाड कष्ट करूनही सहसा द्रव्य मिळत नाहीं. आणि जरी कदाचित् मिळाले तरी लोभ्याची नीति सुटते व त्यामुळें तें त्याला अपायच करते यास्तव द्रव्यामध्यें सुख नाहीं हें मी तुला त्रिवार सांगतो. ५३

धन वेचोनि फाडोवाडें । घर करिती वाडेंकोडें ।
तें अध्रुवत्वें सवेंचि पडे । थितें द्रव्य बुडे आयुष्येंसीं ॥ २५४ ॥
अहो, पुष्कळ धन खर्च करून मोठ्या आवडीने घर बांधतात, पण क्षणभंगुरत्वामुळें आयुष्यासह तें सर्व बुडून जातें. ५४

करूनि आयुष्याचा मातेरा । मुद्दलसिंचने जोडिलें पुत्रा ।
त्या पुत्राच्या मरणद्वारा । दुःखदुर्धरामाजीं बुडती ॥ २५५ ॥
सर्व आयुष्याचा मातेरा करून व आगणित धन (खर्च करून पुत्र संपादन केला, पण त्या पुत्राच्या मरणद्वारां बिचारा दुःखांतच बुडाला. ५५

प्रपंचींचे सुहृद समस्त । जंव स्वार्थ तंव होती आप्त ।
स्वार्थविरोधें तें अनाप्त । हो‍ऊनि घात सुहृदां करिती ॥ २५६ ॥
प्रपंचांतील सर्व सुहृद जोंवर त्यांचा स्वार्थ साधत असतो, तोंवरच आप्त असतात, पण स्वार्थाशीं विरोध येऊ लागला कीं, तेच वैरी होऊन त्याचाच घात करतात. ५६

करोनिया अतिहव्यासु । मेळविती नाना पशु ।
त्यांचा सवेंचि होय नाशु । तेणें दुःखें त्रासु गृहस्थांसी ॥ २५७ ॥
मोठा हव्यास धरून गायी, म्हशी, घोडे इत्यादि अनेक पशु संपादन करतो, पण लागलाच त्यांचा नाश होतो. त्यामुळें या गृहस्थाला अतिशय दुःख होतें. ५७

निजदेहोचि नश्वर येथ । त्यासि प्रपंच नव्हे गा शाश्वत ।
अवघें जगचि काळग्रस्त । इहलोकीं समस्त ठकिले विषयीं ॥ २५८ ॥
अगोदर आपला देहच जर नश्वर आहे, तर प्रपंच तरी सत्य कसा असेल ! या सर्व जगाला काळानं ग्राशिले आहे, त्यानें सृष्टीतील सर्व प्राण्यांना ठकविलें आहे, सर्व लोकांना फसविले आहे, ५८

मनुष्यदेहो कर्मभूमीं प्राप्त । तो लोक म्हणती कर्मजित ।
हा जैसा नश्वर येथ । तैसाच निश्चित नश्वर स्वर्गु ॥ २५९ ॥
या कर्मभूमीत जो मनुष्यदेह प्राप्त होतो, त्याला कर्मजित-कर्मानें संपादिलेला असें म्हणतात. पण हा लोक जसा नश्वर आहे, तसाच स्वर्गही नश्वर आहे. कारण तोही कर्मजितच. ५९

एवं लोकं परं विद्यान्नश्वरं कर्मनिर्मितम् ।
सतुल्यातिशयध्वंसं यथा मण्डलवर्तिनाम् ॥ २० ॥
एवं – याप्रमाणे – यथा मंडलवर्तिनां – जसे मांडलिक राजांमध्ये – सतुल्यातिशयध्वंसं – ज्यांत तुल्य अशा सुखसंपत्तिवंतांशी स्पर्धा असल्यामुळे त्यापासून होणार्‍या दुःखदायक – कर्मनिमित्तम् – कर्मांनी संपादिलेला – परं लोकं – स्वर्गादि परलोक देखील – नश्वरं विंद्यात् – विनाशी जाणावा. ॥ २० ॥ [ इहलोकांप्रमाणें परलोकही नश्वर आहे, असें समजावे कारण तोही कर्माने संपादन केलेला आहे. ‘ज्याप्रमाणें इहलोकी कर्माने संपादन केलेले फल जसे नाश पावते, त्याप्रमाणें परत्र पुण्याने संपादन केलेले फलही नाश पावते’ – अशी श्रुति आहे. शिवाय वर्तमान समयीही परलोक दुःखयुक्त आहे, असें पहावे कारण तो लोक तुल्य, अतिशय व ध्वंस यांनी युक्त आहे. त्यामुळें परलोकही तुल्यांशी स्पर्धा, अधिकांशी असूया व विनाश उपस्थित झाला असतां भयादिक ही अपरिहार्य आहेत. त्याविषयी या लोकींच्या चक्रवर्ति राजांचा दृष्टांत दिला आहे. सार्वभौम व मांडलिक राजे यांच्यामध्यें परस्पर स्पर्धादिक कशा चालते, हे प्रसिद्धच आहे. ] २०

मनीं धरोनी विषयभोग । इहलोकीं करिती याग ।
पुण्य जोडोनियां साङ्ग । पावती स्वर्गनिजपुण्ययोगें ॥ २६० ॥
मनामध्ये विषयावासना धरून या लोकी मोठमोठे यज्ञ करतात व सांग पुण्य जोडतात. त्या पुण्याच्या योगाने त्यांना स्वर्ग मिळतो. २६०

स्वर्गासुखा इंद्र अधिपती । तोही पतनार्थ धाके चित्तीं ।
विघ्नें सूची तापसांप्रती । स्वर्गस्थिति अपायी ॥ २६१ ॥
पण स्वर्गसुखाचा अधिपति जो इंद्र तोही आपलें या स्थानापासून पतन होईल म्हणून अहर्निश मनांत भीति बाळगतो. विषयभोगसमयींही विघ्नांची भीति असते. त्यामुळें स्वर्गस्थितीसुद्धा अपायकारक आहे. ६१

यापरी निजपुण्यें स्वर्गप्राप्ती । त्या लोकातें पुण्यजित म्हणती ॥
तेही पुण्यक्षयें क्षया जाती । तेणें धाकें धाकती स्वर्गस्थ श्रेष्ठ ॥ २६२ ॥
आपल्या पुण्याने स्वर्गप्राति होते, म्हणून स्वर्गाला पुण्यजितलोक म्हणतात. पण पुण्य क्षय झालें असतां तेही क्षय पावतात, म्हणून स्वर्गातील श्रेष्ठ देवही क्षयाच्या भीतीनें नेहमी सचिंत असतात. ६२

गांठीं पुण्य असतां चोख । स्वर्गभोगीं असेल सुख ।
हेही वार्ता समूळ लटिक । स्वर्गींचें दुःख ऐक राया ॥ २६३ ॥
अहोपण, आपल्या पदरी जर उत्तम पुण्य असेल तर स्वर्गलोकींही सुख होईल असें जर म्हणाल तर, ही समजूत सर्वथा खोटी आहे. राजा, स्वर्गामध्यें किती दुःख आहे तें ऐक. ६३

समान पुण्यें समपदप्राप्ती । त्यांसी स्पर्धकलहो करिती ।
आपणाहूनि ज्यां अधिक स्थिति । त्यांचा द्वेष चित्तीं अहर्निशी ॥ २६४ ॥
ज्यांचे एकसारखेंच पुण्य असतें, त्यांना समानपदाची प्राप्ति होते. अर्थात् त्यांची परस्पर स्पर्धा व कलह चालतो. आपणाहून ज्यांना उच्चस्थिति प्राप्त झालेली असते, त्यांच्याविषयीं चित्तांत अहर्निश द्वेष वाटतो. ६४

जैसे राजे मंडळवर्ती । राज्यलोभें कलहो करिती ।
तैशी स्वर्गस्थां कलहस्थिती । द्वेषें होती अतिदुःखी ॥ २६५ ॥
जसे इहलोकचे मांडलिकराजे राज्यलोभानें परस्पर भांडतात, तसेंच स्वर्गस्थही भांडतात आणि द्वेषाने अतिशय दुःखी होतात. ६५

पतनभयें कलह-द्वेष वोढी । क्षयातें पावे पुण्यजोडी ।
अधोमुख पडती बुडीं । याज्ञिकें बापुडीं चरफडती ॥ २६६ ॥
पतनाची भीति, कलह व द्वेष यांच्या ओढीने पुण्याची जोड संपते आणि बिचारे याज्ञिक चडफडत अधोमुख खालीं पडतात. ६६

एवं स्वर्गसुखउल्हासु । मानिती ते केवळ पशु ।
प्रत्यक्ष तेथ द्वेष नाशु । असमसाहसु नित्य कलहो ॥ २६७ ॥
यास्तव जे स्वर्गसुखाचा हव्यास धरतात ते केवळ पशु होत. द्वेष नाश, असहिष्णुता, नित्यकलह इत्यादि दोष तेथें प्रत्यक्ष असतात. ६७

सेविलाचि विषयो नित्य सेविती । परी कदा नव्हे मानसीं तृप्ती ।
तरी मिथ्या म्हणौनि नेणती । हे मोहक शक्ती मायेची ॥ २६८ ॥
एकदां भोगलेला विषय पुनःपुनः नित्य भोगतात. तरी त्यांच्या मनाची तृप्ती होत नाहीं आणि हे कधीही तृप्ती न करणारे विषय मिथ्या आहेत असें ते जाणत नाहींत. हीच मायेची ती मोहक शक्ति आहे. ६८

जैसें वेश्येचें सुख साजणें । वित्त घे‍ऊनि वोसंडणें ।
तेवीं विषयाचा संगु धरणें । तंव तंव होणें अतिदुःखी ॥ २६९ ॥
जसे मोलाने संपादन केले सुख वित्तासह सोडावे लागतें व शेवटीं अतिशय पश्चाताप होतो, त्याप्रमाणें विषयासक्ति जशी जशी वाढत जाते तसें तसें दुःखाचे प्रमाणही वाढत जातें. ६९

यालागीं उभयभोगु‍उपाया । जे जे प्रवर्तले गा राया ।
ते ते जाण ठकिले माया । थितें गेलें वायां उत्तम आयुष्य ॥ २७० ॥
यास्तव ऐहिक व पारलौकिक भोगांच्या उपायामध्ये जे जे प्रवृत्त झाले, ते ते मायेकडून ठकविलें गेलें व त्यांचेंउत्तम आयुष्य फुकट गेले. २७०

कर्मभूमीं नरदेह प्राप्त । हें पूर्ण निजभाग्याचें मथित ।
देव नरदेह वांछित । ते देव केले व्यर्थ विषयार्थीं ॥ २७१ ॥
याकर्मभूमीमध्यें मनुष्यदेहाची प्राप्ति होणें हें आपल्या पूर्व भाग्याचे सारभूत फल आहे. देवही मनुष्यदेहाची इच्छा करतात. पण ते सुद्धा बिचारे विषयांच्या नादीं लागून व्यर्थ जातात. ७१

एवं विषयाची आसक्ती । माया ठकिले नेणों किती ।
यालागीं विषयाचे विरक्ती । करावी गुरुभक्ती तेंचि सांगों ॥ २७२ ॥
याप्रमाणे विषयाच्यासक्तीच्या द्वारा मायेने कितीजणांना ठकविलें आहे याची कांहीं गणना नाहीं. म्हणून विषयाविषयीं विरक्त होऊन गुरुभक्ति करावी हेंच आतां प्रबुद्ध पुढील श्लोकांत सांगतो. २७२

तस्माद्‌गुरुं प्रपद्येत जिज्ञासुः श्रेय उत्तमम् ।
शाब्दे परे च निष्णातं ब्रह्मण्युपशमाश्रयम् ॥ २१ ॥
तस्मात् – म्हणून – उत्तमं श्रेयः – सर्वोत्कृष्ट कल्याण – जिज्ञासुः – जाणण्याची इच्छा करणारा पुरुष – शाब्दे – वेदाख्य – परे च – व साक्षात्काररूप – ब्रह्मणि निष्णाते – ब्रह्मामध्ये निष्णात म्हणजे परिपूर्ण – उपशमाश्रयं च – परम शांतीचे घरच अशा – गुरुं प्रपद्येत – सद्‌गुरूला शरण जावो. ॥ २१ ॥ [ परम श्रेय जें परमात्मतत्त्व त्याला जाणण्याची इच्छा करणाऱ्या साधकानें गुरूला शरण जावे, तो गुरु कसा असावा ! शाब्द म्ह० वेदाख्य ब्रह्मामध्यें निष्णात असावा. म्ह० न्यायाने वेदार्थ जाणणारा असावा. तसा नसल्यास तो शिष्याच्या संशयाची निवृत्ति करण्यास समर्थ होणार नाहीं. तसाच तो परब्रह्मामध्येंही अपरोक्ष साक्षात्कारानें निष्णात असावा. कारण त्यावाचून तो आपलें ज्ञान श्रोत्यांच्या मनांवर ठसवू शकणार नाहीं. ‘उपशमाश्रय’ हें गुरूचे विशेषण त्याचे परब्रह्म-निष्णातत्व सुचविते. उपशम म्हणजे शांति, विरक्ति व कर्मापासून निवृत्ति. २१.

जाणोनि विषयांचे नश्वरपण । पावावयालागीं ब्रह्म पूर्ण ।
सद्‌गुरुसी अनन्यशरण । रिघावें संपूर्ण श्रद्धायुक्त ॥ २७३ ॥
विषयांची क्षणभंगुरता जाणून पूर्णब्रह्माला प्राप्त होण्यासाठीं सद्‌गुरूला दृढ श्रद्धेने अनन्य शरण रिघावें. ७३

सद्‌गुरुवचनमात्रें माया । तरेन हा निश्चयो राया ।
येणें सद्‌भावें लागतो पायां । पावावया निजस्वार्थु ॥ २७४ ॥
‘मी केवळ सद्‌गुरुवचनानेच मायेला तरून जाईन’ असा माझा पूर्ण निश्चय आहे असें म्हणून सद्‌भावनेनें आत्मस्वार्थ साधण्यासाठीं मी तुमच्या पाया पडतो. ७४

गुरु ऐसें जे म्हणणें । तेंही आहे बहुसालपणें ।
ऐक राया तीं लक्षणें । तुज कारणें सांगेन ॥ २७५ ॥
हे राजा, एखाद्याला गुरु म्हणणें यांतही पुष्कळ प्रकार आहेत. यास्तव मी तुला गुरूची लक्षणें सांगतो. ७५

एक वेदाध्ययन गुरु । एक व्याख्यानदानीं उदारु ।
एक ज्योतीषज्ञानीं गंभीरु । परी तो सद्‌गुरु न म्हणती ज्ञाते ॥ २७६ ॥
एकवेदाध्यायन सांगणारे गुरु असतात. कांहीं नुस्ते व्याख्यान देण्यांत कुशल असतात. कित्येक ज्यौतिषज्ञानात प्रविण असतात. पण ज्ञाते त्यांना सद्‌गुरु म्हणत नाहींत. ७६

एक आगमोक्त मंत्र उपासिती । जप करावा विधानयुक्ती ।
मग कैं हो‍ईल निजप्राप्ती । हें नकळे निश्चितीं गुरुशिष्यां ॥ २७७ ॥
कित्येक मंत्र-शास्त्रांतील मंत्राची उपासना करतात. यथाविधि जप करावा असें सांगतात, पण त्यामुळें इष्टप्राप्ति केव्हा होईल हें गुरुंनाही निश्चयानें सांगवत नाहीं व शिष्यालाही कळत नाहीं. ७७

एक वायुधारणा लाविती । एक नाना लक्ष्यें दाविती ।
एक हठयोगें गोंविती । एक बैसविती महामुदा ॥ २७८ ॥
कित्येक प्राणायामाच्या योगाने वायु कोंडावयास लावितात. काहीजण ब्रह्माचीं अनेक प्रतीकें दाखवितात. कित्येक शिष्याला हठयोगांत गोंवितात व कोणी मौन धरून बसवितात. ७८

एक ब्रह्मानुवादें चोखटु । तत्त्वनिरूपणीं उद्‌भटु ।
वैरग्यबोलिका वरिष्ठु । उपजवी विटु उभयभोगंचा ॥ २७९ ॥
कित्येक ब्रह्माचे निरूपण करण्यांत फार चतुर असतात, ते तत्त्वाचे प्रतिपादन मोठ्या आवेशाने करतात. वैराग्याचें उपपादन करण्यांत अतिशय वरिष्ठ असतात. ते आपल्या मोहक भाषणाने श्रोत्यांच्या मनांत दोन्ही लोकांतील भोगाविषयी वैराग्य उत्पन्न करतात. ७९

कैसें निरूपी शुद्ध ब्रह्म । ऐकोनि सात्त्विकां येत प्रेम ।
परी निजहृदयींचा भ्रम । निरसे तें वर्म नेणेचि ॥ २८० ॥
अहो, अशा वक्त्यांचे शुद्ध ब्रह्म निरूपण ऐकून सात्त्विक श्रोत्यांच्या मनांत प्रेमाचे भरते येतें. पण आपल्या मनांतील भ्रम जाईल हें वर्म त्यांनाही ठाऊक नसतें. २८०

जेवीं गूळ-उसांचा घाणा । तोंडींचा रसु भरे भाणा ।
शब्दचोपटें भरोनि वदना । करी परिभ्रमणा करकरितु ॥ २८१ ॥
जसा ऊंसाचा घ्राणा आपल्या तोंडातील रसाने त्याच्याखाली ठेवले भाडे भरतो, पण त्याला आपलें तोंड वारंवार चोयट्यांनीच भरून घेऊन एकसारखेच ‘कर्र कर्र’ असा आवाज करीत भ्रमण कर लागतें. ८१

ऐसा जो कां शब्दज्ञानी । उत्तम व्यख्याता ज्ञानगुणीं ।
तो जन रंजवी निरूपणीं । स्वयें कोरडेपणीं करकरितु ॥ २८२ ॥
या दृष्टान्ताप्रमाणेच जो केवळ शब्दज्ञानी उत्तम व्याख्याता असतो तो ज्ञानगुणानें आपल्या निरूपणशक्तीनें लोकांचे रंजन करतो. पण स्वतः कोरडाच राहून घाण्याप्रमाणें नुसती वटवट करीत असतो. ८२

योगक्षेम चाले गोमटा । लौकिकीं थोर प्रतिष्ठा ।
तेथें निजप्राप्तीची उत्कंठा । न वचे वरिष्ठा शिष्यांची ॥ २८३ ॥
आपला योगक्षेम चांगला चालावा, लोकांमध्ये आपली मोठी प्रतिष्ठा व्हावी, एवढीच त्याची लालसा असते. आपल्या शिष्यांना आत्मप्राप्ति व्हावी अशी मुळींच उत्कंठा नसते. ८३

जेवीं अमृत म्हणतां । चवी न लभे गा सर्वथा ।
तेवीं शाब्दिक ज्ञानयोग्यता । अनुभववार्ता स्वयें नुपजे ॥ २८४ ॥
जसे म्हणतांना म्हणावयाचें अमृत, पण त्यांत चवीचा लेशही नसावा, त्याप्रमाणें शाब्दिक ज्ञानाची योग्यता मोठी, पण स्वतःला अनुभवाच्या नांवांनी पूज्य. ८४

जेणें स्वयें चाखिली नाहीं चवी । तो दुजयातें गोडी केवीं लावी ।
यालागीं जो पूर्णानुभवी । तो तारी सद्‌भावें सच्छिष्यासी ॥ २८५ ॥
अहो, ज्याने स्वतः एखाद्या वस्तूची चव मुळींच घेतलेली नाही, तो दुसऱ्याला त्याची गोडी कशी लावणार ? यास्तव जो गुरु पूर्ण अनुभवी असतो तोच सच्छिष्याला सद्‌भावाने तारू शकतो. ८५

एवं गुरुपणाची वदंती । असे बहुपणें नांदती ।
जो करी अपरोक्षप्राप्ती । त्यातें म्हणती सद्‌गुरुस्वामी ॥ २८६ ॥
गुरुत्वाची वार्ता या जगामध्ये अशी अनेक प्रकारची आहे, पण जो शिष्याला अनुभवाची प्राप्ति करून देतो, त्यालाच सद्‌गुरुस्वामी म्हणतात. ८६

ज्याचेनि वाक्यें असंतता । निःशेष मावळे तत्त्वतां ।
त्यासीचि गा सद्‌गुरुता । वेदशास्त्रार्थां प्रतिपाद्य ॥ २८७ ॥
ज्याच्या वाक्यानें शिष्याची मिथ्या जगद्‌भावना तत्त्वतः निःशेष मावळते, त्यालाच सद्‌गुरुत्व आहे, असें वेद व शास्त्रे यात प्रतिपादन केलें आहे. ८७

जे उपदेशिती मंत्रतंत्र । तेही पूज्यत्वें अतिसधर ।
जेथें नुरे पूज्यपूजकताविचार । तोचि साचार सद्‌गुरुस्वामी ॥ २८८ ॥
जे मंत्रतंत्रांचा उपदेश करतात तेही पूज्यत्वाने फार थोर होत. पण जेथे मी पूज्य व हा पूजक असा विकार रहात नाहीं, तोच खरा सद्‌गुरुस्वामी होय. ८८

एकातें ब्रह्मज्ञान । वस्तु देखोनि विरालें मन ।
मावळले द्वैताचें भान । पडिलें मौन चहूं वाचां ॥ २८९ ॥
ज्याचे ब्रह्मज्ञान शुद्ध आहे, ब्रह्मवस्तूला पाहून ज्याचे मन विरून गेलें आहे, द्वैताचे भान मावळलें आहे, चारी वाणींना मौन पडलें आहे, ८९

इंद्रियें टंवकारिलीं समस्त । प्राण पांगुळला जेथींचा तेथ ।
वस्तु देखोनियां परमाद्‌भुत । पडलें ताटस्थ्य देहभावा ॥ २९० ॥
सर्व इंद्रिये तटस्थ झाली आहेत, परम अद्‌भुत वस्तु पाहून प्राण जेथल्या तेथें पांगुळला आहे, देहभावाला तटस्थत्व प्राप्त झालें आहे, २९०

ऐसा जो आत्मानुभवी । त्यातें सद्‌भावें शिष्यु विनवी ।
तंव तो पुसे ना समजावी । ताटस्थ्यभावीं अबोलपणा ॥ २९१ ॥
असा जो आत्मानुभवी गुरु त्याला शिष्य सद्‌भावानें विनवितो. पण असला गुरु त्या शिष्याला कांहीं विचारीत नाहीं व कांहीं समजून सांगत नाहीं, तर तटस्थपणे मौन धरून बसतो. ९१

एका अनुभवा आलें ब्रह्म । फिटला बाध्यबाधकतेचा भ्रम ।
मोडलें द्वैतभावाचें कर्म । जगीं विषम असेना ॥ २९२ ॥
ब्रह्म अनुभवाला आलें व बाध्यबाधाकनेचा भ्रम निवृत्त झाला. द्वैतभावाचे कर्म थांबले. जगांतील विषमभाव गेला, ९२

परी अचुंबित वर्तणें । अघटमान कर्म करणें ।
अत्यंत उग्रता मिरवणें । दुर्धरपणें भयानकु ॥ २९३ ॥
तथापि कोठेंही आसक्त न होतां जगांत रहाणे, दुसऱ्या कोणालाही करतां येणार नाहीं, असें कर्म करणें न्यायनिष्ठूर होऊन जगत् आपल्याला वचकून राहील, अशा प्रकार जगांत मिरवणे हें सद्‌गुरूचें लक्षण आहे. ९३

आपण आपणियामाजी हंसत । ध्वनितें बोले परमार्थ ।
तेथें बोधेना शिष्याचें चित्त । पडे दुश्चित ते ठायीं ॥ २९४ ॥
जो मनांतल्या मनांत जगाची मूढता पाहून हसत असतो, अन्योक्तीनें परमार्थ बोलतो, आणि त्यामुळें शिष्याच्या चित्ताला कांहीं उमज न पडून तो गोंधळांत पडतो. ९४

ऐसा जो वर्ते ब्रह्मज्ञानी । त्याची ब्रह्मस्थिती न मने जनीं ।
मा कोण जा‍ईल भाव धरोनि । बोधालागोनी त्यापाशीं ॥ २९५ ॥
जो ब्रह्मज्ञानी असें वर्तन करतो त्याची ब्रह्मस्थिति सामान्य लोकांना प्रतीत होत नाहीं. असें वागण्यांत त्याचा हा आशय असतो कीं, आपल्याजवळ बोवासाठी लोकांची व्यर्थ गर्दी होऊं नये. ९५

आतां सद्‌गुरुचीं जीं निजलक्षणें । राया सांगेन तुजकारणें ।
जें ऐकतां अंतःकरणें । सुखी होणें सद्‌भावें ॥ २९६ ॥
आतां सद्‌गुरूची जी स्वाभाविक लक्षणें असतात तीं मी तुला सांगतो. तीं ऐकून तुझें अंतकरण सद्‌भावानें सुखी होईल. ९६

तरी जो कायावाचामनें । अतिकृपाळू दीनाकारणें ।
तोडी शिष्याचीं भवबंधनें । उठवी ठाणें अहंकाराचें ॥ २९७ ॥
जो दीनावर शरीर, वाणी व मन यांनी अतिशय कृपा करतो, शिष्याची संसारबंधनें तोडितो, अहंकाराची ठाणीं उठवतो, ९७

जो शब्दज्ञानें पारंगतु । ब्रह्मानंदे सदा डुल्लतु ।
शिष्य प्रबोधनीं समर्थू । यथोचितू निजभावे ॥ २९८ ॥
शब्दज्ञानामध्यें पारंगत असतो, ब्रह्मानंदाने सदा डुलत असतो, शिष्याला आत्मभावाने अधिकाराप्रमाणें बोध करण्यास समर्थ असतो, ९८

ज्याचा जैसा जैसा भावो । तैसा तैसा करी अनुभवो ।
तरी गुरुत्वाचा अहंभावो । अणुमात्र पहा हो धरीना ॥ २९९ ॥
ज्याचा जसा भाव असतो तशीच त्याला प्रतीति आणून देतो; तथापि गुरुत्वाचा अहंभाव अणुमात्रही धरीत नाहीं. ९९

शिष्यपासूनि सेवा घेणें । हें स्वप्नींही न स्मरे मनें ।
शिष्याची सेवा स्वयें करणें । पूज्यत्वें पाहणें निजशिष्यां ॥ ३०० ॥
शिष्यापासून सेवा करून घेण्याची कल्पना कधीं स्वप्नांतही त्याच्या चित्तांत उद्भवत नाहीं. उलट स्वत: शिष्याची सेवा करणें व आपल्या शिष्याला पूज्यत्वानें पहाणे हा सद्‌गुरूचा स्वभावच आहे. ३००

शिष्य देखावा पुत्रासमान । हें स्मृतिवाक्य असे प्रमाण ।
दृष्टीं देखो नेणें गौण । शिष्या देखे पूर्ण ब्रह्मत्वें ॥ ३०१ ॥
‘शिष्याला पुत्रासमान पहाणे’ हें स्मृतिवाक्य याविषयी प्रमाण आहे, त्यामुळें शिष्याला कमी समजणें हें त्याला ठाऊकच नसतें. त्याला तो पूर्ण ब्रह्मभावाने पहातो. १

शिष्य सेवा करी निजभावार्थें । परी तो सेवक न म्हणे त्यातें ।
ज्यासी भगवद्‌रूप सर्व भूतें । शिष्य वेगळा तेथें सेवकत्वें नुरे ॥ ३०२ ॥
शिष्य आपल्या भावनेनेंच त्याची सेवा करतो, पण सद्‌गुरू त्याला आपला सेवक म्हणत नाहीं, कारण ज्याला सर्व -भूते भगवद्‌रूप झाली त्याला शिष्य सेवकत्वानें वेगळा कोठचा रहाणार ? २

ऐसा मी एक महायोगी । हेंही न मिरवी तो जगीं ।
गुरुत्वाचा ताठा अंगीं सर्वथा । शिगीं लागों नेदी ॥ ३०३ ॥
मी हा असा एक महायोगी आहें, असेही तो जगांत मिरवीत नाहीं. तो आपल्या अंगीं सद्‌गुरुत्वाचा ताठा केव्हांही भरू देत नाहीं. ३

आपुल्या योगक्षेमाचें सांकडें । स्वप्नींही न घाली शिष्याकडे ।
शिष्य संकट अतिगाढें । निवारी रोकडें निजांगें जो ॥ ३०४ ॥
आपल्या चरितार्थाचा भार स्वप्नांतही शिष्यावर घालीत नाहीं. उलट शिष्याचे फार मोठेंही संकट स्वतःच निवारण करतो. ४

मी एक अकर्ता निजात्मयोगी । म्हणौनि विषयांतें न भोगी ।
अथवा विषयो निःशेष त्यागी । हाही आग्रहो अंगीं असेना ॥ ३०५ ॥
मी एक अकर्ता आत्मयोगीआहे, अशा अभिमानाने विषयांचा भोग घेत नाहीं. किंवा विषयाचा निःशेष त्याग करावा असाही त्याचा आग्रह नसतो. ५

तो विषय भोगी ना स्वयें त्यागी । तो अदृष्टाच्या निजविभागीं ।
लावूनियां देहाच्या अंगीं । परब्रह्मयोगीं विचरत ॥ ३०६ ॥
तो आसक्तीने विषयभोगहि घेत नाहीं व स्वतः त्याचा त्यागहि करीत नाहीं. तर प्रारब्धाच्या अनुसार जें प्राप्त होईल तें देहाकडून करवून परब्रह्मचिंतनात निमग्न असतो. ६

देह दैवें पालखीमाजीं चढे । अथवा विष्ठेमाजीं पडे ।
तें दोहींचें सुखदुःख त्याकडे । मी म्हणौनि पुढें कदा न रिघे ॥ ३०७ ॥
देह पालखींत बसला किंवा विष्ठेत पडला तरी त्या दोहोंचेंही सुखदुःख त्याच्यापुढे ‘मी’ म्हणून कधींच उभे रहात नाहीं. ७

देहीं असोनि नाहीं अहंकृती । गेहीं असोनि नाहीं गृहासक्ती ।
शेखीं लोकांमाजीं लौकिकस्थिती । सुखें वर्तती लोकांसरिसें ॥ ३०८ ॥
देहांत असूनही त्याचा अहंकार नाहीं व गृहासक्ति नाहीं. उलट तो व्यवहारांत लौकिक स्थितीला अनुसरून लोकाप्रमाणें सुखाने वागतो. ८

त्यासी स्त्री म्हणे माझा भर्ता । पुत्र म्हणे माझा पिता ।
शिष्य म्हणती गुरु तत्त्वतां । तो त्यांहूनि परता त्यांमाजीं वर्तें ॥ ३०९ ॥
त्याची पत्नी त्याला हा माझा पति असें म्हणते. पुत्र हा माझा पिता असें म्हणतो, शिष्य हा आपला गुरु असें म्हणतात. पण तो तत्त्वतः त्या सर्वांहून अलिप्त राहून, त्यांच्यांत असतो. ९

ऐशिया पूर्णप्रतीती । आचरोनि दावी भक्ती ।
हरि भजावा सर्वां भूतीं । हेंच शिष्यांप्रती उपदेशी ॥ ३१० ॥
व अशा आपल्या पूर्ण प्रतीतीने ईश्वराची भक्ति करून दाखवितो आणि सर्व भूतांमध्ये हरीचे भजन करावे असाच शिष्यांना उपदेश करतो. ३१०

हीं सद्‌गुरुचीं निजलक्षणें । पंडितां न कळती ज्ञातेपणें ।
पूर्णानुभवी जाणती खुणे । इतरांचें जाणणें पांगुळे तेथ ॥ ३११ ॥
सद्‌गुरूचीं ही स्वाभाविक लक्षणें पंडितांना पांडित्याच्या अभिमानामुळें कळत नाहींत. जे पूर्णानुभवी असतात तेच ही सद्‌गुरूची खूण ओळखतात. इतरांचे ज्ञान त्याच्या ठिकाणीं कुंठित होतें. ११

त्याचे गुरुत्वाची वोळखण । अंगीं निजशांति पूर्ण ।
हेंचि सद्‌गुरुत्वाचें लक्षण । मुख्य भूषण हेंचि राया ॥ ३१२ ॥
पूर्ण शांति, हीच त्याच्या गुरुत्वाची खूण आहे. तेंच सद्‌गुरुत्वाचें मुख्य लक्षण व मुख्य भूषण आहे. १२

जगीं शांति जाली परदेशी । कोठेंही ठावो न मिळे तिशीं ।
ते आली सद्‌गुरुपायांपाशीं । सुखवासासी वसावया ॥ ३१३ ॥
या जगांत शांतीला कोठेंच अवकाश मिळेनासा झाल्यामुळे ती बिचारी निराधार होऊन सद्‌गुरूंच्या पायापाशी सुखाने रहावयास आली. १३

यापरी सद्‌गुरुपाशीं शांती । स्वयें आली सुखवासवस्ती ।
जेवीं कां माहेरा‍आंतौती । स्वानंदें क्रीडती कन्या जैशी ॥ ३१४ ॥
आणि कन्या माहेरी आल्यावर जशी स्वानंदाने रममाण होते, त्याप्रमाणें सदगुरूपाशीं आलेली शांति तेथें सुखाने रहाते. १४

जाणोनि वेदशास्त्र निश्चितीं । जो न मिरवी गा व्युत्पत्ती ।
ज्यासी अपरोक्षें पूर्ण शांती । तो सद्‌गुरुमूर्ति निश्चयें राया ॥ ३१५ ॥
वेदशास्त्रांचें निश्चित ज्ञान असूनही जो आपलें पांडित्य मिरवीत नाहीं आणि पूर्ण शांतीचा साक्षात अनुभव घेतो, तोच सद्‌गुरु होय, असें तू निश्चयानें जाण. १५

झणीं श्रोते कोपती येथ । म्हणतील ग्रंथ वाढविला व्यर्थ ।
निष्णात या पदाचा अर्थ । काढितां तेथ स्फुरलें हो ॥ ३१६ ॥
सद्‌गुरूचें हें सविस्तर वर्णन ऐकून श्रोते कदाचित् रागावतील आणि म्हणतील कीं, ‘हा ग्रंथ तुम्ही व्यर्थ वाढविलात.’ पण मी तरी काय करूं ! श्लोकांतील ‘निष्णात’ या पदाचा अर्थ सांगत असतांना मला हें वर्णन सहज स्फुरले. १६

हे माझे गांठीची नव्हे युक्ती । सद्‌गुरु आपण आपली स्थिती ।
बोलवीतसे ग्रंथार्थीं । पदपदार्थीं साधूनि ॥ ३१७ ॥
पण ही युक्ति माझ्या पदरची नव्हे. सद्‌गुरु आपणच आपली स्थिति माझ्याकडून शब्द व शब्दार्थ साधवून ग्रंथार्थरूपानें बोलवीत आहे. १७

तरी सद्‌गुरुचीं लक्षणें । न वर्णवती अगाधपणें ।
वेद वेडावले मुकेपणें । तेथें माझें बोलणें सरे केवीं ॥ ३१८ ॥
तथापि सद्‌गुरूचीं लक्षणें अगाध आहेत; त्यामुळें मला त्यांचे यथार्थ वर्णन करवत नाहीं. अहो, वेद सुद्धा जेथें वेडावले व स्तब्ध बसले तेथें माझें बोलणे कसें पुरे पडणार ! १८

येथ आश्चर्य कैसे देखा । श्रीभगवत देशभाखा ।
परमार्थु साधिला नेटका । तुष्टला निजसखा जनार्दनस्वामी ॥ ३१९ ॥
पण यांत एक मोठें आश्चर्य कसें आहे तें पहा ! श्रीमद्‌भागवतांतील परमार्थ या देशभाषेनें चांगला साधला व त्यामुळें निजसखा जनार्दनस्वामी संतुष्ट झाला. १९

एका जनार्दना शरण । त्याची जैं होय कृपा परिपूर्ण ।
त्या देहीं असता देहबंधन । नातळे जाण गुरुभक्तां ॥ ३२० ॥
हा एकनाथ जनार्दनस्वामींनाच शरण आहे. त्याची ज्यावर पूर्ण कृपा होते, तो देहामध्ये असला तरी त्याला देहबंधन स्पर्श करीत नाहीं. गुरुभक्तांना देहबंध प्राप्त होत नाहीं, हें तूं निश्चयानें जाण. ३२०

ज्याचे सेवितां निजचरण । देहीं न बाधी देहबंधन ।
त्यासी जाहलिया अनन्य शरण । दे अगाध कोण हें न कळे वेदां ॥ ३२१ ॥
त्याच्या चरणाचें सेवन केलें असतां देहांत असूनही देहबंधन प्रात होत नाहीं. त्यालाच अनन्य शरण झाल्यावर अगाध ज्ञानाचा ठेवा कोण कसा देतो हें कळत नाहीं. २१

न करितां सद्‌गुरुभक्ती । कदा नव्हे परमार्थप्राप्ती ।
यालागीं सद्‌गुरुभक्ती । बोलिलीं ग्रंथीं शिष्यहितार्थ ॥ ३२२ ॥
सद्‌गुरूची भक्ति केल्यावांचून परमार्थप्राति केव्हांही होत नाहीं. म्हणून शिष्याच्या हितासाठी या ग्रंथांत गुरुभक्ति सांगितली. २२

यालागीं पूर्ण सद्‌गुरुपाशीं । अनन्य शरण होतां त्यासी ।
तो सद्‌भावें निववी शिष्यासी । निजबोधेंसीं यथार्थ ॥ ३२३ ॥
गुरूला अनन्य शरण झालें असतां तो यथार्थ आत्मबोधाने व सद्‌भावनेनें शिष्याला सुखी करतो. २३

सद्‌गु्रुस्थितीचें निरूपण । राया सांगितलें संपूर्ण ।
आतां शिष्याचे लक्षण । सावधान अवधारीं ॥ ३२४ ॥
राजा, मीं सद्‌गुरुस्थितीचें पूर्णपणे निरूपण केलें. आतां तूं सावधान मनाने शिष्याचे लक्षण ऐक. ३२४

तत्र भागवतान्धर्मान्शिक्षेद्‌गुर्वात्मदैवतः ।
अमाययानुवृत्त्या यैस्तुष्येदात्माऽऽत्मदो हरिः ॥ २२ ॥
तत्र गुर्वात्मदैवतः सन् – तेथे ज्याचा आत्मा व दैवत गुरुच आहे असे होऊन – अमायया अनुवृत्त्या – निष्कपट अशा सेवेने – भागवतान् धर्मान् शिक्षेत् – भगवंतांनी स्वमुखाने सांगितलेले आत्मप्राप्तीचे उपाय असे धर्म शिको. – यैः आत्मा – ज्यांचे योगे आत्मरूप असा – आत्मदः च हरिः तुष्येत् – व भक्तांना आत्मस्वरूप देणारा असा हरि संतुष्ट होतो. ॥ २२ ॥ [ ज्या भागवत धर्मांनी वस्तुतः सर्व भूतांचा आत्मा पण बलिप्रभूतीप्रमाणें उपासकांना आत्मभाव देणारा हरि संतृप्त होईल, ते भागवतधर्म गुरु हाच ज्याचा आत्मा व दैवत आहे, अशा शिष्याने निष्कपट सेवेनें गुरूपासून शिकावे. ] २२.

वरीवरी दिसती सात्त्विक । भीतरीं विकल्पी शिष्य एक ।
एक ते केवळ दांभिक । एक ज्ञानठक अतिधूर्त ॥ ३२५ ॥
कांहीं शिष्य वरून मात्र सात्त्विक दिसतात, पण आंतून मोठे विकल्पी व दांभिक असतात. कोणी ठकवून ज्ञान संपादन करणारे अतिधूर्त असतात. २५

एक ते केवळ प्रतिष्ठाकाम । एकासी पूज्यतेचा संभ्रम ।
एकासी जाणिवेचा आक्रम । एकाचे पोटीं भ्रम महासिद्धीचा ॥ ३२६ ॥
कित्येकांना केवळ प्रतिष्ठेची हांव असते. कित्येकांना पूज्यतेची हाव असते. कोणाला ज्ञातृत्वाचा अभिमान असतो. कोणाला आपण महासिद्धि मिळवाव्या असें वाटतें. २६

एक वाग्वादी वाजट । एक अतिशयेंसीं कर्मठ ।
एक केवळ कर्मनिष्ठ । आम्ही ब्रह्मनिष्ठ अभिमानें ॥ ३२७ ॥
कोणी नुस्ते वावदूक असतात. कोणी अतिशय कर्मठ असतात. तर कोणी ‘आम्ही ब्रह्मनिष्ठ आहो’ या अभिमामानें कर्मभ्रष्ट झालेले असतात. २७

एका आवडे वायुधारण । एका आसनजयाभिमान ।
एकाचें संशयी मन । विश्वास पूर्ण दृढ नाहीं ॥ ३२८ ॥
कोणाला प्राणायामाची आवड असते. कित्येकांना आसनजयाचा अभिमान असतो. कित्येकांचे मन संशयी असतें. पूर्ण विश्वास कोठेच नसतो. २८

एक आदरें उपदेशु घेती । मग होय नव्हे विकल्प चित्तीं ।
ऐशा अनेक शिष्यपंक्ती । ते जाण निश्चितीं मायिक ॥ ३२९ ॥
कित्येक मोठ्या आदराने गुरूपदेश घेतात, पण या उपदेशाने आपलें परमार्थिक कल्याण होईल किंवा नाहीं असा विकल्प त्यांच्या मनांत असतोच. शिष्याचे असे अनेक प्रकार आहेत, पण ते सर्व ढोंगी आहेत, असें तूं समज. २९

आतां जे कां अमायिक । शोधितसत्त्वाचे सात्त्विक ।
मुख्य परमार्था साधक । जे अवंचक सर्वस्वें ॥ ३३० ॥
आतां जे निष्कपट, शुद्ध सत्त्वगुणसंपन्न, मुख्य परमार्थाचे साधक, सर्वथा अवंचक, गुरुचरणाचे अंकित झाले, ३३०

जे गुरुचरणाचे अंकिले । जे गुरुवाक्या जीवें विकले ।
सद्‌गुरूलागीं वहिलें । सर्वस्व आपुलें वोवाळिती ॥ ३३१ ॥
गुरुवाक्याला मनाने विकून घेतलेलें व आपलें सर्वस्व सदगुरूवरून सत्वर ओवाळून टाकणारे, ३१

जो सद्‌गु‍रूच्या बोलावरी । जीविताची कुरवंडी करी ।
जो गुरु‍आज्ञेबाहेरी । तिळभरी हों न शके ॥ ३३२ ॥
जो सदगुरूच्या शब्दावर आपल्या जीविताची कुरवंडी करतो, गुरूच्या आज्ञेबाहेर तीळभरही जाऊं शकत नाहीं, ३२

सद्‌गुरूतें मनुष्यबुद्धी । पाहोंचि नेणे जो त्रिशुद्धी ।
सेवेलागीं निरवधी । हर्षानंदीं तत्पर ॥ ३३३ ॥
सद्‌गुरूला मनुष्यबुद्धीनें पहाणे ज्याला ठाऊकही नाहीं आणि जो गुरुसेवेसाठीं सत्य सत्य, निरतिशयहर्षाने तत्पर असतो ३३

निजभावार्थें सादर । सेवेलागीं अतितत्पर ।
शरीर आठही प्रहर । अणुमात्र वंचिना ॥ ३३४ ॥
व आठही प्रहर ती करण्यांत एक अणुमात्रही अंतर करीत नाहीं, ३४

उंच अथवा नीच काम । म्हणो नेणे मनोधर्म ।
गौण करोनि नित्यकर्म । मानी उत्तमोत्तम गुरुसेवा ॥ ३३५ ॥
हें काम माझ्या योग्यतेचें आहे व हें काम योग्यतेचें नाहीं, असें ज्याच्या मनाला वाटत नाहीं, आपलें नित्यकर्मही गौण मानून जो गुरुसेवेला उत्तमोत्तम समजतो, ३५

सेवेंलागीं निष्कपट । नित्य निजभावें चोखट ।
जंव जंव सेवा पडे सदट । तंव तंव उद्‌भट उल्हासु ॥ ३३६ ॥
मोठ्या श्रद्धेने सेवा करण्यासाठीं गुरुसंनिध रहातो आणि कष्टतर सेवा करण्याचा जसा जसा प्रसंग येतो, तसा तसा त्याचा उल्हास वाढत जातो. ३६

सच्छिष्य असच्छिष्य समुदावो । सद्‌गुरूसी सारिखेचि पहा वो ।
ज्याचे हृदयीं जैसा भावो । तैसा पहा हो फळभोग ॥ ३३७ ॥
सद्‌गुरूला अशाप्रकारचे सच्छिष्य व पूर्वी सांगितल्याप्रकारचे कपटी असच्छिथ्य हे दोन्हीं सारखेच पण ज्याचा जसा भाव असतो, तसा त्याला फलाचा लाभ होतो. ३७

‘भावेषु विद्यते देवो’ । हा उपदेशीं मुख्य निर्वाहो ।
आपुला आपणया भावो । फळभोग पहा हो भोगवी ॥ ३३८ ॥
‘भावेधु विद्यते देवः’ जेथे भाव तेथें देव, हाच न्याय उपदेशालाही लागू आहे. प्रत्येकाला त्याच्या त्याच्या भावनेप्रमाणें फल मिळत असतें. ३८

चुकवावया मृत्यूचा ठावो । जाणिवे आणितां निजभावो ।
हिरण्यकशिपु नाडला पहा हो । संधी साधोनि देवो निर्दळी त्यासी ॥ ३३९ ॥
हिरण्यकश्यपूने मृत्यु टाळण्यासाठी आपल्या भावनेप्रमाणें यत्न केला, पण तो बिचारा फसला. देवाने संधि साधून त्याचा घात केला. ३९

तेथेंचि प्रल्हादाचा भावो । मज रक्षिता देवाधिदेवो ।
त्यासी साक्षेपें मारितां रावो । मरणचि वावो भावार्थें केलें ॥ ३४० ॥
पण त्याच्या उलट ‘माझें रक्षण करणारा देवाधिदेव आहे’ असा प्रल्हादाचा भाव होता, त्यामुळें त्याच्या पित्याने त्याला मारण्यासाठीं वाटेल तितके जरी प्रयत्न केले, तरी त्याच्या भावनेनें ते सर्व फुकट गेले. ४०

परमार्थीं जें जाणपण । ते जाणावी नागवण ।
यालागीं सद्‌भावें जो संपूर्ण । तो जन्ममरणछेदकु ॥ ३४१ ॥
परमार्थांत ज्ञानीत्वाचा अभिमान ही शुद्ध नागवण आहे. जो पूर्ण सद्‌भावानें युक्त असतो, तोच जन्ममरणाचा उच्छेद करतो. ४१

मी शिष्यपरीक्षकु ज्ञाता । हे सद्‌गु्रुसी नाही अहंता ।
तेथें जैशी त्याची भावार्थता । तैशा तैशा अर्था तो पावे ॥ ३४२ ॥
मी मोठा ज्ञाता, शिष्याची परीक्षा करणारा आहें, ही अहंता सद्‌गुरूला नसते. त्यामुळेंत्या शिष्याचा जसा भाव असतो तसें त्याला फल मिळतें. ४२

हें असो सच्छिष्याचा सद्‌भावो । राया अभिनव कैसा पहा हो ।
गुरु ब्रह्म ऐक्यभावो । निजनिर्वाहो निष्टंक ॥ ३४३ ॥
सच्छिष्याचा सद्‌भाव कसा अपूर्व असतो, तो पहा. गुरु आणि ब्रह्मा याचा ऐक्यभाव हाच त्याचा निश्चित निर्वाह असतो. ४३

माझ्या इंद्रियवृत्ती चाळिता । सद्‌गुरु निजात्मा मजआंतौता ।
बाह्य सेवेलागीं सर्वथा । ब्रह्ममूर्ति तत्त्वतां सद्‌गुरु मानी ॥ ३४४ ॥
माझ्या इंद्रियवृत्तींना प्रेरणा करणारा माझा आत्मा सद्‌गुरु माझ्या हृदयांत आहे आणि बाह्य सेवेसाठी तत्त्वतः हा ब्रह्ममूर्ति सद्‌गुरु आहे, असें तो मानतो. ४४

सद्‌गुरुचरणीं आपण । चित्त-वित्त-जीवितेंसीं पूर्ण ।
करूनि घाली आत्मार्पण । सर्वस्वें संपूर्ण सर्वभावें ॥ ३४५ ॥
तो पूर्ण भावनेनें चित्त, वित्त व जीवित हें एकरूप करून सदगुरुचरणीं घालतो व सर्वस्वानें आत्मार्पण करतो. ४५

तेथें संतुष्टला स्वामी पूर्ण । तोही सर्वस्वें भुलोन ।
आवडी निजांगें आपण । सेवका आधीन स्वामी होये । ३४६ ॥
त्यामुळें पूर्ण संतुष्ट झालेला स्वामी प्रेमाला सर्वथा भुलून आपण स्वांगाने सेवकाधीन होतो. ४६

आत्मार्पण करितां बळी । द्वारीं द्वारपाळ जाहला वनमाळी ।
ऐसी भजनभावाची नवाळी । सेवकाजवळी स्वामी तिष्ठे ॥ ३४७ ॥
बलीने आत्मसमर्पण केलें असतां स्वतः वनमाळीही त्याच्या द्वारांतील द्वारपाल झाला. भजनभावाची अपूवर्ता ही आहे कीं, स्वामी सेवकाजवळ रहातो. ४७

एवढी ये अगाध प्रीती । उत्तम भक्त स्वयें पावती ।
भाळ्याभोळ्यां हेचि स्थिती । कैशा रीती आतुडे ॥ ३४८ ॥
जे उत्तम भक्त असतात, ते स्वतःच अशा अगाध प्रीतीला पात्र होतात. पण भाळ्याभोळ्या लोकांना ही स्थिति कशी प्राप्त होते ! ४८

याचिलागीं सद्‌गुरूपाशीं । शरण रिघावें सर्वस्वेंशीं
तो संतोषोनियां शिष्यासी । भजनधर्मासी उपदेशी ॥ ३४९ ॥
त्यांनींही सद्‌गुरूला सर्वभावानें शरण जावे, म्हणजे तोही संतुष्ट होऊन शिष्याला उपदेश करतो. ४९

जेणें भजनें भगवंत । भजोनि जाहले उत्तम भक्त ।
ते भागवतधर्म समस्त । शिकावे निश्चित सद्‌भावेंसीं ॥ ३५० ॥
ज्या भजनाने भगवंताचे भजन करून उत्तम भक्त झाले, ते सर्व निश्चित भागवतधर्म सद्‌भावाने शिकावे. ३५०

मुख्य भागवतधर्मस्थिती । अवश्य करावी सत्संगती ।
हेंचि सद्‌गुरु उपदेशिती । असत्संगतित्यागार्थ ॥ ३५१ ॥
सत्संगति अवश्य करावी. कारण ती मुख्य भागवतवर्मस्थिति आहे आणि सद्‌गुरुही असत्संगतीच्या त्यागासाठी शिष्याला हेंच शिकवितात. ३५१.

सर्वतो मनसोऽसङ्गमादौ सङ्गं च साधुषु ।
दयां मैत्रीं प्रश्रयं च भूतेष्वद्धा यथोचितम् ॥ २३ ॥
आदौ – सर्वप्रथम – सर्वतः – सर्व म्हणजे स्त्री, पुत्र, धन, देह इत्यादिचे ठिकाणी – मनसः असंगं – मनाची अनासक्ति (वैराग्य) – साधुषु संगं च – व साधूंचा सहवास – भूतेषु च – आणि सर्व भूतांचे ठिकाणी – यथोचितम् – ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार – दयां मैत्रीं प्रश्रयं अद्धा – दया, मैत्री, नम्रता असावी. ॥ २३ ॥ [ अनासक्ति, साधुसंग, व हीन प्राण्यांवर दया, समानशीलांशी मैत्री व श्रेष्ठांशी विनय हे गुण साक्षात् शिकावे. ] २३.

सर्वांपासोनि निःसंग । जरी मनीं होणें आहे चांग ।
तैं अवश्य धरावा सत्संग । असत्संग त्यागावा ॥ ३५२ ॥
मनाने सर्व विषयांपासून विरक्त व्हावें, अशी जर इच्छा असेल तर अगोदर सत्संग अवश्य धरावा व असत्संग सोडावा. ५२

मुख्य असत्संग देहसंगती । त्याची समूळ करावी निवृत्ती ।
जगीं दाटुगी सत्संगती । जाण निश्चिती नृपनाथा ॥ ३५३ ॥
देहसंगति हाच मुख्य असत्संग आहे. त्याची समूळ निवृत्ति करावी. जगामध्ये सत्संगति प्रबल आहे, असें हे राजा, तूं निश्चयाने जाण ५३

तेथें दया मैत्री प्रश्रयो पूर्ण । मुख्यत्वें हें त्रिविध लक्षण ।
अवश्य करावें आपण । सत्संग प्रमाण स्वहितासी ॥ ३५४ ॥
जेथें पूर्ण दया, मैत्री व विनय हें त्रिविध लक्षण मुख्यत्वेंकरून असतें, त्याचाच सत्संग करावा. कारण तोच स्वहिताला कारण होतो. ५४

सांडोनिया थोरपण । साधूसी लीन हो‍आवें संपूर्ण ।
सांडोनियां देहाभिमान । त्यासी लोटांगण घालावें ॥ ३५५ ॥
आपलें थोरपण सोडून साधूपुढें पूर्णपणे लीन व्हावें. देहाभिमान सोडून त्यांना लोटांगण घालावे ५५

साधूपरता पूज्य पहा हो । जगीं नाही आन देवो ।
संतपूजनें देवाधिदेवो । स्वयमेवो संतुष्टे ॥ ३५६ ॥
या जगांत साधूहून निराळा पूज्य देव नाहीं. संतांच्या पूजनाने देवाधिदेव स्वतःच संतुष्ट होतो. ५६

संतपदींचे रजःकण । शिरीं वंदावे श्रद्धेने पूर्ण ।
संतांपुढें जाणपण । सर्वथा आपण न मिरवावें ॥ ३५७ ॥
संतचरणाचे रजःकण मोठ्या श्रद्धेने मस्तकावर धारण करावे. संतांपुढें आपलें ज्ञान सर्वथा मिरवू नये. ५७

देखोनि संतसमुदावो । अनन्यगती भगवद्‌भावो ।
भगवभावें नम्र स्वभावो । प्रश्रयो पहा हो या नांव ॥ ३५८ ॥
संतांचा समुदाय पाहून त्यांमध्यें अनन्यभावानें भगवद्‌भाव ठेवावा, कारण भगवद्‌भावानें नम्र होण्याचे जें शील त्यालाच विनय म्हणतात. ५८

नम्रता सेवितां सन्तचरण । येथें भूतदया वाढें पूर्ण ।
हें दयेचें निजलक्षण । सावधान । अवधारीं ॥ ३५९ ॥
नम्रपणानें संतचरणांची सेवा केली असतां भूतदया पूर्णपणे वाढते. हे राजा, आतां तूं दयेचे लक्षण सावधान चित्ताने ऐक. ५९

भूतांसी कठिणपण । देखतां निघों पाहे प्राण ।
मा स्वयें करील आपण । हें सर्वथा जाण स्वप्नीं न घडे ॥ ३६० ॥
भूताशी कोणी निष्ठरपणानीं वागत आहे, असें पहाताच याचे प्राण कासावीस होतात. मग हा स्वतः त्यांच्याशीं निष्ठुरपणे वागेल, हें त्याच्याकडून स्वप्नींही घडत नाहीं. ३६०

जेणें आपणासी होय दुःख । तें भूतांसी करीना निःशेख ।
जेणें आपणासी होय सुख । तें आवश्यक करी दीना ॥ ३६१ ॥
ज्याच्या योगाने स्वतःला दुःख होतें, तसले वतन तो भूतांशी कधींच करीत नाहीं. ज्याप्रकारच्या वर्तनाने त्याला स्वतःला सुख होतें, तसेंच वर्तन तो दीनाशी करतो. ६१

सर्व भूतीं दया समान । कदा न बोले कठिणपण ।
भूतांची पीडा निवारण । करोनि आपण सुखोपाय चिंती ॥ ३६२ ॥
त्याची सर्व प्राण्यांवर सारखीच दया असते. तो कोणालाही कधीं कठिण शब्द बोलत नाहीं. भूतांच्या पीडेचे निवारण करणें हाच आपल्या सुखाचा उपाय आहे, असें तो समजतो. ६२

जीवमात्रीं दुरुक्ती बोलतां । जिव्हेच्या घेवों पाहे जीविता ।
भूतीं दुष्टपण चाळितां । समूळ निजचित्ता निर्दाळूं पाहे ॥ ३६३ ॥
एखाद्या सामान्य जीवाला उद्देशून तोंडांतून कठिण शब्द निघाल्यास तो त्या जिव्हेचा जीव घेऊं पहातो. एखाद्या प्राण्याविषयीं दुष्ट संकल्प मनांत आल्यास आपल्या चित्ताचा समूळ नाश करण्यास तयार होतो. ६३

भूतांसी जेथ पीडा पावे । त्यातळी जीव घालूं धांवे ।
जीवापरीस भूतें सर्वें । दयागौरवें पढियंतीं ॥ ३६४ ॥
प्राण्यांना जेथे पीडा होत असेल तेथें आपला जीव घालवावयास धावतो. दयेमुळे त्याला सर्व भूते आपल्या जीवापेक्षांही अधिक वाटतात. ६४

ऐसें जें कारुण्य पूर्ण । त्या नांव दया संपूर्ण ।
आतां मैत्रीवें लक्षण । असाधारण तें ऐका ॥ ३६५ ॥
असल्या कारुण्यालाच दया हें योग्य नांव आहे. आतां मैत्रींचे लक्षण सांगतो, तें लक्ष देऊन ऐक. ६५

सर्व भूतांचे ठायीं । सुहृदावांचोनि दुजें नाहीं ।
तरी न करितांचि मैत्री पाहीं । ठायींचे ठायीं अलोलिक ॥ ३६६ ॥
सर्व भूतांमध्यें जो सुहृद्‍भाव ठेवतो, म्ह० त्याला आपल्या सुहृदावांचून दुसरें कांहीं दिसतच नाहीं व अशी मैत्री न ठेवितां जो भूतांमध्ये भेदभाव ठेवितो तो भगवद्‌भक्तच नव्हे. ६६

जे विषयवियोगें न विटे । नाना विकल्पीं न तुटे ।
आलिया परम संकटें । मैत्री नेटेंपाटें सदा ग्राह्य ॥ ३६७ ॥
जो विषयसंबंधाचा कंटाळा करीत नाहीं, ज्याच्या मनांत अनेक विकल्प उठत नाहींत, अनेक संकटे जरी आली, तरी जो मैत्रीपासून ढळत नाहीं, ६७

या नांव गा मित्रभावो । प्राण गेलिया न तुटे पहा हो ।
देखतां कल्पांतकाळघावो । निजमित्रसमुदावो एकवटे कीं ॥ ३६८ ॥
यालाच साधूचा मित्रभाव म्हणतात. प्राण जरी गेला व कल्पान्त कालाचा घाला येत आहे असें दिसलें, तरी त्याचा मित्रभाव तुटत नाहीं. उलट तशा प्रसंगीही त्याचा मित्रसमुदाय एकरूप होतो. ६८

ऐसी आचरतां निजस्थिती । श्रद्धा उपजे सर्वां भूतीं ।
त्या श्रद्धेची व्युत्पत्ती । यथनिगुती सांगेन ॥ ३६९ ॥
अशा आत्मस्थितीचें आचरण करीत असतां सर्व भूतांविषयीं श्रद्धा उत्पन्न होते. श्रद्धेचीही मी आतां उपपत्ति सांगतो. ६९

नवल श्रद्धेचें लक्षण । ब्रह्मा मुंगी समसमान ।
तरी यथोचित विधान । सर्वथा जाण चुकेना ॥ ३७० ॥
श्रद्धेचे लक्षण आश्चर्यकारक आहे. तिच्या योगानं मुंगी व ब्रह्मदेव समानअसतात, तथापि प्रत्येक प्राण्याशीं त्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणें आचरण करणें सर्वथा चुकत नाहीं. ३७०

अर्घ्यपाद्यादि पूजन । सकळ दान आणि सन्मान ।
हे श्रद्धा ब्रह्मणीं संपूर्ण । एकासी तें जाण अन्नमात्रचि ॥ ३७१ ॥
अर्घ्य-पाद्यादिकांनी पूजन, सर्वस्वदान आणि सन्मान ही पूर्ण श्रध्दा बाह्मणांमध्येंच उचित आहे; पण कित्येकांना नुस्ते अन्न देणेच उचित आहे. ७१

एका अन्न आच्छादन । एकासी ते कोरडे कण ।
तृण आणि जीवन । एका पयःपान यथोचित ॥ ३७२ ॥
दुसऱ्या कित्येकांना अन्न व आच्छादान उचित. कांहींना धान्याचे कोरडे कण, कोणाला तृण व जळ व कांहींना नुस्ते जलपान उचित आहे. ७२

जेणें ज्यासी सुख संपूर्ण । तें तें करी उचित श्रद्धें जाण ।
अनुचित श्रद्धेचें विंदाण । दुःखकारी संपूर्ण सर्वार्थीं ॥ ३७३ ॥
ज्याने ज्याला पूर्णसुख होईल, तें तेंच श्रद्धेने करणें उचित होय. अनुचित श्रद्धेचे लक्षण दुःखकर व सर्वांशी अपूर्ण आहे. ७३

जेवीं ब्राह्मणा वाढिलें तृण । गा‍ईस वाढिलें मिष्टान्न ।
श्वानासी बैसणें सिंहासन । साधूसी आसन थारोळा ॥ ३७४ ॥
जसे ब्राह्मणापुढें गवत वाढणे व गायीपुढें मिष्टान्न ठेवणे, कुत्र्याला सिंहासनावर बसविणे आणि साधूला थारोळयावर बसण्यास सांगणे हें श्रद्धेचे अनुचित लक्षण आहे. ७४

व्याघ्रासी पडिल्या लंघन । त्यासी अर्पूं नये गोदान ।
गाय गादल्या संपूर्ण । तैलाभ्यंजन करूं नये ॥ ३७५ ॥
वाघ उपाशी आहे म्हणून त्याला गोदान करतां येत नाहीं. गायीला जरी त्रास झाला तरी तिला तेल लावून कभ्यंगस्नान घालता येत नाहीं. ७५

हो कां देह इंद्रियें जरी एकें । तरी जिव्हाकर्म नव्हे नाकें ।
तेवीं एक भूतात्मा भूतवेखें । उचितोन्मुखें यजावा ॥ ३७६ ॥
देह व इंद्रिये ही जरी एक असली तरी जिव्हेचे काम नाकानी होत नाहीं, त्याच न्यान्यानें एकाच भूतात्म्याचे भूतवेषाला उचित असेंच यजन करावे. ७६

करितां यथोचित अर्पण । जरी क्रिया दिसे भिन्न भिन्न ।
तरी अंतरश्रद्धा अभिन्न । हें मुख्य लक्षण भागवतधर्मीं ॥ ३७७ ॥
याप्रमाणे यथोचित अर्पण करीत असतां क्रिया जरी भिन्नभिन्न दिसली, तरी आतील श्रद्धा अभिन्न असणें हें भागवत धर्माचें मुख्य लक्षण आहे. ७७

भूतीं भूतात्मा अभिन्नस्थिती । दया मैत्री साधूंची भक्ती ।
हेच आतुडे कैशा रीतीं । प्रबुद्ध तदर्थीं उपाव सांगे ॥ ३७८ ॥
भूतांमध्ये भूतात्मा एकरूपाने स्थित आहे. दया आणि मैत्री ही साधूची भक्ति आहे. तीच कोणत्या उपायाने साध्य होते ७८

तेचि नव श्लोकीं श्लोकोक्ती । समूळ भगवतधर्मस्थिती ।
प्रबुद्ध सांगे रायाप्रती । साधकां निजप्राप्ती साधावया ॥ ३७९ ॥
तें प्रबुद्ध महर्षि पुढील नऊ श्लोकांनी राजाला सांगेल. साधकांना आत्मप्राति होण्यास हीच मुख्य भागवतस्थिति आहे. ३७९.

शौचं तपस्तितिक्षां च मौनं स्वाध्यायमार्जवम् ।
ब्रह्मचर्यमहिंसां च समत्वं द्वन्द्वसंज्ञयोः ॥ २४ ॥
शौचं तपः तितिक्षां च – व प्रत्यक्ष अंतर्बाह्य पवित्रता, स्वधर्माचरण व क्षमा – मौनं स्वाध्यायं आर्जवम् – व्यर्थ भाषण न करणे, वेदाध्ययन व मनाचा सरळपणा – ब्रह्मचर्यं अहिंसांच – ब्रह्मचर्य व कोणचाही द्वेष न करणे – समत्वं द्वंद्वसंज्ञयोः – लाभ-हानि, सुख-दुःख इत्यादि द्वंद्व संज्ञा असलेल्यांचे ठिकाणी समत्वबुद्धी असणे ॥ २४ ॥ [ मृत्तिका व जल यांनी बाह्य देहाची शुद्धि आणि अदंभ, अमान इत्यादि आभ्यंतर शुद्धि शिकावी. स्वधर्माचरण, क्षमा, व्यर्थ शब्द न उच्चारणे, अधिकारानुसार वेदपाठादिक, सरळपणा, गृहस्थांचे गौण आणि यति व ब्रह्मचारी यांचें मुख्य ब्रह्मचर्य, प्राणिमात्राचा अद्रोह, शीतोष्ण सुख-दुःखादि द्वंद्वप्राप्ति झाली असतां हर्ष व विशाद यांचा अभाव इत्यादि धर्म शिकावे. २४.

मुख्य साधावया परमार्थ । अवश्य पाहिजे गा शुचिता ।
शुचित्वावांचोनि तत्त्वता । न लाभे हाता निजस्वार्थु ॥ ३८० ॥
मुख्य परमार्थ साधण्यासाठी शुचिर्भूतपणा अवश्य पाहिजे. शुद्धीवांचून निजहित केव्हांही हातीं लागणार नाहीं. ३८०

यालागीं गा नृपनाथा । शुद्ध शौचाची आ‍इक कथा ।
आंतर मळ न क्षाळितां । न लाभे हाता बाह्यशुद्धी ॥ ३८१ ॥
यासाठीं हे राजा, शुद्ध शौच्याची कथा ऐक. अंतःकरणाची मलिनता घालविल्यावांचून बाह्य देहाची शुद्धि प्राप्त होत नाहीं. ८१

मन मळिण वासनामळें । तें न करितां सोंवळें ।
बाह्य पवित्रता अहंबळें । तें जाण आंधळें न्याहाळी जैसें ॥ ३८२ ॥
वासनारूपी मळानें मलिन झालेलें मन स्वच्छ न करतां बाह्य पवित्रतेचा मात्र नुसता अहंकार धरणे, हें आंधळ्याने पहाण्यासारखेच आहे. ८२

सोनें जेवीं पुटीं पडे । मळ तुटे वाणीं चढे ।
तेवीं गुरुसेवा जडत्व मोडे । चित्तशुद्धी जोडे निर्दुष्ट ॥ ३८४ ॥
यास्तव आपली भावना व गुरुवाक्यावरील निष्ठा यांनी मनाचा वासनामळ धुवून त्याला स्वच्छ करावे. ८३

आरशासी सहाणीं तोडिजे । तेणें स्वमुखा शुद्धत्व जोडिजे ।
तेवीं चित्तशुद्धी उघडिजे । सहजीं सहजें निजशुद्धी ॥ ३८५ ॥
सोन्याला मुशीत टाकिलें, म्हणजे त्यावरील मळ निघून जातो व त्याचा कस वाढतो, त्याप्रमाणें गुरुसेवेनें जडत्व निघून जातें व चित्त शुद्ध होतें. ८४

लोहें परिसु झांकिजे । तंव लोहत्वा मुकिजे ।
तेवीं अंतरशुद्धीनें कीजे । महा निर्बुजे स्थूळबुद्धि ॥ ३८६ ॥
आरशाला घासून स्वच्छ केलें असतां त्यांत आपल्या मुखाचे शुद्ध प्रतिबिंब दिसते, त्याचप्रमाणे चित्तशुद्धी झाली असतां आत्मशुद्धि अनायासाने होतेः लोखंडाने परिसाला जो झांकावें, तो त्यानें आपल्या लोखंडपणालाच मुकावे, त्याप्रमाणें चित्तशुद्धीनें स्थूलबुद्धीला पळावयास लावावे. ८६

सूर्यासन्मुख सूर्यकांत । जाहलिया शुद्धत्वें होय दीप्त ।
ते प्रभा बाह्य प्रकाशत । अग्निहोत्रार्थ महायागा ॥ ३८७ ॥
सूर्यकांत मणि सूर्याच्या समोर धरल्यास तो आपल्या शुद्धपणानें प्रदीप्त होतो. त्याची प्रभा काष्ठादि बाह्य पदार्थात प्रकट होते, आणि तोच अग्नि महायागांच्या उपयोगी पडतो, ८७ ं

तेवीं गुरुवाक्यें अंतरशुद्धता । सबाह्य आली शुचिता ।
हे न करिती जे पवित्रता । ते जाण तत्त्वतां अतिभंडिमा ॥ ३८८ ॥
त्याच न्यायाने गुरुवाक्यानें अंतःशुद्धि होऊन शरीराला सबाह्य शुचित्व येतें. पण जे ही पवित्रता संपादन करीत नाहींत, ते खरोखर मोठे दांभिक होत. ८८

अल्प जळ शौचाप्रती । तेणें हात करकटले ठाती ।
शेवटीं गिरबडे बृहती । तेवीं विकल्पी होती अपवित्र ॥ ३८९ ॥
शुद्धीसाठी थोडेसेच जल घेतल्यास हातालाही घ्राण रहाते व शरीरही निर्मल होत नाहीं, त्याचप्रमाणे विकल्पाने मन अपवित्र होतें. ८९

भरलें काळकूट जीवीं । वरी टवटव अतिबरवी ।
तें इंद्रावण कोणीही न सेवी । अंतरस्वभावीं अतिमळिण ॥ ३९० ॥
मनांत काळकूट विष भरले आहे व वरून वटवट मात्र फार चांगली चालली आहे, पण तें तसले कवंडळ कोणीही स्वीकारीत नाहीं. कारण त्या वटवट करणाराचे अंतःकरण स्वभावतःच मलिन असतें. ३९०

तीर्थीं धुतला रजकराजु । तो काय हो‍ईल शुद्ध द्विजु ।
नटें घेतला राजध्वजु । तो नव्हे पूज्यु बाह्यक्रियावशें ॥ ३९१ ॥
परटाच्या नायकाला पवित्र तीर्थांत चांगले धुतले तरी तो काय पवित्र ब्राह्मण होणार आहे ! नटाने राजाची चिन्हे धारण केली तरी तो बाह्य उपचारानी खरा राजा कधीच होत नाहीं. ९१

सुंदरी सुकुमार साजिरी । वोठीं कुष्ठता तिळभरी ।
जाहलिया तीतें कोणी न वरी । वरीवरी बरी दिसतांही ॥ ३९२ ॥
एखादी कन्या अति सुंदर, कोमल व गोमटी आहे पण तिच्या ओठावर तिळाएवढे जरी कोड असलें, तरी ती वरून सुंदर असूनही तिला कोणी वरीत नाहीं. ९२

नागवी माथा मोत्यांची जाळी । शिंबरी सुपाणीदाणा ल्याली ।
तेवीं बाह्य पवित्रता दाविली । ते ते केली निजभंडिमा ॥ ३९३ ॥
एखाद्या नग्न स्त्रीनें डोक्यावर मोत्याची जाळी घालावी किंवा नकटीने नाकांत पाणीदार मोत्यांची नथ घालावी, त्याप्रमाणें एखाद्या ढोंग्याने बाह्य पवित्रता कितीही जरी दाखविली तरी ती व्यर्थच होय. ९३

दहें माखला वायसु । तो काय हो‍ईल राजहंसु ।
दहीं म्हणोनि मथितां कापुसु । तृप्ती नव्हे उपहासु जगीं प्रगटे ॥ ३९४ ॥
कावळ्याला दह्याचा लेप दिला तरी तो काय राजहंस होईल ! कापसाला दही म्हणून किती जरी घुसळले तरी त्यापासून लोणी निघत नाहीं, उलट जगांत उपहासच होतो. ९४

तेवीं अंतरीं विकल्पु असतां । बाह्य जे जे पवित्रता ।
ते ते क्रिया नृपनाथा । जाण तत्त्वतां अतिभंडिमा ॥ ३९५ ॥
त्याच न्यायाने मनांत विकल्प असतांना बाहेरून पवित्रतेचा आव कितीही जरी आणला, तरी खरोखर तें ढोंग आहे असें तू समज. ९५

अंतर क्षाळिलें गुरुप्रतीतीं । बाह्य क्षाळिलें शास्त्रयुक्तीं ।
ऐसें शुचित्व निजनिश्चितीं । अद्वैत स्थिती तेथें नांदे ॥ ३९६ ॥
गुरुवाक्याच्या प्रतीतीने ज्याने आपलें अंतःकरण शुद्ध केलेले असतें व शास्त्रोक्त स्नानादि उपायांनी बाह्य शरीर शुद्ध केले असतें, म्हणजे असें दोन प्रकारचे शुचित्व जेथे निश्चित असतें तेथेंच अद्वैतस्थिति नांदते. ९६

अंतरी शुचित्व पूर्ण वसे । तें बाह्यकर्मीं स्वयें प्रकाशे ।
तें शुचित्वचि अनायासें परमार्थदशे प्रकाशी ॥ ३९७ ॥
अंतःकरणात पूर्णपणे राहणारे शुचित्व बाह्यकर्मामध्यें आपोआप प्रकट होतें आणि असलें शुचित्वच परमार्थदशेला अनायासाने व्यक्त करते. ९७

ईश्वरभावाचें निजवर्म । ज्याचे पोटीं रिघालें सप्रेम ।
त्याचें कर्मचि होय ब्रह्म । त्या देहभ्रम बाधिना ॥ ३९८ ॥
ईश्वरभावाचे हें मुख्य वर्म प्रेमासह मनांत भिनल्यास त्याचें कर्मच ब्रह्म होतें. नंतर त्याला देहभ्रम बाधत नाहीं. ९८

या नाम शुचिष्मता । सत्य जाण गा नृपनाथा ।
तपाचीही स्थिती आतां । ऐक तत्त्वतां सांगेन ॥ ३९९ ॥
हे राजा, अशा शुद्धीलाच खरें शौच म्हणतात. आतां मी तुला तपाची स्थिति सांगती ती ऐक, ९९

शरीरशोषणा नांव तप । तें प्रारब्ध-भोगानुरूप ।
हृदयीं वाहणें कृष्णस्वरूप । तो शुद्ध साक्षेप तपाचा ॥ ४०० ॥
व्रतादि उपायांनी शरीराला कृश करणें याला तप असें म्हणतात, पण तें प्रारब्धानेंच प्राप्त होतें; वस्तुतः हृदयामध्ये श्रीकृष्णस्वरूपाचें सतत ध्यान करणें शुद्धतपाचे लक्षण आहे. ४००

जेवीं धूरसूनि दिठी । शूर रणामाजीं उठी ।
तेवीं ईश्वर धरोनि पोटीं । वर्ते तो सृष्टीं तपिया शुद्ध ॥ ४०१ ॥
समरांगणांत उडालेल्या धुळीनें दृष्टि मलिन झाली असतां एखादा शूर योद्धा कांहीं एक विचार न करतां जसा पराक्रम गाजवीत सुटतो, त्याप्रमाणें ईश्वराला मनांत धरून जो या सृष्टीत प्राप्त व्यवहार करतो तो शुद्ध तपस्वी होय. १

हेंचि तपाचें निजस्वरूप । याचि नांव शुद्ध तप ।
यावरतें न चढे रूप । व्यर्थ वाग्जल्प कां करावे ॥ ४०२ ॥
तपाचें मुख्य स्वरूप हेंच आहे. यालाच शुद्धतप असें नांव आहे. या पलीकडे त्याचें वर्णन करतां येत नाहीं. व्यर्थ वटवट करण्यांत काय अर्थ आहे. २

द्वंद्वसहिष्णुता मुमुक्षा । या नांव म्हणिजे तितिक्षा ।
तेही आणावया लक्षा । नृपाध्यक्षा अवधारीं ॥ ४०३ ॥
मुमुक्षूंनी शीतोष्णादि द्वंद्वांना सहन करणें यालाच तितिक्षा हें नांव आहे. तिचेही स्वरूप कळावे, म्हणून आतां मी सांगती तें तूं ऐक. ३

सुखदुःख उभय भोग । दोंमाजीं अखंड आपुलें अंग ।
जेवीं चित्रींची वाघीण आणि वाघ । दोहींमाजीं साङ्ग निजत्वें भिंती ॥ ४०४ ॥
सुख व दुःख असे दोन भोग आहेत. ज्याप्रमाणें भिंतीवरील चित्रांतील वाघीण आणि वाघ या दोहोमध्ये भिंत स्वरूपाने सारखीच असते, त्याप्रमाणें आपलें शरीर त्या दोन्ही भोगप्रसंगीं अखंड एकरूप असतें. ४

जेवीं दावाग्नी कां उन्हाळे । आकाश जैसें न पोळें ।
असोनि त्यांचेनि मेळें । त्यांवेगळें अलिप्त ॥ ४०५ ॥
दावाग्नीच्या प्रचंड ज्वालांनी आकाश पोळत नाहीं. त्यांच्याशी त्याचा संसर्ग झालेला असूनही तें स्वरूपाने त्याहून भिन्न व अलिप्तच असतें. ५

शीतळ जळ कां हींव पडे । पृथ्वी निजक्षमा न कांकुडे ।
तेवी निजस्वरूपसुरवाडें । द्वंद्वा नातुडे निजसाधु ॥ ४०६ ॥
पृथ्वीवर शीतल जल पडो कीं बर्फ पडो, पृथ्वी आपल्या स्वाभाविक क्षमेमुळे कधीं कांकडत नाहीं, त्याचप्रमाणें साधु आपल्या स्वरूपानुभवानें द्वंद्वांनी व्याकुळ होत नाहीं. ६

शरीर जरी हिंवे कांपे । तेणें देह कांपे साधु न कांपे ।
शरीर अति‍उष्णें तापे । परी साधु न तापे देहतापामाजीं ॥ ४०७ ॥
शरीर हिंवाने जरी कांपत असलें तरी विद्वान् साधु कापत नाहीं. त्याचें शरीर कांपते. शरीर तापानें जरी अतिशय तप्त झालें, तरी साधु त्या देहतापानें संतप्त होत नाहीं. ७

सुख देखोनि दिठी । ज्या गोडिया घाली मिठी ।
दुःखही त्याचि आवडी घोंटी । द्वंद्वसहिष्णुता मोठी या नांव राया ॥ ४०८ ॥
हे राजा, तो जितक्या आवडीने सुखात आसक्त होतो, तितक्याच आवडीने तो दुःखाचाही अनुभव घेतो. यालाच द्वंद्वसहिष्णुता हें नांव आहे. ८

गोफणगुंडा सन्मुख । लागतां अवश्य उठे दुःख ।
तोच सुवर्णाचा जाहलिया देख । दुःख लोपोनि सुख अनिवार वाढे ॥ ४०९ ॥
गोफणीतून मारलेला दगड अंगाला लागला असतां दुःख अवश्य होतें. पण तोच जर सोन्याचा असला तर तो लागल्यामुळें झालेलें दुःख लोपून जातें व अनिवार सुख होतें. ९

सुखदुःखप्रकाशक । निजवस्तु असे एक ।
त्या एकात्मता देख । द्वंद्वें साधक सुखें साहती ॥ ४१० ॥
सुख व दुःख यांची निजवस्तु एक आहे. त्यामुळें साधक द्वंद्वांना एकात्मतेने पहातात व त्यामुळें त्यापासून सुख साधतात. ४१०

तेवीं द्वंद्वाचें जाणपण । जाणवीता असे जें ज्ञान ।
तें जाणितल्या आपण । द्वंद्वें संपूर्ण निर्द्वंद्वें होती ॥ ११ ॥
जें ज्ञान द्वंद्वांचा अनुभव घेते त्याला जाणले असतां द्वंद्वे पूर्णपणे निर्द्वंद्व होतात. ११

रसउसीं कठिणपण । त्यामाजीं गोडी अखंड पूर्ण ।
तेवीं द्वंद्वामाजीं वस्तु चिद्‌घन । अखंडदंडायमान स्वयें देखे ॥ १२ ॥
रसाने भरलेल्या ऊसांत कठिणपणा असतो, पण त्यामध्ये गोडी अखंड असते. त्याचप्रमाणें द्वंद्वामध्ये अखंड एकरूप चिद्‌घन वस्तु हा स्वतः पहातो. १२

ऐशी हे अखंडता । जंव न ये साधकाचे हाता ।
तंव द्वंद्वाची सहनता । नव्हे नृपनाथा निश्चयेंसीं ॥ १३ ॥
अशी ही अखंडता साधकाच्या हाताला जोवर लागत नाहीं तोवर द्वंद्वाची सहनशीलता निश्चयानें साध्य होत नाहीं. १३

या नांव द्वंद्वसहन । निजनिश्चयें जाण पूर्ण ।
आतां मौनाचें लक्षण । सावधान अवधारीं ॥ १४ ॥
म्ह० तोवर द्वंद्वे सहन करण्याचें सामर्थ्य येत नाहीं. यालाच द्वंद्वसहन-तितिक्षा म्हणतात. आतां मौनाचे लक्षण सावधान चित्ताने ऐक. १४

वाग्वादु करावा जनीं । तैं दृढ व्हावें देहाभिमानी ।
सांडविला तो सद्‌गुरूंनी । निःशेष धो‍उनी शब्देंसीं ॥ १५ ॥
लोकांमध्यें वादविवाद करावयास लागावे तो देहाभिमान दृढ होतो. पण सद्‌गुरु आपल्या शब्दानी तो वाद विवाद निःशेष बुडून टाकतात. १५

सद्‌गुरुवचन पडतां कानीं । स्तुति निंदा मिळोनि दोन्ही ।
बोल बोलणें निरसुनी । हृदयभुवनीं परिपक्कलें ॥ १६ ॥
सद्‌गुरुवचन कानीं पडताच स्तुति व निंदा या दोहोंनाही गिळून वागिंद्रियानें बोलणे सोडून दिलें व तें हृदयकमलांत एकरूप होऊन राहिलें. १६

तेव्हां ज्याचे बोलावे अवगुण । तेथें दिसे हृदयस्थ आपण ।
यालागीं बोलतां पैशुन्य । पडे मौन गुरुवाक्यें ॥ १७ ॥
एखादे वेळी एखाद्याचे अवगुण बोलू लागावे, तर त्याच्या जागी त्याला स्वतःचीच प्रतीति येते. त्यामुळें आपोआपच बोलणे बंद पडून गुरुवाक्यानें वाणीला मौन पडते. १७

गुण देखोनियां स्तवन । करितां पडे दृढ मौन ।
मीचि स्तव्य स्तविता स्तवन । मज म्यां वानितां पूर्ण मूर्खत्व माझें ॥ १८ ॥
एकाद्याचे गुण पाहून स्तुति करावयास जें प्रवृत्त व्हावे तो वाणीला दृढ मौन पडते. कारण मीच स्तुतींतील स्तव्य, स्तविता व स्तवन आहें. त्यामुळें मीच माझी स्तुति केल्यास माझ्या पदरी पूर्ण मूर्खत्व येईल. १८

निजात्मा निःशेष नसे । ऐसा रिता ठाव न दिसे ।
तेथें जें जें कांहीं दिसे । तें आत्मप्रकाशें सदोदित ॥ १९ ॥
जेथें निजात्मा सर्वथा नाहीं, असा रिता ठावच कोठे दिसत नाहीं. त्यामुळें तेथें जें जें कांहीं दिसते, तें तें सर्व आत्मप्रकाशानेंच सदा प्रकाशित झालेलें असतें. १९

ऐशी सद्‌गुरूंनि दाखविली युक्ती । ती विश्वासें स्थिरावली चित्तीं ।
यालागीं निंदा आणि स्तुती । वाचेप्रती बोलेना ॥ २० ॥
सद्‌गुरूंनी अशी युक्ती दाखविली व ती चित्तांत विश्वासाने स्थिर झाली, त्यामुळे वाणी, निंदा व स्तुति यांतील काहींच करूं शकत नाहीं. ४२०

संवाद करावा निजस्वार्थी । तंव सद्‌गुरूच्या वचनोक्तीं ।
खुंटल्या वेदशास्त्रांच्या युक्ती । त्यावरी स्थिती चढेना ॥ २१ ॥
आपल्या हितासाठी संवाद करावा तर सद्‌गुरूंच्या वचनसामर्थ्याने वेदशास्त्रांच्या युक्ति कुंठल्या आणि त्यामुळें संवादाचीही प्रवृत्ति थांबली. २१

एवं स्तुति निंदा वाग्वाद । करितां खुंटला संवाद ।
महामौनें अतिशुद्ध । परमानंद साधकां ॥ २२ ॥
स्तुति, निंदा, वाद, संवाद इत्यादि सर्व वाग्व्यापार कुंठित झाले असतां त्या अतिशुद्ध महामौनाने साधकाला परमानंद होतो. २२

ऐसें साधावया दृढ मौन । सद्‌गुरु शिकवी वेदाध्ययन ।
उपनिषदर्थ विवंचून । पढवी संपूर्ण अर्थावबोधें ॥ २३ ॥
अशा प्रकारचे दृढ मौन साधण्यासाठी सद्‌गुरु वेदाध्ययन करावयास शिकवतो. उपनिषदांच्या ब्रह्मसिद्धांताचे विवेचन करून अर्थज्ञानासह त्यांचे पाठ सांगतो, २३

अथव अतिशयें दृढ मौन । श्रीरामकृष्णनामस्मरण ।
अखंड नामें गर्जतां पूर्ण । वेदार्थ जाण तिष्ठती पुढें ॥ २४ ॥
किंवा श्रीराम व कृष्ण यांचें नामस्मरण हेंच अति दृढ मौन होय, कारण अखंड नामगर्जना केल्याने वेदार्थ जणु काय पुढें उभे रहातात. २४

नित्य रामनाम गर्जे वाणी । त्या तीर्थें येती लोटांगणीं ।
सुरवर लागती चरणीं । यम पायवणी स्वयें वंदी ॥ २५ ॥
ज्याची वाणी रामनामाची सतत गर्जना करते, त्याच्यापुढे तीर्थ लोटांगणे घालीत येतात. देव त्याच्या पायां पडतात आणि यम त्याच्या पायाच्या तीर्थाला वंदन करतो. २५

रामनामाचें जें स्मरण । या नांव गा महामौन ।
वेदें नाम स्तविलें पूर्ण । शुद्ध अध्ययन हरिनाम ॥ २६ ॥
रामनामाचे जें स्मरण त्यालाच महामोन असें नांव आहे. वेदाने त्या नामाची स्तुति केली आहे, म्हणून हरिनाम हें शुद्ध अध्ययन आहे. २६

वेदु अथवा नामस्मरण । या नांव गा स्वाध्यावो जाण ।
आतां आर्जवाचें लक्षण । ऐकें संपूर्ण महाराजा ॥ २७ ॥
वेद १ किंवा नामस्मरण याला स्वाध्याय हें नांव आहे. आतां आर्जवाचे लक्षण ऐक. २७

आतां आर्जव तें ऐसें । सर्वा जीवां जीवन जैसें ।
कां तंतु जैसा निजविलासें । अविरोधें असे पटामाजीं ॥ २८ ॥
सर्व जीवांना जसे जीवन, किंवा पटामध्यें जसा तंतु आपल्या विलासाने अविरोधाने रहातो, तसेंच हें आर्जव आहे. २८

साखरेचें इंद्रावण । केलिया न वचे गोडपण ।
तैसें विषमांही जीवां जाण । आर्जवें पूर्ण रंजवी स्वभावें ॥ २९ ॥
साखरेचे कवंडळ केल्यास त्याची गोडी नाहीशी होत नाहीं म्ह० तें कडू होत नाहीं, त्याचप्रमाणें दुष्ट, क्रूर, इत्यादि विषम जीवांनाही हा साधक स्वभावतःच आर्जवाने पूर्णपणे रंजवितो. २९

वक्र चंद्राची चंद्रिका । परी अमृत वक्र नव्हे देखा ।
तैसें देखोनि विषमां लोकां । मनोवृत्ति देख पालटेना ॥ ३० ॥
चंद्राची कोर वाकडी असते, पण त्यातील अमृत कांहीं वांकडे नसतें, त्याच न्यायाने विषम लोकांना पाहून याची मनोवृत्ति पालटत नाहीं. ४३०

निपराद न देखे कोणासी । जिवलग सोयरा सर्वांशीं ।
वोळखी जीवमात्रांशीं । जैशी तैशी जुनाट ॥ ३१ ॥
तो कोणालाही आपल्याहून कमी योग्यतेचा पहात नाहीं. सर्वांशी जिवलग सोयऱ्याप्रमाणें वागतो. एखाद्याची जशी फार जुनी ओळख असावी, त्याप्रमाणें सर्व जीवाशी ओळख असल्याप्रमाणेच तो वागतो. ३१

न्यहा संतप्ता आधार देत । वरूनि घणघाय घेत ।
सांडस घायातळीं सूत । तें आघवेंचि आप्त लोहत्वें लोहा ॥ ३१अ ॥
न्यहा म्हणजे ऐरण, ही तापलेल्या लोखंडाला आधार देते, वरून घणाचे घांव घेते, सांडसांत लोखंडाचा तुकडा धरून वर घाव बडवतात, त्या लोखंडाला लोखंडपणानेंच ती आप्त होऊन राहते. ४३१अ

यापरी जयासी आप्त सर्व । ऐसा जो कां निजस्वभाव ।
तया नांव गा आर्जव । अति‍अपूर्व गुरुदीक्षा ॥ ३२ ॥
याप्रमाणे त्याला सर्व जीव सर्वदा आत भासतात व तसा त्याचा स्वभावच बनलेला असतो. त्याच्या या स्वभावाला आर्जव असें नांव आहे. गुरुदीक्षा अशी अपूर्व आहे. ३२

असुर सुर नर ऋषीश्वर । मदनें केले निजकिंकर ।
कंदर्पाचा मार थोर । अतिदुर्धर अनंगु ॥ ३३ ॥
मदनाने दानव, देव, मनुष्य, कृषि या सर्वांना आपले दास केले. कामदेवाचा मारा अति दुर्धर असून ३३

अंतरीं कामाचें दृढ ठाणें । वरीवरी दांत चावूनि साहणें ।
त्याचें मनचि निष्काम न म्हणे । चाळवणें लौकिकु ॥ ३४ ॥
मनामध्ये कामाचे दृढ ठाणे बसले आहे. पण हा उसने अवसान आणून वरवर निष्कामतेचा आव आणतो व लौकिक चालवतो. ३४

तैसी नव्हे सद्‌गुरुची युक्ती । कामाची पालटे कामनावृत्ती ।
अभंग ब्रह्मचर्यस्थिती । शिष्यांप्रती उपदेशी ॥ ३५ ॥
तथापि त्याचें मनच निष्कामता कबूल करीत नाहीं. सद्‌गुरूची युक्ति तशी नाहीं. तिच्या योगाने साधकाची कामनावृत्ति पालटते, गुरु शिष्याला अखंड ब्रह्मचर्यवृत्तीचा उपदेश करतो. ३५

कंदर्पराणिवेस्त्रीपुरुष । तेथें गुरुदीक्षा अलोलिक ।
मिथ्या स्त्रीपुरुष माइक । विषयसुख भ्रम मात्र ॥ ३६ ॥
स्त्री व पुरुष हें कामदेवाचे राज्य आहे; पण गुरुदीक्षा अद्‌भुत आहे. ती स्त्री व पुरुष ही दोन्ही मिथ्या आहेत व विषयसुख हा मायिक भ्रम आहे, असा प्रत्यय आणून देते. ३६

आनंदाचें उपस्थ एकायतन । हें काय मिथ्या वचन ।
ते अर्थीं पूर्ण वेदज्ञ । वेदविवंचन दाविती ऐसें ॥ ३७ ॥
उपनिषदांत ‘सर्व आनंदाचे उपस्थेंद्रिय हें एकायतन आहे.’ असें सांगितलें आहे. तें खोटे आहे कीं काय ! वेदाचा अर्थ जाणणारे अर्थवेत्ते या अर्थाचे असें विवेचन करून दाखवितात. ३७

पुसतां साखरेची गोडी कैशी । तो स्वादु न ये सांगावयासी ।
तेथें चाखो देती अणुमात्रेंशीं । तेचि गोडपण राशीं जाणती जाण ॥ ३८ ॥
साखरेची गोडी कशी आहे, असें कोणाला विचारल्यास ती शब्दाने सांगता येत नाहीं, पण साखरेचा लहानसा कणही तोंडांत घातल्यास तिची रुचि खाणाराच्या लक्षांत आपोआप येते. ३८

तेवीं परमानंदसुखप्राप्ती । उपस्थद्वारा नर चाखिती ।
आनंद एकायतनस्थिती । बोलिली उपस्थीं या हेतु वेदें ॥ ३९ ॥
त्याच न्यायाने पुरुष उपस्थेंद्रियाच्या द्वारा आनंदाचा अनुभव घेतात, म्हणून वेदाने उपस्थ हा आनंदाचा एक आधार आहे, असें म्हटलें आहे. ३९

त्या उपस्थसुखाची नित्यस्थिती । संभोगेंवीण जे वाढविती ।
तेथ मिथ्या स्त्रीपुरुषव्यक्ती । सहजें होती सज्ञान ॥ ४४० ॥
जे संभोगावांचून विषयजन्य सुखाची नित्य स्थिति वाढवितात त्यांना त्या सुखाचा केवल भ्रम झालेला असतो. कारण स्त्री व पुरुष या व्यक्ति मिथ्या आहेत. ४४०

चाखिली गोडी तेचि साखर । परमानंद मैथुनमात्र ।
मानूनियां मैथुनपर । जाहले पामर विषयांधा ॥ ४१॥
साखर खालयावाचून तिची गोडी जशी कळत नाहीं, त्याप्रमाणें विषयजन्य आनंद प्रत्यक्ष संभोगावाचून अनुभवास येत नाहीं. यास्तव संभोग हेंच आनंदाच्या ज्ञानाचे प्रधान कारण आहे. तथापि विषयांध पामर संभोगालाच परम आनंद मानून त्यांत आसक्त होतात. ४१

उपस्थीं परमानंदगोडी । यालागीं स्त्रीकामाची अतिवोढी ।
सद सोसिजे महामूढीं । ताडातोडी जीविताच्या ॥ ४२ ॥
यांतच परमानंद आहे असें मानून त्यांची विषयासक्ति अतिशय वाढते व मूढलोक जीवाची आटापिट करून त्यासाठीं अनेक क्लेश सोसतात. ४२

साखरेचें केलें नारियेळ । तेथ त्वचा गर्भ साखरचि केवळ ।
तेवीं विषयद्वारा सुखकल्लोळ । उठती सकळ परमानंदें ॥ ४३ ॥
साखरेचा नारळ केल्यास त्यांतील करवंटी, खोबरे वगैरे सर्वच भाग जशी केवल साखरच असते, त्याप्रमाणें विषयांच्या द्वारा उत्पन्न होणारे सर्व सुखतरंग केवल परमानंदरूप आहेत. ४२

नाना पक्वान्नपरवडी । गुळाच्या गोडीनें ते चवी गाढी ।
तेवीं विषयाची जे जे आवडी । ते ते गोडी निजानंदें ॥ ४४ ॥
अनेक पक्वाने जरी केली, तरी त्यांतील गोडी एका गुळाचे मुळेंच जशी असते, त्याप्रमाणें विषयांपासून होणारे सर्व सुख एका निजानंदामुळें आहे. ४४

हें नेणोनि मुळींची निजगोडी । सोशिती विषयांच्या अतिवोढी ।
बाप सद्‌गुरुकृपा गाढी । विषयांची आवडी एकत्वा आणी ॥ ४६ ॥
ही मूळची निजगोडी न जाणल्याने पामर लोक विषयासक्तीमुळे केश भोगतात. पण सद्‌गुरूंची कृपा अति प्रबल आहे. ती विषयप्रीतीला एकरूप करते, ४५

यलागीं विषयांची आस्था । न चढे सच्छिष्याचे माथां ।
स्त्रीभोगाची आसक्तता । मिथ्या तत्त्वतां गुरुवाक्यनिष्ठा ॥ ४६ ॥
त्यामुळें सच्छिष्यामध्यें विषयाची आसक्ति नसते. गुरुवाक्यावरील निष्ठेमुळे विषयासक्ति मिथ्या आहे हें त्याला तत्त्वतः कळतें. ४६

हा आत्मा हे आत्मी पाहीं । ऐसें मिथुन मुळीं नाहीं ।
तें निजमूळ पाडितां ठायीं । ब्रह्मचर्य पाहीं अभंग ॥ ४७ ॥
हा आत्मा व ही आत्मी जसे जोडपे मुळांत नाहीं. तर सर्वत्र एक आत्माच आहे हें मूखतत्व प्रत्ययाला आलें, म्हणजे मग ब्रह्मचर्य अखंड रहाते. ४७

या नांव गा निज नैष्ठिक्य । ब्रह्मचर्य अति सुटंक ।
सद्‌गुरूंनी बोधिले निष्टंक । अलोलिक अभंग ॥ ४८ ॥
यालाच अखंड नैष्ठिक ब्रह्मचर्य म्हणतात. सद्‌गुरूंनी त्याचा निश्चित बोध केला असतां तें दृढ व अभंग रहाते ४८

आतां अहिंसेची स्थिती । ऐकें राया चक्रवर्ती ।
भंवई उचलणें नाहीं भूतीं । स्वप्न-सुषुप्ती-जागतां ॥ ४९ ॥
आतां हे राजा; अहिंसेची स्थिति एके. स्वप्न, सुषुप्ति व जागृति या तिन्ही अवस्थांमध्यें जो कोणत्याही प्राण्याकडे डोळे वटारून व कपाळाला आठी घालून पहात नाही, ४९

पावो आदळतां देख । झणीं पृथ्वी पावेल दुःख ।
या काकुळती आवश्यक । पा‍उलें अलोलिक हळुवार ठेवी ॥ ५० ॥
आपण जोराने पाऊल टाकल्यास पृथ्वीला दुःख होईल या काकुळतीने अगदीं अवश्य तितकी पावले मोजकी व हळू ठेवीत चालतो. ४५०

आकाश दचकेल देख । यलागीं नेदी सैरा हांक ।
वाचा परिपक्व पीयुख । वचनें परम सुख सर्वांसी देतु ॥ ५१ ॥
कदाचित् आकाश दचकेल, म्हणून कधी ओरडून बोलत नाहीं. तर आपल्या अमृतासारख्या वचनाने सर्वांना परम सुख देतो. ५१

त्याचा शब्दु जैं गगनीं भरे । तेणें शब्दानंदचमत्कारें ।
गगनचि निजसुखें भरें । येणें सुखोद्‌गारें वचनोक्ती ॥ ५२ ॥
याचा शब्द जेव्हां आकाशांत प्रवेश करतो, तेव्हां शब्दानंद चमत्कारानें आकाशालाही सुखाचे भरते येईल, अशा सुखावह शब्दांनीं तो भाषण करतो. ५२

जळामाजीं घालितां उडी । झणीं उदक दडपे बुडीं ।
तरंगन्यायें देणें बुडी । जीवनाची दुथडी न हेलावतां ॥ ५३ ॥
पाण्यांत उंचावरून उडी टाकल्यास कदाचित् तें खालीं दडपेल, या भीतीनें तो तरंगाप्रमाणेंच प्रवाहाच्या दोन्ही थडी क्षुब्ध न होतील अशा बेताने हळूच बुडी मारतो. ५३

त्यासी जळीं होतां निमग्न । जळाचा तापु शमे संपूर्ण ।
यापरी करी स्नान । जीवना जीवन निववितु ॥ ५४ ॥
जळात निमग्न होतांच जळाचा ताप पूर्णपणे शांत होईल, अशा प्रकारे तो स्नान करतो. म्ह० आपल्या स्पर्शाने तो स्वभावतःच शितळ असलेल्या जळालाही शितळ करतो. ५४

झणीं दुःख पावेल वारा । म्हणौनि श्वासु न घाली सैरा ।
नेमूनि प्राणसंचारा । निजशरीरा वागवी ॥ ५५ ॥
कदाचित् वाऱ्याला दुःख होईल म्हणून तो श्वासही जपून सोडतो. श्वासोच्छवासाचे नियमन करून आपल्या शरीराला वागवितो. ५५

निजदेहा करावया घातु । सर्वथा जेवीं नुचले हातु ।
तेवीं भूतावरी निघातु । ज्याच्या पोटांतु उपजेना ॥ ५६ ॥
आपल्यालाच मारण्यासाठी आपले हात जसे उचलत नाहींत, त्याप्रमाणें इतर प्राण्यांवर प्रहार करावा असें त्याच्या मनांतही येत नाहीं. ५६

अत्यंत न्याहारें पाहतां । वचकु पडेल प्राण्यांच्या चित्ता ।
यालागीं बाह्यदृष्टीं क्रूरता । न पाहे भूतां भूतभावें ॥ ५७ ॥
करड्या नजरेने पाहिल्यास प्राण्यांना भीति वाटेल, म्हणून क्रूर दृष्टीनें तो कधींच पहात नाहीं. ५७

रोम रगडतील संपूर्ण । यालागीं न करी अंगमर्दन ।
एवं स्वदेहाचें देहपण । भूतहिंसाभेण अहंत्वा नाणी ॥ ५८ ॥
अंगावरील रोम रगडले जातील म्हणून तो अंगमर्दन करीत नाहीं, याप्रमाणे स्वदेहाचें देहत्व भूतहिंसेच्या भीतीनें आपलेसे मानीत नाहीं. ५८

भूतां देतां दुःखलेशु । भूतीं दुखवेल भूतेशु ।
ऐसा ज्याचा दृढ विश्वासु । तेथ रहिवासु अहिंसेचा ॥ ५९ ॥
भूतांना यत्किंचित्‌ही दुःख दिल्यास त्यांतील भूतात्मा दुखी होईल, असा ज्याचा दृढ विश्वास असतो त्याच्याच ठिकाणी अहिंसा वास करते. ५९

कायिक-वाचिक-मानसिक । भूतां उपजे त्रिविध दुःख ।
तें जेथें निमालें निःशेख । अहिंसा देख ते ठायीं ॥ ६० ॥
भूतांना शरीर, वाणी आणि मन या तीन साधनांनी तीन प्रकारचे दुःख होतें; पण ज्याच्या ठिकाणी त्या तिहींचाही निःशेष अभाव असतो, तेथेंच अहिंसा राहते. ४६०

या नांव गा शुद्ध अहिंसा । सत्य जाण नृपवरेशा ।
आतां द्वंद्वसाम्याची दशा । आ‍इक क्षितीशा सांगेन ॥ ६१ ॥
राजा, हीच शुद्ध अहिंसा आहे, असें तूं निश्चयानें जाण. आतां द्वंद्वसाम्याची स्थिति ऐक. ६१

सुख दुःख अदृष्टाधीन । तें अदृष्ट देहाचे माथां पूर्ण ।
ऐसें जाणोनि आपण । निर्द्वंद्व संपूर्ण सद्‌गुरुवाक्यें ॥ ६२ ॥
सुख व दुःख ही दोन्हीं अदृष्टाच्या अधीन आहेत आणि तें अदृष्ट देहाच्या डोक्यावर बसले आहे, असें जाणून हा स्वतः सद्‌गुरु वाक्याने पूर्णपणे निर्द्वंद्व होतो. ६२

अदृष्टें देह सुखदुःख भोगी । मूर्ख तेथ रागी विरागी ।
शिष्यु लागों नेदी निजांगीं । गुरुवाक्यरंगीं रंगला । ६३ ॥
अदृष्टामुळेंच देह सुख-दुःख भोगतो. पण अविवेकी त्यांतील सुखामध्ये आसक्त होतो व दुःखाचा द्वेष करतो. पण गुरुवाक्याच्या रंगांत रंगलेला शिष्य त्या दोहोंचाही आपल्याला लेप लागू देत नाहीं. ६३

देहींचेनि सुखें सुखावतां । सवेंचि दुःख चढे माथां ।
हें गुरूनें जाणोनि तत्त्वतां देहअहंता सांडविली ॥ ६४ ॥
देहाच्या सुखाने हा सुखावला कीं लागलेंच त्याच्या डोक्यावर दुःख येऊन कोसळेल हें तत्त्वतः जाणून गुरूने त्याचा देहाहंकार सोडविला. ६४

निरभिमान्याच्या अंगीं । दुःख नुरेचि दुःखनियोगीं ।
सुख नुरेचि सुखसंभोगीं । तो उभयभागीं अलिप्त ॥ ६५ ॥
निरभिमानी पुरुषाला दुःखसंयोगाने दुःख होत नाहीं व सुखसंयोगाने सुख होत नाहीं. तो त्या दोहींपासून अलिप्त असतो. ६५

छाया उष्णामाजी तापली । ते छाया छायेंचि निवाली ।
तेवीं सुखदुःखें मिथ्या जाहलीं । स्थिति सुखावली यथानुलाभें ॥ ६६ ॥
छाया उन्हामध्यें तापते व छायेनेच थंड होत, त्याप्रमाणे सुख-दुःखें मिथ्या झाली म्हणजे मग त्यांतील ज्याची प्राप्ति होईल त्यानें याला सुखच होतें. ६६

अदृष्टें देही वर्ततां देख । बाधूं न शके सुखासुख ।
हें गुरुगम्य अलोलिक । शिष्य विश्वासिक पावती ॥ ६७ ॥
देह अदृष्टाप्रमाणें वागू लागला असतां सुखदुःख पीडा देऊं शकत नाहींत, ही गुरुकृपेनेंच प्राप्त होणारी निश्चित युक्ति श्रद्धाळु शिष्यालाच प्राप्त होते. ६७

विश्वासेंवीण सर्वथा । गुरुगम्य नये हाता ।
गुरुगम्येंवीण तत्त्वतां । द्वंद्वसमता कद न घडे ॥ ६८ ॥
श्रद्धेवांचून गुरुगस्थ तत्त्व हातीं लागत नाहीं आणि गुरुगम्य तत्त्व जाणल्यावांचून द्वंद्वाचे समत्व कदापि संभवत नाहीं. ६८

देहीं दृढता जंव मीपण । तंव तंव द्वंद्वबाधा दारुण ।
जे गुरुवाक्यें निरभिमान । त्यांसी द्वंद्वें जाण अतिमिथ्या ॥ ६९ ॥
‘देहच मी’ हा अभिमान जोवर दृढ आहे, तोवर सुख-दुःखादि द्वंद्वांची भयंकर पीडा होत असते. पण गुरुवाक्यानें जे निरभिमानी झाले, त्यांना ही द्वंद्वे सर्वथा मिथ्या वाटतात. ६९

स्वप्नींचें दरिद्र-समर्थता । जेवीं दोनी मिथ्या जागृता ।
तेवीं द्वंद्वबाधेची वार्ता । न बाधे गुरुभक्तां अपरोक्षबोधें ॥ ७० ॥
स्वग्नातील दारिद्र्य आणि श्रीमंती ही दोन्हीं जागृतींत जशी एकसारखीच, त्याप्रमाणें अपरोक्षसाक्षात्कारामुळें द्वंद्वाच्या पीडेची वार्ता गुरुभक्तांच्या कधीं कानांवरही येत नाहीं. ४७०

लेंकुरांच्या खेळापाशीं । पारणें तैशी एकादशी ।
द्वंद्वाची दशा तैशी । गुरुवाक्यासरिसी समूळ उडे ॥ ७१ ॥
मुलांच्या खेळातील पारणे आणि एकादशी दोन्हीं जशी सारखीच, तशीच द्वंद्वाची दशाही गुरुवाक्याबरोबर समूळ नाहीशी होते. ७१

जेवीं चंदनाचिया द्रुतीं । आरीबोरी चंदन होती ।
तेवीं गुरुवाक्यप्रतीती । सकळ द्वंद्वें येती निजसाम्या ॥ ७२ ॥
चंदनाच्या संगतीत असलेल्या बोरीबाभळीही चंदन होतात म्ह० त्यांच्या लाकडाला चंदनाचा वास येऊ लागतो, त्याचप्रमाणे गुरुवाक्यप्रतीतीनें सर्व द्वंद्वे एकरूप होतात. ७२

चंदनासभोंवतीं झाडें । तींही कोरडीं लांकडें ।
देवद्विजांचे मस्तकी चढे । भाग्य एवढें सत्संगी ॥ ७३ ॥
चंदनाच्या सभोवार असलेली झाडे गंधरहित शुद्ध लाकडे असतात; पण संगतीच्या बलाने ती देव-ब्राह्मणांच्या मस्तकावर चढतात. सत्संगामध्ये एवढे सामर्थ्य आहे. ७३

सद्‌गुरु तोचि सत्संगती । तत्संगें शिष्य पालटती ।
स्वयें ब्रह्मरूप होती । तेव्हां द्वंदें येतीं निर्द्वंद्वा ॥ ७४ ॥
जो सद्‌गुरु तीच सत्संगति, तिच्या योगाने शिष्य पालटतात, व स्वतः ब्रह्मरूप होतात. त्यानंतर द्वंद्वे निर्द्वंद्व अवस्थेस प्राप्त होतात. ७४

एवं गुरुवाक्यीं विश्वासतां । द्वंद्वसाम्य चढे हाता ।
तें गुरुवाक्यही तत्त्वतां । ऐक आतां सांगेन ॥ ७५ ॥
याप्रमाणे ज्या गुरुवाक्यावर विश्वास ठेविला असतां द्वंद्वसाम्य प्रात होतें तें गुरुवाक्यही मी तुला आतां तत्त्वतः सांगतो. ४७५.

सर्वत्रात्मेश्वरान्वीक्षां कैवल्यमनिकेतताम् ।
विविक्तचीरवसनं सन्तोषं येन केनचित् ॥ २५ ॥
सर्वत्र आत्मेश्वरान्वीक्षां – सर्वत्र सत्य-ज्ञानरूपाने आत्मा व नियामक रूपाने ईश्वर भरून राहिला आहे असे पाहणे – कैवल्यं – एकांतवास – अनिकेततां – गृहधनादिकांचे ठिकाणी अभिमान त्याग – विविक्तचीरवसनं – यथा तथा वस्त्र किंवा वल्कले परिधान करणे – येनकेनचित् संतोषः – कशानेही संतोष असणे – ॥ २५ ॥

सद्‌गुरुवचनविश्वासें । मानीं सर्वत्र परमात्मा ऐसें ।
तेचि निजबुद्धी निश्चयवशें । निजमानसें विवंची ॥ ७६ ॥
सद्‌गुरूवरील विश्वासाने सर्व ठिकाणीं परमात्मा आहे, असें मानतो आणि तीच आपली बुद्धि निश्चयबलाने दृढ करून सर्वदा मनाने तिचेच विवेचन करतो. ७६

मजमाजीं परमात्मा वसे । तेणें स्थूळदेहो वर्ततसे ।
त्याचेनि पूर्ण चित्प्रकाशें । जग भासे जगद्‌रूपें ॥ ७७ ॥
माझ्यामध्यें परमात्मा आहे, त्यामुळेच हा स्थूल देह सर्व व्यवहार करतो. त्याच्याच पूर्ण चित्प्रकाशानें हें जगत् जगदाकारानें भासते. ७७

तेणें निजात्मप्रकाशें माझें । दृष्टीसी दृश्य दिसे ।
दृश्यद्रष्ट्टदर्शनविलासें । विलसतसे परमात्मा ॥ ७८ ॥
त्या निजात्मप्रकाशानें माझ्या दृष्टीला दृश्य दिसते. याप्रमाणे एक परमात्माच दृष्य, द्रष्टा, दर्शन या विकारांनी विकास पावतो. ७८

दृश्य दृश्यपणें जें जें उठीं । तें तें निजात्मता पाठींपोटीं ।
तेणें अन्वयें देवो देखे दृष्टी । आहाळबाहाळ सृष्टि दुमदुमित ॥ ७९ ॥
दृश्य व द्रष्टा या रूपाने जो जो परिणाम होतो तेथे त्याच्या मागोमाग आत्मत्व असतेंच. त्या चैतन्याच्या अनुवृत्तीनेंच हृदयस्थ देव आपल्या दृष्टीने ही सर्व विचित्र प्राण्यांनी दुमदुमलेली सृष्टि पहातो. ७९

तेव्हां जें जें देखे भूताकृती । तेथ परमात्मा ये प्रतीती ।
मी नियंता ईश्वर त्रिजगतीं । हेही स्फुर्तीं स्फुरों लागे ॥ ८० ॥
त्यामुळें भक्त जी जी भूताकृति पहातो, तिच्यामध्यें परमात्माच त्याच्या प्रतितीस येतो. या त्रिभुवनातील नियंता ईश्वर मीच आहें, अशीही प्रतीति त्याला येऊ लागते. ८०

जग वर्ते माझिया सत्ता । मी कळिकाळाचा नियन्ता ।
मी उत्पत्ति-स्थिति-प्रलयकर्ता । हे मूळ अहंता स्वभावें स्फुरे ॥ ८१ ॥
हें जगत् माझ्या सत्तेने सर्व व्यवहार करते, मी कळीकाळाचा नियंता आहें. मी जगाची उत्पत्ति, स्थिति व लय करणारा आहें. ही मूळ अहंता त्याच्यामध्ये स्वभावतःच स्फुरते. ८१

येणें पूर्वान्वयें जंव पाहे । तंव सर्वीं सर्व मीचि आहें
तें पाहतें पाहणें पाहों ठाये । तेथें अहं जाये विरोनि ॥ ८२ ॥
या पूर्वानुवृत्तीनें म्ह० मूळ चैतन्याच्या अनुवृत्तीने भक्त जों पहातो तों सर्वांमध्यें ‘मीच सर्व आहें’ असें त्याला भासते आणि मग दृश्य, दर्शन, द्रष्टा इत्यादि त्रिपुटी जागच्याजागीं थांबते व अहंभाव विरून जातो. ८२

तेथें परब्रह्मैक प्रसिद्ध । कोंदला ठाके सच्चिदानंद ।
ऐसा गुरुवाक्यें प्रबोध । शिष्य अतिशुद्ध पावती ॥ ८३ ॥
त्या अवस्थेंत परब्रह्माचे ऐक्य पूर्णपणे सिद्ध होते. सर्वत्र सत्‌-चित्‌-आनंद भरून रहातो. अति शुद्ध शिष्याला गुरुवाक्यानें असा साक्षात्कार होतो. ८३

तेव्हां वैकुंठीं देवो आहे । हें बोलणें त्या आहाचि होये ।
क्षीरसागरीं देवो राहे । हें ऐकतांचि पाहें अनिवार हांसे ॥ ८४ ॥
त्यानंतर देव वैकुंठीं आहे, हें बोलणें व्यर्थ होतें. देव क्षीरसागरामध्ये रहातो. हें अज्ञाचे वाक्य ऐकतांच त्या ज्ञानी शिष्याला अनिवार्य हसूं कोसळते. ८४

देवांवाचोनि तत्त्वता । तिळभरी ठावो नाहीं रिता ।
त्यातें एकदेशीं नेमितां । न मने वस्तुतां सच्छिष्यासी ॥ ८५ ॥
देवावांचून वस्तुतः एक तीळभरही जागा रिकामी नाहीं, पण अज्ञ त्याला एकदेशी म्हणतो. त्यामुळें सच्छिष्याला तत्त्वतः त्याचें म्हणणें पटत नाहीं. ८५

वैकुंठ आणी क्षीराब्धी । ज्याचेनि प्रकाशे ज्यामधीं ।
तो वैकुंठवासी अथवा क्षीराब्धीं । हे बोल सोपाधी शबलत्वाचे ॥ ८६ ॥
अहो, वैकुंठ आणि क्षीरसागर ज्याच्या प्रकाशाने प्रकाश पावतात व ज्यामध्ये रहातात, तो परमात्मा वैकुंठांत किंवा क्षीरसागरांत रहातो, हें म्हणणे त्याला कसें पटावे ! कारण हे अशाप्रकारचे बोल सोपाधिक शबल ब्रह्मालाच म्ह० हिरण्यगर्भालाच साजतात. ८६

जेथ सर्वीं सर्व परमात्मा । तेथे एकदेशी न सरे महिमा ।
तो पूर्णब्रह्म अनाश्रमा । वैकुंठादि आश्रमा वश नव्हे ॥ ८७ ॥
जेथे सर्वांमध्ये सर्व परमात्मा आहे तेथें हा असला एकदेशी महिमा पुरेसा होत नाहीं. कारण पूर्ण ब्रह्म आश्रमादि देशाने मर्यादित होत नाहीं. त्यामुळें तो वैकुंठादि आश्रमाला वश होत नाहीं. ८७

अखंडातें आवाहन । अधिष्ठानातें आसन ।
सर्वगता सिंहासन । कल्पिती स्थान निजकल्पना ॥ ८८ ॥
अखंड परमात्म्याचे पूजासमयी आवाहन, सर्वगत ईश्वराला बसण्यासाठी सिंहासनादि आसन, इत्यादिकांची कल्पना हा निव्वळ भ्रम आहे. ८८

तेही कल्पिती निजवृत्ती । जे ब्रह्मरूप नित्य पाहती ।
त्यांची परब्रह्मस्थिती । कदा कल्पांतीं भंगेना ॥ ८९ ॥
तथापि कांहीं परिच्छिन्न दृष्टीचे लोक आपल्या समजुतीप्रमाणें त्यांचीही कल्पना करतात. परंतु जे नित्यब्रह्मरूप पहातात, त्यांची परब्रह्मस्थिति कधीं कल्पांतींही भंग पावत नाहीं. ८९

ऐशी परब्रह्मआवाप्ती । साधकीं पावावया निश्चितीं ।
नित्य वसावें एकांतीं । द्वैताची स्फुर्ती त्यागोनी ॥ ९० ॥
साधकाला अशी परब्रह्मप्राति निश्चयानें व्हावी म्हणून त्यानें द्वैतदृष्टि सोडून नित्य एकांतात बसावे. ४९०

साधितां परमार्थनिधान । साधकां आडवी वस्त्रअन्न
निमोली वल्कलें परिधान । कां त्यागिलीं अतिजीर्ण वस्त्रें घ्यावीं ॥ ९१ ॥
परमार्थरूपी निधान साधण्यासाठी यत्न करीत असतांना साधकाला अन्न-वस्त्र प्रतिबंध करते. म्हणून त्यानें अरण्यांत फुकट मिळणारी वल्कले धारण करावी किंवा लोकांनी टाकून दिलेली फाटकींतुटकीं वस्त्रे नेसावी. ९१

शाकफलमूलकंदभोजन । येणें करावें जठरतर्पण ।
सांडूनि परमार्थ साधन । जोडावया अन्नधन न वचावें कदा ॥ ९२ ॥
यदृछेने प्राप्त झालेली शाक, फळ, मूळ किंवा कंद खाऊन जठराची तृप्ति करावी. पण परमार्थीचे साधन सोडून अन्न व धन मिळविण्यासाठीं आपलें आयुष्य कधीं फुकट दवडू नये. ९२

चौपालवीं बांधोनि करीं । भीक मागावी दारोदारीं ।
परी अन्न आच्छादनावरी । आयुष्य तिळभरी न वेंचावें ॥ ९३ ॥
हातांत चौपदरी घेऊन दारोदार भीक मागावी. पण अन्न व आच्छादन यांसाठी एक क्षणभरही आयुष्य खर्ची घालू नये. ९३

मेळवावया अन्न आच्छादन । न शिणती साधक सज्ञान ।
देह अदृष्टाधीन । तें सहजें जाण प्रतिपाळी ॥ ९४ ॥
जे साधक ज्ञानी असतात ते अन्नवस्त्र मिळविण्यासाठी कष्ट करीत नाहींत. देह अदृष्टाधीन आहे, तें अदृष्टच त्याचें अनायासाने प्रतिपालन करील. ९४

स्वयें शिणतां अहोराती । अदृष्टावेगळी अणुभरी प्राप्ती ।
कदा न चढे कोणाचे हातीं । हें साधक जाणती सज्ञान ॥ ९५ ॥
स्वतः अहोरात्र वाटेल तिके जरी कष्ट केले तरी अदृष्टावांचून अणुमात्रही लाभ कोणाला कधींच होत नाहीं, हें ज्ञानी साधक जाणतात. ९५

यालगीं अदृष्टें जें प्राप्त । तेणें निर्वाहें सदा निश्चिंत ।
साधक परमार्थ साधित । संतोषयुक्त गुरुवाक्यें ॥ ९६ ॥
त्यामुळें अदृष्टाने जें प्राप्त होईल त्यावर निर्वाह करून सर्वदा निश्चिंत असलेले साधक गुरुवाक्यानें संतोषयुक्त होऊन परमार्थ साधतात. ९६

देह अदृष्टपरवडी । होती सुखदुःख घडामोडी ।
साधकां संतोषु चढोवढी । गुरुवाक्यसुख गोडी दृढ लागली ॥ ९७ ॥
देहप्रारब्धाप्रमाणें सुख-दुःखांच्या घडामोडी होतात. साधकाचा संतोष उत्तरोत्तर वाढत असतो. गुरुवाक्याने साधकाला त्या संतोषाची पूर्ण गोडी लागलेली असते. ९७

जैसें देहाचे प्राक्तन । तैसें होय अशन वसन ।
परी गुरुवाक्यसुख सांडून । देहावरी मन ममत्वें न ये ॥ ९८ ॥
देहाचे प्राक्तन जसे असतें तसें त्याला अन्न-वस्त्र अनायासाने प्राप्त होतें. पण गुरुवाक्याचे सुख सोडून त्याचें मन ममत्वाने देहावरआसक्त होत नाहीं. ९८

यांचेवीण यथाकाळें । यदृच्छया जें जें मिळे ।
तें तें सेवी सकळ मंगळें । गुरुवाक्यमेळें स्वानंदें ॥ ४९९ ॥
याचनेवांचून त्या त्या काली यदृच्छेने जें जें प्राप्त होईल तें तें सर्व गुरुवाक्यानें प्राप्त झालेल्या संतोषानें गोड मानून त्याचें सेवन करतो. ९९

शरीरनिर्वाहाविखीं । कोठें कांहीं नाभिलाखी ।
जें जें मिळे तेणेंचि सुखी । निजात्मतोखीं संतुष्ट ॥ ५०० ॥
शरीरनिर्वाहासाठीं कोठे कशाचाही अभिलाष धरीत नाहीं, तर जें जें मिळेल त्यानेंच संतुष्ट होतो. तो आत्मसंतोषानेच सदा संतुष्ट असतो. ५००

प्रारब्धें सुखदुःख भोगितां । संतोष साधकांच्या चित्ता ।
हें गुरुवाक्यें विश्वासतां । चढे हाता शिष्याच्या ॥ ५०१ ॥
प्रारब्धानुसार सुख-दुःख भोगित असतां साधकाच्या चित्ताला संतोषच होतो, हें म्हणणें गुरुवाक्यावर विश्वास ठेविला असतां शिष्याच्या प्रतीतीला येतें. १

त्याच्या दृढ विश्वासासीं । भागवतशास्त्र गुरुपाशीं ।
अभ्यासावें आदरेंसीं । दृढ-निश्चयेंसीं प्रबोधक ॥ ५०२ ॥
गुरुवाक्यावर दृढ विश्वास बसण्यासाठी गुरुपाशींच भागवतशास्त्राचें आदराने अध्ययन करावे म्हणजे तें शास्त्र निश्चयानें ज्ञानदायक होतें. ५०२.

श्रद्धां भागवते शास्त्रेऽनिन्दामन्यत्र चापि हि ।
मनोवाक्कर्मदण्डं च सत्यं शमदमावपि ॥ २६ ॥
भागवते शास्त्रे श्रद्धां – भगवत्प्रतिपादक शास्त्राविषयी विश्वास – अन्यत्र च अपि अनिंदांही – आणि इतर शात्रांविषयी सुद्धा अगदी अनिंदा – मनोवाक् कर्मदंडं च – आणि मन, वाणी व कर्म यांचे नियमन – सत्यं शमदमौ अपि – सत्य, मनोनिग्रह व इंद्रियांचा निग्रह करणे – ॥ २६ ॥ [ भगवत्स्वरूपाचे प्रतिपादन करणाऱ्या शास्त्रावर श्रद्धा ठेवण्यास शिकावे. अन्य शास्त्रादिकांचीही निंदा न करण्यास शिकावे. मनाचा प्राणायामांनीं निरोध करावा, वाणीचे मौनाने नियमन करावे शरीराला कर्मत्यागानें दंड करावा. सत्य म्ह० यथार्थ भाषण, अंतःकरणाचा निग्रह हा शम व बाह्येंद्रियांचा निग्रह हा दम, यांचें शिक्षण घ्यावे. ] २६.

सगुण अथवा निर्गुण ।जेथ भगवत्स्वरूपवर्णन ।
कं भगवंत बोलिला आपण । अथवा भगवद्‌गुणकीर्ति जेथें ॥५०३ ॥
ज्यांत सगुण किंवा निर्गुण भगवत्‌स्वरूपाचें वर्णन असतें किंवा जें स्वतः भगवानाने सांगितलेले असतें, अथवा ज्यात भगवदगुणकीर्ति असते, ३

तें तें राया शास्त्र जाण । आवडे जैसें जीवुप्राण ।
विशेषेंसीं ज्ञान कथन । सप्रेम पूर्ण पढियंतें ॥ ५०४ ॥
तें तें भागवत शास्त्र होय. ज्याला असलें शास्त्र आपला जीव कीं प्राण वाटतो, विशेषतः ज्यात सप्रेम ज्ञानकथन असतें, तें ज्याला फार आवडते, ४

गुरुमुखें ज्ञानकथा गोड । तेणें श्रीभागवतीं श्रद्धा दृढ ।
श्रवणें पुरे जीवाचें कोड । वोसरे चाड विषयांची ॥ ५०५ ॥
गुरुमुखाने ऐकत असलेली ज्ञानकथा ज्याला फार गोड वाटते व त्यामुळें श्रीभागवत शास्त्रावरील ज्याची श्रद्धा दृढ होते, अशा शास्त्राच्या श्रवणाने त्याच्या मनातील हौस पुरी होते आणि विषयप्रीति नाहीशी होते. ५

जीवीं नाहीं विषयकौतुकें । तरी विषय आवश्यक ।
साधकां होती बाधक । तेणें आत्यंतिक अनुतापु ॥ ५०६ ॥
त्याला विषयाचे कौतुक वाटत नाहीं, कारण विषय साधकांना अवश्य बाधक होतात व त्यामुळें साधकाला अत्यंत पश्चात्ताप होतो. ६

अनिवार विषयावस्था । त्यागिली न वचे निजसत्ता ।
तेणें मुमुक्षूच्या चित्ता । अत्यंत व्यथा अनुतापें ॥ ५०७ ॥
विषयप्रीति अनिवार आहे. तिच्यापुढे आत्मप्रतीति येत नाहीं. म्हणून मुमुक्षूच्या चित्ताला पश्चात्तापाची फार व्यथा होते. ७

नसतां विषयांची अतिप्रीति । स्वतां नव्हे विषयनिवृत्ति ।
ऐशिया साधकांप्रती । निर्णीत शास्त्रार्थीं नेमिला नेमु ॥ ५०८ ॥
विषयांची अतिशय प्रीति तर नाहीं, पण विषयांची निवृत्तिही आपोआप होत नाही, अशा साधकांसाठी शास्त्रामध्यें निश्चित नियम सांगितला आहे. ८

नाहीं विषयांची आसक्ति । ना नव्हे विषयनिवृत्ति ।
ऐशी जे कां साधकस्थिति । नेमू त्याप्रती शास्त्रें केली ॥ ५०९ ॥
विषयासक्तीही नाहीं व विषयनिवृत्तीही नाहीं अशी जी साधकांची स्थिति तिला उद्देशून शास्त्रांनी नियम केलेला आहे. ९

जो कां केवळ विषयासक्त । तो कदा न मानी शास्त्रार्थ ।
कां जो झाला जीवन्मुक्त । तोही शास्त्रार्थ मानूनि न मानी ॥ ५१० ॥
जो केवल विषयासक्त असतो तो शास्त्रार्थाला केव्हांही मानीत नाहीं आणि जो जीवन्मुक्त झाला तोही पूर्वी जरी शास्त्रार्थ मानीत असला तरी आतां मानीत नाहीं. ५१०

जैसी मृगजळाची भासे स्थिति । तैसे विषय मुक्तांप्रती ।
त्या विषयांचिये निवृत्ती । कोणते शास्त्रार्थीं मानावा नेमु ॥ ५११ ॥
मुक्तांना विषय मृगजळासारखे भासतात. तेव्हां त्यांनीं विषयांच्या निवृत्तीसाठी कोणत्या शास्त्रांतील कोणता नियम मानावा ! ११

एवं अत्यासक्त अतिविरक्त । त्यंसी नेमु न चले येथ ।
मुमुक्षूंसीच शास्त्रार्थ । नेमी निश्चित निजनेमे ॥ ५१२ ॥
याप्रमाणे अति आसक्त व अति विरक्त या दोघापुढेंही शास्त्रनियमाचें कांहीं चालत नाहीं. यास्तव शास्त्र मुमुक्षूंनाच निश्चित आपल्या नियमानें नियत करते. १२

तेथ गुरुशिष्यसंवाद । करितां ज्ञानार्थबोध ।
ते बोधीं बाधी विषयबाध । तत्त्यागीं प्रसिद्ध शास्त्रार्थनेमु ॥ ५१३ ॥
याविषयी गुरु व शिष्य यामध्ये होणारा जो संवाद त्यापासून ज्ञानार्थ बोध होतो. त्या बोधाने विषयपीडा नाहींशी होते. विषयत्यागासाठीं शास्त्रार्थांचा नियम प्रसिद्ध आहे. १३

मनसा-वाचा-कर्मावरोधु । येणें विषयांचा त्रिविध बाधु ।
त्या तिहींसही त्रिविधु । शास्त्रें अतिशुद्धु नेमिला नेमु ॥ ५१४ ॥
मन, वाणी व शरीर यांच्या विरोधाने मानसिक, वाचिक व शारीरिक विषयांचा बाध होतो. त्या त्रिविध बाधासाठी या श्लोकाच्या ‘मनोवाक्कर्मदण्डम्०’ या उत्तरार्धांत शास्त्रानें तीन प्रकारचा अति शुद्ध नियम नियत केला आहे. १४

पूर्वश्लोकोत्तरार्धम् – मनोवाक्कर्मदण्डं च सत्यं शमदमावपि ॥
मनाला उपशमाचा म्ह० शांतीचा नियम आणि इंद्रियांना दमाचा म्ह० बाह्य इंद्रियनिग्रहांचा नियम सांगितला आहे. वाणीला सत्याने नियत केलें आहे. याप्रमाणे या तीन साधनांचे नियम सांगितले आहेत. १५

मनासी नेमु उपशमाचा । इंद्रियां नेमु तो दमाचा ।
सत्यें नेमिलीं वाचा । तिहींसही तिहींचा निजनेमु ॥ ५१५ ॥
वाणीनें, कर्मानें, इंद्रियांचा व मनाचा निग्रह करणे.

विषयकाम गज दारुण । अहंमदें उन्मत्त पूर्ण ।
देहतारुण्यें अतिघूर्ण । तोडी बंधन विधीचें ॥ ५१६ ॥
विषयेच्छा हा भयंकर हत्ती आहे. तो ‘अहं’ या महामदानें अतिशय मत्त झालेला असतो. देहाच्या तारुण्यानें त्याचे डोळे फिरून गेले असतात. त्यामुळें तो शास्त्रविधीचें बंधन तोडून टाकतो. १६

रवंदी सुहृद राजा गुरु । सोंडां कवळी स्वर्गशिखरु ।
नरकनदीमाजीं अपारु । अतिदुस्तरु बुड्या देत ॥ ५१७ ॥
सुहृद, राजा, गुरु यांचा अपमान करतो. आपल्या सोंडेने स्वर्गाच्या शिखरालाही कवटाळतो व अपार नरकनदीमध्यें अति दुस्तर बुड्या मारतो. १७

धर्मजलें क्षाळे अवचिता । सवेंचि सलोभ धुळी घाली माथां ।
घोळसी ब्रह्मादिकां समस्तां । अहंममता गर्जतु ॥ ५१८ ॥
कदाचित् एखाद्या वेळीं धर्मजलांत तो स्नान करतो; पण लागलीच लोभरूपी माती आपल्या डोकीवर घेतो. ब्रह्मादि सर्व समर्थांना पायांखाली तुडवितो आणि अहं-ममतेने गर्जना करूं लागतो. १८

त्यासी विवेकमहावत जाण । माथां चढों जाणे आपण ।
शास्त्रविधी-अंकुशें पूर्ण । धरिला आवरून करकरितु ॥ ५१९ ॥
त्याला वठणीवर आणणारा विवेक हाच महात आहे. त्या विषयकामरूप मत्तगजाच्या मस्तकावर कसें चढावे हें तो जाणतो व शास्त्रविधि याच तीक्ष्ण अंकुशाने त्यानें त्या गजाला आवरून धरले १९

त्यासी उपशमाचें संरक्षण । वैराग्ययुक्त ठेवूनि जाण ।
दमाचे शृंखळीं आकळून । सत्याचे स्तंभीं पूर्ण विवेकु बांधे ॥ ५२० ॥
म्हणजे तो चिं चिं करूं लागतो. त्याचें संरक्षण करण्यासाठीं त्याच्यावर वैराग्ययुक्त उपशमाचा पहारा ठेवून व दमाच्या शृंखलांनी त्याला बांधून तो विवेकमहात सत्याच्या स्तंभाशी त्याला जखडून टाकतो. ५२०

मनसा-वाचा-कायिक कर्म । येणें विषयबाधा बाधी परम ।
त्या तिहींसी केला त्रिविध नेम । त्या नेमाचें वर्म ऐक राया ॥ ५२१ ॥
याप्रमाणे कायिक, वाचिक व मानसिक कर्मांच्या योगाने शास्त्र विषयपीडेला प्रतिबंध करते शास्त्रानें त्या तीन साधनांचे तीन नियम सांगितले आहेत. राजा, त्यांचें वर्म मी तुला सांगतो. २१

आतां शमाची ऐशी स्थिती । मनबुद्ध्यादि चित्तवृत्ती ।
सांडवूनि विषयासक्ती । लावी परमार्थीं प्रबोधूनि ॥ ५२२ ॥
मन, बुद्धि इत्यादि चित्तवृत्तींचे नियमन करून, विषयासक्ति सोडवून व बोध करून शम त्याला परमार्थी लावतो. २२

पूर्वे उगवतां गभस्ती । आंधारु सांडी त्रिजगती ।
तेवीं गुरुवाक्यें शमाची प्राप्ती । विषयनिवृत्ति मानसिक ॥ ५२३ ॥
पूर्वेस सूर्य उगवताच अंधकार जसा नाहींसा होतो, त्याप्रमाणें गुरुवाक्यानें शमाची प्राप्ति होते. मानसिक विषयांची निवृत्ति हाच शम होय. २३

बाह्य इंद्रियप्रवृत्ती । दमें दमोनि गुरुवाक्यस्थिती ।
मग शमाची संगति । आणी निवृत्ती इंद्रियकर्में ॥ ५२४ ॥
ह्या नियमानें, गुरुवाक्याच्या आधाराने, बाह्यइंद्रियप्रवृत्तीचे नियमन करून, शमाच्या साह्याने इंद्रियकर्मांची निवृत्ति करतो. २४

कन्या प्रतिपाळूनि जैसी । दान देतां जांवयासी ।
त्यागी बापाचे कुळगोत्रासी । दमें इंद्रियें तैशीं विषयार्था ॥ ५२५ ॥
कन्येला वाढवून जावयाला तिचे दान दिलें असतां ती पित्याच्या कुलगोत्राला जशी सोडते, तशी इंद्रिये दमाच्या योगाने विषयप्रवृत्तीला सोडतात. २५

झणीं वाचा जा‍ईल विकळ । तिसी सत्याचा महामोकळ ।
दे‍ऊनि केली निखळ । अति‍अढळ सत्यधूत वाणी ॥ ५२६ ॥
कदाचित् वाचा असत्य, अभद्र भाषण करील म्हणून तिला सत्याचा तोबरा देऊन प्रतिबद्ध केलें. त्यामुळें ती नियमानें सत्य व पवित्र झाली. २६

सत्यवादिया ब्रह्मादि वंदिती । असत्या होय अधोगती ।
ऐसें व्याख्यन जे करिती । तेही वदती असत्य ॥ ५२७ ॥
‘सत्य भाषण करणाराला ब्रह्मादि देवही वंदन करतात व असत्य भाषण करणारास अधोगति मिळते’ असें भर सभेत जे मोठ्या आवेशाने व्याख्यान देतात तेही प्रसंगी खोटे बोलतात. २७

कां रामनामाच्या आवृत्तीं । वाचा धूतली स्मरणोक्तीं ।
ते असत्यामाजीं पुढती । कदा कल्पांतीं बुडेना ॥ ५२८ ॥
रामनामाच्या स्मरणाची अविच्छिन्न आवृत्ति केल्याने ज्याची वाचा निर्मळ झाली आहे, ते पुढें कधीं कल्पांतींही असत्यांत बुडत नाहींत. २८

मंथूनि काढिलें नवनीत । तें पुढती न बुडें ताकांत ।
तेवीं नामें वाचा निर्धूत । असत्य तेथ स्पर्शेना ॥ ५२९ ॥
दही घुसळून लोणी काढल्यावर मग तें ताकांत बुडत नाहीं, त्याप्रमाणें रामनामाने वाणी पवित्र झाली म्हणजे मग तिला असत्य स्पर्शही करीत नाहीं. २९

जेवीं लागलेनि रविकरें । घृतकणिका स्वयें विरे ।
तेवीं सत्याचेनि निजनिर्धारें । असत्य चमत्कारें समूळ उडे ॥ ५३० ॥
सूर्यकिरणांचा स्पर्श होतांच तुपांतील कण्या जशा विरघळून जातात, त्याप्रमाणें सत्याच्या निर्धाराने असत्य मोठ्या चमत्कारानें समूळ नाहीसे होतें. ५३०

चंदनाचिया चौफेरीं । काष्ठत्वा मुकती खैर बोरी ।
तेवीं नामाच्या निजगजरीं । वाचेमाझारीं निजसत्य प्रगटे ॥ ५३१ ॥
चंदनाच्या सहवासांत असलेला खैर, बोरी इत्यादि वृक्ष आपल्या काष्ठालाच मुकतात, त्याप्रमाणें रामनामाच्या गजराने वाणीमध्ये स्वाभाविक सत्य प्रकट होतें. ३१

झलेनि अर्कप्रकाशें । खद्योत हारपती जैसे ।
तेवीं रामनामसौरसें । लोपे अनायासें असत्य ॥ ५३२ ॥
सूर्याचा प्रकाश पडताच काजव्याचा प्रकाश लोपतो, त्याप्रमाणें रामनामाच्या प्रभावाने असत्य अनायासाने लोपते. ३२

अंवसेसी प्रतिपदे कुहु । गेलिया बिंब सांडी राहु ।
तेव्हां प्रकाशाचा समूहु । प्रगटे बहु जगामाजीं ॥ ५३३ ॥
पूर्ण अमावास्येला एक अशाने असलेला चंद्र प्रतिपदेमध्यें गेला म्हणजे राहू त्याच्या बिंबाला सोडतो आणि मग त्याचा प्रकाश जगामध्ये प्रकट होतो, ३३

तेवीं असत्याचेनि आक्रमें । वाचा प्रकाशे सत्यसंभ्रमें ।
जेवीं राजाज्ञा‍अनुक्रमे । प्रजा स्वधर्में वर्तती ॥ ५३४ ॥
त्याप्रमाणें असत्याला पराभूत करून वाणीमध्ये सत्य अनायासाने प्रकट होतें. राजाज्ञेच्या अनुसार प्रजा स्वधर्माने जशी वागते, ३४

सत्यापरतें नाहीं तप । सत्यापरता नाहीं जप ।
सत्यें पाविजे सद्‌रूप । सत्यें निष्पाप साधक होती ॥ ५३५ ॥
त्याप्रमाणें वाणी सत्यालाच अनुसरते. सत्याहून निराळें तप नाही सत्याहून वेगळा जप नाहीं, सत्याने सद्‌रूपाची प्राप्ति होते व सत्याने साधक निष्पाप होतो. ३५

एवं काया वाचा आणि मनें । शमदमादिसत्यलक्षणें ।
जो नेमिला त्रिविधविंदानें । त्याचे विषयाचें धरणें तत्काळ उठी ॥ ५३६ ॥
याप्रमाणे शरीर, वाक् व मन यांनी शम, दम, सत्य इत्यादि त्रिविध श्रेष्ठ साधनांमध्ये जो निमग्न झालेला असतो त्याच्या मनातील विषयांचे धरणे तत्काळ उठते. ३६

ऐसिया स्वार्थालागीं जीवीं । भगवच्छास्त्रीं आवडी करावी ।
परी आणिकां शास्त्रां न लावी । द्वेषभावीं निंदेचें बोट ॥ ५३७ ॥
अशा स्वार्थासाठी तो आपल्या मनांत भगवत्स्वरूप प्रतिपादनशास्त्रावर मोठी प्रीति ठेवतो, पण इतर शास्त्रांना द्वेषभावानें निंदेचे बोट लावीत नाहीं. ३७

एका स्तुती एका निंदा । करितां आदळे अंगी बाधा ।
यालागीं निंदानुवादा । साधक कदा नातळती ॥ ५३८ ॥
कारण एकाची स्तुति व एकाची निंदा करूं लागले असता मोठा दोष लागतो. म्हणून साधक कोणाची निंदा करीत नाही. ३८

अर्धांगींची लक्ष्मी वंदावी । मा चरणींची गंगा काय निंदावी ।
निजजननी नमस्करावी । काय येरां द्यावी पांपर ॥ ५३९ ॥
भगवानांच्या अर्धांगी असलेल्या लक्ष्मीला मात्र वंदन करावे आणि त्याच्या चरणापासून निघालेल्या गंगेची काय निंदा करावी, होय ! आपल्या जननीला मात्र नमस्कार करावा आणि इतर स्त्रियांना काय लाथा माराव्या ! ३९

तरी भज्य भजावें भजनीं । परी निंदा स्तुति सांडूनि दोनी ।
जो निजसत्यें होय मौनी । तैं ब्रह्मज्ञानीं अधिकारु ॥ ५४० ॥
यास्तव आपल्या उपास्याचे प्रेमाने भजन करावे, पण तें निंदा व स्तुति या दोहोंना सोडून करावे. जो स्वाभाविक सत्याने मौनी होतो, तोच ब्रह्मज्ञानाचा अधिकारी आहे. ५४०

ऐशी न करितां व्युत्पत्ति । न सोशितां हे कष्टस्थिति ।
भावें करितां भगवद्‌भक्ति । फुकाची मुक्ति हरिभक्तां ॥ ५४१ ॥
शास्त्रव्युपत्तीसाठी विशेष खटपट न करतां व प्राणायामादि साधनांचे कष्टही न सोशितां भगवद्‌भक्तांना केवल निरतिशय प्रेमाने भगवद्‌भक्ति केल्यानेच मुक्ति अनायासाने मिळते. ४१

ते भक्तीची निजस्थिति । राया सांगेन तुजप्रती ।
सुगमत्वें परमात्मप्राप्ति । हरिभक्त पावती तें ऐक ॥ ५४२ ॥
हे राजा, मी तुला त्या भक्तीचीच स्वाभाविक स्थिति सांगतो. हरिभक्तांना अनायासाने परमात्मप्राप्ति कशी होते, ती ऐक. ५४२.

श्रवणं कीर्तनं ध्यानं हरेरद्‌भुतकर्मणः ।
जन्मकर्मगुणानां च तदर्थेऽखिलचेष्टितम् ॥ २७ ॥
हरेः अद्‌भुतकर्मणः – ज्याची कर्में विलक्षण आहेत अशा श्रीहरीच्या – जन्मकर्मगुणानां – अवतारातील, चरित्रांचे व गुणांचे – श्रवणं कीर्तनं ध्यानं – श्रवण, कीर्तन, ध्यान-चिंतन – तदर्थे च – आणि त्याच्या म्हणजे भगवम्तांच्या प्रीत्यर्थच – अखिलचेष्टितम् – सर्व कर्मांचे आचरण भगवंतासाठीच करणे ॥ २७ ॥ [ अदभुत कर्म करणाऱ्या हरीच्या जन्मादिकांचे श्रवणादि शिकावे व ईश्वरार्थ केलेल्या सर्व कर्मांचे ज्ञान संपादन करावे. ] २७.

मुख्य भक्तीचें करण । हरीचे जन्म-कर्म-गुण ।
पूर्ण श्रद्धा करावे श्रवण । हरिकीर्तन स्वानंदें ॥ ५४३ ॥
हरीचे जन्म, कर्म व गुण हें भक्तीचे मुख्य कारण आहे. यास्तव त्याच्या जन्मादिकांचें श्रवण पूर्ण श्रद्धेने करावे व स्वानंदानें हरिकीर्तन करावे ४३

हरिकीर्तनाचिया जोडी । सकळ साधनें केलीं बापुडीं ।
अद्‌भुत कर्में हरीचीं गाढीं । गातां अति‍आवडी उल्हासे ॥ ५४४ ॥
हरिकीर्तनाशीं तुलना करूं लागल्यास इतर सर्व साधने कमी प्रतीचीं ठरतात. हरीच्या अद्‌भुत कर्मांचे मोठ्या प्रेमाने गायन करूं लागलें असतां मनाला मोठा आल्हाद होतो. ४४

शिळा तारिल्या सागरीं । गोवर्धन धरिला करीं ।
निद्रा न मोडितां सकळ नगरी । द्वारकेमाझरीं आणिली मथुरा ॥ ५४५ ॥
हरीने समुद्रावर शिळा तरावयास लावल्या, हातांत गोवर्धन पर्वत धरला व लोकांची झोप न मोडता सर्व मथुरानगरी द्वारकेंत नेली. ४५

निमाला गुरुपुत्र दे आणूनि । मुखें प्राशिला दावाग्नि ।
गत गर्भ आला घे‍ऊनि । निजजननीतोषार्थ ॥ ५४६ ॥
मेलेल्या गुरुपुत्राला परत आणून दिलें. दावाग्नीला गिळिलें. आपल्या मातेला संतुष्ट करण्यासाठीं कंसाने मारलेल्या तिच्या गर्भांना परत आणलें. ४६

अजन्म्या जन्में नेणों किती । अकर्म्याचीं कर्में गाती ।
अगुणाचे गुण वर्णिती । तेणें श्रीपति सुखावे ॥ ५४७ ॥
जन्मरहित असलेल्याही त्याचे किती जन्म झाले काही कळत नाहीं. तथापि भक्त जन्मरहिताच्याही जन्माचे, कर्मरहिताच्या कर्मांचे व निर्गुणाच्या गुणांचे वर्णन करतात व त्यामुळें तो श्रीपति संतुष्ट होतो. ४७

जो सुखैकमूर्ति निजस्वभावें । तोही जन्म-कर्म-गुणवैभवें ।
गातां कीर्तनीं अतिसुखावे । स्वानंदगौरवें डुल्लतु ॥ ५४८ ॥
जो स्वभावतःच केवळ सुखरूप असलेला हरि तोही भक्त कीर्तनामध्यें जन्म, कर्म व गुण यांचें वैभव गावू लागले असतां अति प्रसन्न होतो व स्वानंदभरानें डोलू लागतो. ४८

ऐशी कीर्तनीं गातां कीर्ति । निर्मळ होय चित्तवृत्ति ।
तेथें ठसावे ध्यानस्थिति । ऐक ते नृपती सांगेन ॥ ५४९ ॥
कीर्तनामध्यें भक्त याप्रमाणे हरीची कीर्ति गाऊं लागला असतां त्याची चित्तवृत्ति प्रसन्न होते व हरीच्या स्वरूपांत ध्यानस्थिति ठसते. राजा, मी आतां तुला हरीचे सगुण स्वरूपच सांगतो. ४९

मुकुट कुंडलें मेखळा । कांसे कसिला सोनसळा ।
आपाद रुळे वनमळा । घनसांवळा घवघवित ॥ ५५० ॥
मस्तकावर मुकुट, कानांत कुडले, कमरेला मेखळा, पीतांबराचे परिधान, पायांपर्यंत लोंबणारी वनमाळा यांनी युक्त असलेला तो मेघश्याम सूर्याप्रमाणें झळकत आहे, ५५०

ऐशी मूर्ती सुरेख सगुण । कां निरसून रूप नाम गुण ।
ध्यानीं ठसावे निजनिर्गुण । ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वें ॥ ५५१ ॥
अशी सुरेख सगुण मूर्ति नाम, रूप व गुण यांचे निरसन करून ध्यानामध्यें ठसते. स्वभावतः निर्गुण व परिपूर्ण ब्रह्म ५१

ऐसें ठसावतां ध्यान । भक्तांची सबाह्य क्रिया पूर्ण ।
ते ते होय कृष्णार्पण । स्त्रीपुत्रादि जाण सर्वस्वें ॥ ५५२ ॥
याप्रमाणे पूर्णत्वाने ठसले असतां भक्तांची जी जी बाह्य किंवा आंतर क्रिया ती ती सर्व स्त्री-पुत्रादि सर्वस्वासह कृष्णार्पण होते. ५५२.

इष्टं दत्तं तपो जप्तं वृत्तं यच्चात्मनः प्रियम् ।
दारान्सुतान्गृहान्प्राणान्यत्परस्मै निवेदनम् ॥ २८ ॥
इष्टं दत्तं तपः जप्तं – यज्ञादिक वैदिक कर्मे, दानादिक स्मार्त कर्मे, तपश्चर्या, जप, – वृत्तं यत् च – सदाचरण आणि जे – आत्मनः प्रियं – आपणाला प्रिय अशा – दारान् सुतान् गृहान् – स्त्री, पुत्र घर इत्यादि – प्राणान् परस्मै यत् निवेदनम् – प्राण व परमेश्वराला प्रिय अशी सेवा समर्पण करणे – ॥ २८ ॥ [ यागादि प्राणान्त सर्व वस्तूंचे ‘मी परमात्म्याचा सेवक आहें’ या भावनेने त्याला समर्पण करणे, हेही शिकावे. ] २८.

अग्निहोत्रादि याग होम । ग्रहणादि दान अनुत्तम ।
तप म्हणिजे स्वधर्म । जो वर्णाश्रम यथोचित ॥ ५५३ ॥
अग्निहोत्रादि याग व होम, ग्रहणादिप्रसंगीं उत्तम दान, तप म्ह० वर्णाश्रमोचित स्वधर्म, ५३

आगमोक्त यथाशास्त्र । आवरणविधि-विधानतंत्र ।
गुरुदीक्षा शुद्ध मंत्र । अथवा नाममात्र जो जपु कीजे ॥ ५५४ ॥
शास्त्रोक्त आचार, आवरणादि विधिविधान तंत्रे, गुरुदीक्षा, शुद्धमंत्राचा किंवा नाममंत्राचा जप ५४

तें यज्ञ दान क्रिया तप । दीक्षामंत्र कां नामजप ।
तेथें न घालितां संकल्प । करी निर्विकल्प कृष्णार्पण ॥ ५५५ ॥
इत्यादि हें सर्व करून ‘यांचा कर्ता मी आहे,’ अस्त संकल्प न करतां निर्विकल्प मनाने त्यांना कृष्णार्पण करावे. ५५

हरीशीं जाहले जे अनन्य शरण । ते हरीचे लडिवाळ पूर्ण ।
त्यांचें हरि करी प्रतिपाळण । जेवीं जननी जाण तानुलेया ॥ ५५६ ॥
हरीला जे अनन्य शरण होतात ते त्याला अतिशय आवडतात आणि माता आपल्या तान्ह्या मुलाचे जसे परिपालन करते, तसें हरि त्यांचें परिपालन करतो. ५६

यालागीं जें जें जीविकावर्तन । तेंही करावें कृष्णार्पण ।
हें माझें म्हणोनि अभिमान । भक्त सज्ञान न धरिती कद ॥ ५५७ ॥
यास्तव आपल्या उपजीविकेची वृत्तीही कृष्णार्पण करावी. ज्ञानी भगवदभक्त ‘हें माझें’ असें म्हणून कोठेही अभिमान ठेवीत नाहीं. ५७

ज्याची आवडी अतिशयें चित्तीं । ज्याची आपणिया अतिप्रीति ।
तें तें कृष्णार्पण करिती । गुरुवाक्यस्थिती विश्वासें ॥ ५५८ ॥
मनांत ज्याची अतिशय आवड असते आणि ज्यावर अतिशय प्रीति असते तें तें सर्व गुरुवाक्यावरील विश्वासाने कृष्णार्पण करतात. ५८

यलागीं आठही प्रहर । सेवेसी वेंचिति निजशरीर ।
निमिषार्धही व्यापार । विषयाकार करिती ना ॥ ५५९ ॥
भगवद्‌भक्त आठही प्रहर भगवद्सेवेत आपलें शरीर वेचतात. अर्धा क्षणही विषयाकार व्यापार करीत नाहींत. ५९

अन्नालागी हो‍ऊनि वेडें । सधनांच्या पायां न पडे ।
आयुष्याचे तीन कवडे । विषयाचे चाडे कदा न करी ॥ ५६० ॥
अन्नासाठी वेडे होऊन धनिकांच्या पायां पडत नाहींत. विषयतृष्णेने आपलें आयुष्य तीन कवडीचे म्ह० कवडीमोल करीत नाहीत. ५६०

आयुष्याची अर्ध घडी । वेंचितां न मिळे लक्ष कोडी ।
तेणें आयुष्यें परमार्थ जोडी । विषयांच्या कोडी थुंकोनि सांडी ॥ ५६१ ॥
लक्षावधी होन जरी खर्च केले तरी आयुष्याची अर्ध घडी मिळत नाहीं, हें जाणून भक्त असंख्य विषयांनाही थुंकून टाकून म्ह० तुच्छ मानून त्याच आयुष्याने परमार्थ जोडतात. ६१

त्यागोनिया राज्यसंपत्ती । राजे जा‍ऊनि वनाप्रति ।
स्वयें परमार्थ साधिती । विषयासक्ति थुंकोनि ॥ ५६२ ॥
राजे राज्यसंपत्तीचा त्याग करून वनांत जातात आणि विषयासक्ति टाकून स्वतःच परमार्थ साधतात. ६२

कैशी भक्तीची गोडी संपूर्ण । रिता जावों नेदी अर्ध क्षण ।
अवघें जीवितचि जाण । करी कृष्णार्पण सर्वस्वें ॥ ५६३ ॥
अहो, या भक्तीची गोडी काय सांगावी ! भक्त तिच्यावाचून एकक्षण रिता जाऊं देत नाहींत. तर आपलें सर्व जीविते सर्वस्वी कृष्णार्पण करतात. ६३

आणि पुत्रदासादिक जें जें घरीं । तें तें भगवत्सेवेवारीं ।
स्वयें कृष्णार्पण करी । माझी म्हणोनि न धरी ममत जीवीं ॥ ५६४ ॥
घरामध्ये स्त्री, पुत्र, इत्यादि जें जें कांहीं असतें, तें तें सर्व भक्त भगवत्सेवेमध्ये लावतो. आपण होऊन त्यांना कृष्णार्पण करतो. त्यांतील कशालाहि ‘हें माझें’ असे म्हणून मनांत ममता धरीत नाहीं. ६४

दारा पुत्र देह गेह प्राण । यांसी आत्मा सबाह्य पूर्ण ।
तेथें संकल्पेंवीण जाण । ब्रह्मार्पण सहजचि ॥ ५६५ ॥
स्त्री, पुत्र, गृह व प्राण यांत आत्मा सबाह्यपूर्ण आहे, त्यामुळे संकल्पावांचूनच त्याचें ब्रह्मार्पण सहजच सिद्ध होतें, असें तूं जाण ५६५.

एवं कृष्णात्मनाथेषु मनुष्येषु च सौहृदम् ।
परिचर्यां चोभयत्र महत्सु नृषु साधुषु ॥ २९ ॥
एवं कृष्णात्मनाथेषु – कृष्ण हाच ज्यांचा आत्मा, स्वामी अशा – मनुष्येषु – मनुष्यांचे ठिकाणी – सौहृदं कर्तुं च – स्नेह करण्याला आणि – उभयत्र च विशेषतः नृषु – स्थावर जंगम प्राण्यांचे, त्यांत विशेषतः मनुष्यांचे ठिकाणी – तत्रापि साधुषु – त्यांतही स्वधर्मांचे ठिकाणी – ततोऽपि महत्सु – त्यापेक्षाही भगवद्‌भक्तांचे ठिकाणी – परिचर्यां कर्तुं शिक्षेत् – सेवाशुश्रूषा करण्याला शिकावे. ॥ २९ ॥ [ श्रीकृष्ण ज्यांचा आत्मा व नाथ आहे, किंवा ज्यांच्या जीवाचा स्वामी आहे, असा मनुष्यांमध्यें प्रीति, स्थावर व जंगम या दोन्हीं प्रकारच्या प्राण्यांची परिचर्या, त्यांतही विशेषतः मनुष्यांची, मनुष्यांतही स्वधर्मशील साधूंची आणि त्यांतही भगवद्‌भक्त महात्म्यांची परिचर्या शिकावी. ] २९.

एवं दारा गेह देह संपदा । आत्मार्पणें शुद्ध श्रद्धा ।
भजलें सर्वकाळीं सर्वदा । ते भक्त गोविंदा पढियंते ॥ ५६६ ॥
याप्रमाणे स्त्री, गृह, देह, संपत्ति यांसह आत्मसमर्पण करून जे भक्त शुद्ध श्रद्धेने गोविंदाला सर्वदा भजतात ते त्याला आवडतात. ६६

जो सर्व भूतीं हृदयस्थु । परमात्मा श्रीकृष्णनाथु ।
त्याचे ठायीं जो भक्तु । साधावया निजस्वार्थु सर्वस्वें भजे ॥ ५६७ ॥
भक्त परमार्थ साधण्यासाठी सर्व प्राण्यांच्या हृदयांत स्थित असलेल्या परमात्म्या श्रीकृष्णाचें भजन सर्वस्वानें करतो. ६७

त्या हृदयस्थाचे ठायीं । दृढ दृष्टी जंव बसली नाहीं ।
तवं सगुणमूर्ती हृदयीं । भजावी पाहीं सर्वात्मभावें ॥ ५६८ ॥
त्या हृदयस्थ परमात्म्यामध्ये जोपर्यंत दृढ दृष्टि बसली नाही, तोपर्यंत त्यानें हृदयांत सगुणमूर्तीचेच सर्वात्मभावानें भजन करावे. ६८

सगुणमूर्ती नातुडे ध्यानीं । तरी भजावें प्रतिमेच्या स्थानीं ।
तेथें ही चलाचल दोनी । भजाव्या गुरुवचनीं समसाम्यभावें ॥ ५६९ ॥
ध्यानामध्यें सगुणमूर्तीवर मन जर स्थिर होत नसले तर प्रतिमेमध्यें तिची कल्पना करून ध्यान करावे. त्यातही गुरुवचनानें चल व अचल मूर्तीचे समभावाने पूजन करावे. ६९

ज्या उपासक पूजिती । त्या जाणाव्या ‘चला’ मूर्ति ।
ज्या पांडुरंगादि द्वारावती । त्या स्थावरा मूर्ति पुराणोक्त ॥ ५७० ॥
उपासक ज्या मूर्तीची पूजा करतात त्या चलमूर्ति समजाव्या आणि पुराणांत वर्णिलेल्या क्षेत्रादिकांतील पांडुरंगादिकांच्या ज्या मूर्ति त्या अचल जाणाव्या. ५७०

त्या मूर्तीहूनि श्रेष्ठ स्थान । पूर्ण पूज्यत्वें ब्राह्मण ।
तेथें करावें गा भजन । सर्वस्वें जाण सर्वदा ॥ ५७१ ॥
त्या मूर्तींहूनही पूर्ण पूज्यत्वानें ब्राह्मण हें श्रेष्ठस्थान आहे. त्यांत सर्वस्वानें सर्वदा भजन करावे. ७१

त्या ब्राह्मणामाजीं अतिश्रेष्ठ । श्रोत्रिय सदाचारनिष्ठ ।
त्यांतही वेदशास्त्रार्थीं प्रविष्ट । ते अतिवरिष्ठ पूज्यत्वें ॥ ५७२ ॥
ब्राह्मणांमध्यें सदाचारनिष्ठ श्रोत्रिय अतिश्रेष्ठ, त्याहूनही वेदशास्त्रार्थामध्यें प्रविष्ट झालेले ब्राह्मण पूजत्वाने अधिक श्रेष्ठ होत. ७२

त्यांहीमाजीं जे भागवत । भागवतधर्मीं नित्य निरत ।
जे निष्कर्मेंसीं भगवत्भक्त । ज्यांचा भावार्थ श्रीकृष्णीं ॥ ५७३ ॥
त्यापेक्षांही भागवत धर्मांत सतत तत्पर असलेले जे अनन्य भागवतभक्त, ज्यांची श्रीकृष्णामध्ये पूर्ण निष्ठा असते, ७३

ज्यांसी आत्मा श्रीकृष्ण हृदयस्थ । ज्यांचा अनन्य स्वामी श्रीकृष्णनाथ ।
ऐसें जे भगवद्‌भक्त । ते पूज्य निश्चित निजभक्तां ॥ ५७४ ॥
हृदयस्थ आत्मा हाच श्रीकृष्ण आहे असें ज्ञान झालेलें असतें, ज्याचा श्रीकृष्णनाथ हाच अनन्य स्वामी असतो, ते भगवद्‌भक्त परमात्मभक्तांना निश्चयानें पूज्य असतात. ७४

अतिमहत्त्वें पूज्य गहन । ज्याचे सुर नर वेद बंदीजन ।
तो सद्‌गुरु श्रेष्ठ पूज्य स्थान । शिष्यासी जाण सर्वस्वें ॥ ५७५ ॥
देव, मनुष्य, वेद इत्यादि हे ज्याचे स्तुतिपाठक भाट आहेत व अतिमहत्त्वामुळें जो अतिशय पूज्य आहे तो सद्‌गुरु शिष्याला अत्यंत पूज्य आहे, असें तू जाण. ७५

गुरु ब्रह्म दोनी समान । हेंही वचन दिसे गौण ।
गुरुवाक्यें ब्रह्मा ब्रह्मपण । तेथें व्हावया समान भिन्नत्व नुरे ॥ ५७६ ॥
गुरु व ब्रह्म हे दोन्ही समान आहेत, हें म्हणणें गौण दिसते. कारण गुरुवाक्यानें ब्रह्माला ब्रह्मत्व येतें. त्यानंतर मग ब्रह्मा व गुरु यांचें साम्य कल्पावयास त्यांचें भिन्नत्व उरत नाहीं. ७६

जैसा देवाचे ठायीं भावो । तैसाचि गुरुचरणीं सद्‌भावो ।
गुरुदेवांमाजीं पहा हो । भिन्नत्वभावो असेना ॥ ५७७ ॥
देवाच्या ठिकाणी जसा भाव असतो, तसाच गुरुचरणांवरही सद्‌भाव ठेवावा लागतो. त्यामुळें गुरु व देव यामध्ये भेदभाव उरत नाहीं. ७७

देवो पूजिल्या गुरु तोषे । गुरु पूजिल्या देवो संतोषे ।
दों नांवांचेनि हरुषें । स्वरूपें एकें वर्तती ॥ ५७८ ॥
देवाची पूजा केल्यास गुरु संतुष्ट होतो, पण गुरूचे पूजन केल्यास देव संतुष्ट होतो; पण या दोन नांवांच्या हर्षाने ते दोघेही स्वरूपाने एकरूप होऊन रहातात. ७८

सुवर्ण आणि कांकण । दों नांवीं एक सुवर्ण ।
तेवीं गुरु-ब्रह्मांमाजीं जाण । भीन्नपण असेना ॥ ५७९ ॥
सुवर्ण आणि कंकण या दोन नांवांमध्यें सुवर्ण एक असतें. त्याचप्रमाणें गुरु व ब्रह्म यामध्ये भेद असत नाहीं. ७९

त्या सद्‌गुरुचें निजभजन । चित्तवित्तें अवंचन ।
गुरुचरणीं आत्मार्पण । करावें आपण सर्वेंसीं ॥ ५८० ॥
अशा सदगुरूचें निष्कपटबुद्धीनें चित्त व वित्त यांचें गुरुचरणीं सर्वस्वी आत्मार्पण करून भजन करावे. ५८०

तैसेचि साधु श्रोते सज्ञान । तेही मानावे सद्‌गुरुसमान ।
त्यांचेनि संवादें आपण । श्रवण कथन करावें ॥ ५८१ ॥
त्याचप्रमाणे सज्ञान साधु जे श्रोते त्यांनाही सदगुरुतुल्य मानावे. त्यांच्याशी संवाद करून आपण श्रवण व कथन करावे ५८१.

परस्परानुकथनं पावनं भगवद्यशः ।
मिथो रतिर्मिथस्तुष्टिर्निवृत्तिर्मिथ आत्मनः ॥ ३० ॥
पावनं भगवद्‌यशः – पवित्र भगवंतांचे यश – परस्परानुकथनं – परस्परांनी केलेले वर्णन – आत्मनः मिथः रतिः – मनाने परस्परांत रमणे – या मिथः तुष्टिः – जो परस्पर संतोष – या मिथः निवृत्तिः – आणि परस्पर सर्व दुःखांतून निवृत्त होऊन शांतिचा अनुभव घेणे – ॥ ३० ॥ [ त्या साधूंची संगति करून पवित्र भगवद्‌यशाचें परस्पर संकीर्तन कसें करावे, तसेच याविषयी स्पर्धा वगैरे टाकून परस्परांची रति, सुख व दुःखनिवृत्ति ही शिकावी. ३०.

तेथ करितां कथानुवादु । परस्परें निजात्मबोधु ।
करितां गुह्यज्ञानसंवादु । परमानंदु वोसंडे ॥ ५८२ ॥
साधूंच्या समागमांत कथानुवाद करीत असतां एकमेकांस निजात्मबोध होऊन त्या गुह्यज्ञानाच्या संवादाने परमानंद नुसता उचंबळून येतो. ८२

एवं हरिकथेच्या आवडीं । परस्परें श्रद्धा गाढी ।
सुखसंवादपरवडी । निजसुखगोडी चाखिती ॥ ५८३ ॥
हरिकथेच्या प्रेमाने परस्परांची श्रद्धा दृढ होत जाते आणि त्या सुखसंवादप्रसंगी आत्मसुखाचा अनुभव येतो. ८३

चाखतां निजसुखगोडी । हारपती दुःखकोडी ।
उभवूनि भक्तिसाम्राज्यगुढी । स्वानंदजोडी जोडावी ॥ ५८४ ॥
याप्रमाणे आत्मसुखाची गोडी चाखली असतां कोट्यवधि दुःखे नाहीशी होतात. यास्तव भक्तिरूप साम्राज्याची गुढी उभारून स्वानंदाची जोड जोडावी. ८४

भावें करितां अभेदभजन । भक्त पावती स्वानंद पूर्ण ।
त्या स्वानंदाचें निजचिन्ह । ऐक सांगेन नृपनाथा ॥ ५८५ ॥
प्रेमाने अभेदभक्ति केली असतां भक्त पूर्ण स्वानंदाला प्राप्त होतात. हे राजा, त्या स्वानंदाचें स्वरूप मी सांगतो, तें ऐक. ५८५.

स्मरन्तः स्मारयन्तश्च मिथोऽघौघहरं हरिम् ।
भक्त्या सञ्जातया भक्त्या बिभ्रत्युत्पुलकां तनुम् ॥ ३१ ॥
क्वचित् रुदन्ति अच्युतचिन्तया क्वचित् ।
हसन्ति नन्दन्ति वदन्त्यलौकिकाः ।
नृत्यन्ति गायन्ति अनुशीलयन्त्यजं ।
भवन्ति तूष्णीं परमेत्य निर्वृताः ॥ ३२ ॥
याप्रमाणे भगवद्‌भजनांत प्रवृत्त होणाऱ्या भक्तांना परमानंदप्राति होते, असें पुढील दोन श्लोकांनीं सांगतात –
अघौघहरं – पापसमूह नष्ट करणार्‍या – हरिं स्मरंतः – श्रीहरीला स्मरणारे – मिथः स्मारयंतः च – परस्पर आणि स्मरण करविणारे – भक्त्या उत्पुलकां तनुं बिभ्रति – भगवंताच्या प्रेमलक्षणा भक्तीने रोमांचित शरीर बनतात. ॥ ३१ ॥
अलौकिकाः – लोकविलक्षण – अच्युतचिंतया – भगवत् चिंतनाने – क्वचित् रुदंति – केव्हा रडतात – क्वचित् हसंति – केव्हां हसतात – क्वचित् नंदंति – कधी आनंद पावतात – क्वचित् वदंति – केव्हा बोलतात – क्वचित् नृत्यंति – कधी नाचतात – अजं गायंति – जन्मरहित परमात्म्याचे गुण गातात – अनुशीलयंति – त्यांच्या लीलांचे अनुकरण करतात – परं एत्य निर्वृताः संतः – परमेश्वराला प्राप्त होऊन सुखी होत – तूष्णीं भवंति – स्वस्थ होतात. ॥ ३२ ॥ [ पूर्वी साधनभक्ति केल्याने उत्पन्न झालेल्या प्रेमलक्षण साध्यभक्तीनें सर्व पापांचे हरण करणाऱ्या हरीचे स्वतः स्मरण करून आपसांत संवादरूपाने इतरांकडूनही स्मरण करविणारे भक्त रोमांचित होतात. ते अच्युताच्या स्मरणाने केव्हां रडतात, केव्हां हसतात, केव्हां आनंदित होतात, केव्हां जणुकाय अलौकिक असल्याप्रमाणे बोलतात, कधीं नाचतात, कधीं गातात, केव्हां केव्हां भगवानाच्या लीलेचा हावभाव करतात. याप्रमाणें परमात्ममय होऊन अत्यंत सुखी होत्साते तूष्णीभाव धारण करतात. ] ३१-३२.

हरिकथेची महिमा कैसीं । आदरें पुसत्या-सांगत्यासी ।
होती पुण्याचिया राशी । पाप वोखदासी मिळेना ॥ ५८६ ॥
हरिकथेचा महिमा कसा आहे, हें आदराने विचारणारा आणि तो सांगणारा यांच्यापुढे पुण्याच्या राशी पडतात. त्यांच्यापाशीं पाप औषधालाही सांपडत नाहीं. ८६

ज्याचिया नामस्मरणकरीं । सकळ पातकातें हरि हरी ।
तो स्वयें प्रगटला अंतरीं । पातकां उरी उरे कैंची ॥ ५८७ ॥
नुसते नामस्मरण केल्याने जर श्रीहरि सर्व पातकांचे हरण करतो, तर मग तो स्वतःच हृदयात प्रकट झाला असतां तेथें पातक उरणार कोठले ? ८७

साधनरूपभक्तीच्या युक्तीं । पूर्ण सप्रेम उपजे भक्ती ।
ते भक्तीची निजस्थिती । ऐक चक्रवर्ती सज्ञाना ॥ ५८८ ॥
हे ज्ञानी सार्वभौम राजा, साधनरूप भक्तीच्या योगाने पूर्ण सप्रेम भक्ति उत्पन्न होते. त्या भक्तीचे स्वरूप मी तुला सांगतो. ८८

सद्‌भावें निजभजनकरीं । हृदयीं प्रगटतां श्रीहरी ।
तंव देहींचीं चिन्हें बाहेरी । क्षणामाझारीं पालटती ॥ ५८९ ॥
सद्‌भावाने भजन करतां करतां हृदयामध्यें श्रीहरि प्रकट होतो, त्याबरोबर एका क्षणांत देहातील चिन्हे बाहेर उमटलेली दिसतात. ८९

परस्परें निजसंवादु । करितां जाहला स्वरूपावबोधु ।
नेत्रीं जळ अंगीं स्वेदु । प्राणस्पंदु पांगुळे ॥ ५९० ॥
परस्परांनी आत्मस्वरूपाचा संवाद केला असतां जेव्हां स्वरूपाचा बोध होतो, तेव्हांच नेत्रांत आनंदाश्रु येतात, अंगाला घाम सुटतो आणि श्वासोच्छवास मंद होतो. ५९०

चित्तचैतन्यां होतां भेटी । हर्षे बाष्प दाटे कंठीं ।
पुलकांकित रोमांच उठी । उन्मीलित दृष्टी पुंजाळे ॥ ५९१ ॥
अनेक चित्तांमध्यें-चैतन्य आत्मा प्रकट झाला असतां आनंदातिशयानें कंठ दाटून येतो, अंगावर रोमांच येतात, डोळे अर्धवट मिटूं लागतात व प्रेमाश्रू वाहूं लागतात. ९१

करितां अच्युतचिंतन । सप्रेम गहिंवरे मन ।
अट्टहासें करी रुदन । अनिवार स्फुंदन ऊर्ध्वश्वासें ॥ ५९२ ॥
अच्युताचे चिंतन केलें असतां मन प्रेमाने आर्द्र होतें आणि भक्त अतिशय स्फुंदून स्फुंदून ओक्साबोक्सीं रडूं लागतो. ९२

त्या रुदनासवेंचि हर्ष प्रगटे । त्या हर्षाचेनि नेटेंपाटें ।
हांसो लागे कडकडाटें । सुखोद्‌भटें गदगदौनी ॥ ५९३ ॥
त्या रडण्याबरोबरच हर्षही प्रकट होतो, आणि तो पोट धरून मोठमोठ्यानें हसू लागतो. ९३

मीपणाचेनि अनुरोधें । गिळिलों होतों मोहमदें ।
तो सुटलों गुरुकृपावबोधें । तेणें परमानंदें डुल्लत ॥ ५९४ ॥
‘मी आजपर्यंत अहंकारामुळे प्राप्त झालेल्या मोहमदाकडून गिळिलों गेलों होतों, तो आतां गुरुकृपेनें झालेल्या बोधाने मुक्त झालो,’ असें म्हणून त्या परमानंदानें डोलूं लागतो. ९४

मी-माझेनि भवभानें । मज मी चुकलों मीपणें ।
मज मी भेटलों सद्‌गुरुवचनें । आनंदें तेणें उल्हासें ॥ ५९५ ॥
‘हा संसार माझा आहे या मिथ्या अभिमानाने मी मलाच पारखा झालो होतों पण, आतां सद्‌गुरुवचनानें, मीं आपल्याला ओळखलें,’ असें बोलून तो आनंदाने उल्हसित होतो. ९५

कैसें सद्‌गुरुवचन अलोलिक । म्यांचि माझें भोगिजे निजसुख ।
येणें आश्चर्यें देख । स्वानंदोन्मुख उल्हासे ॥ ५९६ ॥
सद्‌गुरूचें वचन कसें निश्चित आहे, पहा. पूर्वी संसारतापानें तप्त होणारा मीच आतां नित्य सुख भोगीत आहें, याचे त्याला आश्चर्य वाटतें. ९६

संसारबागुलाचें । भय लागलें नेणों कैंचें ।
तें गुरुवाक्यें दवडिलें साचें । म्हणोनि नाचे निर्लज्ज ॥ ५९७ ॥
संसाररूपी बागुलबुवाचे भय कोठून कसें आलें, तें कांहीं कळत नाहीं. पण गुरुवाक्यानें त्याला घालवून व खरोखरच त्याला घालवून दिले, असें समजून तो निर्भय होऊन नाचूं लागतो. ९७

जेवीं मा‍उली देखोनि डोळां । बालक नाचे नानाकळा ।
तेवीं गुरुवाक्याचा सोहळा । देखोनि स्वलीळा निजभक्त नाचे ॥ ५९८ ॥
ज्याप्रमाणें माता दृष्टीस पडताच बालक नानाप्रकारच्या चेष्टा करीत नाचू बागडू लागतें, त्याप्रमाणें गुरुवाक्याचा सोहळा पाहून भक्त आपल्या लीलेने नाचूं लागतो. ९८

तेणें निजनृत्यविनोदें । फावलेनि निजबोधें ।
नानापरीचीं भगवत्पदें । सुखानुवादें स्वयें गातु ॥ ५९९ ॥
या आपल्या नृत्यविनोदानें प्राप्त झालेल्या आत्मबोधानेंच अनेक प्रकारची भगवद्वर्णनपर पदें स्वतः मोठ्या आनंदाने गाऊं लागतो. ९९

तेणें कीर्तनकीर्तिगजरें । त्रैलोक्य सुखें सुभरे ।
परमानंदुही हुंबरे । सुखोद्‌गारें तुष्टोनी ॥ ६०० ॥
त्या कीर्तनगजरानेंच त्रैलोक्य सुखाने भरून जातें. त्या सुखोद्‌गारानें संतुष्ट होऊन परमानंदही उचंबळतो. ६००

तेंही सांडोनियां गाणें । गर्जो लागे अतिसत्राणें ।
दुजें नाहीं नाहीं म्हणे । गाणें ऐकणें म्यां माझें ॥ ६०१ ॥
पुढें तें गायनही सोडून तो मोठमोठ्यानें ‘द्वैत नाहीं द्वैत नाहीं. गाणाराही मीच व ऐकणाराही मीच’ असें गर्जूं लागतो. १

मीचि गाता मीचि श्रोता । माझें गाणें मीचि तत्त्वतां ।
जगीं मीचि एकुलता । द्वैताची कथा असोनि नाहीं ॥ ६०२ ॥
‘गाता, श्रोता व गायन हें तत्त्वतः मीच आहें. जगांत मी एकुलता एक आहें. द्वैताची वार्ता असली तरी वस्तुतः नाही’. २

सद्‌भावें भगवत्परिचर्या । करितां पारुषे कर्मक्रिया ।
अहं-सोऽहं निरसोनियां । वृत्तिही लया जाय तेथें ॥ ६०३ ॥
याप्रमाणे सद्‌भावनेनें भगवद्‌भक्ति करू लागलें असतां कर्मानुष्ठान आपोआप थांबते. मी, तूं तोच मी इत्यादि भावना सोडून वृत्तीही भजनांत लय पावते. ३

एवं सप्रेम भक्तिसंभ्रमु । तेणें निरसे साधनश्रमु ।
फिटे निःशेष भवभ्रमु । वाचांसी उपरमु इंद्रियां होय ॥ ६०४ ॥
याप्रमाणे सप्रेम भक्ति दृढ झाली असतां साधनानुष्ठानामुळें होणारा श्रम आपोआप नाहीसा होतो व सर्व संसारश्रम निवृत्त होतो. परा, पश्यंती, मध्यमा व वैखरी या चार वाणींसह इंद्रिये शांत होतात. ४

जेथें एक ना दुसरें । सन्मुख ना पाठिमोरें ।
जेथ सुखही निजसुखामाजीं विरे । तें स्वरूप निर्धारें निजशिष्य होती ॥ ६०५ ॥
जेथे अद्वैत व द्वैतही नाहीं, संमुख असेंही कांहीं नाहीं व विमुख असेही कांहीं नाहीं, जेथे लौकिकसुखही आत्मसुखांत विरून जातें तेंच स्वरूप शिष्य निश्चयानें होतात. ५

जेवीं बाळाचे लळे पाळणें । हे व्यालीचि वेदना जाणे ।
कां शिष्यांसी पूर्ण बोध करणें । तेथील कळवळणें सद्‌गुरु जाणे ॥ ६०७ ॥
जी पुत्रवती आहे तीच आपल्या बालकाला कसें पाळले पाहिजे, तें जाणते. त्याचप्रमाणे शिष्याला पूर्ण बोध होईल असें शिक्षण प्रेमाने कसें द्यावे, हें एक सद्‌गुरूच जाणतो. ६

बाळका लेवविल्या लेणें । जेवीं माउली निवों जाणे ।
कां शिष्यसुखें सुखावणें । हें सद्‌गुरु जाणे परिपूर्णबोधें ॥ ६०७ ॥
बाळकाच्या अंगावर अलंकार घालून आईला जसे सुख होतें, त्याचप्रमाणे शिष्याला पूर्णज्ञानी करून त्याच्या सुखाने आपण सुखी कसें व्हावें हें एक सद्‌गुरूच जाणतो. ७

इंद्रियें नेणती ज्याचें घर । जें मना वचना अगोचर ।
बुद्धीसि न कळे ज्याची मेर । ऐसी निर्विकार निजवस्तु ॥ ६०८ ॥
इतर इंद्रिये, वाणी व मन यांचा विषय न होणारी व निरतिशय व्यापक अशी निर्विकार आत्मवस्तु ८

दृष्टीं दाविजे साक्षात । हातीं दे‍इजे पदार्थ ।
तैसा नव्हे गा परमार्थ । तोही सद्‌गुरुनाथ प्रबोधी शिष्यां ॥ ६०९ ॥
साक्षात् डोळ्यांनी दाखविता येईल किंवा एखाद्या पदार्थाप्रमाणे हातांत देता येईल अशी नाहीं. हे राजा, परमार्थ ही लौकिक वस्तु नव्हे. तथापि सदगुरूनाथ शिष्यांना त्याचाही बोध करतात. ९

शिष्यासी करावया प्रबोध । बोधिता सद्‌गुरु अगाध ।
यालागीं शिष्यसुखें स्वानंद । भोगी परमानंद गुरुरावो ॥ ६१० ॥
शिष्याला परमार्थाचा बोध करावयास बोध करणारा सद्‌गुरूही तितकाच अगाध ज्ञानी लागतो आणि असाच अगाध ज्ञानी शिष्याला सुखी करून त्याच्या मुखाने स्वतः परमानंद भोगतो. ६१०

शिष्यासी आकळे परब्रह्म । तंव तंव निरसे त्याचा भ्रम ।
तेणें सद्‌गुरूसी परम । सुखसंभ्रम उल्हासे ॥ ६११ ॥
शिष्याच्या बुद्धीला परब्रह्माचें आकलन जसे जसे होत जातें तसा तसा त्याचा भ्रम कमी होऊं लागतो आणि त्याचा भ्रम कमी होऊं लागला आहे, असें पाहून गुरूलाही आनंदाचे भरते येतें. ११

सेवकु परचक्र विभांडी । तंव राजा उभारी यशाची गुढी ।
शिष्य परमानंदीं दे बुडी । तेणें गुरूसी गाढी सुखावस्था ॥ ६१२ ॥
तिकडे सेनापति वगैरे राजसेवक शत्रुसैन्याचा पराभव करतो; पण इकडे राजा यशाची गुढी उभारतो. तसेंच शिष्य परमानंदांत निमग्न झाला आहे असें पाहून गुरूही परम सुखी होतो. १२

ऐसी शिष्यकृपेची कळकळ । ज्या सद्‌गुरूमाजी प्रबळ ।
तेणें भागवतधर्म हे सकळ । शिकावे अविकळ अनन्यश्रद्धा ॥ ६१३ ॥
ज्या सद्‌गुरूमध्ये शिष्यावरअनुग्रह करण्याची प्रबल कळकळ असते, त्यामध्ये हे भागवतधर्म पूर्णपणे रहातात आणि तोच ज्ञानी सद्‌गुरु पूर्ण अनन्यश्रद्धेनें युक्त असतो. ६१३.

इति भागवतान् धर्मान् शिक्षन् भक्त्या तदुत्थया ।
नारायणपरो मायां अञ्जस्तरति दुस्तराम् ॥ ३३ ॥
आतां प्रबुद्ध आपल्या उपदेशाचा उपसंहार करतो –
इति भागवतान् धर्मान् – पूर्वोक्त भागवत धर्मांना – शिक्षन् पुरुषः – शिकणारा मनुष्य – तदुत्थ भक्त्या – भागवतधर्मांच्या आचरणाने उत्पन्न झालेल्या भक्तीने – नारायणःपरः सन् – भगवंताच्याच ठिकाणी तत्पर होत – दुस्तरां अपि मायां – तरून जाण्यास कठीण अशाही मायेला – अंजः तरति – सहज तरून जातो. ॥ ३३ ॥ [ याप्रमाणे भागवतधर्माचे शिक्षण घेणारा भक्त त्या धर्माचरणामुळें उत्पन्न झालेल्या भक्तीने नारायणपरायण होत्साता दुस्तर मायेचें उल्लंघन करतो. ] ३३.

ऐशी भागवतधर्मस्थिति । शरण जा‍ऊनि सद्‌गुरूप्रति ।
अभ्यासावी भगवद्‌भक्ति । तैं मायेची शक्ति बाधूं न शके ॥ ६१४ ॥
भागवधर्माची स्थिति अशी आहे. सद्‌गुरूला शरण जाऊन भगवद्‌भक्तीने तिचा अभ्यास करावा, म्हणजे मायेची शक्ति बाधू शकत नाहीं. १४

माया वेदशास्त्रां अनावर । ब्रह्मादिकां अतिदुस्तर ।
ते सुखें तरती भगवत्पर । हरिनाममात्र-स्मरणार्थें ॥ ६१५ ॥
माया वेदशास्त्रांना अनावर आहे, ब्रह्मादिकांना अति दुस्तर आहे. परंतु भगवद्‌भक्त केवळ हरिनामस्मरणानें त्या मायेला अनायासाने तरून जातात. १५

हरिनामाच्या गजरापुढें । माया पळे लवडसवडें ।
यालागीं तरणोपावो घडे । सुख सुरवाडे हरिभक्तां ॥ ६१६ ॥
हरिनामाच्या गजरापुढें माया त्वरेने पळून जाते यामुळे हरिभक्तांस तरणोपाय घडतो व सुखाचा सुकाळ होतो. १६

परात्पर नारायणाची माया । भजतां नारायणाच्या पायां ।
सुखेंचि तरिजे गा राया । त्या भजनउपाया सांगितलें ॥ ६१७ ॥
हे राजा, नारायणाच्या चरणाचे भजन केलें असतां त्या श्रेष्ठ परमात्म्याची माया सहज तरून जातां येते. त्या भजनाचा उपाय मीं तुला सांगितला. १७

मायातरणोपायस्थिति । राया तुवां पुशिली होती ।
तदर्थीं मुख्य भगवद्‌भक्ति । जाण निश्चितीं नृपनाथा ॥ ६१८ ॥
राजा, तूं मायेच्या तरणोपायाविषयी प्रश्न केला होतास, यास्तव हे नृपश्रेष्ठा, भगवद्‌भक्ती हाच त्याचा मुख्य उपाय आहे, हें तूं निश्चयानें समज. १८

भक्तीपाशी नित्य तृप्ति । भक्तीपाशीं नित्यमुक्ति ।
भक्तीपाशीं भगवत्प्राप्ति । मायानिवृत्ति हरिभजनें ॥ ६१९ ॥
भक्तीजवळ तृप्ति, मुक्ति व भगवतप्राप्ति नित्य असते व हरिभजनानें मायेची निवृत्ति होते. १९

हरिनामभजनकल्लोळें । माया जीवित्व घे‍ऊन पळे ।
भक्त तरती बाळेभोळे । हरिभजनबळें महामाया ॥ ६२० ॥
भगवन्नामकीर्तनाच्या गर्जनेनें माया जीव घेऊन पळत सुटते. भाळेभोळे भक्तसुध्दां हरिभजनाच्या सामर्थ्याने महामायेला तरून जातात. ६२०

करितां नरायणाची भक्ती । निजभक्त सुखें माया तरती ।
ते नारायणाची मुख्य स्थिती । स्वयें चक्रवर्ती पुसतु ॥ ६२१ ॥
ज्या नारायणाच्या भक्तीने भक्त मायेला तरून जातात त्या नारायणाचें मुख्य लक्षण स्वतः सार्वभौम राजा पुढें विचारतो. ६२१

श्रीराजोवाच –
नारायणाभिधानस्य ब्रह्मणः परमात्मनः ।
निष्ठामर्हथ नो वक्तुं यूयं हि ब्रह्मवित्तमाः ॥ ३४ ॥
नारायणपरायण भक्त मायेला तरतात, असें प्रबुद्धानें सांगितलें असतां –
नारायणाभिधानस्य – नारायणनामक – परमात्मनः ब्रह्मणः निष्ठां – परमात्म ब्रह्माचे स्वरूप – नः वक्तुं अर्हथ – आम्हांला सांगण्याला योग्य आहा – ही – ज्या अर्थी – यूयं ब्रह्मवित्तमाः – आपण ब्रह्मवेत्त्यांमध्ये श्रेष्ठ आहा. ॥ ३४ ॥
[ ब्रह्मच नारायण, भगवान्, परमात्मा असें म्हटलें जातें. याविषयी शास्त्रांमध्यें तत्त्ववेत्ते जें अद्वयज्ञान त्याचाच ‘ब्रह्म, परमात्मा, भगवान’ या शब्दांनी उल्लेख करतात. ‘भगवान् नारायणामध्यें हें विश्व आरोपित आहे’ इत्यादि प्रमाणें आहेत. तेव्हां ‘या सर्व शब्दांनी ती निर्विशेष वस्तूच सांगितली जाते किंवा त्यांत कांहीं विशेषांश आहे,’ असा या राजाच्या प्रश्नाचा भावार्थ आहे. ] ३४.

सर्वां भूतीं भगवद्‌भावो । हा मुख्य मायातरणोपावो । ।
आ‍इकोनि सुखावला रावो । तेणें आनन्दें पहा हो परब्रह्म पुसे ॥ ६२२ ॥
सर्व प्राण्यांमध्ये भगवद्‌भावना ठेवणे हा मायेच्या तरणाचा मुख्य उपाय आहे हें ऐकून राजा अत्यंत संतुष्ट झाला आणि त्या आनंदाने तो परब्रह्माचे स्वरूप विचारू लागला. २२

करितां नारायणाची भक्ति । उत्तम भक्त माया तरती ।
ते नारायणाची निजस्थिति । साक्षेपें नृपति पुसतु ॥ ६२३ ॥
ज्या नारायणाची भक्ति केली असतां उत्तम भक्त मायेला तरतात, त्या नारायणाचें स्वरूप राजा बुध्दिपुरःसर विचारतो. २३

‘ब्रह्म-परमात्मा-नारायण’ । वस्तूसीच म्हणणें जाण ।
ते वस्तुनिष्ठा परिपूर्ण । राजा आपण पुसतु ॥ ६२४ ॥
सदवस्तुलाच ब्रह्म, परमात्मा व नारायण म्हणतात. तेंच परिपूर्ण वस्तुरूप आहे. २४

सकळांमाजीं अधिष्ठान । सबाह्य ज्याचेनि परिपूर्ण ।
त्या स्वरूपातें ‘नारायण’ । स्वयें वेदज्ञ बोलती ॥ ६२५ ॥
तेच सर्व जगाचे अधिष्ठान, त्याच्याच योगाने सर्व सबाह्य परिपूर्ण व त्यालाच वेदज्ञ स्वतः नारायण असें म्हणतात. यास्तव त्याचें तत्त्व मला सांगा. २५

तुम्हां‍ऐसे ज्ञाननिधि । भाग्यें जोडलेति त्रिशुद्धी ।
तुमच्या वचनामृतबोधीं । अहंबुद्धि उपजेना ॥ ६२६ ॥
खरोखर, तुमच्यासारखे ज्ञाननिधि मला आज मोठ्या भाग्यानेच लाधले आहेत. तुमच्या वचनामृताचें प्राशन करून माझी अहंबुद्धि शांत झाली आहे. २६

तुमचिया वचनोक्तीं । वोसंडली स्वानन्दस्फूर्ति ।
लांचावली चित्तवृत्ती । श्रवणें तृप्ती कदा न मनीं ॥ ६२७ ॥
स्वानंदाला भरते आलें आहे. चित्तवृत्ति श्रवणास लांचावली आहे. कितीही श्रवण केलें तरी तिची तृप्ति होत नाही. २७

ऐकोनियां रायाचा श्रेष्ठ प्रश्न । प्रबुद्धाधाकुटा पिप्पलायन ।
तो बोलावया आपण । स्वानंदें पूर्ण सरसावला ॥ ६२८ ॥
राजाचा हा श्रेष्ठ प्रश्न ऐकून प्रबुद्धाचा धाकटा भाऊ पिप्पलायन मोठ्या आनंदाने बोलावयास पुढें सरसावला. ६२८.

श्रीपिप्पलायन उवाच –
स्थित्युद्‌भवप्रलयहेतुरहेतुरस्य ।
यत्स्वप्नजागरसुषुप्तिषु सद्‌बहिश्च ।
देहेन्द्रियासुहृदयानि चरन्ति येन ।
सञ्जीवितानि तदवेहि परं नरेन्द्र ॥ ३५ ॥
नरेंद्र ! – हे राजा ! – अस्य जगतः – या जगाच्या – स्थित्युद्‌भवप्रलयहेतुः – उत्पत्ति, स्थिती, संहारांना कारण – परं स्वयं अहेतुः – पण स्वतःला काहीच कारण नाही अशा – यत् स्वप्नजागरसुषुप्तिषु – स्वप्न, जागृति, निद्रांमध्ये सतत असणारे – संजीवितानि – चैतन्यशक्ति दिलेली अशी – देहेंद्रियासुहृदयानि चरंति – देह, इंद्रिये, प्राण, मन आपापला व्यवहार करतात – तत् ते एकमेव परं तत्त्वं अवेही – ते एकच श्रेष्ठ तत्त्व जाण. ॥ ३५ ॥ [ या श्लोकांत पूर्वोक्त प्रश्नाचें उत्तर दिलें आहे. त्याचा भावार्थ असा – या विश्वाच्या उत्पत्ति-स्थिति लयाचे कारण, पण स्वतः हेतुरहित, असा जो नारायण तें परम तत्त्वच आहे, असें तूं समज. स्वप्न, जागृति, सुषुप्ति यामध्ये अनुवृत्त होणारे, कारण ‘तुरीयं त्रिषु संततं’ असें हाच मुनि पुढें सांगणार आहे व या तीन अवस्थांहून भिन्न अशा समाधि इत्यादि अवस्थांमध्येंही अनुवृत्त होणारे जें सत्, ज्याला ब्रह्म असें म्हणतात, तेंही परतत्त्वच आहे असें तूं जाण. देह, इंद्रिये, प्राण व मन ही ज्याच्या योगाने संजीवित होऊन आपापल्या व्यापारांत प्रवृत्त होतात त्यालाच परमात्मा म्हणतात. हा परमात्माही परमतत्त्व आहे, असें तूं जाण. याप्रमाणे जगत्‌‍हेतुत्व, सर्वत्र अनुवृत्ति व संजीवन या तीन लक्षणांनी नारायण, ब्रह्म व परमात्मा या तीन नांवानी बोलले जात असलेलेंही तें एकच परमतत्त्व आहे, असें तूं समज. ] ३५

अगा ज्याचेनि उपजे उत्पत्ति । ज्याचेनि अंगें स्थितीसी स्थिति ।
ज्याचेनि प्रळया प्रळयशक्ति । ऐसा जो त्रिजगतीं मुख्य हेतु ॥ ६२९ ॥
हे राजा, ज्याच्यापासून सृष्टि उत्पन्न होते, तिचे पालन होतें व प्रलय काळीं ज्यात तिचा लय होतो, जो त्रैलोक्याचे व जगाचे मुख्य कारण आहे, २९.

यापरी जो जगाचा हेतु । स्वयें स्वसत्ता हेतुरहितु ।
सच्चिदानंदें सदोदितु । तो जाण निश्चितु नारायणु ॥ ६३० ॥
पण स्वतः मात्र आपल्या सत्तेने हेतुरहित आहे, जो सत्, चित् व आनंद यांनी सर्वदा परिपूर्ण आहे, तोच नारायण होय, असें तूं निश्चयानें जाण. ६३०

जेवीं सायंप्रातर्मध्यान्ह । तिहीं काळीं अलिप्त गगन ।
तेवीं उत्पत्तिस्थितिप्रळयीं जाण । अलिप्त नारायण परमात्मा ॥ ६३१ ॥
ज्याप्रमाणें सायंकाल प्रातःकाल व मध्यान्ह या तीन्ही कालांनी आकाश लिप्त होत नाहीं, त्याप्रमाणें उत्पत्ति-स्थिति-लय या तिन्ही काली परमात्मा नारायण समान व अलिप्त असतो. ३१

उत्पत्तिस्थितिप्रळयान्त । म्हणसी कोण देखे येथ ।
तेचि अर्थींचा दृष्टांत । स्फुरदर्थ अवधारीं ॥ ६३२ ॥
उत्पत्ति, स्थिति व प्रलय यामध्ये पहाणारा कोण म्हणून म्हणशील तर याविषयी स्पष्टार्थ दृष्टान्त देतो, तो ऐक. ३२

जागृति स्वप्न आणि सुषुप्ति । तिन्ही व्यापूनि समाधीही परती ।
ज्याची साक्षित्वें स्फुरे स्फूर्ति । तो जाण निश्चितीं नारायण । ६३३ ॥
जाग्रदादि तीन अवस्थांना व्यापून त्यांच्या पलीकडे असलेल्या समाधीमध्येंही साक्षित्वानें ज्याचा अनुभव येतो, तो नारायण होय,असे तूं निश्चयानें जाण. ३३.

जागृतीचें जाणपण । स्वप्नाचें मिथ्या भान ।
सुषुप्तीचा साक्षी पूर्ण । तो नारायाण निश्चित ॥ ६३४ ॥
जागृतीचे ज्ञातृत्व,स्वप्नाचें मिथ्याभान व सुषुप्तीचा पूर्णसाक्षी तो नारायणच आहे. ३४

एवं परमात्मा परंज्योति । आत्मा हृदयस्थ त्रिजगतीं ।
त्यातें नारायण म्हणती । जाण निश्चितीं नृपनाथा ॥ ६३५ ॥
याप्रमाणे जो हृदयस्थ परमज्योति परमात्मा सर्व भूतांचा अंतरात्मा आहे त्यालाच नारायण म्हणतात. २५

ऐसी सांगतां ब्रह्मस्फूर्ति । अगम्य वाटेल ब्रह्मप्राप्ति ।
सहजें ब्रह्म आतुडे हातीं । ऐक ते उपपत्ति सांगेन ॥ ६३६ ॥
पण ही अशा प्रकारची ब्रह्मप्राप्ति अगम्य आहे, असें तुला वाटेल, म्हणून ब्रह्म सहज हातीं कसें लागेल ती युक्ति मी तुला सांगतो ३६

तरी परमात्मा ब्रह्म पूर्ण । तुझे हृदयीं नांदे आपण ।
ज्याचेनि मन बुद्धि प्राण । इंद्रियें जाण वर्तती ॥ ६३७ ॥
तो पूर्ण ब्रह्ममूर्ति परमात्मा तुझ्या हृदयामध्ये आहे. त्याच्या सत्तेनेच मन, बुद्धि, प्राण व इंद्रिये आपापला व्यापार करतात. ३७

नयनें तेणें तेजें देखणें । रसना तेणें स्वादें चाखो जाणें ।
श्रवण तेणें अवधानें । शब्दज्ञानें प्रबोधती ॥ ६३८ ॥
त्याच्याच तेजाने नेत्र रूप पहातात, त्याच्याच स्वादाने रसना रस ग्रहण करते, श्रवणेंद्रिय शब्दाचे ग्रहण करते, ३८

तेणें अहंकारा अहंभाव । तेणेंचि मनासी मंतव्य ।
तेणेंचि चित्तासी चेतव्य । बुद्धीसि बोद्धव्य तेणें ब्रह्मावबोधे ॥ ६३९ ॥
अहंभाव अहंकार धारण करतो, त्याच्याचमुळें मन मनन करते, चित्त चिंतन करते व बुद्धि जाणते. ३९

तेणें जड देह सचेतन । तेणेंचि कळे मृदु कठीण ।
तेणेंचि चरणाच्या ठायीं गमन । करी कर ग्रहण त्याचिये सत्ता ॥ ६४० ॥
त्यामुळेंच देह सचेतन होतो. मृदु, कठिण इत्यादि स्पर्श कळतात, पायामध्ये गमन करण्याची व हातामध्ये ग्रहण करण्याची शक्ति येते. ६४०

त्याचेनि प्राण परिचरती । त्याचेनि निमिषोन्मेषस्फूर्ति ।
त्याच्या आनंदलेशस्थितीं । आनंद उपस्थीं भोगिती प्राणी ॥ ६४१ ॥
प्राण श्वासोच्छ्‍वास करतात, नेत्रांचे निमिषोन्मेष होतात व प्राणी विषयानंदानुभव घेतात. ४१

एवं चाळकु तो त्रिजगतीं । तो स्वानन्दें नांदे हृदयस्थितीं ।
त्यातें नारायण म्हणती । तोचि निश्चितीं परमात्मा ॥ ६४२ ॥
याप्रमाणे जो त्रिभुवनांतील चालक हृदयामध्ये रूपानंदाने नांदतो त्याला नारायण म्हणतात व तोच परमात्मा आहे. ४२

ज्याचेनि मन बुद्धि प्राण । इंद्रियें विचरती संपूर्ण ।
तो तूं म्हणसी त्यां‍आधिन । हें कल्पांतीं जाण कदा न घडे ॥ ६४३ ॥
ज्याच्या योगाने मन, बुद्धि, प्राण, इंद्रिये आपला सर्व व्यवहार करतात तो इंद्रियादिकांच्या अधीन आहे असें तूं म्हणतोस, पण ही गोष्ट कल्पांतीही घडणे शक्य नाहीं. ४३

तेथ जाणपणें जाणों जासी । तैं जाणावें तेंचि नेणसी ।
तेथ ज्ञातेपणें ज्ञानासी । स्वरूपापाशीं रिगू नाहीं ॥ ६४४ ॥
तूं ज्ञाता होऊन त्याला जाणावयास जातोस पण तें जाणणेच विसरतोस. कारणस्वरूपामध्ये ज्ञातृत्वानें ज्ञानाचा प्रवेश होत नाहीं. ४४

जाणीव आणि नेणीव । हे सोडूनि सर्व भाव ।
जैं उपजे सद्‌भाव । तैं ब्रह्म स्वयमेव पाविजे ॥ ६४५ ॥
यास्तव ज्ञानत्व, अज्ञानत्व इत्यादि सर्व भाव सोडून जेव्हां सद्‌भाव उपजतो, तेव्हां ब्रह्म स्वतःच प्राप्त होतें. ६४५.

नैतन्मनो विशति वागुत चक्षुरात्मा ।
प्राणेन्द्रियाणि च यथानलमर्चिषः स्वाः ।
शब्दोऽपि बोधकनिषेधतयात्ममूलम् ।
अर्थोक्तमाह यदृते न निषेधसिद्धिः ॥ ३६ ॥
वरील श्लोकांत ‘अवेहि’ म्ह. जाण असें सांगितलें; पण त्यामुळें त्या तत्त्वाला विषयत्व प्राप्त झालें, म्हणून पुढील श्लोकाने त्याचा निषेध करतात –
यथा स्वाः अर्चिषः अनलं (न प्रकाशयति न दहति) – ज्याप्रमाणे अग्नीच्या अंशभूत ठिणग्या अग्नीला (प्रकाशत नाहीत वा जाळत नाहीत – ततः मनः एतद् न विशति – त्याप्रमाणे मनाला ब्रह्मांत गति नाही – उत वाक् चक्षु आत्मा – तसेच वाणी, नेत्र वा बुद्धि – प्राणेंद्रियाणि च – व प्राण आणि इंद्रिये – शब्दः अपि बोधकनिषेधतया – वा वेदही ‘नेति नेति’ म्हणत बोध करून देणार्‍या साधनांचा निषेध करून – आत्ममूलं सत् अर्थोक्तं आह – आत्म्याविषयी प्रमाण असूनही तात्पर्य सांगावे अशा रीतीने सांगतो. – यद् ऋते निषेधसिद्धिः न भवति – या ब्रह्म्याव्यतिरिक्त निषेधाची सिद्धीच होत नाही. ॥ ३६ ॥ [ या परम तत्त्वाला मन विषय करीत नाहीं. वाक्‌ही विषय करीत नाहीं. चक्षुरिंद्रिय, आत्मा म्ह० बुद्धि त्याला विषय करीत नाहीं. प्राणही आपल्या क्रियाशक्तीने त्याला प्राप्त होत नाही. इतर इंद्रियेही त्याला विषय करीत नाहींत. जसे अग्नीचे अंशभूत विस्फुलिंगादिक अग्नीला प्रकाशित करीत नाहीत किंवा दग्ध करीत नाहींत, त्याप्रमाणेंच अंशभूत इंद्रियादि त्याला प्रकाशित करीत नाहींत. जड मन-आदि वृत्तींमध्यें अभिव्यक्त होणारा जो आत्मप्रकाश त्याला व त्या त्या वृत्तीला प्रकाशित करणाऱ्या आत्मप्रकाशाला मन-आदिप्रकाश-विषयत्व नाही. याविषयी ‘प्राणस्य प्राणं’ , ‘यतो वाचो निवर्तन्ते’ इत्यादि श्रुति प्रमाण आहेत. अहोपण, ‘मी त्या औपनिषद पुरुषाविषयीं प्रश्न करतो.’ बृ. ३-९-२६ अशी श्रुति असल्यामुळें आत्म्याचे शब्दविषयत्व प्रतीत होतें, अशी आशंका घेऊन पिप्पलायन ‘शब्दोपि’ इत्यादि उत्तरार्धाने म्हणतो. शब्दही आत्म्याविषयी प्रमाण होत नाहीं तर तो सुद्धा साभार आत्मप्रतिपादन करूं शकत नाही तर लक्षणेने आत्मप्रतिपादन करतो. कारण तो स्वतःच आपल्या बोधकत्वाचा निषेध करणारा आहे. ‘यतो वाचो निवर्तन्ते’ इत्यादि अनेक श्रुति आत्मा वागादि इंद्रियांचा विषय होत नाही असें म्हणतात. तर मग श्रुति आत्मप्रतिपादन करीत नाहींतच, मग असें असतांना त्या लक्षणेने प्रतिपादन करतात असें कां म्हणतां ? अशी आशंका आली असतां मुनि म्हणतो- ‘नेति नेति’ अस्थूलं, अनणु,’ इत्यादि निषेधाचे अवधिभूत-अधिष्ठानभूत जे ब्रह्म त्यावाचून त्या निषेधाची सिद्धीच होत नाहीं. कारण जो जो निषेध तो सावधि म्ह० अधिष्ठानयुक्त असतो. ] ३६.

वैकुंठ कैलास क्षीराब्धी । मन कल्पी कल्पनाविधी ।
परी आत्मा कल्पावया त्रिशुद्धी । मनबुध्यादी सरेना ॥ ६४६ ॥
मन, वैकुंठ, कैलास, क्षीरसागर वगैरे सर्वांची कल्पना करते; पण आत्म्याची कल्पना करण्याचें सामर्थ्य त्यामध्ये नाहीं. ४६

स्वयें कल्पीं त्रिभुवन । तें स्वरूपीं रिघों न शके मन ।
बुद्धि निश्चयात्मक पूर्ण । तीसही जाण अगम्य वस्तु ॥ ६४७ ॥
स्वतः त्रिभुवनाची कल्पना करणारे मनही आत्मस्वरूपांत प्रवेश करूं शकत नाहीं. निश्चयात्मक बुद्धीलाही तें अगम्य आहे. ४७

जें मन बुद्धि अगोचर । तें वाचेसी अति दुस्तर ।
वस्तु नव्हे शब्दगोचर । परात्पर परब्रह्म ॥ ६४८ ॥
जें मन व बुद्धि यांचा विषय न होणारे तें परात्पर परथह्म वागिंद्रियाचा विषय होणें कधींच शक्य नाहीं. ४८

मोटे बांधतां आकाशातें । चारी पालव पडती रिते ।
तेवीं शब्दें बोलावें वस्तूतें । तंव शब्द शब्दार्थें निर्धर्म ॥ ६४९ ॥
आकाशाची मोट बांधू लागलें असतां त्याचे चारी पदर रिते पडतात. त्याप्रमाणें शब्दाने आत्मवस्तु बोलू लागल्यास तो शब्दार्थहीनच होतो. ४९

प्राणाचेनि निज ढाळें । जे कां क्रियाशक्ति चळे ।
ते क्रियेसी वस्तु नातळे । मा इंद्रियां आकळे कैसेनी ॥ ६५० ॥
प्राणाच्या चलनसामर्थ्यानें शरीरातील सर्व क्रिया होतात, पण वस्तु त्यांचा विषय होत नाहीं. मग इंद्रियांचा विषय कसा होणार ? ६५०

जेवीं थिल्लरा‍आंतौता । बिंबोनि वोला नव्हे सविता ।
तेवीं मनबुद्धि इंद्रियांपरता । जाण तत्त्वतां परमात्मा ॥ ६५१ ॥
डबक्यांत प्रतिबिंबित झालेला सूर्य त्यांतील पाण्यानें जसा भिजत नाहीं, तसाच मन-बुद्धि-इंद्रिये यांहून पर असलेला परमात्मा वस्तुतः त्यांनीं लिप्त होत नाहीं. ५१

जो मनाचें अनादि मन । जो बुद्धीची बुद्धि सज्ञान ।
जो नयनाचे आदि नयन । जो श्रवणाचें श्रवण सावधानत्वे ॥ ६५२ ॥
जो मनाचेंही आदिमन, जो बुद्धीचेंही कारण, नयनाची दर्शनशक्ति, श्रवणाचे सावधान श्रवण, ५२

जो घ्राणाचें निजघ्राण । जो रसनेची रसना आपण ।
जो त्वचेची निजत्वचा पूर्ण । जीवाचा जो जाण जीवु स्वयें ॥ ६५३ ॥
जो इंद्रियांचा प्रकाशिता । जो कर्म करोनि अकर्ता ।
तो इंद्रियीं इंद्रियार्था । विषयी सर्वथा हों नेणें ॥ ६५४ ॥
जो घ्राणाचें मूळ, रसनेचीही रसना, त्वगिंद्रियाचा आधार, जीवाचा जीव, इंद्रियाना प्रकाशित करणारा, कर्मे करूनही अकर्ता, तो इंद्रियांचा विषय केव्हांही होत नाहीं. ५३-५४

जेथ बुद्धीची दृष्टि न वळंघे । तेथे मन मनपणें केवीं रिघे ।
मा श्रवणनयनघ्राणयोगें । विषयसंयोगें केवीं भेटे ॥ ६५५ ॥
अहो, जेथे बुद्धि सुद्धा पोचत नाहीं, तेथें मन आपल्या मननसामर्थ्याने प्रवेश कसें करणार ! आणि श्रवण, नयन, इत्यादि विषयांचा तरी तें विषय कसें होणार ! ५५

जेथ प्राणशक्ति न चले पुढें । जेथ वाचा स्वयें लाजिली मुरडे ।
मा कर्मेंद्रियांसी कोणीकडे । पवाडु पुढें जोडेल ॥ ६५६ ॥
अहो, जेथे प्राणही कुंठित होतो आणि वागिंद्रिय लाजून परत फिरते, तेथें कर्णेंद्रियाची काय कथा ! ५६

अग्नीपासूनि आह्या अनेग । क्षणक्षणां निघती चांग ।
परी आह्यांमाजीं अग्नींचें अंग । सर्वथा साङ्ग प्रगटेना ॥ ६५७ ॥
अग्नीपासून क्षणोक्षणी अनेक ठिणग्या उडतात, पण त्यांत अग्नीचे स्वरूप पूर्णपणे प्रकट होत नाहीं. ५७

कां सूर्यापासून सूर्यकांत । प्रकाशती असंख्यात ।
परी सूर्यकांता‍आंत । कदा भास्वत प्रगटेना ॥ ६५८ ॥
सूर्यापासून असंख्य किरण प्रकाश पावतात, पण त्यांत स्वतः सूर्य प्रकट होत नाहीं. ५८

जेवीं सिंधूपासूनि तरंग । प्रकाशति अति अनेग ।
परी तरंगीं सिंधूचें अंग । सर्वथा साङ्ग प्रगटेना ॥ ६५९ ॥
समुद्रापासून अनेक तरंग उद्‌भवतात, पण त्यांत समुद्राचे पूर्ण स्वरूप प्रकट होत नाहीं. ५९

तेवीं ब्रह्मापासोनि करणें । प्रकाशती अनेकपणें ।
तरी त्या इंद्रियां ब्रह्म जाणणें । हें जीवें प्राणें घडेना ॥ ६६० ॥
त्याप्रमाणें ब्रह्मापासून अनेक इंद्रिये उद्‌भवतात, पण त्यांनीं ब्रह्माला जाणणे हें कधींही संभवत नाहीं. ६६०

जरी केळापासूनि केळी निपजे । कां साखरेपासूनि ऊंस उपजे ।
तरी इंद्रियीं ब्रह्म जाणिजे । हें न ये निजवोजें ब्रह्मादिकां ॥ ६६१ ॥
केळ्यापासून जर केळ उत्पन्न झाली किंवा साखरेपासून ऊस उत्पन्न झाला तर इंद्रिये ब्रह्माला जाणूं शकतील, पण तसें होणें केव्हांही शक्य नाहीं. ब्रह्मादिकांनाही आपल्या सामर्थ्याने ही गोष्ट घडवून आणता येत नाहीं. ६१

आशंका ॥ इंद्रियीं नव्हे ब्रह्मज्ञान । तैं जीवाचें भवबंधन ।
कदा काळीं न तुटे जाण । जन्ममरण अनिवार ॥ ६६२ ॥
अहोपण, इंद्रियांनी जर ब्रह्मज्ञान होत नसेल तर जीवाचे भवबंधन कधीच तुटणे शक्य नाहीं आणि त्यामुळें जन्म-मरण अनिवार्य आहेत, असें होईल. ६२

शब्दादेवापरोक्षमति । ऐशी श्रुतिशास्त्र-उत्पत्ति ।
तेही मिथ्या वाटे वदंती । ऐसें तूं निश्चितीं मानिसी राया ॥ ६६३ ॥
शब्दापासूनच अपरोक्ष साक्षात्कार होतो अशी श्रुति व शास्त्र यांची प्रतिज्ञा आहे पण तीही यावरून खोटी ठरते, अशी आशंका तुला येईल, ६३

तेही अर्थींचें निरूपण । ऐक राया सावधान ।
शब्द निमोनि आपण । दे ब्रह्मज्ञान जीवासी ॥ ६६४ ॥
म्हणून तिचेंही निरसन मी करतो, तें तूं सावधान चितानं ऐक. शब्द विद्यावृत्ति उत्पन्न करून स्वतः लय पावतो व जीवाला ब्रह्मज्ञान देतो. ६४

पूर्वील श्लोकार्ध –
शब्दोऽपि बोधकनिषेधतयात्ममूलम् । अर्थोक्तमाह यदृते न निषेधसिद्धिः ॥
श्लोकार्धः – प्राण आणि इंद्रियेही त्याला जाणत नाहीत “नेतिनेति” हे श्रुतींचे शब्दसुद्धा बोध करून देणार्‍या साधनांचा निषेध करून तात्पर्यरूपाने जेथे निषेध संपतो, ते आपले मूळ दाखवितात कारण हे मूळ नसेल, तर निषेधच सिद्ध होणार नाही.

जीवु सोडवावया होडा । शब्दें सवेग उचलिला विडा ।
तेणें घेतां तत्त्वांचा झाडा । आपणही पुढां निमाला ॥ ६६५ ॥
त्याविषयींची उपपत्ती मी तुला या श्लोकाच्या उत्तरार्धानें सांगतो. शब्दाने जीवाला संसारांतून सोडविण्याची पैज लावून मोठ्या त्वेषानें विडा उचलला. पण तो जेव्हां तत्वांचें परीक्षण करूं लागला, तेव्हां आपला विषय होणारे पदार्थजात आत्मा नव्हे असें पाहून तोही शेवटीं थकला. ६५

श्रुति नेते नेति येणें शब्दें । अतद्व्यावृत्तिनिषेधबोधें ।
परी साक्षात् वेदानुवादें । निज वस्तु शब्दें न बोलवे ॥ ६६६ ॥
त्यामुळें श्रुति’ नेति नेति’ म्ह० पृथ्वी, आप व तेज हें मूर्त भूतत्रयही आत्मा नव्हे आणि आकाश व वायु है अमूर्त भूतद्वयही आत्मा नव्हे; अशा अनात्म पदार्थांच्या निषेधाने बोध करते; पण तिलाही साक्षात वेदानुवादानें आत्मवस्तूचा बोध करवत नाही. ६६

शब्दासी जें वाच्य नोहे । तेंचि परब्रह्म जाणावें ।
तेथील जो खुणे पावे । तो ब्रह्म सद्‌भावें स्वयें होय ॥ ६६७ ॥
जें शब्दाचा विषय होत नाहीं तेंच ब्रह्म होय व त्याची खूण ज्याला कळते तोच स्वरूपाने स्वतः ब्रह्म होतो. ६७

श्रुति नेति नेति येणें वचनें । शब्द निषेधूनि वस्तु दावणें ।
शब्दीं निःशब्द जो लक्षूं जाणे । तेणें पावणें परब्रह्म ॥ ६६८ ॥
श्रुति ‘नेति नेति’ या वचनाने शब्दाचा निषेध करून लक्षणावृत्तीने वस्तु दाखविते. त्या शब्दांनी निःशब्द ब्रह्मात्म्याला जो ओळख शकतो तोच साक्षात् परब्रह्म होतो. ६८

शब्दु निजनिषेधें जें बोधी । तेथ समरसे ज्याचि बुद्धि ।
तेंचि परब्रह्म गा त्रिशुद्धि । निषेधावधि तो ठावो ॥ ६६९ ॥
शब्द निषेधमुखानें ज्याचा बोध करतो, त्या तत्त्वांत ज्याची बुद्धि एकरूप होऊन जाते, तें तत्त्वच परब्रह्म आहे, असें तूं निश्चयाने जाण. तें तत्त्वच निषेधाचा परमावधि आहे. द्वैतनिषेधाचे तें अधिष्ठान आहे. ६९

शब्द निमोनि सर्वशक्तिं । जीवासी दे ब्रह्मप्राप्ति ।
शब्दादेवापरोक्षेति । जाण निश्चितीं या नांव ॥ ६७० ॥
शब्द आपल्या सर्व शक्तिसह लीन होऊन जीवाला परब्रह्मप्राप्ति करून देतो शब्दापासूनच अपरोक्षज्ञान होतें, असें जें श्रुतीने म्हटलें आहे, तें हेंच होय. ६७०

वाचा निःशेष निवर्ते । मन बुद्धि न पवे जेथें ।
तेचि अवधि निषेधातें । परब्रह्म त्यातें बोलिजे ॥ ६७१ ॥
वाणी मन व बुद्धि हीं ज्याला विषय करीत नाहींत तो निषेधाचा अवधि आहे. त्यालाच परब्रह्म म्हणतात. ७१

जें वाचेचें वदवितें । परी वाचा वदों न शके ज्यातें ।
जें मनबुद्ध्यादिकां जाणतें । परी मन बुद्धि ज्यातें नेणती ॥ ६७२ ॥
जें वाचेला बोलविणारें, पण ती वाक् ज्याच्याविषयी बोलू शकत नाहीं, जें मन, बुद्धि, इत्यादिकांना जाणणारे, पण मन, बुद्धि ज्याला जाणत नाहींत, ७२

जें नयनातें दाखवितें । परी नयन न देखती ज्यातें ।
जें श्रवणघ्राणांतें चेतवितें । परी श्रवण घ्राण ज्यातें नेणती ॥ ६७३ ॥
जें नेत्रांना रूपादि दाखविणारे, पण ज्याला नेत्र पहात नाहींत, जे श्रवण व घ्राण यांना ऐकण्याची व वास घेण्याची शक्ति देते, पण ही दोन्हीं इंद्रिये ज्याला जाणत नाहींत ७३

एवं सर्वांचें जाणतें । परी सर्व सर्वथा नेणे ज्यातें ।
ज्यासी जाणावयालागीं येथें । आणिक जाणतें असेना ॥ ६७४ ॥
याप्रमाणे तें सर्वांना जाणणारे, पण सर्व ज्याला सर्वथा जाणत नाहीं व ज्याला जाणण्यास समर्थ असें दुसरें या जगांत कांहींही नाहीं. ७४

ऐसें स्वसंवेद्य निजज्ञातें । ज्यासी दुजें नाहीं जाणतें ।
शब्द रिघावया तेथें । रिगमु त्यातें असेना ॥ ६७५ ॥
अशा स्वसंवेद्य म्ह० स्वतःच स्वतःला जाणणारे जें तत्त्व त्यात शब्दाला प्रवेश करावयास अवकाशच मिळत नाहीं. ७५

जें कृश ना पुष्कळ । जें वक्र ना वर्तुळ ।
जें सूक्ष्म ना नव्हे स्थूळ । वस्तु केवळ निर्विकार ॥ ६७६ ॥
जें कृश किंवा विपुल नाहीं, जें वक्र किंवा वर्तुळ नाहीं, जें सूक्ष्मही नाहीं व स्थूलही नाहीं, तेंच केवळ निर्विषय आहे ७६

ज्यासी नाहीं रूपगुण । ज्यासी नाहीं आश्रमवर्ण ।
ज्यासी नाहीं मीतूंपण । ज्यासी जन्म-मरण असेना ॥ ६७७ ॥
ज्याला रूप, गुण, आश्रमवर्ण व ‘मी तूं’ पण नाही, जन्म-मरण नाही, ७७

जें हळुवट ना गहिंस । जें चिवळ ना सपोस ।
जें वसतें ना वोस । जें का निःशेष निर्धर्म ॥ ६७८ ॥
जे हलकें नाही व जडही नाही, जे रोड नाही व लठ्ठही नाही, जे वसते किंवा ओस नाही, तर जे निःशेष निर्विषय आहे, ७८

जें र्‍हस्व ना मोठें । जें वडील ना धाकुटें ।
जें विचारितां विवेकवाटे । विवेकुही आटे निःशेष ॥ ६७९ ॥
जे आखूड किंवा लांब नाही, वडील किंवा धाकटे नाहीं, जे विचार करूं लागलें असतां जेथे विवेकही कुंठित होतो, ७९

ज्यासी आदि ना अंतु । जे मध्यस्थितीरहितु ।
जें गुण ना गुणातीतु । अच्युतानंतु अद्वयत्वें ॥ ६८० ॥
ज्याला आदि-अंत-मध्यस्थिति नाहीं, जें सगुण नाहीं व गुणातीतही नाहीं, जें अद्वयत्वानें अनंत व अच्युत आहे, ६८०

त्या स्वरूपाचा वचनपाठ । करावया वेदें केली खटपट ।
तेथ श्रुतीचाही बोभाट । लाजिला करूनि कष्ट नेतिनेतिवादें ॥ ६८१ ॥
त्या स्वरूपाचे शब्दांनी वर्णन करण्याची खटपट वेदांनी केली; श्रुतीनेंही पुष्कळ वाग्विस्तार केला; पण शेवटीं ती बिचारी इतके कष्ट करूनही शेवटीं ‘नेति नेति’ असें म्हणून लाजून मुकाट्यानें बसलीं. ८१

वेदु काय नेणोनि परतला । जाणोनि न बोलिवेचि बोला ।
याचिलागीं तो मौनावला । तटस्थ ठेला निःशब्दें ॥ ६८२ ॥
तर मग काय ! वेदही त्याला न जाणतां परत फिरला ? नाहीं, असें नाहीं. त्याला त्याचें स्वरूप कळले; पण त्याला तें शब्दांनी वर्णितां येईना; त्यासाठीं त्यानें मौन धरलें व निःशब्द होऊन तो तटस्थ राहिला. ८२

वेदें धरितां दृढ मौन । शास्त्रें भांबावलीं जाण ।
तिहीं धरोनि मताभिमान । करिती वल्गन अतिवादें ॥ ६८३ ॥
याप्रमाणे वेदाने दृढ मौन धारण केलें असतां षट्शास्त्रे भांबावली. तीं मताभिमान धरून अतिवादानें वल्गना करूं लागली; ८३

शब्दांतीं ब्रह्मज्ञान । हे वेदें पावोनि पूर्ण खूण ।
शब्दें शब्द निषेधून । दृढ मौन तेणें धरिलें ॥ ६८४ ॥
पण शब्दवृत्ति सोडल्यानेंच ब्रह्मज्ञान होतें, हें रहस्य पूर्णपणे ओळखून वेदानें शब्दानेच शब्दाचा निषेध केला व दृढमौन धारण केलें. ८४

वेदरायें धरितां मौन । शास्त्रें भांबावलीं जाण ।
शोधितां शब्दांचें रान । निजसमाधान न पावती ॥ ६८५ ॥
वेदराजानें मौन धारण केले पाहून भांबावलेली शास्त्रे शब्दाचे रान शोधूं लागली; पण त्यांना आत्मसमाधान लाधले नाहीं. ८५

ज्यासी शब्दांतीं ब्रह्मप्राप्ति । त्यासी दर्शनें ऐक्या येती ।
शास्त्रें स्वयेंचि समजतीं । ऐक्यें त्रिजगती आभासे ॥ ६८६ ॥
वेदार्थ समजून घेऊन ज्यांनीं ब्रह्म संपादन केलेलें असते त्यांच्या ठिकाणी सर्वदर्शनें एकत्वास प्राप्त होतात, त्यांना शास्त्रे आपोआप कळतात व त्रिभुवन एकरूप दिसूं लागतें. ८६

ब्रह्म एकाकी अद्वय स्थिति । तुवांचि दाविली उपपत्ति ।
तेथें ऐक्यरूपें त्रिजगती । म्हणसी कवणाप्रती आभासे ॥ ६८७ ॥
यावर राजा म्हणतो – ‘हे मुने, ब्रह्म एकच व अद्वितीय आहे, असें आतां तुम्हीच सांगितलेत; तेव्हां त्रिभुवन एकरूपाने भासते असें जें म्हणतां तें कोणाला ?’ ८७

ज्याची तुटली वासनाफांसिटी । विराली अहंकाराची गांठी ।
प्रारब्ध उतरलें देहाचे तटी । त्यासी ऐक्यें सृष्टी आभासे ॥ ६८८ ॥
मुनि म्हणतो – ‘हे राजा, ज्याचा वासनेचा फास तुटला आहे व अहंकाराची गांठ सुटली आहे आणि प्रारब्ध देहधर्म होऊन राहिलें आहे, त्याला ही सर्व सृष्टि एकरूपाने भासते. ८८

त्याच्या अनुभवाची गोड गोष्टी । सांगावया उल्हास पोटीं ।
पिप्पलायनि स्वानंदतुष्टी । ब्रह्मैक्यें सृष्टी वाखाणी ॥ ६८९ ॥
त्याच्या अनुभवाची मधुर कथा या राजास सांगावी असा पिप्पलायनाच्या मनाला मोठा उल्हास वाटला आणि तो त्यामुळें स्वानंदतृतीनें सर्व सृष्टीला ब्रह्मैक्याने वाखाणूं लागला. ८९

सत्त्वं रजस्तम इति त्रिवृदेकमादौ ।
सूत्रं महानहमिति प्रवदन्ति जीवम् ।
ज्ञानक्रियार्थफलरूपतयोरुशक्ति ।
ब्रह्मैव भाति सदसच्च तयोः परं यत् ॥ ३७ ॥
तर मग प्रमाणाचा विषय होत नसल्यामुळें ब्रह्म नाहींच, असें म्हणण्याचा प्रसंग येतो, अशी आशंका घेऊन पिप्पलायन म्हणतो –
आदौ एकं – प्रथमारंभी एकच ब्रह्म असते – तदेव सत्त्वं रजः तमः इति त्रिवृत् प्रवदंति – त्यालाच सत्त्वरजतमात्मक त्रिगुणप्रधान म्हणतात – तदेव सूत्रं, महान्, अहं जीवं इति प्रवदंति – त्यालाच सूत्र, महान, अहंरूपी जीव असे म्हणतात – ज्ञानक्रियाफलरूपतया – ज्ञान, क्रिया, अर्थ, फल या निरनिराळ्या रूपांनी – उरुशक्ति – अत्यंत शक्तिशाली – ब्रह्मएव भाति – ब्रह्मच प्रकाशत आहे – यत् सत् असत् च तयोः परं – जे स्थूल व सूक्ष्म व त्यांचे श्रेष्ठ कारण आहे. ॥ ३७ ॥ [ सत्-स्थूल-कार्य, व असत्-सूक्ष्म-कारण तें सर्वही ब्रह्मच आहे. कारण तें त्या दोहोंचेही आदि कारण आहे. पण एकच ब्रह्म बहुविध कार्य-कारणाचे कारण कसें असू शकेल ? उत्तर – कारण तें उरुशक्ति आहे. उरु म्ह० फार मोठी जी मायारूप शक्ति ती त्याची उपाधि आहे. म्हणजे ते अनेक शक्तियुक्त आहे. आतां त्याचें अनेक प्रकारे भान कसें होतें तेंच दाखवितात. पूर्वी जें एकच असलेलें ब्रह्म तेंच सत्त्व, रज व तम या तीन गुणांनी युक्त असलेलें प्रधान आहे, असे म्हणतात. त्यानंतर क्रियाशक्तीनें युक्त असलेल्या त्याला सूत्र असें म्हणतात. ज्ञानशक्तीनें युक्त असलेल्या त्याला महत् असें म्हणतात. अहं म्हणून प्रसिद्ध असलेल्या जीवाला जीवोपाधि अहंकार म्हणतात. पुढें ज्ञान म्हणजे देवता. सर्व क्रिया, इंद्रिये, विषय व त्यांचें ज्ञान किंवा सुखादि हें फल या रूपानेंही तें ब्रह्मच भासते. अर्थात् मायेपासून फळापर्यंत सर्व कार्यकारणरूपानें स्वतः भासणाऱ्या ब्रह्माच्या सिद्धीसाठी प्रमाणाची अपेक्षा नाहीं, असा याचा भावार्थ. ] ३७.

ब्रह्मनिजऐाक्यपरिपाटी । प्रपंचु ब्रह्मत्वेंचि उठी ।
संतासंत सकळ सृष्टी । देखती दृष्टीं ब्रह्मरूप ॥ ६९० ॥
ब्रह्म स्वभावतःच एकरूप आहे आणि हा प्रपंच ब्रह्मत्वानेंच उद्‌भवला आहे. म्हणून ज्ञाते लोक सृष्टींतील सर्व शुभाशुभ पदार्थांना आपल्या ज्ञानदृष्टीने ब्रह्मरूप पहातात. ६९०

जेवीं नभीं नीळिमेचें भान । तेवीं ब्रह्मीं माया नांदे संपूर्ण ।
नवल तियेचें विंदान । नपुंसका जाण पुरुषत्व केलें ॥ ६९१ ॥
जसे आकाशामध्यें नीलत्वाचें भान होतें, त्याप्रमाणें ब्रह्मामध्यें सर्व माया नांदते. तिचे कौशल्य विलक्षण आहे. तिने नपुंसकालाही पुरुषत्व आणलें आहे. ९१

अगाध तिचा पतिव्रताधर्म । नपुंसकीं उपजवी काम ।
अनाम्या ठेवी नाम । कीं निष्कर्मा कर्म तिचेनी ॥ ६९२ ॥
तिचा पतिव्रताधर्म विचित्र आहे. ती नपुंसकाच्या ठिकाणींही काम उत्पन्न करते. नामरहिताला नांव ठेवते. तिच्यामुळें निष्कर्माला कर्म प्रात होतें. ९२

निःसंगसंगा रातली । स्पर्शेंवीण गुर्विणी झाली ।
प्रधान-महत्तत्त्वें गर्भा आली । तेथ त्रिगुणातें व्याली विकारयुक्त ॥ ६९३ ॥
ती माया असंगाच्याही संगाला प्रवृत्त झाली. त्याच्या स्पर्शावांचूनही गर्भवती झाली. प्रधान व महत्तत्त्व ही तिच्या पोटीं आली व विकारयुक्त त्रिगुणांना ती प्रसवली. ९३

विद्या‍अविद्या निजस्वभावीं । जीवशिवांची भेदपदवी ।
प्रिया पुरुषातें भोगवी । ज्ञाना-ज्ञानगांवीं वसोनियां ॥ ६९४ ॥
विद्या व अविद्या या आपल्या स्वभावांनीं तिने जीव व शिव हा भेद उत्पन्न केला. पुरुषाला अतिप्रिय होऊन आणि ज्ञान व अज्ञान या गावांमध्ये राहून त्याच्याकडून आपला भोग घेववूं लागली. ९४

जेवीं सुवर्णीं अलंकार । तंतूमाजीं पटाकार ।
भिंतीवरी भासे चित्र । तेवीं माया साकार ब्रह्मीं भासे ॥ ६९५ ॥
सुवर्णामध्ये जसा अलंकार, तंतूंमध्यें जसा पटाकार व भिंतीवर जसे चित्र भासते, त्याप्रमाणें ब्रह्मामध्ये माया साकार भासते. ९५

मृत्तिकेची गोकुळें केलीं । नाना नामाकारीं जरी पूजिलीं ।
तरी मृत्तिकाचि संचलीं । तेवीं ब्रह्मीं भासलीं जगद्‌रूपें माया ॥ ६९६ ॥
मृत्तिकेचीं गोकुलें व गायींची खिल्लारे केली, अनेक नांवे व आकार यांनी त्यांची पूजा केली, तरी त्यांत सर्वत्र मृत्तिकाच जशी व्याप्त असते, त्याप्रमाणें ब्रह्मामध्यें माया जगद्‌रूपानें भासते. ९

जैशा घृताच्या कणिका । घृतेंसीं नव्हतीं आणिका ।
तेवीं ब्रह्मीं मायाशक्ति देखा । दावी अनेका अर्थांतें ॥ ६९७ ॥
तुपाच्या कण्या जशा तुपाहून निराळ्या नसतात, त्याप्रमाणें ब्रह्मामध्यें अभिन्न असलेली मायाशक्ति अनेक पदार्थांना भासविते. ९७

ब्रह्म पुर्वीं एकाकी एक । तेंचि केवीं झालें अनेक ।
तो मायायोगपरिपाक । विशद अर्थ देख पिप्पलायनु सांगे ॥ ६९८ ॥
उत्पत्तीच्या पूर्वी ब्रह्म एक व अद्वितीय होतें, पण तेंच अनेक कसें झालें ? हा मायासंबंधाचा परिणाम आहे. पिप्पलायन मुनि हाच अर्थ आता विशद करून सांगतात. ९८

मुळीं मुख्य ब्रह्म ओंकार । तें एकचि झालें त्रिप्रकार ।
आकार-उकार-मकार । सत्त्वादि विकार गुणत्रयात्मक ॥ ६९९ ॥
मूळचे मुख्य ब्रह्म ओंकार तेंच अकार, उकार व मकार असें तीन प्रकारचे झालें. तेच सत्वादि त्रिगुणात्मक विकार होत. ९९

गुणत्रय समसमान । त्या नांव बोलिजे प्रधान ।
तेंचि क्रियाशक्ति सूत्र जाण । तेथें प्रगटल्या ज्ञान महत्तत्त्व म्हणती ॥ ७०० ॥
त्रिगुणांच्या साम्यावस्थेला प्रधान म्हणतात. तेंच क्रियाशक्तिसूत्र आहे. त्यांत प्रकट झालेल्या ज्ञानाला महत्तत्त्व म्हणतात. ७००

अहंब्रह्म हे पूर्णफुर्ति । तें अहं आलें देहाकृती ।
देहाभिमानें निश्चितीं । जीव म्हणती वस्तूतें ॥ ७०१ ॥
‘अहं ब्रह्म’ ही पूर्ण स्फूर्ति आहे. पण तेंच देहाकारानें परिणत होऊन ‘देहच मी’ असें निश्चयानें म्हणूं लागलें. म्हणजे वस्तूलाच जीव असें म्हणूं लागतात. १

क्रिया म्हणिजे दशधा करणें । ज्ञान शब्दें देवताधिष्ठानें ।
अर्थ ऐसें विषयांसी म्हणणें । तेथ फळ जाणणें सुखदुःख ॥ ७०२ ॥
क्रिया म्ह० दहा इंद्रिये. त्यांच्या अधिष्टातृदेवतांना येथें ज्ञान असें म्हटलें आहे. अर्थ म्ह० विषय, फल म्ह० सुख-दुःख, २

गुण-भूतें-विषय-करणें । जीव भोक्ता सुखदुःखपणें ।
ज्ञान क्रिया कर्माचरणें । हें सर्वही जाणणें पूर्ण ब्रह्म ॥ ७०३ ॥
गुणांचे विकार असे विषय, त्यांचें ग्रहण करणारी इंद्रिये, सुख-दुःखपणानें भोक्ता जीव व कर्माचरणाने ज्ञानक्रिया, हें सर्वही पूर्ण ब्रह्म आहे, असें जाणावे ३

साखरेचा फणस प्रबळ । तेथें कांटे त्वचा बीजगोळ ।
अवघी साखरचि केवळ । तेवीं ब्रह्मचि सकळ जगदाकारें ॥ ७०४ ॥
साखरेचा मोठा फणस केला असतां त्याचे कांटे, साल-चारखंड, आठळ्या, हें सर्वही केवळ साखरच असते. त्याप्रमाणें सर्व जगदाकार केवळ ब्रह्म आहे. ४

जेवीं पाटा‍ऊ पुतळीकृत । तेथ विषमावयवीं समान सूत ।
तेवीं जगदाकारें आकारवंत । दिसे अविकृत परब्रह्म ॥ ७०५ ॥
चिंध्यांची बाहुली केली व भिन्न भिन्न अवयव दाखविले, तरी त्यांत केवळ सूतच असतें. त्याप्रमाणें निर्विकार परब्रह्म जगदाकाराने आकारवान् दिसते ५

जग-विश्व-प्रपंचु नाम । परी ते निखळ परब्रह्म ।
हा उपनिषदार्थ उत्तम । वेदांती परम परमार्थु तो हा ॥ ७०६ ॥
जगाला विश्वप्रपंच असें नांव आहे; परंतु तें शुद्ध परब्रह्म आहे. हा उत्तम उपनिषदर्थ आहे. वेदान्तातील परम परमार्थ तो हाच. ६

जगदाकारें ब्रह्म निश्चित । जग अवघें विकारवंत ।
तैं ब्रह्मासही विकार प्राप्त । म्हणती तो अर्थ न घडे राया ॥ ७०७ ॥
पण ब्रह्मच जगदाकार झालें आहे व सर्व जगत् विकारवान् आहे, त्यामुळें ब्रह्मालाही विकार होतो, असें कित्येक म्हणतात. परंतु हे राजा, ही गोष्ट त्रिकाली संभवत नाहीं. ७०७.

नात्मा जजान न मरिष्यति नैधतेऽसौ ।
न क्षीयते सवनविद्व्यभिचारिणां हि ।
सर्वत्र शश्वदनपाय्युपलब्धिमात्रं ।
प्राणो यथेन्द्रियबलेन विकल्पितं सत् ॥ ३८ ॥
अहोपण, ब्रह्म जर सर्वात्मक असेल तर सर्व कार्याला जन्मादि विकारतत्त्व असल्यामुळें ब्रह्मालाही विकारतत्त्व प्राप्त होतें, अशी आशंका घेऊन पिःपलायनमुनि म्हणतो –
असौ आत्मा न जजान – हा आत्मा जन्मला नाही – न मरिष्यति – मरणार नाही – न एधते – पुष्टही होत नाही – न क्षीयते – वा क्षीणही होत नाही. – ही व्यभिचारिणां – कारण आपले रूप सोडून जन्ममरणादि विकार पावणार्‍या सर्व दृश्यादृश्य पदार्थांना – सवनवित् – जाणणारा काळ – सर्वत्र शश्वत् – सर्व ठिकाणी नित्य – अनपायि – अजरामर – उपलब्धिमात्रं – ज्ञानरूप, सच्चित्‌रूप – तत् सत् एव – ते सत्‌च – बलेन – इंद्रियांच्या बळाने – विकल्पितं – अनेक प्रकारे कल्पिलेले असे भासते – यथा एकः प्राणः – जसा प्राण एकच असून निरनिराळ्या ठिकाणी असतो. ॥ ३८ ॥ [ आत्मा म्ह० ब्रह्म उत्पन्न झालेलें नाहीं. जन्माच्या अभावामुळेंच अस्तित्वरूप दुसरा विकारही त्याला नाही. त्याची वृद्धि होत नाही. वृद्धि या तिसऱ्या भावविकाराच्या अभावामुळेंच त्याचा विपरिणाम व अपक्षयही होत नाही व शेवटीं तो मरणारही नाहीं. कारण उत्पन्न होऊन नाश पावणाऱ्या बाल, तरुण इत्यादि देहांच्या त्या त्या कालाचा हा द्रष्टा आहे. अवस्थावानांचा द्रष्टा त्या अवस्थांनी युक्त होत नाहीं, असा याचा भावार्थ. तर मग अवस्थारहित असा हा आत्मा कोण आहे ? उत्तर – हा केवळ अनुभवरूप-ज्ञानरूप आहे. तर मग त्याला क्षणिकत्व असेल ! नाहीं, त्याचें स्वरूपज्ञान क्षणिक नाहीं. कारण तो सर्व देशांमध्यें सर्वदा अनुवृत्त होतो. अहोपण, नील वर्णाचे ज्ञान नष्ट झालें, पीतवर्णाचे ज्ञान नष्ट झालें, अशी प्रतीति येत असल्यामुळें ज्ञानाला अनपायित्व नाही, अशी आशंका घेऊन मुनि म्हणतो – सद्‌रूपज्ञानच इंद्रियबलाने नानाप्रकारें कल्पिले आहे. म्ह० नीलादि आकाराच्या वृत्तीच उत्पन्न होतात व नाश पावतात. ज्ञान कधीं उत्पन्न होत नाही व नाशही पावत नाही, असा याचा भावार्थ. व्यभिचार पावणाऱ्या वृत्तींमध्यें व अवस्थांमध्ये ज्ञानाचा व आत्म्याचा अव्यभिचार कसा असतो, याविषयी ‘जसा प्राण’ असा येथें दृष्टांत दिला आहे. ] ३८.

ब्रह्मासी नाहीं माता पिता । यालागीं न घडे जन्मकथा ।
आत्मा एकदेशी होता । तरी जन्मा येता जनजीजठरा ॥ ७०८ ॥
ब्रह्माला आईबाप नाहींत, त्यामुळें त्याला जन्मच नाहीं. आत्मा जर एकदेशी असता तर तो मायेच्या पोटीं जन्माला आला असता. ८

आत्म्यावेगळा कांहीं । तिळभरी ठावो रिता नाहीं ।
यापरी पूर्णत्वें पाहीं । जन्म ते ठायीं स्पर्शेना ॥ ७०९ ॥
परंतु आत्म्याने रहित अशी तिळभरही कोठे जागा सापडणार नाहीं, असें त्याचें पूर्णत्व आहे. त्यामुळें त्याच्या ठिकाणीं जन्माचा गंधही नाहीं. ९

जन्मापूर्वीं । बाळाचें नास्तिक्य । जन्मापाठीं मानिती आस्तिक्य ।
या अस्तिनास्तीची भाख । आत्म्यासी देख असेना ॥ ७१० ॥
जन्मापूर्वी बाळाचे नास्तित्व असतें. म्ह. तें नसतें. जन्मानंतर त्याचें अस्तित्व मानतात; पण ही ‘अस्ति नास्ति’ भाषा आत्म्याला नाहीं. ७१०

आतां आहे पूर्वीं नाहीं । ऐसें आस्तिक्य आत्म्याचे ठायीं ।
कदाकाळीं न रिघे कांहीं । तो नित्य पाहीं निरंतर ॥ ७११ ॥
आत्मा आतां आहे व पूर्वी नव्हता, असें कधींही म्हणतां येत नाहीं. कारण तो नित्य अखंड आहे. ११

देहीं जन्मल्या बाळकासी । वाढी दिसे दिवसदिवसीं
तो बाळजन्म नाहीं आत्म्यासी । यालागीं वृद्धि त्यासी घडेना ॥ ७१२ ॥
बालक देहरूपाने जन्माला आला असतां त्याची दिवसेंदिवस वाढ होत असलेली दिसते. पण आत्म्याला तसा बालजन्म नाहीं. त्यामुळें त्याची वृद्विही होत नाहीं. १२

ज्यासी वृद्धि नाहीं तत्त्वतां । त्यासी न ये विपरिणमता ।
बाल्य तारुण्य वृद्धावस्था । आत्म्यासी सर्वथा असेना ॥ ७१३ ॥
ज्याला तत्त्वतः वृद्धि नाहीं त्याचा विपरिणामही संभवत नाहीं. त्यामुळें आत्म्याला बाल्य, तारुण्य व वृद्धावस्था सर्वथा नाहींत. १३

जो मी बाळत्वें होतों धाकुटा । तोचि मी तारुण्यें जाहलों मोठा ।
तो मी वृद्ध जाहलों कटकटा । ऐसा त्रिकाळद्रष्टा परमात्मा ॥ ७१४ ॥
मी जो बालत्वाने लहान होतों, तोच तारुण्यानें मोठा झालो आणि हर हर, आतां या वृद्धावस्थेला प्राप्त झालो आहें. असा जो तिन्ही अवस्था जाणणारा, तो परमात्मा होय. १४

द्रष्टा साक्षी जो अवस्थातीत । तो कदा नव्हे अवस्थाभूत ।
देहीं असोनि अवस्थारहित । जाण तो निश्चित परमात्मा ॥ ७१५ ॥
जो द्रष्टा, साक्षी व अवस्थातीत तो अवस्थाभूत केव्हांही होणे शक्य नाहीं. देहांत असूनही जो अवस्थारहित तोच निश्चित परमात्मा होय. १५

निरवस्थ आत्मा अविकारी पूर्ण । त्यासी कदा न ये क्षीणपण ।
ज्यासी जन्मचि नाहीं जाण । त्यासी मरण असेना ॥ ७१६ ॥
अवस्थाशून्य आत्मा पूर्ण निर्विकार आहे. त्यामुळें त्याला क्षीणत्व कधींच येत नाहीं. ज्याला जन्मच नाहीं, त्याला मरण कोठचे ! १६

तो अविकारी निरवस्थ पूर्ण । ज्यासी नाहीं जन्ममरण ।
ऐसा तूं आत्मा म्हणशील कोण । तरी जाण सर्वज्ञ ज्ञानस्वरूप ॥ ७१७ ॥
पण ‘पूर्ण निर्विकार, अवस्थाशून्य व जन्म-मरणरहित असा तो आत्मा कोण आहे,’ म्हणून म्हणशील तर तो सर्वज्ञ, ज्ञानस्वरूप आहे, असें तूं जाण. १७

म्हणसी ज्ञानही क्षणिक असे । घटज्ञानें पटज्ञान निरसे ।
तेथ इंद्रियार्थवृत्तिचि नासे । ज्ञान जैसें तैसें अविनाशी ॥ ७१८ ॥
‘ज्ञानही क्षणिक आहे, कारण घटज्ञानानें पटज्ञानाचें निरसन होतें.’ म्हणून म्हणशील तर ज्ञानाचे निरसन होत नसून इंद्रियविषयवृत्तींचा नाश होतो. ज्ञान जसेच्या तसेंच अविनाशी असतें. १८

तेचि अर्थींचा पूर्ण चृष्टांत । जेवीं प्राण देहातें वाढवीत ।
तों देहोचि होय अवस्थाभूत । प्राण निरवस्थ जैसा तैसा ॥ ७१९ ॥
त्याविषयीच मी एक पूर्ण दृष्टान्त सांगतो. जसा प्राण देहाला वाढवितो, पण देहच अवस्थांनीं युक्त होतो, प्राण जशाच्या तसा अवस्थाशून्य असतो. १९

प्राणु देहातें चाळितां । त्यासी न बाधी देहावस्था ।
आत्मा प्राणातें चेतविता । त्यासी देहावस्था असेना ॥ ७२० ॥
प्राण देहाकडून सर्व क्रिया करवितो, पण देहावस्था प्राणालाही बाध्य करूं शकत नाहीं. आत्मा तर प्राणालाही सामर्थ्य देणारा आहे, तेव्हां त्याला देहावस्था कशा असणार ! ७२०

येणें चि प्राणदृष्टांतें । साधूनि घ्यावें परब्रह्मातें
देहेंद्रियावेगळें आत्म्यातें । पुढील श्लोकार्थें प्रबोधी ॥ ७२१ ॥
याच प्राणाच्या दृष्टान्तानें परब्रह्माचे निर्विकारत्व निश्चित करावे आतां मुनि पुढील लोकार्धानें आत्मा, देह व इंद्रिय यांहून वेगळा आहे, असा बोध करतो. ७२१

अण्डेषु पेशिषु तरुष्वविनिश्चितेषु
प्राणो हि जीवमुपधावति तत्र तत्र ।
सन्ने यदिन्द्रियगणेऽहमि च प्रसुप्ते
कूटस्थ आशयमृते तदनुस्मृतिर्नः ॥ ३९ ॥
पूर्वोक्त प्राणदृष्टान्ताचेंच विवरण करणारा मुनि इंद्रियादिकांच्या लयानें निर्विकार आत्म्याचा अनुभव कसा येतो तें दाखवितो –
अंडेषु पेशिषु तरुषु – अंड्यात, पेशींत, वृक्षात – अविनिश्चितेषु योनिषु – अविनिश्चित् योनीत – तत्र तत्र प्राणः – तेथे तेथे प्राण – जीवं उपधावति ही – जीवानुसरण करून विद्यमान असतोच – यत् इंद्रियगणे सन्ने – जेव्हा इंद्रिये लीन झालेली असतात – अहमि च प्रसुप्ते – अहंवृत्ति निद्रावश झालेली असते – आशयं ऋते कूटस्थ आत्मा – उपाधिशून्य निर्लेप आत्मा – नः तदनुस्मृतिः – आम्हाला त्या आत्म्याचे स्मरण राहात नाही. ॥ ३९ ॥ [ अंडज, स्वेदज, जरायुज व उद्‌भिज या शरीरातील प्रत्येक जीवामध्ये प्राणाची अनुवृत्ति होते. याप्रमाणे दृष्टान्तभूत प्राणाचे निर्विकारित्व दाखवून द्राष्ट्रांतिकातही तें दाखवितात. त्याच वेळीं आत्मा सविकार असल्याप्रमाणें कसा प्रतीत होतो ? उत्तर – जेव्हां जागरावस्थेंत इंद्रियगण जागत असतो व स्वप्नांत जागृतींतील संस्कारांनीं युक्त असा अहंकार जागत असतो, तेव्हांच आत्मा सविकार असल्याप्रमाणे भासतो. पण जेव्हां सुषुप्तावस्था सुरू होते, तेव्हा त्या अवस्थेंत इंद्रियसमूह लीन झाला असतां व अहंकारही लीन झाला असतां आत्मा निर्विकारच होतो. कारण विकाराचे निमित्त असें जें लिंगशरीर त्या उपाधीचा त्या वेळीं अभाव होतो. अहोपण, अहंकारापर्यंत सर्वांचा लय झाला असतां शून्यच अवशिष्ट रहाणार ! तेव्हां निर्विकार आत्म्याचा तेथें संभव कसा आहे ? ‘तदनु- स्मृतिर्नः’ या पदांनी उत्तर – त्या विशेषज्ञानशून्य सुखात्मरूप सुषुप्तीसाक्षीची स्मृति आम्हांला होते. मी एवढा वेळ सुखाने निजलो होतों, मला काही कळले नाहीं, असें त्याचें निजून उठल्यावर स्मरण होतें. ज्याचा अनुभव घेतला नाहीं, त्याचें स्मरण होत नाही; पण झोपेतील सुखाचे व अज्ञानाचे स्मरण होतें, त्यावरून सुषुप्तीतही आत्मानुभव आहेच. तथापि विषयसंबंधाच्या अभावामुळे तो स्पष्ट नाही, असा याचा भावार्थ. ‘यद्वै तन्न पश्यति’ अशी याविषयी श्रुति आहे. ३९

अंडज स्वेदज जारज । चौथें जाण गा उद्‌भिज ।
त्यांचे ठायीं प्राणु सहज । आत्मयोगें सदा वर्ते ॥ ७२२ ॥
जरायुज, अंडज, स्वेदज व उद्‌भिज, यामध्ये प्राण सहजच आत्मसंबंधानें सदा रहातो. २२

प्राणयोगें आत्मा वर्ततां । त्यासी जीव म्हणती तत्त्वतां ।
त्या प्राणासी न बाधिती देहावस्था । मा जीवाचे माथां त्या कैंच्या ॥ ७२३ ॥
प्राणसंबंधानें आत्मा वागू लागला असतां त्यालाच जीव म्हणतात. त्या देहावस्था प्राणालाही विकारयुक्त करूं शकत नाहींत; तर मग त्या जीवाला विकृत कशा करणार ! २३

देहेंद्रियामाजीं वर्ततां । आत्मा अलिप्त देहावस्था ।
तो कैसा म्हणती आतां । ऐक त्याही दृष्टांता सांगेन ॥ ७२४ ॥
आत्मा देहेंद्रियांदिकांत रहात असताना देहावस्थांहून अलिप्त असतो. पण तो कसा आहे, हेही मी दृष्टांताने सांगतो. २४

आत्मा जागृतिदेहीं वर्ते । तैं सविकार मानिती त्यातें ।
तोचि सांडूनि देहेंद्रियांतें । स्वप्नीं वर्ते पूर्वानुध्यासें ॥ ७२५ ॥
आत्मा जेव्हां जाग्रद्‌देहांत असतो तेव्हां त्याला सविकार म्हणतात. तोच देहेंद्रियावरील अभिमान सोडून स्वप्नांत पूर्वचिंतनानुसार रहातो. २५

देहेंद्रियाविहीन । केवळ लिंगदेह जाण ।
निजात्मा देखे स्वप्न । जागृत्यभिमानसंकल्पें ॥ ७२६ ॥
देहेंद्रियांनीं रहित केवळ लिंग देहाभिमानी आत्मा जागृतींतील अभिमानसंकल्पानें स्वप्न पहातो. २६

तें उपरमल्या स्वप्न । देहाभिमान झालिया लीन ।
सर्वविकारविहीन । सुषुप्तिकाळीं पूर्ण परमात्मा उरे ॥ ७२७ ॥
पुढें तें स्वप्न शांत होऊन देहाभिमान लीन झाला असतां सुषुतिकाली सर्व विकारशून्य पूर्ण परमात्मा होतो. २७

देहेंद्रियासीं अभिमान लीन । कोणीही स्फुरेना स्फुरण ।
तरी तें झालें सर्व शून्य । आत्मा चिद्घन नाहीं म्हणसी ॥ ७२८ ॥
‘पण देहेंद्रियांवरील अभिमान लीन झाल्यावर कांहींच भासत नाहीं, त्यावेळीं सर्व शून्य होतें. अर्थात त्यावेळीं चिद्‌घन आत्माही नाहीं,’ म्हणून म्हणशील तर सांगतो; २८

जरी सुषुप्तीसी आत्मा नाहीं । तरी सुखें निजेलों होतों पाहीं ।
हें उपजे ज्याच्या ठायीं । तो सर्वथा नव्हे कहीं शून्य ॥ ७२९ ॥
जर सुषुतीत आत्मा नाहीं तर मी एवढा वेळ सुखानें निजलों होतों हे स्मरण कसें होतें ? अर्थात तें ज्याच्या ठिकाणीं उपजतें त्याला शून्य म्हणतां येत नाहीं. २९

जो मी जागृतीं जागता । तोचि मी स्वप्नातें देखता ।
तोचि मी सुषुप्तीं सुखभोक्ता । एवं तिहीं अवस्था साक्षी जो ॥ ७३० ॥
मी जागृतींत जागणारा, सुषुप्तींत सुख भोगणारा व स्वप्नांत स्वप्नद्रष्टा, असा तिन्ही अवस्थांत जो साक्षी ७३०

गो अवस्थात्रयीं साक्षी पूर्ण । तो सर्वथा नव्हे शून्य ।
तोचि परमात्मा परिपूर्ण । शुद्ध चिद्घ्न तो राया ॥ ७३१ ॥
तो केव्हांही शून्य होऊं शकत नाहीं. राजा, तोच शुद्ध चिद्‌घन पूर्ण परमात्मा आहे. ३१

सुषुप्तीं ब्रह्मानुभवो आहे । तरी कां पुढतीं संसारु पाहे ।
तेथ अविद्येसीं अहं लीन राहे । यालागीं होये भवभ्रमु ॥ ७३२ ॥
‘सुषुतीत असा ब्रह्मानुभव जर येतो, तर पुढे-जागृतीत पुनः संसार कां भासतो,’ असें म्हणशील तर त्या अवस्थेंत अहंकार अविद्येत लीन होऊन रहातो. त्याचा सर्वथा बाध होत नाहीं. यामुळे संसारभ्रम होतो. ३२

तें अविद्या अहंकारेंसी नाशे । तैं जगद्‌रूपें ब्रहचि भासे ।
जन्ममरणांचा ठावोचि पुसे । जीव समरसे परब्रह्मीं ॥ ७३३ ॥
पण ती अविद्याच अहंकारासह जेव्हां नाश पावते, तेव्हां जगद्‌रूपानें ब्रह्मच भासते. जन्म-मरणाचें नांवही उरत नाहीं. जीव ब्रह्मामध्यें एकरूप होतो. ३३

तेथ हेतुमातु दृष्टांत । प्रमाण-प्रमेय विवर्जित ।
परमात्मा सदोदित । परब्रह्म निश्चित परमानंदें ॥ ७३४ ॥
त्या अवस्थेंत परमात्मा हेतु, दृष्टान्त, प्रमाण, प्रमेय, प्रमाता इत्यादिकांनीं रहित, सदा प्रकाशरूप, परमानंद व निश्चित परब्रह्म होतो. ३४

तेथ सुखावरी सुख नांदे । आनंदु भोगिजे आनंदें ।
जग दुमदुमी परमानंदें । स्वानंद बोधें संपूर्ण ॥ ७३५ ॥
त्या अवस्थेंत निरतिशय सुख नांदते. आनंदानेच आनंदाचा अनुभव येतो. जगत् स्वानंदानें दुमदुमून जातें. सर्वत्र स्वानंदबोध भरून रहातो. ३५

निरसोनियां निजमाया । ऐसा अनुभवो मुनिवर्या ।
कैं हो‍ईल म्हणसी राया । तैं भजावें यदुवर्या निष्कामभावें ॥ ७३६ ॥
‘मायेचे निरसन होऊन असा आत्मानुभव केव्हा येईल’ म्हणून जर विचारशील तर हे राजा, यदुश्रेष्ठाला निष्कामभावानें भजावे म्हणजे मायेची निवृत्ति होऊन असा स्वात्मानुभव येतो. ७३६.

यर्ह्यब्जनाभचरणैषणयोरुभक्त्या ।
चेतोमलानि विधमेद्‌गुणकर्मजानि ।
तस्मिन् विशुद्ध उपलभ्यत आत्मतत्त्वं ।
शाक्षाद्यथामलदृशोः सवितृप्रकाशः ॥ ४० ॥
अहोपण, सुषुप्तींत कूटस्थ आत्म्याचा अनुभव जर येत असेल तर पुनरपि संसार कसा संभवेल ! अविद्या व अविद्येचे संस्कार विद्यमान असल्यामुळें तो संभवेल ! असें म्हणाल तर अविद्यादिकांची निवृत्ति करणारा आत्मानुभव केव्हां येतो ! पिप्पलायन याचे उत्तर पुढील श्लोकांत देत आहे –
यर्ही – जर – अब्जनाभचरण एषणया – ज्याच्या नाभीमध्ये कमल आहे अशा श्रीविष्णूच्या चरणांची इच्छा करणार्‍या – उरुभक्त्या – एकनिष्ठ भक्तीच्या साह्याने – यर्ही चेतोमलानि – जेव्हा अंतःकरणातील मळ – विधमेत् – दूर होईल तेव्हा – यथा सवितृप्रकाशः विशुद्धे – ज्याप्रमाणे शुद्ध दृष्टीस् सूर्यप्रकाशाची प्रतीती येते – तस्मिन् आत्मतत्त्वं – त्याप्रमाणे त्या शुद्ध अंतःकरणामध्ये आत्मस्वरूप – साक्षात् उपलभ्यते – प्रत्यक्ष प्रगट होते. ॥ ४० ॥ [ द्रव्यादिकांची इच्छा टाकून केवळ भगवच्चरणाच्या इच्छेने केलेल्या श्रेष्ठ भक्तीनें शरीरेंद्रियांकडून होणाऱ्या कर्मांपासून उत्पन्न झालेल्या रागद्वेषादि चित्तमलांचा पुरुष जेव्हां नाश करतो, किंवा येथें पुरुष हा कर्ता न घेतां ‘चेतः’ हाच कर्ता घ्यावा. चेतः म्ह० अंतःकरण आपल्यांतील गुणकर्मजन्य मलांचे पूर्वोक्त भक्तीनें जेव्हां क्षालन करते तेव्हां तें चित्त अतिशय शुद्ध झालें असतां त्यांत आत्मतत्त्व साक्षात् उपलब्ध होतें. नेत्र निर्मल झाले असतां पूर्वी सिद्ध असलेलाच सूर्यप्रकाश जसा दिसतो, त्याप्रमाणें पूर्वी सिद्ध असलेलाच आत्मा शुद्ध अंतःकरणांत साक्षात् उपलब्ध होतो. ] ४०.

निर्विकारस्वरूपप्राप्ति । अवश्य पावणें हे चित्तीं ।
तैं करावी भगवद्‌भक्ति । उत्कटा प्रीति अविश्रम ॥ ७३७ ॥
आपल्याला निर्विकार स्वरूपाची प्राप्ति अवश्य व्हावी असें जर वाटत असेल तर त्यानें मोठ्या उत्साहाने व न कंटाळता भगवद्‌भक्ति करावी. ३७

त्यजूनि पुत्रवित्तेषणेचें काज । जिणौनि लौकिकाची लाज ।
पद्मनाभभजनाचें भोज । अतिनिर्लज्ज नाचावें ॥ ७३८ ॥
पुत्रैषणा, वित्तैषणा इत्यादि एषणांचा त्याग करून, लौकिकाची लाज सोडून ईश्वराच्या भजनाने लौकिकदृष्ट्या एखाद्या सोंगासारखे निर्लज्जपणे नाचावे. ३८

पुत्रवित्तलोकेषणा । त्यजूनि भजतां हरिचरणां ।
तंव तंव चित्ताचे चैत्यमळ जाणा । क्षणक्षणां नासती ॥ ७३९ ॥
पुत्र, वित्त व लोक, यांच्या प्राप्तीची इच्छा याच पुत्रादि तीन एषणा होत. त्यांचा त्याग करून हरिचरणांचें भजन करू लागलें असतां चित्ताचे मल हळूहळू नाश पावू लागतात. ३९

रजतमादि कर्मज मळ । चित्तीं बैसले जे सबळ ।
ते प्रक्षाळती सकळ । भक्तिप्रेमजळक्षाळणें ॥ ७४० ॥
राजस व तामस कर्मांमुळे चित्तावर जे प्रबल मळ बसलेले असतात ते भक्तिरूप प्रेमजळानें धुतले जातात. ७४०

जंव जंव थोरावे सप्रेम भक्ति । तंव तंव पाया लागे विरक्ति ।
स्वयें विरमे विषयासक्ति । होय चित्तवृत्ति निर्मळ ॥ ७४१ ॥
सप्रेम भक्ति जशी जशी वाढूं लागते, तशी तशी विरक्ति येऊ लागते. विषयासक्ति आपोआप निवृत्त होते व त्यामुळें चित्तवृत्ति निर्मल होते. ४१

निर्मळ जाहलिया चित्तवृत्ति । परमात्मया सर्व भूतीं ।
भजों लागे अनन्यप्रीतीं । हे चौथीं भक्ति उदार ॥ ७४२ ॥
ती निर्मल झाली असतां हा विरक्त भक्त परमात्म्याला सर्वभूतांमध्ये अनन्य प्रीतीने भजूं लागतो. ही ज्ञानलक्षण चवथी भक्ति श्रेष्ठ आहे. ४२

हे भक्ति अतिशयें उदार । निर्दाळी भक्तांचा अहंकार ।
उद्धरी सुर नर स्त्रिया शूद्र । आनंदनिर्भर करी जीवु ॥ ७४३ ॥
कारण ती भक्तांचा अहंकार घालविते. देव, मनुष्ये, स्त्रिया, शूद्र यांचा उद्धार करते. जीवाला आनंदपूर्ण करते. ४३

हे भक्ति जैं लागे हातीं । तैं भवभयाची निःशेष शांति ।
पायां लागती चारी मुक्ती । ऐशी उदार भक्ति ह्जरीची ॥ ७४४ ॥
ही भक्ति जेव्हां हातीं लागते, तेव्हां संसारभयाची निःशेष शांति होते. चारी मुक्ति त्याच्या पाया पडूं लागतात. ही ज्ञानलक्षण हरिभक्ति अशी उदार आहे. ४४

जेवीं डोळां असतां पडळ । सविता उगवे सर्व काळ ।
तो सन्मुख न देखे रविमंडळ । मा पदार्थ सकळ त्या कैंचे ॥ ७४५ ॥
डोळ्यांवर पडदा बांधिला असतां किंवा सारा वगैरे दृष्टीला प्रतिबंध करणारा कांहीं दोष उद्‌भवला असतां सर्वकाल समोर असलेलाही सूर्य दिसत नाहीं; मग इतर पदार्थ कोठून दिसणार ! ४५

तेंचि फिटलिया पडळ । दृष्टी होय अतिनिर्मळ ।
देखों लगे पदार्थ सकळ । रविमंडळसमन्वयें ॥ ७४६ ॥
पण डोळ्यांवरील तो प्रतिबंध उपायाने दूर केला असतां दृष्टि अतिशय निर्मळ होते व सूर्यमंडळासह ती सर्व पदार्थ पाहूं लागते. ४६

तेवीं निजात्मा हृदयीं वसे । परी चित्तवृत्ति मळिण असे ।
तंव परब्रह्म न प्रकाशे । चित्त वासनादोषें दूषित ॥ ७४७ ॥
त्याच न्यायाने आत्मा हृदयामध्यें रहातो; पण चित्तवृत्ति जोवर मलिन असते, तोवर परब्रह्म प्रकाश पावत नाहीं. चित्त वासनादोषानें दूषित झालेलें असतें. ४७

तेथ करितां भगवद्‌भक्ति । निर्मळ होय चित्तवृत्ति ।
तेव्हां निर्विकारस्वरूपप्राप्ति । भक्त पवती निजभजनें ॥ ७४८ ॥
चित्तवृत्ति भगवद्‌भक्तीनें निर्मल होते आणि त्यामुळें भक्त आपल्या निर्विकार स्वरूपास प्राप्त होतात. ४८

पावावया परमप्राप्ति । जगीं दाटुगी भगवद्‌भक्ति ।
ते म्यां सांगितली तुजप्रती । यथानिगुतीं नृपनाथा ॥ ७४९ ॥
या जगांत भगवद्‌भक्तीच परमात्मप्राप्ति करून देण्यास समर्थ आहे व मी तीच तुला यथार्थपणे सांगितली आहे. ४९

जेवीं डोळ्यांचे पडळ फिटे । तेथ प्रकाशेंसीं सविता भेटे ।
तेवीं कल्पनालोपें प्रगटे । नेटेपाटें परब्रह्म ॥ ७५० ॥
ज्याप्रमाणें डोळ्यांवरील आवरण निघून गेलें असतां सूर्याचा प्रकाश साक्षात् दिसतो, त्याप्रमाणें कल्पनांचा लोप झालाअसतां निर्विकल्प अंतःकरणांत परब्रह्म प्रकट होतें. ७५०

जेथ निर्विकल्प समान । निश्चयेंसीं जाहलें मन ।
त्यासी देहीं वर्ततांही जाण । भवबंधन स्पर्शेना ॥ ७५१ ॥
ज्याचे मन निश्चयानें निर्विकल्प झालें आहे तो देहात जरी असला तरी त्याला संसारबंधन स्पर्श करीत नाहीं. ५१

ऐसें गर्जोनिया जाण । हर्षें बोले पिप्पलायन ।
तंव राजा सुखावला संपूर्ण । जीवींची खूण बाणली ॥ ७५२ ॥
पिप्पलायनमुनि मोठ्या हर्षाने गर्जना करून असें सांगत असतां राजालाही मोठा हर्ष झाला. त्याला स्वात्मानुभवाची खूण पटली. ५२

ऐकतां ब्रह्मनिरूपण । राजा लांचावला पूर्ण ।
पुढें वाढावया निरूपण । अन्वयें प्रश्न पुसतसे ॥ ७५३ ॥
या ब्रह्मनिरूपणास राजा अतिशय लांचावला व तें आणखी वाढावे म्हणून त्या मुनींना याच विषयाला अनुरूप असा आणखी प्रश्न विचारू लागला. ५३

जेणें तुटे कर्मबंधन । त्या कर्मयोगाचें लक्षण ।
समूळ ऐकावया जाण । राजा आपण सादरें पुसतु ॥ ७५४ ॥
ज्या कर्मयोगानें कर्मबंधन तुटते त्याचें समूळ लक्षण ऐकण्यासाठी तो राजा आदराने विचारू लागला. ७५४.

श्रीराजोवाच ।
कर्मयोगं वदत नः पुरुषो येन संस्कृतः ।
विधूयेहाशु कर्माणि नैष्कर्म्यं विन्दते परम् ॥ ४१ ॥
भक्ति कर्मयोगाच्या अधीन असल्यामुळें राजा त्या कर्मयोगाविषयी प्रश्न करतो –
राजा उवाच – राजा म्हणाला, येन संस्कृतः – ज्या कर्मयोगाने शुद्धचित्त झालेला पुरुष – इह कर्माणि विधूय – यालोकी कर्मे टाकून (म्हणजेच फलाचा त्याज करून) – परं नैष्कर्म्यं – श्रेष्ठ अशा नैष्कर्म्यस्थितीला – आशु विन्दते – चटकन प्राप्त होतो – नः कर्मयोगं वदत – त्या कर्मयोगाचा आम्हाला उपदेश करा, ॥ ४१ ॥ [ ज्या कर्मयोगाच्या अनुष्ठानानें पुरुष संस्कारयुक्त होऊन कर्मांचा त्याग करून कर्मनिवृत्तीने साध्य होणाऱ्या ज्ञानाला प्राप्त होतो, तो कर्मयोग मला सांगा. ] ४१.

राजा निजश्रद्धासंपन्न । अतिविनीत करी प्रश्न ।
जेणें तुटे कर्मबंधन । तो कर्मयोग संपूर्ण सांगा स्वामी ॥ ७५५ ॥
श्रद्धाळु राजा नम्रपणाने म्हणाला कीं, हे स्वामिन्, ज्याच्या योगाने कर्मबंधन तुटून जातें तो कर्मयोग मला पूर्णपणे सांगा. ५५

कोणें कर्में कर्म तुटे । नैष्कर्म्यासिद्धि स्वयें प्रगटे ।
पुरुषा पुरुषोत्तम भेटे । हें मज गोमटें वर्म सांगा ॥ ७५६ ॥
कोणत्या कर्माने कर्माची निवृत्ति होऊन नैष्कर्म्यसिद्धि आपोआप प्रकट होते व पुरुषाला पुरुषोत्तम भेटतो, तें उत्तम कर्म मला सांगा. ७५६.

एवं प्रश्नमृषीन्पूर्वमपृच्छं पितुरन्तिके ।
नाब्रुवन् ब्रह्मणः पुत्रास्तत्र कारणमुच्यताम् ॥ ४२ ॥
राजा आणखी एक प्रश्न करतो –
पूर्वं पितुः अंतिके – पूर्वी माझा पिता समक्ष असता – एवं प्रश्नं – या प्रकारचाच प्रश्न – ऋषीन् अपृच्छम् – मी ऋषींना विचारला होता – ब्रह्मणः पुत्राः – पण ब्रह्मदेवाचे सनकादि पुत्र – न अब्रुवन् – त्यासंबंधात कांहीच बोलले नाहींत. – तत्र कारणं उच्यताम् – त्याचे काय कारण असावे बरे ? ॥ ४२ ॥ [ पित्याच्या समक्ष पूर्वी मीं एकदा ब्रह्मदेवाच्या सनकादिपुत्रांना हाच प्रश्न केला. पण सर्वज्ञ असूनही त्यांनीं मला उत्तर दिलें नाहीं. त्याचें कारण काय, ते मला सांगा. ] ४२.

पूर्वीं हाचि प्रश्नु सनकादिकां । पित्यासन्निध पुशिला देखा ।
ते उत्तर नेदितीचि कां । हेही आशंका फेडावी स्वामी ॥ ७५७ ॥
पूर्वी मीं हाच प्रश्न सनकादिकांना पित्यासमोर विचारला होता, पण त्यांनीं त्याचें उत्तर दिलें नाहीं, तें कां दिलें नाहीं ? ही माझी आशंका घालवावी. ५७

रायाचे प्रश्न अतिपवित्र । त्यांचें द्यावया प्रति‍उत्तर ।
हरिखावला आविर्होत्र । तो कर्मवैचित्र्य निरूपी ॥ ७५८ ॥
रायाचे हे दोन्ही प्रश्न अति पवित्र होते. यास्तव त्याचें प्रत्युत्तर देण्यासाठीं आविर्होत्र मोठ्या हर्षाने पुढें झाला व तो कर्मवैचित्र्याचे निरूपण करूं लागला. ७५८

श्रीआविर्होत्र उवाच –
कर्माकर्म विकर्मेति वेदवादो न लौकिकः ।
वेदस्य चेश्वरात्मत्वात्तत्र मुह्यन्ति सूरयः ॥ ४३ ॥
प्रश्नाचें गहनत्व प्रकट करण्यासाठीं मुनि अगोदर दुसऱ्या प्रश्नाचें उत्तर सांगतो –
अविर्होत्रः उवाच – अविर्होत्र म्हणाला, कर्म अकर्म विकर्न – विहित कर्म, निषिद्ध कर व विहित कर्म न करणे – इति वेदवादः – हा विषय वेदवचनांनी कळणारा आहे – लौकिकः न – लौकिक वचनांनी कळण्यासारखा नाही. – वेदस्य च – आणि वेदांना – ईश्वरात्मत्वात् – ईश्वराने आत्मरूप सांगण्यासाठी स्वस्फूर्तीने उत्पन्न केलेले असल्यामुळे – तत्र – त्या कर्म-अकर्म-विकर्म निर्णय संबंधी – सूरयः अपि मुह्यंति – शहाणे लोकही मोह पावतात (स्तंभित होतात). ॥ ४३ ॥ [ वेदविहित कर्म, वेदनिषिद्ध अकर्म आणि विहिताचे अकरण हें विकर्म हा वेदवाद आहे. हें कर्मत्रय केवल वेदावरूनच ज्ञात होतें. तें लौकिक नाहीं आणि वेद ईश्वरापासून श्वासोछ्वासाप्रमाणे अप्रयत्नाने उत्पन्न झालेला असल्यामुळें अपौरुषेय आहे. पुरुषाच्या वाक्याचे वक्त्याच्या अभिप्रायावरून अर्थज्ञान होऊं शकते. पण अपौरुषेयवेदांमध्यें केवल वाक्यांच्या पूर्वापार संबंधावरूनच तात्पर्याचा निश्चय करावा लागतो. पण ही गोष्ट दुष्कर आहे. त्यामुळें या कर्मादिकांविषयीं विद्वानांनाही मोह होतो. मग इतर अविद्वानांविषयीं काय सांगावे ! पूर्वी तूं जेव्हां हा प्रश्न केलास तेंव्हा बालक होतास; त्यामुळें सनकादिकांनीं तुझ्या प्रश्नाचें उत्तर दिलें नाहीं. ] ४३.

कर्माकर्मविकर्म जाणा । सामान्य नव्हे नृपनंदना ।
करितां विभागविवंचना । नुगवे सज्ञानां स्मृतिकारांसी ॥ ७५९ ॥
हे राजा, कर्म, अकर्म आणि विकर्म ही काही सामान्य गोष्ट नव्हे. ज्ञानी स्मृतिकारांनाही त्याच्या विभागाचा निर्णय करतां येत नाहीं. ५९

जे स्वयें प्रतिसृष्टिकारी । तेही भुलले कर्मविभागावरी ।
जे समुद्र घोंटिती चुळेकरीं । तेही कर्मसागरीं बुडले ॥ ७६० ॥
जे स्वतः साक्षात प्रतिसृष्टि करणारे, तेही या कर्मविभागामध्यें घुटमळतात. जे समुद्राला आपल्या चुळक्यांत घेऊन प्राशन करते झाले, तेही या कर्मसागरांत बुडाले आहेत. ७६०

येचि कर्मविवंचनेसाठीं । ऋषिमहर्षींचिया कोटी ।
मताभिमानें झालें हिंपुटी । त्यांसीही शेवटीं नुगवेचि ॥ ७६१ ॥
याच कर्मविवंचनेंत अनेक ऋषि व महर्षि भिन्नभिन्न मतांच्या अभिमानाने निराश होऊन बसले, पण त्यांनाही त्यांचा निर्णय कळला नाहीं. ६१

कर्माकर्मविभाग जाणा । स्वयें नुगवेचि चतुरानना ।
इतरांची कोण गणना । कर्मविवंचना करावया ॥ ७६२ ॥
साक्षात् ब्रह्मदेवालाही तो कळला नाहीं, मग इतरांची काय कथा ! ६२

कर्म वेदमूळ जाण । वेदु स्वयें नारायण ।
वेदवादविवंचन । करितां मौन श्रुतिशास्त्रां ७६३ ॥
कर्माचे मूळ वेद आहे व वेद साक्षात् नारायण आहे. वेदवादाचें विवेचन करता करतां श्रुति- शास्त्रांनाही मौन धारण करावे लागलें आहे. ६३

कर्म-अकर्म-विकर्म जाण । एकचि परी त्रिविध भिन्न ।
तेंही विभागविवंचन । सावधान अवधारीं ॥ ७६४ ॥
कर्म, अकर्म व विकर्म हे एकाचेच तीन प्रकार आहेत, तेही मी तुला विशद करून सांगतो, तें सावधान मनाने ऐक. ६४

श्वेत मृदु मधुर । त्रिविधभेदें एक साखर ।
तेवीं एकचि त्रिप्रकार । कर्मठ नर मानिती कर्म ॥ ७६५ ॥
एकच साखर शुभ, मधुर व मृदु अशा त्रिविध भेदानी युक्त असते, त्याच न्यायाने कर्मठ पुरुष एकच कर्म तीन प्रकारचे मानतात. ६५

भिन्न करितां मधुरता । तीमाजीं ये मृदु-श्वेतता ।
श्वेततचि भिन्न करितां । मृदु-मधुरतं तीमाजीं ॥ ७६६ ॥
साखरेंतील मधुरता भिन्न केली असता तिच्यामध्ये मृदुत्व व श्वेतत्व रहाते. श्वेततेला भिन्न केलें असतां मृदुत्व व मधुरत्व रहाते. ६६

तेवीं भिन्न करितां कर्म । कर्मा सर्वांगीं अकर्म ।
कर्म अकर्मामाजी विकर्म । मिरवे परम सौभाग्यें ॥ ७६७ ॥
त्याच न्यायाने कर्माला भिन्न केलें असतां कर्मामध्यें पूर्ण अकर्म रहाते, आणि कर्म व अकर्भ यामध्ये विकर्म परम सौभाग्यानें मिरवते. ६७

मुख्य मूळीं जें कां निपजे । कर्म ऐसें त्यातें म्हणिजे ।
विहिताविहितक्रिया जे जे । विकर्म म्हणिजे तिये नांव ॥ ७६८ ॥
अगदीं आरंभी जें उत्पन्न होतें, त्याला कर्म म्हणतात जी जी विहित व अविहित क्रिया तिला विकर्म म्हणतात. ६८

कर्म अकर्मयोगें चळे । ऐसें विकर्मीं ज्यासी विवळे ।
त्यास निष्कर्मता आकळे । गुरुकृपाबळें तत्काळ ॥ ७६० ॥
अकर्मसंबंधानें कर्म स्वरूपापासून ढळते, असें विकर्मामध्ये ज्याला कळतें त्याची निष्कर्मता गुरुकृपेने तत्काळ सिद्ध होतें. ६९

कर्मावरी कर्म विशेष वाढे । विकर्म त्यातें म्हणणें घडे ।
जेथें कर्म रिघों न शके पुढें । अकर्म चोखडें या नांव ॥ ७७० ॥
एका कर्मापासून दुसरें, दुसऱ्यापासून तिसरे अशी जी कर्माची वाढ होते, तिलाच विकर्म म्हणावे लागतें. पण, जेथे कर्माची वाढ खुंटते त्यालाच अकर्म हें यथार्थ नांव आहे. ७७०

ऐशी कर्मविवंचना अटक । हा प्रश्न केला तैं तूं बाळक ।
त्याचिलागीं गा राया देख । सनकादिक न सांगतीचि ॥ ७७१ ॥
राजा, कर्मांची विवंचना अशी अगाध आहे. तूं पूर्वी जेव्हां हा प्रश्न केलास त्यावेळीं तू लहान बालक होतास, म्हणून सनकादिकांनीं तुला त्याचें उत्तर सांगितलें नाहीं. ७१

कर्माकर्मविवंचना । अधिकारेंवीण कोणा ।
सांगों नये नृपनंदना । कर्म सज्ञाना अतिदुर्बोध ॥ ७७२ ॥
कारण अधिकारावांचून हा कर्माकर्मविवेक कोणाला सांगू नये, अशी शास्त्रमर्यादा आहे. मोठमोठ्या शास्त्रज्ञांनासुद्धां हा कर्माकर्मविवेक समजणे कठिण आहे. ७७२.

परोक्षवादो वेदोऽयं बालानामनुशासनम् ।
कर्ममोक्षाय कर्माणि विधत्ते ह्यगदं यथा ॥ ४४ ॥
दुर्ज्ञेय वेदतात्पर्य सांगतात –
परोक्षवादः – एका प्रकाराने असलेला अर्थ गुप्त राखण्यसाठी वरवर दुसर्‍या प्रकाराने सांगणारा – अयं वेदः – हा वेद – यथा बालानां अगदं तथा – जसे बालकांना मिठाईची लालूच दाखवून कडू औषध दिले जाते त्याप्रमाणे – अनुशासनं यथा स्यात् तथा – अज्ञांना कर्मफलाचे प्रलोभन दाखवून – कर्ममोक्षाय कर्माणि विधाते ही – कर्मबंधन तुटण्यासाठी वेद कर्मच करवितो. ॥ ४४ ॥ [ मुख्य आशय गुप्त ठेवण्यासाठी वरून वरून दुसरा आशय व्यक्त केला जातो याला परोक्षवाद म्हणतात. याविषयी श्रुतीमध्यें अनेक उदाहरणे आहेत. वेद मुख्य अर्थ गुप्त ठेवून दुसराच अर्थ प्रकट करतो म्हणून त्याला परोक्षवाद म्हटलें आहे. कर्मातून मुक्त होण्यासाठी तो कर्माचे विधान करतो, हेंच त्याचें परोक्षवादत्व आहे. पण वेद स्वर्गादिकांसाठी कर्माचे विधान करतो. कर्ममोक्षासाठी त्यांचें विधान करीत नाही, म्हणून म्हणशील तर सांगतो. अज्ञांना कर्म करण्याची आवड ज्याप्रकारे होईल त्याप्रकारें तो बोध करतो. याविषयीं औषधाचा दृष्टांत दिला आहे. पिता बालकाला औषध पाजविण्यासाठी, खडीसाखर, लाडू इत्यादिकांची लालुच दाखवतो, खाऊच्या लोभानें तो बालकही कडू औषध पितो व त्याला खाऊही मिळतो. पण तेवढ्यावरून खडीसाखर मिळणे हें औषधप्राशनाचें फल नव्हे, तर आरोग्य हें त्याचें फल आहे, त्याच न्यायाने वेदही स्वर्गादि अवांतर फलांनी अज्ञाच्या मनांत कर्मानुष्ठानाची आवड उत्पन्न करून कर्मबंधनांतून मुक्त होण्यासाठीच कर्माचे विधान करतो. ४४.

जेवीं रोगु जावया निश्चित । बापु बाळा भेषज देत ।
तेथें साखर घाली हातांत । तत्सेवनार्थ प्रलोभें ॥ ७७३ ॥
मुलाला कांहीं रोग झाला असता,तो जाण्यासाठी त्याचा पिता जसा त्याला औषध देतो व तें औषध घेण्यासाठी लालूच दाखवून त्याच्या हातावर साखरेचा खडा ठेवतो, ७३

तेवीं वेदांचा परोक्षवाद । सत्य मानिती बुद्धिमंद ।
कर्में छेदवी कर्मबाध । हा वेदानुवाद मुख्यत्वें ॥ ७७४ ॥
त्याचप्रमाणे अज्ञ लोक वेदाचा परोक्षवाद सत्य मानतात. पण कर्मानुष्ठानानेंच कर्मबंधनाचा छेद करविणें हा वेदानुवादाचा मुख्य आशय आहे. ७४

वेदु बोले स्वर्गादि फळ । तो प्रवृत्तिलोभ केवळ ।
परी कर्में छेदी कर्ममूळ । हें मुख्यत्वें फळ वेदोक्तीं ॥ ७७५ ॥
वेदाने स्वर्गादि जें फल सांगितलें आहे, ती केवळ कर्मप्रवृत्तीसाठीं लालूच आहे; परंतु कर्मानें कर्मीचे मूळच तोडून टाकणे हेंच मुख्य फल वेदाने सांगितलें आहे. ७५

लोहाची बेडी पडली पायीं । ते तोडावया घणु आणिला पाहीं ।
तो घणुचि विकून खादला जिहीं । त्यांचें बंधन कहीं तुटेना ॥ ७७६ ॥
लोखंडाची बेडी पायात पडली असतां ती तोडण्यासाठी घण आणला, पण ज्यांनीं तो घणच विकून खाऊन टाकला, त्यांचें बंधन कधींच तुटत नाहीं. ७६

तेवीं कर्में छेदावें कर्मबंधन । तें कर्म वेंचिती विषयीं पूर्ण ।
त्यांचें कदा न तुटे भवबंधन । जन्ममरण सरेना ॥ ७७७ ॥
त्याच न्यायाने वस्तुतः कर्मानीं कर्माचे बंधन तोडावे पण जे तें कर्मच विषयामध्ये खर्चितात त्यांचें भवबंधन कधीं तुटत नाहीं व जन्म-मरण सरत नाहीं. ७७

आम्ही स्वर्गफळा विरक्त । म्हणोनि नाचरे जो वेदोक्त ।
त्याचें ज्ञान जालें विपरित । अति अनर्थ पावे तो ॥ ७७८ ॥
आम्ही स्वर्गफलांविषयीं विरक्त आहो, असें म्हणून जो वेदोक्त कर्म आचरीत नाहीं, त्याला विपरीत ज्ञान झालें आहे. तो मोठ्या अनर्थाला प्रति होतो. ७७८.

नाचरेद्यस्तु वेदोक्तं स्वयमज्ञोऽजितेन्द्रियः ।
विकर्मणा ह्यधर्मेण मृत्योर्मृत्युमुपैति सः ॥ ४५ ॥
अहोपण, कर्ममोक्ष हा जर पुरुषार्थ असेल तर अगोदरच कर्माचा त्याग करावा, असें कोणी म्हणेल म्हणून आविहोत्र म्हणतो –
तु यः अजितेंद्रियः अज्ञः – पण जो अजितेंद्रिय अज्ञ, स्वयं वेदोक्त – स्वतः वेदोक्त कर्म, न आचरेत् – न करील तर, सः विकर्मणा अधर्मेण – तो अनाचारलक्षण अधर्माने, मृत्योः मृत्युं उपैति – मृत्पूनंतर पुनः मृत्यूला प्राप्त होतो. [ अजितेंद्रियत्वामुळें अज्ञ असलेला जो मनुष्य वेदोक्त कर्मांचे आचरण करीत नाहीं, तो कर्माचे अनुष्ठान न करणें या स्वरूपाच्या अधर्माने मृत्युपरंपरेंत पडतो. याविषयी ‘स्वकर्मांनी पीडिले जाणारे जन पुनः पुन, मृत्युवश होतात’ अशा अर्थाची श्रुति आहे. ] ४५

आम्ही जितेंद्रिय म्हणवीत । म्हणोनि नाचरे जो वेदेक्त ।
त्यासी नातुडे गा परमार्थ । अति‍अनर्थ अंगीं वाजे ॥ ७७९ ॥
आम्ही जितेंद्रिय आहो, असें मानून जो वेदोक्त कर्म आचरीत नाहीं, त्याला परमार्थाचा लाभ होत नाहीं. उलट त्याच्यावर मोठा अनर्थ कोसळतो. ७९

जरी शास्त्रज्ञ ज्ञाता झाला । आणि वेदोक्ता विमुख ठेला ।
तरी तो जाणपणेंचि नागवला । जाण बुडाला दुःखार्णवीं ॥ ७८० ॥
एखादा जरी मोठा शास्त्रज्ञ ज्ञाता झाला व वेदोक्तकर्मांपासून विमुख होऊन राहिला तरी तो आपल्या ज्ञानाच्या घमेंडीनेच नागविला गेला असून दुःखसागरांत बुडाला असें तूं समज. ७८०

नाचरे जो वेदोक्त कर्म । त्यक्तकर्में मानी मिष्कर्म ।
त्यासी थोर पडला भ्रम । नाडला परम अभिमानें ॥ ७८१ ॥
जो वेदोक्त कर्म करीत नाहीं व तसल्या कर्मत्यागानेंच आपल्याला निष्कर्मा मानतो, त्याला फार मोठा भ्रम झाला आहे व अभिमानाने त्याला नाडले आहे, असें तूं समज. ८१

जरी विषयो निग्रहिला । आणि वेदोक्ता जो दुरावला ।
तो निजघाता प्रवर्तला । स्वयें बुडाला नरकार्णवीं ॥ ७८२ ॥
एखाद्याने विषयांचा जरी निग्रह केला आणि तो वेदोक्तकर्मापासून दूर राहिला तर तो आपला घात करावयास प्रवृत्त झाला आहे व नरकसागरांत बुडाला आहे, असें तूं समज. ८२

वेद निजमूळ परमार्था । तें वेदोक्त नाचरतां ।
जें जें करणें नृपनाथा । तें तें तत्त्वतां अधःपाती ॥ ७८३ ॥
वेद परमार्थाचे मूळ आहे. यास्तव वेदोक्त कर्म न करतां दुसरें जें जें करणें तें तें सर्व अधःपाताचे साधन आहे, असें तूं समज. ८३

डोळे देखणें तत्त्वतां । ते काढोनि पाहों जातां ।
न देखे आपुली डोळसता । मा इतर पदार्था कोण देखे ॥ ७८४ ॥
पहाणे हें डोळ्याचे कार्य आहे. पण तो डोळाच काढून जर पाहूं लागलें तर डोळसताही गेली व इतर पदार्थांचें पहाणेंही गेलें; ८४

तैसा नाचरोनि चेदार्थु । जो जो मानिला परमार्थु ।
तेणें आंवतूनियां अनर्थु । जाण निश्चितु आणिला घरा ॥ ७८५ ॥
त्याच न्यायाने वेदार्थाचे आचरण न करतां परमार्थ साधू लागणे, हें अनर्थाला निमंत्रण देऊन आपल्या घरीं आणण्यासारखे आहे. ८५

तेणें आचार अनर्थपाटें । वाहावले जन्ममरणवाटे ।
तेथ नानायोगिनिगर्भसंकटें । सोसितां न सुटे कल्पांतीं ॥ ७८६ ॥
अशा आचरणाने त्यानें अनर्थांना जन्म-मरणांच्या मार्गांनीं वेगाने वहावयास लाविलें आहे, असें तूं निश्चयानें जाण. त्या मार्गांत अनेक योनीतील गर्भवासांतील संकटे सोशीत असतांना कल्पांतीही त्याचा मोक्ष होत नाहीं. ८६

तेथें जन्मजन्मों जन्म न टके । मरमरों मरण न चुके ।
जैं वेदविहित चुके । तैं अतिदुःखें दुःखभोगु ॥ ७८७ ॥
वेदविहितकर्माला जेव्हां हा चुकतो, तेव्हां अतिशय दुःख भोगतो. लक्षावधी जन्म घेऊनही त्याचे जन्म संपत नाहींत व तितकेच वेळां पुनःपुनः मरूनही त्याचें मरण चुकत नाहीं. ८७

विकर्मणा ह्यधर्मेण । हें मूळींचें पदनिरूपण ।
तेणें विकर्मामाजीं अधर्म पूर्ण । परी अकर्म तें जाण अधर्म नव्हे ॥ ७८८ ॥
‘विकर्मणा ह्यधर्मेण’ या मूळ श्लोकातील पदाचे निरूपण असें- विकर्मामध्ये अधर्म पूर्णपणे वास करतो, पण अकर्म हा अधर्म नव्हे. ८८

ज्यासी लावितां न लागे कर्म । या नांव मुख्य निष्कर्म ।
निष्कर्मलक्षण हाचि धर्म । येणेंचि परम मुक्त साधु ॥ ७८९ ॥
ज्याला कर्म लावीत असतांनाही लागत नाहीं तेंच मुख्य निष्कर्म होय. हाच मुख्य निवृकर्मलक्षणधर्म आहे. यानेच साधु परम मुक्त होतात. ८९

ज्यासी शुद्ध आकळे अकर्म । तो तत्काळ होय निष्कर्म ।
अकर्माचें कळल्या वर्म । मुक्तता परम पायां लागे ॥ ७९० ॥
ज्याला शुद्ध अकर्म अवगत होतें, तो तत्काल कर्मशून्य होतो. अकर्माचें धर्म कळले असतां मुक्ति त्याची दासी होते. ७९०.

वेदोक्तमेव कुर्वाणो निःसङ्गोऽर्पितमीश्वरे ।
नैष्कर्म्यां लभते सिद्धिं रोचनार्था फलश्रुतिः ॥ ४६ ॥
–म्हणून–
अजितेंद्रियः – इंद्रिये स्वाधीन नसलेला – तु यः स्वयं अज्ञा सन् – पण जो स्वतः अज्ञानी असूनही – वेदोक्तं न आचरेत् – जर वेदांनी सांगितल्याप्रमाणे आचरण करणार नाही – सः विकर्मणा अधर्मेण – मग तो अधर्माने वागणारा अर्थात् विहित कर्मे न करणारा असा, – मृत्युः मृत्युं उपैति ही – मृत्युमागून मृत्यूलाच प्राप्त होतो. ॥ ४५ ॥ [ वेदोक्तच कर्म करणारा व निषिद्ध कर्म न करणारा नैष्कर्म्यरूप सिद्धीला प्राप्त होतो. अहोपण, कर्म करूं लागलें असतां त्याविषयीं मी कर्ता अशी आसक्ति व फल ही दोन्हीं होतील, नैष्कर्म्यरूपसिद्धि होणार नाही, असें कोणी म्हणेल म्हणून मुनि सांगतो. ‘मी कर्ता’ असा अभिनिवेश न ठेवतां जो पुरुष सर्व कर्मे ईश्वरार्पण करतो, फळाच्या उद्देशाने तीं करीत नाही त्याला नैष्कर्म्यसिद्धि प्राप्त होते. अहोपण, फल श्रुत असल्यामुळें कर्म केलें असतां तें फल अवश्य प्राप्त होणारच. वेदानें कर्माचे जें फल सांगितलें आहे तें फल औषधप्राशनाच्या दृष्टांताप्रमाणे कर्माविषयीं रुचि उत्पन्न करण्यासाठी आहे. वेदोक्त फलश्रवणानें कर्मानुष्ठानाची आवड उत्पन्न झाली असतां पुरुष वेदार्थाचा विचार करूं लागतो. त्यांतील ‘जो हे गार्गि, या अक्षर ब्रह्माला न जाणता या लोकांतून मरून जातो, तो कृपण होय’ अशी अनात्मज्ञाचीच कृपणता व ‘ब्राह्मण या आत्म्याला वेदानुवचन ब्रह्मचर्य, तप, श्रद्धा, यश, इत्यादि उपायाने जाणण्याची इच्छा करतात’ इत्यादि वचनांवरून यज्ञादिकांची ज्ञानांगता निश्चित करून निष्काम कर्मामध्येच प्रवृत्त होतो. त्यानंतर ‘ज्याला स्वर्गाची इच्छा असते तो याग करतो’ इत्यादि वचनांवरून इच्छित स्वर्गादिकालाच फलत्व आहे, असा बोध होतो. पण स्वर्गादिकांची इच्छा न केल्यास तो प्राप्त होत नाही, असा नियम असल्यामुळें निष्कामकर्मानुष्ठनानें चित्तशुद्धि, ज्ञानप्राप्ति इत्यादि क्रमानें नैष्कर्म्यसिद्धि होतें. ] ४६.

दासी स्वामीची आज्ञाधारी । कां राजमुद्रा प्रजांवरी ।
तैसी वेदाज्ञा जो शिरीं धरी । स्वधर्माचारी निष्काम ॥ ७९१ ॥
एखादी दासी आपल्या स्वामीची आज्ञा जशी शिरसा मान्य करते, किंवा प्रजा राजाच्या मुद्रेला प्रमाण मानते, त्याप्रमाणें जो वेदाज्ञेला शिरसा मान्य करून निष्काम स्वधर्माचरण करतो, ९१

मी एकु कर्मकर्ता । ऐशी उठों नेदी अहंता ।
तें कर्मचि स्वभावतां । अर्पीं श्री‍अनंता ईश्वरातें ॥ ७९२ ॥
‘मी कर्मकर्ता आहें’ अशी अहंता उत्पन्न होऊं देत नाहीं व तें कर्म स्वभावतःच ईश्वरार्पण करतो, ९२

एवं ईश्वरीं जें अर्पे कर्म । तें कर्म होय निर्धर्म ।
याचि नांव परम । नैष्कर्म्य निजसिद्धी ॥ ७९३ ॥
त्याचें तें ईश्वरार्पण केलेले कर्मच निर्धर्म होतें. हीच नैष्कर्म्यनिजसिद्धि आहे. ९३

वेदें बोलिले कर्मफळ । ज्याची वासना निष्काम निर्मळ ।
त्यासि वेदोक्त फळ प्रबळ । भोगावया केवळ स्वप्नीं न दिसे ॥ ७९४ ॥
वेदाने जें कर्मफल सांगितलें आहे, त्याची वासना सोडून जो शुद्ध निष्काम कर्म करतो, त्याला वेदोक्त प्रबल फलही स्वप्नांतसुद्धां भोगावे लागत नाहीं ९४

ऐसें असतां कर्मफळ । वांछितां नाडिजे केवळ ।
जेवीं परिसु दे‍ऊनि सोज्ज्वळ । म्गिजे पोफळ तांबूलासी ॥ ७९५ ॥
पण असें असतांही जे कर्मफलाची इच्छा करतात ते केवळ नागविले जातात. आपल्या हातातील सुंदर परीस देऊन त्याबद्दल विडा खाण्यासाठी सुपारी मागण्यासारखेच हें आहे. ९५

कर्मा निष्कामता नित्य फळ । तेथ फळाशा नाडले सकळ ।
चंदन सर्वांगीं सफळ । तेथ मागतां फळ नाडिजे स्वयें ॥ ७९६ ॥
कर्मांतील निष्कामता हें नित्यफल आहे. पण फलाशेनें तें दुर्लभ होतें. चंदन सर्वांगी सफल आहे म्ह० तो सुगंधाने ओतप्रोत भरलेला आहे. पण असें असतांही त्याच्याजवळ जाऊन त्याच्यापाशीं गंधरहित फल मागणे म्हणजे स्वतःचीच फसवणूक करणें आहे. ९६

हातिं आंतुडावया मासा । गळीं लाविजे अल्प आमिषा ।
तेवीं निष्काम करावया मानसा । वेदु फळाशा प्रलोभी ॥ ७९७ ॥
मासा हातीं लागावा म्हणून गत्याला जसे थोडेसे मांस लावतात, त्याप्रमाणें वेद मनाला निष्काम करण्यासाठीं फलाशेचा लोभ दाखवतो. ९७

आमिष घालूनि मासे पाळी । किं तद्योगें जळाबाहेर गाळी ।
तेवीं कर्म कर्मातें निर्दाळी । हें नेणिजे मुळीं फळकामी ॥ ७९८ ॥
गळाला मांस लावून कोळी मोठा थोरला मासा जळातून जसा बाहेर काढतो, त्याप्रमाणें कर्म कर्माचा नाश करते, पण हें सकाम पुरुष जाणत नाहीं. ९८

हो कां फळाचिये चाडे । स्वधर्मकर्मीं प्रवृत्ति घडे ।
तेणें नैष्कर्म्यसिद्धि आंतुडे । हें वेदाचे फुडें निजगुह्य ॥ ७९९ ॥
अगोदर पुरुषाची फलाच्या इच्छेनेच कां होईना पण स्वधर्मरूप कर्मांमध्ये प्रवृत्ति होऊं दे. पुढें त्या स्वधर्म कर्मानेंच क्रमानेच नैष्कर्म्यसिद्धि होईल, हा वेदाचा गूढ आशय आहे. ९९

कर ब्रह्मत्वें सदा सफळ । फळ वांच्छी त्यातें निष्फळ ।
हें जाणोनि कर्मकुशळ । फळाशा समूळ छेदिती ॥ ८०० ॥
कर्म ब्रह्मत्वानें सदा सफल आहे. पण जे फलाची इच्छा धरतात, त्यांना तें निष्फल होतें, हें जाणून कर्मकुशल पुरुष फलाशेचा समूळ उच्छेद करतात. ८००

ऐसें आचरतां वैदिक कर्म । तेणें कर्में पाविजे नैष्कर्म्य ।
याहोनियां अति सुगम । सांगेन वर्म तें ऐक ॥ ८०१ ॥
याप्रमाणे वैदिककर्म आचरीत असतांना त्या कर्मानेंच नैष्कर्म्यप्राति होते. हे राजा, आतां याहीपेक्षा मी तुला अति सुगम उपाय सांगतो, तो ऐक. ८०१.

य आशु हृदयग्रन्थिं निर्जिहीर्षुः परमात्मनः ।
विधिनोपचरेद्देवं तन्त्रोक्तेन च केशवम् ॥ ४७ ॥
याप्रमाणें वैदिक कर्मयोग सांगून तांत्रिक कर्मयोग सांगतात –
यः परमात्मनः – जो परब्रह्मर्तूपी आपल्या जीवात्म्याचा – हृदयग्रंथिं – अहंकाररूप बंध – आशु निर्जिहीर्षुः – त्वरित तोडू इच्छिणार्‍या पुरुषाने – वैदिकेन तंत्रोक्तेन च विधिना – वैदिक आणि तांत्रिक विधीने – केशवं देवं उपचरेत् – केशव भगवंताची पूजा करावी. ॥ ४७ ॥ [ जीवात्मा हा वस्तुतः परमात्माच आहे, यास्तव त्याच्या हृदयग्रंथीचा म्ह० अहंकारबंधनाचा सत्वर उच्छेद करण्याची ज्याला इच्छा असेल त्यानें तंत्रोक्त विधीनेंही भगवानाची परिचर्या करावी. ] ४७

जेणें वासनेचें जाळ तुटे । अहंकाराची गांठी सुटे ।
जीवीं परमात्मा स्वयें प्रगटे । तें तांत्रिक गोमटें ऐक राया ॥ ८०२ ॥
ज्याच्या योगाने वासनेचे जाळे तुटते, अहंकाराची गांठ सुटते व जीवामध्ये परमात्मा स्वतः प्रकट होतो, तें उत्तम तांत्रिक विधान तूं आतां ऐक. २

जया तांत्रिक महापूजा । संतोष होय गरुडध्वजा ।
तें तांत्रिक विधान वोजा । महाराजा अवधारीं ॥ ८०३ ॥
ज्या तांत्रिक महापूजेनें गरुडध्वजाला संतोष होतो, तें तांत्रिक विधान तूं आतां लक्ष देऊन ऐक. ३

वैदिक मंत्र तांत्रिक तंत्र । हे मिश्रपूजा अतिपवित्र ।
शीघ्र निष्काम करी नर । तो पूजाप्रकार अति‍उत्तम ॥ ८०४ ॥
वैदिक मंत्र व तांत्रिक तंत्र अशी ही मिश्रपूजा अति पवित्र असून पुरुषाला निष्काम करते. तो पूजाप्रकार उत्तम आहे. ४

वैदिक अथवा तांत्रिक । गुरुमार्गें सिद्धिदायक ।
यालागी गा आवश्यक । सद्‌गुरुसी देख शरण जावें ॥ ८०५ ॥
पण वैदिक किंवा तांत्रिक विधान गुरुमार्गानें सिद्धिदायक होतें, यासाठीं सद्‌गुरूला अवश्य शरण जावे. ८०५.

लब्ध्वानुग्रह आचार्यात्तेन सन्दर्शितागमः ।
महापुरुषमभ्यर्चेन्मूर्त्याभिमतयाऽऽत्मनः ॥ ४८ ॥
तोच तंत्रोक्त विधि पुढील श्लोकांत सांगतात –
आचार्यात् लब्धानुग्रहः – ज्याने आपल्या सद्‌गुरुकडून मंत्र घेतला आहे – तेन च संदर्शितागमः – आणि त्या गुरुने पूजादिप्रकार विधि दाखविला आहे अशा पुरुषाने – आत्मनः अभिमतया मूर्त्या – आपल्याला इष्ट असणार्‍या मूर्तीच्या द्वारे – महापुरुषं अभ्यर्चेत् – परमेश्वराची पूजा करावी. ॥ ४८ ॥ [ आचार्यांचा अनुग्रह संपादन करून, त्यांच्यापासून पूजेचा प्रकार समजून घेऊन स्वतःला इष्ट असलेल्या मूर्तीने भगवानाची पूजा करावी. ] ४८.

प्रवृत्तिनिवृत्तिकृत कार्या । अवश्य पाहिजे आचार्या ।
आपमतीं भजतां राया । अनेक अपायांमाजीं पडे ॥८०६ ॥
प्रवृत्ति किंवा निवृत्ति या कर्तव्याचें ज्ञान करून देण्यास गुरु अवश्य पाहिजे. हे राजा, मार्गदर्शक आचार्यावाचून आपल्याच बुद्धीने कर्म आचरलें असतां तो भक्त निःसंशय अनेक संकटांत पडतो. ६

भोयी पाय सिद्ध आहेती । भोयाळेंवीण वृथा भ्रमती ।
तेवीं गुरूवीण जे जे करिती । ते ते अहंमती दृढ भ्रमले ॥ ८०७ ॥
भूमीवर चालण्यास पाय सिद्धच आहेत. परंतु मार्गदर्शक वाटाड्या नसला तर नवखा मनुष्य जसा व्यर्थ भटकत फिरतो, त्याचप्रमाणे जे जे गुरूवांचून कर्म करतात, ते अहंकारी पुरुष खात्रीने भ्रमांत पडतात. ७

गुरु ब्रह्म दोनी ऐक । ऐशिया भावना आवश्यक ।
सेवा करूनि भावपूर्वक । संतोषवूनि देख अनुग्रहो घ्यावा ॥ ८०८ ॥
‘गुरु व ब्रह्म ही दोन्हीं एकच आहेत’ अशी भावना अवश्य ठेवावी आणि भक्तिपूर्वक गुरूची सेवा करून, त्याला संतोषवून त्याचा अनुग्रह संपादन करावा. ८

तेथ निजाधिकारप्राप्तें । जे मूर्ति आवडेल आपणियातें ।
तेचि मंत्रविद्या तेथें । श्रद्धासंभरितें अंगीकारावी ॥ ८०९ ॥
आपल्या अधिकारानुरूप जी रान आपल्याला आवडत असेल तिच्याच उपासनेची मंत्रविद्या श्रद्धेने स्वीकारावी. ९

तेव्हां गुरुमुखें मिश्र वोजा । पुरुषोत्तममहापूजा ।
शिकोनियां निजकाजा । भजावें अधोक्षजा शिक्षिता मतीं ॥ ८१० ॥
गुरुमुखानें पुरुषोत्तमाची मिश्रमहापूजा शिकून शिक्षितमतीनें आपल्या इष्टकार्यासाठीं भगवानाला भजावे. ८१०

ते चि भजती हातवटी । आगमोक्त निजपुष्टी ।
राया सांगेन गोमटी । सावधानदृष्टीं अवधारीं ॥ ८११ ॥
हे राजा, तीच तंत्रशास्त्रोक्त पूजापद्धति मी तुला सांगतो, ती सावधान चित्ताने ऐक ८११.

शुचिः सम्मुखमासीनः प्राणसंयमनादिभिः ।
पिण्डं विशोध्य सन्न्यास कृतरक्षोऽर्चयेद्धरिम् ॥ ४९ ॥
प्राणसंयमनादिभिः – प्राणायामादि साधनांनी – पिण्डं संशोध्य – शरीर सुद्ध करून – शुचिः संमुखं आसीनः – शुचिर्भूत पूजकाने ईश्वरसंमुख बसावे – संन्यासकृतरक्षः – न्यास करून स्वतःला सुरक्षित करून घ्यावे – हरिं अर्चयेत् – आणि हरिपूजा करावी. ॥ ४९ ॥ .

विध्युक्त करितां संध्यास्नान । तेथचि आहे ब्रह्मज्ञान ।
आचमनीं होय हरिरूप आपण । हें नेणोनि अज्ञान आगमीं भरती ॥ ८१२ ॥
सशास्त्र स्नानसंध्या केली असतां त्यातच ब्रह्मज्ञान आहे. आचमनाने तो स्वतः भगवद्‌रूपच होतो, हें न जाणून लोक अज्ञानांत शिरतात. १२

केशवादि नामीं जाण । अंगप्रत्यंगीं न्यासितां पूर्ण ।
तेव्हां हरिरूप होय आपण । हें नेणोनि अज्ञान आगमीं भारती ॥ ८१३ ॥
केशवादि नामांनी अंगें व प्रत्यगें यांवर न्यास केला असतां आपण स्वतः हरिरूप होतों हें न जाणता लोक व्यर्थ अज्ञानात पडतात. १३

करूनि आगमोक्त संध्यास्नान । मूर्तीपासीं ये‍ऊन जाण ।
संमुख घालावें आसन । चैलाजिनकुशयुक्त ॥ ८१४ ॥
आगमोक्त स्नानसंध्या करावी, मूर्तिजवळ येऊन तिच्यापुढे चैल-अजिन-कुश यांनी युक्त आसन घालावे १४

रेचक-पूरक-कुंभकें जाण । प्रणायामें प्राणसंयमन ।
भूतशुद्ध्यादिकीं जाण । शरीरशोधन करावें ॥ ८१५ ॥
रेचक, पूरक व कुंभक करून प्राणायामाच्या द्वारा प्राणसंयमन करावे.’अपक्रामंतु०’ इत्यादि मंत्रानी भूतशुद्ध्यादिकाच्या योगाने शरीरशोधन करावे १५

भूतविलय भूतशुद्धी । प्राणप्रतिष्ठा पिंडादिशुद्धी ।
मूळमंत्रें न्यास प्रबुद्धीं । गुरुदीक्षाविधी विध्युक्त कीजे ॥ ८१६ ॥
भूतविलय, भूतशुद्धि, प्राणप्रतिष्ठा, पिण्डादिशुद्धि, मूळमंत्रांनीं अंगावर देवतांचा न्यास इत्यादि सर्व यथाशास्त्र गुरूने सांगितलेल्या पद्धतीने करावे. १६

हृदय कवच शिखा शिर । नेत्रे अस्त्रादि फट्‍कार ।
एवंविधान अनुकार । आगमोक्तप्रकार करावे न्यास ॥ ८१७ ॥
हृदय, कवच, शिखा, शिर, नेत्र अस्त्रादि फटकार, इत्यादि सर्व न्यास आगमोक्त प्रकाराने यथाविधि करावे. १७

यापरी मूळमंत्रदीक्षा । करोनि दिग्बंधादि संरक्षा ।
मग मूर्तिपूजनपक्षा । नृपाध्यक्षा अवधारीं ॥ ८१८ ॥
याप्रमाणे मूळ मंत्राची दीक्षा व दिग्बंधादि संरक्षा करून त्यानंतर मूर्तीचे पूजन कसें करावे, तें आतां सांगतो. ऐक. ८१८.

अर्चादौ हृदये चापि यथालब्धोपचारकैः ।
द्रव्यक्षित्यात्मलिङ्गानि निष्पाद्य प्रोक्ष्य चासनम् ॥ ५० ॥
पाद्यादीनुपकल्प्याथ सन्निधाप्य समाहितः ।
हृदादिभिः कृतन्यासो मूलमन्त्रेण चार्चयेत् ॥ ५१ ॥
द्रव्यक्षित्यात्मलिंगानि – पूजाद्रव्ये, भूमि आपण स्वतः व मूर्ति यांना – निष्पाद्य – प्रोक्षणाने शुद्ध करून – आसनं च प्रोक्ष्य – आणि आसन प्रोक्षण करून – अथ सन्निधाप्य – ती जवळ ठेऊन – समाहितः सन् – अंतःकरण स्थिर करून – हृदादिभिः कृतन्यासः – हृदयादिकांचा षडंग न्यास करून – मूल मंत्रेण च – व मूळमंत्रांनी – यथालब्धोपचारकैः – यथालब्ध उपचारांनी – अर्चादौ – मूर्तीचे ठिकाणी – हृदये च अपि – व हृदयाचे ठिकाणीही – अर्चयेत् – पूजा करावी. ॥ ५०-५१ ॥ [ मूर्त्यादिकांमध्यें व हृदयांतही प्राप्त झालेल्या उपचारांनीं हरीची पूजा करावी. पण त्यापूर्वी पुष्पादि द्रव्यें भूमि इत्यादिकांना पूजेला योग्य करून अर्घ्यपाद्यादि पात्रे जवळ घेऊन हृदयामध्यें पूजिलेल्या भगवानाचे श्रीमूर्तीमध्ये ध्यान करून हृदय, शिर, शिखा, कवच, नेत्र, अस्त्र, यांचें ‘हृदयाय नमः’ ‘शिरसे स्वाहा’ इत्यादि मंत्रांनी व मूलमंत्रांनी देवामध्ये न्यास करून मूलमंत्रांनी त्याची पूजा करावी. ] ५०-५ १

प्रयोगछंद संपूर्ण । पूर्वान्वया विपरीत जाण ।
द्रव्यशुद्धि क्षितिमार्जन । हें मागील निरूपण पुढां आलें ॥ ८१९ ॥
मंत्रांचा प्रयोग, त्यांचा छंद, इत्यादिकांचें पूर्णपणे स्मरण करून पूर्व श्कोकाशी याचा संबंध आहे यास्तव द्रव्यशुद्धि, भूमार्जन इत्यादि मागील निरूपणच येथें आलें आहे. १९

द्रव्यशुद्धि मुख्यशोधन । भूमिशुद्धि संमार्जन ।
आत्मशुद्धि सावधान । काढिल्या अनुलेपन मूर्तिशुद्धी ॥ ८२० ॥
द्रव्यशुद्धि म्ह० मुखशोधन, भूमिशुद्धि म्ह. संमार्जन, आत्मशुद्धि म्ह० मनाचे सावधानपण व मूर्तिशुद्धि म्ह ० मूर्तीवरील गंधादिकांचे अनुलेपन वगैरे काढणें, ८२०

पूजासंभार सिद्ध करून । समस्त शंखतोयें प्रोक्षून ।
निजासनीं सावधान । एकाग्र जाण बैसावें ॥ ८२१ ॥
पुष्पादि पूजासंभार सिद्ध करून, शंखांतील जलाने त्या सर्वांचे प्रोक्षण करून, आपल्या आसनावर सावधान व एकाग्र मनाने बसावे. २१

ज्यासी ध्यानीं मूर्ति न ये संपूर्ण । तेणें प्रतिमामूर्ति अधिष्ठान ।
तेथेंचि करावें पूजन । लब्धोपचारें जाण आगमोक्त ॥ ८२२ ॥
ज्याच्या ध्यानामध्यें श्रुति पूर्णपणे येत नाहीं, त्यानें प्रतिमामूर्तीचें अधिष्ठान करून तेथेंच प्राप्त उपचारानी आगमोक्त विधीने पूजन करावे २२

ज्यासी ध्याना मूर्ति ये अतिसंकटीं । तेणें बाह्योपचारआटाटी ।
सांडूनियां ध्यानदृष्टीं । करावी गोमटी मानसपूजा ॥ ८२३ ॥
पण ज्याच्या ध्यानामध्यें मूर्ति पूर्णपणे स्थित होत असेल त्यानें बाह्य उपचारांची खटपट टाकून ध्यानदृष्टीनें सुंदर मानसपूजा करावी. २३

ज्याचे हृदयींचें न विकरे ध्यान । बाह्यमूर्तिपूजेसी सावधान ।
तेणें उभयतां पूजन । करावें संपूर्ण आगमोक्त ॥ ८२४ ॥
ज्याच्या हृदयातील ध्यान सुटत नाहीं व जो बाह्यमूर्तिपूजेमध्येही सावधान असतो, त्यानें आगमोत्त प्रकाराने दोन्हीं ठिकाणी पूजन करावे २४

सकळ पूजासंभार । निकट ठेवूनि उपचार ।
मग मूर्तीसी न्यासप्रकार । उक्तशास्त्र करावा ॥ ८२५ ॥
पूजेचे सर्व साहित्य आपल्याजवळ ठेवून घ्यावे मग शास्त्रोक्तप्रकारें मूर्तींच्या ठिकाणी न्यास करावा. २५

जैसेचि न्यास आपणास । तैसेचि करावे मूर्तीस ।
हा आगमोक्त गुरुसौरस । मूळमंत्रें न्यास मूर्तीसी ॥ ८२६ ॥
आपण आपल्या अंगावर जसा न्यास करतो, तसाच तो मूर्तीच्या ठिकाणी मूळमंत्रांनी करावा २६

आगमोक्त करितां न्यास । अंगप्रत्यंगीं विन्यास ।
तेणें कर्ता होय हृषीकेश । हा अर्थसौरस दृढ करावा ॥ ८२७ ॥
व तो गुरुमुखाने आगमद्वारां समजून घ्यावा. असा अंगन्यास केला असतां हा उपासकच साक्षात् हृषीकेष होतो, ही भावना दृढ करावी. २७

दृढ करोनि अनुसंधान । मूळमंत्रें मूर्तिपूजन ।
हृदयीं आणि प्रतिमेसी जाण । पूजाविधान दोहीं ठायीं ॥ ८२८ ॥
चित्ताचे अनुसंधान दृढ ठेवून हृदयामध्यें व प्रतिमेमध्यें अशा दोन्ही ठिकाणी मूळमंत्राने मूर्तीची यथाविधि पूजा करावी ८२८

साङ्गोपाङ्गां सपार्षदां तां तां मूर्तिं स्वमन्त्रतः ।
पाद्यार्घ्याचमनीयाद्यैः स्नानवासोविभूषणैः ॥ ५२ ॥
गन्धमाल्याक्षतस्रग्भिर्धूपदीपोपहारकैः ।
साङ्गं संपूज्य विधिवत् स्तवैः स्तुत्वा नमेद्धरिम् ॥ ५३ ॥
सांगोपांगां – हृदयादिक अंगे व सुदर्शनादिक उपांगे यांसह – सपार्षदां च – व नंदादि पार्षदांसह – तां तां मूर्तिं – त्या त्या रामकृष्णादि मूर्तींची – स्वमंत्रतः – मूलमंत्राने – पाद्यार्ध्याचमनीयाद्यैः – पाद्य, अर्घ्य, आचमनीय, इत्यादि – स्नानवासोविभूषणैः – अभिषेक, वस्त्रे, अलंकार – गंधमाल्यक्षतस्त्रग्भिः – गंध, फुले, अक्षता, माळा – धूपदीपोपहारकैः – धूप, दीप, नैवेद्य इत्यादि उपचारांनी – सांगं विधिवत् संपूज्य – यथासांग यथाविधि पूजा करून – स्तवैः स्तुत्वा च – व स्तोत्रपाठांनी स्तुति करून – हरिं नमेत् – श्रीहरिमूर्तीला नमस्कार करावा. ॥ ५२-५३ ॥ [ अक्षतांनी विष्णूची व केतकीपुष्पानीं महेश्वराची पूजा करूं नये, असा निषेध असल्यामुळें येथील अक्षता हें पूजासाहित्य न समजता तिलकालंकारांतील अक्षता समजाव्या. ] ५२-५३.

करचरणादि अव्यंग । मूर्ति चिंतावी सुन्दर साङ्ग ।
श्याम मनोहर श्रीरंग । उल्हास चांग निजध्यानीं ॥ ८२९ ॥
हात, पाय इत्यादि सर्व अवयवांनींयुक्त अशा श्यामसुंदर, मनोहर श्रीरंगाच्या सुंदर मूर्तीचे चिंतन करावे आपल्या ध्यानामध्यें चांगला उल्हास धरावा. २९

मूर्ति चतुर्भुज वेल्हाळ । शंख चक्र गदा कमळ ।
सुनंदादि पार्षदमेळ । चिंतावे सकळ आयुधादिक ॥ ८३० ॥
चतुर्मुज सुंदर मूर्ति कल्पावी. तिच्या हातांत शंख, चक्र, गदा व कमल ही चिन्हे असावीत. सुनंदादि पार्षदाचा समूह व आयुधादि देवता यांची कल्पना करून अशा मूर्तीचे चिंतन करावे, ८३०

यथोक्त मधुपर्कविधान । अर्घ्यपाद्यादि आचमन ।
पुरुषसूक्तमंत्रें जाण । करावें स्नान निर्मळ जळें ॥ ८३१ ॥
आसन, अर्घ्य, पाय, आचमन, मधुपर्क इत्यादि उपचार पुरुषसूक्तमंत्रांनी समर्पण करावे. निर्मलजलानें स्नान घालावे, ३१

मुकुट कुंडलें कटी मेखला । कांसे मिरवे सोनसळा ।
आपाद रुळे वनमाळा । कौस्तुभ तेजाळा कंठीं झळके ॥ ८३२ ॥
मुकुट, कुडले, कंबरेत मेखला, नेसावयास पिवळा पीतांबर, गळ्यांत पायापर्यंत लोंबणारी वनमाला, गळ्यांत अतिशय तेजस्वी कौस्तुभ, ३२

पाद पद्मांकित सुकुमार । ऊर्धरेखा ध्वज वज्र ।
वांकी अंदुवांचा गजर । चरणीं तोडर गर्जतु ॥ ८३३ ॥
सुकुमार पायांवर ऊर्ध्वरेखांकित ध्वज व वन्न ही चिन्हे, पायांत साखळ्या व छमछम वाजणाऱ्या तोरड्या आहेत, अशी कल्पना करावी-३३

निढळीं शुद्ध श्यामकळा । टिळकु रेखिला पिंवळा ।
त्यावरी अक्षता सोज्ज्वळा । आरक्त तेजाळा कुंकुमाक्त ॥ ८३४ ॥
कपाळावर केशरी तिलक, त्यावर अक्षता, तेजस्वी रक्तवर्ण कुंकुमाचा लेप, ३४

सुमनें गुंफिली वीरगुंठी । त्यांवरी मधुकरांची घरटी ।
तुळसीकमळमाळा कंठीं । चंदनाची उटी श्यामंगीं शोभे ॥ ८३५ ॥
केसांत फुलाची जाळी, त्यावर भ्रमरांचा थवा, गळ्यात तुळसीच्या व कमलांच्या माळा आणि श्यामसुंदर अंगावर चंदनाची उटी शोभत आहे, अशी कल्पना करावी. ३५

धूप दीपं उपहार । तांबूल अर्पावा सकर्पूर ।
निरंजनें जयजयकार । मंत्रावसर अर्पावा ॥ ८३६ ॥
धूप, दीप, नैवेद्य व कर्पूरयुक्त तांबूल अर्पण करावा. मंत्रस्वरानें निरंजन भगवानाचा जयजयकार करावा. ३६

स्तुति करावी वेदोक्त मंत्रें । कां पुराणोक्त नाना स्तोत्रें ।
अथवा प्राकृत नामोच्चारें । नाना प्रकारें गद्यपद्यें ॥ ८३७ ॥
वेदोक्तमंत्रांनीं किंवा पुराणोक्त विविध स्तोत्रांनी स्तुति करावी. किंवा प्राकृत नामोच्चार करून अनेक प्रकारची गद्ये व पद्यें म्हणावी. ३७

स्तवनें संतोष अधोक्षजा । ऐसें भावावें महाराजा ।
मग साष्टांगें अतिवोजा । गरुडध्वजा नमस्कारावें ॥ ८३८ ॥
या आपल्या स्तवनांनीं भगवानाला संतोष होतो, अशी भावना करावी. नंतर अति आदराने भगवानाला साष्टांग नमस्कार घालावा. ८३८.

आत्मानं तन्मयं ध्यायन् मूर्तिं संपूजयेद्धरेः ।
शेषामाधाय शिरसा स्वधाम्न्युद्वास्य सत्कृतम् ॥ ५४ ॥
आत्मानं तन्मयं ध्यायन् – आपण स्वतः हरिस्वरूप आहोत असे ध्यान करीत – हरेः मूर्तिं संपूजयेत् – हरीच्या मूर्तीची पूजा करावी – शिरसा शेषां आधाय – मस्तकावर निर्माल्य धारण करून – सत्कृतम् – पूजिलेल्या – स्वधाम्नि उद्वास्य – क्रमाने हृदयामध्ये व करंड्यामध्ये स्थापना करावी. ॥ ५४ ॥

द्वैतभावें भजनविधि । ते जाणावी स्थूल बुद्धि ।
भजनाची भजनसिद्धी । जाण त्रिशुद्धी तन्मय होणें ॥ ८३९ ॥
द्वैतभावानें भजन करणें ही स्थूलबुद्धि आहे. भजनसमयीं तन्मय होणें, हीच खरोखर भजनाची सिद्धि आहे. ३९

मूर्तिध्यानें तन्मय स्थिति । ऐक्यत्वें राहे निश्चळ वृत्ति ।
याचि नांव मुख्य भक्ति । उठलिया पुढतीं नमावें हरी ॥ ८४० ॥
मूर्तीचे ध्यान करतां करतां तन्मय स्थिति झाली असतां वृत्ति एकत्वाने निश्चल रहाते. यालाच मुख्य भक्ति म्हणतात. ही ऐक्यभक्ति सोडून उठले असतां हरीला नमस्कार करावा. ८४०

ऐशी पूजा करूनि हरी । शेष प्रसादु धरोनि शिरीं ।
मग देवो आपणियाभीतरीं । हृदयमंदिरीं निजविजे ॥ ८४१ ॥
अशी सांगपूजा करून निर्माल्यादि शेषप्रसाद मस्तकावर धारण करून देवाला हृदयमंदिरांत निजवावें. ४१

एवं पूजेचें उद्वासन । ध्यानमूर्ति हृदयीं शयन ।
प्रतिमा पर्यंकीं निजवून । विधिविधानसमाप्ति ॥ ८४२ ॥
याप्रमाणे पूजेचे विसर्जन करावे. ध्यानाच्या मूर्तीला हृदयात व मूर्तीला पर्यंकावर निजवून पूजाविधीची समासि करावी; ४२

जाहलिया पूजविसर्जन । विसर्जूं नये अनुसंधान ।
अखंड हरीचें स्मरण । सर्वस्वें आपण सर्वदा कीजे ॥ ८४३ ॥
पण याप्रमाणे पूजेचे विसर्जन जरी केलें, तरी हरीचे अनुसंधान सोडू नये, तर त्याचें अखंड, अहर्निश स्मरण करीत रहावे. ४३

या नांव गा आगमविधि । राया जाण त्रिशुद्धि ।
सदा पाळिती सद्‌बुद्धि । परमत्मसिद्धिप्रापक ॥ ८४४ ॥
राजा, हाच तांत्रिकविधि आहे. बुद्धिमान लोक हाच सदा पाळतात व तो परमात्म्याची सिद्धि करून देणारा आहे. ४४

आगमोक्त विधिलक्षण । प्रतिमाचि मुख्य नव्हे जाण ।
ज्यासी जेथ श्रद्धा पूर्ण । तेथ हें विधान सुखें कीजे ॥ ८४५ ॥
परंतु या आगमोक्तविधींत प्रतिमाच मुख्य आहे, असें तूं समजू नकोस; तर ज्याची ज्यावर पूर्ण श्रद्धा असेल, त्यानें तेथेंच हें विधान खुशाल करावे ८४५.

एवमग्न्यर्कतोयादावतिथौ हृदये च यः ।
यजतीश्वरमात्मानमचिरान्मुच्यते हि सः ॥ ५५ ॥
इति श्रीमद्‌भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां
एकादशस्कंधे तृतीयोऽध्यायः ॥ ३ ॥
तांत्रिक कर्मयोगाचा उपसंहार करतात –
एवं अग्नि अर्क तोयादौ – अग्नि, सूर्य, जल इत्यादिकांचे ठिकाणी – अतिथौ – अतिथीचे ठिकाणी – हृदये च – आणि हृदयाचे ठिकाणी – यः ईश्वरं आत्मानं यजति – जो ईश परमात्म्याचे पूजन करतो – सः अचिरात् मुच्यते ही – तो लवकरच खात्रीने मुक्त होतो. ॥ ५५ ॥

हे पूजा नव्हे एकदेशी । बहुत स्थानें ये पूजेसी ।
त्यांत शीघ्रतर जें प्राप्तीसी । तें मी तुजपासीं सांगेन राया ॥ ८४६ ॥
ही पूजा एकदेशी म्ह० केवळ मूर्तीतच होते, असें नाहीं. हिचीं अनेक स्थाने आहेत. त्यांतील हरीची प्राप्ति सत्वर करून देणारे स्थान मी तुला सांगतो. ४६

येणेंचि विधानें यथाकाळीं । साङ्ग पूजा कीजे जळीं ।
अथवा सूर्यमंडळीं । पूजा सोज्ज्वळीं हरिध्यानें कीजे ॥ ८४७ ॥
याच विधीनें प्रसंगीं जनांत सांगपूजा करावी. किंवा सोज्ज्वल सूर्यमंडळांत हरीच्या ध्यानाने पूजा करावी. ४७

अग्नीच्या ठायीं होय दीप्ति । पूजा कीजे कमळापति ।
अवघ्यापरीस शीघ्रप्राप्ति । पूजावा अथिथि भगवद्‌भावें ॥ ८४८ ॥
अग्नीमध्यें दीप्ति असते. तिच्यामध्यें कमलापतीची पूजा करावी. या सर्वांपेक्षा भगवंताची प्राप्ति सत्वर करून देणाऱ्या अतिथीची भगवद्‌भावनेनें पूजा करावी. ४८

आलिया वैश्वदेवाचे अंतीं । तो भलता हो भलते याती ।
त्यासी जे भगवद्‌भावें पूजिती । त्यांचे घरा पूर्ण प्राप्ति वोरसोनि ये ॥ ८४९ ॥
वैश्वदेवाच्या शेवटीं कोणीही व कोणत्याही जातीचा अतिथि जरी आला तरी त्याची पूजा भगवद्‌भावानें जे करतात, त्यांच्या घरीं पूर्णप्राप्ति धावून येते. ४९

पूर्वीं अनोळखु निश्चितीं । आलिया वैश्वदेवाचें अंतीं ।
त्यातें ब्रह्मभावें जे पूजिती । त्यांसी भुक्तिमुक्ति आंदणी ॥ ८५० ॥
पूर्वी ज्याची कधीं ओळख नाहीं, असा एखादा अतिथि वैश्वदेवाच्या शेवटीं आल्यास त्याची ब्रह्मभावाने जे पूजा करतात, त्यास भुक्ति व मुक्ति वश होतात. ८५०

त्या वैश्वदेवाचे अंतीं जाण । निजभाग्यें आलिया शुद्ध ब्राह्मण ।
तया श्रद्धेनें पूजितां आपण । ते घरीं नारायण स्वानंदें वसे ॥ ८५१ ॥
त्याच वैश्वदेवाच्या शेवटीं मोठ्या भाग्याने एखादा सत्पात्र ब्राह्मण आल्यास त्याची जे मोठ्या श्रद्धेने पूजा करतात त्यांच्या घरीं नारायण सानंदानें रहातो. ५१

राया वैश्वदेवाचें अंतीं । अतिथीसवें ये भुक्तिमुक्ति ।
विमुख जाहल्या त्या लाभा नाडती । पूजकां सुखप्राप्ति परमानंदें ॥ ८५२ ॥
राजा, वैश्वदेवाच्या शेवटीं अतिथीबरोबर भुक्ति व मुक्ति येतात. यास्तव अतिथि विमुख झाल्यास गृहस्थ त्यांच्या लाभाला अंतरतो. पण अतिथींची जे पूजा करतात, त्यांना सुखप्राति होते. ५२

अतिथीच्या ठायीं मूर्तिध्यान । सर्वथा करणें न लगे जाण ।
तो स्वरूपें स्वयें नारायण । पूजितां संपूर्ण सर्वार्थसिद्धि ॥ ८५३ ॥
अतिथीच्या ठिकाणी मूर्तीचे ध्यान मुळींच करावे लागत नाहीं. कारण तो स्वरूपानेंच साक्षात् नारायण असतो. यास्तव त्याची पूजा केली असतां पूर्णपणे सर्वार्थसिद्धि होते. ५३

एवं अतिथीसी जें अर्पे । तें भगवंतमुखीं समर्पे ।
यालागीं अतिसाक्षेपें । अतिथि ब्रह्मरूपें पूजिजे सदा ॥ ८५४ ॥
अतिथीला जें जें अर्पण करावे तें तें भगवंताच्या मुखींच समर्पित होतें. म्हणून अतिथीचे सर्वदा मोठ्या आदराने ब्रह्मरूपाने पूजन करावे. ५४

जें जें बोलिलें पूजास्थान । तेथें निजश्रद्धाचि प्रमाण ।
श्रद्धेवेगळें राया जाण । प्राप्ति संपूर्ण कदा न लभे ॥ ८५५ ॥
वर पूजेचे स्थान म्हणून जें जें सांगितलें आहे, त्यावरील पूजकाची श्रद्धा हेंच प्रमाण आहे. श्रद्धेवाचून पूर्णप्राप्ति कधीच होत नाहीं. ५५

निजश्रद्धेचें हृदय स्थान । ते हृदयीं विध्युक्त पूजन ।
करितां श्रद्धेनें आपण । प्राप्ति संपूर्ण उद्बोधे स्वयें ॥ ८५६ ॥
हृदय हें श्रद्धेचे स्थान आहे. यास्तव हृदयामध्यें यथाविधि श्रद्धेने पूजन केले असतां पूर्णप्राति आपोआप प्रकट होते. ५६

येर्‍हवीं तरी आपुल्या देहीं । चाळक ईश्वरु आहे हृदयीं ।
श्रद्धेनें भजतां त्याचे ठायीं । निजप्राप्ति पाहीं सहजें लाभे ॥ ८५७ ॥
वस्तुतः चालक ईश्वर आपल्या देहांत हृदयामध्ये स्थित आहेच. श्रद्धेने त्याचें भजन केलें असतां आत्मप्राप्ति अनायासाने होते. ५७

जें जें आपण सेविजे । तें तें भगवन्मुखीं भाविजे ।
येणें निजभजनें पाविजे । जाण सहजें परमात्मा ॥ ८५८ ॥
आपण ज्याचे सेवन करावें तें ते भगवंताच्या मुखी अर्पावे. अशा भजनाने परमात्मा अनायासाने प्राप्त होतो. ५८

सांडोनि देहींची अहंता । सकळ भोग ईश्वर भोक्ता ।
ऐसी दृढ भावना भावितां । पाविजे परमार्था अपरोक्षसिद्धी ॥ ८५९ ॥
देहावरील अभिमान सोडून सर्व भोगांचा भोक्ता ईश्वर आहे, अशी भावना दृढ केली असतां परमार्थाची साक्षात् सिद्धि होते. ५९

देह जड मूढ अचेतन । सकळभोक्ता ईश्वर पूर्ण ।
तेथ वाढवूनि देहाभिमान । भोगिती अज्ञान अनेक दुःखें ॥ ८६० ॥
देह जड, मूळ, अचेतन आहे; सर्व भोगांचा भोक्ता पूर्ण ईश्वर आहे. पण असें असतांही अज्ञानी लोक देहाभिमान वाढवून अनेक दुःखे भोगतात. ८६०

ते सांडूनि देहअहंता । हृदयस्था शरण जातां ।
पाविजे पूर्ण परमार्था । जाण तत्त्वतां नृपवर्या ॥ ८६१ ॥
यास्तव देहाभिमान टाकून हृदयस्थ ईश्वराला शरण गेलें असतां पूर्ण परमार्थाची प्राप्ति होते. ६१

निःशेष सांडिजे मीपण । याचि नांव हृदयस्था शरण ।
तूं सहजें परब्रह्म पूर्ण । मिथ्या देहाभिमान धरूं नको ॥ ८६२ ॥
हे राजा, मीपण निःशेष टाकणे हैंच हृदयस्थ ईश्वराला शरण जाणें होय. तूं स्वरूपानें पूर्ण परब्रह्म आहेस, यास्तव मिथ्या देहाभिमान धरू नकोस, ६२

राया येणेंचि कर्में जाण । तुटे कर्माचें कर्मबंधन ।
पाविजे पूर्ण समाधान । तें हें मुख्य लक्षण नृपनाथा ॥ ८६३ ॥
राजा, याच कर्माने कर्मबंध तुटतो व पूर्ण समाधान होतें. आगमोक्त भजनाचे हें मुख्य लक्षण आहे. ६३

आगमोक्त निजभजन । कर्मयोगाचें मुख्य लक्षण ।
ऐकतां राजा समाधान । परमानंदें पूर्ण निवाला ॥ ८६४ ॥
तेंच कर्मयोगाचेंही मुख्य लक्षण आहे. हें ऐकून राजाला परम समाधान झालें. परमानंदाने तो शांत झाला. ६४

जंव जंव रायाचें पुरे कोड । तंव तंव कथा लागे गोड ।
अतिशयें श्रवणाची चाड । विशेषें वाड थोरावली ॥ ८६५ ॥
राजाचे मनोरथ जसे जसे पूर्ण होऊं लागले तशी तशी त्याला कथा गोड लागू लागली व श्रवणाची इच्छा अतिशय वाढली. ६५

राजा निवालेनि परमानंदें । सुखावलेनि निजबोधें ।
लांचावलेनि स्वानंदें । पुढां प्रश्न विनोदें पुसेल ॥ ८६६ ॥
राजा, परमानंदाने शांत होऊन आत्मबोधानें सुखी झाला असतांही स्वानंदाच्या लालचीने विनोदाने आणखी प्रश्न विचारील. ६६

उगें राहतां आपण । उठून जाती मुनिगण ।
यालागीं प्रश्नावरी प्रश्न । विचित्रविंदान पुसतु ॥ ८६७ ॥
आपण जर आतां प्रश्न न करतां मुकाट्यानें बसलों तर हे मुनिगण उठून जातील या भीतीनें तो चतुर राजा प्रश्नांवर प्रश्न विचारू लागला. ६७

स्वानंदें लोधली चित्तवृत्ती । इंद्रियें वेधलीं सुखस्थितीं ।
राजा निवाला निश्चितीं । तरी प्रश्नोक्ती पुसत ॥ ८६९ ॥
राजाची चित्तवृत्ति स्वानंदानें भरून गेली. इंद्रिये सुखाने वेधली. राजा पूर्णपणे शांत झाला. तथापि त्यानें प्रश्न विचारलाच. ६८

पुसेल हरीचे अवतार । ते कथा सुंदर मनोहर ।
निरूपण अति अरुवार । निजजिव्हार निववील ॥ ८६९ ॥
तो आतां पुढच्या अध्यायांत हरीचे अवतार विचारील. ती कथा फारच सुंदर आहे आणि निरूपणही अति रमणीय होणार आहे. तें खरोखर श्रोत्यांच्या चित्ताला विश्रांति देईल. ६९

त्या प्रश्नाचें प्रत्युत्तर । कथाकौतुक सनागर ।
एका जनार्दनाचा किंकर । उपानहधर संतांचा ॥ ८७० ॥
त्या प्रश्नाचें प्रत्युत्तर म्हणजे एक रमणीय कथाकौतुकच आहे. हा एकनाथ जनार्दनाचा किंकर व संताची पादत्राणे धारण करणारा आहे. ८७० ं

संत सज्जन कृपास्थिती । श्रीजनार्दन वरदमूर्ती ।
पुढील कथेचि व्युत्पत्ती । सांगेन यथार्थी अर्थुनी ॥ ८७१ ॥
तो आतां संत व सज्जन याच्या कृपेनें व वरदमूर्ति श्रीजनार्दनाच्या अनुग्रहाने पुढील कथा यथार्थ अर्थाने सांगेल. ७१

श्रीभागवताचे राशीवरी । एकाजनार्दन केला मापारी ।
तो निजबोधाचे कुडवावारीं । भरील वखारी श्रवणाच्या ॥ ८७२ ॥
श्री भागवताच्या राशीवर एका जनार्दनाला माप घालणारा केला आहे; तो आत्मबोधाच्या कुडवानी श्रवणाच्या वखारी भरील. ८७२.

इति श्रीमद्‌भागवते महापुराणे एकादशस्कन्धे परमहंस संहितायां
एकाकार टीकायां निमिजायंतसंवादे मायाकर्मब्रह्मनिरूपणं नाम तृतीयोऽध्यायः ॥ ३ ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ५५ ॥ ओव्या ॥ ८७३ ॥
इति श्रीमद्‌भागवतमहापुराणांतील एकादशस्कंधाचा परमहंससंहितेमधला श्रीधर-एकनाथविरचित टीकांनुसार विष्णूशर्मकृत सान्वयार्थ-भावार्थासह निमिजायंतसंवादांतील मायाकर्मब्रह्मनिरूपण नांवाचा तिसरा अध्याय समाप्त झाला.