एकनाथी भागवत – अध्याय १८

ॐ नमो कर्मप्रकाशका । सद्विद्याविधिविवेका ।
कर्मधर्मप्रतिपाळका । जगन्नायका गुरुवर्या ॥ १ ॥
हे कर्मप्रकाशका ! हे ब्रह्मविद्योपदेशविवेका! हे कर्मधर्मप्रतिपालका ! हे जगनायका! *ओंकारस्वरूप गुरुवर्या ! तुला नमस्कार असो १.

वर्णाश्रमादि मर्यादा । त्याचा सेतू तूं गोविंदा ।
तूं कारण वेदानुवादा । विवादसंवादा तूं मूळ ॥ २ ॥
हें गोविंदा ! वर्णाश्राच्या मर्यादेचा तू आधार आहेस. वेदानुवादाचे कारण तूंच आहेस; आणि विवादाचे व संवादाचें मूळही तूंच आहेस २.

तूं शब्दसृष्टीचा अर्कु । तूं वेदगुह्यप्रकाशकु ।
तूंचि एकला अनेकु । व्याप्य व्यापकु तूंचि तूं ॥ ३ ॥
शब्दसृष्टीचा तूं देदीप्यमान सूर्य आहेस; तूं वेदांतील गूढार्थाचा प्रकाशक आहेस; तूं एकटाच असून अनेक झाला आहेस; व्याप्य आणि व्यापकही तूंच आहेस ३.

तूंचि तूं विधि विधान । तूं बोलका तूंचि मौन ।
एका आणि जनार्दन । दोनी संपूर्ण तूं गुरुराया ॥ ४ ॥
विधि व विधान तूंच ; बोलकाही तूंच; आणि मौनही तूंच ; हे गुरुराजा! एका आणि जनार्दन हे दोघेही पूर्णपणे तूंच आहेस ४.

यालागीं श्रीभागवता । तूंचि अर्थ तूं कविता ।
तूंचि अर्थावबोधकता । हेंही बोलविता तूंचि आम्हां ॥ ५ ॥
वास्तव श्रीभागवतांतील कविता तूंच व अर्थही तूंच, आणि अर्थज्ञान सुद्धा तूंच असून आम्हांकडून हे बोलविणाराही तूंच आहेस ५.

जैशीं आपुलींचि उत्तरें । पडसादें होतीं प्रत्युत्तरें ।
तेवीं माझेनि मुखांतरें । तूं कवित्वद्वारें बोलका ॥ ६ ॥
आपलेच शब्द ज्याप्रमाणे प्रतिध्वनीमध्ये उत्तरे देतात, त्याप्रमाणेच माझ्या मुखावाटे कवित्वाच्या रूपाने तूंच बोलका आहेस ६.

बोलका श्रीभागवतीं । श्रीकृष्ण कृपामूर्ती ।
तेणें वर्णाश्रम‍उत्पत्ति । यथास्थिती सांगितली ॥ ७ ॥
श्रीभागवतामध्ये कृपामूर्ति श्रीकृष्ण हाच वक्ता आहे. त्याने वर्णाश्रमाची उत्पत्ति यथार्थ रीतीने सांगितली ७.

सप्तदशाध्यायीं सुगम । सांगितले ब्रह्मचर्य-धर्म ।
गृहस्थाचें स्वधर्मकर्म । नित्यनेम निरूपिले ॥ ८ ॥
सतराव्या अध्यायामध्ये श्रीकृष्णांनी ब्रह्मचर्याचा धर्म सुगम करून सांगितला, आणि गृहस्थाच्या स्वधर्माचें व नित्यनेमाचेही निरूपण केलें ८.

आतां अष्टादशाध्यायीं जाण । वानप्रस्थाश्रमलक्षण ।
संन्यासधर्माचें निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ९ ॥
आता अठराव्या अध्यायांत वानप्रस्थाश्रमाचे लक्षण व संन्यासधर्माचे निरूपणही श्रीकृष्ण स्वतः सांगत आहेत ९.

श्रीभगवानुवाच-
वनं विविक्षुः पुत्रेषु भार्यां न्यस्य सहैव वा ।
वन एव वसेच्छान्तस्तृतीयं भागमायुषः ॥ १ ॥
[श्लोक १] श्रीकृष्ण म्हणतात गृहस्थाश्रमी मनुष्य जर वानप्रस्थआश्रमात जाऊ इच्छित असेल, तर त्याने आपल्या पत्‍नीला पुत्रांकडे सोपवावे किंवा आपल्याबरोबर घेऊन जावे आणि आपल्या आयुष्याचा तिसरा भाग वनातच राहून शांत चित्ताने व्यतीत करावा. (१)

आतां क्रमेंचि निरूपण । वानप्रस्थाचें आलें जाण ।
त्यासी वनास निघावया कारण । आयुष्यलक्षण विभाग ॥ १० ॥
आतां क्रमानेच वानप्रस्थाचे निरूपण आले. त्याला वनाला जाण्यास निघण्यासाठी आयुष्याचे विभाग हेच कारण आहेत १०.

‘शतायुःपुरुष’-मर्यादा श्रुती । त्याच्या तृतीयभागाची स्थिती ।
सासष्टी क्रमिल्याअंतीं । वनाप्रती निघावें ॥ ११ ॥
श्रुतीमध्ये पुरुषाच्या आयुष्याची मर्यादा शंभर वर्षे सांगितली आहे; त्यांतील दोन भाग जाऊन तिसरा भाग सुरू झाल्यानंतर म्हणजे सासष्टी लागली की, अरण्यांत जाण्याची तयारी करावी ११.

निघावया वनाप्रती । भार्या देऊनि पुत्राचे हातीं ।
आपण निघावें शीघ्रगतीं । वानप्रस्थीं वनवासा ॥ १२ ॥
वनाला जाण्यापूर्वी बायकोला पुत्राच्या स्वाधीन करावी, आणि आपण सत्वर वानप्रस्थाश्रम स्वीकारण्याकरितां वनांत जावें १२.

भार्या साध्वी पतिव्रता सती । ईश्वरस्वरूप मानी पती ।
भ्रतार निघतां वानप्रस्थीं । जे पुत्राप्रती राहेना ॥ १३ ॥
महान् साध्वी सती व पतिव्रता स्त्री पतीला केवळ ईश्वरस्वरूप मानून वागणारी व पति वानप्रस्थाश्रम घेण्यासाठी वनांत निघाला असता पुत्रापाशी राहण्यास तयार नसते १३,

सांडितां भ्रतारसेवेसी । कल्पांत हों पाहे जिसी ।
जे भ्रतारचरणांची दासी । ते सवें वनासी आणावी ॥ १४ ॥
पतीची सेवा अंतरली तर जिला केवळ कल्पान्त झाला असे वाटते, जी पतीच्या चरणाची केवळ दासी, अशी असेल तर तिला आपल्याबरोबर वनांत घेऊन जावें १४.

जो पुरुष स्त्रीसमवेत । वनीं झाला वानप्रस्थ ।
तेणें स्त्रीकामासी अलिप्त । व्हावें दृढव्रत ते आश्रमीं ॥ १५ ॥
ज्या पुरुषाने स्त्रीसहवर्तमान वनांत येऊन वानप्रस्थाश्रम स्वीकारला, त्याने त्या आश्रमामध्ये स्त्रीकामापासून अलिप्त राहून तेच व्रत दृढतर चालवावें १५.

जो वानप्रस्थवनवासी । तेणें दृढ धरावी शांति मानसीं ।
नातळावें कामक्रोधासी । हेही व्रत त्यासी आवश्यक ॥ १६ ॥
ज्याने वनांत जाऊन वानप्रस्थाश्रम स्वीकारला, त्याने मनामध्ये दृढ शांति धारण करावी; कामक्रोधाला स्पर्शही करूं नये, हेही व्रत त्याला आवश्यक आहे १६.

कन्दमूलफलैर्वन्यैर्मेध्यैर्वृत्तिं प्रकल्पयेत् ।
वसीत वल्कलं वासस्तृणपर्णाजिनानि च ॥ २ ॥
[श्लोक २] वनातील पवित्र कंदमुळे आणि फळे खाऊनच त्याने उदरनिर्वाह करावा वस्त्रांऐवजी झाडांच्या साली, झाडांची पाने, मृगचर्म यांचाच उपयोग करावा. (२)

वनींचीं कंदमूळफळें । जीं निपजलीं ऋतुकाळें ।
तींही अतिपवित्रें निर्मळें । आहार तेणें मेळें करावा ॥ १७ ॥
वनामध्ये ज्या ज्या ऋतूंत जी जी कंदमुळे व फळे मिळतील, त्यांतील अत्यंत निर्मल व पवित्र असतील ती घेऊन त्यावर निर्वाह करीत जावा १७.

वनवासीं वस्त्रें जाण । वल्कलें व्याघ्रमृगाजिन ।
अथवा नेसावें केवळ तृण । कां पर्णाभरण वृक्षांचें ॥ १८ ॥
वनवासांत असतांना वल्कलें, व्याघ्रांबर किंवा मृगचर्म हीच वस्त्रें वापरावीत; अथवा नुसतें गवत नेसावे, किंवा झाडांच्या पानांचे वस्त्र करावें १८.

वानप्रस्थीं नेमग्रहण । ऐक त्याचेंही लक्षण ।
त्या नेमाचें निरूपण । स्वयें नारायण सांगत ॥ १९ ॥
आतां वानप्रस्थ आश्रमामध्ये नेम कसा व कोणता धरावा, त्याचेही लक्षण ऐक. त्या नेमाचे निरूपण स्वतः नारायण सांगत आहेत १९.

केशरोमनखश्मश्रु मलानि बिभृयाद्दतः ।
न धावेदप्सु मज्जेत त्रिकालं स्थण्डिलेशयः ॥ ३ ॥
[श्लोक ३] केस, लव, नखे आणि दाढीमिशारूप शरीरावरील मळ काढू नये दात दंतमंजन इत्यादीने घासू नयेत पाण्यात शिरून दिवसातून तीन वेळा स्नान करावे आणि जमिनीवरच झोपावे. (३)

केश म्हणिजे मस्तकींचे । श्मश्रु बोलिजे मुखींचे ।
रोम ते कक्षोपस्थींचे । छेदन यांचें न करावें ॥ २० ॥
‘केश’ म्हणजे मस्तकावर येतात ते व ‘श्मश्रू’ म्हणजे मुखावर केस येतात ते ; आणि रोम’ म्हणजे कार्खेत व गुह्यभागाच्या ठिकाणी जे केस येतात ते ; ह्यांपैकी कोणत्याही केशांचें छेदन करूं नये २०.

मस्तकीं न करावें वपन । न करावें श्मश्रुकर्म जाण ।
न करावें रोमनखच्छेदन । दंतधावन न करावें ॥ २१ ॥
मस्तकाचे कधीं वपन करूं नये, इमश्रही करूं नये किंवा इतर ठिकाणचे केस व नखेही काढू नयेत : तसेच दांतही घांसू नयेत २१.

स्नान मुसलवत् केवळ । अवश्य करावें त्रिकाळ ।
प्रक्षाळावे ना शरीरमळ । व्रत प्रबळ वनस्था ॥ २२ ॥
स्नान मात्र तीन त्रिकाळ अवश्यमेव करावें ; पण ते फक्त मुसळासारखे आंत बुडून निघावे. शरीरावरील मळ धुऊ नये. हेच वानप्रस्थाचें मोठे व्रत आहे २२.

केवळ भूमीवरी शयन । सदासर्वदा करावें जाण ।
तळीं घालावें ना तृण । मग आस्तरण तें कैंचें ॥ २३ ॥
सदा सर्वदा नुसत्या जमिनीवर निजावें. खाली गवतसुद्धा घालू नये, मग वस्त्राची गोष्ट कोठची? २३.

यापरी वानप्रस्थें जाण । दृढ धरूनि व्रतधारण ।
करावें तपाचरण । तें तपलक्षण अवधारीं ॥ २४ ॥
याप्रमाणे वानप्रस्थानें दृढतर व्रत धारण करून तप करावे. त्या तपाचे लक्षण आतां ऐक २४.

ग्रीष्मे तप्येत पञ्चाग्नीन् वर्षास्वासारषाड्वले ।
आकण्ठमग्नः शिशिर एवं वृतस्तपश्चरेत् ॥ ४ ॥
[श्लोक ४] उन्हाळ्यात चार बाजूला अग्निकुंडे पेटवून त्यामध्ये राहून डोक्यावर ऊन घ्यावे हे पंचाग्निसाधन होय पावसाळ्यात अंगावर पावसाचा मारा सहन करावा थंडीच्या दिवसात गळ्यापर्यंत पाण्यात बुडून राहावे अशा रीतीने राहून तप करावे. (४)

उष्णकाळीं पंचाग्नीं । अग्निकुंडे चहूं कोणीं ।
पांचवा रवि माध्याह्नीं । ऐसा पंचाग्नी साधावा ॥ २५ ॥
उन्हाळ्यामध्ये पंचाग्निसाधन करावें. चार बाजूंला चार अग्निकुंडे पेटवावी व डोकीवर मध्यान्हीचा सूर्य तळपत असावा, याला ‘पंचाग्निसाधन’ म्हणतात २५.

माळा करोनि उच्च प्रदेशीं । धन वर्षतां धारावर्त्तेंसीं ।
तेथ व्हावें आकाशवासी । वर्षाकाळीं ऐसी तपप्राप्ती ॥ २६ ॥
पावसाळ्यांत उंच ठिकाणी माळा बांधून मुसळधार पाऊस पडूं लागला असता त्याच्यावर उघडे जाऊन बसावें, हे वर्षाकालांतील तप होय २६.

आलिया हेमंतऋतूसी । आकंठमग्न जळावासी ।
जळ वास करावा निशीं । हे वानप्रस्थासी तपक्रिया ॥ २७ ॥
थंडीचे दिवस आले म्हणजे रात्रीच्या वेळी गळ्यापर्यंत पाण्यात बुडून बसावें. हेच वानप्रस्थाचे तपाचरण होय २७.

हे तपक्रिया प्रतिवरूषीं । विहित वानप्रस्थासीं ।
वयसापरत्वें भक्षणासी । हृषीकेशी सांगत ॥ २८ ॥
ही तपाची क्रिया, वानप्रस्थाला प्रत्येक वर्षाला विहित आहे. आतां वयपरत्वे खाण्याचे पदार्थ कोणते कोणते तें श्रीकृष्ण सांगतात २८.

अग्निपक्वं समश्नीयात्कालपक्वमथापि वा ।
उलूखलाश्मकुट्टो वा दन्तोलूखल एव वा ॥ ५ ॥
[श्लोक ५] अग्नीत भाजलेले अन्न किंवा काळानुसार पिकलेली फळे खाऊन भूक भागवावी ते बारीक करण्याची आवश्यकता असेल, तर उखळामध्ये घालून किंवा दगडांनी ठेचून कुटावे, किंवा दातांनी चावून खावे. (५)

अगीस्तव पाका आलीं । कां काळें जीं परिपक्व झालीं ।
तीं तापसालागीं भलीं । आहारीं विहिलीं उदरार्थ ॥ २९ ॥
अग्नीवर शिजविलेली (किंवा अग्नीत भाजलेली कंदमूलें) किंवा ऋतुमानाप्रमाणे पिकलेली फळे असतील, तीच उदरनिर्वाहाकरितां खाणें तपस्व्याला उचित होय २९.

दांत असलिया बळी । फळें खावी तेणें सगळीं ।
कां गेलिया दांत समूळीं । कांडूनि उखळीं सुखे खावीं ॥ ३० ॥
दांत बळकट असतील तर त्याने सगळींच्या सगळीच फळे खावीत; किंवा दांत सारेच पडले असतील, तर त्याने ती खुशाल उखळांत कांडून खावीत ३०.

जरी उखळ न मीळे वनीं । तरी खावीं दगडें ठेंचुनी ।
नाहीं चाड गोडपणीं । क्षुधानिवारणीं आहारार्थ ॥ ३१ ॥
वनामध्ये उखळ मिळाले नाही, तर ती दगडाने ठेचून खावीत. रुचकर असावीत अशी इच्छा धरूं नये; कोणीकडून तरी भूक निवारण व्हावी असाच हेतु धरावा ३१.

स्वयं सञ्चिनुयात्सर्वमात्मनो वृत्तिकारणम् ।
देशकालबलाभिज्ञो नाददीतान्यदाहतम् ॥ ६ ॥
[श्लोक ६] देश, काळ आणि आपल्या शरीराची कुवत पाहून पोट भरण्यासाठी लागणारी सर्व सामग्री स्वतःच जमवावी दुसर्‍यांनी दिलेल्या वस्तू वापरू नयेत. (६)

ऋतुकाळीं फळें संपूर्णें । तीं कालांतराकारणें ।
संग्रहो सर्वथा न करणें । व्रतधारणें वनस्था ॥ ३२ ॥
फळांचा ऋतु असला म्हणजे ती पुष्कळ मिळतात, म्हणून ती पुढे उपयोगी पडतील अशा दृष्टीने त्यांचा कधीही सांठा करून ठेवू नये. हेंच वानप्रस्थाचे व्रत होय ३२.

पूर्वदिवसीं फळें आणिलीं । अपरदिवसीं जरी उरलीं ।
ती अवश्य पाहिजे त्यागिलीं । नाहीं बोलिलीं आहारार्थ ॥ ३३ ॥
आदल्या दिवशी फळे आणली आणि ती दुसऱ्या दिवसाला उरली, तर ती अवश्य फेंकून द्यावी. ती खावी असे शास्त्रांत सांगितलेले नाही ३३.

प्रत्यहीं आहारार्थ जाण । फळें आणावीं नूतन ।
जीर्ण फळांचें भक्षण । निषिद्ध जाण वानप्रस्था ॥ ३४ ॥
दररोज खाण्याकरितां ताजी फळे आणावीत. शिळे फळ भक्षण करणे वानप्रस्थाला निषिद्ध आहे हे लक्षात ठेव ३४.

आणिकें फळें जीं आणिलीं । तीं अंगीकारा निषिद्ध झालीं ।
जीं स्वकष्टें अर्जिलीं । तींचि वहिलीं आहारार्थ ॥ ३५ ॥
तसेंच दुसऱ्या कोणी फळे आणली असतील तर तीही घेण्याला योग्य नव्हत; स्वकष्टाने आपण आणलेली फळे असतील तीच आहाराला योग्य होत ३५.

देश काळ वर्तमान । इत्थंभूत कळलें ज्ञान ।
तरी संग्रह न करावा जाण अदृष्टधारण निर्धारें ॥ ३६ ॥
देश, काल व वर्तमान ह्यांचे इत्थंभूत ज्ञान असले तरी, कोणत्याही प्रकारचा संग्रह करूं नये. निश्चयाने प्रारब्धावरच भरंवसा ठेवून राहावे ३६.

पराचा प्रतिग्रहो पूर्ण । सर्वथा न करावा आपण ।
प्रतिग्रह घेतां जाण । व्रतखंडन वानप्रस्था ॥ ३७ ॥
दुसऱ्याने दिलेले दान आपण कधीही घेऊ नये. अशा प्रकारचा प्रतिग्रह घेतला असतां वानप्रस्थाच्या व्रताचा भंग होतो, असे समजावे ३७.

वन्यैश्चरुपुरोडाशैर्निर्वपेत्कालचोदितान् ।
न तु श्रौतेन पशुना मां यजेत वनाश्रमी ॥ ७ ॥
[श्लोक ७ ] वानप्रस्थ आश्रम स्वीकारलेल्याने वनातील वस्तूंनीच चरू, पुरोडाश इत्यादी हविष्यान्न तयार करावे त्याचपासून त्या त्या वेळच्या गोष्टी कराव्यात वेदविहित पशुबलीने माझे यजन करू नये. (७)

जो वानप्रस्थ स्त्रीसमवेत । त्यासी अग्निहोत्र झालें प्राप्त ।
तेव्हां कर्म जें वेदोक्त । तें करावें समस्त वनवासीं ॥ ३८ ॥
जो वानप्रस्थ स्त्रीसमवेत वनांत जातो, त्याला अग्निहोत्र बाळाले पाहिजे. याकरिता त्याने वनांत राहिले असतांही सारे वेदोक्त कर्म करावें ३८.

वनीं जीं फळें ज्या ऋतूस । तोचि कल्पावा चरुपुरोडाश ।
तेणें यजावा मी यज्ञपुरुष । सावकाश मंत्रोक्त ॥ ३९ ॥
वनामध्ये असतांना ज्या ऋतूंत जी फळे मिळतील, त्यांचाच चरु व पुरोडाश करून त्यानेच यथोक्त मंत्रानें, मी जो यज्ञपुरुष, त्या मजप्रीत्यर्थ यज्ञ करावा ३९.

यापरी श्रौतकर्मविधान । यागार्थ पशुहनन ।
तें वानप्रस्थासी नाहीं जाण । वनफळीं यजन यागाचें ॥ ४० ॥
श्रौतकर्मविधानाप्रमाणे वानप्रस्थाने यज्ञाकरितां पशुवध करूं नये. त्याने वनांतील फळांनीच यज्ञ करावा ४०.

अग्निहोत्रं च दर्शश्च पूर्ण्मासश्च पूर्ववत् ।
चातुर्मास्यानि च मुनेराम्नातानि च नैगमेः ॥ ८ ॥
[श्लोक ८] वानप्रस्थाश्रमीयांसाठी वेदवेत्त्यांनी अग्निहोत्र, दर्शपूर्णमास, तसेच चातुर्मास्य याग इत्यादी गृहस्थाश्रमाप्रमाणेच करावेत, असे सांगितले आहे. (८)

पूर्वीं अग्निहोत्रकर्में जैसीं । गृहीं होतीं गृहस्थासी ।
तींचि चालवावीं वनवासीं । वेदाज्ञेसीं वनस्थें ॥ ४१ ॥
पूर्वी अग्निहोत्रादि कर्में गृहस्थाश्रमात घरामध्ये जशी गृहस्थ चालवीत होता, त्याप्रमाणेच वानप्रस्थाश्रमांतही वेदाज्ञेप्रमाणे चालवावीत ४१.

आम्नायें आगमनिगमांसी । जाणोनि करावें यागासी ।
दर्शपौर्णमासचातुर्मास्यांसी । निष्कामतेसी वेदाज्ञा ॥ ४२ ॥
वैदिक क्रिया व शास्त्रप्रमाण पाहून यज्ञ करीत जावा. त्याचप्रामाणे वेदाच्या आज्ञेप्रमाणे दर्श, पूर्णमास व चातुर्मास्ययाग, इत्यादि कृत्येही निष्कामपणाने करावीत ४२.

ऐसा मुनीश्वर वनवासी । तपस्वी तेजोराशी ।
त्याचिये फळप्राप्तीसी । स्वयें हृषीकेशी सांगत ॥ ४३ ॥
असा वनांत राहणारा तेजस्वी व तपस्वी मुनीश्वर, त्याला कसले फल प्राप्त होते, ते श्रीकृष्ण सांगतात ४३.

एवं चीर्णेन तपसा मुनिर्धमनिसन्ततः ।
मां तपोमयमाराध्य ऋषिलोकादुपैति माम् ॥ ९ ॥
[श्लोक ९] अशा प्रकारे तपाचे आचरण करीत कृश झालेला मुनी तपोमूर्तिस्वरूप माझी आराधना करून प्रथम ऋषिलोकात जातो व नंतर तेथून माझ्या लोकी येतो. (९)

ऐसें वेदोक्त तप साचार । आस्तिक्यभावें अत्यादर ।
साक्षेपें करितां निरंतर । अस्थिमात्र देह उरे ॥ ४४ ॥
अशा प्रकारे वेदांत सांगितल्याप्रमाणे आस्तिक्यभावनेनें आदरपूर्वक निरंतर तपाचे आचरण करीत असतां देहाचा केवळ अस्थिपंजर मात्र उरतो ४४.

शुष्कशरीरपांजरा । त्वचेनें झांकिलिया शिरा ।
परी सामर्थें अति खरा । न सरे माघारा तपोनिष्ठें ॥ ४५ ॥
शरीराचा सांपळा शुष्क होऊन त्वचेनें शिरा आच्छादलेल्या असल्या तरी सामर्थ्याने तो अतिशय मोठा असतो. तपोनिष्ठेत तो कधीही माघार घेत नाही ४५.

ऐसें यावज्जन्म करितां तप । तो सबाह्य झाला निष्पाप ।
लाहोनि ज्ञान सद्‌रूप । माझें निजस्वरूप तो पावे ॥ ४६ ॥
असें यावज्जन्म तप करीत असल्याने तो अंतर्बाह्य निष्पाप होतो; आणि त्याला सत्यज्ञान प्राप्त होऊन तो माझ्या निजस्वरूपाला पोचतो ४६.

अवशेष वासना असतां । सूक्षरूप प्रतिबद्धकता ।
तपाभिमानें तत्त्वतां । देह‍अहंता अणुमात्र ॥ ४७ ॥
वासना थोडी जरी शिल्लक राहिली तरी सूक्ष्मरूपाने तिचा प्रतिबंध हा होतोच. कारण खरोखर तपाच्या अभिमानाने देहअहंताही अणुमात्र तरी असतेच ४७.

परी फळाशा पोटीं नाहीं । ऐसेनि निमाला जो देही ।
तो पावोनि ऋषिलोकाच्या ठायीं । तेथोनि पाहीं मज पावे ॥ ४८ ॥
पण फलाची आशा पोटांत नसतां जो देहधारी मरण पावतो, तो ऋषिलोकाच्या ठिकाणी जाऊन तेथून मग तो माझ्याकडे येतो ४८.

जो ऋषिलोकातें पावला । तो क्रमें मुक्तीच्या मार्गा आला ।
तेथूनि क्रमेंचि मज पावला । यापरी उद्धरला वनस्थ ॥ ४९ ॥
ऋषिलोकाला जो पोचतो, तो क्रममुक्तीच्या मार्गाला लागतो. आणि त्या क्रमानेंच तो मला येऊन पोचतो. अशा प्रकारे वानप्रस्थाचा उद्धार होतो ४९.

यस्त्वेतत् कृच्छ्रतश्चीर्णं तपो निःश्रेयसं महत् ।
कामायाल्पीयसे युञ्ज्याद्‍बालिशः कोऽपरस्ततः ॥ १० ॥
[श्लोक १०] जो मनुष्य अतिशय कष्टाने केलेली आणि मोक्ष देणारी ही महान तपश्चर्या क्षुद्र फळांच्या प्राप्तीसाठी करतो, त्याच्याइतका मूर्ख कोण असेल बरे ? (१०)

एवं वानप्रस्थ अतिकष्टीं । तपादिसाधनसंकटीं ।
भोगफळाशेच्या तुटीं । मोक्षपरिपाटी पावले ॥ ५० ॥
अशा प्रकारे वानप्रस्थ अत्यंत कष्ट सोसून व तपादिक साधनांची संकटें सहन करून फलाची आशा सोडतो तो मोक्षाला पावतो ५०.

जें हाता आलें मोक्षफळ । आविरिंच्यादि मंगळ ।
तें तपादिसाधन निर्मळ । कामार्थ केवळ कल्पिती ॥ ५१ ॥
ज्याच्या योगानें सत्यलोकादि मंगल मोक्षफल हाती येते. त्या निर्मळ तपादिसाधनांचा उपयोग केवळ कामनापूर्तीसाठी करितात ५१.

जेवीं कां चिंतामणीचियेसाठीं । मागे चातीलागीं खापरखुंटी ।
कां परीस देवोनि पालटीं । काळी गोमटी वीट मागे ॥ ५२ ॥
ज्याप्रमाणे हाती असलेला चिंतामणि देऊन चाती करावयासाठी खापरखुटी मागावी, किंवा परीस देऊन त्याच्या मोबदला काळी कुळकुळीत वीट मागावी ५२,

तेवीं मनुष्यपणाचिये स्थितीं । उत्तम जन्में तपःप्राप्ती ।
ते तपःक्रिया व्यर्थ करिती । काम वांछिती ते मूर्ख ॥ ५३ ॥
त्याप्रमाणे मनुष्यपण व ब्राह्मण जन्म प्राप्त होऊन तप करितात, पण कामोपभोगाची इच्छा करून तपश्चर्या फुकट घालवितात, ते मूर्ख होत ५३.

त्या मूर्खांचें मूर्खपण । किती सांगावें गा गहन ।
मोक्षप्राप्तीचें साधन । कामलिप्सा जाण नाशिलें ॥ ५४ ॥
त्या मूर्खाचा मूर्खपणा किती म्हणून सांगावा? कामेच्छेनें मोक्षप्राप्तीचे साधन कि हो ते नासून टाकतात! ५४.

असो हें मूर्खाचें कथन । वानप्रस्थाचेंचि लक्षण ।
पूढील सांगेन संपूर्ण । शस्त्रार्थ जाण सुनिश्चित ॥ ५५ ॥
अशा मूर्खाची गोष्ट राहू द्या. वानप्रस्थाचे पुढील लक्षण शास्त्रोक्त व खरे खरे असें संपूर्णपणे सांगतों ऐक ५५.

जो वानप्रस्थ आपण । तपादि साधनीं अतिक्षीण ।
झाला तरी वैराग्यज्ञान । ज्यासी जाण नुपजेचि ॥ ५६ ॥
जो वानप्रस्थ तपादि साधनाने अतिशय क्षीण झाला, तरीसुद्धा ज्याला वैराग्य व ज्ञान उत्पन्न होत नाही ५६,

पन्नास वर्षें गार्हस्थ्य । दोनी द्वादशें वानप्रस्थ ।
झाला तरी जो अप्राप्त । वैराग्ययुक्त निजज्ञाना ॥ ५७ ॥
पन्नास वर्षे गृहस्थाश्रम करून चोवीस वर्षे वानप्रस्थाश्रम केला, तरीसुद्धा ज्याला वैराग्ययुक्तज्ञान प्राप्त झाले नाही ५७;

आयुष्याचे तीन भागवरी । वेंचलें गा ऐशापरी ।
आतां चतुर्थ भाग उरल्यावरी । क्षीण शरीरीं जर्जर ॥ ५८ ॥
आयुष्याचे तीन भाग अशा रीतीनें खर्च होऊन गेले, आणि पुढे चवथा भाग राहिला म्हणजे तो क्षीणशरीर होऊन जर्जर होतो! ५८,

ऐसें शरीर झालिया क्षीण । अल्पही वैराग्य झाल्या जाण ।
करावें संन्यासग्रहण । कर्माचरण यथाशक्ती ॥ ५९ ॥
अशा प्रकारें शरीर क्षीण झाले; आणि त्यांत थोडेसें जरी वैराग्य उत्पन्न झाले, तरी संन्यास ग्रहण करून यथाशक्ति कर्म करीत असावें ५९.

वानप्रस्थाश्रमी झाल्याही । निःशेष वैराग्य अल्पही ।
सर्वथा नुपजे ज्याच्या ठायीं । त्याचा अधिकार पाहीं हरि बोले ॥ ६० ॥
आतां वानप्रस्थाश्रम घेऊनही ज्याला अल्पही वैराग्य मुळीच उत्पन्न होत नाही, त्याचा अधिकार श्रीकृष्ण सांगतात ६०.

यदासौ नियमेऽकल्पो जरया जातवेपथुः ।
आत्मन्यग्नीन् समारोप्य मच्चित्तोऽग्निं समाविशेत् ॥ ११ ॥
[श्लोक ११] जेव्हा वानप्रस्थाश्रमी आपल्या आश्रमाच्या नियमांचे पालन करण्यास असमर्थ होतो, म्हातारपणामुळे त्याचे शरीर थरथर कापू लागते, तेव्हा भावनेने अंतःकरणात यज्ञाच्या अग्नींची स्थापना करावी आणि आपले मन माझे ठिकाणी लावून अग्नीत प्रवेश करावा. (११)

सर्वथा वैराग्य नुठी देहीं । जरा आदळली ठायींचे ठायीं ।
स्वधर्माचरणीं शक्ति नाहीं । कंप पाहीं सर्वांगीं ॥ ६१ ॥
-देहामध्ये वैराग्य मुळीच उत्पन्न झाले नाहीं, बसल्या ठिकाणी जरा येऊन ठेपली, स्वधर्माने चालावयालाही शक्ति उरली नाही, साऱ्या अंगाला कंप सुटला ६१,

ऐसा वानप्रस्थवनवासी । आत्मसमारोप करूनि अग्नीसी ।
मातें दृढ ध्याऊनि मानसीं । अग्निप्रवेशीं रिघावें ॥ ६२ ॥
अशा स्थितीत जर वानप्रस्थाश्रमी वनामध्ये असेल, तर त्याने आत्मस्वरूपांत अग्नीचा समारोप करून मनामध्ये माझें दृढ ध्यान करून अग्निप्रवेश करावा ६२.

वानप्रस्थाश्रमीं वनस्थ । अतिशयें झाला जो विरक्त ।
त्याची उत्तरविधि समस्त । स्वयें भगवंत सांगतसे ॥ ६३ ॥
आतां वानप्रस्थाश्रमी वनांत राहात असून जो अत्यंत विरक्त होईल, त्याने पुढे कसे वागावे, तें भगवान् स्वतः सांगत आहेत ६३.

यदा कर्मविपाकेषु लोकेषु निरयात्मसु ।
विरागो जायते सम्यङ् न्यस्ताग्निः प्रव्रजेत्ततः ॥ १२ ॥
[श्लोक १२] कर्मांचे फळ म्हणून जे लोक प्राप्त होतात, ते नरकाप्रमाणे दुःखपूर्ण आहेत, असे वाटून जर पूर्ण वैराग्य आले, तर विधिपूर्वक अग्नींचा त्याग करून संन्यास ग्रहण करावा. (१२)

वानप्रस्थीं अनुष्ठान । तेणें वैराग्य अतिगहन ।
इंद्रचंद्रादिब्रह्मसदन । निरयासमान जो मानी ॥ ६४ ॥
-वानप्रस्थाश्रमामध्ये योग्य अनुष्ठान घडल्यामुळे अत्यंत वैराग्य उत्पन्न झाले ; आणि इंद्रलोक, चंद्रलोक व सत्यलोक हेही ज्याला नरकाप्रमाणे वाटू लागले ६४;

ऐसा दृढ वैराग्य‍उठावा । तेणें विहिताग्नि बोळवावा ।
त्याग करूनि आघवा । अंगीकारावा संन्यास ॥ ६५ ॥
सारांश, इतकें निस्सीम वैराग्य ज्याच्या ठिकाणी उत्पन्न झालें, त्याने विध्युक्त रीतीने आपल्या विहितामीचे विसर्जन करावे आणि सर्वस्वाचा त्याग करून संन्यास स्वीकारावा ६५.

ते संन्यासग्रहणस्थिती । यथाशास्त्र यथापद्धती ।
स्वयें सांगताहे श्रीपती । यथानिगुती विहितार्थे ॥ ६६ ॥
तो संन्यासग्रहणाचा कल्याणप्रद प्रकार यथाशास्त्र व संप्रदायानुसार श्रीकृष्ण यथार्थ रीतीने सांगत आहेत ६६.

इष्ट्वा यथोपदेशं मां दत्वा सर्वस्वमॄत्विजे ।
अग्नीन्स्वप्राण आवेश्य निरपेक्षः परिव्रजेत् ॥ १३ ॥
[श्लोक १३] ज्याला संन्यास घ्यावयाचा असेल त्याने शास्त्रानुसार मला उद्देशून यज्ञ करावा नंतर आपले सर्वस्व ऋत्विजाला देऊन टाकावे यज्ञाचे अग्नी आपल्या प्राणात विलीन करावेत आणि नंतर कसलीही अपेक्षा न ठेवता संन्यास ग्रहण करावा. (१३)

अष्टश्राद्धादि विधान । प्राजापत्यनामिष्टिसाधन ।
मज भगवंतातें यजून । सर्वस्वदान ऋत्विजां ॥ ६७ ॥
– यथाविधि आठ श्राद्धे करून व प्राजापत्य नांवाची इष्टि करून मज भगवंताच्या प्रीत्यर्थ यज्ञ करून ऋत्विजाला सर्वस्वदान करावें ६७.

मुख्यत्वें मूर्त जो अग्नी । तो निजहृदयीं संस्थापूनी ।
आशा निःशेष छेदूनी । संन्यास करूनी निरपेक्ष ॥ ६८ ॥
मुख्यत्वेकरून मूर्त जो अग्नि, त्याची आपल्या हृदयांत स्थापना करून, निःशेष आशा सोडून देऊन संन्यासदीक्षा ग्रहण करून निरिच्छ व्हावें ६८.

संन्यास करितेठायीं । विघ्नें अपार उठतीं पाहीं ।
तीं रगडूनियां पायीं । संन्यास तिंहीं करावा ॥ ६९ ॥
संन्यास ग्रहण करतेवेळी हजारों विघ्ने उत्पन्न होतात, ती सारी पायांखाली तुडवून टाकून संन्यासग्रहण करावें ६९.

विप्रस्य वै संन्यसतो देवा दारादिरूपिणः ।
विघ्नान्कुर्वन्त्ययं ह्यस्मानाक्रम्य समियात्परम् ॥ १४ ॥
[श्लोक १४] जेव्हा ब्राह्मण संन्यास ग्रहण करू लागतो, तेव्हा देव स्त्रीपुरूषादिकांच्या रूपाने त्याच्या संन्यासग्रहणामध्ये विघ्न आणतात, कारण ते असा विचार करतात की, “हा आमची अवहेलना करून, परमात्म्याला प्राप्त करून घेण्यासाठी चालला आहे”. (१४)

संन्यास करिता जो ब्राह्मण । त्यासी समस्त देव मिळोन ।
नाना स्त्रियादि रूपें जाण । अनंत विघ्नें करूं येती ॥ ७० ॥
जो ब्राह्मण संन्यास घेऊ लागतो, त्याला सारे देव मिळून अनेक स्त्रियादिरूपाने अनंत विघ्ने करूं लागतात ७०.

विघ्न करावया कारण । मनुष्य देवांचा पशु जाण ।
सदा अर्पी बळिदान । देवाअधीन हा सर्वदा ॥ ७१ ॥
त्यांनी विघ्न करावयाचे कारण हें की, देवांचा पशु असा जो मनुष्य, तो नेहमी देवांना बलिदान करीत असतो; व त्यांच्या तो अधीन होऊन राहातो ७१.

तो बळी नेदी येथूनि आतां । पाय देऊनि आमुचे माथां ।
घेऊं पाहे ब्राह्मसायुज्यता । यालागीं सर्वथा विघ्नें करिती ॥ ७२ ॥
त्या मनुष्याने संन्यास घेतला म्हणजे तो कांहीं ह्यापुढे आम्हांस बलि देणार नाही, इतकेच नव्हे तर उलट आमच्या डोक्यावर पाय देऊन ब्रह्मपदही घेऊं लागेल, हे मनांत येऊन देव नेहमी त्याला विनंती करूं पाहतात ७२.

तेथ वैराग्यबळें तत्त्वतां । विघ्नें हाणूनियां लातां ।
अवगणूनि देवां समस्तां । संन्यास सर्वथा करावा ॥ ७३ ॥
अशा वेळी खरोखर वैराग्याच्या जोरावर विघ्नांना लाथा हाणून साऱ्या देवांना बाजूस सारून अवश्यमेव संन्यासग्रहण करावें ७३.

ऐसा वैराग्यें उद्‍भट । विवेकज्ञानें अतिश्रेष्ठ ।
संन्यासग्रहण वरिष्ठ । विधिनिष्ट विभागें ॥ ७४ ॥
असा वैराग्याने संपन्न व विवेकज्ञानाने अत्यंत श्रेष्ठ असलेला पुरुष विधिपूर्वक संन्यास घेऊन वरिष्ठ म्ह. पूज्य होऊन राहातो ७४.

एवं झाल्या संन्यासग्रहण । त्याचें विधीचें विधिविधान ।
स्वयें सांगताहे नारायण । स्वधर्मलक्षण संन्यासिया ॥ ७५ ॥
अशा प्रकारे संन्यास ग्रहण केल्यानंतर त्याने विधिपूर्वक कसे वागावें तें संन्यासाचे स्वधर्मलक्षण स्वत: नारायण सांगत आहेत ७५,

बिभृयाच्चेन्मुनिर्वासः कौपीनाच्छादनं परम् ।
त्यक्तं न दण्डपात्राभ्यामन्यत्किञ्चिदनापदि ॥ १५ ॥
[श्लोक १५]

भूतां अभयदानपुरस्कर । संकल्पपूर्वक प्रेषोच्चार ।
तैं उरलें दिसे देहमात्र । सर्वस्य येर त्यागिलें ॥ ७६ ॥
-प्राणिमात्रांना अभयदान देण्याकरितां संकल्पपूर्वक प्रेषोच्चार केल्यानंतर त्याचा देहमात्र राहिलेला दिसतो. बाकी त्याने पूर्वीच सर्वस्वाचा त्याग केलेला असतो ७६.

जो गुरुवाक्यश्रवणासरिसा । वस्तूचि हो‍ऊनि ठेला आपैसा ।
उडाला देहबुद्धिचा वळसा । तुटला फांसा कर्माचा ॥ ७७ ॥
जो गुरुवाक्यश्रवणाबरोबर सहज ब्रह्मस्वरूप होऊन जातो, आणि देहबुद्धीचा ठसा उडून जाऊन ज्याच्या कर्माचाही फासा तुटतो ७७;

त्यासी विधिविधान कर्तव्यता । बोलोंचि नये गा सर्वथा ।
नवनीत आलिया हाता । रितें ताक आतां कोण घुसळी ॥ ७८ ॥
त्याला शास्त्रविधीप्रमाणे वागणेसवरणेची गोष्टसुद्धा कधी बोलू नये. कारण, लोणी हाताला आल्यानंतर मग रिकामें ताक घुसळीत कोण बसणार? ७८.

कापूर मिळालिया वन्हीं । तो परतेना कापूरपणीं ।
तेवीं वस्तु झाला जो गुरुश्रवणीं । तो विधिकिंकरपणीं वर्तेना ॥ ७९ ॥
कापूर अग्नीला मिळाला, म्हणजे मग पुन्हा काहीं तो कापराच्या स्वरूपांत यावयाचा नाही. त्याप्रमाणे गुरुवाक्यश्रवणानें जो ब्रह्मरूप झाला तो काही विधिनिषेधाचा ताबेदार होऊन राहणार नाही ७९.

परी गुरुवाक्यें तत्त्वतां । ज्यासी ऐसी हे अवस्था ।
सत्य न बाणेचि सर्वथा । त्याची विधानता अवधारीं ॥ ८० ॥
परंतु खरोखर गुरुवाक्याने ज्याला अशी अवस्था बाणली नसेल, त्याच्या वागणुकीचा प्रकार ऐक ८०.

गुरुवाक्याचें करितां मनन । नागवेपणीं लाजे मन ।
तरी लिंगमात्र आच्छादन । कौपीन जाण धरावी ॥ ८१ ॥
गुरुवाक्याचे मनन करतांना नागवेपणाने राहण्याला लज्जा वाटेल तर लिंगाच्या आच्छादनापुरती कौपीन धारण करावी ८१.

इतुकेन निर्वाह न सरे । ऐसें जाणवलें जैं पुरें ।
तैं वस्त्रखंड दुसरें । स्वाधिकारें धरावें ॥ ८२ ॥
अथवा तेवढ्याने काही निर्वाह होत नाही असे वाटेल, तर आपल्याला योग्य असा दुसरा कापडाचा तुकडा घ्यावा ८२.

दंड कमंडलु जंव आहे । तंव कौपीन बहिर्वास राहे ।
दंडत्यागासवें पाहें । त्याग होये वस्त्रांचा ॥ ८३ ॥
दंड आणि कमंडलु जोपर्यंत असतो, तोपर्यंत कौपीनही अंगवस्त्रासह राहते. आणि दंडाचाही जेव्हां त्याग केला जातो तेव्हां वस्त्राचाही त्याबरोबर त्याग होतो ८३.

आपत्तिकाळीं संन्याशासी । रोग लागला होय ज्यासी ।
का जरेनें व्यापिलें देहासी । तैं जें लागेल त्यासी तें द्यावें ॥ ८४ ॥
संन्याशाला विपत्तिकाल प्राप्त झाला, किंवा त्याला रोग जडला, किंवा वृद्धापकाळानें देह जर्जर झाला, तर त्याला जे लागेल तें देत असावे ८४.

गुरुवाक्यें श्रवण मनन । ऐसें साधी जो साधन ।
त्या साधकाचें लक्षण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ८५ ॥
गुरुवाक्याचे श्रवण मनन करणे एतद्रूप साधन जो साधतो, त्या साधकाचे लक्षण स्वतः श्रीकृष्ण सांगत आहेत ८५.

दृष्टिपूतं न्यसेत्पादं वस्त्रपूतं पिबेज्जलम् ।
सत्यपूतां वदेद्वाचं मनःपूतं समाचरेत ॥ १६ ॥
[श्लोक १६] संन्याशाने वस्त्र धारण केलेच, तर फक्त लंगोटी व त्यावर एक लहानशी छाटी असावी संकटकाळ नसेल तर त्याने फक्त दंड आणि कमंडलू या व्यतिरिक्त दुसरी कोणतीही पूर्वी टाकलेली वस्तू बाळगू नये. (१५)

दृष्टि ठायीं ठेवूनि जाण । पृथ्वी पाहूनि पावन ।
हंसगतीं करी गमन । अनुसंधान निजवृत्तीं ॥ ८६ ॥
भूमीवर दृष्टि ठेवून, जमीन पवित्र पाहून, आत्मवृत्तीचें अनुसंधान ठेवून तो हंसगतीने म्ह० सावकाश चालतो ८६ ;

जेथ जीवसंपदा दृष्टीं पडे । तैं प्राण गेल्या न चले पुढें ।
जीवांतें काढूनि कडे । पाऊल पडे अतिशुद्ध ॥ ८७ ॥
जेथें जीवमात्र दृष्टीस पडेल तेथें प्राण गेला तरी पुढे पाऊल टाकावयाचा नाही. त्या जीवाला कडेला काढून पाऊल अत्यंत निर्मळ जाग्यावर ठेवतो ८७.

आधींच पवित्र गंगाजळ । त्याचा निर्मळ वस्त्रें निरसोनि मळ ।
यापरी करोनियां निर्मळ । गंगाजळ सेविती ॥ ८८ ॥
गंगाजळ हे आधीच पवित्र ; त्यांतील खळमळही निर्मळ वस्त्राने गाळून टाकतो व अशा रीतीने निर्मळ करून पाणी पितो ८८.

ज्याचे वाचेचे आळां । असत्याच्या तृणशाळा ।
जाळूनि वैराग्यज्वाळा । सत्याचा उगवला कल्पद्रुम ॥ ८९ ॥
त्याच्या वाणीच्या आळ्यांत, असत्यरूप गवताचा पेंढा वैराग्यरूपी अग्निज्वाळांनी जाळून टाकून तेथे सत्याचा कल्पवृक्ष उगवतो ८९.

ज्या कल्पद्रुमाचीं वचनफळें । परिपक्वे आणि सोज्वळें ।
मधररसेंसीं रसाळें । अतिनिर्मळें घमघमितें ॥ ९० ॥
त्या कल्पवृक्षाची वचनरूप फळे अत्यंत रसाळ व परिपक्व झालेली, मधुर रसाने थबथबलेली, अत्यंत निर्मळ व घमघमीत स्वादाची असतात ९०.

जें श्रवणीं अतिगोड । पुरवी श्रोतयांचें कोड ।
निववी जीवाची चाड । सत्य सुरवाड हा वाचेचा ॥ ९१ ॥
ती श्रवणाने चाखली असतां अत्यंत गोड, श्रोत्यांची इच्छा तृप्त करणारी, आणि जीवाची इच्छा पूर्ण करणारी असतात. ‘सत्यपूत’ म्हणजे सत्याने पावन झालेली वाणी ती हीच ९१.

सहजें संन्याशाचें ध्यान । `अहमेव नारायण’ ।
तें दृढ धरोनि अनुसंधान । पवित्र मन करावें ॥ ९२ ॥
(आतां मनाची पवित्रता सांगतात.) संन्याशाचे स्वाभाविक ध्यान म्हणजे ‘नारायण तो मीच’ हे होय. ही दृढतर भावना धरून मन पवित्र करावें ९२.

मन करोनि पावन । पृथ्वी विचरावी जाण ।
त्या मनाचें पवित्रपण । सर्वत्र आपण लक्षावें ॥ ९३ ॥
मन पवित्र करून पृथ्वीचें पर्यटन करावे. सर्वत्र आत्मस्वरूप आहे असे पाहाणे, हेच मनाचे पवित्रपण होय ९३.

संन्याशाचे धर्मीं जाण । मुख्यत्वें हेंचि लक्षण ।
पवित्र करोनि अंत:करण । सर्वत्र नारायण लक्षावा ॥ ९४ ॥
संन्याशाच्या धर्मामध्ये मुख्य लक्षण हेच आहे की, अंतःकरण पवित्र करून सर्व ठिकाणी नारायणस्वरूपाचीच भावना धरावी ९४.

मनाचें पवित्रपण । उद्धवा या नांव जाण ।
आतां त्रिदंडाचें लक्षण । संन्यासनिरूपण तें ऐक ॥ ९५ ॥
उद्धवा ! ह्याचेच नाव मनाचा पवित्रपणा हे लक्षात ठेव. त्रिदंड संन्यासाचे लक्षण कसे असते तेही ऐक ९५.

मौनानीहानिलायामा दण्डा वाग्देहचेतसाम् ।
न ह्येते यस्य सन्त्यङ्ग वेणुभिर्न भवेद्यतिः ॥ १७ ॥
[श्लोक १७] उद्धवा ! वाणीचा मौन, शरीराचा काम्यकर्मत्याग आणि मनाचा प्राणायाम, हे दंड होत ज्याच्याजवळ हे तिन्ही दंड नाहीत, तो केवळ बांबूचे दंड घेऊन संन्यासी होत नाही. (१७)

मौन अथवा सत्य भाषण । कां श्रीरामनामाचें स्मरण ।
हो कां ओंकाराचें उच्चारण । `वाग्दंड’ जाण या नांव ॥ ९६ ॥
मौन अथवा सत्य भाषण, किंवा श्रीरामाचे नामस्मरण, अथवा ओंकाराचा उच्चार. याचे नांव ‘वाग्दंड’ ९६.

शरीरींचे जितुकें चळण । तें प्राणाचेनि बळें जाण ।
त्या प्राणाचें प्राणरोधन । करावें आपण प्राणायामें ॥ ९७ ॥
शरीरांतील जितकें म्हणून चलनवलन आहे, तितकें सारे प्राणाच्याच शक्तीने होते. त्या प्राणाचा प्राणायामाने आपण निरोध करावा ९७.

प्राणायामें निजप्राण । जिणोनि करावा स्वाधीन ।
या नांव `देहदंड’ जाण । ऐक लक्षण `मनोदंडाचें’ ॥ ९८ ॥
प्राणायामाच्या योगाने प्राण जिंकून आपल्या स्वाधीन ठेवावा. ह्याचें नांव ‘देहदंड’. आतां मनोदंडाचे लक्षण ऐक ९८.

मनाचें चपळपण । संकल्प विकल्प जाण ।
त्याचें करावया छेदन । ब्रह्मानुसंधान करावें ॥ ९९ ॥
संकल्प आणि विकल्प हाच मनाचा चपलपणा आहे. त्याचे छेदन करण्याकरितां ब्रह्मस्वरूपाचे अनुसंधान करावें ९९.

माझें स्वरूप सर्वगत । तेथ निश्चयें ठेवितां चित्त ।
मन संकल्पविकल्पें जाय जेथ । तेथ तेथ स्वरूप ॥ १०० ॥
माझें स्वरूप सर्वव्यापी आहे ; त्याच्यावर दृढभावनेनें चित्त ठेवले म्हणजे संकल्पविकल्पाने मन जेथे जेथे जाईल, तेथे तेथे माझें स्वरूप असतेच १००.

ऐसें सावध राखतां मन । दृढ लागल्या अनुसंधान ।
तंव संकल्पविकल्प क्षीण । सहजचि जाण स्वयें होती ॥ १ ॥
असें मन सावध ठेवलें व ब्रह्मस्वरूपाचे दृढ़ अनुसंधान लागले म्हणजे संकल्प-विकल्प हे आपोआपच क्षीण होत जातात १.

देह वाचा आणि मन । या त्रिदंडांचें लक्षण ।
तुज म्यां सांगितले संपूर्ण । संन्यासत्व जाण येणें सत्य ॥ २ ॥
काया, वाचा आणि मन ह्या त्रिदंडाचें सारें लक्षण मी तुला सांगितले. ह्याच्याच योगानें खराखरा संन्यासपणा प्राप्त होतो २.

हे तिन्ही दंड नसतां जाण । केवळ वेणुदंडग्रहण ।
तेणें संन्यासत्व न घडे जाण । देहविटंबन दंभार्थ ॥ ३ ॥
हे तिन्ही दंड नसतां केवळ कळकाचा दंड घेतला, तर त्याने काही संन्यासत्व घडत नाही. दंभार्थ संन्यास घेणे ही शुद्ध देहविटंबना होय ३.

सन्याशाचा आहार विहार । आचार संचार विचार ।
स्वधर्मयुक्त साचार । स्वयें सारंगधर सांगतु ॥ ४ ॥
आतां संन्याशाचा खरोखर स्वधर्ममुक्त आहारविहार, आचारविचार, जाणेयणे, इत्यादि कसे असावें तें श्रीकृष्ण स्वतः सांगत आहेत ४.

भिक्षां चतुर्षु वर्णेषु विगर्ह्यान्वर्जयंश्चरेत् ।
सप्तागारानसंक्लृप्तांस्तुष्येल्लब्धेन तावता ॥ १८ ॥
[श्लोक १८] संन्याशाने निंदित आणि पतित सोडून चारही वर्णांकडून भिक्षा स्वीकारावी प्रथम न ठरवता फक्त सात घरातून भिक्षा स्वीकारावी भिक्षेमध्ये जे काही मिळेल, त्यात संतुष्ट असावे. (१८)

पूर्वी जाण संन्याशासी । चतुर्वर्णीं भिक्षा होती त्यासी ।
कलियुगीं गोष्टी झाली कैसी । ब्राह्मणापाशीं चतुर्वर्ण ॥ ५ ॥
पूर्वी संन्याशांना चारही वर्णामध्ये भिक्षा होती. पण कलियुगामध्ये असा प्रकार झाला की, ब्राह्मणांमध्येच चार वर्ण झाले ५.

ज्याची जीविका जेणें जाण । त्या ब्राह्मणाचा तोचि वर्ण ।
ऐका तेंही प्रकरण । जीविकालक्षण सांगेन ॥ ६ ॥
ज्या वृत्तीच्या योगानें ब्राह्मणाचा उदरनिर्वाह होतो, तोच त्या ब्राह्मणाचा वर्ण होय. याकरितां तेही प्रकरण ऐका. जीविकेचे प्रकार सांगतों ६.

`मुख्य ब्राह्मणाची वृत्ती’ जाण । `शिल’ `उंछ’ का `कोरान्न’ ।
अयाचित का अध्यापन । अथवा याजन जीविकेसी ॥ ७ ॥
ब्राह्मणाची उपजीविकेची मुख्य वृत्ति म्हटली म्हणजे शिल, उंछ अथवा कोरान्न; तसेंच अयाचित, अध्यापन किंवा याजन हीही उपजीविकेची साधने होत ७.

जो जीविकेलागीं निर्धारीं । शस्त्र घेऊनियां करीं ।
शूरवृत्तीं जीविका करी । तो जाणावा `क्षत्री’ ब्राह्मणांमाजीं ॥ ८ ॥
जो उपजीविकेसाठी धैर्याने शस्त्र हातात घेऊन शूरवृत्तीने आपला निर्वाह करतो, तो ब्राह्मणांतील ‘क्षत्रिय’ म्हणून समजावें ८.

जो वाणिज्यवृतीवरी । नित्य जीविका आपुली करी ।
तो ब्राह्मण ब्राह्मणामाझारीं । `वैश्य’ निर्धारीं निश्चित ॥ ९ ॥
जो नित्य वाणीपणाचा धंदा पतकरून आपली उपजीविका चालवितो, तो खरोखर ब्राह्मणांतीक ‘वैश्य’ होय ९.

जो शूद्राचे शूद्रक्रियेवरी । सदा सर्वदा जीविका करी ।
तो ब्राह्मण शूद्रकर्मेंकरीं । `शूद्रत्व’ धरी क्रियायोगें ॥ ११० ॥
आणि जो शूद्राच्या वृत्तीवरच सदासर्वदा आपली उपजीविका करतो, तो ब्राह्मण शतकर्में करीत असल्याने, त्या कर्मामुळे ‘शूद्र’ होतो ११०.

जैं उत्तम ब्राह्मणाची भिक्षा न लभे । तैं क्षत्रियब्राह्मणीं भिक्षा लाभे ।
क्षात्रब्राह्मणांचेनि अलाभें । वैश्यादि ब्राह्मणीं लाभे भिक्षाग्रहण ॥ ११ ॥
जेव्हां ‘उत्तम’ बाह्मणाची भिक्षा मिळत नाही, तेव्हां क्षत्रियवृत्तीने राहणाऱ्या ब्राह्मणापाशीं भिक्षा मिळवावी. क्षत्रिय-ब्राह्मणाच्या घरी भिक्षान्न न मिळेल तर वैश्य-ब्राह्मणाकडे भिक्षा मिळवावी ११.

ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्यब्राह्मणीं । भिक्षेस अप्राप्त हे तिनी ।
तैं शूद्रजीविका-ब्राह्मणीं । भिक्षाग्रहणीं अधिकारु ॥ १२ ॥
ब्राह्मण , क्षत्रिय व वैश्य या तिन्ही ब्राह्मणांमध्ये भिक्षा न मिळेल तर शूद्रवृत्तीवर निर्वाह करणाऱ्या ब्राह्मणाच्या घरी भिक्षा घेण्याचा अधिकार आहे १२.

यांत निंद्य जे ब्राह्मणाआंतु । केवळ दोषी अथवा अभिशप्तु ।
ते भिक्षेसी न लावावा हातु । हा स्वधर्मार्थु भिक्षेचा ॥ १३ ॥
या ब्राह्मणांतही जे केवळ निंद्य असतील, दोषी अथवा बहिष्कृत असतील, त्यांच्या भिक्षेला हात लावू नये. हाच भिक्षेचा धर्म होय १३.

तेही भिक्षा अतिनेमस्त । भिक्षेसी येतों हें कळों नेदित ।
मागावीं नेमिलीं घरें सात । जें झालें प्राप्त तेणें सुखी ॥ १४ ॥
भिक्षा घेणे तीही अत्यंत नियमित घेत असावी. आपण भिक्षेला येत आहोत हे कळू देऊ नये. मोजकी सात घरेच भिक्षा मागावी. आणि त्यांत जे मिळेल त्यांतच तृप्त असावें १४.

जे सातां घरीं भिक्षा प्राप्त । ते भिक्षेचा धर्म विहित ।
स्वयें सांगे श्रीकृष्णनाथ । स्मृतिशास्त्रार्थप्रयोगें ॥ १५ ॥
आतां सात घरांत जी भिक्षा मिळेल, त्या भिक्षेचा स्मृतिशास्त्रांत विहित धर्म कसा ते स्वतः श्रीकृष्ण सांगतात १५.

बहिर्जलाशयं गत्वा तत्रोपस्पृश्य वाग्यतः ।
विभज्य पावितं शेषं भुञ्जीताऽशेषमाहृतम् ॥ १९ ॥
[श्लोक १९] अशा प्रकारे भिक्षा घेऊन गावाबाहेर जलाशयावर जावे तेथे हातपाय धुऊन पाण्याने प्रोक्षण करून भिक्षा पवित्र करावी नंतर शास्त्रोक्त पद्धतीने भिक्षेचे भाग ज्यांनात्यांना देऊन जे शिल्लक राहील, ते मौन धारण करून सर्व खावे. (१९)

ग्रामाबाहेर गंगातीरीं । अथवा तडागाचे परिसरीं ।
भिक्षा धरोनियां करीं । आचमन तीरीं करावें ॥ १६ ॥
ती मिळालेली भिक्षा हातात घेऊन गांवाच्या बाहेर नदीकाठावर किंवा एखाद्या सरोवराच्या तीरावर यावे आणि तेथे आचमन करावें १६.

याचित जें भिक्षेचें अन्न । तें द्वादशप्रणवें अभिमंत्रून ।
तेणें मंत्रोदकें प्रोक्षीतां जाण । होय पावन पवित्र ॥ १७ ॥
याचना करून जें भिक्षेचे अन्न मिळालेले असते, ते बारा प्रणवमंत्राने अभिमंत्रण करावे. त्या मंत्रोदकानें तें अन्न प्रोक्षण केले म्हणजे पवित्र होते १७.

चतुर्धा करावें त्या अन्नातें । चार अधिकारी त्या भागतें ।
ब्रह्मा विष्णु अर्क आणि भूतें । अर्पण तेथें अवधारीं ॥ १८ ॥
नंतर त्या अन्नाचे चार भाग करावेत. ब्रह्मा, विष्णु, सूर्य आणि जीवमात्र असे त्याचे चार अधिकारी होत. त्यांस ते कसें अर्पण करावयाचें तें ऐक १८.

विष्णुकल्पित जो भाग । तो जळीं घालावा साङ्ग ।
भूतकल्पित जो विभाग । तो पृथ्वीवरी चांग ठेवावा ॥ १९ ॥
विष्णुप्रीत्यर्थ जो भाग काढलेला असेल तो पाण्यात टाकावा; आणि जीवांसाठी जो भाग काढलेला असेल तो नीटपणे जमिनीवर ठेवून द्यावा १९.

उरले जे विभाग दोनी । यतीसी अधिकार सेवनीं ।
दीन मागों आलिया ते क्षणीं । भूतदयागुणीं अन्न द्यावें ॥ १२० ॥
बाकी दोन भाग राहिले ते संन्याशाला सेवन करण्याला अधिकार आहे. किंवा तितक्यांत कोणी गरीब मागावयास आला तर भूतदयेच्या दृष्टीने त्याला तत्काल अन्न द्यावें १२०.

परी मी एक अन्नदाता । हें आठवोंही नये चित्ता ।
आल्या दातेपणाची अहंता । अधर्मता संन्यासीं ॥ २१ ॥
पण ‘मी एक अन्नदाता’ अशी मनांत वृत्तिही उठं देऊं नये. दातेपणाचा अभिमान झाला की, संन्यासव्रतामध्यें तो अधर्मच समजावा २१.

मधुकरीचें अवघेंचि अन्न । समयीं मागों येती दीन ।
येणें उद्देशें अधिक अन्न । सर्वथा जाण मागों नये ॥ २२ ॥
मधुकरीचे सगळेच अन्न वेळेला एखादा गरीब मागावयास येतो या उद्देशाने अधिक अन्न कधीही मागू नये २२.

करितां मधुकरीभोजन । ठायीं अधिक उरलिया अन्न ।
तें सांडितां अतिपतन । अवघेंच जाण भक्षावें ॥ २३ ॥
मधुकरीचे भोजन करतांना पात्रांत अधिक अन्न उरलें. तर ते टाकलें असतां मोठा दोष लागतो. याकरितां तें सारेंच भक्षण केले पाहिजे २३.

संन्यासधर्मीं लघु आहार । नित्य करावा निरंतर ।
अधिक आहारीं विकार । निद्रा आळस फार बाधिती ॥ २४ ॥
पण संन्यासधर्मामध्ये सदासर्वदा लघु आहार केला पाहिजे. अधिक भोजन केले असता अनेक विकार उत्पन्न होतात. निद्रा व आळस यांची फारच पीडा होत असते २४.

ज्यालागीं कीजे चतुर्थाश्रम । तो संन्याशाचा मुख्य धर्म ।
स्वयें सांगे पुरुषोत्तम । जेणें आत्माराम पाविजे ॥ २५ ॥
आतां ज्यासाठी संन्यासाश्रम घ्यावयाचा, तो संन्याशाचा मुख्य धर्म, की ज्याच्या योगाने आत्मपदप्राप्ति होते. तो स्वत: श्रीकृष्ण सांगत आहेत २५.

एकश्चरेन्महीमेतां निःसङ्गः संयतेन्द्रियः ।
आत्मक्रीड आत्मरत आत्मवान् समदर्शनः ॥ २० ॥
[श्लोक २०] संन्याशाने सगळीकडे एकट्यानेच फिरावे कोठेही आसक्ती ठेवू नये इंद्रिये ताब्यात ठेवावीत आत्म्याशीच खेळावे आत्मप्रेमातच तन्मय असावे, प्रतिकूल परिस्थितीतही धैर्याने वागावे आणि परमात्म्याला सगळीकडे समदृष्टीने पाहात राहावे. (२०)

सदा वैराग्य अंगीं पुरतें । जो अपेक्षीना सांगात्यातें ।
निःसंग होत्साता चित्तें । सुखें पृथ्वीतें विचरतु ॥ २६ ॥
सदासर्वदा अंगामध्ये परिपूर्ण वैराग्य ; तो कोणा सोबत्याची इच्छा करीत नाही. मनाने निःसंग होऊन पृथ्वीवर आनंदाने फिरत असतो २६.

इंद्रियें बांधोनि चित्ताच्या पायीं । चित्त लावी चैतन्याच्या ठायीं ।
तेणें चिन्मात्र ठसावें पाहीं । देहत्व देहीं स्मरेना ॥ २७ ॥
इंद्रियांना चित्ताच्या पायाला बांधून, चित्त हे चैतन्याच्या ठिकाणी लावतो. त्यामुळे त्याला सर्वत्र चिन्मयस्वरूपच दिसू लागते. देहाचा देहपणाच आठवत नाही २७.

ऐसा आत्मस्थितीचा उद्यम । तेणें आत्मक्रीडेचा आराम ।
आत्मसुखाचा संभ्रम । अनुभव परम तो ऐक ॥ २८ ॥
आत्मस्थितीचा उद्यम असाच असतो, त्यायोगें आत्मक्रीडेतच त्याला आराम वाटतो. आतां आत्मसुखाचा उत्साह व श्रेष्ठ अनुभव कसा असतो तो ऐक २८.

आत्मस्थिति निजात्मयुक्त । तेणें आत्मसुखें उल्हासत ।
सदा समदर्शनें डुल्लत । वोसंडत समसाम्यें ॥ २९ ॥
तो आत्मस्थितीने निजात्मयुक्त झाल्यामुळे आत्मानंदांतच निमग्न असतो व सर्वत्र ऐक्यभावनेनें सदासर्वदा डुलत राहुन, समरसत्वानें तो भरून जात असतो २९.

ऐशिया समसुखाची संपत्ती । भोगावया सुनिश्चितीं ।
सदा एकाकी वसे एकांतीं । तेंचि श्रीपती सांगत ॥ १३० ॥
अशा समत्वसुखाचें ऐश्वर्य निश्चिंतपणाने भोगावयाला मिळावे म्हणून तो नेहमी एकांतांतच एकटा राहत असतो. तेंच श्रीकृष्ण सांगताहेत १३०.

विविक्तक्षेमशरणो मद्‍भावविमलाशयः ।
आत्मानं चिन्तयेदेकमभेदेन मया मुनिः ॥ २१ ॥
[श्लोक २१] संन्याशाने निर्जन पण निर्भय अशा एकांतात राहावे माझ्यावरील प्रेमाने त्याचे हृदय विशुद्ध असावे त्याने स्वतःला माझ्यापासून अभिन्न समजावे. (२१)

पवित्र आणि विजन । प्रशस्त आणि एकांतस्थान ।
तेणें माझें अनुसंधान । सद्‍भावें जाण सर्वदा ॥ ३१ ॥
-पवित्र आणि निर्जन, प्रशस्त आणि एकांत अशी जागा पाहून तेथें सद्भक्तीने सदासर्वदा माझें ध्यान करावें ३१.

तेथें सांडून जनपद दुश्चित । सदा एकांतीं व्हावें निरत ।
मद्‍भावें सुनिश्चित । आत्मसुख प्राप्त साधकां ॥ ३२ ॥
अशा साधकानें संसारदुःखांत मग्न झालेले लोक सोडून देऊन निरंतर एकांतांतच रममाण होऊन राहिले पाहिजे. कारण मद्भावयुक्त राहिल्याने साधकांना आत्मसुखाची प्राप्ति होते ३२.

ज्यासी निजात्मसुख झालें प्राप्त । तो होय अनन्यशरणागत ।
मीवांचूनि जगाआंत । आणीक अर्थ देखे न ॥ ३३ ॥
आणि ज्याला आत्मसुखाची प्राप्ति झाली, तो मला अनन्यभावानें शरण असतो. त्याला या जगांत माझ्याशिवाय दुसऱ्या कशांत अर्थ म्हणून दिसतच नहीं ३३.

ऐसे अनन्य करितां माझें ध्यान । साधक विसरे मीतूंपण ।
तेव्हां अभेदें चैतन्यघन । मद्‌रूप जाण तो होय ॥ ३४ ॥
याप्रकारें माझे अनन्य ध्यान केले असतां साधक मीतूंपण विसरूनच जातो. तेव्हां भेदभाव नाहीसा झाल्यामुळे तो चैतन्यधन असा मत्स्वरूपच होऊन राहातो ३४.

त्या मद्‌रूपाचे स्वरूपस्थिती । पाहों जातां निजात्मवृत्ती ।
मी ना तो ऐशी होय गती । `अभेदप्राप्ती’ या नांव ॥ ३५ ॥
त्या माझ्या स्वरूपाची स्थिति अशी असते की, आत्मदृष्टीने पाहूं लागळे असतां मीही नाही आणि तोही नाही अशी दशा होते. या स्थितीलाच ‘अभेदप्राप्ति’ म्हणतात ३५.

जंव असे द्वैतवार्ता । तंव भयाची बाधकता ।
अभेदत्व आल्या हाता । निर्भयता साधकां ॥ ३६ ॥
द्वैतभावना जोपर्यंत असते, तोपर्यंतच साधकाला संसारभय बाधत असते. अभेदभावना एकदा हाताला चढली की, साधक निर्भय होतो ३६.

अभेदप्राप्तीच्या ठायीं । बंधमोक्षांची वार्ता नाही ।
गडगर्जे बंधमोक्ष पाहीं । नांदती नवायी हरि बोले ॥ ३७ ॥
कारण, अभेदभावनेच्या ठिकाणी बंधाची आणि मोक्षाची वार्ताच राहात नाही. आतां बंध व मोक्ष जिकडे गडगर्जना करीत नांदतात, त्यांची नवलाई श्रीकृष्ण सांगताहेत ३७.

अन्वीक्षेतात्मनो बन्धं मोक्षं च ज्ञाननिष्ठया ।
बन्ध इन्द्रियविक्षेपो मोक्ष एषां च संयमः ॥ २२ ॥
[श्लोक २२] त्याने आपल्या ज्ञाननिष्ठेने चित्ताचे बंधन आणि मोक्ष यासंबंधी विचार करावा व असा निश्चय करावा की, विषयोपभोगासाठी इंद्रियांचे चंचल होणे, हे बंधन आहे आणि त्यांना नियंत्रणाखाली ठेवणे, हाच मोक्ष होय. (२२)

ऐक्यें पावोनि एकात्मता । तेथूनि बंधमोक्ष पाहतां ।
दोंहीची मिथ्या वार्ता । मायिकता निश्चित ॥ ३८ ॥
ऐक्यस्वरूपाला पोंचून एकात्मता झाल्यानंतर बंधमोक्षाकडे पाहूं लागले म्हणजे ते दोन्ही खरोखर मायिक व मिथ्याच भासू लागतात ३८.

प्रवृत्तीमाजीं बंधमोक्षता । त्या दोंहीची विभागता ।
इंद्रियांची जे विषयासक्तता । `दृढबद्धता’ ती नांव ॥ ३९ ॥
बंध आणि मोक्ष हे प्रवृत्तीमध्येच असतात. त्या दोहोंचे भेद हेच की. इंद्रियांची विषयासक्तता याचे नांव दृढबंधन’ ३९.

काया-वाचा-चित्तवृत्तीं । निःशेष विषयांची विरक्ती ।
या नांव साचार `मुक्ति’ । जाण निश्चितीं उद्धवा ॥ १४० ॥
आणखी उद्धवा! कायावाचामनेंकरून निखालस विषयांची जी विरक्ति तीच खरोखर ‘मुक्ति’ असे समज १४०.

ज्यासी साचार पाहिजे मुक्ती । तेणें करावी विषयनिवृत्ती ।
हेचि मुख्यत्वें उपायस्थिती । कृष्ण कृपामूर्ती सांगत ॥ ४१ ॥
ह्याकरितां ज्याला खरोखर मुक्ति पाहिजे असेल, त्याने विषयांची निवृत्ति केली पाहिजे. कृपेची केवळ मूर्ति जे श्रीकृष्ण ते मुख्यत्वेकरून त्याचाच उपाय सांगत आहेत ४१.

तस्मान्नियम्य षड्वर्गं मद्‍भावेन चरेन्मुनिः ।
विरक्तः क्षुल्लकामेभ्यो लब्ध्वाऽऽत्मनि सुखं महत् ॥ २३ ॥
[श्लोक २३] म्हणून संन्याशाने मन आणि पाचही इंद्रिये यांना जिंकावे, भोग हे क्षुद्र आहेत असे समजून त्यांच्याबाबत विन्मुख असावे आणि आत्म्यातच परम आनंदाचा अनुभव घ्यावा अशा प्रकारे माझ्याशी एकरूप होऊन राहावे. (२३)

येणें विचारें विचारिता । विषयासक्ती दृढबद्धता ।
त्या विषयांचा त्याग करितां । निजमुक्तता सहजेंचि ॥ ४२ ॥
अशा दृष्टीने विचार करतांना विषयासक्तीनें दृढतर ‘बंधन’ प्राप्त होते; त्या विषयांचाच त्याग केला म्हणजे आपली ‘मुक्ति’ सहज सिद्ध आहे ४२.

तेचि विषयांची विरक्ती केवीं । आतुडे आपुल्या हातीं ।
यालागीं वैराग्याची उत्पत्ती । साधकें निश्चितीं साधावी ॥ ४३ ॥
पण तीच विषयाची विरक्ति आपल्या हाती कशी लागेल ? तर यासाठी साधकानें वैराग्य उत्पन्न होईल, तो तो यत्न करावा ४३.

अंतरीं वासना दृढमूळ । विषयशाखा तेणें सबळ ।
ते वासना छेदावया समूळ । वैराग्य सबळ साधावें ॥ ४४ ॥
अंत:करणामध्ये वासना दृढमूल असते; तिला विषयरूप शाखा फुटून त्या माजतात ; याकरितां ती वासनाच समूळ छेदून टाकण्यासाठी कडकडीत वैराग्य साध्य करावें ४४.

वैराग्यप्राप्तीचें कारण । स्वधर्मकर्म मदर्पण ।
सांडावें कर्माचें कर्तेपण । `मदर्पण’ या नांव ॥ ४५ ॥
स्वधर्मकर्म करून ते मला अर्पण करावे, हेच वैराग्यप्राप्तीचे मुख्य साधन आहे. कर्म करून त्याचे कर्तेपण सोडून देणे ह्याचंच नांव ‘मदर्पण’ होय ४५.

मदर्पणें कर्मस्थिती । तेणें माझ्या ठायीं उपजें प्रीती ।
माझें नाम माझी कीर्ती । चिंतन चित्तीं पैं माझें ॥ ४६ ॥
मदर्पणबुद्धीने कर्म करूं लागले म्हणजे माझ्यावर प्रेम उत्पन्न होते. आणि चित्ताला माझेच नाम, माझीच कीर्ति आणि माझेच चिंतन घडू लागते ४६.

ऐशिया माझ्या परम प्रीतीं । होय वैराग्याची उत्पत्ती ।
तेणें विषयांची विरक्ती । माझी सुखप्राप्ती शनैःशनैः ॥ ४७ ॥
अशी मजवर अत्यंत प्रीति जडली म्हणजे वैराग्य उत्पन्न होते. आणि तेणेकरून विषयांची विरक्ति घडून हळू हळू माझ्या सुखाची प्राप्ति होते ४७.

माझेनि सुखें माझें भजन । अत्यंत थोरावे पैं जाण ।
तेव्हा सर्वत्र मद्‍भावन । ब्रह्मत्वें पूर्ण ठसावे ॥ ४८ ॥
माझ्या सुखाने माझें भजन अत्यंत वाढू लागते. आणि सर्व ठिकाणी माझीच ब्रह्मत्वाने भावना पूर्णपणे ठसते ४८.

सर्वत्र ब्रह्मभावन । ब्रह्मसुखाचें अनुसंधान ।
धरूनि करावें पर्यटण । जंव निर्वासन मन होय ॥ ४९ ॥
याकरितां सर्वत्र एक ब्रह्मच भरलेले आहे अशी भावना धरून, महासुखावरच लक्ष ठेवून मन वासनारहित होईपर्यंत पर्यटण करीत असावें ४९.

पुत्रग्रामव्रजान् सार्थान् भिक्षार्थं प्रविशंश्चरेत् ।
पुण्यदेशसरिच्छैलवनाश्रमवतीं महीम् ॥ २४ ॥
[श्लोक २४] पवित्र देश, नद्या, पर्वत, वने, आणि आश्रमांनी परिपूर्ण अशा पृथ्वीवर फिरत राहावे फक्त भिक्षेसाठीच नगर, गाव, गौळवाडा किंवा यात्रेकरूंच्या समूहात जावे. (२४)

पृथ्वी विचरणें विचित्र । पुण्यदेश कुरुक्षेत्र ।
सप्त पुर्‍या परम पवित्र । पुष्करादि थोर महातीर्थें ॥ १५० ॥
चांगल्या चांगल्या पुण्यक्षेत्री फिरून पृथ्वीपर्यटन करावे. पवित्र असें कुरुक्षेत्र, अत्यंत पवित्र अशा सात पुऱ्या [अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, जगन्नाथपुरी व द्वारका.] पुष्कर, प्रयागराज वगैरे तीर्थे , १५०,

कृतमाला पयस्विनी । पुण्यरूप ताम्रपर्णी ।
गौतमी रेवा त्रिवेणी । परमपावनी गोमती ॥ ५१ ॥
कृतमाला, पयस्विनी, पुण्यस्वरूप अशी ताम्रपर्णी, गोदावरी, नर्मदा, त्रिवेणी, परमपवित्र अशी गोमती ५१:

कृष्णा वेण्या तुंगभद्रा । तपती पयोष्णी भिंवरा ।
यमुना भागीरथी नीरा । गंगा सागरासंगमीं ॥ ५२ ॥
कृष्णा. वेण्या, तुंगभद्रा, तापी, पायोष्णी, चंद्रभागा, यमुना, भागीरथी, नीरा, किंवा गंगा समुद्राला मिळते तो संगम ५२,

ऋष्यमूक श्रीशैल व्यंकटाद्री । मूळपीठींचा सह्याद्री ।
गौतमीतीरींचा ब्रह्मगिरी । जो पापें संहारी यात्रामात्रें ॥ ५३ ॥
ऋष्यमूक, श्रीशैल, व्यंकटादि (व्यंकटगिरि), मूळपीठाचा सद्यादि, किंवा गौतमीतीरावरील ब्रह्मगिरि यांची यात्रा केली असतां सर्व पातकांचा संहार होतो ५३.

हो कां चढता हिमगिरी । पदीं दुरितांतें दूर करी ।
निःशेष पापांतें निवारी । ते यात्रा मुनीश्वरीं अवश्य कीजे ॥ ५४ ॥
हिमालय पर्वत चढू लागले असता, प्रत्येक पावला-पावलाने पातकनाश होत होत, सर्व पातकांचा नाश होतो. याकरितां मुनिश्रेष्ठांनी ती यात्रा अवश्य करावी ५४.

दंडकारण्य बृहद्वन । नैमिषारण्य आनंदवन ।
इत्यादि वनांचें गमन । संन्याशीं जाण करावें ॥ ५५ ॥
दंडकारण्य नांवाचे मोठे अरण्य, नैमिषारण्य, आनंदवन (काशीजवळ) इत्यादि वनांमध्ये संन्याशाने अवश्य जावें ५५.

च्यवनकपिलव्यासाश्रम । गौतमवामन‍आश्रमोत्तम ।
यात्रा श्रेष्ठ बदरिकाश्रम । जो सकळ कर्मदाहकु ॥ ५६ ॥
च्यवन, कपिल व व्यास यांचे आश्रम; गौतम व वामन यांचे उत्तमोत्तम आश्रम ; तसेच सर्व श्रमांचा परिहार करणारी बदरिकाश्रमाची श्रेष्ठ यात्रा ५६ ;

ऐशीं स्थळें जीं पावन । तेथें संन्याशियें करावें गमन ।
मार्गीं भिक्षार्थ जें अटन । तेंही निरूपण अवधारीं ॥ ५७ ॥
अशी जी पवित्र स्थळे आहेत, तेथें संन्याशाने अवश्य जावें. आतां मार्गामध्ये भिक्षेकरितां कोठें फिरावें तेंही सांगतों ऐक ५७.

हाट हाटवटिया अति उत्तम । त्यातें `पुर’ म्हणती नरोत्तम ।
हाटहाटवटियाहीन तो `ग्राम’ । भिक्षेचा नेम सारवा तेथें ॥ ५८ ॥
जेथें उत्तमोत्तम बाजार व रस्ते असतात, त्याला ज्ञातेलोक ‘पुर’ म्ह. शहर असे म्हणतात. ज्या गांवांत मोठमोठाले रस्ते किंवा बाजार नसेल त्याला ‘ग्राम’ म्हणतात. तेथे जाऊन आपल्या भिक्षेचा नेम पूर्ण करावा ५८.

गायीगौळियांचें निवासस्थान । `व्रत’ त्यातें म्हणती जाण ।
`सार्थ’ म्हणिजे पव्हा संपूर्ण । भिक्षार्थ अटन करावें तेथें ॥ ५९ ॥
गाई व गवळी जेथे राहतात, त्याला ‘ व्रज ‘ म्ह. गौळवाडा, असे म्हणतात. तसेंच ‘सार्थ’ म्हणजे पाणपोई असेल तेथे अथवा यात्रिक जनसमूहांत भिक्षेसाठी फिरावें ५९.

पवित्र भिक्षेचे प्राप्तीकारणें । संन्यासीं अवश्य जाणें ।
तेचि अर्थींचें निरूपणें । स्वयें श्रीकृष्ण सांगिजे ॥ १६० ॥
ह्याप्रमाणे पवित्र अशी मिक्षा मिळविण्याकरितां संन्याशाने अवश्य जात असावे. याच अर्थाचे निरूपण स्वतः श्रीकृष्ण सांगत आहेत १६०.

वानप्रस्थाश्रमपदेष्वभीक्षणं भैक्ष्यमाचरेत् ।
संसिद्धयत्याश्वसंमोहः शुद्धसत्त्वः शिलान्धसा ॥ २५ ॥
[श्लोक २५] शक्यतो वानप्रस्थींच्या आश्रमातूनच भिक्षा मागून आणावी कारण शेतात पडलेल्या दाण्यांपासून ते अन्न शिजवतात म्हणून ते पवित्र असते आणि ते खाल्ल्याने चित्त शुद्ध होऊन ताबडतोब मोह नष्ट होतो. (२५)

शुद्ध व्हावया अंतर । वानप्रस्थाश्रमी जो नर ।
जाऊनि ठाकावें त्याचें द्वार । अतिसादर भिक्षार्थ ॥ ६१ ॥
अंतःकरण शुद्ध होण्याकरिता वानप्रस्थाश्रमामध्ये जो पुरुष असेल, त्याच्या दारांत भिक्षेकरितां मोठ्या आदराने जाऊन उभे रहावें ६१.

सेवितां सात्त्विकाचे अन्नासी । शुद्धसत्त्वता साधकासी ।
तत्काळ होय ग्रासोग्रासीं । शुद्ध अन्नासी हा महिमा ॥ ६२ ॥
कारण, सात्विकाचे अन्न सेवन केले असता साधकांच्या अंगीही प्रत्येक घासाला शुद्धसत्त्वपणा उत्पन्न होतो. असा शुद्ध अन्नाचा महिमा आहे ६२.

यालागीं वानप्रस्थाचें द्वार । ठाकोनिजावें वारंवार ।
तेणें सत्त्वशुद्धि अनिवार । होय साचार साधकां ॥ ६३ ॥
ह्याकरितां वानप्रस्थाचे दार पाहून तेथे वारंवार जात असावें. तेणेंकरून साधकांची अनिवार सत्त्वशुद्धि होते ६३.

शुद्ध भिक्षेचिये प्राप्ती । सत्त्वशुद्ध होय वृत्ती ।
तेणें वासना निःशेष नासती । निजशांती उल्हासे ॥ ६४ ॥
शुद्ध भिक्षा मिळाली म्हणजे वृत्तिही सत्वशुद्ध होते; आणि तेणेकरून वासनाही निःशेष नाहीशी होऊन आत्मशांति प्रगट होते ६४.

वासना नासल्या निलाग । तो सत्यत्वें न देखे जग ।
विषयासक्ति कैंची मग । सहज विराग उद्‍भट ॥ ६५ ॥
निःशेष वासना गेली म्हणजे त्याला जग सत्यत्वाने दिसतच नाही. मग विषयासक्ति कोठची? तेव्हां अर्थातच उत्कट वैराग्य उत्पन्न होते ६५.

नैतद्वस्तुतया पश्येद् दृश्यमानं विनश्यति ।
असक्तचित्तो विरमेदीहामुत्र चिकीर्षितात् ॥ २६ ॥
[श्लोक २६] संन्याशाने दृश्य जगाला सत्य मानू नये कारण ते नाश पावते कोठेही आसक्ती नसावी इहलोकी किंवा परलोकी काहीही करण्याची इच्छा बाळगू नये. (२६)

येथ जें जें दिसे नासे । हें सर्वांसी प्रत्यक्ष आभासे ।
परी अज्ञानें भुलले कैसे । विषयविलासें गुंतोनी ॥ ६६ ॥
-या लोकामध्ये जे जे म्हणून दिसतें तें तें नाश पावते, हे सर्वांना प्रत्यक्ष दिसतेच; परंतु विषयाला वश होऊन व त्यांत गुंतून पडून अज्ञान लोक कसे भुलले आहेत पहा! ६६.

यालागीं शुद्ध भिक्षेचिये प्राप्ती । ज्याची शुद्धसत्व झाली वृत्ती ।
त्यासी विषय सत्यत्वें न दिसती । मा विषयासक्ती तेथें कैंची ॥ ६७ ॥
ह्याकरितां शुद्ध भिक्षेच्या प्राप्तीने ज्याची वृत्ति शुद्धसत्त्वात्मक झाली, त्याला विषय हे सत्यत्वाने दिसतच नाहीत; मग विषयासक्ति कोठली १६७.

ऐसें मिथ्या विषयांचें भान । त्याचें विषयासक्त नव्हे मन ।
यालागीं भवस्वर्गसाधन । दोन्ही तो जाण स्पर्शेना ॥ ६८ ॥
ह्याप्रमाणे विषयाचे ज्याला मिथ्या भान असते, त्याचे मन विषयासक्त होत नाही. म्हणून संसाराच्या किंवा स्वर्गाच्या, दोहोंच्याही साधनांना तो स्पर्श करीत नाही ६८.

ऐसा जो विषयविरक्त । त्याचें परमार्थीं लागे चित्त ।
तो जगीं विचरे अनासक्त । परमार्थयुक्त निजबोधें ॥ ६९ ॥
ह्याप्रमाणे जो विषयविरक्त असतो, त्याचेंच परमार्थाकडे चित्त लागून राहते आणि तो निजबोधाने परमार्थयुक्त होऊन जगामध्ये अनासक्तपणेच हिंडत असतो ६९.

त्याच्या निजबोधाचें लक्षण । स्वयें सांगताहे नारायण ।
प्रपंचाचें मिथ्यापण । समाधान निजात्मता ॥ १७० ॥
त्याच्या निजबोधाचे लक्षण म्ह. प्रपंचाचे मिथ्यात्व आणि आत्मस्वरूपाने येणारे समाधान श्रीकृष्ण स्वत: सांगत आहेत १७०.

यदेतदात्मनि जगन्मनोवाक्क्ष्‍प्राणसंहतम् ।
सर्वं मायेति तर्केण स्वस्थस्त्यक्त्वा न तत्स्मरेत ॥ २७ ॥
[श्लोक २७] संन्याशाने आत्म्यामध्ये दिसणारे मन, वाणी आणि प्राण यांचा संघात असलेले हे जग म्हणजे माया आहे, असा निश्चय करून त्याचा त्याग करावा व आत्मस्वरूपात स्थिर राहून त्याचे कधीही स्मरण करू नये. (२७)

मनसा-वाचा-प्राणप्रवाहीं । अहंकारकृत उभयदेहीं ।
जग आत्म्याच्या ठायीं । मिथ्या मायिक पाहीं आभासे ॥ ७१ ॥
मन, वाणी व प्राण ह्यांच्या प्रवाहांत अहंकाराने केलेले जे दोन्ही देह व इतर जग हे आत्म्याच्या ठिकाणी मिथ्या मायिक आहे असाच भास होतो ७१.

दोराअंगीं सर्पाभास । शुक्तिकेमाजीं रजतप्रकाश ।
उखरीं मृगजळाचा विलास । तैसा जगदाभास चिन्मात्रीं ॥ ७२ ॥
दोरामध्ये सर्पाचा भास, शिंपीमध्ये रुप्याचा भास, किंवा उन्हामध्ये मृगजळाचा भास होतो, त्याप्रमाणेच चिन्मात्रब्रह्मस्वरूपामध्ये जगाचा आभास होतो ७२.

जैसा स्वप्नींचा व्यवहार । तैसें भासे चराचर ।
ऐसें मिथ्या जाणोनि साचार । पुढती स्मरणादर स्फुरेना ॥ ७३ ॥
स्वप्नांतील जसा व्यवहार असतो, त्याप्रमाणेच हें सारें चराचर भासतें. अशा प्रकारे हे सारे खरोखर मिथ्या आहे अशी खात्री झाली म्हणजे मग पुढे स्मरणाविषयी आदर राहात नाहीं ७३.

जो जागा झाला इत्थंभूत । तैं स्वप्नभोग न वांछी चित्त ।
तेवीं स्वरूपीं जो सुनिश्चित । तो प्रपंचजात स्मरेना ॥ ७४ ॥
जो चांगला जागा होतो, त्याचे मन स्वप्नांतील सुखाची काही इच्छा करीत नाही; त्याप्रमाणे स्वस्वरूपामध्ये ज्याचे मन स्थिर झालें, तो कोणत्याही प्रपंचवस्तूचे स्मरण करीत नाही ७४.

त्रिदंडी बहूदकाचें कर्म । तुज म्यां सांगितलें सुगम ।
आता हंस परमहंसांचे धर्म । यथानुक्रम अवधारीं ॥ ७५ ॥
याप्रमाणे त्रिदंडी’ आणि ‘बहूदक’ या संन्याशांचे कर्म मी तुला सुगम करून सांगितले. आतां ‘हंस’ व ‘परमहंस’ ह्यांचे धर्मही यथानुक्रमाने सांगतों ऐक ७५.

संन्यास चतुर्विध देख । `हंस’ `परमहंस’ एक ।
एक तो `बहूदक’ । `कुटीचक’ तो भिन्न ॥ ७६ ॥
संन्यासही चार प्रकारचा आहे हे लक्षात ठेव. एक ‘हंस’ व दुसरा ‘परमहंस’: तिसरा ‘बहूदक’ आणि चौथा त्याहून भिन्न आहे त्यास ‘कुटीचक’ असें म्हणतात ७६.

कर्म त्यागोनि झाला संन्यासी । ज्ञान ध्यान नाहीं मानसीं ।
अन्नालागी सग्रामवासी । ‘लुटीचक’ तयासी बोलिजे ॥ ७७ ॥
कर्म टाकून संन्यासी झाला, पण मनामध्ये ध्यानही नाही आणि ज्ञानही नाही; आणि अन्नासाठी आपल्या गांवांतच राहतो, त्याला ‘कुटीचक ‘ असे म्हणतात ७७.

वार्धकीं कुटीचकाची परी । अग्निहोत्र-स्त्रियेचा त्याग करी ।
परी शिखासूत्र न अव्हेरी । गायत्रीमंत्रीं अधिकारु ॥ ७८ ॥
कुटीचक असतो त्याचा प्रकार असा की वार्धक्यामध्ये अग्निहोत्र आणि स्त्री ही टाकून देतो, परंतु शिखासूत्र टाकीत नाही, म्हणून त्याला गायत्रीमंत्राचा अधिकार असतो ७८.

नित्य भिक्षा पुत्राचे घरीं । पर्णकुटी बांधे त्याचे द्वारीं ।
मठिका सांडोनि न वचे दूरी । `कुटीचक’ निर्धारीं या नांव ॥ ७९ ॥
नित्यशः पुत्राच्या घरींच भिक्षा घ्यावयाची, त्याच्याच दारांत पर्णकुटी बांधावयाची, आणि मठी सोडून लांब कोठे जावयाचे नाही, म्हणून त्याचे नांव ‘कुटीचक’ होय ७९.

शिखासूत्र त्यागोनि जाण । करूनि त्रिदंडांचें ग्रहण ।
केवळ करी कर्माचरण । ज्ञानाचें लक्षण जाणेना ॥ १८० ॥
शिखासूत्राचा त्याग करून, त्रिदंडाचे ग्रहण करून, केवळ कर्माचरण करतो; पण ज्ञानाचे रक्षण मुळीच समजत नाही १८०

नाहीं वैराग्य वरिष्ठ । न दिसे ज्ञाननिष्ठा श्रेष्ठ ।
अतिशयेंसीं जो कर्मिष्ठ । `बहूदक’ ज्येष्ठ त्यासी म्हणती ॥ ८१ ॥
निस्सीम वैराग्य नाही: ज्ञानावरही निष्ठा चांगली दिसत नाही आणि कर्मठ मात्र अतिशय. तोच ‘बहूदकां’ मध्ये श्रेष्ठ म्हटला जातो ८१.

जो कां वैराग्याच्या निर्धारीं । ज्ञानसाधनार्थ विचारी ।
शिखासूत्रकर्मत्याग करी । आत्मचिंतनावरी निजनिष्ठा ॥ ८२ ॥
आणि वैराग्याच्या निर्धाराने ज्ञानसाधनाचा विचार करणारा; शिखासूत्र व कर्म यांचा त्याग करून आत्मचिंतनावरच ज्याची निष्ठा असा ज्याचा त्यागविलास असतो ८२.

ऐसा जो त्यागविलास । या नांव `विविदिषा’ संन्यास ।
ऐशिया निष्ठें वर्ते तो `हंस’ । एक `परमहंस’ हा म्हणती ॥ ८३ ॥
त्याला ‘विविदिष’ संन्यास असे म्हणतात आणि अशा दृढ निष्ठेनें जो वागतो, त्याला ‘हंस’ असे म्हणतात. कोणी यालाच ‘परमहंस’ ही म्हणतात ८३.

ऐक परमहंसाचें लक्षण । ज्ञानपरिपाकें परिपूर्ण ।
अतएव शांति वोळंगे आंगण । देखे तिन्ही गुण मिथ्यात्वें ॥ ८४ ॥
आतां परमहंसाचे लक्षण ऐक. तो ज्ञाननिष्ठेने परिपूर्ण असतो. म्हणून शांतिही त्याच्या दारांत राबत असते. तो तिनी गुण मिथ्या मानीत असतो ८४.

मिथ्या जाणे कर्माची वार्ता । आपुली देखे नित्य निष्कर्मता ।
कर्मक्रिया जो कर्तव्यता । ते प्रकृतीचे माथां प्रारब्धें ॥ ८५ ॥
कर्माची वार्ता तो मिथ्याच मानतो आणि आपण नित्य निष्कर्मच आहो असें तो जाणतो. तसेंच कर्म, क्रिया व कर्तव्यता ही प्रारब्धानुसार होणारी प्रकृतीच्याच माथ्यावर तो ठेवतो (आपल्या अंगावर घेत नाही) ८५.

ऐशिया स्थितीं सावकाश । त्या नांव जाण `परमहंस’ ।
नाहीं मठ मठिका विलास । नित्य उदास निराश्रयी ॥ ८६ ॥
अशा स्थितीने जो समाधानांत राहातो, त्याचे नाव ‘परमहंस’. त्याला मठ मठी वगैरेची यातायात नको असते. तो नित्य उदास आणि निराश्रयीच राहातो ८६.

आतां हंस-परमहंसांचे धर्म । स्वयें सांगताहे पुरुषोत्तम ।
त्या धर्माचें विशद वर्म । ऐक सुगम उद्धवा ॥ ८७ ॥
आता उद्धवा! त्या हंस-परमहंसाचे धर्म आणि त्यांतील मर्म सुगम रीतीने विशद करून सांगतों ऐक. असें म्हणून श्रीकृष्ण स्वतःच ते सांगत आहेत ८७.

ज्ञाननिष्ठो विरक्तो व मद्‍भक्तो वाऽनपेक्षकः ।
सलिङ्गानाश्रमांस्त्यक्त्वा चरेदविधिगोचरः ॥ २८ ॥
[श्लोक २८] ज्ञाननिष्ठ, विरक्त अथवा कशाचीच अपेक्षा नसलेला माझा भक्त यांनी आश्रम किंवा त्याची चिह्ने यांचा त्याग करावा व शास्त्राने सांगितलेल्या विधिनिषेधांचीही पर्वा न करता स्वच्छंदपणे वागावे. (२८)

विषयांची नावडे मातु । ज्ञानप्राप्तीलागीं उद्यतु ।
यापरी जो अतिविरक्तु । तो संन्यास बोलिजेतु मुख्यत्वें ॥ ८८ ॥
विषयाची वार्तासुद्धा आवडत नाही, ज्ञानप्राप्तीसाठी उद्युक्त, असा जो अत्यंत विरक्त असेल, त्यालाच मुख्यत्वेकरून ‘संन्यास’ असे म्हणतात ८८.

जो ज्ञाननिष्ठा अतिसंपन्न । सदा स्वरूपीं रंगलें मन ।
कदा न मोडे अनुसंधान । परमहंसासमान हा हंस ॥ ८९ ॥
जो ज्ञाननिष्ठेने अत्यंत संपन्न असतो, ज्याचे मन स्वरूपामध्ये सदासर्वदा रंगलेले असते आणि आत्मस्वरूपाचे अनुसंधान ज्याचे कधीही मोडत नाही. हा हंसही परमहंसाप्रमाणेच होय ८९.

ज्यासी करितां भगवद्‍भक्ती । अपेक्षामात्राची झाली शांती ।
मोक्षापेक्षा नुपजे चित्तीं । हे संन्यासपद्धती अतिश्रेष्ठ ॥ १९० ॥
भगवद्भक्ति करीत असतां त्याच्या सर्व इच्छांची शांति झालेली असते ; ज्याच्या मनांत मोक्षाचीसुद्धा अपेक्षा राहत नाहीं, तीच संन्यासपद्धति अत्यंत श्रेष्ठ होय १९०.

ज्ञाननिष्ठ कां मद्‍भक्त । इहीं आश्रमधर्म दंडादियुक्त ।
त्याग करावा हृदयीं समस्त । बाह्य लोकरक्षणार्थं राखावे ॥ ९१ ॥
जे ज्ञाननिष्ठ असून माझे भक्त असतील, त्यांनी दंडादिक आश्रमधर्माचा अंत:करणामधून त्याग करावा आणि बाह्य चिन्हें फक्त लोकशिक्षणाकरिता ठेवावीत ९१.

येचि अर्थींचें निरूपण । पुढें सांगेल श्रीकृष्ण ।
प्रस्तुत त्यागाचें लक्षण । ऐक संपूर्ण हरि बोले ॥ ९२ ॥
ह्याच अर्थाचे निरूपण पुढे श्रीकृष्ण सांगणार आहेत. तूर्त त्यागाचेंच सारे लक्षण ऐक. असें श्रीहरि म्हणाले ९२.

आश्रमधर्म समस्त करी । परी विधिकिंकरत्व तो न धरी ।
प्रतिबिंब कांपतां जळांतरी । आपण बाहेरी कांपेना ॥ ९३ ॥
तो आश्रमधर्म सारे करतो, परंतु विधीचा दास होऊन मात्र राहात नाही. जलामध्ये प्रतिबिंब कापत असले तरी बाहेरचे बिंब कांहीं कांपत नाहीं ९३.

तेवीं स्वधर्मकर्म कर्तव्यता । करी परी नाहीं कर्मठता ।
आपुली कर्मातीतता । जाणे तत्त्वतां निजकर्मी ॥ ९४ ॥
त्याप्रमाणे स्वधर्मकर्म-कर्तव्यता तो करतो, पण कर्मठपणा बाळगीत नाही. आपल्या सर्व कर्मामध्ये तो आपली कर्मातीतता पक्की ओळखून असतो ९४.

यापरी स्वधर्मकर्म करी । परी विधीचें भय तो न धरी ।
विधिनिषेध घालून तोडरीं । कर्मे करी अहेतुक ॥ ९५ ॥
अशा रीतीने तो स्वधर्मकर्म करतो, पण विधीचं भय बाळगीत नाही. विधिनिषेध पायांखाली तुडवून तो अहेतुक कर्में करतो ९५.

जो नातळे स्वाश्रमकर्मगती । दंडादि लिंग न धरी हातीं ।
ऐसिया सर्वत्यागाची स्थिती । पुढें श्रीपती सांगेल ॥ ९६ ॥
आपल्या आश्रमकर्माला शिवत नाही व दंडादि चिन्हेंही हाती धरीत नाही, अशा सर्वस्वत्यागाचे लक्षण पुढे श्रीकृष्ण सांगणार आहेत ९६.

प्रस्तुत हेंचि निरूपण । लोकरक्षणार्थ लिंगधारण ।
अंतरीं जो निष्कर्म जाण । त्याचे लक्षण हरी बोले ॥ ९७ ॥
प्रस्तुत लोकाचाराकरितां दंडादि चिन्हें धारण करितो व अंत:करणामध्ये निष्काम राहातो, त्याचेंच लक्षण श्रीकृष्ण सांगत आहेत ९७.

बुधो बालकवत् क्रीडेत् कुशलो जडवच्यरेत् ।
वदेदुन्मत्तवद्विद्वान् गोचर्यां नैगमश्चरेत् ॥ २९ ॥
[श्लोक २९] बुद्धिमान असूनही त्याने बालकाप्रमाणे खेळावे, हुशार असूनही मूर्खाप्रमाणे राहावे, विद्वान असूनही वेड्यासारखे बडबडावे आणि वेदवेत्ता असूनही पशूप्रमाणे वागावे. (२९)

विवेकज्ञान शुद्ध आहे । परी बाळकाच्या परी पाहे ।
मानापमान सुखें साहे । सांडोनि सोये देहाभिमानाची ॥ ९८ ॥
त्याच्या ठिकाणी विवेकज्ञान शुद्ध असते; पण तो बालकासारखाच वागतो. देहाभिमान सोडून मान किंवा अपमान जें काय प्राप्त होईल, ते सुखाने सहन करतो ९८.

निजनैष्कर्में अतिकुशल । परी कर्मजडाऐसा केवळ ।
कर्में आचरे तो सकळ । कोठेंही विकळ दिसों नेदी ॥ ९९ ॥
तो आपल्या नैष्कर्म्याने अत्यंत प्रवीण असतो; पण कर्मठासारखा सारी कर्में तो आचरण करतो; कोठेही कमी पडल्याचे दिसू देत नाहीं ९९.

जाणे धर्माधर्मलक्षण । सर्वार्थीं अतिसज्ञान ।
परी न करी प्रश्नसमाधान । अप्रमाणिक जाण स्वयें बोले ॥ २०० ॥
धर्माचं व अधर्माचे लक्षण तो चांगले जाणतो; साऱ्या बाबतीत तो ज्ञानसंपन्नच असतो. परंतु कोणी प्रश्न केल्यास समाधान करीत नाही. तो अज्ञान्यासारखा काही तरी प्रमाणरहितच बोलतो २००.

करितां प्रश्नसमाधान । लौकिकीं वाढेल सन्मान ।
यालागीं साक्षेपें जाण । उन्मत्त वचन स्वयें बोले ॥ १ ॥
प्रश्नाचे समाधान करूं लागले तर, लोकांमध्ये आपला मानसन्मान वाढेल, म्हणून मुद्दामच उन्मत्तासारखें बोलत असतो १.

वेदतत्त्वार्थ विहित जाणे । तें लौकिकीं नाहीं मिरवणें ।
सकळिकीं मूर्खाचि म्हणणें । तैशीं `पशु’ लक्षणें स्वयें दावी ॥ २ ॥
वेदातील रहस्य व विहित शास्त्रार्थ तो जाणून असतो; पण त्याचा लोकांमध्ये डौल मिरवीत नाही. इतकेच नव्हे, तर सर्वांनी आपल्याला मुर्खच म्हणावे म्हणून स्वत: पशुतुल्यता दाखवितो २.

यालागीं वेदवादसंवाद । न करी वाद अतिवाद ।
येचि अर्थीं अतिविशद । स्वयें गोविंद सांगत ॥ ३ ॥
याकरितां तो वेदवाद-संवाद-विवाद काही करीत नाही; किंवा वितंडवादही घालीत नाही. हीच गोष्ट श्रीकृष्ण स्वत:च स्पष्ट करून सांगतात ३.

वेदवादरतो न स्यान्न पाषण्डी न हैतुकः ।
शुष्कवादविवादे न कञ्चित्पक्षं समाश्रयेत् ॥ ३० ॥
[श्लोक ३०] त्याने वेदाविषयी ऊहापोह करू नये, पाखंडी नसावे, तर्कवितर्क करू नये आणि कोरड्या वादविवादात कोणाचीही बाजू घेऊ नये. (३०)

धरोनियां मीमांसकमत । कर्मकांडींचे शास्त्रार्थ ।
नानावाद कर्मार्थ । न करी निश्चित निजबोधें ॥ ४ ॥
तो निजबोधानें पक्का असल्यामुळे मीमांसकांचे मत जमेस धरून कर्मकांडांतील शास्त्रार्थ, किंवा कर्मविषयींचे नाना प्रकारचे वादविवाद तो करीत नाही ४.

तार्किकाचे अतितर्क । तर्क वितर्क कुतर्क ।
हेही वाद करीना देख । निजात्मसूख जो जाणे ॥ ५ ॥
ज्याला आत्मानंदाचा अनुभव आलेला असतो, तो तर्कशास्त्राप्रमाणे तर्क, वितर्क, किंवा कुतर्क काढून वाद करीत नाही ५.

बाहेरी ब्रह्मज्ञानें गर्जे तोंड । भीतरीं विषयवासना उदंड ।
ऐसे महावादी प्रचंड । अतर्क `पाखंड’ त्या नाव ॥ ६ ॥
बाहेर तोंडाने ब्रह्मज्ञान गर्जत असतो, आणि आंत प्रचंड विषयावासना भरलेली असते. असे जे प्रख्यात वितंडवादी असतात तेच अस्सल ‘पाखांडी’ होत ६.

नसोनि ब्रह्मानुभव साचार । जो उच्छेदी निजाचार ।
तो केवळ पाखंडी नर । उदरंभर दुःशील ॥ ७ ॥
खरोखर ब्रह्माचा अनुभव नसतां जो पुरुष आपला आचार टाकून देतो, तो शुद्ध पाखांडी, पोटभरू, दुष्टस्वभावी मनुष्य समजावा ७.

ऐशिया वादाचा विटाळ । ज्याचे वाचेसी नाहीं अळुमाळ ।
न लगे असत्याचा समूळ मळ । नित्य निर्मळ निजबोधें ॥ ८ ॥
ज्याच्या वाणीला अशा प्रकारच्या वादाचा लवमात्रही विटाळ नाही, असल्याचा यत्किंचितही मळ खपत नाही, तोच आत्मज्ञानाने नित्य निर्मळ असतो ८.

`शुष्कवाद’ ज्या वृथा गोष्टी । त्यांतही वाग्वाद उठी ।
होय नव्हे कपाळपिटी । मिथ्या चावटी करीना ॥ ९ ॥
‘शुष्कवाद’ म्ह. निरर्थक गोष्टी, यांतसुद्धा वाद उत्पन्न होतोच. याकरितां होयनव्हे, अशी कपाळपिटी करून व्यर्थ बडबड करीत नाही ९;

ऐशिया विवादाची कथा । दृष्टीं न पाहे निजज्ञाता ।
मा स्वयें करील ऐशा वार्ता । हें सर्वथा घडेना ॥ २१० ॥
तो खरोखर आत्मज्ञानी असतो; त्याला असल्या वादविवादाची गोष्ट दृष्टीपुढेसुद्धा नको असते; मग तो स्वतः तसल्या गोष्टी करील हे तर कधीच घडावयाचे नाही २१०.

होतां शास्त्रार्थमहावाद । देतां युक्तीचे प्रतिबाध ।
तेथ न करी पक्षपात शुद्ध । जाणे परी शब्द बोलेना ॥ ११ ॥
शास्त्रार्थांचा मोठा वाद जरी होत असला आणि युक्तीने व प्रमाणाने जरी उत्तरें प्रत्युत्तरें चालली असली, तरी कोणताही पक्ष उचलीत नाही. खरे काय ते त्याला माहीत असते; पण तो मुळी बोलतच नाही ११.

श्रुतिस्मृतींसीं विरूद्ध । होतां देखे अतिवाद ।
स्वयें जाणे शास्त्रार्थ शुद्ध । परी पक्षपात करीना ॥ १२ ॥
श्रुतिस्मृतींना विरुद्ध असा वितंडवाद चालतांना पाहिला, व खरा आणि शुद्ध शास्त्रार्थ कोणता हे माहीत असले, तरी कोणताच पक्ष उचलीत नाही १२.

वाग्वादीं बोलतां जाण । दुखवेल पुढिलांचें मन ।
कां क्षोभेल स्वांतःकरण । यालागीं वचन बोलेना ॥ १३ ॥
वादविवादांत बोलतां बोलतां दुसऱ्यांचे मन दुखेल, किंवा आपल्याच अंतःकरणाला क्रोध उत्पन्न होईल म्हणून तो शब्दच बोलत नाही १३.

नोद्विजेत जनाद्धीरो जनं चोद्वेजयेन्न तु ।
अतिवादांस्तितिक्षेत नाममन्येत कञ्चन ॥ ३१ ॥
[श्लोक ३१] त्याने धैर्यवान असावे त्यामुळे कोणाचाही त्याला त्रास वाटणार नाही आणि तोही कोणाला त्रास देणार नाही एखाद्याने त्याची निंदा केली तरी त्याने ती प्रसन्न मनाने सहन करावी, कोणाचाही अपमान करू नये एखाद्या पशूप्रमाणे आपल्या शरीरासाठी कोणाशीही वैर करू नये. (३१)

जनापासोनि उद्वेगगती । ज्ञाता न पवे सर्वथा चित्तीं ।
निंदा अवगणना अपमानिती । ते आत्मस्थितीं स्वयें साहे ॥ १४ ॥
लोकांपासून ज्ञाता मनामध्ये उद्वेग मुळीच पावत नाही. कोणी निंदा करतात, कोणी तिरस्कार करतात, कोणी अपमान करतात, तरी आत्मस्थितीने स्वतः सहन करतो १४.

जन जे जे उपद्रव देती । ज्ञाता साहे ऐशिया रीतीं ।
मीचि आत्मा एक सर्व भूतीं । यालागीं खंती मानीना ॥ १५ ॥
लोक जे जे म्हणून उपद्रव देतात, ते ज्ञाता अशा रीतीने सर्व सहन करतो. कारण प्राणिमात्रामध्ये आपणच आत्मा भरलेला आहे, अशी त्याची भावना असल्यामुळे त्याला त्याची खंती वाटत नाही १५.

आपुलिया अवयवविकारता । उद्वेग नुपजें जेवीं चित्ता ।
तेवीं सर्वांभूतीं एकात्मता । जाणून तत्त्वतां उबगु न मनी ॥ १६ ॥
आपल्या अवयवाकडून काही प्रमाद झाला, तर त्याबद्दल चित्ताला जसा उद्वेग वाटत नाही, त्याप्रमाणे सर्व प्राणिमात्रांमध्ये एकात्मतेचीच भावना असल्यामुळे तो त्याबद्दल खरोखर खेद मानीत नाही १६.

तैसेंचि ज्याचिया स्थितीं । भूतें उद्वेग न मानिती ।
ज्याचिया निजाचारगतीं । सुखी होती जीवमात्र ॥ १७ ॥
तसेंच याच्या संसर्गापासून प्राणिमात्रांनाही उद्वेग प्राप्त होत नाही. त्याच्या वागणुकीने जीवमात्रांना सुखच होते १७.

सर्व भूतीं भगवंत आहे । झणें त्यासी उपद्रव होये ।
यालागीं वागवितां हातपाये । सावध राहे निजदृष्टीं ॥ १८ ॥
सर्व प्राणिमात्रांमध्ये भगवंतच राहात असल्याने, न जाणों त्याला कदाचित् उपद्रव होईल, म्हणून हात-पाय हालवितांना तो आत्मदृष्टीने फार सावध असतो १८,

थोर देतां आरोळी । झणें दचकेल वनमाळी ।
कां नेटें भवंडितां जपमाळी । देवाचे कपाळीं झणें लागे ॥ १९ ॥
मोठ्याने हाक मारली तर कदाचित भगवान् दचकेल किंवा जपाची माळ जोराने फिरविली तर कदाचित् देवाच्या कपाळावर बसेल १९.

यालागीं करचरणांच्या चेष्टा । आवरोनियां निजात्मनिष्ठा ।
भूतीं लागों नेदी झटा । झणें वैकुंठा उपद्रव लागे ॥ २२० ॥
म्हणून हातापायांच्या चेष्टा निजात्मनिष्ठेने आवरून, न जाणो देवालाच पीडा होईल म्हणून प्राण्याला धक्का लागू देत नाही २२०.

ऐसिऐशिया निजात्मगती । उद्वेग उपजों नेदी भूतीं ।
तेथ वाग्वादाची गती । कैशा रीतीं संभवे ॥ २१ ॥
अशा अशा निजात्मकल्पनेने प्राणिमात्रांना दुःख होऊ देत नाही. तेव्हां वाग्वाद-तंट्याचा आरंभ तरी त्याच्याकडून कसा संभवणार ? २१.

सर्वभूतीं भूतात्म ईश्वर । यालागीं उंच न बोले उत्तर ।
तेथ अतिवाद्यासी समोर । सर्वथा अधर उचलीना ॥ २२ ॥
भूतात्मा सर्व भूतांमध्ये भरलेला आहे, हे लक्षात आणून तो मोठ्याने भाषणसुद्धा करीत नाही. तर मग वितंडवाद्यासमोर तो तोंड कसा उघडील ? २२.

पडल्या जीवसंकट प्राणांतीं । अपमान न करावे कोणे व्यक्ती ।
अपमानीना भूताकृती । सर्वांभूतीं हरी देखे ॥ २३ ॥
जीवावरचे संकट आले, प्राणांवर येऊन बेतले, तरी त्याला कोणत्याही व्यक्तीचा अपमान करवत नाही; कोणत्याही जीवाची आकृति असो, तिचा अपमान करावयाचाच नाहीं; कारण सर्व प्राणिमात्रांमध्ये श्रीहरिच असलेला त्याला दिसत असतो २३.

जनास्तव उद्वेगता । कदाकाळीं न पवे ज्ञाता ।
ज्ञात्यापासोनि उद्वेगता । नव्हे सर्वथा जनासी ॥ २४ ॥
जनापासून उद्वेग असा ज्ञात्याला कधीच वाटत नाही व ज्ञात्यापासून जनालाही कधी उद्वेग प्राप्त होत नाही २४.

ऐशी निजात्मस्थिती साचार । तो कोणासीं न करी वैर ।
येचि अर्थीं शारंगधर । विशद उत्तर सांगत ॥ २५ ॥
अशीच खरोखर ज्याची आत्मस्थिति असते, तो कोणाशीही वैर करीत नाही. याच अर्थाचे स्पष्ट भाषण श्रीकृष्ण सांगतात २५.

देहमुद्दिश्य पशुवद् वैरं कुर्यात्र केनाचित् ।
एक एवपरो ह्यात्मा भूतेष्वात्मन्यवस्थितः ॥ ३२ ॥
[ श्लोक ३२ ] पाण्याने भरलेल्या वेगवेगळ्या पात्रांमध्ये एकच चंद्र जसा वेगवेगळा दिसतो, त्याचप्रमाणे एकच परमात्मा सर्व प्राण्यांमध्ये आणि आपल्यातही राहिलेला आहे सर्वांचा आत्मा एकच आहे आणि सर्व प्राण्यांची शरीरेसुद्धा एकाच समान तत्त्वांनी बनलेली आहेत म्हणून त्यांमध्ये मूलद्रव्यसुद्धा एकच आहे, असा विचार करावा. (३२)

केवळ पशूचियापरी । हो‍ऊनियां देह‍अहंकारी ।
कोणासी वैर न करी । तेही परी परीयेंसी ॥ २६ ॥
– केवळ पशूसारखा देहाचा अहंकारी होऊन तो कोणाशीही वैर करीत नाही. त्याचाही प्रकार ऐक २६.

प्रकृति-पर चिदात्मा आहे । तोचि सर्वांभूतीं भूतात्मा पाहे ।
मजमाजींही तोचि राहे । ऐशी सर्व भूतीं एकात्मता जो ॥ २७ ॥
ज्ञानस्वरूप आत्मा हा प्रकृतीच्या पलीकडे असतो; तोच सर्व प्राणिमात्रांचा आत्मा असून माझ्यामध्येही तोच राहातो, अशा समजुतीने जो एकात्मता वाहतो २७.

त्यासी कोण आप्त कोण इतर । कोणासी करावें वैर ।
सर्व भूतीं मीचि साचार । निरंतर निजात्मा ॥ २८ ॥
खरोखर माझंच आत्मस्वरूप जर सर्व प्राणिमात्रांमध्ये भरलेलें आहे, तर त्याला आत कोण, आणि इतर कोण ? आणि वैर तरी कोणाशी करावयाचे ? २८.

एक आत्मा सर्व भूतांत । येचि अर्थींचा दृष्टांत ।
स्वयें सांगे श्रीकृष्णनाथ । श्रोता सावचित्त उद्धव ॥ २९ ॥
सर्व प्राणिमात्रांमध्ये एकच आत्मा कसा आहे, याच अर्थाचा दृष्टांत स्वतः श्रीकृष्ण सांगत आहेत आणि उद्धव हा श्रोता सावध चित्ताने श्रवण करीत आहे २९.

यथेन्दुरुदपात्रेषु भूतान्येकात्मकानि च ।
अलब्ध्वा न विषीदेत काले कालेऽऽशनं क्वचित् ।
लब्ध्वा न हृष्येद्धृतिमानुभयं दैवतंत्रितम् ॥ ३३ ॥
[लोक ३३] संन्याशाने एखादे दिवशी भोजन मिळाले नाही तरी दुःखी होऊ नये किंवा मिळाले तरी हर्ष मानू नये त्याने धैर्य धरून भोजन मिळणे अगर न मिळणे हे प्रारब्धाच्या अधीन आहे, असे समजावे. (३३)

सहस्त्र घटीं भरल्या जळ । बिंबे एकचि चंद्रमंडळ ।
तेवीं निजात्मा एक केवळ । भूतीं सकळ भूतात्मा ॥ २३० ॥
हजार घागरीमध्ये पाणी भरलेले असले तरी त्या प्रत्येकीमध्ये एकाच चंद्राचे प्रतिबिंब पडते त्याप्रमाणें सर्व प्राणिमात्रांत एकच आत्मा भरलेला आहे २३०.

देखे भूताकृति ज्या भिन्न । त्याही परमकारणीं अभिन्न ।
जेवीं अळंकारीं सुवर्ण । आकारींहीं जाण भिन्नत्वं नाहीं ॥ ३१ ॥
प्राण्यांच्या आकृति भिन्न भिन्न दिसतात, पण मूळ मायेच्या ठिकाणी त्या साऱ्या एकच आहेत. ज्याप्रमाणे अलंकारांतील आकारामुळे सुवर्णा मध्ये भेद नसतो ३१.

जेवीं मृत्तिकेचीं गोकुळें केलीं । नानाकारीं पूज्य झालीं ।
परी ते मृतिकाचि संचली । तेवीं भूतें भासलीं भगवंतीं ॥ ३२ ॥
किंवा मातीची गोकुळे केली, तर ती (नंद, यशोदा, कृष्ण इ.) निरनिराळ्या आकारांनी पूजेला पात्र होतात, पण ती सारी मातीच भरलेली असते. त्याप्रमाणेच भगवंतामध्येही प्राण्यांचा भास होतो ३२.

का विणोनियां सुतें सुत । शेला परकळा पातळ म्हणत ।
तैशी वस्तूचि वस्तुत्वें येथ । साकार भासत भवरूपें ॥ ३३ ॥
किंवा सुतांत सूत विणून वस्त्र केलें म्हणजे त्याला शेला, दुपेटा, पातळ, इत्यादि म्हणतात. त्याप्रमाणे येथे ब्रह्मच संसाराच्या रूपाने साकार भासत असते ३३.

एवं साकार निराकार । उभयतां ब्रह्मचि साचार ।
ऐसा ज्याचा ज्ञाननिर्धार । त्याचा `आहार’ तूं ऐक ॥ ३४ ॥
ह्याप्रमाणे साकार काय आणि निराकार काय, खरोखर दोन्ही ब्रह्मच. असा ज्याच्या ज्ञानाचा निर्धार असतो, त्याचा आहार तूं ऐक ३४.

आहार न मिळे जिये काळीं । दुःखी नव्हे तिये वेळीं ।
अन्नालागीं न तळमळी । धारणाबळीं बलिष्ठ ॥ ३५ ॥
ज्या वेळेला काही खावयास मिळत नाही, त्या वेळेसही तो दुःखी होत नाही. तो अन्नासाठी तळमळ करीत नाही. इतका त्याचा मनोनिग्रह बळकट असतो ३५.

आहार मिळाल्या उत्तम । हरिखेजेना मनोधर्म ।
दैवाधीन जाणे वर्म । निजकर्मप्राप्तीसी ॥ ३६ ॥
बरें; उत्तम आहार मिळाला म्हणून त्याच्या मनाला हर्षही पण नाही. कारण आपल्या कर्माप्रमाणे सर्व गोष्टी असतात हे वर्म त्याला माहीत असते ३६.

एवं प्राप्ताप्राप्ताची कथा । जाणे दैवाधीन तत्त्वता ।
यालागीं हर्षविषादता । त्याचे चित्ता स्पर्शेना ॥ ३७ ॥
तात्पर्य, मिळणे किंवा न मिळणे हे खरोखर दैवाधीन आहे हें तो जाणून असतो. म्हणून सुख किंवा दुःख त्याच्या चित्ताला शिवतच नाही ३७.

दैवाधीन प्राप्ती प्राणियांसी । ऐसे सत्य कळलें ज्यासी ।
तैं भिक्षेसी कां हिंडणें म्हणसी । तेंचि हृषीकेशी सांगत ॥ ३८ ॥
प्राण्याला लाभ होणे तो दैवानुसारच होत असतो, असें जर त्याला निश्चयेंकरून कळलेले असते, तर मग तो भिक्षेसाठी तरी कां हिंडतो? असें म्हणाल तर तेच श्रीकृष्ण सांगतात ३८.

आहारार्थं समीहेत युक्तं तत्प्राणधारणम् ।
तत्त्वं विमृश्यते तेन तद्विजाय विमुच्यते ॥ ३४ ॥
[श्लोक ३४ ] भिक्षेसाठी प्रयत्‍न करणे योग्यच आहे कारण त्यामुळेच प्राण्यांचे रक्षण होते प्राण वाचले तरच तत्त्वाचा विचार करता येईल आणि तत्त्वविचाराने तत्त्वज्ञान होऊन मुक्ती मिळेल. (३४)

पाळावया आश्रमधर्मासी । अवश्य हिंडावें भिक्षेसी ।
मधुकरी संन्याशांसी । स्वधर्मासी अतिविहित ॥ ३९ ॥
आश्रमधर्म पाळण्यासाठी भिक्षेला अवश्य फिरावें. संन्याशाच्या धर्माला मधुकरी ही अत्यंत योग्य आहे ३९.

साधकां तरी आहारार्थ । अवश्य हिंडावें लागे येथ ।
आहारेंवीण त्यांचें चित्त । विक्षेपभूत हों पाहे ॥ २४० ॥
साधकांनासुद्धा आहारासाठी अवश्य हिंडावे लागते. कारण, आहाराशिवाय त्यांचे चित्त चंचळ होऊ लागते २४०.

तिंहीं रसासक्ति सांडून । भिक्षेसी करावा प्रयत्न ।
आहारेंवीण त्यांचें मन । अतिक्षीण सर्वार्थीं ॥ ४१ ॥
त्यांनी गोडपणाची आसक्ति सोडून भिक्षेचा प्रयत्न करावा. कारण आहाराशिवाय त्यांचे मन सर्वाधी क्षीणच होत असते ४१.

साधकांसी आहारेंवीण । न संभवे श्रवण मनन ।
न करवे ध्यान चिंतन । अनुसंधान राहेना ॥ ४२ ॥
आहाराशिवाय साधकांना श्रवण-मनन घडू शकत नाहीं; ध्यान-चिंतन करवत नाही व अनुसंधानही टिकत नाही ४२.

संन्याशांसी ध्यान न घडे । तैं आश्रमधर्माचें तारूं बुडे ।
यालागीं भिक्षेसी रोकडें । हिंडणें घडे हितार्थ ॥ ४३ ॥
संन्याशाला जर ध्यान घडले नाही, तर त्याच्या आश्रमधर्माचें तारूं बुडून जाते. म्हणून आपल्या हिताकरितांच त्याला भिक्षेला जाणे भाग पडते ४३.

मिळावें मिष्टान्न गोड । हे सांडूनि रसनाचाड ।
करावें भिक्षेचें कोड । परमार्थ दृढ साधावया ॥ ४४ ॥
गोड मिष्टान्न मिळावे अशी जिभेची गोडी न धरतां परमार्थ साधण्यासाठी भिक्षेचीच आवड धरावी ४४.

आहार घेतलिया जाण । साधकांसी घडे साधन ।
साधन करितां प्रकटे ज्ञान । ज्ञानास्तव जाण निजमोक्ष लाभे ॥ ४५ ॥
आहार सेवन केला असतां साधकाला साधन घडते; साधन घडले म्हणजे ज्ञानप्राप्ति होते आणि ज्ञानप्राप्तीने मोक्षाचा लाभ होतो ४५.

सर्वथा न वांछावें मिष्टान्न । तरी भिक्षा मागावी कोण ।
ऐसें कांहीं कल्पील मन । तेंचि श्रीकृष्ण सांगत ॥ ४६ ॥
मिष्टान्नाची तर कधीच इच्छा करूं नये. मग भिक्षा तरी कशाची मागावी? असें कांहीं मनांत येईल, तर तेच श्रीकृष्ण सांगतात ४६.

यदृच्छयोपपन्नान्नमद्याच्छ्रेष्ठमुताऽपरम् ।
तथा वासस्तथा शय्यां प्राप्तं प्राप्तं भजेन्मुनिः ॥ ३५ ॥
[श्लोक ३५] संन्याशाने प्रारब्धानुसार चांगले अगर वाईट, भिक्षान्न मिळेल, तेच खावे वस्त्र आणि अंथरूणपांघरूणसुद्धा जे मिळेल, त्यावरच काम भागवावे. (३५)

सहज भिक्षेसी आलें जाण । शुष्क अथवा मिष्टान्न ।
तेणें करावें प्राणधारण । रसनालालन सांडोनि ॥ ४७ ॥
रुक्ष किंवा मिष्टान्न सहजी जे मिळेल, त्यानेच प्राणधारण करावें. जिव्हेची लालूच सोडून द्यावी ४७.

निद्रालस्याचें न ये प्रस्थान । तैसें करावें प्राणधारण ।
दृढ ठसावें आसनध्यान । `युक्ताहार’ जाण या नांव ॥ ४८ ॥
निद्रा किंवा आळस ह्यांचे ठाणे न बसेल अशा रीतीने प्राणधारण करावें. आसन किंवा ध्यान नीट रीतीने ठसेल अशा रीतीने खाणे, त्याचेच नांव ‘युक्ताहार’ ४८.

वल्कल अथवा अजिन । नवें अथवा वस्त्र जीर्ण ।
सहजें प्राप्त झाल्या जाण । करी प्रावरण यथासुखें ॥ ४९ ॥
झाडाची साल अथवा मृगचर्म, नवे किंवा जुने वस्त्र, सहजी जे मिळेल, ते आनंदाने पांघरावें ४९.

कंथा हो कां मृदु आस्तरण । तृणशय्या कां भूमिशयन ।
स्वभावें प्राप्त झाल्या जाण । तेथही शयन करी मुनि ॥ २५० ॥
गोधडी किंवा मऊ हांतरूण, गवताचा थर किंवा जमीन, जे काय सहज मिळेल, त्यावरच मुनि शयन करतात २५०.

मी एक भोक्ता शयनकर्ता । हेही नाहीं त्यासी अहंता ।
स्नानादि कर्मीं वर्ततां । त्याची निरभिमानता हरि सांगे ॥ ५१ ॥
मी एक भोक्ता किंवा शयनकर्ता आहे, ही अहंताही त्याला नसते. आतां, स्नानादिक कृत्यांमध्येही त्याची निरभिमानताच असते, तीच श्रीकृष्ण सांगतात ५१.

शौचमाचमनं स्नानं न तु चोदनया चरेत् ।
अन्यांश्च नियमान् ज्ञानी यथाहं लीलयेश्वरः ॥ ३६ ॥
[श्लोक ३६] ज्ञानी पुरूषाने पावित्र्य, आचमन, स्नान किंवा इतर नियम शास्त्राची आज्ञा म्हणून पाळू नयेत मी ईश्वर सर्व कर्मे जशी लीलया करतो, तशी त्याने सहज जमल्यास करावीत. (३६)

आचमन स्नान शौचाचार । करितां नव्हे विधिकिंकर ।
कर्माभिमानाची मोडली थार । जैसा मी अवतार तैसा तो ॥ ५२ ॥
आचमन, स्नान किंवा प्रातर्विधि वगैरे करतांना तो शास्त्रविधीचा किंकर बनून करीत नाही. कारण त्याच्या कर्माभिमानाचा थाराच मोडून गेलेला असतो. सारांश, मी जसा अवतारी, तसाच तोही होतो ५२.

जैसा मी `लीलावतार’ धरीं । अलिप्तपणें कर्में करीं ।
तैसीचि जाण योग्याची परी । सर्व कर्माचारीं अलिप्त ॥ ५३ ॥
मी जसा लीलेने अवतार धारण करून अलिप्तपणाने सर्व कर्मे करतो, त्याप्रमाणे योग्याचीही पद्धत असते. तोही सर्व कर्मे करतांना अलिप्तच असतो ५३.

ज्यासी विधींचें भय नाहीं पोटीं । तो कर्में करावया कदा नुठी ।
तेचि विखींची विशद गोठी । कृष्ण जगजेठी सांगता ॥ ५४ ॥
ज्याच्या अंत:करणांत विधीचे भय नसते, तो कमें करावयाला कधी उठतच नाही. ह्याच विषयाचे रहस्य श्रीकृष्ण जगजेठी विशद करून सांगताहेत ५४.

न हि तस्य विकल्पाख्या या च मद्वीक्षया हता ।
आदेहान्तात्क्वचित्ख्यातिस्ततः संपद्यते मया ॥ ३७ ॥
[श्लोक ३७] ज्ञानी पुरूष भगवंतांना सगळीकडे पाहातो म्हणून त्याची भेददृष्टी मावळलेली असते शरीर सुटण्यापूर्वी कदाचित अशी भेददृष्टी वाढली, तरीसुद्धा मरणानंतर तो मलाच येऊन मिळतो. (३७)

कर्म करणें न करणें । ऐशिया संदेहाचें ठाणें ।
पळालें माझेनि दर्शनें । संकल्पाचें जिणें निमालें ॥ ५५ ॥
त्याला माझे दर्शन झाल्यामुळे, कर्म करणे किंवा न करणे अशा संशयाचे ठाणेच पळून जाते आणि संकल्पाचा प्राणच निघून जातो ५५.

संकल्पु निमतांचि पोटीं । विराली लिंगदेहाची गांठी ।
भेदाची हारपली त्रिपुटी । मी परमात्मा दिठीं देखतां ॥ ५६ ॥
मला परमात्म्याला दृष्टीने पहातांच संकल्प मनातल्या मनांतच जिरून जातो; लिंगदेहाची गांठच सुटते आणि भेदाची त्रिपुटी लोपून जाते ५६.

ज्यासी नाहीं भेदाचें भान । त्याचे देहाचें भरण पोषण ।
स्नान-भोजन-शयन । गमनागमन केवीं घडे ॥ ५७ ॥
ज्याला भेदाचेंच भान नाही, त्याच्या देहाचे पालनपोषण, स्नान, पान, खाणे, जेवणे, बसणे, जाणे, येणें तरी कसें घडणार? ५७.

जो जिणोनियां विकल्पभ्रांती । त्रिशुद्धिं मिसळला अद्वैंतीं ।
त्याचे देहाची स्थितिगती । प्रारब्धाहातीं निश्चित ॥ ५८ ॥
जो विकल्पाची भ्रांति जिंकून टाकून खरोखर अद्वैतस्वरूपांतच मिसळला, त्याच्या देहाची स्थिति व चलनवलन प्रारब्धाधीनच राहाते ५८.

वृक्ष समूळ उपडलिया पाहें । परी सार्द्रता वृक्षीं राहे ।
तांबूल खाऊनियां जाये । तरी अधरीं राहे सुरंगात ॥ ५९ ॥
वृक्ष समूळ जरी उपडून पडला, तरी त्या वृक्षामध्ये ओलेपणा हा असतोच. विडा गिळून टाकला तरी तोंडाला लाली ही राहतेच ५९.

हो कां कन्यादान केल्या पाहें । वरु कन्याही घेउनि जाये ।
तरी उगा मान उरला राहे । रुसणें न जाये देहान्त ॥ २६० ॥
किंवा कन्यादान करून दिलें, नवरा नवरीला घेऊनही गेला, तरी फुकटचा मान म्हणून शिल्लक असतो, आणि मरेपर्यत रुसणे आणि फुगणें कांहीं जात नाहीं! २६०,

तैसा अभिमानाचेनि सळें । मी कर्मकर्ता म्हणवीं बळें ।
ते अहंता निमे ज्ञानबळें । तरी शरीर चळे प्रारब्धें ॥ ६१ ॥
त्याप्रमाणे अभिमानाच्यामुळे मी कर्मकर्ता असें बळेच म्हणवितो, ती अहंता ज्ञानाच्या बळाने नाहीशी होते. तथापि शरीर हे प्रारब्धानें चालतच असते ६१.

कुलाल दंड भांडें घेऊनि जाये । पूर्वभवंडीं चक्र भंवत राहे ।
तेवीं अभिमान गेलिया पाहें । देह वर्तताहे प्रारब्धें ॥ ६२ ॥
कुंभार हा दांडा व मडके घेऊन जातो, तरी पहिल्या फिरविण्याने त्याचे चाक फिरतच असते. त्याप्रमाणे अभिमान नाहीसा झाला तरी, प्रारब्धाने देह चालतच असतो ६२.

त्या देहाचें भरणपोषण । प्रारब्धचि करितें जाण ।
ज्ञात्यासी प्रपंचाचे भान । सत्यत्वें जाण असेना ॥ ६३ ॥
त्या देहाचे पालनपोषण प्रारब्धच करते हें तूं लक्षांत ठेव. ज्ञात्याला खरोखर प्रपंचाचे भानच नसते ६३.

जैशी मिथ्या छाया देहापाशीं । तैसें देह दिसे सज्ञानासी ।
यालागीं देहबुद्धि त्यासी । सत्यत्वेंसीं उपजेना ॥ ६४ ॥
देहाजवळ जशी मिथ्यारूप छाया असते, त्याप्रमाणे ज्ञात्याला देह दिसत असतो. म्हणूनच खरोखर त्याला ‘देह हाच मी’ अशी बुद्धि उत्पन्न होत नाही ६४.

छाया सुखासनामाजीं बैसे । कां विष्ठेवरी पडली दिसे ।
त्या छायेचे अभिमानवशें । सुखदुःख नसे पुरुषासी ॥ ६५ ॥
छाया ही पालखीत बसली, किंवा ती विष्ठेवर पडलेली दिसली, तरी त्या छायेच्या अभिमानाने पुरुषाला काही त्याचे सुखदुःख होत नसते ६५.

तेवीं देहाची ख्यातिविपत्ती । बाधीना सज्ञानाचे स्थितीं ।
प्रारब्धक्षयाचे अंतीं । विदेह पावती कैवल्य ॥ ६६ ॥
त्याप्रमाणे देहाचा मानापमान हा सज्ञानाच्या स्थितीला मुळीच बाधक होत नाही. शेवटीं प्रारब्धाचा क्षय झाला म्हणजे ते विदेहमोक्ष पावतात ६६.

जैशी जळाची लहरी । निश्चळ होय सागरीं ।
तैसा ज्ञाता मजमाझारीं । विदेह करी समरसें ॥ ६७ ॥
पाण्याची लाट जशी समुद्रामध्ये स्थिर होते (मिसळून जाते) त्याप्रमाणे ज्ञाता माझ्यामध्येच विदेहपणाने समरसून जातो ६७.

उगम संगम प्रवाहगती । सरितांची नामरूपख्याती ।
जेवीं प्रळयोदकीं हारपती । तेवीं समरसती मजमाजीं ज्ञाते ॥ ६८ ॥
उगम-संगम-प्रवाह असतो, तोपर्यंतच नदीच्या नामरूपाची ख्याति असते; पण ती साराच जलप्रलय झाला की आटपते. त्याप्रमाणेच ज्ञाते माझ्यामध्ये एकरूप होऊन जातात ६८.

अपरोक्ष साक्षात्कार संन्यासी । त्याची स्थितिगति स्वधर्मेंसीं ।
उद्धवा सांगितली तुजपाशीं । आता मुमुक्षु संन्यासी ते ऐक ॥ ६९ ॥
उद्धवा ! ब्रह्मसाक्षात्कार घडलेले संन्यासी कसे असतात व त्यांची स्वधर्माची रीतभात कशी असते, ती मी तुला सांगितली. आतां मुमुक्षु संन्यासी कसे असतात तें ऐक ६९.

दुःखोदर्केषु कामेषु जातनिर्वेद आत्मवान् ।
अजिज्ञासितमद्धर्मो गुरुं मुनिमुपाव्रजेत् ॥ ३८ ॥
[श्लोक ३८] जितेंद्रिय पुरूषाचा जेव्हा असा निश्चय होतो की, विषयांच्या भोगांचे फळ दुःखच आहे, तेव्हा त्याने विरक्त व्हावे आणि माझ्या प्राप्तीचे साधन त्याला माहीत नसेल तर ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंना त्याने शरण जावे. (३८)

शेंडा धरूनि समूळ । ज्याचें उत्तरोत्तर दुःख फळ ।
अतिबाधक विषयजाळ । त्यासी केवळ जो अनासक्त ॥ २७० ॥
शेंड्यापासून बुडख्यापर्यंत ज्याची फळे उत्तरोत्तर दुःखदायक; अशा अत्यंत बाधक विषयजाळासंबंधाने जो निखालस अनासक्त २७०,

माझे प्राप्तीलागीं चित्त । सदा ज्याचें आर्तभूत ।
स्वधर्मकर्मीं वर्तत । जो वेदशास्त्रार्थ विवंची ॥ ७१ ॥
माझ्या प्राप्तीसाठी ज्याचे चित्त सदा उत्सुक; जो स्वधर्मकर्मानेच राहणार आणि वेदशास्त्रार्थाचा विचार करणारा ७१,

इहामुत्रभोगीं निश्चित । त्रासलें असे ज्याचें चित्त ।
ऐसा जो कां नित्य विरक्त । अतिविख्यात मुमुक्षु ॥ ७२ ॥
ऐहिक व पारलौकिक सुखाविषयीं ज्याचे चित्त खरोखर त्रासलेलें; असा जो नित्य विरक्त व अत्यंत मुमुक्षु असेल ७२,

तेणें साधवया ब्रह्मज्ञान । तेचि साधनीं लावितां मन ।
स्वकर्म झालिया विलक्षण । आली नागवण प्रत्यवायें ॥ ७३ ॥
त्याने ब्रह्मज्ञान साधण्यासाठी तिकडेच मन लावले, आणि त्याचे स्वधर्मकर्म जर विपरीत झाले, तर त्या दोषामुळेच त्याची नागवण होते ७३.

तेणें कर्म संन्यासोनि जाण । करावें संन्यासग्रहण ।
सद्‍गुरूसी रिघावें शरण । तेणें ब्रह्मज्ञानपदप्राप्ती ॥ ७४ ॥
त्याकरिता त्याने विधिपूर्वक कर्माचा त्याग करून संन्यास ग्रहण करावा आणि सद्गुरूला शरण जावे, म्हणजे त्याला श्रेष्ठ ब्रह्मज्ञानाची प्राप्ति होईल ७४.

एक केवळ भावार्थीं । नेणे स्वधर्मकर्मगती ।
नेणे शास्त्रश्रवणव्युत्पत्ती । परी माझी प्रीती अनिवार ॥ ७५ ॥
पण कित्येक लोक केवळ भावार्थी असतात. त्यांना स्वधर्मकर्माचे प्रकार कळत नाहीत, शास्त्रश्रवण वगैरेही माहीत नसते. परंतु माझ्यावर प्रेम असते तें मात्र अलोट असते ७५.

तेणेंही संन्यासूनि जाण । गुरूसी रिघावें शरण ।
त्यासीही गुरुकृपा जाण । ब्रह्मज्ञान‍अवाप्ति ॥ ७६ ॥
त्यानेसुद्धा संन्यास ग्रहण करून गुरुला शरण जावें. त्यालाही गुरुकृपेनें ब्रह्मज्ञानाची प्राप्ति होते ७६.

गुरु करावा अतिशांत । शास्त्रार्थ परमार्थपारंगत ।
त्याचे सेवेचा भावार्थ । स्वयें श्रीकृष्णनाथ सांगत ॥ ७७ ॥
गुरु करणें तो अत्यंत शांत व परोक्षापरोक्षज्ञानांत पारंगत असा करावा. आतां त्याच्या सेवेचा भावार्थ स्वतः श्रीकृष्ण सांगतात ७७.

तावत्परिचरेद्‍भक्तः श्रद्धावाननसूयकः ।
यावद्‍ब्रह्म विजानीयान्मामेव गुरुमादृतः ॥ ३९ ॥
[श्लोक ३९] श्रद्धावान व गुरूंचे दोष न पाहाणार्‍या गुरूभक्त शिष्याने जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही, तोपर्यंत मलाच गुरूंच्या रूपामध्ये पाहून त्यांची आदराने सेवा करावी. (३९)

अचळ अमळ अविनाश । परात्परतर परेश ।
गुरु तो परब्रह्म ईश । हा दृढ विश्वास धरावा ॥ ७८ ॥
गुरु म्हणजे अचळ, निर्मळ, अविनाश, परेहून पलीकडचा परमेश्वर, परब्रह्म व ईश्वर आहे असाच दृढतर विश्वास धरावा ७८.

त्या विश्वासाच्या पडिपाडीं । नवल गुरुचरणीं आवडी ।
नित्य नूतन नवी गोडी । चढोवढी भजनार्थ ॥ ७९ ॥
त्या दृढतर विश्वासाच्या संवयीने गुरुचरणाच्या ठिकाणी अपूर्व आवड उत्पन्न होऊन भजनाला नित्य नवी व अधिकाधिकच गोडी चढते ७९.

ऐशिया भजनपरवडीं । हृदयीं श्रद्धा उसळे गाढी ।
गुरुआज्ञेची नुल्लंघी काडी । आळस तोडी समूळ ॥ २८० ॥
अशी भजनाची आवड उत्पन्न झाली म्हणजे अंतःकरणामध्ये अतिशय श्रद्धा उचंबळून येते; गुरूच्या आज्ञेची एक काडीसुद्धा तो ओलांडीत नाही, आणि आळस सारा झाडून टाकतो २८०.

गुरुवाक्याचेनि श्रवणें । विकल्पाचें खत खाणणें ।
संकल्पासी सूळीं देणें । जीवें घेणें अभिमाना ॥ ८१ ॥
गुरुवाक्यश्रवणाच्या योगें विकल्पाचे खत खणून टाकतो. आणि संकल्पाला सुळी देऊन अभिमानाला ठार करितो ८१.

तेथ असूया कैंची उठी । धाकेंचि निमाली उठाउठी ।
ऐशी गुरुचरणीं श्रद्धा मोठी । परब्रह्मदृष्टीं गुरु पाहे ॥ ८२ ॥
त्या वेळी मत्सर डोके वर काय काढणार? तो धाकानें जेथल्या तेथेच ठार होतो. ह्याप्रमाणे गुरूच्या ठिकाणी अतिशय श्रद्धा बसते; तो परब्रह्मदृष्टीनेच गुरूला पहात असतो ८२.

निर्गुण जो निर्विकारु । तोचि मूर्तिमंत माझा गुरु ।
करूनि अकर्ता ईश्वरु । तोचि हा साचारु गुरु माझा ॥ ८३ ॥
जो निर्गुण आणि निराकार तोच मूर्तिमंत माझा गुरु होय. करून अकर्ता असणारा जो ईश्वर, तोच खरोखर माझा गुरु ८३.

नित्य निर्विकल्प देख । ज्यासी म्हणती समाधिसुख ।
तें माझ्या गुरूचें चरणोदक । ऐसा भावें नेटक भावार्थी ॥ ८४ ॥
नित्य व निर्विकल्प असें जें समाधिसुख म्हणतात, ते माझ्या गुरूच्या चरणाचें तीर्थ होय. इतका तो दृढभावार्थी होतो ८४.

गुरूतें पाहतां ब्रह्मदृष्टीं । शिष्य ब्रह्मत्वें आला पुष्टी ।
ब्रह्मरूप देखे सृष्टी । निज‍ऐक्यें मिठी गुरुचरणीं ॥ ८५ ॥
गुरूला अशा प्रकारें ब्रह्मस्वरूपाने पाहिले म्हणजे शिष्यालाही ब्रह्मस्वरूपाचीच पुष्टि प्राप्त होते. तो सारी सृष्टिच ब्रह्मरूप पाहू लागतो, आणि आत्मैक्यानेच गुरुचरणाला मिठी घालतो ८५.

ऐसें ब्रह्मरूपीं ऐक्य घडे । तंव गुरुसेवा करणें पडे ।
ऐक्य झाल्याही पुढें । सेवा न मोडे अखंडत्वें ॥ ८६ ॥
अशा प्रकारे ब्रह्मस्वरूपाशी ऐक्य झाले तरी, गुरूची सेवा करावीच लागते. ब्रह्माशी ऐक्य झाले तरी अखंडत्वामुळे सेवा मोडतच नाही ८६.

कापूर घातलिया जळीं । स्वयें विरोनि जळ परमळी ।
तेवीं अहं जाऊनि सेवा सकळी । सर्वीं सर्वकाळीं गुरुचरणीं ॥ ८७ ॥
कापूर पाण्यात घातला, तर तो स्वतः विरून जातो; पण जलाला सुगंधित करतो. त्याप्रमाणे ‘अहं’ हा अभिमान नाहीसा झाला तरी तो सदासर्वदा गुरुचरणाची सेवाच करीत राहतो ८७.

ऐशी अवस्था न येतां हाता । केवळ मुंडूनियां माथा ।
संन्यासी म्हणवी पूज्यता । त्याची अनुचितता हरि बोले ॥ ८८ ॥
अशी अवस्था हाताला न चढतां केवळ मस्तकाचे मुंडण करून आपण मोठा संन्यासी म्हणविणाराचा अनुचितपणा श्रीकृष्ण सांगतात ८८.

स्वयें संन्यास अंगीकारी । ब्रह्मसाक्षात्कार जो न करी ।
त्यालागीं स्वयें श्रीहरी । अतिधिक्कारीं निंदीत ॥ ८९ ॥
स्वतः संन्यास घेऊन जो ब्रह्मस्वरूपाचा साक्षात्कार करून घेत नाही, त्याचा स्वतः श्रीकृष्ण अतिशय धिक्कार करून दूषण देतात ८९.

यस्त्वसंयतषड्वर्गः प्रचण्डेन्द्रियसारथिः ।
ज्ञानवैराग्यरहितस्त्रिदण्डमुपजीवति ॥ ४० ॥
सुरानात्मानमात्मस्थं निन्हते मां च धर्महा ।
अविपक्वकषायोऽस्मादमुष्माच्च विहीयते ॥ ४१ ॥
[श्लोक ४०/४१] परंतु ज्याने पाच इंद्रिये आणि मन या सहांवर विजय मिळविला नाही, ज्याचे इंद्रियरुपी घोडे आणि बुद्धीरूपी सारथी हे दोघेही बिघडलेले आहेत, तसेच ज्याच्या हृदयात ज्ञान व वैराग्य नाही, तो जर त्रिदंडी संन्याशाचा वेष धारण करून आपले पोट भरत असेल, तर तो संन्यासधर्माचा नाशच करीत आहे, असे समजावे शिवाय तो देवांना, स्वतःला आणि आपल्या हृदयात असलेल्या मला फसविण्याचा प्रयत्‍न करीत असतो, त्याच्या वासना नष्ट झालेल्या नसतात म्हणून इहलोक आणि परलोक अशा दोन्ही लोकांना तो गमावून बसतो. (४०-४१)

नाहीं वैराग्याची स्थिती । नसतां विषयविरक्ती ।
देखोदेखीं संन्यास घेती । केवळ वृत्ती अन्नार्थ ॥ २९० ॥
काही लोक अंगांत वैराग्य न बाणतां, विषयाची विरक्ति न येतां, देखोवेखीनें म्ह• दुसऱ्याचे पाहून केवळ अन्नासाठी संन्यास घेतात! २९०.

संन्यास नेघतां पूर्व दृष्टीं । जें वैराग्य होतें पोटीं ।
तें संन्यास घेतल्यापाठीं । उठाउठीं पळालें ॥ ९१ ॥
संन्यास घेण्याच्या आधी अंतःकरणांत जें वैराग्य झालेले होते, तेही संन्यास घेतल्यानंतर लगेच निघून जातें ! ९१.

ज्ञानेंद्रियें पांच सहावें मन । हेचि अरिषड्वर्ग जाण ।
यांचें न करितां निर्दळण । संन्यासपण तो विटंबु ॥ ९२ ॥
पांच ज्ञानेंद्रिये आणि सहावे मन, हेच सहा शत्रु होत. त्यांचे निर्दळण केल्याशिवाय संन्यास घेणे ही केवळ विटंबना होय ९२.

अवैराग्यें सकाम मन । तेणें विषयाकुलित बुद्धि जाण ।
नाहीं ज्ञान ध्यान साधन । दंडग्रहण उदरार्थ ॥ ९३ ॥
वैराग्याच्या अभावामुळे मन लोभिष्ट असते आणि बुद्धि विषयलंपट होते. ज्ञान नाहीं, ध्यान नाहीं, साधन नाही. उदरभरणासाठी दंड मात्र हातात घेतलेला! ९३.

नुपजेच अनुताप जाण । न करीच श्रवण मनन ।
आदरें न साधीचि साधन । त्यासी ब्रह्मज्ञान नव्हेचि ॥ ९४ ॥
उपरति कधी व्हावयाची नाही. श्रवणमननही कधी करावयाचे नाही. आदराने कधी साधनही करावयाचे नाही. अशाला कधींच ब्रह्मज्ञान होणार नाहीं ९४.

त्याचा व्यर्थ संन्यास जाण । व्यर्थ त्याचें दंड मुंडण ।
व्यर्थ काषायवस्त्रग्रहण । जेवीं वेषधारण नटाचें ॥ ९५ ॥
त्याचा संन्यास व्यर्थ, त्याचा दंड व्यर्थ ; त्याचे मुंडण व्यर्थ ; त्याची भगवीं वस्त्रें व्यर्थ. ते केवळ नटाचे सोंग होय ९५.

संन्यास घेतलिया पाठीं । काम उचंबळे उठाउठीं ।
क्रोधलोभांची धुमे आगिटी । चौगुणा पोटीं अभिमान ॥ ९६ ॥
संन्यास घेतल्यानंतर काम उचंबळतो; क्रोधाची लोभाची आगटी धुमसूं लागते; आणि मनामध्ये चौपट अभिमान उत्पन्न होतो ९६,

आसक्ति अधिकाधिक उठी । सदा ग्रामणी चावटी ।
करणें पैशुन्याच्या गोष्टी । दंड कासोटी दंभार्थ ॥ ९७ ॥
अधिकाधिक आसक्ति करावयाची; नेहमीं गांवकुटाळक्या आणि टासोपणाच्या गोष्टी सांगावयाच्या; आणि दंड व कौपीन ही केवळ दंभार्थ वापरावयाची! ९७.

अनधिकारीं दंडग्रहण । तेणें संन्यासरूपें जाण ।
केवळ आली नागवण । आपल्या आपण नाडिलें ॥ ९८ ॥
दंड ग्रहण करण्याला असा मनुष्य निखालस अनधिकारी होय. त्याने संन्यासाच्या निमित्ताने आपली नागवण करून घेतली म्हणून समजावें ९८.

नाडिले यज्ञाधिकारी सुरगण । नाडिले स्वधाकाराचे पितृगण ।
नाडिले ऋषि भूतगण । बळिअर्पण ठाकेना ॥ ९९ ॥
त्याने यज्ञाचे अधिकारी जे देव त्यांना टाळा दिला : स्वधाचे अधिकारी जे पितृगण त्यांना धाब्यावर बसविलें ; ऋषि व भूतगण यांनाही फसविलें. कारण, त्याच्याकडून बलिदान कसलेच होत नाहीं ! ९९.

जीवरूपें मी परमात्मा आपण । त्या मज हृदयस्था ठकिलें जाण ।
जीवोद्धारीं जें संन्यासग्रहण । तेंचि दृढबंधन त्यासी झालें ॥ ३०० ॥
जीवरूपाने मी परमात्मा स्वतः हृदयामध्ये असणारा, त्या मलाही तो ठकवितो. त्यामुळे जीवाच्या उद्धारासाठी जे संन्यासग्रहण करावयाचे तेच दृढतर बंधनाला मात्र कारणीभूत होते ३००.

संन्यासग्रहणीं दृढबंधन । व्हावया कोण कारण ।
तेचि विषयींचें निरूपण । स्वयें नारायण बोलिला ॥ १ ॥
संन्यासग्रहण हेच दृढ बंधनाला हेतु होण्याचे कारण काय ? याविषयींचेंच निरूपण स्वतः श्रीकृष्ण सांगतात १.

पूर्वश्लोकींचे तिनी चरण । येथील हें निरूपण ।
श्रोतीं द्यावें अवधान । झणें विलक्षण कोणी म्हणे ॥ २ ॥
आता कोणी म्हणतील की. हे सांगणे मोठे विलक्षण दिसते. तर हे पूर्वीच्या श्लोकांतील तीन चरणांच्या अर्थाचेंच निरूपण आहे. श्रोत्यांनी लक्ष देऊन ऐकावे २.

”निन्हुते मां च धर्महा ।
अविपक्वकषायोऽस्मादमुष्माञ्च विहीयते ॥”
तो देवांना, स्वतःला आणि आपल्या हृदयात असलेल्या मला फसविण्याचा प्रयत्‍न करीत असतो, त्याच्या वासना नष्ट झालेल्या नसतात म्हणून इहलोक आणि परलोक अशा दोन्ही लोकांना तो गमावून बसतो.

करोनियां संन्यासग्रहण । न करी ज्ञान ध्यान साधन ।
न करी प्रणव‍उच्चारण । अविरक्त जाण विषयार्थी ॥ ३ ॥
संन्यास ग्रहण करून ज्ञान, ध्यान, इ. साधन करीत नाहीं; ओंकाराचा जपही करीत नाही; आणि विषयाच्या ठिकाणी वैराग्य नाही ३;

तेणें दारादिअभिलाषण । करिती द्रव्याचें संरक्षण ।
आणि गोदानादि ग्रहण । पचन पाचन करविती ॥ ४ ॥
त्यामुळे स्त्रियादिकांचा अभिलाष करून तो द्रव्याचे संरक्षण करतो, आणि गोदानादिक ग्रहण करून अर्चन अथवा यजनयाजन करवितो ४.

मठाधिपत्याचिये बुद्धीं । धनधान्यस्नेहसमृद्धी ।
नाना वाढवितां उपाधी । जीवात्मा त्रिशुद्धी नाडिला ॥ ५ ॥
मठाधिपतीच्या नात्याने धनधान्य यांचा लोभ वाढून नानाप्रकारच्या उपाधि लागल्या की, जीवात्मा हा खरोखर नाडला जातो! ५.

ऐसें करितां अधर्मपण । जीवासी लागलें दृढ बंधन ।
जेणें इहलोकपरलोकसाधन । त्या नरदेहासी जाण नाडिलें ॥ ६ ॥
ह्याप्रमाणे अधर्म करूं लागले असता जीवाला दृढतर बंधन मात्र प्राप्त होते. आणि ज्या नरदेहाच्या योगें इहलोक व परलोक साधता येतो, त्या नरदेहाला हा आंचवतो ६.

चौर्‍याशीं लक्ष योनींप्रती । जैं असंख्य फेरे होती ।
तैं नरदेहाची प्राप्ती । अवचटें पावती सभाग्य ॥ ७ ॥
चौऱ्यांशी लक्ष योनींचे जेव्हां असंख्य फेरे होतात, तेव्हांच भाग्यवंत लोकांना अवचित नरदेह प्राप्त होतो ७.

त्या नरदेहासी येऊनि जाण । स्वयें नागवला आपण ।
करितां अधर्माचरण । नरक दारुण संन्याशा ॥ ८ ॥
अशा त्या नरदेहाला येउन जर आपली आपणच बुडवणूक करून घेतली, आणि अधर्माचरण केले, तर त्या संन्याशाला नरकाचीच प्राप्ति होणार ८.

ज्या नांव गा `आश्रम चौथा’ । ज्यासी देवो वंदी माथां ।
तेथेंही अधर्म करितां । नरकपाता पावले ॥ ९ ॥
अरे ! ‘चौथा आश्रम’ असें ज्याला नांव, ज्या आश्रमाला देव शिरसावंदन करितो , त्यांतही जर अधर्म केला, तर नरकालाच जावयाचे ९.

ज्या नरकाचे ठायीं । कोटि वर्षें बुडतां पाहीं ।
ठावचि न लागें कंहीं । तैसे ठायीं बुडाले ॥ ३१० ॥
ज्या नरकामध्ये कोट्यवधि वर्षे बुडाले तरी कधींही ठाव लागणार नाही, अशा ठिकाणी ते बुडतात ३१०.

मुख्य चतुर्थाश्रमीं हे स्थिती । तैं इतर आश्रमां कैंची गती ।
यालागीं आश्रमधर्मयुक्ती । स्वयें श्रीपती सांगत ॥ ११ ॥
मुख्य असा जो चतुर्थाश्रम, त्यांतील ही स्थिति; मग इतर आश्रमांची गोष्ट काय सांगावी? म्हणून स्वतःच श्रीकृष्ण त्या आश्रमधर्माची युक्ति सांगतात ११.

भिक्षोर्धर्मः शमोऽहिंसा तप इक्षा वनौकसः ।
गृहिणो भूतरक्षेज्या द्विजस्याऽऽचार्यसेवनम् ॥ ४२ ॥
[श्लोक ४२] संन्याशाचे मुख्य धर्म शांती आणि अहिंसा, वानप्रस्थाचे मुख्य धर्म तपश्चर्या आणि तत्त्वविचार गृहस्थाश्रमीचे मुख्य धर्म प्राण्यांचे रक्षण व यज्ञयाग आणि ब्रह्मचार्‍याचा मुख्य धर्म गुरूंची सेवा होय. (४२)

संन्याशासी मुख्य `शम’ । सबाह्य `इंद्रियनेम’ ।
`अहिंसा’ त्याचा स्वधर्म । हा परमधर्म संन्याशासी ॥ १२ ॥
संन्याशाला शांति ही मुख्य आहे. याशिवाय अंतर्बाह्य इंद्रियांचा निग्रह पाहिजे. अहिंसा हा तर त्याचा स्वधर्मच, संन्याशाचा श्रेष्ठ धर्म तो हाच १२.

वानप्रस्थाचा स्वधर्म । `तपप्राधान्य मंत्र होम’ ।
आतां गृहस्थाचा नेम । तिंही आश्रमां विश्रामदाता ॥ १३ ॥
तपःप्रधान मंत्रहोम हा वानप्रस्थाचा स्वधर्म होय आणि तिन्ही आश्रमस्थांना आश्रय देऊन सुखविणे हा गृहस्थाचा नेम होय १३.

गृहस्थ मुख्य `अग्निहोत्र’ जाण । संन्यासी ब्रह्मचार्‍यांसी द्यावें अन्न ।
करावें `भूतसंरक्षण’ । तेहीं लक्षण अवधारीं ॥ १४ ॥
अग्निहोत्र हे गृहस्थाला मुख्य आहे. त्याने संन्याशाला व ब्रह्मचाऱ्याला अन्न द्यावे आणि प्राणिमात्रांचे संरक्षण करावे. त्याचा मार्गही श्रवण कर १४.

असिलेनि सामर्थ्यें जाण । अन्न धन वस्त्र जीवन ।
तृण पर्ण निवासस्थान । देऊनि दीन रक्षावे ॥ १५ ॥
गृहस्थानें याचकाला यथाशक्ति अन्नपाणी, वस्त्रपात्र, पैसाअडका, राहण्यासाठी तृणपर्णाच्या झोपड्या बांधून देऊन गरीबगुरिबांचे रक्षण करावें १५.

ब्रह्मचार्‍याचे स्वधर्मीं जाण । श्रद्धायुक्त `गुरुसेवन’ ।
एवं आश्रमधर्मलक्षण । मुख्यत्वें हें जाण उद्धवा ॥ १६ ॥
आतां ब्रह्मचाऱ्याचा स्वधर्म म्हणजे श्रद्धायुक्त बुद्धीनें गुरूची सेवा करणे. उद्धवा ! याप्रमाणे आश्रमधर्माची ही मुख्य लक्षणे समजावी १६.

गृहस्थाश्रमीं जो धर्म आहे । तो इतर आश्रमीं करूं नये ।
इतराश्रमींचा धर्म पाहें । गृहस्थाश्रमीं होये करणीय ॥ १७ ॥
गृहस्थाश्रमाला जो धर्म सांगितला आहे, तो इतर आश्रमीयांनी करूं नये. परंतु इतर आश्रमांतील काही धर्म गृहस्थाश्रमीयाने करण्यास हरकत नाही १७.

ब्रह्मश्चर्यं तपः शौचं संतोषो भूतसौहृदम् ।
गृहस्थस्याप्यृतौ गन्तुः सर्वेषां मदुपासनम् ॥ ४३ ॥
[श्लोक ४३] फक्त ऋतुकाळीच आपल्या स्त्रीशी सहवास करणार्‍या गृहस्थाचेसुद्धा ब्रह्मचर्य, तपश्चर्या, पवित्र्य, संतोष आणि सर्व प्राण्यांबद्दल प्रेमभाव हे मुख्य धर्म होत माझी उपासना तर सर्वांनीच केली पाहिजे. (४३)

गृहस्थें व्हावया निष्पाप । ठाके तो करावा जप तप ।
उभय शौचांचें स्वरूप । अतिसाटोप करावें ॥ १८ ॥
गृहस्थानें निष्पाप होण्यासाठी होईल तितका जप व तप करावें, आणि अंत:शुद्धि व बाह्यशुद्धि या दोन्ही शुद्धि अत्यावश्य साधाव्यात १८.

पोटींची सांडूनि कुसमुस । यथालाभें अतिसंतोष ।
परोपकारीं अतिहव्यास । सुहृद सर्वांस स्वात्मत्वें ॥ १९ ॥
पोटांतील तळमळ सोडून देउन, मिळेल त्यांतच अत्यंत संतोष मानावा. आपण सर्वांचे सुहृद आहोत असे समजून परोपकार करण्याचा हव्यास धरावा १९.

गृहस्थीं ब्रह्मचर्यलक्षण । ऋतुकाळीं स्वदाराभिगमन ।
मुख्यत्वें करावें माझें भजन । हा स्वधर्म जाण सर्वांचा ॥ ३२० ॥
गृहस्थाश्रमांतही ब्रह्मचर्याचे लक्षण हें की, ऋतुकाळीच स्वस्त्रीशी रममाण व्हावें. मुख्यत्वेकरून माझे भजन करणे हा सर्वाचा स्वधर्म होय ३२०.

सर्व आश्रम सर्व वर्ण । त्यांसी हाचि स्वधर्म जाण ।
सांडोनि विषयाचें भान । माझें भजन करावें ॥ २१ ॥
सर्व वर्णाना व सर्व आश्रमांना हाच स्वधर्म आहे की, विषयाचे भान सोडून देऊन माझे भजन करावें २१.

करितां स्वधर्में माझी भक्ती । भक्तासी होय जे प्राप्ती ।
तेचि सांगताहे श्रीपती । उद्धवाप्रती स्वानंदें ॥ २२ ॥
स्वधर्माने माझीच भक्ति केली असतां भक्तांना जे काय प्राप्त होते, तेंच श्रीकृष्ण उद्धवाला आनंदाने सांगत आहेत २२.

इति मां यः स्वधर्मेण भजेन्नित्यमनन्यभाक् ।
सर्वभूतेषु मद्‍भावो मद्‍भक्तिं विन्दतेऽदृढाम् ॥ ४४ ॥
[श्लोक ४४] अशा प्रकारे जो अनन्य भावाने आपल्या वर्णाश्रमधर्मांच्या द्वारा माझ्या सेवेत तत्पर आणि सर्व प्राण्यांच्या ठिकाणी माझीच भावना करतो, त्याला माझी दृढ भक्ती प्राप्त होते. (४४)

सर्व भावें अनन्यगतीं । करितां स्वधर्में माझी भक्ती ।
माझा भावो सर्वांभूतीं । शीघ्रगती उल्हासे ॥ २३ ॥
सर्वोपरी एकनिष्ठेनें व स्वधर्मानं माझी भक्ति केली असता, सर्व भूतांत माझी भावना दृढतर होते २३.

मद्‍भावो जोडल्या सर्व भूतीं । तेणें प्रकटे माझी चौथी भक्ती ।
जिच्या पायीं चारी मुक्ती । सदा लागती स्वानंदें ॥ २४ ॥
सर्व प्राणिमात्रांमध्ये माझी भावना होऊ लागली म्हणजे जिच्या पायांला स्वानंदानें चारही मुक्ति लागतात, अशी माझी चौथी भक्ति प्रगट होते २४.

अनिवार अनन्यगती । सर्वस्वें ज्यासी माझी प्रीती ।
तो लाहे माझी परमभक्ती । जेथोनि कल्पांतीं च्यवेना ॥ २५ ॥
अनिवार एकनिष्ठेने सर्वस्वी ज्याला माझी आवड लागते त्याला माझी ‘परमभक्ति प्राप्त होते व तो तिच्यापासून अथवा माझ्या परमधामापासून कल्पांतीही च्युत होत नाही २५.

भक्त्योद्धवानपायिन्या सर्वलोकमहेश्वरम् ।
सर्वोत्पत्त्यप्ययं ब्रह्म कारणं मोपयति सः ॥ ४५ ॥
[श्लोक ४५] उद्धवा ! सर्व लोकांचा स्वामी, सर्वांची उत्पत्ती आणि प्रलयांचे परम कारण ब्रह्म अशा मला तो अखंड भक्तीच्याद्वारा प्राप्त करून घेतो. (४५)

सकळ सच्चिदानंदस्थिती । जीमाजीं सांपडे मी सहजगती ।
ती नांव माझी `परमभक्ती’ । जाण निश्चितीं उद्धवा ॥ २६ ॥
उद्धवा ! जी पूर्ण सचिदा सच्चिदानंदमय स्थिति, तिच्यामध्ये मी सहजगतीनें सांपडतो. तिचंच नाव माझी ‘परमभक्ति’ असें तूं निश्चित जाण २६.

विपरीत संसाराचें भान । दिसे दृष्य-विलक्षण ।
तेथ सदा स्वानंदपूर्ण । ते चौथी जाण भक्ती माझी ॥ २७ ॥
ज्या अवस्थेत संसाराचे स्वरूप उलटें दिसावयास लागते : दृश्यही विलक्षण दिसते : व सर्वकाल पूर्ण स्वानंदाचा अनुभव येतो ती माझी ‘चौथी भक्ति’ होय २७.

जेथ देव भक्त एक होती । एकपणें भजनस्थिती ।
ऐशी साधकांसी प्राप्ती । ते `परमभक्ती’ उद्धवा ॥ २८ ॥
उद्धवा! जेथे देव आणि भक्त एक होऊन जातात, ऐक्यस्वरूपानेच भजन घडते, अशी जी साधकाची प्राप्ति, तीच माझी ‘परमभक्ति’ होय २८.

माझी प्रकटल्या परम भक्ती । पतन नाहीं प्रळयांतीं ।
साधक मद्‌रूपा येती । स्वरूपस्थितीं समसाम्यें ॥ २९ ॥
अशी माझी ‘परमभक्ति’ प्रकट झाली की, प्रळयांतीसुद्धा पतन नाही. कारण स्वरूपस्थितीच्या समसाम्यामुळे साधक मत्स्वरूपालाच पोचतात २९.

त्या स्वरूपाचें लक्षण । सांगताहे श्रीनारायण ।
उत्पत्ति-स्थिति-निदान । कारणा जो चिदात्मा ॥ ३३० ॥
त्या स्वरूपाचे लक्षण श्रीनारायण सांगतात. उत्पत्ति-स्थिति-लयाच्या कारणाचेही कारण असा तो चिदात्मा आहे ३३०;

जो सकळ नियंता ईश्वरु । जो विश्वात्मा विश्वंभरु ।
जो उपनिषदांचें सारु । जो महेश्वरु जगाचा ॥ ३१ ॥
जो सर्वांचा नियंता ईश्वर ; जो विश्वात्मा आणि विश्वंभर ; जो उपनिषदांचे सार आणि जो जगाचा महेश्वर ३१

त्या पदाची पदप्राप्ती । भक्त पावले परमभक्तीं ।
तेंचि पुढती उद्धवाप्रती । स्वानंदें श्रीपति सांगत ॥ ३२ ॥
त्याच्या पदाला भक्त हे माझी ‘परमभक्ति’ करून पोचतात. तेच पुढे श्रीकृष्ण स्वानंदानें उद्धवाला सांगत आहेत ३२.

इति स्वधर्मनिर्णिक्तसत्त्वो निर्ज्ञातमद्‍गतिः ।
ज्ञानविज्ञानसंपन्नो नचिरात्समुपैति माम् ॥ ४६ ॥
[श्लोक ४६] अशा प्रकारे तो गृहस्थ आपल्या धर्मांचे पालन करून आपले अंतःकरण चांगल्या तर्‍हेने शुद्ध करून माझे स्वरूप जाणतो आणि ज्ञानविज्ञानाने संपन्न होऊन लवकरच मला प्राप्त करून घेतो. (४६)

ऐशिया पदाची पदप्राप्ती । साधक पावले स्वधर्मस्थितीं ।
ते स्वधर्मप्रयोजनगती । यथानिगुती सांगत ॥ ३३ ॥
एवढ्या पदाला साधक स्वधर्मस्थितीने वागून पोंचतात. त्याच स्वधर्माचे कार्यकारण यथार्थ रीतीने भगवान सांगतात ३३.

करितां स्वधर्मानुष्ठान । रजतमें नाशती जाण ।
शुद्धसत्त्व अंतःकरण । तेथ माझें ज्ञान प्रकाशे ॥ ३४ ॥
स्वधर्माचे अनुष्ठान केलें म्हणजे रज आणि तम हे नाश पावतात. आणि अंत:करण शुद्धसत्त्वयुक्त झाले म्हणजे तेथें माझें ज्ञान प्रकाशमान होते ३४.

प्रकाशल्या माझें ज्ञान । तेणें उल्हासे माझें भजन ।
भजनास्तव मन । विकल्पपण पैं त्यागी ॥ ३५ ॥
आणि माझे ज्ञान प्रकाशित झाले म्हणजे माझे भजनही फैलावते आणि भजनाचा विकास झाला म्हणजे मन संकल्प विकल्प सोडून देते ३५.

विकल्पत्यागाचिये गतीं । वैराग्यें उचंबळे विरक्ती ।
भासे परमात्मा सर्व भूतीं । तेणें `परमभक्ती’ उल्हासे ॥ ३६ ॥
विकल्पाचा त्याग झाला की विरक्ति उचंबळून येते व सर्व प्राणिमात्रांमध्ये परमात्म्याचाच भास होऊ लागतो; आणि तेणेकरून ‘परमभक्ति’ विकास पावते ३६.

उल्हासल्या परमभक्ती । भक्तासी माझी स्वरूपप्राप्ती ।
तेचि स्वरूपाची स्वरूपस्थिती । यथानिगुतीं सांगत ॥ ३७ ॥
परमभक्तीचा विकास झाला की माझ्या भक्ताला मत्स्वरूपाची प्राप्ति घडते. त्याच स्वरूपाचे लक्षण यथार्थ रीतीने सांगतात ३७.

परमात्मा परंज्योती । परब्रह्म परंज्ञप्ती ।
परात्परतर प्रकृती । वेद बोलती `परावर’ जो ॥ ३८ ॥
परमात्मा, परंज्योति, परब्रह्म, परंज्ञप्ति, प्रकृतीहुन परात्पर व ज्याला ‘परावर’ म्हणतात ३८.

अज अव्यय अक्षर । अरूप अनाम अगोत्र ।
अलक्ष अतर्क्य अपार । अपरंपारस्वरूप ॥ ३९ ॥
अज, अव्यय, अक्षर, अरूप, अनाम, अगोचर, अलक्ष्य, अतर्क्य , अपार आणि अनंतस्वरूप ३९;

ऐशी निजस्वरूपीं निजप्राप्ती । भक्त पावले स्वधर्मस्थिती ।
जेथूनि परतलिया श्रुती । नेतिनेतीं निजनिष्ठा ॥ ३४० ॥
अशा प्रकारची आत्म्यामधीलच आत्मस्वरूपाची प्राप्ति भक्तांना स्वधर्मस्थितीने घडून येते, ‘नेति’ ‘नेति’ असें म्हणून श्रुतीही तेथून परत फिरतात (अशा स्वस्वरूपस्थितीला भक्त पोचतात) ३४०.

ऐसें मद्‌रूप पावल्यापाठीं । संसाराची काढिली कांटी ।
नांवरूपांची बुडाली गोठी । पडली तुटी जन्ममरणां ॥ ४१ ॥
ह्याप्रमाणे मत्स्वरूप झाले म्हणजे संसाराचे कुंपण तुटून जातें: नामरूपाची वार्ता लुप्त होते व जन्ममरणाचे नावही शिल्लक राहात नाही ४१.

एवं स्वधर्माचेनि धर्मवशें । मीतूंपणाचें नांवचि पुसे ।
मद्‌रूपाचेनि सामरस्यें । अनायासें मीचि जाहले ॥ ४२ ॥
अशा प्रकारे स्वधर्माच्या आश्रयाने चालले असतां मीपणाचे नांवच पुसून जाते आणि मत्स्वरूपाशी समरस झाल्याने अनायासे ते मीच होतात ४२.

`पूर्वीं होतों मी जीव । आतां झालों सदाशिव’ ।
हाही बुडाला आठव । ऐसा माझा अनुभव मद्‍भक्तां ॥ ४३ ॥
पूर्वी मी जीव होतो आणि आतां शिव झालों, ह्याचीही आठवण राहात नाही. असा माझ्या भक्तांना माझा अनुभव येतो ४३.

शून्य पडिलें संसारस्थिती । तेथ कैंची पुनरावृत्ती ।
ऐशी मद्‍भक्तां माझी प्राप्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ४४ ॥
संसाराच्या अस्तित्वावरच पाणी पडते. तेथे पुनरावृत्ति कुठून ? अशी माझ्या भक्तांना माझी प्राप्ति होते ४४.

एवं स्वधर्में मत्प्राप्ति जाण । तया स्वधर्माचें महिमान ।
स्वयें सांगताहे श्रीकृष्ण । सावधान परियेसा ॥ ४५ ॥
तात्पर्य , स्वधर्मेंकरूनच माझी प्राप्ति होते हे लक्षात ठेव. असा त्या स्वधर्माचा महिमाच श्रीकृष्ण स्वतः सांगत आहेत. तरी लक्ष देऊन श्रवण करावा ४५.

वर्णाश्रमवतां धर्म, एष आचारलक्षणः ।
स एव मद्‍भक्तियुतो, निःश्रेयसकरः परः ॥ ४७ ॥
[श्लोक ४७] मी तुला हा वर्णाश्रमांचे पालन करणार्‍यांच्या आचारधर्म सांगितला आहे हे करताना जर तो माझ्या भक्तीने संपन्न असेल, तर त्याला खात्रीने मोक्षाची प्राप्ती होते. (४७)

अनादि जो स्वधर्माचार । जो कां मोक्षकर साचार ।
तेणें स्वधर्में सकाम नर । लोकांतर वांछिती ॥ ४६ ॥
अत्यंत प्राचीनकालापासून चालत आलेला जो स्वधर्माचार, जो खरोखर मोक्ष देणारा, त्याच स्वधर्माचरणाने सकाम लोक स्वर्गादि लोकांची इच्छा करतात! ४६.

झालिया लोकांतरप्राप्ती । तेथूनि होय पुनरावृत्ती ।
न करूनियां माझी भक्ती । स्वधर्म नाशिती सकामें ॥ ४७ ॥
पण तो स्वर्ग मिळाला तरी तेथून मृत्युलोकावर जन्म घ्यावा लागतोच. ह्याप्रमाणे माझी भक्ति न करितां लोक सकामपणाने स्वधर्म नासून टाकतात ४७.

ब्राह्मणा आला भद्रजाती । आम्हां न पोसवे हा निश्चितीं ।
मग तो देऊनियां घेती । वाहावया पोथी वृद्ध ढोर ॥ ४८ ॥
ब्राह्मणाला हत्ती दान मिळाला तर ह्याला खावयाला कोणी घालावें असें म्हणून त्याला देऊन टाकतात, आणि पोथ्या वहावयाला म्हातारा बैल घेतात ४८.

यापरी स्वधर्म जाण । उपेक्षिती गा ब्राह्मण ।
मग लोकांतरीं कोरान्न । मागावया कण धांवती ॥ ४९ ॥
ह्याप्रमाणे बाह्मणलोक स्वधर्माची उपेक्षा करतात आणि स्वर्गात भिकेचे दाणे गोळा करावयाला जातात ! ४९.

घरीं आणोनि दीघली कामधेनु । आम्हां न पोसवे म्हणूनु ।
ताकासाठीं देती हेळसूनु । आली नागवणु ते नेणे ॥ ३५० ॥
घरांत कोणी कामधेनु आणून दिली तर ती आम्हांला पोसवत नाही म्हणून ताकाच्या मोबदल्यांत तिला देऊन टाकतात. पण त्यांत आपली केवढी नागवण झाली हे त्यांना कळत नाही! ३५०.

तेवीं म्यां जाण गायत्रीमंत्र । दिधला ब्राह्मणांसी स्वतंत्र ।
तो उपेक्षूनियां मंत्रतंत्र । शूद्राचार आचरती ॥ ५१ ॥
त्याप्रमाणे मी ब्राह्मणांना गायत्री हा स्वतंत्र मंत्र दिला असता त्याची उपेक्षा करून भलतेच मंत्रतंत्र जपतात व ते शुद्राच्या आचाराने वागतात ! ५१.

सौर शाक्त गाणपत्यादि जाण । नाना मंत्रदीक्षा घेती ब्राह्मण ।
परी गायत्रीचें अनुष्ठान । एकही जाण न करिती ॥ ५२ ॥
ब्राह्मणलोक सौर, शाक्त, गाणपत्य, इत्यादि अनेक प्रकारच्या दीक्षा घेतात; पण एकही कोणी गायत्रीचे अनुष्ठान करीत नाही! ५२.

नाहीं गायत्रीचें अनुष्ठान । परी विपरीत झालें आन ।
गायत्रीचें श्रेय जाण । देती ब्राह्मण द्रव्यार्थ ॥ ५३ ॥
गायत्रीचे अनुष्ठान तर नाहीच, पण त्याहून विपरीत करतात. ते काय ? तर पैशासाठी ब्राह्मण हे गायत्रीमंत्राचें सारें श्रेयच विकत देतात ! ५३.

गायत्रीमंत्र असोनि घरीं । तिचा भावार्थ कोणी न धरी ।
दीक्षेलागीं मूर्खाचे द्वारीं । लोळिजे द्विजवरीं ऐसें झालें ॥ ५४ ॥
गायत्री मंत्र घरांत असून त्याचा भावार्थ कोणी धरीत नाहीत आणि मूर्खाच्या दारात ‘दीक्षा द्या ‘ ‘दीक्षा द्या ‘ म्हणून ब्राह्मणच लोळत असतात! असा प्रकार झाला आहे ५४.

शस्त्रास्त्रीं रथ सुदृढू । त्यावरी बैसविला भेडू ।
सांडूनि पळणें मानी सुरवाडू । न शके विभांडूं रणांगण ॥ ५५ ॥
शस्त्रास्त्रांनी भरलेला खंबीर रथ असला, आणि त्यावर नेऊन भित्रा मनुष्य बसविला, तर रथ टाकून पळून जाणे ह्यांतच तो सुख मानतो. कारण त्याला युद्ध करण्याचे मुळी सामर्थ्यच नसते ५५.

तेवीं वेदरूप मी नारायण । ब्राह्मणहृदयीं असें जाण ।
त्याचें नेणोनि महिमान । वेदपारायण विकिती ॥ ५६ ॥
त्याप्रमाणे मी वेदरूपाने नारायण ब्राह्मणांच्या हृदयांतच असता, त्याचा महिमा न जाणतां वेदाचें केलेलें पारायण विकून टाकतात ! ५६.

वांछूनियां स्वर्गफळ । नाना याग करिती प्रबळ ।
कामकल्पना केवळ । स्वधर्म विकळ पाडिती ॥ ५७ ॥
स्वर्गफळाची इच्छा धरून अनेक प्रचंड यज्ञ करतात. तात्पर्य सकाम कल्पना ह्या स्वधर्माला स्वतः बुडवितात ५७.

वेदीं प्रतिपाद्य कर्मफळ । तो वेदु मिथ्या नव्हे केवळ ।
तो वेदवाद समूळ । नेणोनि बरळ हा मानिती ॥ ५८ ॥
ज्या वेदामध्ये कर्माचे फळ सांगितलेले आहे, तो वेद केवळ मिथ्या नव्हे ; त्या वेदांत खरे काय प्रतिपादन केलें आहे ते मुळीच न जाणतां वाटेल ती बडबडच खरी समजतात ! ५८.

घ्यायवा वोखदाची वाटी । माता साकर दे चिमुटी ।
तें मुख्य फळ नव्हे दृष्टीं । जावया पोटींचा महारोगु ॥ ५९ ॥
औषधाची वाटी घ्यावी म्हणून आई मुलाला साखरेची चिमटी देत असते; परंतु खरे पाहिले तर तो उद्देश कांहीं मुख्य नसतो. तर पोटांतला प्रबळ रोग हटावा हाच तिचा उद्देश असतो ५९.

तेवीं वेद बोले जें फळ । तें प्रवृत्तिरोचना केवळ ।
स्वधर्म विचारितां समूळ । चित्तमळक्षाळक ॥ ३६० ॥
तद्वत वेदानें जें फळ सांगितले आहे, ते केवळ स्वधर्माची रुचि उत्पन्न व्हावी एवढ्याकरितांच. कारण स्वधर्म हा चित्तांतील सर्व मळ नाहीसा करणारा आहे ३६०.

स्वधर्म सांडूनि सर्वथा । सकाम कर्में करूं जातां ।
तेंही शिणल्यावेगळें तत्त्वतां । क्षुद्रकामता फळेना ॥ ६१ ॥
पण स्वधर्म सोडून देऊन सकाम कर्मेच करूं गेल्यास त्यांतही कष्ट केल्याशिवाय क्षुद्र मनोरथही पूर्ण होत नाहीत ६१.

जेणें द्रव्यें अमृत ये हाता । तें वेंचूनि मद्य घेतां ।
अधर्म आणि उन्मत्तता । पिशाचता जग थुंकी ॥ ६२ ॥
ज्या द्रव्याने अमृत हाती येते, तें खर्च करून मद्यच विकत घेतल्यास अधर्म होतो, माद चढतो, वेडे चाळे करतो आणि त्यामुळे सारे जग तोंडावर थुंकतें ६२.

स्वपतीसीं काम भोगितां । परलोक पावि पतिव्रता ।
तोचि काम परपुरुषीं करितां । अधःपाता नेतसे ॥ ६३ ॥
आपल्या भ्रताराशींच रममाण झाले असतां पतिव्रतेला परलोक प्राप्त होतो; पण तीच परपुरुषाशी रममाण झाली तर अध:पाताला जाते ६३.

जिह्वा दुरुक्ती बोलतां । यमप्रहार वाजती माथां ।
तिणेंचि `राम राम’ म्हणतां । हरिभक्तां यम कांपे ॥ ६४ ॥
जिव्हा जर दुरुक्ति बोलेल तर यमाचे तडाखे मस्तकावर बसतात; पण तीच जिव्हा ‘राम राम ‘ म्हणेल तर त्या हरिभक्तांना यमसुद्धा कांपतो ६४.

तेवीं पावोनि उत्तम जन्म । कर्म करूनि सकाम ।
भोगावें दुःख परम । मरण जन्म अनिवार ॥ ६५ ॥
त्याप्रमाणे उत्तम जन्माला येऊन सकाम कर्म केले असतां अत्यंत दुःख भोगावे लागते; आणि असंख्य जन्ममृत्यु सोसावे लागतात ६५.

तेणेंचि देहें स्वधर्म । करितां निरसे सकळ कर्म ।
निवारे मरणजन्म । बहुतां हे वर्म कळेना ॥ ६६ ॥
पण त्याच देहाने स्वधर्माचरण केले, तर सारेच कर्म लयास जाऊन जन्ममरणाचे फेरे चुकतात. पण हें मर्म पुष्कळ लोकांना कळत नाही ६६.

स्वधर्में घडे भगद्‍भक्ती । ऐशी अतिगुह्य आहे व्युत्पत्ती ।
ते मी सांगेन तुजप्रती । यथानिगुतीं उद्धवा ॥ ६७ ॥
स्वधर्मानें भगवंताची भक्ति घडते हेच ह्यांतलें गूढ रहस्य आहे. उद्धवा ! तेच मी तुला यथार्थ रीतीने सांगेन ६७.

स्वधर्म करणें आवश्यक । तेथें सांडणें फळाभिलाख ।
तेंचि `मदर्पण’ चोख । न करितां देख संकल्पु ॥ ६८ ॥
स्वधर्माने वागणे अत्यंत अवश्य आहे; पण त्यांत फलाची आशा सोडली पाहिजे. म्हणजे संकल्प न करताही ते खरोखर मला अर्पण होतें ६८.

हो कां घरिच्याचि रांजणीं । निघती मुक्ताफळांच्या श्रेणी ।
तरी कां ताम्रपाणीं । समुद्रमिळणीं शोधावी ॥ ६९ ॥
अरे ! घरांतल्या रांजणामध्येच मोत्यांच्या रांगा सांपडल्या, तर मग ताम्रपर्णी नदी समुद्राला मिळते तें स्थळ कशाला शोधावयास जावें ? ६९.

आपुलेच घरींचीं झाडें । फळती कल्पतरूचेनि पाडें ।
तरी अमरावतीचे चाडें । वृथा वेडे कां शिणती ॥ ३७० ॥
आपल्या घरचींच झाडे जर कल्पवृक्षाप्रमाणे फलद्रूप होऊ लागली, तर अमरावतीच्या इच्छेनें वेड्यांनी कां बरें शिणावें ? ३७०

हो कां सद्‍गुरूंचे तीर्थ घेतां । पाविजे परम पवित्रता ।
तरी धांवावया नाना तीर्था । विशेषता ते कायी ॥ ७१ ॥
किंवा सद्गुरूचे तीर्थ घेतलें असतां अत्यंत पवित्रता प्राप्त होते; तर मग हिकडच्या तिकडच्या शेंकडों तीर्थाकडे धावत सुटण्यांत काय अर्थ ? ” ७१.

कां ईश्वरत्वें पिता पूजितां । निजमोक्ष लाभे आइता ।
तरीं भजावें देवां देवतां । कोण्या अर्था सज्ञानीं ॥ ७२ ॥
किंवा ईश्वरभावनेने पित्याची पूजा केली, तर सहज मोक्ष प्राप्त होतो, तर मग ज्ञात्या लोकांनी देव-देवतांना कशाकरितां भजावें ? ७२.

तेवीं स्वकर्माचि करितां । लाभे आपली निष्कर्मता ।
ते स्वधर्मीं काम कल्पितां । जीव निजस्वार्था नाडले ॥ ७३ ॥
तद्वत् स्वकर्म करतांनाच आपली निष्कर्मता प्राप्त होते; पण त्याच स्वधर्मामध्ये फलाची इच्छा धरली की प्राणी आपल्या खऱ्या स्वार्थाला अंतरतात ७३.

निर्विकल्पें स्वधर्माचरण । त्या नांव माझें `शुद्ध भजन’ ।
तेणें भजनें हो‍ऊनि प्रसन्न । मी विवेक-वैराग्य-ज्ञान भक्तांसी दें ॥ ७४ ॥
निर्विकल्प चित्ताने स्वधर्माचरण करणे याचेच नांव माझे ‘शुद्ध भजन’ होय. त्याभजनानेच मी प्रसन्न होऊन माझ्या भक्तांना विवेकयुक्त वैराग्य व ज्ञान देतों ७४.

तेणेंचि ज्ञानें होय शुद्ध मती । चित्तशुद्धीमाजीं परमभक्ती ।
ते भक्तीनें माझी परम प्राप्ती । भक्त पावती उद्धवा ॥ ७५ ॥
त्याच ज्ञानाने बुद्धि पवित्र होते. चित्त शुद्ध झाले म्हणजे त्यांतच माझी ‘परम भक्ति’ उत्पन्न होते. आणखी उद्धवा ! त्या भक्तीनेच भक्तांना माझ्या श्रेष्ठ स्वरूपाची प्राप्ति होते ७५,

यालागीं नैराश्यें जें स्वधर्मकर्म । तेंचि माझें भजन परम ।
तेणें भजनें भक्तोत्तम । स्वयें पुरुषोत्तम हो‍ऊनि ठाकती ॥ ७६ ॥
म्हणून निष्काम जें स्वधर्माचरण तेंच माझे उत्तम भजन होय. त्या भजनानेच भक्तोत्तम असतात ते स्वतःच पुरुषोत्तम होऊन राहातात ७६.

यापरी स्वधर्मस्थितीं । लाभे आपुली निजमुक्ती ।
तेचि म्यां तुजप्रती । यथानिगुतीं सांगितली ॥ ७७ ॥
ह्याप्रमाणे आपल्या स्वधर्मातच आपणास मुक्ति लाभते. तोच प्रकार मी तुला इत्थंभूत सांगितला ७७.

एतत्तेऽभिहितं साधो भवन्पृच्छति यच्च माम् ।
यथा स्वधर्मसंयुक्तो भक्तो मां समियात्परम् ॥ ४८ ॥
इति श्रीभागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां
एकादशस्कन्धे अष्टादशोऽध्यायः ॥ १८ ॥
[श्लोक ४८] हे उद्ववा ! तू मला जो प्रश्न विचारला होतास, त्याचे उत्तर मी दिले आणि आपल्या धर्माचे पालन करणारा भक्त परब्रह्मस्वरूप अशा मला कशा रीतीने प्राप्त होतो, तेही सांगितले. (४८)

उद्धवा पुसिलें त्वां मजप्रती । स्वधर्में केवीं घडे मुक्ती ।
भक्तीनें पाविजे निजमुक्ती । तें म्यां तुजप्रती सांगितले ॥ ७८ ॥
उद्धवा ! स्वधर्मानेच मुक्ति कशी घडते असें तूं मला विचारलें होतेंस, तर भक्तीनेंच (भक्तियुक्त स्वधर्माने ) मुक्ति प्राप्त होते हे मी तुला सांगितले ७८.

हाता आलिया स्वधर्म । तत्काळ निरसे स्वकर्म ।
उडोनि जाय भवभ्रम । प्राप्ती परम स्वधर्में ॥ ७९ ॥
स्वधर्म हाती लागला की, स्वकर्म तत्काल निरास पावते आणि संसाराचा सारा भ्रम दूर होतो. याप्रमाणे स्वधर्माने परमपदाची प्राप्ति होते ७९.

माझिया प्राप्तीलागीं स्वकर्म । नैराश्यें आचरावा स्वधर्म ।
हें ज्यासी कळे वर्म । तया पुरुषोत्तम सदा वश्य ॥ ३८० ॥
माझी प्राप्ति पाहिजे असेल तर स्वस्वकर्म म्ह. स्वधर्म निष्काम भावाने आचरावा. हे वर्म ज्याला कळले, त्याला पुरुषोत्तम वश झालाच म्हणून समजावें ३८०.

स्वधर्माऐसा स्पर्शमणी । सांपडल्या निर्विकल्पपणीं ।
तो लावितां दृश्यस्थानीं । चिन्मात्रसुवर्णीं तेज उठी ॥ ८१ ॥
स्वधर्मासारखा परिस निर्विकल्पपणे सांपडतांच तो दृश्य पदार्थास लावला असता, ते सर्व पदार्थ चिन्मात्र सुवर्ण म्ह. ब्रह्ममयच होऊन जातात ८१.

स्वधर्माऐसा दिनमणी । नैराश्यें उगवलिया स्वभुवनीं ।
तो अज्ञाननिशा निरसुनी । स्वप्रकाशपणीं सदा वर्ते ॥ ८२ ॥
स्वधर्मासारखा सूर्य निष्कामतेनें अंत:करणांत उदय पावला असतो तो अज्ञानरूप रात्र नाहीशी करून सदासर्वदा स्वप्रकाशपणानेच नांदतो ८२.

स्वधर्माऐसें निज‍अमृत । जे निर्विकल्पें सेवूं जाणत ।
त्यांसी जन्ममरणांचा आवर्त । मी श्रीअनंत लागों नेदीं ॥ ८३ ॥
स्वधर्मासारखें अमृत निर्विकल्पत्वाने म्ह. निष्कामपणे ज्यांना सेवन करता येते, त्यांना मी श्रीअनंत जन्ममरणाचा भोंवरा लागूच देत नाही ८३.

जे कां स्वधर्मीं विमुख । त्यासीं माझी प्राप्ती नाहीं देख ।
जन्मकोटी परम दुःख । सकामें मूर्ख भोगिती ॥ ८४ ॥
पण जे स्वधर्माला विमुख होतात, त्यांना मात्र माझी प्राप्ति होत नाही. ते मूर्ख सकामपणामुळे कोट्यवधि जन्मपर्यंत दुःसह दुःख भोगीत असतात ८४,

त्या स्वधर्माची अतर्क्य गोष्टी । न कळे नैष्कर्में निजदृष्टीं ।
याचिलागीं जन्मकोटी । अतिसंकटीं जीव भोगी ॥ ८५ ॥
त्या स्वधर्माची गोष्ट अतर्क्य आहे. त्याची निष्कर्मता डोळ्यांना दिसत नाही. म्हणूनच प्राणी कोट्यवधि जन्मपर्यंत दुःख भोगीत राहतात ८५.

स्वधर्में करितां स्वकर्म । जैं नैष्कर्म्यतेचें कळे वर्म ।
तैं विभांडूनि मरणजन्म । परब्रह्म पावती ॥ ८६ ॥
स्वधर्मानेच स्वकर्म करीत असतां निष्कामपणाचें वर्म कळले, तर ते जन्ममरणाचा फेरा चुकवून परब्रह्मस्वरूपाला पोचतात ८६.

एवं स्वधर्म यापरी । तारक होय संसारीं ।
स्वधर्माचे नावेवरी । तरले भवसागरीं निजभक्त ॥ ८७ ॥
अशाप्रकारें स्वधर्म हा संसारामध्ये तारकच होतो. स्वधर्मरूप नावेवरून माझे पुष्कळ भक्त संसारसागर तरून गेले ८७.

संसार तरले हा बोलु कुडा । स्वधर्म करितं माझिया चाडा ।
होय भवसागर कोरडा । मी सांपडें पुढा निजात्मा ॥ ८८ ॥
‘संसार तरून गेले’ हे सुद्धा बोलणे खोटेंच, कारण माझ्या प्राप्तीच्या इच्छेने स्वधर्माचे आचरण केले असतां संसारसागर मुळी कोरडाच होऊन जातो आणि मी परमात्मा त्यांना समोरच सापडतों ८८.

ऐशी स्वधर्माची थोरी । निष्कामतेच्या निजकुसरी ।
देवो सांगे आवडीभरीं । नानापरी प्रबोधें ॥ ८९ ॥
निष्कामपणाच्या साहाय्याने होणाऱ्या स्वधर्माचरणाची इतकी थोरवी आहे. त्याचीच देवाला मोठी आवड असल्याने त्याने नाना प्रकारे उद्धवाला समजून सांगितले ८९.

भक्तिप्राधान्य भागवत । मुख्य भक्ति ते स्वधर्मयुक्त ।
येणें स्वधर्मभजनें समस्त । परम भागवत उद्धरले ॥ ३९० ॥
भागवत हें भक्तिप्रधान आहे, त्यांतील भक्ति ही स्वधर्मयुक्त आहे. ह्या स्वधर्मभजनानेच सारे श्रेष्ठ भक्त उद्धरून गेले ३९०,

त्या स्वधर्मकर्माचा एकान्त । निजभजनभक्तीचा भावार्थ ।
उद्धवासी श्रीकृष्णनाथ । स्वयें सांगत एकादशीं ॥ ९१ ॥
त्या स्वधर्मकर्मातील रहस्य आणि आत्मभजनभक्तीचा भावार्थ श्रीकृष्णांनी स्वतः उद्धवाला अकराव्या स्कंधांत सांगितला ९१.

त्या एकादशाच्या गोष्टी । स्वधर्मकर्माची कसवटी ।
एका जानार्दनकृपादृष्टीं । टीका मराठी हे केली ॥ ९२ ॥
त्या अकराव्या स्कंधांतील गोष्टी म्हणजे स्वधर्मकर्माची कसोटी आहे. श्रीजनार्दनाच्या कृपादृष्टीनेच एकनाथाने ही मराठी टीका केली आहे ९२.

हे करणी केली जनार्दनें । मज अभंगीं घातलें तेणें ।
शेखीं मीतूंपणाचे ठाणें । येणें निरूपणें उडविलें ॥ ९३ ॥
ही करणी त्या जनार्दनांनीच केली, आणि कवितेत माझें नांव घातले आणि शेवटी या निरूपणाने मीतूंपणाचे ठाणेच उडवून टाकले ९३.

उडविलें विषयीं विषयपण । उडविले भेदाचें भान ।
उडविलें जीवशिवपण । जनीं जनार्दन तुष्टोनी ॥ ९४ ॥
विषयांतील विषयपणाच नाहींसा केला; भेदाचे भानच उडवून टाकलें; आणि जनीं-जनार्दन संतुष्ट होऊन त्याने जीवशिवपणच उडवून लावले ९४.

जनार्दनें जनकें तेणें । आम्हां केलें परब्रह्म खेळणें ।
यालागीं सकळ क्रिया तेणें होणें । स्वधर्मपणें सहजेंचि ॥ ९५ ॥
जनार्दनरूप जो पिता, त्याने आम्हांला परब्रह्म हें खेळणेच करून टाकले. म्हणूनच त्याच्या योगाने ज्या ज्या क्रिया होतात, त्या त्या आपोआप स्वधर्मपणानेच घडतात ९५.

सहजीं लागल्या स्वधर्म । कर्मचि होय निष्कर्म ।
संसार होय परब्रह्म । हे कृपा परम जनार्दनीं ॥ ९६ ॥
स्वभावतःच स्वधर्म लागला म्हणजे कर्म असते तेंच निष्कर्म होते आणि संसार असतो तोच परब्रह्म होतो. हीच जनार्दनाची मोठी कृपा होय ९६.

यालागीं सांडूनियां एकपण । एका जनार्दन शरण ।
स्वधर्मकर्माचें निरूपण । झालें संपूर्ण तया कृपा ॥ ९७ ॥
ह्यास्तव एकपणा म्ह. एकनाथपणा सोडून एका हा जनार्दनाला शरण गेला. म्हणून त्यांच्या कृपेनेंच स्वधर्मकर्माचे निरूपण संपूर्ण झाले ९७.

इति श्रीभागवते महापुराणे एकादशस्कंधे श्रीकृष्णोद्धवसंवादे
एकाकारटीकायां वानप्रस्थसंन्यासधर्मनिरूपणं नाम अष्टादशोऽध्यायः ॥ ९८ ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ओंव्या ३९७ ॥ श्लोक ॥ ४८ ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां एकादशस्कन्धे अष्टादशोऽध्यायः ॥ १८ ॥