एकनाथी भागवत – अध्याय ०२

श्रीगणेशाय नमः ॥ श्री गोपालकृष्णाय नमः ॥
जय जय देवाधिदेवा । भोगिसी गुरुत्वें सुहावा ।
विश्वीं विश्वात्मा ये सद्‌भावा । तूं कृपेनें जेव्हां अवलोकिसी ॥ १ ॥
हे देवाधिदेवा ! तुझा जयजयकार असो. तूं गुरुत्वाच्या योगेंकरून आवड पुरी करतोस. तूं कृपेनें जेव्हां अवलोकन करतोस, तेव्हां विश्वामध्यें विश्वात्मा व्यापून राहिल्याचे अनुभवास येते १.

ते विश्वीं जो विश्ववासी । त्यातें विश्वासी म्हणसी ।
तेणें विश्वासें प्रसन्न होसी । तैं पायांपाशीं प्रवेशु ॥ २ ॥
ह्या विश्वामध्यें जो जगन्निवास आहे, त्यावर विश्वास ठेवावा, असें तूं सांगतोस. आणि तसा विश्वास ठेवला, की तूं प्रसन्न होतोस. आणि प्रसन्न झालास म्हणजे तुझ्या पायांपाशीं प्रवेश होतो २.

त्या चरणारविंदकृपादृष्टी । अहं सोहं सुटल्या गांठी ।
एकसरें तुझ्या पोटीं । उठा‍उठी प्रवेशलों ॥ ३ ॥
त्या पादकमलांच्या कृपादृष्टीनें ‘अहं’ ‘सोहं ‘ भावनेच्या गांठी सुटून हां हां म्हणतां एकदम तुझ्या पोटांत शिरलों ३.

यालागीं तूं निजात्ममाये । या हेतु जंव पाहों जायें ।
तंव बापपण तुजमाजीं आहे । अभिनव काये सांगावें ॥ ४ ॥
तूं आमची माता आहेस, अशा दृष्टीनें तुझ्याकडे पाहूं लागतों, तो पितृत्वही तुझ्यामध्येंच दिसते. ह्यापेक्षा अधिक आश्चर्य तें काय सांगणार ? ४.

येथ मातापिता दोनी । वेगळीं असती जनीं ।
ते दोनी एक करोनी । एका जनार्दनीं निजतान्हें ॥ ५ ॥
ह्या लोकी तर माता व पिता ही दोन वेगवेगळी असतात; पण ती दोन्ही एका जनार्दनामध्यें ऐक्यरूप होऊन त्यांचे मी तान्हें लेकरूं झालों ५.

आतां उभयस्नेहें स्नेहाळा । वाढविसी मज बाळा ।
परी नित्य नवा सोहळा । संभ्रमु आगळा निजबोधाचा ॥ ६ ॥
ह्याकरितां ती दोन्ही प्रेमें एकत्र करून ह्या लेकराला वाढवावे आणि रोज रोज आत्मबोधाचा नवा नवा सोहळा दाखवीत जावा अथवा दाखवीत आहेसच ६.

शिव शक्ति गणेशु । विश्व विष्णु चंडांशु ।
ऐसा अलंकार बहुवसु । निजविलासु लेवविशी ॥ ७ ॥
शिव, शक्ति, गणेश, तसाच विश्व, विष्णु, सूर्य, एतद्प अनेक अलंकार स्वतः आपल्या हौसेनेंच मला घालतोस ७.

यापरी मज निजबाळा । लेणीं लेवविशी स्वलीळा ।
आणि ले‍इलेपणाचा सोहळा । पहाशीं वेळोवेळां कृपादृष्टीं ॥ ८ ॥
ह्याप्रमाणें मला आपल्या लेंकराला आपल्या हौसेनेंच भूषणे लेववितोस व तो सोहळा वेळोवेळां कृपादृष्टीनें तूंच पाहातोस ८.

बाळका लेवविजे लेणें । तयाचें सुख तें काय जाणे ।
तो सोहळा मातेनें भोगणें । तेवीं जनार्दनें भोगिजे सुख ॥ ९ ॥
मुलाच्या आंगावर दागदागिनें घातले, तरी त्यांची शोभा व सुख ही त्याला कशी कळणार ? तो सोहळा आईनेंच भोगावा. त्याप्रमाणें मजकडून ग्रंथ वदवून त्याचे सुख जनार्दनांनीच घ्यावे ९.

आपुल्या चिद्‌रत्‍नांच्या गांठी । आवडी घालिशी माझ्या कंठी ।
यालागीं मज पाठोवाठीं । निजात्मदृष्टीं सवें धांवे ॥ १० ॥
आपल्या चिद्‌रत्‍नांच्या माळा आवडीनें माझ्या गळ्यांत तूंच घालतोस व रक्षणासाठी निजात्मदृष्टीनें माझ्या पाठोपाठ धांवत असतोस १०.

समर्थ जयाचा जनकु । त्यास मानिती सकळ लोकु ।
एका जनार्दनीं एकु । अमान्य अधिकु मान्य कीजे ॥ ११ ॥
ज्याचा बाप श्रीमंत असतो, त्याच्या मुलाला सर्व लोक मान देतात. त्याप्रमाणें एका जनार्दनांनी ह्या एकनाथाला आपला म्हटले, त्यामुळें तो अमान्य असतांही अधिक मान्यतेला पात्र झाला आहे ११.

बाळक स्वयें बोलों नेणे । त्यासी माता शिकवी वचनें ।
तैशीं ग्रंथकथाकथनें । स्वयें जनार्दनें बोलविजे ॥ १२ ॥
मुलाला स्वतः बोलावयाला कळत नाही, म्हणून आईच त्याला बोलावयाला शिकवीत असते. त्याप्रमाणें ह्या ग्रंथांतील कथा ही गुरु जनार्दन स्वतः माझ्याकडून बोलवीत आहेत १२.

तेणें नवल केलें येथ । मूर्खाहाती श्रीभागवत ।
शेखीं बोलविलें प्राकृत । एकादशार्थ देवभाषा ॥ १३ ॥
त्यांनी येथे केवढा चमत्कार केला पहा, श्रीभागवताच्या एकादशस्कंधाचा अर्थ, तोही शेवटी महाराष्ट्रभाषेमध्यें मज मूर्खाकडून बोलविला ! असो. १३.

परिसोनि प्रथम अध्यावो । उगाचि राहिला कुरुरावो ।
पुढें कथाकथनीं ठावो । कांहीं अभिप्रावो दिसेना ॥ १४ ॥
पहिला अध्याय श्रवण करून कुरुराज परीक्षिती उगाच बसला. पुढचा कथाभाग ऐकावयाचा त्याचा कांहीं मानस दिसेना १४.

आपण करावा प्रश्न । तंव हा सांगेल कृष्णनिधन ।
यालागीं राजा मौन । ठेला धरून निवांत ॥ १५ ॥
कारण, आतां जर आपण प्रश्न केला, तर शुकाचार्य कृष्णनिधनाची कथा सांगतील. ह्यास्तव तो राजा मुकाट्यानें बसला १५.

जाणोनि त्याचा अभिप्रावो । बोलत जाहला शुकदेवो ।
तो म्हणे मोक्षाचा प्रस्तावो । तो हा अध्यावो परीक्षिति ॥ १६ ॥
त्याच्या मनांतील असा अभिप्राय जाणून शुकाचार्य म्हणाले, “हे परीक्षिती ! हा अध्याय म्हणजे मोक्षाचा प्रस्ताव आहे असे समज” १६.

हा एकादश अलोलिक । श्लोकाहून श्लोक अधिक ।
पदोपदीं मुक्तिसुख । लगटले देख निजसाधकां ॥ १७ ॥
“हा अकरावा स्कंध सगळाच मोठा अलौकिक आहे. ह्यांत एकापेक्षा एक सरस श्लोक असून, आत्मसाधन करणाराला मुक्तिसुख पावलोपावली भेटते” १७.

ऐसें ऐकतांचि वचन । राजा जाहला सावधान ।
मुक्तिसुखीं आवडी गहन । अवधानें कान सर्वांग केले ॥ १८ ॥
असें ऐकतांच राजा सावधान झाला. कारण मुक्तिसुखाची त्याला फारच आवड. म्हणून त्यानें अवधानानें सर्वांगाचे कान करून सोडले १८.

ऐसें देखोन परीक्षिती । शुक सुखावे अत्यंत चित्तीं ।
तो म्हणे अवधानमूर्ती । ऐक निश्चितीं गुह्यज्ञान ॥ १९ ॥
असे पाहून शुकाचार्यांच्या चित्ताला अत्यंत आनंद झाला आणि ते म्हणाले, “तूं अवधानाची मूर्तिच बनलास, तर आतां तूं स्वस्थ अंतःकरण करून गुह्य ज्ञान श्रवण कर” १९.

द्वितीयाध्यायीं निरूपण । नारद वसुदेवसंवाद जाण ।
निमिजायंतांचे प्रश्न । मुख्य लक्षण भागवतधर्म ॥ २० ॥
दुसऱ्या अध्यायामध्यें नारद आणि वसुदेव ह्यांच्या संवादाचे निरूपण आहे. यात मुख्यतः भागवतधर्माचें लक्षण निमिजायंतांच्या प्रश्नरूपानें सांगितले आहे २०.

श्रीशुक उवाच –
गोविन्दभुजगुप्तायां द्वारवत्यां कुरूद्वह ।
अवात्सीन्नारदोऽभीक्ष्णं कृष्णोपासनलालसः ॥ १ ॥
श्लोक १ – श्रीशुक म्हणतात हे कुरूनंदना ! श्रीकृष्णांच्या सहवासात राहण्याच्या इच्छेने नारद श्रीकृष्णांनी स्वतःच्या शौर्याने रक्षण केलेल्या द्वारकेत वारंवार येऊन राहात असत. (१)

जो मुक्तांमाजीं अग्रणी । जो ब्रह्मचारियां शिरोमणी ।
योगी वंदिती मुकुटस्थानीं । जो भक्तमंडणीं अतिश्रेष्ठ ॥ २१ ॥
मुक्तलोकांमध्यें जो अग्रगण्य, ब्रह्मचाऱ्यांचा शिरोमणि, ज्याला योगीसुद्धां शिरसावंद्य मानतात, जो भक्तमंडळामध्यें अत्यंत श्रेष्ठ २१.

जो ब्रह्मरसाचा समुद्र । जो निजबोधाचा पूर्णचंद्र ।
तो बोलता झाला शुक योगींद्र । श्रोता नरेंद्र कुरुवंशीचा ॥ २२ ॥
जो ब्रह्मरसाचा समुद्र व आत्मबोधाचा पूर्ण चंद्र, तो शुकयोगींद्र बोलू लागला आणि कुरुवंशांतील राजाधिराज परीक्षिती ऐकू लागला २२.

तो म्हणे व्यासाचा जो निजगुरु । आणि माझाही परमगुरु ।
नारद महामुनीश्वरु । त्यासी अति‍आदरु श्रीकृष्णभजनीं ॥ २३ ॥
शुकाचार्य म्हणाले-जो व्यासाचा साक्षात् गुरु व माझा परमगुरु महामुनीश्वर नारद त्याचे श्रीकृष्णभजनावर अत्यंत प्रेम होतें २३.

द्वारकेहूनि स्वयें श्रीकृष्ण । पिंडारका पाठवी मुनिगण ।
तेथूनि नारद आपण । द्वारकेसी जाण पुनः पुनः येतु ॥ २४ ॥
श्रीकृष्णांनी आपणहूनच सार्‍या मुनिजनांना द्वारकेहून पिंडारकाला पाठविलें, पण नारद मात्र तेथून वरचेवर द्वारकेला येत असत २४.

हो कां जे द्वारके‍आंत । न रिघे भय काळकृत ।
जेथ स्वयें श्रीकृष्णनाथ । असे नांदत निजसामर्थ्यें ॥ २५ ॥
द्वारकेमध्यें काळकृत भय प्रवेश करीत नसे. कारण, तेथें स्वसामर्थ्यानें श्रीकृष्ण स्वतः नांदत होते २५.

दक्षशापु नारदासी पाहीं । मुहूर्त राहों नये एके ठायीं ।
तो शापु हरिकीर्तनीं नाहीं । यालागीं तो पाहीं किर्तननिष्ठु ॥ २६ ॥
नारदाला दक्षाचा शाप होता की, तूं एक मुहूर्तभरही एके ठिकाणी राहूं नयेस; पण तो शाप हरिकीर्तनामध्यें चालत नव्हता, म्हणून तो कीर्तनांतच निरंतर मग्न असे २६.

ज्याची गा‍इजे कीर्तनीं कीर्ती । तो द्वारकेसी वसे स्वयें श्रीपती ।
तेथें शापबाधेची न चले प्राप्ती । यालागीं नित्यवस्ती नारदासि तेथें ॥ २७ ॥
ज्याची कीर्ति कीर्तनामध्यें गावयाची, तो लक्ष्मीपति श्रीकृष्ण स्वतःच द्वारकेमध्यें रहात होता. म्हणून तेथेही या शापाची बाधा होत नसे. एवढ्याकरितां नारदाची तेथें निरंतर वस्ती होती २७.

नारदासी पूर्ण ब्रह्मज्ञान । त्यासी कां कृष्णमूर्तीचें ध्यान ।
श्रीकृष्णदेहो चैतन्यघन । यालागी श्रीकृष्णभजन नारदा पढियें ॥ २८ ॥
नारदाला परिपूर्ण ब्रह्मज्ञान होते; मग त्याला सगुण अशा श्रीकृष्णमूर्तीचे ध्यान का आवडावें बरें ? तर श्रीकृष्ण जरी देहधारी होते, तरी त्यांचा देह केवळ चैतन्यमयच होता, म्हणून श्रीकृष्णाचे भजन नारदांना अत्यंत आवडे २८.

यापरी कृष्णभजन । मुक्तांसी पढिये पूर्ण ।
त्यासी न भजे अभागी कोण । तेंचि निरूपण शुक सांगे ॥ २९ ॥
याप्रमाणें श्रीकृष्णभजन जर मुक्तांनाहीं आवडते, तर त्याला भजत नाहीं असा अभागी कोण असणार ? तेंच निरूपण शुकाचार्य सांगतात २९.

को नु राजन् इन्द्रियवान् मुकुन्दचरणाम्बुजम् ।
न भजेत्सर्वतोमृत्युः उपास्यममरोत्तमैः ॥ २ ॥
श्लोक २- हे राजन ! ज्याला इंद्रिये आहेत असा, सगळीकडून मृत्यूने वेढलेला कोणता प्राणी मोठमोठ्या देवतांनीसुद्धा उपासना करावी, अशा श्रीकृष्णचरणकमलांची सेवा करणार नाही ? (२)

ऐकें बापा नृपवर्या । ये‍ऊनि उत्तमा देहा या ।
जो न भजे श्रीकृष्णराया । तो गिळिला माया अतिदुःखें ॥ ३० ॥
हे राजश्रेष्ठा ! बाबा ऐक. ह्या उत्तम नरदेहाला येऊन जो श्रीकृष्णाला भजत नाही, त्याला मायेनें आणि घोर दुःखानें गिळले म्हणून समजावें ३०.

ज्या भगवंतालागुनी । माथा धरूनि पायवणी ।
सदाशिव बैसला आत्मध्यानीं । महाश्मशानीं निजवस्ती ॥ ३१ ॥
ज्या भगवंतासाठी त्याच्या पायांचे तीर्थ मस्तकावर घेऊन सदाशिव महास्मशानामध्यें वस्ती करून आत्मध्यानामध्यें बसलेला आहे ३१,

पोटा आला चतुरानन । इतरांचा पाडु कोण ।
देहा येवोनि नारायण । न भजे तो पूर्ण मृत्युग्रस्त ॥ ३२ ॥
ब्रह्मदेवच ज्याच्या पोटीं आलेला आहे, तेथे इतरांची काय कथा ? नरदेहाला येऊन जो नारायणाला भजत नाहीं, तो पूर्ण मृत्युग्रस्त होय ३२.

त्यजूनि परमात्मा पूर्ण । नाना साधनें शिणती जन ।
त्यासी सर्वथा दृढबंधन । न चुके जाण अनिवार ॥ ३३ ॥
श्रीकृष्णपरमात्म्याला सोडून जे लोक नानाप्रकारच्या साधनांच्या क्लेशांत पडतात, त्यांचे दृढसंसारबंधन कधीही चुकणार नाहीं ३३.

सांडूनि श्रीकृष्णचरण । इंद्रादि देवांचें करितां भजन ।
ते देव मृत्युग्रस्त पूर्ण । मा भजत्याचें मरण कोण वारी ॥ ३४ ॥
श्रीकृष्णाचे चरण सोडून इंद्रादि देवांचे कोणी भजन करतात; पण ते देवच जर पूर्णपणे मृत्युग्रस्त आहेत, तर मग भजणारांचे मरण ते कसें चुकविणार ? ३४.

असोनि इंद्रियपाटव पूर्ण । जो न भजे श्रीकृष्णचरण ।
त्यासी सर्वत्र बाधी मरण । क्षणक्षण निर्दाळी ॥
सर्व इंद्रिये शाबूत असूनही जो श्रीकृष्णचरणांचे भजन करीत नाहीं, तो जेथे जेथे जाईल, तेथे तेथे त्याला मरण हे ठेवलेलेच. तें प्रत्येक क्षणाला त्याचा नाश करते ३५.

तो नारद महामुनीश्वरु । मुक्त हो‍ऊनि भजनतत्परु ।
द्वारके वसे निरंतरु । श्रीकृष्णीं थोरु अतिप्रीति तया ॥ ३६ ॥
तो महामुनि नारद, मुक्त असूनही भजनामध्यें निरंतर तत्पर असतो. तो सदासर्वदा द्वारकेमध्येंच राहत असे. त्याचे श्रीकृष्णावर अत्यंत प्रेम होते ३६.

तमेकदा तु देवर्षिं वसुदेवो गृहागतम् ।
अर्चितं सुखमासीनं अभिवाद्येदमब्रवीत् ॥ ३ ॥
श्लोक ३- एकदा देवर्षी नारद वसुदेवांकडे आले ते आसनस्थ झाल्यावर त्यांनी त्यांची विधिपूर्वक पूजा व प्रणाम करून म्हटले – (३)

धन्य धन्य तो नारदु । ज्यासी सर्वीं सर्वत्र गोविंदु ।
सर्वदा हरिनामाचा छंदु । तेणें परमानंदु सदोदित ॥ ३७ ॥
अहाहा ! धन्य धन्य तो नारद ! त्याला जिकडे तिकडे श्रीकृष्णच दिसत असे. त्याला सदासर्वदा हरिनामाचा छंद असून परमानंदामध्येंच तो सदा निमग्न असे ३७.

जो श्रीकृष्णाचा आवडता । ज्यासी श्रीकृष्ण आवडे सर्वथा ।
ज्याचेनि संगें तत्त्वतां । नित्यमुक्तता जडजीवां ॥ ३८ ॥
जो श्रीकृष्णाचा आवडता व ज्याला सर्वतोपरी श्रीकृष्ण आवडता, ज्याच्या संगतीनें जड जीवांना मुक्ति प्राप्त होते ३८,

तो नारदु एके वेळां । स्वानंदाचिया स्वलीळा ।
आला वसुदेवाचिया रा‍उळा । तेणें देखोनि डोळां हरिखला ॥ ३९ ॥
तो नारद एके दिवशी आपल्या आनंदाच्या भरांत सहज वसुदेवाच्या घरी गेला. त्यास पाहातांच वसुदेवाला फार आनंद झाला ३९.

केलें साष्टांग नमन । बैसों घातलें वरासन ।
ब्रह्मसद्‌भावें पूजन । श्रद्धासंपूर्ण मांडिलें ॥ ४० ॥
त्यानें त्यास साष्टांग नमस्कार घालून बसावयास उच्चासन दिले, आणि प्रत्यक्ष परब्रह्मच आपल्या घरीं आलें, अशा श्रद्धायुक्त बुद्धीनें पूजेस प्रारंभ केला ४०.

नारद तोचि नारायण । येणें विश्वासेंकरूनि जाण ।
हेमपात्रीं चरणक्षाळण । मधुपर्क विधिपूर्ण पूजा केली ॥ ४१ ॥
नारद हा प्रत्यक्ष नारायणच आहे अशा दृढ विश्वासानें त्यानें त्याचे पूजन केले. सुवर्णाच्या पात्रामध्यें त्याचे पाय धुवन मधुपर्कविधीनें त्याची यथासांग पूजा केली ४१.

पूजा करोनि सावधानीं । वसुदेव बैसोनी सुखासनीं ।
हृदयीं अत्यंत सुखावोनी । काय आल्हादोनी बोलत ॥ ४२ ॥
ह्याप्रमाणें प्रेमानें पूजा करून वसुदेव आपल्या आसनावर बसला आणि अंतःकरणामध्यें अत्यंत आनंदभरित होऊन बोलू लागला ४२.

श्रीवसुदेव उवाच –
भगवन्भवतो यात्रा स्वस्तये सर्वदेहिनाम् ।
कृपणानां यथा पित्रोः उत्तमश्लोकवर्त्मनाम् ॥ ४ ॥
श्लोक ४- वसुदेव म्हणाले ज्याप्रमाणे मातापित्यांचे पुत्राकडे येणे त्याच्या कल्याणासाठी किंवा भगवद्‌भक्तांचे येणे प्रपंचाला उबगलेल्या दुःखितांच्या कल्याणासाठी असते, तसेच, हे भगवन ! आपले येणे हे सर्व प्राण्यांच्या कल्याणासाठीच असते. (४)

स्वलीला कृपा केली तुम्हीं । तेणें परम सभाग्य जाहलों जी मी ।
तुमचेनि आगमनें आम्ही । कृतकृत्य स्वामी सन्निधिमात्रें ॥ ४३ ॥
आज आपणहून येण्याची कृपा केलीत, तेगंकरून मी अयंत भाग्यवान् झालो आहे. आपल्या सन्निधिमात्रानें (जवळ असल्याने) आम्ही कृतकृत्य झालो आहों ४३.

चुकलिया निजजननी । बाळक दीन दिसे जनीं ।
त्यासी मातेच्या आगमनीं । संतोष मनीं निर्भर ॥ ४४ ॥
आई दिसेनाशी झाली म्हणजे लोकांमध्यें मूल केविलवाणे होते. पण त्याची आई आली की त्याच्या मनामध्यें आनंद मावेनासा होतो ४४.

त्याहूनि श्रेष्ठ तुमची यात्रा । नित्य सुखदाती भूतमात्रां ।
स्वलीला तुम्ही मही विचरां । दीनोद्धारालागुनी ॥ ४५ ॥
तिच्यापेक्षाही आपलें आगमन अधिक श्रेष्ठ आहे; कारण तें प्राणिमात्रांना नित्यसुख देणारे असते. आपण दीनांचा उद्धार करण्याकरितां लीलेनें पृथ्वीवर संचार करता ४५.

मातेच्या आगमनीं निजबाळा । दृष्टि‍उत्संगीं नित्य नवा सोहळा ।
तुमची यात्रा दीनां सकळां । भोगवी स्वलीळा निजात्मसुख ॥ ४६ ॥
आई आलेली दिसतांच मुलाला नित्य नवा सोहाळा होतो, पण तुमचे आगमन यच्चयावत् दीन जनांना अनायासे आत्मसुख भोगावयाला लावते ४६.

माता सुख दे तें नश्वर । तुमच्या आगमनीं अनश्वर ।
नित्य चित्सुख चिन्मात्र । परात्पर भोगावया ॥ ४७ ॥
आई सुख देते तें नश्वर असते, आणि तुमच्या आगमनानें जें सुख प्राप्त होतें तें शाश्वत असतें. परेच्या पलीकडील चिन्मात्र चित्सुख भोगावयास मिळते ४७.

तुम्ही भागवतधर्ममार्गगामी । तैंचि तुमची भेटी लाहों आम्ही ।
जैं पुण्यकोटी निष्कामीं । प्रयागसंगमीं केलिया ॥ ४८ ॥
आपण भागवतधर्माच्या मार्गानें जाणारे आहात. आम्ही प्रयागसंगमावर निष्काम बुद्धीनें जेव्हां पुण्याच्या कोटी कराव्यात, तेव्हांच आम्हांला आपली भेट होते ४८.

नारदा तूं भगवद्‌रूप । तुझी भेटी करी निष्पाप ।
तुवां कृपा केलिया अल्प । स्वयें चित्स्वरूप ठसावे ॥ ४९ ॥
नारदा ! तू भगवत्स्वरूप आहेस. तुझी भेटच मनुष्याला निष्पाप करून सोडते. तूं थोडीशी जरी कृपा केलीस, तरी अंतःकरणामध्यें चित्स्वरूप ठसून जाते ४९.

तुझेनि भक्तीसी महिमा अमूप । तुझेनि वाढला भक्तिप्रताप ।
तुझेनि भक्ति भगवद्‌रूप । तूं चित्स्वरूप निजनिष्ठां ॥ ५० ॥
तुझ्याच योगानें भक्तीला अलौकिक महिमा चढला. भक्तीचे सामर्थ्य तुझ्याच योगानें पसरलें. तुझ्याच योगानें भक्ति ही भगवत्स्वरूप बनली. तूं आपल्या आत्मनिष्ठेच्या योगानें चित्स्वरूप झाला आहेस ५०.

तूं भक्तिप्रकाशकु दिवटा । कीं भक्तिमार्गींचा मार्गदृष्टा ।
नारदा तुझा उपकार मोठा । भक्तीच्या पेठा वसविल्या तुवां ॥ ५१ ॥
भक्तीला दाखवून देणारी मशाल ती तूंच किंवा भक्तिमार्गाचा वाटाड्या तो तूं. नारदा ! तुझा उपकार फार मोठा आहे. कारण तूं भक्तीच्या पेठाच वसवून टाकल्या आहेस ५१.

मुख्य भागवतशास्त्र पूर्ण । तुवां व्यासासी उपदेशून ।
प्रगट करविलें दशलक्षण । दीन जन उद्धरावया ॥ ५२ ॥
श्रेष्ठ आणि परिपूर्ण भागवतशास्त्राचा तूंच व्यासाला उपदेश करून दीन जनांचा उद्धार करण्यासाठी दशलक्षणे* प्रगट कलींस ५२.
[[ * भागवताची दशलक्षणे- सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, ऊति, मन्वंतरें, ईशानुक्रथन, निरोध, मुक्ति व आश्रय यांचे विवरण नाथांनी आपल्या चतुःश्लोकी भागवतांत पुढे लिहिल्याप्रमाणें कलें आहे “सर्ग बोलिजे संसारातें। विसर्ग म्हणिजे संहारातें। स्थान म्हणिजे वैकुंठातें। पोषण तेथें भगवद्‌भजन ॥ ८१४ ॥ कर्म त्या नांव ऊति । चौदा मनूंची व्यवस्थिति। या नांव मन्वंतरें म्हणती। दशावतारकीर्ति ईशचरित्र ।। १५॥ सकल इंद्रियांच्या वृत्ति । एकाग्र या नांव निरोधस्थिति । निःशेष जेथ विरे वृत्ति । त्या नांव मुक्ति महाराया ॥ १६ ॥ उत्पत्ति-स्थिति-प्रळयान्त । ज्या स्वरूपावरी होत जात। स्वरूप अविकारी यथास्थित । त्या नांव निश्चित आश्रय राया ॥ १७ ॥ दोराअंगी सर्प उपजला । दोरावरी सर्प नांदला । दोरावरी सर्प निजला । तरी दोर स्पर्शला नाहीं सा ॥ १८ ॥ तेवीं वस्तूच्या ठायीं। प्रपंचाची वार्ता नाहीं। तो झाला गेला न घडे कांहीं । आश्रय पाहीं या नांव ॥ १९ ॥ पावावया आश्रयप्राप्ति । भावें करावी भगवद्‌भक्ति । ते भक्तीची निजस्थिति । श्रीव्यासें भागवतों विशद केली ।। ८२० ॥ इ. ]]]

नारदा तूं देवासमान । हेही उपमा दिसे गौण ।
तेचिविषयीं निरूपण । वसुदेव आपण निरूपी ॥ ५३ ॥
नारदा ! तूं देवासमान आहेस. पण ही उपमासुद्धां गौणच होय. अशा अभिप्रायानें वसुदेव म्हणाला ५३.

भूतानां देवचरितं दुःखाय च सुखाय च ।
सुखायैव हि साधूनां त्वादृशामच्युतात्मनाम् ॥ ५ ॥
श्लोक ५- देवतांचे वर्तन कधी प्राण्यांच्या दुःखाला तर कधी सुखाला कारणीभूत होते परंतु आपल्यासारख्या भगवत्प्रेमी साधूंची प्रत्येक कृती सर्व प्राण्यांच्या कल्याणासाठीच असते. (५)

देवांपासूनि भूतसृष्टी । सुखदुःखें शिणे पोटीं ।
अतिवृष्टी कां अनावृष्टी । भूतकोटी आकांतु ॥ ५४ ॥
देवांपासून जीवसृष्टीला सुखें आणि दुःखें प्राप्त होऊन तिला यातना भोगाव्या लागतात. अतिवृष्टि किंवा अनावृष्टि झाली की प्राण्यांमध्यें आकांत उसळतो ५४.

त्या देवांपरीस साधु अधिक । हें साचचि मज मानलें देख ।
देवचरिते उठी सुखदुःख । साधु निर्दोख सुखदाते ॥ ५५ ॥
ह्याकरिता त्या देवांपेक्षां साधु हेच श्रेष्ठ होत, असें मला खरोखर वाटते. कारण, देवांच्या करणीनें दुःखमिश्रित सुख उत्पन्न होते; पण साधु हे निर्दोष सुखाचे दाते. अर्थात दुःखलेशरहित सुख देणारे आहेत ५५.

त्यांहीमाजीं तुजसारिखा । जोडल्या कृपाळू निजात्मसुखा ।
तैं पेठ पिके परमार्थसुखा । हा महिमां लोकां कदा न कळेचि ॥ ५६ ॥
त्यांतही तुझ्यासारखा कृपाळू निजात्मसखा मिळाल्यावर काय विचारावें ? परमार्थसुखाची पेठच पिकून जाते. हा महिमा ह्या लोकांना कळत नाहीं ५६.

दिधल्या सुखाचि मागुती । च्युती हों नेणे कल्पांतीं ।
ते अच्युतात्मस्थिती । तुजपाशी निश्चितीं नारदा ॥ ५७ ॥
आणखी विशेष हे की, एकदां हें सुख मिळाले की, तें कल्पांतीही नाश पावत नाहीं अशी अच्युतात्मस्थिति, नारदा ! निश्चितपणे तुझ्यापाशींच आहे ५७.

तुझिये महिमेपासीं । मुदल देवो नये तुकासी ।
तेंही सांगेन मी तुजपासीं । यथार्थेंसी नारदा ॥ ५८ ॥
तुझ्या महिमेशी मुख्य देवाचीही बरोबरी होऊ शकत नाही. ती कशी ? तेही नारदा ! मी तुला यथार्थ रीतीनें सांगतों ५८.

देवाचा अवतार होये । दासां सुख दैत्यां भये ।
तेथेही ऐसे विषम आहे । हें न समाये तुजमाजीं ॥ ५९ ॥
देवाचा अवतार झाला म्हणजे त्याच्या दासाला सुख होते आणि दैत्यांना भय पडते, असा त्यांत भेदभाव आहे; पण हा पक्षपात तुझ्यामध्यें नाहीं ५९.

तूं देवांचा आप्त होसी । दैत्यही विश्वासती तुजपासीं ।
रावण ने‍ऊनि तुज एकांतासी । निजगुह्यासी स्वयें सांगे ॥ ६० ॥
तूं देवांचाही आप्त आहेस; तसा दैत्यांचाही पण तुझ्यावर भरंवसा आहे. रावण तुला एकांतांत नेऊन आपल्या हृदयांतील हितगुज सांगत होता ६०.

देव रावणें घातलें बंदीं । तो रावण तुझे चरण वंदी ।
शेखी रामाचा आप्त तूं त्रिशुद्धी । विषम तुजमधीं असेना ॥ ६१ ॥
रावणानें देव बंदीत घातले होते, पण तोच तुझ्या चरणाला वंदन करीत होता. शेवटी तूं खरोखरी रामाचाही मित्र होतासच. सारांश, तुझ्यामध्यें विषमभाव हा नाहींच ६१.

जरासंधु कृष्णाचा वैरी । तुझी चाल त्याच्या घरीं ।
आणि कृष्णाचे सभेमाझारीं । आप्तत्वें थोरी पैं तुझी ॥ ६२ ॥
जरासंध कृष्णाचा वैरी होता, पण तुझें जाणेयेणें त्याच्या घरी होतेच; आणि कृष्णाच्या सभेत तर कृष्णाचा थोर आप्त तूंच ६२.

नाम घेवों नेदी देवाचें । हें बिरुद हिरण्यकशिपूचें ।
त्यासी कीर्तन तुझें रुचे । विषमत्व साचें तुज नाहीं ॥ ६३ ॥
देवाचें नांव घेऊ द्यावयाचें नाहीं हे तर हिरण्यकशिपूचे ब्रीद; पण त्याला तुझें कीर्तन मनस्वी आवडत असे. ह्यावरून तुझ्यामध्यें खरोखर भेदभाव असा नाहींच ६३.

लांचुगी बुद्धि सदा देवांसी । तैशी नाहीं तुम्हां साधूंसी ।
ऐक त्याही अभिप्रायासी । यथार्थेंसीं सांगेन ॥ ६४ ॥
देवांची बुद्धि लालुचीची आहे. तशी तुम्हां साधूंची नाही. ती कशी तेही यथार्थ रीतीनें सांगतों ऐक ६४.

भजन्ति ये यथा देवान्देवा अपि तथैव तान् ।
छायेव कर्मसचिवाः साधवो दीनवत्सलाः ॥ ६ ॥
श्लोक ६- लोक देवतांना ज्याप्रकारे भजतात, त्याचप्रमाणे देवतासुद्धा त्यांना प्रतिबिंबासारखेच कर्मानुसार फळ देतात परंतु सत्पुरूष दीनवत्सल असतात ते सर्वांनाच आपले समजतात. (६)

जे जैसे देव यागीं यजिजती । तैसतैसी फळें देव देती ।
न भजत्यांतें विघ्नें सूचिती । ऐसी गती देवांची ॥ ६५ ॥
जे जसे यज्ञानें देवांना तृप्त करतात, त्यांना देव तशी फळे देतात; आणि जे त्यांना भजत नाहीत, त्यांच्यावर विघ्नें आणून घालतात अशी देवांची चाल आहे ६५.

जैसजैसा पुरुष वेंठे । तैसतैसी छाया नटे ।
तेवीं भजनें देव प्रसन्न मोठे । येरवीं उफराटें विघ्न करिती ॥ ६६ ॥
पुरुष जसा वळतो त्याप्रमाणें छायाही वळते. तद्वत् देवांचे भजन केलें म्हणजे ते मोठे प्रसन्न होतात; नाहीं तर उलटें विघ्न करतात ६६.

जंव जंव सूर्य प्रकाशत असे । तंव तंव छाया सरिसी दिसे ।
निजकर्में देवही तैसे । कर्मवशें प्रसन्न ॥ ६७ ॥
प्रातःकाळी सूर्य जसजसा वर चढत जातो, तसतशी छायाही जवळ येत जाते. तद्वत् आपल्या कर्माप्रमाणें देवही जवळ येतात म्हणजे प्रसन्न होतात ६७.

सूर्य अस्तमानीं छाया नासे । अभजनें देव क्षोभती तैसे ।
एवं लांचुगे देव ऐसे । तूंही अनायासे जाणसी ॥ ६८ ॥
सूर्य मावळला की छाया नाहीशी होते, त्याप्रमाणें भजन केले नाहीं की देव क्षुब्ध होतात. अशा प्रकारे देव स्वार्थी आहेत, हे तुलाही माहीत आहेच ६८.

इतर देवांची कथा कोण । थोरला देव लांचुगा पूर्ण ।
तोही न भेटे जीव घेतल्याविण । भेटल्याचे आपण गर्भवास सोसी ॥ ६९ ॥
इतर देवांची काय कथा ? पण सर्वांत जो मोठा देव, तोसुद्धां पक्का लांचखाऊ आहे. तोसुद्धां जीव घेतल्याशिवाय भेटत नाहीं आणि भेटल्याचे गर्भवास आपण सोसतो ६९.

त्याचें जीवें सर्वस्वें भजन । केल्या निजांग दे‍ऊनि होये प्रसन्न ।
परी न भजत्याच्या घरा जाण । विसरोनि आपण कदा न वचे ॥ ७० ॥
त्याचे जीवाभावानें भजन केले म्हणजे तो आपले निजांग देऊनही प्रसन्न होतो; पण जो भजत नाहीं त्याच्या घराला कधी चुकूनसुद्धा जात नाहीं ७०.

तैसी नव्हे तुमची बुद्धी । दीनदयाळ त्रिशुद्धी ।
तूं तंव केवळ कृपानिधी । ऐक तो विधी सांगेन ॥ ७१ ॥
तशी तुम्हां संतांची बुद्धि नाही. तूं तर खरोखर दीनांवर दया करणारा आहेस. कृपेचा केवळ निधि. ते कसे ते सांगतों ऐक ७१.

तुवां व्यास देखोनि सज्ञान । उपदेशिलें गुह्यज्ञान ।
ध्रुव बाळक अज्ञान । म्हणोनि जाण नुपेक्षिसी ॥ ७२ ॥
तूं व्यासाला सज्ञान पाहून ब्रह्मज्ञानाचा उपदेश केलास; पण ध्रुव हे अज्ञान बालक म्हणून त्याचीही उपेक्षा केली नाहींस ७२.

प्रल्हाद उपदेशिला जेव्हां । दैत्यपुत्र न म्हणसी तेव्हां ।
तुझिया कृपेचा हेलावा । तो निजविसांवा दीनांसी ॥ ७३ ॥
प्रल्हादाला जेव्हां उपदेश केलास, तेव्हां हा दैत्याचा मुलगा आहे हा विचार तूं मनांत आणिला नाहीस. तुझ्या कृपेची लहरी हेच दीन जनांचे विश्रांतिस्थान आहे ७३.

केवळ वाटपाडा देख । भजनेंवीण एका‍एक ।
महाकवी केला वाल्मीक । अमर आवश्यक वंदिती त्यासी ॥ ७४ ॥
वाल्या कोळी केवळ वाटमार्‍या, भजन ठाऊक नाहीं, पूजन ठाऊक नाहीं; त्याला तूं रामनामाचा उपदेश करून महाकवि वाल्मीकि करून सोडलास. त्याला देवसुद्धां वंदन करतात ७४.

देखोनि ज्याचिया ग्रंथासी । सुख वोसंडे सदाशिवासी ।
ऐसा तूं कृपाळू होसी । अनाथासी कुवांसा ॥ ७५ ॥
ज्याच्या ग्रंथाला पाहून सदाशिवालासुद्धा आनंदाचे भरतें येते. असा तूं कृपाळू आणि अनाथाला विसावा आहेस ७५.

वरिवरी दाविसी मिणधा कोप । कोपोनि सांडविशी त्याचें पाप ।
शेखीं सायुज्याचे दीप । दाविशी सद्‌रूप दयाळुवा ॥ ७६ ॥
तूं वरवर निमित्ताला मात्र कोप दाखवितोस. पण ज्याच्यावर तूं कोप करतोस त्याचे पाप नाहीसे करतोस; आणि शेवटी, हे दयाळो ! सायुज्याचा दीप लावून सद्‌रूप दाखवितोस ७६.

तुम्ही अच्युतात्मे निजनिर्धारीं । म्हणौनि देवो तुमचा आज्ञाधारी ।
तुम्ही म्हणाल त्यातें उद्धरी । येर्‍हवीं हातीं न धरी आनातें ॥ ७७ ॥
तुम्ही खरोखर अच्युतात्मे आहांत, म्हणून देवही तुमचा आज्ञाधारक आहे. तुम्ही ज्याचा उद्धार करा असे त्याला म्हणाल, त्याचाच तो उद्धार करतो. नाहींतर हातांतसुद्धां धरीत नाहीं ७७.

ऐसा तूं दीनदीक्षागुरु । ब्रह्मज्ञाने अति‍उदारु ।
तरी पुसेन तो विचारु । निजनिर्धारु सांगावा ॥ ७८ ॥
अशा रीतीनें दीनाला परमार्थाची दीक्षा देणारा तूं गुरु आहेस आणि ब्रह्मज्ञानानें अत्यंत उदार आहेस. ह्याकरितां आतां जी गोष्ट मी विचारीन ती नीट सांगावी ७८.

ब्रह्मन् तथापि पृच्छामो धर्मान्भागवतांस्तव ।
यान्श्रुत्वा श्रद्धया मर्त्यो मुच्यते सर्वतो भयात् ॥ ७ ॥
श्लोक ७- हे ब्रह्मन ! तरीसुद्धा आम्ही आपणास भागवत धर्मासंबंधी प्रश्न विचारीत आहोत जे श्रद्धेने ऐकल्यामुळे सगळीकडे भयप्रद असणार्‍या या संसारापासून मनुष्य मुक्त होतो. (७)

आदरें म्हणे देवऋषी । आजि सकळ पुण्यें आलीं फळासी ।
मायबाप तूं घरा आलासी । निजसुखासी दायक ॥ ७९ ॥
तो पुन्हा आदरानें म्हणाला, हे देवर्षे ! आज माझी सारी पुण्ये फळास आली. कारण, आत्मसुख देणारा मायबाप तूं आमच्या घरी आलास ७९.

कृपा केली मागील शिष्यां । तेचि कृपेचा घालीं ठसा ।
मज तुझा पूर्ण भरंवसा । सोडवीं भवपाशापासूनि ॥ ८० ॥
पूर्वीच्या शिष्यांवर आपण जशी कृपा केली, तशीच मजवरही करून मला संसारपाशापासून सोडवावे. तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे ८०..

तुझेनि दर्शनें कृतकृत्यता । जर्‍ही मज जाली तत्त्वतां ।
तर्‍ही भागवतधर्मकथा । कृपेनें तत्त्वतां सांगावी ॥ ८१ ॥
तूं मला आपल्या दर्शनानें खरोखर कृतकृत्य करून सोडलेस. तर आता तशाच कृपेनें यथार्थ रीत्या मला भागवतधर्म सांगावे ८१. त

ऐसे सांगावे भागवतधर्म । जेणें निरसे कर्माकर्म ।
श्रद्धेनें ऐकतां परम । जन्ममरण हारपे ॥८२ ॥
े भागवतधर्म असे सांगावे की, जेणेंकरून सारे कर्माकर्म लयास जाईल आणि श्रद्धेनें श्रवण केले असतां जन्ममरणांतून मुक्तता होईल ८२.

भवभय अति दारुण । त्या भयाचें माया निजकारण ।
तिचें समूळ होय निर्दाळण । ऐसे धर्म कृपेनें सांगावे ॥ ८३ ॥
संसाराचे भय अति दारुण आहे, आणि त्याचे मूळ कारण माया होय. ती ज्या धर्मानें समूळ नाहींशी होऊन जाईल, असे धर्म मला कृपा करून सांगावे ८३.

मज नाही अधिकार पूर्ण । ऐसें विचाराल लक्षण ।
तेविषयींची हे निवारण । सावधान अवधारीं ॥ ८४ ॥
मला ते ऐकण्याचा पूर्ण अधिकार नाही, असे म्हणशील तर त्याबद्दल सांगतों ऐक ८४.

अहं किल पुरानन्तं प्रजार्थो भुवि मुक्तिदम् ।
अपूजयं न मोक्षाय मोहितो देवमायया ॥ ८ ॥
श्लोक ८ – पूर्वी मी मुक्ती देणार्‍या भगवंतांची आराधना मुक्ती मिळावी म्हणून नव्हे, तर ते मला पुत्ररूपाने प्राप्त व्हावेत, म्हणून केली होती कारण भगवंतांच्या मायेने मी त्यावेळी मोहित झालो होतो. (८)

मज अधिकारु नाहीं पूर्ण । हें मीही जाणतो आपण ।
मागें म्यां केले भगवद्‌भजन । तें तूं कथन अवधारीं ॥ ८५ ॥
मला पूर्ण अधिकार नाही, हे माझे मलाच कळते. पण मी पूर्वी भगवद्‌भजन केलेले आहे, तें तूं श्रवण कर ८५.

म्यां पूर्वीं आराधिलें देवराया । तें भजन ममता नेलें वायां ।
प्रलोभविलों देवमाया । पुत्रस्नेहालागूनि ॥ ८६ ॥
मीही पूर्वी देवाधिदेवाची आराधना केली होती; पण तें भजन ममतेमुळें व्यर्थ गेले. पुत्रलोभामुळें देवाच्या मायेनें मी अगदी भुलून गेलों ८६.

मज देव तुष्टला प्रसन्नपणें । मागसी तूं दे‍ईन म्हणे ।
तेथें मायेनें ठकिलें मजकारणें । माझा पुत्र होणें मी मागें ॥ ८७ ॥
देवाला संतोष होऊन तो माझ्यावर प्रसन्न झाला आणि तूं मागशील ते देईन म्हणाला. त्या वेळेस मायेनें मला फसविले, त्यामुळें ‘माझा पुत्र हो’ हे मागणे मी मागितले ८७,

तो हा माझा पुत्र श्रीकृष्ण । परी मज न सांगे ब्रह्मज्ञान ।
तोचि वंदी माझे चरण । म्हणे बाळक पूर्ण मी तुझें ॥ ८८ ॥
तोच हा माझा पुत्र श्रीकृष्ण होय; पण तो मला ब्रह्मज्ञान सांगत नाही. तोच माझ्या चरणांवर मस्तक ठेवतो, आणि मी तुझें खरोखर लेंकरूं आहे असे म्हणतो ८८.

यापरी श्रीकृष्णापासीं । ज्ञानप्राप्ति नव्हे आम्हांसी ।
कृष्ण परमात्मा हृषीकेशी । हें निश्चयेंसीं मी जाणें ॥ ८९ ॥
ह्यामुळें श्रीकृष्णापासून आम्हांला ज्ञानप्राप्ति होत नाही. खरोखर हृषीकेशी श्रीकृष्ण हा परमात्मा आहे हे मला माहीत आहे ८९.

श्रीकृष्ण जन्मला माझिया कुशीं । म्हणौनि श्रद्धा आहे मजपाशीं ।
तेणेंचि तूं तुष्टलासी देवऋषी । तरी निजकृपेंसीं उद्धरी ॥ ९० ॥
श्रीकृष्ण माझ्या पोटी जन्मास आला, म्हणूनच मला श्रद्धा आहे आणि म्हणूनच तूंही संतुष्ट झाला आहेस. तर आतां तसाच आपल्या कृपेनें माझा उद्धार कर ९०.

जे मायेनें ठकिलो वाडेंकोडें । ते माया समूळ झडे ।
ऐसें सांगिजें रोकडें । बहू बोलोनि पुढें काय काज ॥ ९१ ॥
ज्या मायेच्या भुलीनें आम्ही फशी पडलों आहोत, ती माया समूळ झडून जाईल, असे प्रत्यक्ष ज्ञान सांगावें. ह्यापेक्षा जास्त बोलून काय उपयोग ? ९१.

यथा विचित्रव्यसनाद्‌ भवद्‌भिर्विश्वतोभयात् ।
मुच्येम ह्यञ्जसैवाद्धा तथा नः शाधि सुव्रत ॥ ९ ॥
श्लोक ९- हे सुव्रता ! आपण मला आता असा उपदेश करा की, ज्यामुळे अनेक संकटांनी सर्व बाजूंनी वेढलेल्या या संसारातून मी सहज पार होऊन जाईन. (९)

मायाजलें भवसागरु । भरला असे अतिदुस्तरु ।
त्याचा उतरावया पैलपारु । होय तूं तारूं मुनिराया ॥ ९२ ॥
मायारूप जळानें हा संसारसमुद्र अगदीं तुडुंब भरून जाऊन उतरून जाण्याला अत्यंत कठीण झाला आहे. तर हे मुनिराया ! तो उतरून पलीकडे जाण्याला तूं तारूं हो ९२.

याचें सकळ जळ क्षार । माजीं सावजें अनिवार ।
एकएकें चराचर । गिळिलें साचार निजशक्तिं ॥ ९३ ॥
ह्या समुद्राचे पाणी सगळे खारट आहे; आणि त्यांत प्रचंड जलचरें अनिवार झालेली आहेत. ती इतकी मातली आहेत की, त्यांतील एकएकानें आपल्या सामर्थ्यानें खरोखर चराचरच गिळून टाकलेलें आहे ! ९३.

लाटांवरी अचाट लाटा । मोहाचिया अतिदुर्घटा ।
आदळती अविवेकतटा । धैर्याचिया कांठा पाडित ॥ ९४ ॥
मोहाच्या एकावर एक अतिदुर्धर अशा लाटा उसळत आहेत. अविवेकतटावर त्या आदळतात, व धैर्याचा कांठ पाडून टाकतात ९४.

अहं कुवावो वाजतां थोरु । अवघाचि खवळे सागरु ।
मी माझेनि गजरें घोरु । अतिदुर्धरु गर्जत ॥ ८५ ॥
अहंकाररूप झंजावात ‘रों रों रों रों’ असा वाजत असतो, त्यामुळें सारा समुद्र अगदी खवळून जातो; आणि ‘मी’ व ‘माझे’ म्हणून मोठ्यानें गर्जना करतो ९५.

नाना वासनांचा वळसा । पाहे पां भंवताहे कैसा ।
येथ तरावया धिंवसा । नव्हे सहसा सुरनरां ॥ ९६ ॥
त्याचप्रमाणें नाना प्रकारच्या वासनांचे भोंवरे कसे गर गर गर गर फिरतात पहा ! त्यामुळें या सागरांतून पलीकडे जाण्याचे धैर्य सुरनरांना सहसा होत नाहीं ९६.

क्रोधाचें प्रबळ भरतें । भरी द्वेषाचिया तरियांतें ।
असूयातिरस्कारांची तेथें । चिडाणी उते अनिवार ॥ ९७ ॥
द्वेषाच्या खाड्यांतून क्रोधाची भरती भरत असते आणि असूया तिरस्काराचे पुईड पसरून राहते ९७.

कामपर्वताचीं शिखरें । विषमें भासती अपारें ।
आशे‍इच्छेचीं वरी थोरें । झाडें विषयांकुरें वाढलीं ॥ ९८ ॥
कामरूप पर्वतांची असंख्य शिखरे उंचनीच दिसत असतात आणि त्यांच्यावर इच्छेची मोठमोठाली झाडें विषयांकुरानें फोफावतात ९८.

संकल्पविकल्पांचे मीन । निंदेच्या सुसरी दारुण ।
ब्रह्मद्वेषाचे नक्र पूर्ण । सागरीं जाण तळपती ॥ ९९ ॥
ह्या समुद्रांत संकल्प आणि विकल्परूप मासे असून निंदारूप अक्राळविक्राळ सुसरी आहेत आणि ब्रह्मद्वेषरूप माजलेले नक्र समुद्रामध्यें तळपत असतात ९९.

एवढाही हा भवसागरु । शोषितां तूं अगस्ती साचारु ।
तुझेनि भवाब्धीपैलपारु । पावों हा निर्धारु जाहला आम्हां ॥ १०० ॥
संसारसमुद्र हा एवढा प्रचंड आहे तरीसुद्धा त्याला खरोखर शोषून टाकणारा तूं अगस्तीच आहेस. ह्याकरितां तुझ्या साहाय्यानें हा समुद्र उल्लंघन करून जाऊं असा आम्हांला भरंवसा वाटतो १००.

याचा विश्वतोभय हेलावा । तो आम्हां न बाधी तुमच्या कणवा ।
अप्रयासें नारददेवा । मरणार्णवा मज तारीं ॥ १०१ ॥
ह्याच्या लाटांचे भय सर्व ब्रह्मांडाला आहे; पण तुझ्या कृपेनें त्या आम्हांला मात्र बाधक व्हावयाच्या नाहीत. तर हे नारददेवा ! हे दयानिधे ! आपण ह्या जन्ममरणरूप संसारसागरांतून अनायासे माझा उद्धार करावा १.

पायी उतरून भवसागरु । साक्षात् पावें परपारु ।
ऐसा भागवतधर्मविचारु । तो निजनिर्धारु प्रबोधीं ॥ १०२ ॥
हा संसारसमुद्र केवळ पायानेंच तरून जाऊन प्रत्यक्ष पैलतीर गांठीन, असा भागवतधर्माचा विचार मला सांगावा २.

ऐकोनि वसुदेवाची उक्ती । नारद सुखावला चितीं ।
तोचि अभिप्रावो परीक्षिती । शुक स्वमुखें स्थिति सांगत ॥ १०३ ॥
हें वसुदेवाचें भाषण ऐकून नारदाच्या मनाला परम संतोष झाला. तीच त्याची आनंदमय स्थिति शुकाचार्य आपल्या मुखानें परीक्षितीला सांगतात ३

श्रीशुक उवाच –
राजन् एवं कृतप्रश्नो वसुदेवेन धीमता ।
प्रीतस्तमाह देवर्षिः हरेः संस्मारितो गुणैः ॥ १० ॥
श्लोक १०- श्रीशुक म्हणतात राजन ! बुद्धिमान वसुदेवांचा हा प्रश्न ऐकून देवर्षी नारदांना भगवंतांच्या गुणांचे स्मरण झाले आणि प्रेमपूर्वक ते त्यांना म्हणाले – (१०)

सांगतां वसुदेवाचा प्रश्न । श्रीशुक जाहला स्वानंदपूर्ण ।
नारदु वोळला चैतन्यघन । चित्सुखजीवन मुमुक्षां ॥ १०४ ॥
हा वसुदेवाचा प्रश्न सांगतांना श्रीशुकाचार्यांना स्वानंदाचे भरते आले. चैतन्यरूपी मेघ असा नारद मुमुक्षु लोकांवर चित्सुखाचें जीवन (जल) वर्षाव करूं लागला ४.

श्रीशुक म्हणे नरदेवा । भावो मीनला नारदाच्या भावा ।
ऐकोनि प्रश्नसुहावा । तो म्हणे वसुदेवा धन्य वाणी ॥ १०५ ॥
श्रशुकाचार्य म्हणाले. हे राजा ! हे ऐकून मनाला मन मिळाल्यामुळें नारद म्हणाला, हे. वसुदेवा ! तुझी वाणी धन्य होय ५.

परिसतां हा तुझा प्रश्न । चित्सुखें प्रगटे नारायण ।
ऐसें बोलतां नारद जाण । स्वानंदें पूर्ण वोसंडला ॥ १०६ ॥
हा तुझा प्रश्न ऐकून चिदानंदस्वरूपानें नारायणच प्रगट झाला आहे. असें बोलता बोलतां नारद आत्मानंदानें अगदी भरून गेला ६.

रोमांच उचलले अंगीं । स्वेद दाटला सर्वांगीं ।
आनंदाश्रु चालिले वेगीं । स्वानंदरंगीं डुल्लतु ॥ १०७ ॥
त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले, साऱ्या अंगाला घाम सुटला, डोळ्यांतून आनंदाश्रु वाहूं लागले आणि स्वानंदाच्या रंगांत तो डोलूं लागला ७.

सप्रेम मीनलिया श्रोता । जैं पूर्ण सुखावेना वक्ता ।
तैं तो जाणावा अवघा रिता । कथासारामृता चवी नेणे ॥ १०८ ॥
प्रेमळ श्रोता मिळाला असतां ज्या वक्त्याला पूर्ण आनंद होत नाही, त्याला कथासारामृताची चवच ठाऊक नाहीं, तो अगदी कोरडा आहे म्हणून समजावे ८.

ऐकतां वसुदेवाचा प्रश्न । नारद सुखावे पूर्ण ।
मग स्वानंदगिरा गर्जोन । काय आपण बोलत ॥ १०९ ॥
वसुदेवाचा प्रश्न ऐकतांच नारदाला अत्यंत आनंद झाला आणि मग त्या आनंदयुक्त वाणीनें गर्जना करून वसुदेवाला काय बोलू लागला ते ऐक ९.

श्रीनारद उवाच –
सम्यक् एतत् व्यवसितं भवता सात्वतर्षभ ।
यत्पृच्छसे भागवतान् धर्मांस्त्वं विश्वभावनान् ॥ ११ ॥
श्लोक ११- नारद म्हणाले – हे यदुश्रेष्ठा ! विश्वाचे कल्याण करणारा भागवतधर्म जाणून घेण्यासंबंधीचा तुमचा हा निश्चय अतिशय चांगला आहे. (११)

नारद म्हणे सात्वत श्रेष्ठा । वसुदेवा परमार्थ निष्ठा ।
धन्य धन्य तुझी उत्कंठा । तूं भावार्थी मोठा भागवतधर्मी ॥ ११० ॥
नारद म्हणाला, हे यादवश्रेष्ठा ! हे परमार्थनिष्ठ वसुदेवा ! तुझ्या उत्कंठेची खरोखरच धन्य आहे. भागवतधर्मावर तुझी मोठी भक्ति आहे ह्यांत शंका नाहीं ११०.

ज्याचेनि धर्माचे प्रश्नोत्तरें । हें विश्व अवघेंचि उद्धरे ।
हें विचारिलें तुवां बरें । निजनिर्धारें श्रीकृष्णजनका ॥ १११ ॥
हे श्रीकृष्णजनका ! ज्या धर्माच्या प्रश्नोत्तरानें ह्या साऱ्या विश्वाचाही उद्धार होईल, त्याच धर्माचा तूं प्रश्न विचारलास हे फारच उत्तम झाले ११.

तुझेनि प्रश्नोत्तरें जाण । साधक निस्तरती संपूर्ण ।
साधकांचें नवल कोण । महापापी पावन येणें होती ॥ ११२ ॥
तुझ्या प्रश्नोत्तराच्या योगानें साधक उद्धरून जातील ह्यांत आश्चर्य काय ? ह्याच्यायोगें महापापीसुद्धा पावन होतील १२.

श्रुतोऽनुपठितो ध्यात आदृतो वानुमोदितः ।
सद्यः पुनाति सद्धर्मो देवविश्वद्रुहोऽपि हि ॥ १२ ॥
श्लोक १२- हे वसुदेवा ! हा श्रेष्ठ भागवत धर्म असा आहे की, जो ऐकल्याने, त्याचा उच्चार केल्याने, त्याचे स्मरण केल्याने, त्याचा स्वीकार केल्याने किंवा त्याला मान्यता दिल्यामुळेसुद्धा दुर्जनही त्याच क्षणी पवित्र होतात. (१२)

भागवतधर्माचेनि गुणें । एक उद्धरती श्रवणें ।
एक तरती पठणें । एक निस्तरती ध्यानें संसारपाश ॥ ११३ ॥
भागवत धर्मच असा आहे की, त्याच्या श्रवणानें कित्येक उद्धरतात; कोणी त्याच्या पठणानेंच तरतात; कोणी त्याचे चिंतन करून संसारपाशांतून मुक्त होतात १३.

एक श्रोतयां वक्तयांतें । देखोनि सुखावती निजचित्तें ।
सद्‌भावें भलें म्हणती त्यांतें । तेही तरती येथें भागवतधर्में ॥ ११४ ॥
कोणी श्रोत्याला व वक्त्याला पाहून आपल्या मनांत आनंदभरित होतात सद्‌भावानें जे त्यांना ‘भले भले’ म्हणतात तेसुद्धा येथे ह्या भागवतधर्मानें तरून जातात १४.

हें नवल नव्हे भागवतधर्मा । जो कां देवद्रोही दुरात्मा ।
अथवा विश्वद्रोही दुष्टात्मा । तोही तरे हा महिमा भगवतधर्मी ॥ ११५ ॥
ह्यांतही मोठेंसें नवल नाही; पण जो देवद्रोह करणारा दुरात्मा असतो; अथवा साऱ्या विश्वाचा द्रोह करणारा दुष्ट चांडाळ असतो, तोसुद्धा ह्या भागवतधर्मानें तरून जातो, असा ह्याचा महिमा आहे १५.

हृदयीं धरितां भागवतधर्म । अकर्म्याचें निर्दळी कर्म ।
अधर्म्याचें निर्दळी धर्म । दे उत्तमोत्तमपदप्राप्ती ॥ ११६ ॥
भागवतधर्म जर हृदयामध्यें बाळगला, तर अकर्त्यांच्या कर्मांचा तो नाश करून टाकतो आणि अधर्म्यांचे अधर्मही रसातळाला नेऊन त्यांना उत्तमोत्तम पदावर नेऊन बसवितो १६.

जेथ रिगाले भागवतधर्म । तेथ निर्दळे कर्माकर्मविकर्म ।
निंदा द्वेष क्रोध अधर्म । अविद्येचें नाम उरों नेदी ॥ ११७ ॥
जेथें भागवतधर्म शिरतो, तेथे तो कर्माकर्म सारे लयास नेऊन निंदा, द्वेष, क्रोध, अविद्या, ह्यांचे नांवसुद्धां उरूं देत नाहीं १७.

ते भागवतधर्मी अत्यादर । श्रद्धेनें केला प्रश्न तुवां थोर ।
निजभाग्यें तूं अति उदार । परम पवित्र वसुदेवा ॥ ११८ ॥
अशा त्या भागवतधर्मासंबंधानेंच तूं अति आदरानें व भक्तीनें गूढ प्रश्न केलास. तेव्हां हे वसुदेवा, तूं मोठा पवित्र व अत्यंत उदार भाग्याचा आहेस १८.

तुझें वानूं पवित्रपण । तरी पोटा आला श्रीकृष्ण ।
जयाचेनि नामें आम्ही जाण । परम पावन जगद्वंद्य ॥ ११९ ॥
तुझ्या पवित्रपणाचे वर्णन किती करावें ? ज्याच्या नामानें आम्ही पावन व जगद्वंद्य झालों, तो श्रीकृष्ण प्रत्यक्ष तुझ्या पोटाला आलेला आहे १९.

तो स्वयें श्रीकृष्णनाथ । नित्य वसे तुझियां घरांत ।
तुझिया‍ऐसा भाग्यवंत । न दिसे येथ मज पाहतां ॥ १२० ॥
तो श्रीकृष्ण तुझ्या घरांत नित्य वास करीत आहे. तेव्हां तुझ्या एवढा भाग्यवान् मला तर दुसरा कोणी दिसत नाहीं १२०.

वसुदेव तुझिया नामतां । “वासुदेव” म्हणती अनंता ।
तें वासुदेव नाम स्मरतां । परमपावनता जगद्वंद्यां ॥ १२१ ॥
हे वसुदेवा ! तुझ्याच नांवावरून ह्या अनंताला ‘वासुदेव’ असे म्हणतात. त्या वासुदेव-नामाचे स्मरण केले असतां प्राणी अत्यंत पावन होतो २१.

त्वया परमकल्याणः पुण्यश्रवणकीर्तनः ।
स्मारितो भगवानद्य देवो नारायणो मम ॥ १३ ॥
श्लोक १३- ज्यांचे श्रवण व कीर्तन पावन करणारे आहे, त्या परमकल्याणस्वरूप व माझे आराध्यदैवत, अशा भगवान नारायणांचे तुम्ही आज मला स्मरण करून दिले आहे. (१३)

ज्याचेनि श्रवणें वाढे पुण्य । ज्यचेनि नामें झडे भवबंधन ।
तो सद्य स्मरविला तुवां नारायण । तुझी वाचा कल्याण वसुदेवा ॥ १२२ ॥
ज्याच्या गुणानुवादानें पुण्य वाढते, ज्याच्या नामानें संसारबंधन तुटते, त्या नारायणाचे तूं आज स्मरण करविलेंस; तेव्हां तुझ्या ह्या वाणीचे कल्याण असो २२.

तुझा आजि ऐकतांचि प्रश्न । पूर्ण प्रगटला नारायण ।
मज तुझा हा उपकार पूर्ण । तूं परम कल्याण वसुदेवा ॥ १२३ ॥
आज तुझा हा प्रश्न ऐकून हृदयामध्यें नारायणच पूर्णपणे प्रगट झाला आहे. हा तुझा माझ्यावर मोठा उपकार होय. ह्याकरितां हे वसुदेवा ! तुझें कोटकल्याण असो २३.

आशंका : ऐकोनि नारदाचें वचन । झणें विकल्प धरील मन ।
यासी पुर्वीं होतें विस्मरण । आतां जाहलें स्मरण वसुदेवप्रश्नें ॥ १२४ ॥
नारदाचें हें भाषण ऐकून कदाचित् कोणाच्या मनांत विकल्प येईल की, नारदाला पूर्वी नारायणाचे विस्मरण झाले होते, आतां वसुदेवाच्या प्रश्नामुळें त्याला स्मरण झाले २४.

ज्यांची ऐसी विकल्पयुक्ती । ते जाणावे निजात्मघाती ।
तेही अर्थींची उपपत्ती । ऐक निश्चितीं शुक सांगे ॥ १२५ ॥
पण असा जे कोणी विकल्पाचा तर्क करितील ते आत्मघातकी समजावे. त्याविषयींची फोड उघड करून शुक सांगत आहेत ती ऐका २५,

अग्नि कुंडामाजीं स्वयंभ असे । तो घृतावदानें अति प्रकाशे ।
तेवीं सप्रेम प्रश्नवशें । सुख उल्लासे मुक्तांचें ॥ १२६ ॥
अग्निकुंडामध्यें अग्नि स्वयंभू असतो, त्यावर तूप ओतले की तो अधिकच भडकतो. तद्वत् प्रेमळ प्रश्नांच्या योगानें मुक्ताचे सुख अधिक विकासतें २६.

सप्रेम भावार्थे मीनला श्रोता । मुक्तही उल्हासें सांगे कथा ।
तेथील सुखाची सुखस्वादुता । जाणे जाणता सवर्म ॥ १२७ ॥
श्रोता भक्तिभावानें तल्लीन झाला म्हणजे मुक्तही अधिक उल्हासानें कथा सांगतो. त्या सुखाची गोडी जाणता असतो तोच यथार्थ रीतीनें समजतो २७.

यालागीं मुक्त मुमुक्षु विषयी जन । भागवतधर्में निवती संपूर्ण ।
तोचि वसुदेवें केला प्रश्न । तेणें नारद पूर्ण सुखावला ॥ १२८ ॥
ह्याकरितां मुक्त, मुमुक्षु, आणि विषयी जनसुद्धां भागवतधर्मानें पूर्ण शांति पावतात, तोच प्रश्न वसुदेवानें केला म्हणून नारदालाही परमानंद झाला २८.

जे कां पूर्वपरंपरागत । जीर्ण भागवतधर्म येथ ।
सांगावया नारदमुनि निश्चित । उपपादित इतिहासु ॥ १२९ ॥
आणि पूर्वपरंपरागत प्राचीन असा जो भागवतधर्म तो सप्रमाण सांगण्याकरितां त्या नारदमुनींनी मागील इतिहास सांगण्यास सुरवात केली २९.

अत्राप्युदाहरन्ति इमं इतिहासं पुरातनम् ।
आर्षभाणां च संवादं विदेहस्य महात्मनः ॥ १४ ॥
श्लोक १४- त्यासंबंधी हा एक प्राचीन इतिहास सांगतात तो म्हणजे ऋषभाचे पुत्र आणि महात्मा विदेह यांचा संवाद होय. (१४)

येच अर्थीं विदेहाचा प्रश्न । संवादती आर्षभ नवजण ।
ते भागवतधर्म जीर्ण । इतिहास संपूर्ण सांगेन ऐक ॥ १३० ॥
वरील अर्थाचाच जनकराजाचा प्रश्न होता, व त्याचे उत्तर नऊ आर्षभांनी दिले होते. नारद म्हणाला, त्या भागवतधर्माचा संपूर्ण प्राचीन इतिहास मी तुला सांगतों ऐक १३०.

आर्षभ कोण म्हणसी मुळीं । त्यांची सांगेन वंशावळी ।
जन्म जयांचा सुकुळीं । नवामाजीं जाहली ब्रह्मनिष्ठा ॥ १३१ ॥
परंतु प्रथम आर्षभ हे कोण असे विचारशील तर, त्यांची वंशावळीही सांगतो. त्यांचा उत्तम कुळांत जन्म झाला असून त्या नऊ असामींमध्येंही उत्तम ब्रह्मनिष्ठा उत्पन्न झालेली होती ३१.

प्रियव्रतो नाम सुतो मनोः स्वायम्भुवस्य यः ।
तस्याग्नीध्रस्ततो नाभिः ऋषभस्तत्सुतः स्मृतः ॥ १५ ॥
श्लोक १५- स्वायंभुव मनूचा प्रियव्रत नावाचा एक पुत्र होता, त्याचा पुत्र आग्नीध्र, आग्नीध्राचा नाभी आणि नाभीचा ऋषभ. (१५)

स्वायंभु मनूचा सुतु । जाण नामें ‘प्रियव्रतु’ ।
त्याचा ‘आग्नीध्र’ विख्यातु । ‘नाभी’ त्याचा सुतु सूर्यवंशीं ॥ १३२ ॥
स्वायंभूमनूचा जो पुत्र होता, त्याचे नांव ‘प्रियव्रत’ असे जाण. त्याचा पुत्र ‘आग्नीध्र’ नांवाचा विख्यात होता. त्याचा सूर्यवंशांतील पुत्र ‘नाभी’ हा होय ३२.

त्या नाभीपासूनि ज्ञानविलासु । ‘ऋषभ’ जन्मला वासुदेवांशु ।
मोक्षधर्माचा प्रकाशु । जगीं सावकाशु विस्तारिला ॥ १३३ ॥
त्या नाभीपासून ज्ञानाचा केवळ विलास असा ‘ऋषभ’ जन्मास आला, हा वासुदेवाचा अंशांशावतार असून त्यानें मोक्षधर्माचा जगांत सर्वत्र प्रकाश केला ३३.

तमाहुर्वासुदेवांशं मोक्षधर्मविवक्षया ।
अवतीर्णं सुतशतं तस्यासीद् ब्रह्मपारगम् ॥ १६ ॥
श्लोक १६- वासुदेवांचा अंश असणार्‍या त्यांनी मोक्षधर्माचा उपदेश करण्यासाठी अवतार धारण केला होता त्याचे शंभर पुत्र होते आणि ते सगळे वेदांमध्ये पारंगत होते. (१६)

ऋषभ वासुदेवाचा अंशु । ये लोकीं मोक्षधर्मविश्वासु ।
प्रवर्तावया जगदीशु । हा अंशांशु अवतार ॥ १३४ ॥
ऋषभ हा वासुदेवाचा अंश होता. भूलोकी मोक्षधर्मावर लोकांची श्रद्धा वाढावी म्हणूनच हा भगवंताचा ‘अंशांश’ अवतार झाला होता ३४.

त्याचें पंचमस्कंधीं चरित्र । सांगितलें सविस्तर ।
त्यासी जाहले शत पुत्र । वेदशात्रसंपन्न ॥ १३५ ॥
पंचमस्कंधामध्यें त्याचे सविस्तर चरित्र सांगितले आहे, त्याला वेदशास्त्रसंपन्न असे शंभर पुत्र झाले ३५.

त्यांहीमाजीं ज्येष्ठ पुत्र । अतिशयें परम पवित्र ।
ऐक त्याचे चरित्र । अतिविचित्र सांगेन ॥ १३६ ॥
त्यामध्येंही सर्वांत वडील पुत्र होता तो अतिशय पवित्र होता. त्याचे लोकविलक्षण चरित्र सांगतों ऐक ३६.

तेषां वै भरतो ज्येष्ठो नारायणपरायणः ।
विख्यातं वर्षमेतद् यन्नाम्ना भारतमद्‌भुतम् ॥ १७ ॥
श्लोक १७- भरत हा त्यांच्यामध्ये सर्वात थोरला तो नारायणांचा परम भक्त होता त्यांच्याच नावावरून अलौकिक असा हा देश भारतवर्ष या नावाने प्रसिद्ध झाला. (१७)

जो ज्येष्ठपुत्र ‘भरत’ जाण । तो नारायणपरायण ।
अध्यापि ‘भरतवर्ष’ उच्चारण । त्याचेनि नांवें जाण विख्यात ॥ १३७ ॥
या वडील मुलाचे नांव ‘भरत’ असून तो नारायणाचा परम भक्त होता; अद्यापि ‘भरतवर्ष’ म्हणून जे ह्या भरतखंडाला म्हणतात, ते याच्याच नांवामुळें प्रसिद्ध झाले आहे ३७.

जो मनसा-वाचा-कर्मणा । अखंड भजे नारायणा ।
असतांही राज्यधर्मीं जाणा । जो आत्मखुणा न चुके ॥ १३८ ॥
जो मनाने, वाचेनें आणि कर्मानें नारायणाला अखंड भजे, जो राज्यकारभारांत असतांही आत्मखुणा चुकत नसे ३८.

जेवीं मार्गीं चालतां । पा‍उलें वक्रेंही टाकिता ।
दैववशें अडखुळतां । आश्रयो तत्त्वतां भूमिचाचि ॥ १३९ ॥
ज्याप्रमाणें वाटेनें चालत असतां वांकडीतिकडी पावले पडली किंवा ठेचही लागली तरी त्याला भूमीचाच आश्रय असतो ३९.

तेवींचि तयासी असतां । राज्यधर्म चाळितां ।
यथोचित कर्म आचरितां । निजीं निजात्मता पालटेना ॥ १४० ॥
त्याप्रमाणेच तो भरत राज्यकारभार पाहत असतां व यथोचुत कर्में आचरीत असतांही आत्मनिष्ठेपासून च्युत झाला नाहीं १४०.

या नाव बोलिजे ‘अखंडस्थिती’ । जे पालटेना कल्पांती ।
जेथ असतां सुखी होती । पुनरावृत्ति असेना ॥ १४१ ॥
या स्थितीलाच ‘अखंड स्थिति’ असे म्हणतात; जी कल्पांतीही पालटत नाही, आणि ज्या स्थितीत असतांना मनुष्य अत्यंत सुखी होतो व त्याला पुनर्जन्म घ्यावा लागत नाहीं ४१.

ऐसें करी सदाचरण । आणि नारायणपरायण ।
आ‍ईक त्याचेंही व्याख्यान । विशद करूनि सांगेन ॥ १४२ ॥
अशा रीतीनें तो भरत सदाचरण करीत असून, नारायणपरायण होता. ही गोष्ट मी तुला विशद करून सांगतों ऐक ४२.

नरांचा समुदाय गहन । त्यासी ‘नार’ म्हणती जाण ।
त्याचें ‘अयन’ म्हणजे स्थान । म्हणौनि म्हणती ‘नारायण’ आत्मयासी ॥ १४३ ॥
नरांच्या मोठ्या समुदायाला ‘नार’ असे म्हणतात, त्या नाराचे म्हणजे जीवसमुदायाचे आत्मा हा ‘अयन’ म्हणजे स्थान अथवा अधिष्ठान असल्यामुळें त्याला ‘नारायण’ म्हणतात ४३.

त्याच्या ठायीं परायण । म्हणिजे अनन्यत्वें शरण ।
निवटूनियां आपुलें अहंपण । तद्‌रूपें जाण राहिला ॥ १४४ ॥
त्याच्या ठायीं भरत परायण म्हणजे अनन्य शरण झाला व आपले अहंपण नाहीसे करून तद्‌रूप होऊन राहिला ४४.

ऐसा तो ऋषभाचा पुत्र । जयासी नांव ‘भरत’ ।
ज्याच्या नामाची कीर्ति विचित्र । परम पवित्र जगामाजीं ॥ १४५ ॥
असा तो ऋषभाचा पुत्र, त्याचे नांव ‘भरत’. ज्याच्या नांवाची पवित्र कीर्ति सगळ्या जगांत दुमदुमून राहिली आहे ४५.

तो भरतु राहिला हे भूमिकेसी । म्हणौनि ‘भरतवर्ष’ म्हणती यासि ।
सकळ कर्मारंभीं करितां संकल्पासी । ज्याचिया नामासी स्मरताति ॥ १४६ ॥
तो भरत या भूमीत होउन मेला म्हणून या देशाला ‘भारतवर्ष’ असे म्हणतात. सर्व वैदिक कर्मारंभी संकल्प करितांना त्याच्या नांवाचा उच्चार करावा लागतो ४६.

ऐसा आत्माराम जर्‍ही झाला । तर्‍ही विषयसंग नव्हे भला ।
यालागीं त्याचा वृत्तांतु पुढिला । सांगेन सकळां आ‍इकें ॥ १४७ ॥
पण असा अगदी आत्मारामस्वरूप झाला तरी त्यालासुद्धां विषयसंग योग्य नाही, हे समजण्यासाठी त्याचे पुढील चरित्र मी सर्वांना सांगतों, ते ऐकावें ४७.

नामें ख्याती केली उदंड । यालागीं त्यातें म्हणती ‘भरतखंड’ ।
आणीकही प्रताप प्रचंड । त्याचा वितंड तो ऐका ॥ १४८ ॥
नांवानेंच त्यानें आपली फार प्रसिद्धि केली, म्हणूनच याला ‘भरतखंड’ असे म्हणतात. पण याहूनही त्याचा प्रताप प्रचंड म्हणजे लोकविलक्षण आहे तो सांगतो ऐक ४८.

स भुक्तभोगां त्यक्त्वेमां निर्गतस्तपसा हरिम् ।
उपासीनस्तत्पदवीं लेभे वै जन्मभिस्त्रिभिः ॥ १८ ॥
श्लोक १८- त्याने पृथ्वीच्या राज्याचा उपभोग घेतल्यावर ते सोडून तो वनात गेला तेथे त्याने तपश्चर्येने भगवंतांची उपासना करून तीन जन्मांमध्ये भगवंतांना प्राप्त करून घेतले. (१८)

तेणें दिग्मंडल जिंतिलें । समुद्रवलयांकित राज्य केलें ।
नानाविध भोग भोगिले । जे नाहीं देखिले सुरवरीं ॥ १४९ ॥
त्यानें सर्व दिशा पादाक्रांत करून समुद्रवलयांकित पृथ्वीचे राज्य केले. मोठमोठ्या देवांनीही जे भोगविलास भोगले नाहीत, अशा नाना प्रकारच्या सुखविलासांचा त्यानें उपभोग घेतला ४९,

अनुकूळ स्त्रिया पुत्र । अनुकूळ मंत्री पवित्र ।
अनुकूळ राज्य सर्वत्र । ते त्यागिले विचित्र नानाभोग ॥ १५० ॥
त्याला स्त्रिया व पुत्र ही अनुकुल असून पवित्र मंत्रीही अनुकूल होते. तसेच सर्व राष्ट्र अनुकूल असूनही त्या नाना प्रकारच्या दिव्य भोगांचा त्यानें त्याग केला १५०.

ऐसे भोग भोगिलियापाठीं । सांडूनि वलयांकित राज्यसृष्टी ।
स्वयें निघाला जगजेठी । स्वहितदृष्टी हरिभजनीं ॥ १५१ ॥
अशा प्रकारचे सर्व भोग भोगल्यानंतर ते आपलें समुद्रवलयांकित सर्व राज्य सोडून देऊन स्वहितावर दृष्टि ठेवून तो हरिभजनासाठी निघाला ५१.

जे राज्यवैभव भोगिती । त्यांसी कदा नव्हे गा विरक्ती ।
भरतें केली नवलख्याती । सेविला श्रीपती भोगत्यागें ॥ १५२ ॥
जे राज्यवैभव भोगतात, त्यांना विरक्ति कधीच होत नाही; परंतु भरतानें मोठी नवलाची गोष्ट केली, ती ही की, सर्व भोगांचा त्याग करून तो लक्ष्मीपतीची सेवा करूं लागला ५२.

तों नेणेंचि जन्में जाण । हो‍आवा मोक्षासी आरोहण ।
परी जाहलें जन्मांतरकारण । तेंही विंदाण सांगेन ॥ १५३ ॥
तो खरोखर त्याच जन्मांत मोक्षाला जावयाचा; परंतु त्याला जन्मांतर घ्यावे लागले. त्याचेही कारण सांगतों ५३.

संनिहितप्रसूतकाळीं । मृगी जळ प्राशितां जळीं ।
ऐकोनि पंचाननाची आरोळी । उडाली तत्काळीं अतिसत्राणें ॥ १५४ ॥
एक हरिणी, प्रसूतिकाल अगदी जवळ आला असतां, नदीच्या पाण्यांत उभी राहून पाणी पीत होती. इतक्यांत तिनें एकदम व्याघ्राची गर्जना ऐकली. त्यासरशी ती भयानें तत्काळ उडाली ५४.

धाकें गर्भु तिचा पडतां जळीं । भरत स्नान करी ते काळीं ।
देखोनि कृपाळु कळवळी । काढी तत्काळी दयाळुत्वें ॥ १५५ ॥
पण उड्डाण करतांना भयामुळें तिच्या पोटांतील गर्भ एकदम त्या पाण्यांत पडला. त्या काळी जवळच भरत हा स्नान करीत होता. त्यानें तो पाहिला आणि तो जात्याच कोमल मनाचा असल्यानें त्यास त्याची दया येऊन त्यानें त्यास तत्काळ बाहेर काढले ५५.

मृगी न येचि परतोन । मातृहीन हें अतिदीन ।
भरत पाळी भूतदयेनें । मृगममता पूर्ण वाढली ॥ १५६ ॥
ती हरिणी काही मागे परतून आली नाही. त्यामुळें ते पाडस आईशिवाय बापुडवाणे दिसू लागले. त्यामुळे, भूतदयेनें प्रेरित होऊन भरत त्या हरिणबाळकाचा प्रतिपाळ कर्रूं लागला. करतां करतां मृगाची ममता फारच वाढली ५६.

स्नान संध्या अनुष्ठान । करितां मृग आठवे क्षणक्षण ।
आरंभिल्या जपध्यान । मृगमय मन भरताचें ॥ १५७ ॥
ती इतकी की, स्नान, संध्या, अनुष्ठान करतांनासुद्धा क्षणोक्षणी त्याला तें हरिणीचे पाडस आठवूं लागले. जप किंवा ध्यान आरंभिलें की भरताच्या डोळ्यांपुढे त्या हरिणबालकाशिवाय दुसरे कांहींच दिसत नसे ५७.

आसनीं भोजनीं शयनीं । मृग आठवे क्षणक्षणीं ।
मृग न देखतां नयनी । उठे गजबजोनि ध्यानत्यागें ॥ १५८ ॥
बसतांना, जेवतांना, निजतांना, घटकेघटकेला त्या मृगाचीच त्याला आठवण होत असे. हरिणबाल जरा डोळ्यांआड झाला, की तो ध्यान सोडून खडबडून उठत असे ५८.

ममता बैसली मृगापाशीं । मृग वना गेला स्वइच्छेंसीं ।
त्याचा खेदु करितां भरतासी । काळ आकर्षी देहातें ।१५९ ॥
अशा रीतीनें त्या मृगावर त्याची ममता बसली. तों एके दिवशी तो मृग स्वेच्छेनें अरण्यांत निघून गेला, त्यामुळें भरताला अत्यंत दुःख झाले व त्या दुःखाचे वेळींच त्याला मृत्यूनें गाठलें ५९.

यालागी साचचि जाण । ममतेपाशीं असे मरण ।
जो निर्मम संपूर्ण । त्यासि जन्ममरण स्पर्शेना ॥ १६० ॥
यासाठी ममतेपाशी मरण हें ठेवलेलेच समजावे. जो निखालस ममताशून्य असतो, त्याला जन्ममरण स्पर्शसुद्धा करीत नसते १६०.

भरत तपिया थोर अंगें । तेथ काळ कैसेनि रिघे ।
ममतासंधी पाहोनि वेगें । मृत्यु तद्योगें पावला ॥ १६१ ॥
भरत स्वतः मोठा तपस्वी होता, तेव्हां तेथें काल कसा शिरला ? तर ममतेची संधि साधून मृत्यूनें त्यावर घाला घातला ६१.

देहासी येतां मरण । भरतासी मृगाचें ध्यान ।
तेणें मृगजन्म पावे आपण । जन्मांतरकारण जाहलें ऐसें ॥ १६२ ॥
देहाला मरण आले त्या वेळी भरताला त्या मृगाचा ध्यास लागलेला होता. त्यायोगें त्याला पुढचा जन्म मृगाचा प्राप्त झाला. याप्रमाणें त्याला पुनर्जन्माचे कारण घडले ६२.

कृपेनें केला जो संगु । तोचि योगियां योगभंगु ।
यालागीं जो निःसंगु । तो अभंगु साधक ॥ १६३ ॥
कृपेनें का होईना, संग केला असता तोच योग्याच्या योगभंगास कारण होतो. ह्याकरितां जो निःसंग असतो, तोच अभंग साधक होय ६३.

मृगाचेनि स्मरणें निमाला । यालागीं तो मृगजन्म पावला ।
जो कृष्णस्मरणें निमाला । तो कृष्णुचि जाला देहांतीं ॥ १६४ ॥
मृगाचें स्मरण करता करतांच त्याला मरण आले, म्हणूनच तो मृगाच्या जन्मास गेला. जो कृष्णस्मरण करतांना मरण पावतो, तो मृत्यूनंतर कृष्णस्वरूपच होतो ६४.

अंतकाळीं जे मती । तेचि प्राणियांसी जाण गती ।
यालागी श्रीकृष्ण चित्तीं । अहोरातीं स्मरावा ॥ १६५ ॥
अंतकाळी प्राण्याची जशी मति असते, तशीच त्याला गति मिळते. ह्याकरितां मनामध्यें अहोरात्र श्रीकृष्णाचेच स्मरण करावें ६५,

परी मृगदेहीं जाण । भरतासी श्रीकृष्णस्मरण ।
पूर्वीं केलें जें अनुष्ठान । तें अंतर जाण कदा नेदी ॥ १६६ ॥
भरत मृग झाला, परंतु त्या मृगाच्या देहामध्येंसुद्धा त्याला श्रीकृष्णाचे स्मरण होते. कारण, पूर्वजन्मी केलेले अनुष्ठान कधीही व्यर्थ होत नाही, हे पक्कें समजावें ६६.

मागुता तिसरे जन्में पाहें । तो ‘जडभरत’ नाम लाहे ।
तेथें तो निर्ममत्वें राहे । तेणें होय नित्यमुक्त ॥ १६७ ॥
त्यानंतर तिसऱ्या जन्मीं तो ‘जड-भरत’ ह्या नावानें प्रसिद्धीस आला. तेथें तो मायापाशापासून अगदी अलप्त राहिल्यामुळें नित्यमुक्त होऊन बसला ६७.

बहुतां जन्मींची उणीवी । येणें जन्में काढिली बरवी ।
निजात्मा आकळोनि जीवीं । परब्रह्मपदवी पावला ॥ १६८ ॥
मागील पुष्कळ जन्मांची जाणीव त्यानें ह्या जन्मात भरून काढली. त्यानें आपला जीव आत्मस्वरूपांत लीन करून परब्रह्मपदवी प्राप्त करून घेतली ६८.

ऋषभपुत्रउत्पत्ती । शतबंधु जाण निश्चितीं ।
त्यांत ज्येष्ठाची स्थिती । उरल्यांची गती ते ऐका ॥ १६९ ॥
ह्याप्रमाणें ऋषभाला शंभर पुत्र झाले होते, त्यांपैकी सर्वांत जो वडील, त्याची स्थिति सांगितली. आतां बाकीच्यांचें वर्तमान ऐक ६९.

तेषां नव नवद्वीप पतयोऽस्य समन्ततः ।
कर्मतन्त्रप्रणेतार एकाशीतिर्द्विजातयः ॥ १९ ॥
श्लोक १९- त्या पुत्रांपैकी नऊ पुत्र या भारतवर्षाच्या नऊ द्वीपांचे अधिपती झाले आणि एक्क्याऐंशी पुत्र कर्मकांड रचणारे ब्राह्मण झाले. (१९)

नव नवखंडांप्रती । ते केले खंडाधिपती ।
एक्यायशीं जणांची स्थिती । कर्ममार्गी होती प्रवर्तक ॥ १७० ॥
प्रत्येक खंडावर एक एक याप्रमाणें नऊ खंडांवर नवांना अधिपति करून ठेविले होते. एक्यायशी असामी कर्ममार्गाचे प्रवर्तक होते १७०.

उरले जे नव जण । सकळ भाग्याचें भूषण ।
ब्रह्मज्ञानाचें अधिष्ठान । ऐक लक्षण तयांचें ॥ १७१ ॥
बाकी जे नऊ असामी उरले, ते सर्व भाग्याचे भूषण व ब्रह्मज्ञानाचे केवळ अधिष्ठानच होते. त्यांचे लक्षण सांगतो ऐक ७१.

नवाभवन्महाभागा मुनयो ह्यर्थशंसिनः ।
श्रमणा वातरसना आत्मविद्याविशारदाः ॥ २० ॥
श्लोक २० उरलेल्या भाग्यशाली नऊ जणांनी परिश्रमपूर्वक आत्मविद्या संपादन करून ते आत्मज्ञानी झाले होते त्यामुळे ते नेहमी दिगंबर अवस्थेत राहात आणि अधिकारी पुरुषांना आत्मज्ञानाचा उपदेश करीत असत (२०)

ऋषभकुळीं कुळदीप । स्नेहसूत्रेंवीण देदीप्य ।
नवही जण स्वयें सद्‌रूप । सायुज्यस्वरूप प्रकाशक ॥ १७२ ॥
हे नऊ बंधु म्हणजे ऋषभकुलाला तेलवातीशिवाय प्रकाशित करणारे जणूं दीपकच होते. ते नऊही जण सच्चिदानंदरूप असून सायुज्यस्वरूपाचे प्रकाशक म्हणजे साधकांना सायुज्यस्वरूपाचे दर्शन करविणारे होते ७२.

आत्माभ्यासीं परिश्रम । करून निरसिलें कर्माकर्म ।
यालागीं ते अकृताश्रम । निजनिभ्रम स्वयें जाहले ॥ १७३ ॥
त्यांनी आत्माभ्यासांत परिश्रम करून कर्माकर्म निरसून टाकले होते. म्हणून ते भ्रमरहित झाले असून कोणताही आश्रम न स्वीकारतां राहिलेले होते ७३.

शाब्दबोधें सदोदित । ब्रह्मज्ञानपारंगत ।
शिष्यप्रबोधीं समर्थ । परमाद्‌भुत अतिदक्ष ॥ १७४ ॥
ते शब्दज्ञानांत निष्णात व ब्रह्मज्ञानपारंगत असून शिष्यप्रबोधाविषयीं समर्थ आणि परमाद्‌भुत व अत्यंत दक्ष होते ७४.

ते ब्रह्मविद्येचें चालतें डिंब । त्यांचे अवेव ते ब्रह्मकोंब ।
हे विद्येचें पूर्णबिंब । स्वयें स्वयंभ परब्रह्म ॥ १७५ ॥
ते ब्रह्मविद्येचे चालते बोलते पुतळे असून त्यांचे अवयव म्हणजे ब्रह्माला फुटलेले कोंबच होते. ते विद्येचे पूर्णबिंब असून स्वतःसिद्ध परब्रह्माचे स्वरूप होते ७५.

दशदिशा एकूचि दोरा । भरूनि पांघरुणें मुनीश्वरा ।
वारा वळून कडदोरा । बांधिला पुरा ग्रंथीरूप ॥ १७६ ॥
त्या मुनीश्वरांनी दशदिशांना एकच दोरा भरून पांघरुणे केली होती; वारा वळून त्याचा ग्रंथिरूप एकच कडदोरा बांधलेला होता ७६.

आकाशाच्या ठायीं । अंबरत्व केलें तिहीं ।
ते चिदंबर पाहीं । एकचि नवांही पांघरूण ॥ १७७ ॥
आकाशाचेंच त्यांनी वस्त्र केलें होतें. नऊही असामींनी चिदाकाशाचे एकच पांघरूण केले होते ७७.

प्राणापान वळूनि दोन्ही । गांठी केली नाभीच्या ठायीं ।
तंव जीवग्रंथी सुटली पाहीं । तेंचि नवांही ब्रह्मसूत्र ॥ १७८ ॥
प्राण व अपान ह्या दोहोंची दोरी वळून नाभीमध्यें त्याची गांठ दिली, तोंच जिवाची चिदचिद्‌ग्रंथी सुटली आणि तेच त्या नऊ असामींना ब्रह्मसूत्र म्हणजे यज्ञोपवीत झालें. ७८.

ऐसे परब्रह्मवैभवें । निडारले निजानुभवें ।
त्यांचीं सांगेन मी नांवें । यथागौरवें तें ऐक ॥ १७९ ॥
परब्रह्माच्या वैभवानें व आत्मस्वरूपानुभवानें ते अगदी परिपक्व झाले होते. आता त्या नऊ असामींची नावेही यथागौरव सांगतों ऐक ७९.

ज्यांचे नाम ऐकतां । कांपत काळ पळे मागुता ।
संसार नुघवी माथा । नाम स्मरतां जयांचें ॥ १८० ॥
ज्यांचे नांव ऐकताच काळ हा कांपत कांपत माघारी पळतो, ज्यांच्या नामाचे स्मरण केले असतां संसार डोकेंच वर करूं शकत नाहीं १८०,

त्यांचिया नामांची कीर्ती । आ‍ईक सांगेन परीक्षिती ।
ज्यांचेनि नामें आतुडे मुक्ती । जाण निश्चितीं भाविकां ॥ १८१ ॥
हे परीक्षिती ! ज्यांचे नाम घेतले असतां भाविक जनांना निश्चयेंकरून मुक्तीच मिळते, त्यांच्या नामाची कीर्ति तुला सांगतो ऐक ८१.

कविर्हरिरन्तरीक्षः प्रबुद्धः पिप्पलायनः ।
आविर्होत्रोऽथ द्रुमिलश्चमसः करभाजनः ॥ २१ ॥
श्लोक २१- त्यांची नावे अशी होती कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविर्होत्र, द्रुमिल, चमस व करभाजन. (२१)

कवि हरि अंतरिक्ष । प्रबुद्ध पिप्पलायन देख ।
आविर्होत्र द्रुमिल सुटंक । चमस निर्दोष करभाजन ॥ १८२ ॥
कवि, हरि, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविर्होत्र, सुलक्षणी द्रुमिल, निर्दोष असा चमस, व करभाजन ८२.

एवं नवही नांवें जाण । यांचें करितां नामस्मरण ।
सकळ पापा निर्दळण । हे महिमा पूर्ण तयांची ॥ १८३ ॥
अशा प्रकारें त्या नवांची नऊ नांवे होतीं. ह्या नामांचे स्मरण केले असतां सर्व पातकांचा नाश होतो, असा त्यांचा महिमा आहे ८३.

त्यांची परमहंसस्थिती । सांगेन मी तुजप्रती ।
ज्यांचेनि पावन होय क्षिती । त्या या नव मूर्ती पुण्य पूज्य ॥ १८४ ॥
त्यांची परमहंस स्थिति मी तुला सांगतो. ज्यांच्या योगानें सर्व पृथ्वी पावन होऊन जाईल अशा त्या पुण्यपूज्य नऊ मूर्ति होत्या ८४.

एते त भगवद्‌रूपं विश्वं सदसदात्मकम् ।
आत्मनोऽव्यतिरेकेण पश्यन्तो व्यचरन्महीम् ॥ २२ ॥
श्लोक २२- हे व्यक्त-अव्यक्त जग भगवद्‌रूप मानून ते आपल्याहून वेगळे नाही, असा अनुभव घेत पृथ्वीवर विहार करीत होते. (२२)

ते वेगळे दिसती नवांक । परी भगवद्‌रूपें अवघे एक ।
संतासंत जन अनेक । आपणांसगट देख एकत्वें पाहती ॥ १८५ ॥
ते नऊ जरी देहानें वेगळे दिसत होते, तरी भगवत्स्वरूपत्वानें एकच होते. सुष्ट असोत की दुष्ट असोत, सर्वजनांना आपणासहवर्तमान ते एकरूपानेंच पहात ८५.

त्यांसी तंव असंतता । उरली नाहीं सर्वथा ।
संत म्हणावया पुरता । भेदु न ये हाता चिन्मयत्वें ॥ १८६ ॥
कारण, त्यांना असाधुत्व म्हणून कोठेच काही राहिले नव्हते. सर्व चिन्मय झाल्यामुळें ‘संत’ म्हणण्यापुरता भेद त्यांच्या ठिकाणी राहिलाच नव्हता ८६.

जग परिपूर्ण भगवंतें । आपण वेगळा नुरे तेथें ।
तंव भगवद् रूप समस्तें । भूतें महाभूतें स्वयें देखे ॥ १८७ ॥
सारे जग भगवंतानेंच भरलेले असल्यामुळें आपण त्याहून निराळे राहणे शक्य नाही. त्यामुळें ते सर्व भूतमात्र व पंचमहाभूते भगवत्स्वरूपच पहात असत ८७.

हेंही देखतें देखणें । तेंही स्वयें आपण होणें ।
होणें न होणें येणें जाणें । हीं गिळूनि लक्षणें विचरती मही ॥ १८८ ॥
हे पहाणे व पाहण्याचा पदार्थसुद्धा आपणच होऊन, होणें न होणे, येणें जाणें, ही सर्व लक्षणें गिळून टाकून ते जगांत वावरत असत ८८.

अव्याहतेष्टगतयः सुरसिद्धसाध्य ।
गन्धर्वयक्षनरकिन्नर नागलोकान् ।
मुक्ताश्चरन्ति मुनिचारणभूतनाथ ।
विद्याधरद्विजगवां भुवनानि कामम् ॥ २३ ॥
श्लोक २३ – मनात येईल, तिकडे ते जात असत. देवता, सिद्ध, साध्य, गंधर्व, यक्ष, मनुष्य किन्नर, नाग, मुनी, चारण, भूतनाथ, विद्याधर, ब्राह्मण, गोशाळा अशा कोणत्याही जागी ते स्वच्छंदपणे जात सर्वजण जीवन्मुक्तच होते. (२३)

वैकुंठ कैलास सुरसिद्धस्थानें । सप्तपाताळादि गमनें ।
एवं श्लोकोक्त चवदा भुवनें । स्वइच्छा विचरणें कामनारहित ॥ १८९ ॥
वैकुंठ, कैलास, तसेंच देव व सिद्ध (साध्य, गंधर्व, यक्ष, नर, किन्नर, नाग, मुनि, चारण, भूतनाथ, विद्याधर, द्विज, गाई) इत्यादिकांची स्थानें, सारांश, सप्तस्वर्ग व सप्तपाताळादि म्हणजे श्लोकामध्यें सांगितलेले चौदा लोक, यांमध्यें ते निरिच्छपणे खुशाल फिरत असत ८९.

त्यांसी जीवीं नाहीं विषयासक्ती । यालागीं खुंटेना त्यांची गती ।
इच्छामात्रें गमनशक्ती । सुखें विचरती निष्काम ॥ १९० ॥
त्यांच्या मनांत विषयासक्ति नसल्यामुळें त्यांची गति कुठेच खुंटत नसे. स्वेच्छेप्रमाणें पाहिजे तिकडे जाण्याचे त्यांच्या अंगी सामर्थ्य असल्यामुळें ते निष्कामपणे हवे तिकडे खुशाल जात येत असत १९०.

त एकदा निमेः सत्रं उपजग्मुर्यदृच्छया ।
वितायमानमृषिभिः अजनाभे महात्मनः ॥ २४ ॥
श्लोक २४ – ते एकदा या अजनाभ वर्षात महात्म्या निमीच्या, ऋषींच्या द्वारा चालू असलेल्या यज्ञात योगायोगाने जाऊन पोहोचले. (२४)

जेथें मनाचा प्रवेशु नाहीं । त्यांची पायवाट ते ठायीं ।
ऐसे स्वइच्छा विचरतां मही । आले ते पाहीं कर्मभूमीसी ॥ १९१ ॥
ज्या ठिकाणी मनाचासुद्धां प्रवेश होणें नाही, त्या ठिकाणी ते पायांनी जात. अशा प्रकारे ते इच्छागमनीं स्वेच्छेनें जगांत फिरतां फिरतां एक वेळ कर्मभूमीवर आले ९१.

मही विचरतां वितंड । पातले ‘अजनाभ’ खंड ।
तंव विदेहाचा याग प्रचंड । मीनले उदंड ऋषीश्वर ॥ १९२ ॥
आणि यदृच्छेनें पृथ्वीवरील ‘अजनाभ’ खंडाला (भारतवर्षांत) येऊन पोचले. तों तेथें जनकराजाचा यज्ञ चालू असून मोठमोठे ऋषि असंख्यात जमले होते ९२.

याग वेदोक्तविधी निका । कुंडमंडप वेदिका ।
आवो साधोनि नेटका । विधानपीठिका अतिशुद्ध ॥ १९३ ॥
तो यज्ञ वेदोक्तविधीनें यथाशास्त्र चालला होता. कुंड, मंडप, वेदिका, दिशासाधन, अनुष्ठानाची पीठिका म्हणजे यथाशास्त्र पूर्वतयारी करून सर्व कर्में पवित्र रीतीनें चालली होतीं ९३.

स्रुक्-स्रुवा-त्रिसंधानें । विस्तरूनि परिस्तरणें ।
अखंड वसुधारा दंडाप्रमाणें । ऋषिमंडणें होम करिती ॥ १९४ ॥
स्रुक्, सुवा, इत्यादि यज्ञपात्रे, ‘त्रिसंधानें’ म्हणजे तीन ठिकाणीं जोडलेली दर्भाची दोरी (शुल्बादि रज्जु) व दर्भाची परिस्तरणें पसरून ‘दंडाप्रमाणे’ म्हणजे अखंड, ‘वसुधारा’ म्हणजे तुपाची धार धरून ऋषिमंडळे होम करीत होती ९४.

होम होतां संपूर्ण । पूर्णाहुतीसमयीं जाण ।
येतां देखिले नवही जण । देदीप्यमान निजतेजें ॥ १९५ ॥
होमाची समाप्ति होऊन पूर्णाहुतीची वेळा आली तोंच हे नऊ असामी (आर्षभयोगी) तेजानें देदीप्यमान् असे येतांना दृष्टीस पडले ९५.

तान् दृष्ट्वा सूर्यसङ्काशात् महाभागवतान् नृप ।
यजमानोऽग्नयो विप्राः सर्व एवोपतस्थिरे ॥ २५ ॥
श्लोक २५- ते भगवंतांचे परम भक्त आणि सूर्याप्रमाणे तेजस्वी होते त्यांना पाहून यजमान निमी, अग्नी आणि ऋत्विज असे सर्वजणच त्यांच्या स्वागतासाठी उभे राहिले. (२५)

अमित सूर्याचिया कोटी । हारपती नखतेजांगुष्टीं ।
तो भगवंत जिंहीं धरिला पोटीं । त्यांची तेजाची गोष्टी अलोलिक ॥ १९६ ॥
ज्याच्या अंगुष्टनखाच्या तेजांत कोट्यवधि सूर्य लोपून जातात, त्या भगवंताला ज्यांनी हृदयांत सांठविला, त्यांचे तेज किती अलौकिक होते म्हणून सांगावें ? ९६.

त्यांचिया अंगप्रभा । सूर्य लोपताहे उभा ।
जिंहीं प्रभेसी आणिली शोभा । चैतन्यगाभा साकार ॥ १९७ ॥
त्यांच्या अंगकांतीपुढे सूर्यही दिपून जात असे. आपल्या अंगतेजानें प्रभेलाच शोभा आणणारे असे नऊजण साकार चैतन्याचा गाभाच होते ९७.

ते भगवद्‌भांववैभव । भगवंताचें निजगौरव ।
भक्तीचे भाग जे नव । ते हे जाण सर्व मूर्तिमंत ॥ १९८ ॥
नऊ असामी म्हणजे भगवद्‌भावाचें वैभव, भगवंताचें गौरव, किंवा नवविधा भक्तीचे मूर्तिमंत पुतळेच होते असे म्हटले तरी चालेल ९८.

नवखंड पृथ्वीचे अलंकार । नवविधीचें निजसार ।
नवरत्‍नांचेंही निजभांडार । तें हे साकार नवही जण ॥ १९९ ॥
ते नवखंड पृथ्वीचे जणूं अलंकार, नवनिधींचें निजसार, किंवा नवरत्नांचें निजभांडारच साकाररूप घेऊन आलेले, असे ते नऊ असामी होते ९९.

कीं ते नवही नारायण । स्वयें प्रगटले आपण ।
नवही नृसिंह जाण । देदीप्यमान पैं आले ॥ २०० ॥
किंवा ते नऊ नारायणच तेथे आपणहून प्रगट झाले, किंवा ते नऊ नारसिंहच तेथें देदीप्यमान रूपानें आले असे वाटलें २००.

आव्हानिले तिन्ही अग्नी । उभे ठेले त्यांतें देखोनी ।
ते हे भागवतीं देखिले नयनीं । इतरांलागुनी दिसेना ॥ २०१ ॥
तेथील यज्ञकुंडांत दक्षिणाग्नि, गार्हपत्याग्नि व आहवनीयाग्नि अशा तीन अग्नींना आवाहन केलेले होतें, ते ह्यांस पाहतांच उठून उभे राहिले. त्यांना ह्या नऊ भागवतांनीच पाहिले. इतरांना ते अग्नि दिसले नाहींत १.

येतां देखोनि तेजोमूर्ती । ऋत्विज आचार्य उभे ठाकती ।
सा‍उमा धांवे विदेहनृपती । स्वानंदवृत्ती सन्मानी ॥ २०२ ॥
अशा त्या तेजःपुंज मूर्ति पाहून ऋत्विज आणि आचार्य हे उभे राहिले. जनक राजा तर धांवतच सामोरा गेला व त्यानें स्वानंदपूर्वक त्यांचा सत्कार केला २.

सवेग घाली लोटांगण । मुगुट काढोनि आपण ।
मस्तकीं वंदूनियां चरण । पूर्णादरें जाण आणिता झाला ॥ २०३ ॥
त्यानें झटकन जाऊन त्यांच्या पायांवर लोटांगण घातले, आणि मुगुट काढून मस्तकानें चरणांस वंदन करून मोठ्या सत्कारानें त्यांस यज्ञमंडपात आणिलें ३.

विदेहस्तानभिप्रेत्य नारायणपरायणान् ।
प्रीतः सम्पूजयां चक्रे आसनस्थान्यथार्हतः ॥ २६ ॥
श्लोक २६- ते भगवंतांचे परम भक्त आहेत, असे जाणून विदेहराजाने त्यांना यथायोग्य आसनावर बसविले आणि प्रेमाने त्यांची विधिपूर्वक पूजा केली. (२६)

त्यांतें जाणोनि भगवत्पर । विदेहा आल्हाद थोर ।
त्यांचे पूजेसी अत्यादर । स्वयें सादर पैं झाला ॥ २०४ ॥
ते भगवत्पर असल्याचें जाणून जनकाला फार आल्हाद वाटला, व त्यानें स्वतः पूजन करण्याची अत्यादरानें तयारी केली ४.

श्रद्धायुक्त चरणक्षालन । धूप दीप सुमन चंदन ।
पूजा मधुपर्कविधान । केलें संपूर्ण यथायोग्य ॥ २०५ ॥
परमश्रद्धेनें त्यानें त्यांचे पाय धुतले; व धूप, दीप, गंध, पुष्पें वगैरे सर्व साहित्यासह मधुपर्कविधानानें त्यांची यथासांग पूजा केली ५.

तान् रोचमानान् स्वरुचा ब्रह्मपुत्रोपमान्नव ।
पप्रच्छ परमप्रीतः प्रश्रयावनतो नृपः ॥ २७ ॥
श्लोक २७- ते नऊही योगेश्वर आपल्या अंगकांतीने सनकादिकांसारखे तळपत होते राजाने विनम्रतेने मस्तक लववून अतिशय प्रेमाने त्यांना प्रश्न केला. (२७)

निजांगींच्या निजप्रभा । अंगासी आणिली शोभा ।
काय ब्रह्मविद्येचा गाभा । शोभे नवप्रभा शोभायमान ॥ २०६ ॥
निजांगींच्या स्वयंभू तेजानेंच त्यांच्या शरीराला शोभा आलेली होती. त्यांचा देह म्हणजे विलक्षण तेजानें शोभायमान असा ब्रह्मविद्येचा गाभाच होता ६.

निजहृदयींचें ब्रह्मज्ञान । परिपाकें प्रकाशलें पूर्ण ।
तेंचि निजांगा मंडण । इतर भूषण त्यां नाहीं ॥ २०७ ॥
त्यांच्या हृदयांतील ब्रह्मज्ञानच परिपक्व होऊन प्रकाशमान झालेले होते व तेच त्यांच्या आंगाला भूषवीत होते. इतर भूषणे त्यांना नव्हतीं ७.

मुगुट कुंडलें कंकण । मूर्खा‍अंगीं बाणलीं पूर्ण ।
ते शोभा लोपूनि मूर्खपण । बाहेर संपूर्ण प्रकाशे ॥ २०८ ॥
मुगुट, कुंडलें, सलकडीं, ही मूर्खांच्या अंगावर हवीं तितकी असली तरी, त्या अलंकारांची सारी शोभा लोपून त्याच्या अंगचा संपूर्ण मूर्खपणाच मात्र बाहेर प्रकट होतो ८.

तैसे नव्हती हे ज्ञानघन । ब्रह्मपूर्णत्वें विराजमान ।
तेंचि त्यांसी निजांगा मंडण । इतर भूषण त्यां नाहीं ॥ २०९ ॥
हे ज्ञानघन तसे नव्हते. पूर्ण ब्रह्मत्वानेंच ते शोभत होते. तेच त्यांच्या शरीराचे भूषण होते. इतर भूषण त्यांना नव्हते ९.

ब्रह्मानुभवें पूर्णत्व पूर्ण । इंद्रियद्वारा विराजमान ।
तें त्यांसी निजशांतिभूषण । मुगुट कंकण तें तुच्छ ॥ २१० ॥
ते ब्रह्मानुभवानें पूर्ण असून तो अनुभव इंद्रियांच्या द्वारेंही बाहेर पडत होता. पूर्णानुभवामुळें आलेली शांति हेच त्यांचे भूषण होते. त्यापुढे मुगुट व कंकणे ही तुच्छ होत २१०.

मागां वाखाणिले सनकादिक । त्यांसमान कीं अधिक ।
ऐसा विचारितां परिपाक । त्यां यां वेगळिक दिसेना ॥ २११ ॥
पूर्वी सनकादिकांचे वर्णन केलें आहें, त्यांच्याच बरोबरीचे हे होतें, की अधिक होते ? असे विचाराल, तर त्यांच्यामध्यें आणि ह्यांच्यामध्यें मुळीच भेद नाहीं असे समजावें ११.

त्यांची यांची एक गती । त्यांची यांची एक स्थिती ।
त्यांची यांची एक शांती । भेदु निश्चितीं असेना ॥ २१२ ॥
त्यांची ह्यांची गति एक; त्यांची ह्यांची स्थिति एक ; व त्यांची ह्यांची शांतिही एकच ; खरोखर भेद म्हणून काहींच नाहीं १२.

त्यांच्या‍ऐसे हे सखे बंधु । त्यांच्या‍ऐसा समान बोधु ।
त्यांच्या‍ऐसा हा अनुवादु । सर्वथा भेदु असेना ॥ २१३ ॥
त्यांच्यासारखेच हेही सखे बंधु होते; त्यांच्यासारखाच बोध ह्यांचाही होता; सर्व चाल, रीत, वागणूक त्यांच्यासारखीच ; भेद म्हणून कांहींच नाहीं १३.

ते चौघे हे नवजण । अवघ्यां एकचि ब्रह्मज्ञान ।
त्यांची यांची शांती समान । हें विदेहासी पूर्ण कळूं सरले ॥ २१४ ॥
ते चौघे व हे नऊ असामी, पण सर्वांचे ब्रह्मज्ञान सारखेंच ; त्यांची आणि ह्यांची शांति अगदी सारखी; हे जनक राजाला पूर्णपणे कळून चुकले १४.

ऐसें परिपूर्णत्व जाणोनी । राजा सुखावे स्थिति देखोनी ।
मग अतिविनीत हो‍ऊनी । मृदु मंजुळ वचनीं विनवीत ॥ २१५ ॥
अशी त्यांची ती परिपूर्ण स्थिति पाहून राजाला फार संतोष झाला व नंतर त्यानें अत्यंत नम्र होऊन मृदु-मंजुळ वाणीनें त्यांस विनंती केली १५.

श्रीविदेह उवाच –
मन्ये भगवतः साक्षात् पार्षदान् वो मधुद्विषः ।
विष्णोर्भूतानि लोकानां पावनाय चरन्ति हि ॥ २८ ॥
श्लोक २८- विदेहराजा म्हणाला – मी तर असे समजतो की, आपण सर्वजण मधुसूदन भगवंतांचे पार्षदच आहात कारण भगवंतांचे भक्त लोकांना पवित्र करण्यासाठी सर्वत्र फिरत असतात. (२८)

सार्वभौम चक्रवर्ती । देहीं असोनि विदेहस्थिती ।
तो जनकु आर्षभांप्रती । अतिप्रीतीं विनवितु ॥ २१६ ॥
सार्वभौम चक्रवर्ती व देहांत असून विदेह स्थिति, असा जो जनक राजा, तो त्या ऋषभपुत्रांना अतिप्रेमानें विनंती करिता झाला १६.

त्यांच्या भेटीसवें उलथलें सुख । विदेहासी देहेंवीण हरिख ।
तेणें हरिखेंकरूनियां देख । प्रीतीपूर्वक विनवितु ॥ २१७ ॥
त्यांच्या भेटीबरोबर जनकाला आनंद उचंबळून आला. त्या विदेहाला देहावांचून संतोष झाला, व त्या सुखसंतोषाच्या भरांत त्यानें त्यांस प्रेमपूर्वक विनंती केली १७.

तुमचें सामर्थ्य पाहतां येथ । तुम्हीं ईश्वररूप समस्त ।
देहभावें तरी भगवद्‌भक्त । जैसे पार्षद हरीचे ॥ २१८ ॥
तो म्हणाला- येथे तुमचे सामर्थ्य पाहिले तर, तुम्ही सारे ईश्वररूपच आहांत. देहभावानें पाहिले तर भगवंताचे भक्त आहांत, जणू श्रीहरीचे पार्षद (प्रभावळींतील सेवक.) १८.

देवो आपुला आपण भक्तु । ऐसा जो कां उपनिषदर्थु ।
तो साच करूनि वेदार्थु । निजपरमार्थु अनुभवा ॥ २१९ ॥
देव हा आपलाच आपण भक्त आहे असा जो उपनिषदांतील ध्वनितार्थ, तो तुमच्या ठिकाणी खरेपणानें अनुभवास येत आहे १९.

‘शिव हो‍ऊनि शिवु यजिजे’ । हें लक्षण तुम्हांसीच साजे ।
येरीं हे बोलचि बोलिजे । परी बोलते वोजें अर्थ न लभे ॥ २२० ॥
‘शिव होऊनच शिवाची पूजा करावी’ (‘शिवो भूत्वा शिवं यजेत्’) हे उपनिषदरहस्यलक्षण तुमच्याच ठिकाणीं शोभत आहे. इतरांनी ह्या गोष्टी तोंडानें बोलाव्यात मात्र. परंतु त्या बोलण्यात अर्थ दिसून येत नाहीं २२०.

विष्णुनें सृष्टीं जें जें स्रजणें । तें तें तुम्हीं पवित्र करणे ।
मही विचरायाचीं कारणें । कृपाळूपणे दीनोद्धारा ॥ २२१ ॥
श्रीविष्णु सृष्टीमध्यें जें जें म्हणून उत्पन्न करतो, तें तें पवित्र करण्यासाठी, केवळ दीन जनांचा उद्धार करावा म्हणूनच कृपाळूपणानें तुम्ही पृथ्वीवर संचार करीत असतां २१.

तुम्ही विचरा विश्वकणवा । परी भेटी होय प्राप्ति तेव्हां ।
आजि लाधलों तुमची सेवा । उद्‌भट दैवाथिलों मी ॥ २२२ ॥
तुम्ही जगाच्या कल्याणासाठींच फिरत असतां, परंतु भाग्य उदयाला येते तेव्हांच तुमची भेट होते. आज तुमची सेवा मला लाभली त्या अर्थी खरोखरच मी मोठा भाग्यवान होय २२.

आजि माझें धन्य दैव । आजि माझे धन्य वैभव ।
आजि धन्य मी सर्वीं सर्व । हें चरण अपूर्व पावलों ॥ २२३ ॥
धन्य माझे भाग्य व धन्य माझें वैभव. आज आपल्या अपूर्व चरणांचा लाभ झाल्यानें मी सर्वतोपरी धन्यच झालो आहे २३.

दुर्लभो मानुषो देहो देहिनां क्षणभङ्गुरः ।
तत्रापि दुर्लभं मन्ये वैकुण्ठप्रियदर्शनम् ॥ २९ ॥
श्लोक २९- जीवांना मनुष्यशरीर प्राप्त होणे, हे अतिशय कठीण शिवाय ते क्षणभंगुर अशा या देहात भगवंतांच्या भक्तजनांचे दर्शन आणखीच दुर्लभ आहे. (२९)

सकल देहांमाजीं पहा हो । अतिदुर्लभ मनुष्यदेहो ।
त्याचिया प्राप्तीचा संभवो । तो अभिप्रावो अतिदुर्गम ॥ २२४ ॥
अहो ! सर्व देहांमध्यें नरदेह हा अत्यंत दुर्लभ आहे. तो प्राप्त होणे म्हणजे महत्कर्म कठीण ! २४.

सुकृतदुष्कृत समान समीं । तैं पाविजे कर्मभूमी ।
तेंचि जैं पडे विषमीं । तैं स्वर्गगामी कां नरकीं ॥ २२५ ॥
पुण्य आणि पाप समसमान व्हावें तेव्हांच ही कर्मभूमि म्हणजे नरदेह प्राप्त होत असतो. पुण्य-पापांत कांहीं कमीजास्त झाले, तर स्वर्गास जातो किंवा नरकांत पडतो २५.

समानकर्मीं नरदेह जोडे । तरी समस्तां समबुद्धि न घडे ।
त्यां समांमाजीं विषम गाढें । जेणें पडे तें ऐका ॥ २२६ ॥
कर्म समान झाले म्हणजे नरदेह प्राप्त होतो; तरी सर्वांची बुद्धि कांहीं सारखी असत नाही. त्या साम्यामध्यें जेणेकरून गाढ असें वैषम्य पडतें तें सांगतों ऐक २६.

पापाचा एकु महाचिरा । पुण्यें जोखणीं चाराचुरा ।
समान आलिया तुळाभारा । येणें जन्में नरा दृढ पापबुद्धी ॥ २२७ ॥
पापाचा एक भला मोठा चिरा घेऊन तो एका बाजूला घातला, आणि त्याच्या बरोबरीला पुण्याचा चाराचुरा घालून जोखूं लागलें; आणि ती दोन्ही तोलामध्यें सारखीं भरलीं, तर त्या जन्मीं तशा मनुष्याला नेहमीं पापबुद्धिच होत असते २७.

वाळू आणि सुवर्ण । जोखितां झाल्याही समान ।
सोनियालागीं वेंचिती धन । वाळू ते जाण न घेती फुकट ॥ २२८ ॥
ज्याप्रमाणें वाळू आणि सोनें जोखतांना सारखें भरले, तरी त्या सोन्याकरितां द्रव्य खर्च करतात, पण वाळू कोणी फुकटसुद्धा घेत नाहीं २८,

एकाचें पुण्य अत्यंत थोर । पाप लहानसहान एकत्र ।
करूनि जोखितां तुळाभार । समान साचार जैं होय ॥ २२९ ॥
त्याचप्रमाणें एकाचे पुण्यच फार मोठे असते, आणि लहान लहान पापें एकत्र करून ती त्याच्या तुलनेला घातलेली असतात. आणि ती बरोबर होतात २९.

ऐसेनि कर्में जे जन्मती । त्यांसी पुण्यावरी अतिप्रीती ।
पुण्य पाप दोनी झडती । तैं नित्यमुक्ति पाविजे ॥ २३० ॥
अशा कर्मानें जे जन्मास येतात, त्यांची पुण्यावरच फार प्रीति असते. पुण्य आणि पाप ही दोन्ही जेव्हां साफ नाहींशी होतात, तेव्हांच नित्यमुक्ति मिळत असते २३०.

ऐशा अतिसूक्ष्म संकटीं । मनुष्यदेहीं होय भेटी ।
तेथेंही अभिमान अति उठी । धन दारा दिठी विषयांच्या ॥ २३१ ॥
अशा मोठ्या संकटानें मनुष्यदेहाची भेट होत असते. पण तेथे कनक-कांतारूप विषयाचा अतिशय अभिमान उत्पन्न होतो ३१.

मनुष्यदेहींचेनि आयुष्यें । विषयीं सायास करिती कैसे ।
अमृत दे‍ऊनि घे जैसें । तान्हें सावकाशें मृगजळ ॥ २३२ ॥
तहानेसाठीं ज्याप्रमाणें अमृत देऊन मृगजळ घ्यावे, त्याप्रमाणें मनुष्यदेहाच्या अमोल आयुष्यामध्यें विषयासाठीं यातायात करीत असतात ! ३२.

गंधर्वनगरींचीं ठाणीं । घेतलीं दे‍ऊनि चिंतामणी ।
तैशी लटिकियालागीं आटणी । विषयसाधनीं नरदेहा ॥ २३३ ॥
चिंतामणि देऊन गंधर्वनगर म्हणजे आकाशांतील ढगांच्या आकृति घ्याव्यात, त्याप्रमाणें लटक्या अशा विषयसाधनासाठीं नरदेहाचे मातेरे करून घेतात ३३.

तोडूनि कल्पतरूंचे उद्यान । सायासीं तें वाहोनि रान ।
तेथें साक्षेपें पेरिली जाण । आणूनि आपण विजया जैशीं ॥ २३४ ॥
तैसें नरदेहा ये‍ऊनि नरां । करिती आयुष्याचा मातेरा ।
पूर्ण व्यवसायो शिश्नोदरां । उपहास निद्रा कां निंदा ॥ २३५ ॥
कल्पतरूची बाग तोडून टाकावीं व तें रान म्हणून दूर फेंकून द्यावे, आणि त्या जागी जशी मोठ्या अगत्यानें भांग आणून लावावी; त्याप्रमाणें जीव नरदेहाला येऊन आयुष्याचे मातेरे करून सोडतात. शिश्नोदरासाठी सारा दिवस उद्योग; नाहीं तर उपहास, टवाळकी, निंदा किंवा झोंप ! ३४-३५.

नित्य प्रपंचाची कटकट । सदा विषयांची खटपट ।
कदा आरायिल्या चोखट । स्वेच्छा सारीपाट खेळणें ॥ २३६ ॥
दररोज प्रपंचाची कटकट; विषयांची खटपट; तशांत वेळ मिळालाच तर यथेच्छ सोंगट्यांचा डाव खेळावयाचा ! ३६.

नाना विनोद टवाळी । नित्य विषयांची वाचाळी ।
त्यासी जपतां रामनामावळी । पडे दांतखिळी असंभाव्य ॥ २३७ ॥
तर्‍हेतर्‍हेच्या थट्टामस्क‍र्‍या; विषयांचीच नेहमी बडबड; अशांना रामनामावळी जपावयाची म्हटले की, दांतखिळी बसलीच ! ३७.

घरा आली कामधेनु । दवडिती न पोसवे म्हणूनु ।
तेवीं श्रीरामनाम नुच्चारूनु । नाडला जनु नरदेहीं ॥ २३८ ॥
कामधेनु घरी आली असतां पोसवत नाहीं म्हणून तिला हांकून द्यावी, त्याप्रमाणें श्रीरामनामाचा जप न केल्यामुळें जीव नरदेहांत येऊन फुकट गेले ! ३८.

करितां नरदेहीं अहंकार । तंव तो देहचि क्षणभंगुर ।
देहीं देहवंता भाग्य थोर । जैं भगवत्पर भेटती ॥ २३९ ॥
ह्या नरदेहाचा अहंकार धरून रहावें, तर तो मूळचाच क्षणभंगुर ; येथे भगवंताशी एकरूप झालेले भक्त भेटणें हेंच मोठे भाग्य होय ३९.

ज्यांसी भगवद्‌भक्तीची अति गोडी । त्यांवरी भगवंताची आवडी ।
त्यांची भेटी तैं होय रोकडी । जैं पुण्याच्या कोडी तिष्ठती ॥ २४० ॥
ज्यांना भगवद्‌भक्तीची अत्यंत गोडी असतें, त्यांच्यावर भगवंताचेही अत्यंत प्रेम असते. तशा भगवद्‌भक्तांची प्रत्यक्ष भेट तेव्हांच होते की, जेव्हां कोटि पुण्यें उभी राहतात २४०.

ज्यांचिया आवडीच्या लोभा । भगवंतु पालटें आला गर्भा ।
दशावतारांची शोभा जाहली । पद्मनाभा ज्यांचेनि ॥ २४१ ॥
ज्याच्या प्रेमाच्या लोभामुळेच भगवंत आपले निजनिर्गुणरूप पालटून जन्म घेता झाला, ज्यांच्या लोभामुळेच त्या पद्मनाभाला दशावतारांची शोभा प्राप्त झाली ४१,

ऐसे कृष्णकृपासमारंभे । जे भगवंताचे वालभे ।
त्यांची भेटी तैंचि लाभे । जैं भाग्यें सुलभें पैं होती ॥ २४२ ॥
असे जे कृष्णकृपाबळानेंच त्याचे अत्यंत आवडते झाले, तशांची भेट, भाग्य उदयाला येतात तेव्हांच होत असते ४२.

निष्कामता निजदृष्टी । अनन्त पुण्यकोट्यनुकोटी ।
रोकड्या लाभती पाठोवाठीं । तैं होय भेटी हरिप्रियांची ॥ २४३ ॥
अंगामध्यें निरिच्छता, आत्मस्वरूपामध्यें दृष्टि, व कोट्यनुकोटी पुण्यें लागोपाठ उभी राहतात, तेव्हांच हरिप्रियांची भेट होते ४३.

व्याघ्रसिंहांचे दूध जोडे । चंद्रामृतही हाता चढे ।
परी हरिप्रियांची भेटी नातुडे । दुर्लभ भाग्य गाढें मनुष्यां ॥ २४४ ॥
वाघाचे व सिंहाचेही दूध मिळेल, चंद्रामृतही हातीं येईल, पण हरिप्रियांची भेट मात्र होणार नाहीं. त्याला मोठे दुर्लभ भाग्यच लागतें ४४.

व्याघ्रसिंहदुधासाठी । अतिसबळता जोडे पुष्टी ।
परी जन्ममरणांची तुटी । दुधासाठीं कदा नव्हे ॥ २४५ ॥
वाघाच्या अणि सिंहाच्या दुधानें मनुष्य अतिशय प्रबळ व पुष्ट होईल, पण त्या दुधापासून काही जन्ममरण चुकणार नाहीं ४५.

म्हणती चंद्रामृत जो आरोगी । तो होय नित्य निरोगी ।
मुख्य चंद्रचि क्षयरोगी । त्याचें अमृत निरोगी करी केवीं ॥ २४६ ॥
चंद्रामृत जो पितो, तो नित्य निरोगी होतो असे म्हणतात, पण चंद्र हाच मूळचा क्षयरोगी आहे, त्याचे अमृत दुसर्‍याला निरोगी कसे करणार ? ४६.

व्याघ्रसिंहदुग्धाचे शक्तीं । प्राणी जैं अजरामर होती ।
तैं तेणें दुग्धें जयांची उत्पत्ती । ते कां मरती व्याघ्रसिंह ॥ २४७ ॥
वाघाच्या आणि सिंहाच्या दुधानें प्राणी जर अजरामर झाले असतें, त्याच दुधापासून ज्यांची उत्पत्ति ते वाघ आणि सिंह कां मरते ? ४७.

जैं हरिभक्तांची भेटी घडे । तैं न बाधी संसारसांकडें ।
जन्ममरण समूळीं उडे । त्यांची भेटी आतुडे अतिभाग्यें ॥ २४८ ॥
पण हरिभक्तांची भेट जेव्हां होते, तेव्हां संसाराचे संकट बाधत नाही. जन्ममरण समूळ नाहीसे होते. तात्पर्य, त्यांची भेट होण्याला अत्यंत भाग्य पाहिजे. ४८.

आजि मी भाग्यें सभाग्य पूर्ण । लाधलों तुमचें दर्शन ।
तरी “आत्यंतिक क्षेम” कोण । तें कृपा करून मज सांगा ॥ २४९ ॥
आज ते सर्व भाग्य माझ्या वाट्यास आले आहे. कारण मला तुमचे दर्शन घडले. तरी ‘आत्यंतिक क्षेम’ म्हणजे काय ते मला कृपा करून सांगावें ४९.

अत आत्यन्तिकं क्षेमं पृच्छामो भवतोऽनघाः ।
संसारेऽस्मिन्क्षणार्धोऽपि सत्सङ्गः शेवधिर्नृणाम् ॥ ३० ॥
श्लोक ३०- म्हणून हे त्रिलोकपावन महात्म्यांनो ! आम्ही आपणास आमच्या परम कल्याणासंबंधी विचारीत आहोत कारण या जगात अर्धा क्षण झालेला सत्संगसुद्धा मनुष्याचा फार मोठा ठेवा आहे. (३०)

म्हणों तुम्ही निष्पाप निर्मळ । तंव तुमचेनि दर्शनें तत्काळ ।
नासती सकळ कलिमळ । ऐसे निजनिर्मळ तुम्ही सर्व ॥ २५० ॥
तुम्हांला निष्पाप व निर्मळ म्हणावें, तर तुमच्या दर्शनानें सर्व कलिमळ तत्काळ नाश पावतात. असे तुम्ही सर्व जात्याच अत्यंत पवित्र व पावन आहां २५०.

स्नान केलिया गंगा । पवित्र करी सकळ जगा ।
ते गंगाही निजपापभंगा । तुमचे चरणसंगा वांछीत ॥ २५१ ॥
स्नान केले कीं, गंगा सर्व जगाला पवित्र करून सोडते, पण ती गंगाही स्वतःचें पातक नष्ट होण्यासाठी तुमच्या चरणसंगाची इच्छा करते ५१.

तुमची दर्शनसंग-चिद्‌गंगा । अत्यंत दाटुगी माजीं जगा ।
दर्शनमात्रें ने भव भंगा । जन्ममरण पैं गा मग कैंचे ॥ २५२ ॥
तुमच्या दर्शनाचा लाभ, हीच चित्स्वरूप गंगा होय. ती जगामध्यें अत्यंत समर्थ आहे. केवळ दर्शनानेंच भव म्हणजे संसार नाहींसा करून टाकते. मग जन्ममरण कुठलें ? ५२.

तेथें कायसा गंगेचा पडिपाडु । नाहीं तीर्थमहिमेसी पवाडु ।
तीर्थां भवदोष अवघडु । त्यांचा करी निवाडु दृष्टिसंगें ॥ २५३ ॥
ह्या तुमच्या दर्शनापुढे गंगेचा काय पाड ? तीर्थाच्या महिम्याची त्याच्यापुढे प्रतिष्ठा नाहीं. तीर्थाच्यानें संसार दूर करणे अशक्य आहे. त्याचा नाश तुमच्या दृष्टिसंगानेंच होतो ५३,

ऐशी पवित्रता प्रबळ । दृष्टि‍उत्संगी वाढवा सकळ ।
आजि झालों मी अतिनिर्मळ । तुम्हीं दीनदयाळ मीनलेति ॥ २५४ ॥
अशी अत्यंत पवित्रता आपण आपल्या कृपादृष्टीनेंच वाढविता. मी तर आज अत्यंत पवित्र झालो. कारण, तुम्ही दीनदयाळ मला भेटलांत ५४.

ऐसे पवित्र आणि कृपामूर्ति । भाग्यें लाधलो हे संगती ।
सत्संगाची निजख्याती । सांगता श्रुति मौनावल्या ॥ २५५ ॥
अशा पवित्र आणि कृपामूर्तीची संगति मला आज भाग्यानेंच प्राप्त झाली आहे. सत्संगतीचें माहात्म्य वर्णन करतांना श्रुतिसुद्धां मौनावतात ५५.

ब्रह्म निर्धर्म नेणे निजधर्मा । साधुमुखें ब्रह्मत्व ये ब्रह्मा ।
त्या सत्संगाचा महिमा । अतिगरिमा निरुपम ॥ २५६ ॥
ब्रह्म हें स्वतः निर्धर्म आहे, त्याला आपला धर्म काय आहे तें कळत नाहीं, साधूंच्या मुखानेंच ब्रह्माला ब्रह्मत्व येते. त्या सत्संगतीचा महिमा फारच थोर व निरुपम होय ५६.

सत्संग म्हणों निधीसमान । निधि जोडल्या हारपे जाण ।
सत्संगाचें महिमान । साधकां संपूर्ण सद्‌रूप करी ॥ २५७ ॥
सत्संगाला द्रव्याच्या ठेव्यासमान म्हटले, तर ठेवा सांपडलेला हरवतो, पण सत्संगाचा महिमा असा आहे की, तो साधकांना नखशिखान्त सद्‌रूपच करून सोडतो ५७.

निधि सांपडलिया साङ्ग । अत्यंत वाढे विषयभोग ।
तैसा नव्हे जी सत्संग । निर्विषयें चांग सुखदाता ॥ २५८ ॥
चांगलासा ठेवा सांपडला, तर त्यामुळें विषयभोग वाढतो. पण महाराज ! सत्संग मात्र तसा नव्हे. तो निर्विषय-निरतिशय सुख देणारा आहे ५८.

इंद्रियांवीण स्वानंदु । विषयांवीण परमानंदु ।
ऐसा करिती निजबोधु । अगाध साधुनिजमहिमा ॥ २५९ ॥
इंद्रियांशिवाय स्वानंद आणि विषयाशिवाय परमानंद प्राप्त होईल, असाच ते बोध करतात. म्हणून साधूंचा महिमा अगाध आहे ५९.

निमिषार्ध होता सत्संग । तेणें संगें होय भवभंग ।
यालागीं सत्संगाचें भाग्य । साधक सभाग्य जाणती ॥ २६० ॥
सत्संग अर्धनिमिष जरी झाला, तरी त्यायोगें संसाराचा भंग होऊन जातो. ह्याकरितां सत्संगतीचे भाग्य, भाग्यवान् साधक आहेत तेच जाणतात २६०.

संतचरणीं ज्यांचा भावो । भावें तुष्टती संत स्वयमेवो ।
संतसन्निधिमात्रें पहावो । संसार वावो स्वयें होय ॥ २६१ ॥
संतचरणांच्या ठिकाणीं ज्यांचा भाव आहे, त्यांच्यावर त्या भावामुळेंच संत आपणहून संतुष्ट होतात. अहो ! संतांच्या केवळ सान्निध्यानेंच संसार आपोआप वायफळ होऊन जातो ६१.

नाना विकार विषयविधी । संसारु सबळत्वें बाधी ।
त्या संसाराची अवधी । जाण त्रिशुद्धी सत्संग ॥ २६२ ॥
नानाप्रकारचे विकार, विषयांचा पसारा, इत्यादिकांच्या योगें संसार हा तीव्रत्वानें बाधतो. त्या संसाराचा नाश करावयाला सत्संग हाच एक रामबाण उपाय आहे ६२.

दीपाचिये संगप्राप्ती । निःशेष कापुरत्वाची शांती ।
तेवीं झालिया सत्संगती । संसारनिवृत्ति क्षणार्धें ॥ २६३ ॥
दीपाची संगत प्राप्त झाली की कापुराचें कापुरपणच नाहीसें होतें; त्याप्रमाणें सत्संगति प्राप्त झाली असतां एका क्षणार्धामध्यें संसाराची म्हणजे जन्ममरणपरंपरेची, व देहात्मबुद्धीची निवृत्ति होतें ६३.

ते तुमची सत्संगती । भाग्यें पावलों अवचितीं ।
“आत्यंतिक क्षेम” कैशा रितीं । प्राणी पावती तें सांगा ॥ २६४ ॥
ती तुमची संगति आज सुदैवानें मला अकस्मात् मिळाली आहे, तर आतां प्राणी ‘आत्यंतिक क्षेम’ म्हणजे शाश्वत कल्याण कशानें पावतील ते सांगावें ६४.

आत्यंतिक क्षेमाचें वर्णन । जरी म्हणाल भागवतधर्म ।
त्या धर्माचा अनुक्रम । साङ्ग सुगम सांगा जी ॥ २६५ ॥
भागवतधर्मच आत्यंतिक क्षेमाचें वर्म आहे असे आपण म्हणाल, तर महाराज ! त्या धर्माचा अनुक्रम सुगम करून मला सांगावा ६५.

धर्मान्भागवतान्ब्रूत यदि नः श्रुतये क्षमम् ।
यैः प्रसन्नः प्रपन्नाय दास्यत्यात्मानमप्यजः ॥ ३१ ॥
श्लोक ३१- आम्ही ऐकण्याचे अधिकारी असलो, तर आपण आम्हांला भागवतधर्माचा उपदेश करावा कारण त्यामुळे प्रसन्न झाले असता भगवान शरणागत भक्तांना स्वतःलासुद्धा देऊन टाकतात. (३१)

परिसावया भागवतधर्मीं । श्रवणाधिकारी असों जरी आम्ही ।
तरी कृपा करूनि तुम्हीं । सांगावे स्वामी सकळ धर्म ॥ २६६ ॥
भागवतधर्म ऐकण्याइतका जर आमचा अधिकार असेल, तर महाराज ! आपण आम्हांला ते सर्व भागवतधर्म सांगावे ६६.

नवल या धर्मांची ख्याती । सप्रेम आदरितां प्रिती ।
तेणें तुष्टोनियां श्रीपती । दे सेवकां हातीं आपणिया ॥ २६७ ॥
ह्या भागवतधर्माची ख्याति काही विलक्षण आहे. हे जर प्रेमानें स्वीकारले, तर तेणेम्करून श्रीपति संतुष्ट होऊन आपण सेवकांच्या स्वाधीन होतो ६७.

“अजन्मा” या नामाची ख्याती । वेदशास्त्रीं मिरवी श्रीपती ।
तो भागवतधर्माचिया प्रीती । सोशी जन्मपंक्ती भक्तांचिया ॥ २६८ ॥
आपण ‘अजन्मा’ अशी ख्याति श्रीकृष्ण वेदशास्त्रांमध्यें मिरवितात; पण तोच भगवंत भागवतधर्माच्या प्रेमाकरितां भक्तांचे अनेक जन्म सोसतो ! ६८.

एवं भागवतधर्मी जाण । जो कोणी अनन्य शरण ।
त्यासी तुष्टोनियां नारायण । निजात्मता पूर्ण स्वयें देतु ॥ २६९ ॥
अशा ह्या भागवतधर्माला जो कोणी अनन्यभावानें शरण जातो, त्याला नारायण प्रसन्न होऊन आपले सर्वस्व अर्पण करतो ६९.

जी भागवतधर्मश्रवणार्थ । मज अधिकारु जरी नसेल येथ ।
तरी मी अनन्य शरणागत । आणि तुम्ही समस्त कृपाळू ॥ २७० ॥
आतां, भागवतधर्म श्रवण करण्याइतका जर माझा अधिकार नसेल, तर खरोखर मी तुम्हांला अनन्य भावानें शरण आलो आहे आणि तुम्ही सर्वजण कृपाळू आहां २७०.

भूतदयेचें निडारलेपण । तुमच्या ठायीं वोसंडे पूर्ण ।
तुम्ही दयानिधि संपूर्ण । दीनोद्धरण तुमचेनी ॥ २७१ ॥
आपल्या ठिकाणी भूतदया तर परिपक्क होऊन राहिलेली आहे, तुम्ही दयेचे सागर आहां; तुमच्या योगानें दीनांचा उद्धार होतो ७१..

जेथ तुमची कृपा पूर्ण । तेथ न राहे जन्ममरण ।
सर्वाधिकार संपूर्ण । सहज आपण वोळंगे ॥ २७२ ॥
जेथे तुमची पूर्ण कृपा असते, तेथे जन्ममरण नांवालासुद्धां उरत नाहीं; सर्व प्रकारचे अधिकार सहजच प्राप्त होतात, ७२.

तंव तुमचे कृपेपरतें । आन सामर्थ्य नाहीं येथें ।
ऐसें जाणोनियां निश्चितें । शरण तुम्हांतें मी आलों ॥ २७३ ॥
अर्थात् तुमच्या कृपेपरतें दुसरे सामर्थ्यच नाही. असें निश्चयानें जाणून मी तुम्हांला शरण आलो आहे ७३.

कायसी ज्ञातेपणाची लाज । येथें तुमचे कृपें माझें काज ।
ऐसें विदेहें प्रार्थूनि द्विज । चरणरज वंदिलें ॥ २७४ ॥
ज्ञातेपणाची लाज काय कामाची ? कारण येथें तुमच्या कृपेनेंच माझें कार्य होणार आहे. अशी जनकराजानें प्रार्थना करून त्या ब्राह्मणांचे चरणरज मस्तकीं धरलें ७४.

ऐकोनि विदेहाचा नम्र प्रश्न । संतोषले नवही जण ।
तेंचि श्रीमुखें नारद आपण । करी निरूपण वसुदेवा ॥ २७५ ॥
जनकराजाचा हा नम्र प्रश्न ऐकून ते नऊ असामीही संतुष्ट झाले. तीच गोष्ट नारद स्वमुखानें वसुदेवाला निरूपण करीत आहे. ७५

श्रीनारद उवाच –
एवं ते निमिना पृष्टा वसुदेव महत्तमाः ।
प्रतिपूज्याब्रुवन्प्रीत्या ससदस्यर्त्विजं नृपम् ॥ ३२ ॥
श्लोक ३२- नारद म्हणाले हे वसुदेवा ! निमीने जेव्हा त्या महात्म्यांना हा प्रश्न विचारला, तेव्हा त्यांनी अतिशय प्रेमाने त्या प्रश्नाचा सन्मान केला आणि सदस्य व ऋत्विजांच्या बरोबर बसलेल्या राजा निमीला ते म्हणाले – (३२)

जो जगाचि स्थिती गति जाणता । जो हरिहरांचा पढियंता ।
जो निजात्मज्ञानें पुरता । तो झाला बोलता नारदु ॥ २७६ ॥
जो जगाची स्थिति व गति जाणणारा, जो हरिहरांचा लाडका, जो निजात्मज्ञानानें परिपूर्ण, तो नारद वसुदेवास म्हणाला ७६,

नारद म्हणे वसुदेवा । विदेहें प्रश्न केला बरवा ।
तेणें परमानंदु तेव्हां । त्या महानुभावां उलथला ॥ २७७ ॥
वसुदेवा ! जनकराजानें ह्याप्रमाणें मार्मिक प्रश्न केला असता त्या महानुभावांना अत्यंत संतोष झाला ७७.

संतोषोनि नवही मूर्ती । धन्य धन्य विदेहा म्हणती ।
ऋत्विजही सादर परमार्थीं । सदस्य श्रवणार्थीं अतितत्पर ॥ २७८ ॥
ते नऊ असामीही संतुष्ट होऊन जनकराजाला धन्य धन्य म्हणाले. यज्ञांतील ऋत्विजांना व सभासदांना परमार्थश्रवणासाठी अत्यंत उत्सुकता लागून राहिली ७८.

ऐसें दे‍ऊनि अनुमोदन । बोलते जाहले नवही जण ।
तेचि कथेचें निजलक्षण । नव प्रश्न विदेहाचे ॥ २७९ ॥
त्यांनाहीं योग्य अनुमोदन देऊन त्या नऊ असामींनी बोलण्यास प्रारंभ केला. जनकाचे नऊ प्रश्न हा ह्या कथेचा प्रधान विषय होय ७९.

भागवतधर्म भगवद्‌भक्त । माया कैसी असे नांदत ।
तिचा तरणोपाव येथ । केवीं पावत अज्ञानी ॥ २८० ॥
‘भागवतधर्म’ कसा ? ‘भगवद्‌भक्त’ कसे असतात ? ‘माया’ कशी खेळ करते ? तिच्यांतून अज्ञ जनांचा ‘तरणोपाय’ कसा होतो ? २८०.

येथ कैचें असे परब्रह्म । कासया नांव म्हणिजे कर्म ।
अवतारचरित्रसंख्या परम । अभक्तां अधमगति कैशी ॥ २८१ ॥
तसेंच ‘परब्रह्म’ कसे आहे ! ‘कर्म’ हे नांव कशाला लागते ? ‘अवतारचरित्र’ संख्या किती ? ‘अभक्तांना अधोगति’ कां प्राप्त होते ? ८१.

कोणे युगीं कैसा धर्म । सांगावा जी उत्तमोत्तम ।
ऐसे नव प्रश्न परम । जनक सवर्म पुसेल ॥ २८२ ॥
व ‘कोणत्या युगांत कोणता धर्म ?’ हे उत्तम प्रकारें निरूपण करावे. असे मोठे मार्मिक नऊ प्रश्न जनकराजानें विचारले ८२.

ऐसे विदेहाचे प्रश्न । अनुक्रमें नवही जण ।
उत्तर देती आपण । तयांत प्रथम प्रश्न कवि सांगे ॥ २८३ ॥
याप्रमाणें जनकाचे नऊ प्रश्न होते; त्यांची नऊही असामींनी अनुक्रमानेंच उत्तरे दिली. त्यांतला पहिला प्रश्न कवि हा सांगू लागला ८३.

श्रीकविरुवाच –
मन्येऽकुतश्चिद् भयमच्युतस्य
पादाम्बुजोपासनमत्र नित्यम् ।
उद्विग्नबुद्धेरसदात्मभावात्
विश्वात्मना यत्र निवर्तते भीः ॥ ३३ ॥
श्लोक ३३- कवी म्हणाला राजन ! भगवंतांच्या चरणांची नित्य उपासनाच या जगात सर्व प्रकारचे भय नाहीसे करणारी आहे, असे माझे निश्चित मत आहे नश्वर पदार्थांविषयी अहंता व ममता उत्पन्न झाल्यामुळे ज्यांचे चित्त उद्विग्न झालेले असते, त्यांना वाटणारी भीती या उपासनेने संपूर्णपणे नाहीशी होते. (३३)

रायें पुशिलें “आत्यन्तिक क्षेम” । तदर्थीं कवि ज्ञाता परम ।
तो आत्यंतिक क्षेमाचें वर्म । भागवतधर्म प्रतिपादी ॥ २८४ ॥
राजानें ‘आत्यंतिक क्षेम’ म्हणजे अत्यंत कल्याण कशात आहे असे विचारले. त्या विषयांत कवि परमज्ञाताच होता. त्यानें आत्यंतिक क्षेमाचे वर्म म्हणजे ‘भागवतधर्म’ याचे प्रतिपादन करण्यास आरंभ केला ८४.

ऐक राया नवलपरी । आपुला संकल्प आपणा वैरी ।
देहबुद्धी वाढवूनि शरीरीं अतिदृढ करी भवभया ॥ २८५ ॥
तो म्हणाला, राजा ! एक चमत्कार लक्षात ठेव. आपलाच संकल्प आपणास वैरी आहे. तोच शरीरामध्यें देहबुद्धि (साडेतीन हात देह तोच ‘मी’ अशी भावना) वाढवून संसाराचे भय अधिकाधिक दृढ करीत असतो ८५.

जयापाशीं देहबुद्धी । त्यासी सुख नाहीं त्रिशुद्धी ।
ते बुडाले द्वंद्वसंधीं । आधिव्याधिमहार्णवीं ॥ २८६ ॥
ज्याच्यापाशी देहबुद्धि असते, त्याला सुख म्हणून नाहींच नाही. असे लोक सुख-दुःख, शीत-उष्ण इत्यादि द्वंद्वांच्या संधींमध्यें आणि आधिव्याधींच्या महासागरांत बुडून जातात ८६.

जे देहबुद्धीपाशीं । सकळ दुःखांचिया राशी ।
महाभयाचीं भूतें चौपाशीं । अहर्निशीं झोंबती ॥ २८७ ॥
कारण, देहबुद्धीपाशी दुःखांच्या राशी ह्या ठेवलेल्या. रात्रंदिवस चारीही बाजूंनी महाभयांची भूतें त्याला झोंबत असतात ८७.

देहबुद्धीचिया नरा । थोर चिंतेचा अडदरा ।
संकल्पविकल्पांचा मारा । ममताद्वारा अनिवार ॥ २८८ ॥
‘देहच मी’ मानणाऱ्या मानवाला चिंतेचे मोठे भय असते. त्याच्यावर ममतेच्या द्वारा संकल्पविकल्पांचा मारा सारखा सुरू असतो ८८.

देहबुद्धीमाजीं सुख । अणुमात्र नाहीं देख ।
सुख मानिती ते महामूर्ख । दुःखजनक देहबुद्धी ॥ २८९ ॥
देहबुद्धीमध्यें अणुरेणूइतकेंसुद्धा सुख नाही. असे असतांही जे सुख मानतात, ते महामूर्ख होत. देहबुद्धि ही दुःखजनक आहे ८९.

दीपाचे मिळणीपाशीं । केवळ दुःख पतंगासी ।
तरी आलिंगूं धांवे त्यासी । तेवीं विषयांसी देहबुद्धी ॥ २९० ॥
दिव्याची संगत करणाऱ्या पतंगाला केवळ दुःखच असते, तरी तो त्याला मिठी मारावयाला धांवतो, त्याप्रमाणं देहबुद्धि विषयांकडे धांव घेते २९०.

ऐशी असंत देहबुद्धी कुडी । वाढवी विषयांची गोडी ।
तेथें महाभयाची जोडी । जन्ममरणकोडी अनिवार ॥ २९१ ॥
याप्रमाणें देहबुद्धि मोठी वाईट आहे. ती विषयांची गोडी वाढवितें. त्यामुळें महाभय उत्पन्न होऊन जन्ममरणांचे फेरे अनिवार होतात ९१.

एवढा अनिवार संताप । देहबुद्धीपाशीं महापाप ।
जाणोनि धरी जो अनुताप । विषयीं अल्प गुंतेना ॥ २९२ ॥
देहबुद्धीपाशी इतका अपरिहार्य संताप आहे व देहबुद्धीपाशी मोठे पातक आहे, असें जो जाणतो तो अनुताप धरून विषयामध्यें तिळमात्रही गुंतत नाहीं ९२.

धरितां विषयांची गोडी । भोगाव्या जन्ममरणकोडी ।
येणें भयें विषय वोसंडी । इंद्रियांतें कोंडी अतिनेमें ॥ २९३ ॥
विषयांची गोडी धरली असतां कोट्यवधी जन्ममरणें सोसावीं लागतात, या भयानें तो विषय सोडून देतो आणि अत्यंत नियमानें इंद्रियांत कोंडून ठेवतो ९३.

इंद्रियें कोंडितां न कोंडती । विषय सांडितां न सांडती ।
पुढतपुढती बाधूं येती । यालागी हरिभक्ती द्योतिली वेदें ॥ २९४ ॥
पण इंद्रियें ही कोंडावयाला गेले तर कोंडून घेत नाहीत. विषय सोडूं म्हटले तर सुटत नाहींत, पुन्हा पुन्हा उपद्रव द्यावयाला येतात. ह्याकरितांच वेदानें हरिभक्ति प्रगट करून ठेविली आहे ९४.

इंद्रियें कोंडावीं न लगती । सहजें राहे विषयासक्ती ।
एवढें सामर्थ्य हरिभक्तीं । जाण निश्चितीं नृपवर्या । २९५ ॥
तिच्यामध्यें इंद्रिये कोंडावी लागत नाहींत व विषयासक्ति आपोआप थांबते. हे राजाधिराजा ! एवढे अद्‌भुत सामर्थ्य हरिभक्तीमध्यें आहे हे पक्कें लक्षात ठेव ९५.

योगी इंद्रियें कोंडती । तीं भक्त लाविती भगवद्‌भक्तीं ।
योगी विषय जे त्यागितीं । ते भक्त अर्पिती भगवंतीं ॥ २९६ ॥
योगी लोक इंद्रियांना कोंडून ठेवतात; पण भक्त लोक तींच इंद्रिये भगवंताच्या भक्तीकडे लावतात. योगी जे विषय टाकून देतात, तेच भक्त लोक भगवंताला अर्पण करतात ९६.

योगी विषय त्यागिती । त्यागितां देह दुःखी होती ।
भक्त भगवंतीं अर्पिती । तेणें होती नित्यमुक्त ॥ २९७ ॥
योगी विषयांचा त्याग करतात, पण त्या त्यागानें देहाला दुःख होते; आणि भक्त हे तेच विषय भगवंताला अर्पण करीत असल्यामुळें ते नित्यमुक्त होतात ९७.

हें नव्हे म्हणती विकल्पक । याचिलागीं येथें देख ।
“कायेन वाचा” हा श्लोक । अर्पणद्योतक बोलिजेला ॥ २९८ ॥
कोणी विकल्पी लोक हे शक्य नाहीं असे म्हणतात. ह्याकरिता येथे ‘कायेन वाचा’ हा कृष्णार्पणद्योतक श्लोक सांगितला आहे ९८.

दारा सुत गृह प्राण । करावे भगवंतासी अर्पण ।
हे भागवतधर्म पूर्ण । मुख्यत्वें “भजन” यां नांव ॥ २९९ ॥
घरदार, बायकामुलें, आणि प्राणसुद्धां भगवंताला अर्पण करावे, हाच पूर्ण ‘भागवतधर्म’ आणि ह्याचंच नांव ‘मुख्य भजन’ होय ९९.

अकराही इंद्रियवृत्ती । कैशा लावाव्या भगवद्‌भक्ती ।
ऐक राया तुजप्रती । संक्षेपस्थिती सांगेन ॥ ३०० ॥
आतां अकराही इंद्रियांच्या वृत्ति भगवतद्‌भक्तीकडे कशा लावाव्या, ते हे राजा ! तुला संक्षेपरीतीनें सांगतों ऐक ३००.

‘मनें’ करावें हरीचें ध्यान । ‘श्रवणें’ करावें कीर्तिश्रवण ।
‘जिव्हेनें’ करावे नामस्मरण । हरिकिर्तन अहर्निशी ॥ ३०१ ॥
‘मनानें’ हरीचें ध्यान करावें, ‘कानांनी’ त्याची कीर्ति श्रवण करावी, ‘जिव्हेनें’ नामस्मरण करावे, आणि रात्रंदिवस त्याच्या कीर्तनांत मग्न असावें १.

‘करीं’ करावे हरिपूजन । ‘चरणीं’ देवालयगमन ।
‘घ्राणी’ तुलसी आमोदग्रहण । जिंहीं हरिचरण पूजिले ॥ ३०२ ॥
‘हातांनी’ हरीचे पूजन करावे, ‘पायांनी’ देवालयांत जावें, ‘नाकाने’ निर्माल्यतुळसींचाच वास घ्यावा २.

नित्य निर्माल्य मिरवे शिरीं । चरणतीर्थें अभ्यंतरीं
हरिप्रसाद ज्याचे उदरीं । त्या देखोनि दूरी भवभय पळें ॥ ३०३ ॥
जो मस्तकावर नित्य निर्माल्य धारण करतो, आणि पोटांत चरणतीर्थ व हरिप्रसाद सांठवितो, त्याला पाहून संसारभय लांब पळते ३.

वाढतेनि सद्‌भावें जाण । चढतेनि प्रेमें पूर्ण ।
अखंड ज्यासी श्रीकृष्णभजन । त्यासी भवबंधन असेना ॥ ३०४ ॥
वाढत्या सद्‌भावानें व चढत्या प्रेमानें ज्याला श्रीकृष्णाचें भजन अखंड घडते, त्याला संसाराचे बंधन उरत नाहीं ४.

सकल भयांमाजीं थोर । भवभय अतिदुर्धर ।
तेंही हरिभक्तीसमोर । बापुडें किंकर केवीं राहे ॥ ३०५ ॥
सर्व भयांमध्यें भवभय अति दुर्धर ! तेही बिचारे हरिभक्तीपुढे केवळ पामर होऊन जाते. मग ते समोर उभे कसे राहणार ? ५.

करितां रामकृष्णस्मरण । उठोनि पळे जन्ममरण ।
तेथें भवभयाचें तोंड कोण । धैर्यपण धरावया ॥ ३०६ ॥
रामकृष्णस्मरण केले असतां जन्ममरण उठून पळू लागते, तेथें धैर्य धरून पुढे राहण्याला संसारभयाला तोंड कुठचें ? ६.

जेथें हरिचरणभजनप्रीती । तेथें भवभयाची निवृत्ती ।
परम निर्भय भगवद्‌भक्ती । आमुच्या मतीं निजनिश्चयो ॥ ३०७ ॥
जेथें हरिचरणभजनाची प्रीति, तेथें संसारभयाची निवृत्ति याप्रमाणें भगवद्‌भक्ति ही परमनिर्भय होय असा आमच्या बुद्धीचा निश्चय आहे ७.

कृतनिश्चयो आमुचा जाण । येथें साक्षी वेद-शास्त्र-पुराण ।
सर्वात्मना भगवद्‌भजन । निर्भयस्थान सर्वांसी ॥ ३०८ ॥
तूं पक्केपणीं जाण की, हा आमचा कृतनिश्चय आहे; व याला वेद, शास्त्र, पुराणें साक्षी आहेत. तात्पर्य, सर्व प्राण्यांना सर्वोपरी भगवद्‌भजन हेच निर्भय स्थान आहे ८.

असो वेद शास्त्र पुराण । स्वमुखें बोलिला श्रीकृष्ण ।
मी सर्वथा भाक्ति‍आधीन । भक्तिप्रधान भगवद्वाक्य ॥ ३०९ ॥
वेद, शास्त्रे, पुराणें, ही बाजूला राहोत; पण प्रत्यक्ष श्रीकृष्णानें आपल्या मुखानें हेच सांगितले आहे की, मी सर्वथा भक्तीच्या आधीन आहे. यावरून भगवंताच्या वाक्यांत भक्ति हीच प्रधान होय ९.

उभवूनियां चारी बाह्या । निजात्मप्राप्तीच्या उपाया ।
“भक्त्याहमेकया ग्राह्यः” । बोलिला लवलाह्यां श्रीकृष्ण ॥ ३१० ॥
इतकेच नव्हे तर, प्रत्यक्ष श्रीकृष्णांनी आपले चारही हात उभारून निजात्मप्राप्तीचा उपाय सांगताना ‘भक्त्याहमेकया ग्राह्यः’ म्हणजे एका भक्तीनेंच मी वश होणारा आहे, असें एकदम सांगितले आहे. ३१०

ये वै भगवता प्रोक्ता उपाया ह्यात्मलब्धये ।
अञ्जः पुंसामविदुषां विद्धि भागवतान् हि तान् ॥ ३४ ॥
श्लोक ३४- अज्ञानी लोकांनासुद्धा अगदी सहजपणे साक्षात आपल्या प्राप्तीचे जे उपाय भगवंतांनी सांगितले आहेत, तेच “भागवत धर्म” समज. (३४)

न करितां वेदशात्रव्युत्पत्ति । ऐशिया अज्ञानां निजात्मप्राप्ती ।
सुगम जोडे ब्रह्मस्थिती । यालागीं हरिभक्ती प्रकाशिली देवें ॥ ३११ ॥
वेद-शास्त्र-व्युत्पत्ति ज्यांना नाहीं, अशा अज्ञानी जनांना परमेश्वरप्राप्ति सुगम होऊन त्यांना ब्रह्मस्वरूप होतां यावें म्हणून देवानेंच ही हरिभक्ति प्रकट केली आहे ११.

न करितां वेदशास्त्रपठण । जड मूढ म्हणाल तरले कोण ।
उन्मत्तगजेंद्रउद्धरण । गर्भसंरक्षण परिक्षितीचें ॥ ३१२ ॥
वेदशास्त्रपठण न करता जड मूठ कोण तरले असें म्हणाल, तर उन्मत्त गजेंद्राचा उद्धार झाला आहे. परीक्षितीचे गर्भामध्यें संरक्षण झाले आहे १२,

अंबरीषगर्भनिवारण । करावया भक्तीच कारण ।
“अहं भक्तपराधीनः” । स्वमुखें नारायण बोलिला ॥ ३१३ ॥
अंबरीषाचे गर्भवास चुकावयाला भक्ति हीच कारण झाली आहे. ‘अहं भक्तपराधीनः’ म्हणजे मी भक्ताच्या स्वाधीन आहे, असे आपल्या तोंडानें नारायणानें म्हटले आहे १३.

वनचर वानर नेणों किती । उद्धरले भगवद्‌भक्तीं ।
अस्वलें तारावया निश्चितीं । विवरीं जांबवती भक्तीस्तव वरिली ॥ ३१४ ॥
ह्या भगवद्‌भक्तीनें वनचर वानर किती तरले कोण जाणे ! अस्वलांचा उद्धार व्हावा म्हणून भगवंतानें विवरांत जाऊन जांबवतीला भक्तीमुळेंच वरिले १४.

जाण पां अविवेकी केवळ । गौळी गोधनें गोपाळ ।
तेही उद्धरिले सकळ । श्रीकृष्णसखे प्रबळ अनन्यप्रीतीं ॥ ३१५ ॥
पुनः हे लक्षात आण की, केवळ अविवेकी असे गौळी, गोधनें व गोपाळ जे कृष्णाचे सखे सवंगडी, तेसुद्धा प्रबळ अशा अनन्य प्रीतीमुळेच उद्धरून गेले १५.

शास्त्रविरुद्ध अविवेकस्थिती । जारभावें श्रीकृष्णप्रीती ।
गोपी उद्धरिल्या नेणों किती । अनन्यभक्तिसख्यत्वें ॥ ३१६ ॥
शास्त्रविरुद्ध अविवेकामुळें जारभावानेंच का होईना, श्रीकृष्णावर अत्यंत प्रीति ठेवल्यामुळें गोपी किती उद्धरल्या, त्यांची तर गणतिच नाहीं १६.

न करितां नाना व्युत्पत्ती । सुगमोपायें ब्रह्मप्राप्ती ।
अबळें तारावया निश्चितीं । भगवंतें निजभक्ति प्रगट केली ॥ ३१७ ॥
अनेक प्रकारची शास्त्रे वगैरे न पढतां सुलभ उपायानें ब्रह्मप्राप्ति व्हावी, आणि दुबळीही निश्चितपणे तरून जावी म्हणून भगवंतानें आपली भक्ति प्रगट केली १७.

तें हें राया भागवत जाण । मुख्यत्वें भक्तिप्रधान ।
भावें करितां भगवद्‌भजन । अज्ञान जन उद्धरती ॥ ३१८ ॥
राजा ! तेच हे भागवत, ज्यात मुख्यत्वेकरून भक्तिच प्रधान आहे. शुद्ध भावानें भगवद्‌भजन केलें असता अज्ञानी लोक उद्धरून जातात १८.

हें भागवत नव्हे नव्हे । अज्ञानालागीं निजपव्हे ।
भवाब्धि तरावया भजनभावें । महानाव देवें निर्माण केली ॥ ३१९ ॥
हें भागवत नव्हे हो नव्हे; ही दीन अज्ञानी लोकांकरितां घातलेली पाणपोईच आहे. भजनभावानें संसारसागर तरून जाण्याकरितां देवानें ही एक मोठी नौकाच निर्माण करून ठेवली आहे १९.

भागवताचे महानावे । जे रिघाले भजनभावें ।
त्यांसी भवभयाचे हेलावे । भजनस्वभावें न लागती ॥ ३२० ॥
भजनभावानें जे ह्या भागवतरूपी महानौकेंत बसून निघाले, त्यांना भजनस्वभावामुळें संसारभयाचे हेलकावे खावें लागत नाहींत ३२०.

स्त्रीशूद्रादि आघवे । घालूनियां ये नावे ।
एकेच खेपे स्वयें न्यावे । भजनभावें परतीरा ॥ ३२१ ॥
स्त्रीशूद्रादिक सारे ह्या नावेत घालून एकाच खेपेनें भजनभावानें पलीकडच्या तीराला नेतां येतात २१.

जे आवलितां भावबळें । तोडी कर्माकर्मक्रूरजळें ।
स्वबोधाचेनि पाणिढाळें । काढिती एक वेळे निजात्मतीरा ॥ ३२२ ॥
भावबळानें या नावेला वल्हवूं लागले असतां कर्माकर्मरूप क्रूर जळाला तोडून निजबोधाच्या प्रवाहदिशेनें ती एकाच वेळेला नेऊन पैलतीरास पोंचविते २२.

वैराग्याचे निजनावाडे । अढळ बसले चहूंकडे ।
विषयांचे आदळ रोकडे । चुकवूनि धडपुडे काढिती कांठा ॥ ३२३ ॥
वैराग्याचे नावाडी चहूंकडे अढळ बसले असल्यामुळें विषयांचे खडक चुकवून ते अलगद नेऊन तीराला पोंचवितात २३.

संचितक्रियमाणांच्या लाटा । मोडोनि लाविती नीट वाटा ।
वेंचूनि प्रारब्धाचा सांठा । निजात्मतटा काढिती ॥ ३२४ ॥
संचितक्रियमाणांच्या लाटा मोडून नीट रस्त्याला लावतात आणि प्रारब्धाचा साठा संपवून आत्मस्वरूपतटाला पोंचवितात २४.

तेथ गुरुवचन साचोकारें । सांभाळित उणेंपुरें ।
भूतदयेचेनि दोरें । निजनिर्धारें वोढिती ॥ ३२५ ॥
यामध्यें काहीं न्यूनाधिक्य झाल्यास गुरुवचन सांभाळून घेते. नाव तीराला लागत असतां भूतदयेच्या दोरानें आत्मनिर्धारानें ओढतात २५.

तंव एकाएक एकसरीं । काढिली परात्परतीरीं ।
तंव प्रत्यावृत्ती येरझारी । आत्मसाक्षात्कारीं खुंटली ॥ ३२६ ॥
तेव्हां सपाट्यासरशी ती नौका परात्परतीराला लागते. सर्वांना एकदम परतीरावर उतरवितात, आणि मग आत्मसाक्षात्कार झाल्यानें पुनरावृत्ति खुंटून ये जा करावे लागत नाहीं २६.

येथ धरिला पुरे भावो । तैं बुडणेंचि होय वावो ।
मग टाकावो जो ठावो । तो स्वयमेवो आपण होय ॥ ३२७ ॥
एक भाव धरला की पुरे, मग ‘बुडणे’ म्हणतात ते मिथ्या होऊन जाते. मग जेथे पोंचावयाचें म्हणतो तें स्थानच हा आपण होऊन बसतो २७.

येथ पव्हणयावीण तरणें । प्रयासेंवीण प्राप्ति घेणें ।
सुखोपायें ब्रह्म पावणें । यालागीं नारायणें प्रकाशिली भक्ती ॥ ३२८ ॥
येथें पोहल्याशिवायच तरावयाचे, आणि प्रयासाशिवायच प्राप्ति व्हावयाची. अर्थात् सुखोपायानें ब्रह्मप्राप्ति व्हावी म्हणून नारायणानें भक्ति प्रगट केली आहे २८.

भागवतधर्माचिये स्थिती । बाळीं भोळीं भवाब्धि तरती ।
सुखोपायें ब्रह्मप्राप्ती । तेचि श्लोकार्थीं विशद सांगे ॥ ३२९ ॥
भागवतधर्माची स्थितिच अशी आहे की, त्यानें साळींभोळींही संसारसमुद्र तरून जातात. सुलभ रीतीनें ब्रह्मप्राप्ति कशी होते, तेच आतां श्लोकार्थामध्यें स्पष्ट करून सांगतात २९.

यानास्थाय नरो राजन् न प्रमाद्येत कर्हिचित् ।
धावन्निमील्य वा नेत्रे न स्खलेन्न पतेदिह ॥ ३५ ॥
श्लोक ३५- राजन ! या भागवत धर्माचा अवलंब करणार्‍या मनुष्यावर कधी संकटे येत नाहीत आणि डोळे बंद करून तो पळाला म्हणजेच त्याच्या विधिविधानात काही कमतरता राहिली तरी, त्याचे स्खलन किंवा पतन होत नाही. (३५)

जो श्रुतिस्मृती नेणता । भावें भजे भगवत्पथा ।
त्यासी विधिनिषेधबाधकता । स्वप्नींही सर्वथा प्रमादु न घडे ॥ ३३० ॥
ज्याला श्रुति-स्मृति समजत नाहीत, पण केवळ भक्तिभावानेंच जो भगवन्मार्गाला म्हणजे भागवतधर्माला अनुसरतो, ज्याला विधिनिषेधांची बाधा होत नाहीं व स्वप्नांतसुद्धां प्रमाद घडत नाहीं ३३०.

सद्‌भावेंसीं सप्रेम । आचरितां भागवतधर्म ।
बाधूं न शके कर्माकर्म । भावें पुरुषोत्तम संतुष्ट सदा ॥ ३३१ ॥
सप्रेम सद्‌भावानें जर भागवतधर्माचे आचरण केले, तर त्याला कर्माकर्म बाधूं शकत नाही. त्याच्या भक्तीनेंच पुरुषोत्तम सदासर्वदा संतुष्ट असतो ३१.

श्रुतिस्मृति हे दोन्ही डोळे । येणेंवीण जे आंधळे ।
तेही हरिभजनी धांवतां भावबळें । पडे ना आडखुळें सप्रेमयोगें ॥ ३३२ ॥
श्रुति आणि स्मृति हे दोन डोळे आहेत. त्यांच्याशिवाय जे आंधळे असतात, तेही भावबळानें हरिभजनामध्यें धांवतांना पडत नाहीत व अडखळत नाहीत ३२.

प्रेमेंवीण श्रुतिस्मृतिज्ञान । प्रेमेंवीण ध्यानपूजन ।
प्रेमेंवीण श्रवण कीर्तन । वृथा जाण नृपनाथा ॥ ३३३ ॥
हे राजा ! प्रेमाशिवाय श्रुतिस्मृतींचे ज्ञान, प्रेमाशिवाय ध्यान-पूजन, प्रेमाशिवाय श्रवण-कीर्तन, ही सर्व व्यर्थ होत, हे लक्षात ठेव ३३.

माता देखोनि प्रेमभावें । बालक डोळे झांकूनि धांवे ।
तें धांवेसवें झेंपावे । अति सद्‌भावे निजमाता ॥ ३३४ ॥
आई पाहिली की, मूल डोळे झाकून तिच्याकडे धांव घेते; त्या धांवेबरोबर आईही पण तितक्याच प्रेमानें धांव घेऊन मुलाला झेलून घेते ३४.

जैसा सप्रेम जो भजे भक्तु । त्या भजनासवें भगवंतु ।
भुलला चाले स्वानंदयुक्तु । स्वयें सांभाळितु पदोपदीं ॥ ३३५ ॥
त्याप्रमाणें जो भक्त भगवंताला सप्रेम भजतो, त्याच्या त्या भजनाबरोबर भगवंतही भुलून स्वानंदानें त्याच्याबरोबर चालू लागतो व त्याला पदोपदी सांभाळतो ३५.

ऐसे आचरितां भागवतधर्म । बाधूं न शके कर्माकर्म ।
कर्मासी ज्याची आज्ञा नेम । तो पुरुषोत्तम भजनामाजीं ॥ ३३६ ॥
अशा प्रकारें भक्त भागवतधर्म आचरीत असतां त्याला कर्माकर्म बाधूं शकत नाही. कारण, कर्माला ज्यानें आज्ञा व नियम घालून दिले आहेत, तो पुरुषोत्तमच त्याच्या भजनामध्यें असतो ३६.

ऐसा भागवतधर्में गोविंदु । तुष्टला चाले स्वानंदकंदु ।
तेथें केवीं रिघे विधिनिषेधु । भक्तां प्रमादु न कदा बाधी ॥ ३३७ ॥
याप्रमाणें स्वानंदकंद जो गोविंद, तो जेणे भागवतधर्मानें संतुष्ट होऊन चालत असतो, तेथे विधि-निषेधांचा शिरकाव कसा होणार ? त्याच्या भक्ताला प्रमादाची कधीही बाधा होत नाहीं ३७.

जेवीं कां स्वामीचिया बाळा । अवरोधु न करवे द्वारपाळा ।
तेवीं भागवतधर्मभजनशीळा । कर्मार्गळा बाधूं न शके ॥ ३३८ ॥
ज्याप्रमाणें धन्याच्या मुलाला पहारेकर्‍याच्यानें अटकाव करवत नाही, त्याप्रमाणें भागवतधर्मानें जो भजन करणारा आहे, त्याला कर्माचा अडसर प्रतिबंधक होत नाहीं ३८.

ज्यासी भगवद्‌भजनीं विश्वासु । विधिनिषेधु त्याचा दासु ।
देखोनि निजभजनविलासु । स्वयें जगन्निवासु सुखावे ॥ ३३९ ॥
ज्याला भगवद्‌भजनामध्यें विश्वास आहे, त्याचे विधिनिषेध हे दासच बनतात. त्याचा भजनविलास पाहून स्वतः जगन्निवास परम संतुष्ट होतो ३९.

भागवतधर्में राहे कर्म । तंव तंव सुखावे पुरुषोत्तम ।
सप्रेमभक्ता बाधी कर्म । हा वृथा भ्रम भ्रांतांसी ॥ ३४० ॥
भागवतधर्मानें कर्म करण्याचे राहतें, तसतसा पुरुषोत्तम संतुष्टच होतो. प्रेमळ भक्तांना कर्म बाधतें हा भ्रांतिष्ट लोकांना वृथा भ्रम आहे ३४०.

कर्म करूं पावे प्रमादु । तंव प्रमादीं प्रगटे गोविंदु ।
यालागीं विधिनिषेधु । न शकती बाधूं हरिभक्तां ॥ ३४१ ॥
भक्ताला कर्म प्रमादांत पाडूं लागले, तर त्या प्रमादांतच भगवान् प्रगट होतो. ह्याकरितां हरिभक्तांना कर्माचे विधिनिषेध बाधक होत नाहीत ४१.

अजामिळा कर्मबाध । यमपाशीं बांधितां सुबद्ध ।
तेथें प्रगटोनि गोविंद । केला अतिशुद्ध नाममात्रें ॥ ३४२ ॥
अजामिळाला त्याचे कर्म बाधक झालें, यमपाशांत तो बांधला गेला, इतक्यांत केवळ नामामुळें तेथे भगवान् प्रगट होऊन त्यांनी त्याला पावन केले ४२.

स्वधर्म कर्म हेच दोनी । निजसत्ता भोयी करूनी ।
जो पहुडे भजनसुखासनीं । तो पडे तैं दंडणी स्वधर्म-कर्मां ॥ २४३ ॥
स्वधर्म आणि कर्म ह्या दोघांनाहीं आपल्या सत्तेनें भोई करून जो भक्त भजनरूप पालखीत शयन करतो, तेव्हां तो पडेल तर स्वधर्मकर्मानाच दंड होतो ४३.

भजनप्रतापसत्तालक्षणें । स्वधर्मकर्मां ऐसें दंडणें ।
वर्णाश्रमांचा ठावो पुसणें । होळी करणें कर्माची ॥ ३४४ ॥
भजनप्रतापाच्या योगें स्वधर्मकर्मांनाहीं याप्रमाणें दंड करता येतो. वर्णाश्रमाचा ठाव पुसून टाकून कर्माची होळीच करून टाकतां येते ४४.

एवं भागवतधर्में जे सेवक । स्वधर्मकर्म त्यांचें रंक ।
तें राहों न शके त्यांसन्मुख । मा केवीं बाधक हों शकेल ॥ ३४५ ॥
तात्पर्य, याप्रमाणें जे भागवतधर्माचे सेवन करणारे आहेत, त्यांचे स्वधर्मकर्म हे दीन सेवक होत. भक्तांपुढे त्यांना उभे राहण्याचेही सामर्थ्य नाही, मग ते भक्तांना बाधक कसे होऊ शकतील ? ४५.

कैसे कैसे भागवतधर्म । केवीं भगवंती अर्पे कर्म ।
अतिगुह्य उत्तमोत्तम । निजभजनवर्म ऐक राया ॥ ३४६ ॥
भागवतधर्म कसेकसे आहेत ? भगवंतामध्यें कर्म कसे अर्पण होते ? हे राजन् ! अति गुह्य निजभजनवर्म तुला सांगतों ऐक ४६.

कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा
बुद्ध्यात्मना वानुसृतस्वभावात् ।
करोति यद्यत्सकलं परस्मै
नारायणायेति समर्पयेत्तत् ॥ ३६ ॥
श्लोक ३६- मनुष्य शरीराने, वाणीने, मनाने, इंदियांनी, बुद्धीने, अहंकाराने किंवा स्वभावाप्रमाणे जी जी कर्मे करील, ती ती सर्व कर्मे त्याने त्या परमपुरूष नारायणांनाच समर्पण करावीत. (३६)

हेतुक अथवा अहेतुक । वैदिक लौकिक स्वाभाविक ।
भगवंतीं अर्पे सकळिक । या नांव देख “भागवतधर्म” ॥ ३४७ ॥
सहेतुक असो अथवा अहेतुक असो, वैदिक असो, लौकिक असो की स्वाभाविक असो; ही सारी भगवंताच्या ठायीं अर्पण करणें, यालाच ‘भागवतधर्म’ म्हणतात, हें तूं ध्यानांत ठेव ४७.

उदकीं तरंग अतिचपळ । जिकडे जाय तिकडे जळ ।
तैसें भक्ताचें कर्म सकळ । अर्पे तत्काळ भगवंतीं ॥ ३४८ ॥
उदकांतील डलाट अति चपल असते, पण ती जिकडे जाईल तिकडे उदकांतच मिसळते; त्याप्रमाणें भक्तांचे सारे कर्म तत्काल भगवंताच्याठायींच अर्पण होते. अर्थात् भगवद्‌रूपच होऊन जातें ४८.

ये श्लोकींचें व्याख्यान । पहिलें मानसिक अर्पण ।
पाठीं इंद्रियें बुद्धि अभिमान । कायिक जाण श्लोकान्वयें ॥ ३४९ ॥
ह्या श्लोकाच्या व्याख्यानांत प्रथमतः मानसिक कर्माचें अर्पण सांगितले असून, मागाहून इंद्रियें, बुद्धि, अहंकार इत्यादिकांच्या कर्माचे व शेवटी कायिक कर्माचे अर्पण असे श्लोकान्वयानुसार सांगितले आहे ४९.

भागवतधर्माची निजस्थिती । मन बुद्धि चित्त अहंकृती ।
आदिकरूनि इंद्रियवृत्ती । भगवंतीं अर्पिती तें ऐक ॥ ३५० ॥
भागवतधर्माची खरी स्थिति म्हणजे मन, बुद्धि, चित्त, अहंकृति आदिकरून इंद्रियवृत्ति आहेत त्या सर्व भगवंताला अर्पण करणें होय. ते कसें तें ऐक ३५०.

बाधूं न शके स्वधर्मकर्म । ऐक राया त्याचें वर्म ।
मनीं प्रगटला पुरुषोत्तम । अतिनिःसीम निजबोधें ॥ ३५१ ॥
हे राजा ! भक्ताला स्वधर्मकर्म कसें बाधत नाहीं त्याचे वर्म सांगतों ऐक. अति निस्सीम आत्मबोधाच्या योगानें मनामध्येंच पुरुषोत्तम प्रगट होतो ५१.

म्हणोनि संकल्पविकल्प । अवघे झाले भगवद्‌रूप ।
यालागीं भक्त नित्य निष्पाप । सत्यसंकल्प हरिदास ॥ ३५२ ॥
त्यामुळें संकल्प-विकल्प हे सारे भगवद्‌रूपच होतात, आणि त्यायोगें भक्त हे निष्पापच असतात. ते हरीप्रमाणें सत्यसंकल्पी होतात ५२.

जेवीं बुद्धिबळांचा खेळ । राजा प्रधान गजदळ ।
अवघे काष्ठचि केवळ । तेवीं संकल्प सकळ भगवद्‌रूप ॥ ३५३ ॥
ज्याप्रमाणें बुद्धिबळाच्या खेळांत राजा, प्रधान, हत्ती, पायदळ ही सर्व असतात, पण ती सारीच केवळ लांकडे त्याप्रमाणें भगवंताच्या भक्ताचे संकल्प सारे भगवद्‌रूपच होतात ५३.

जो जो संकल्प कामी कामु । तो तो होय आत्मारामु ।
तेथ भजनाचा संभ्रमु । अतिनिःसीमु स्वयें वाढें ॥ ३५४ ॥
त्याचा संकल्प ज्या ज्या विषयाची इच्छा करतो तो तो विषय आत्माराममयच बनतो, त्यामुळें भजनसंभ्रम आपोआपच अतिशय वाढतो ५४.

जागृति सुषुप्ती स्वप्न । तिहीं अवस्थां होय भजन ।
तेथ अखंड अनुसंधान । निजबोधें पूर्ण ठसावलें अंगीं ॥ ३५५ ॥
जागृति, स्वप्न, सुषुति या तिन्ही अवस्थांमध्यें भजन होऊ लागते व अंगामध्यें आत्मबोध पूर्ण ठसला गेल्यामुळें अनुसंधान अखंड असते ५५.

मना होतां समाधान । समाधानें अधिक भजन ।
पूर्ण बाणलें अनुसंधान । ध्येय-ध्याता-ध्यान समरसें भजे ॥ ३५६ ॥
मनाला समाधान प्राप्त झाले म्हणजे त्यायोगें भजनही अधिकच वाढत जाते. अनुसंधान पूर्णपणे बाणल्यामुळें ध्येय, ध्याता, ध्यान ही एकरूप होऊन भजन चालतें ५६.

तूर्या साक्षी उन्मनी । याही लाविल्या भगवद्‌भजनीं ।
जंववरी अवस्थापणीं । आपआपणीं मुकल्या नाहीं ॥ ३५७ ॥
तुर्या, साक्षी आणि उन्मनी ह्या तीन जोपर्यंत आपलेपणाला मुकल्या नाहीत, तोपर्यंत त्यांनाहीं भक्त भगवद्‌भजनाकडेच लावतात ५७.

ऐसा भावनेवीण उपजे भावो । तो तो तत्काळ होय देवो ।
मग अर्पणाचा नवलावो । न अर्पितां पहा हो स्वयें होय ॥ ३५८ ॥
ह्याप्रमाणें भावनेशिवायच भाव उत्पन्न होतो, तो तत्काळ देवरूपच बनतो. मग अर्पणाचे आश्चर्य कसले ? अर्पण न करितां आपोआपच तें भगवदर्पण होतें ५८.

स्वरूपें मिथ्या केलें स्वप्न । जागृती सोलूनि काढिलें ज्ञान ।
निवडोनि सुषुप्तिसुखसमाधान । तिहींतें पूर्ण एकत्र केलें ॥ ३५९ ॥
स्वरूपानुभवानें स्वप्न मिथ्या करून सोडलें ; जागृति सोलून ज्ञान काढले; सुषुप्तीचें सुखसमाधान निवडून काढून ते पूर्णपणे एकत्र करून ठेवले ५९;

तये स्वरूपीं सगळें मन । स्वयेंचि करी निजात्मार्पण ।
तेथींचें सुखसमाधान । भक्त सज्ञान जाणती स्वयें ॥ ३६० ॥
की अशा स्वरूपांत स्वतः मनच आत्मार्पण करते. अशा स्थितीतील सुखसमाधान सज्ञान भक्तच जाणत असतात ३६०.

यापरी मानसिक जाण । सहज स्वरूपीं होय अर्पण ।
आतां इंद्रियांचें समर्पण । होय तें लक्षण ऐक राया ॥ ३६१ ॥
ह्याप्रमाणें मानसिक व्यापार स्वरूपामध्यें सहज अर्पण होतो असें तूं जाण. आतां इंद्रियांचे समर्पण कसे होते, ते लक्षण ऐक ६१.

दीपु लाविजे गृहाभीतरीं । तोचि प्रकाशे गवाक्षद्वारीं ।
तेवीं मनीं प्रगटला श्रीहरी । तोचि इंद्रियांतरीं भजनानंदु ॥ ३६२ ॥
घरामध्यें दिवा लावला म्हणजे त्याचाच उजेड खिडक्यांतूनही बाहेर पडतो. तद्वत् मनामध्यें श्रीहरि प्रगट झाला म्हणजे तोच इंद्रियांमध्यें भजनानंदरूपानें प्रगट होतो ६२.

तेचि इंद्रियव्यापार । सांगिजती सविस्तर ।
स्वाभाविक इंद्रियव्यवहार । भजनतत्पर परब्रह्मीं ॥ ३६३ ॥
तेच इंद्रियांचे व्यापार सविस्तरपणे सांगतों ऐक. स्वाभाविक इंद्रियव्यापारही परब्रह्मस्वरूपांत भजनरूप होतात ६३,

जंव दृष्टि देखे दृश्यातें । तंव देवोचि दिसे तेथें ।
यापरी दृश्यदर्शनातें । अर्पी भजनसत्ते दृष्टीचा विषयो ॥ ३६४ ॥
दृष्टि जेव्हां दृश्य पदार्थाला पहाते, तेव्हां तिला तेथें देवच दिसत असतो. ह्याप्रमाणें भजनसत्तेनें दृश्यदर्शनासह दृष्टीचा विषय भगवंताला अर्पण करतो ६४.

दृश्य द्रष्टा आणि दृष्टी । देखतां तिन्ही एकवटी ।
सहजें ब्रह्मार्पण ते दृष्टी । भक्त जगजेठी यापरी अर्पी ॥ ३६५ ॥
दृश्य, द्रष्टा आणि दर्शन ही तिन्ही एकरूपानें पहात गेलें म्हणजे दृष्टि सहज ब्रह्मार्पण होते. याप्रमाणें भक्त श्रेष्ठ दृष्टि अर्पण करतो ६५.

दृश्य प्रकाशी दृश्यपणें । तेंचि दृष्टीमाजीं होय देखणें ।
ऐसेनि अभिन्नपणें । दर्शनार्पणें भजती भक्त ॥ ३६६ ॥
दृश्याला दृश्यपणानें जी सत्ता प्रगट करते, तीच दृष्टीमध्यें दर्शनरूप होते. अशा अभिन्नपणानें दर्शनार्पण करून भक्तजन भजन करतात ६६.

हे एकपणीं तीनही भाग । तिन्हीमाजीं एक अंग ।
ऐसें जें देखणें चांग । त्याचि अर्पणें साङ्ग सहजें अर्पी ॥ ३६७ ॥
एकपणांत तीनही भाग आहेत व तिहींमध्यें एकच स्वरूप आहे. असें हें सुंदर पहाणे, हेच साङ्ग समर्पण होय ६७.

नाना पदार्थ प्रांजळे । नीच नवे देखती डोळे ।
परी अर्पणाचे सोहळे । निजात्ममेळें अर्पिती स्वयें ॥ ३६८ ॥
डोळे नित्य नवे नाना प्रकारचे पदार्थ पहातात; पण भक्तांना ते सर्व आत्मरूप दिसतात व याप्रमाणें दृष्टीच्या अर्पणाचे सोहळे ते भोगतात ६८.

यापरी दृष्टीचें दर्शन । भक्त करिती ब्रह्मार्पण ।
आतां श्रवणाचें अर्पण । अर्पी तें लक्षण ऐक राया ॥ ३६९ ॥
या प्रकारे दृष्टीचे दर्शन भक्त ब्रह्मार्पण करीत असतात. आता हे राजा ! ते ‘श्रवणाचे अर्पण’ ब्रह्मामध्यें कसे करतात, ते सांगतों ऐक ६९.

जो बोलातें बोलविता । तोचि श्रवणीं झाला श्रोता ।
तोच अर्थावबोधु जाणता । तेथें ब्रह्मार्पणता सहजेंचि ॥ ३७० ॥
जो शब्दाला बोलविणारा, तोच कानांमध्यें ऐकणारा होऊन बसलेला आहे. आणि अर्थाचे ज्ञान जाणणाराही तोच आहे. अर्थात् येथे श्रवणाची ब्रह्मार्पणता होते ३७०.

शब्दु शब्दत्वें जंव उठी । तंव शब्दविता प्रगटे पाठींपोटीं ।
तेणें अकृत्रिम भजन उठी । ब्रह्मार्पणमिठी श्रवणीं पडे ॥ ३७१ ॥
शब्द हा शब्दरूपानें उठतो न उठतो, तोच शब्दास बोलविणारा त्याच्या पाठींपोटीं प्रगट होऊन राहतो; त्यामुळें ते भजन अकृत्रिमपणे उत्पन्न होते आणि श्रवणांत ब्रह्मार्पणाची मिठी सहजच पडते ७१.

शब्दबोलासवें अर्थवाढी । तंव शब्दविता घे शब्दार्थगोडी ।
तेणें हरिभजनीं आवडी । स्वयें उठी गाढी श्रवणार्पणेंसीं ॥ ३७२ ॥
शब्दोच्चार झाला की, त्याच्याबरोबर अर्थ वृद्धिंगत होतो; इतक्यांत शब्द काढणारा असतो तोच शब्दार्थाची गोडी ग्रहण करतो आणि तेणेंकरून श्रवणार्पणानेंच हरिभजनांत अत्यंत आवड उत्पन्न होते ७२.

शब्द जंव कानीं पडे । तंव शब्दार्थें भजन वाढें ।
बोलवित्याच्या अंगा घडे । अर्पण उघडें करितांचि ॥ ३७३ ॥
शब्द कानांवर पडतो न पडतो तोच शब्दार्थामुळें भजन वाढते; आणि त्यायोगें शब्दाच्या प्रवर्तकाशी उघड उघड अर्पण होतें ७३.

बोलासी जो बोलविता । त्यासीं दृढ केली एकात्मता ।
तें भजन चढे श्रवणाच्या हाता । ब्रह्मार्पणता निजयोगें ॥ ३७४ ॥
शब्दाला जो बोलविणारा, त्याच्याशी एकात्मता दृढ केली की, तें भजन श्रवणाच्या हाती येते व ब्रह्मार्पणता सहज घडते ७४.

सद्‌गुरुवचन पडतां कानीं । मनाचे मनपण विरे मनीं ।
तेंचि श्रवण ब्रह्मार्पणीं । भगवद्‌भजनीं सार्थकता ॥ ३७५ ॥
सद्गुरूचे वचन कानांवर पडले की, मनाचे मनपण मनामध्येंच जिरून जाते, तेच श्रवण ब्रह्मार्पण होऊन भगवद्‌भजनानें सार्थकता होते ७५.

श्रवणेंचि यापरी श्रवण । करितां उठिलें ब्रह्मार्पण ।
हेतुरहित भगवद्‌भजन । स्वभावें जाण स्वयें होत ॥ ३७६ ॥
ह्याप्रमाणें श्रवणानेंच श्रवण केले असता त्यास ब्रह्मार्पणता प्राप्त होऊन, हेतुरहित भगवद्‌भजन आपोआपच होते ७६.

भजनें तुष्टला जगन्निवास । होय वासाचा निजवास ।
मग घ्राणद्वारा परेश । भोगी सुवास ब्रह्मार्पणेंसीं ॥ ३७७ ॥
भजनामध्यें संतुष्ट झालेला जगन्निवास वासांतील वास होऊन राहतो; व तो परेश घ्राणाच्या द्वारे ब्रह्मार्पणत्वानें सुवास ग्रहण करतो ७७.

जो सुमना सुमनपण जोडी । तो घ्राणाचेंही घ्राण होय आवडी ।
मग नाना सुवासपरवडी । ब्रह्मार्पणप्रौढीं निजभोग अर्पी ॥ ३७८ ॥
जो पुष्पाला पुष्पपण देतो, तोच आवडीनें घ्राणाचे घ्राण होऊन राहतो; आणि मग अनेक प्रकारच्या सुवासाचा घमघमाट ब्रह्मार्पणप्रौढीनें भोगतो ७८.

वासाचा अवकाश होय आपण । घ्राणीं ग्राहकपणें जाण ।
तो भोगुचि स्वयें संपूर्ण । कृष्णार्पण सहज होतु ॥ ३७९ ॥
नासिकेमध्यें ग्राहकपणानें पोकळीचा भाग आपणच स्वतः होत असल्यामुळें तो भोग सहजच कृष्णार्पण होतो ७९.

रसना रस सेवूं जाये । तंव रसस्वादु देवचि होये ।
मग रसनेमाजीं ये‍ऊनि राहे । ब्रह्मार्पणें पाहे रसभोगवृत्ती ॥ ३८० ॥
(आतां ‘रस’ विषयाचे अर्पण सांगतात)-जिव्हा रसग्रहण करण्याला जाते तो देव स्वतःच रसास्वाद होतो, त्यामुळें रसनेमध्यें रसोपभोगाची वृत्ति ब्रह्मार्पणत्वानें येऊन राहते (अथवा, देव रसनेत येऊन राहतो व त्यामुळें रसभोगवृत्तिही ब्रह्मार्पण होते) ३८०.

जे जे रसना सेवी गोडी । ते ते हरिरूपें धडफुडी ।
स्वादा ये‍ऊनि रोकडी । ब्रह्मार्पणपरवडी निजभोग अर्पी ॥ ३८१ ॥
जिव्हा जो जो स्वाद ग्रहण करते, तो तो हरिरूप होऊन पूर्णपणे गोडीला चढतो. ह्या प्रकारे जिव्हा आपला रसानुभव ब्रह्मार्पण करून टाकते ८१.

रस-रसना-रसस्वादु । त्रिविधभेदें निजअभेदु ।
रससेवनीं परमानंदु । स्वानंदकंदु वोसंडे ॥ ३८२ ॥
रस, रसना आणि रसास्वाद ह्या तिहींचा निजस्वरूपांत अभेदच आहे. अशा भावनेनें रस सेवन केला असतां स्वानंदाचा कंद इंद्रियद्वाराही बाहेर येतो. अर्थात् अशा रससेवनानें परमानंद-साक्षात्कार होतो ८२.

कटु मधुर नाना रस । रसना सेवी सावकाश ।
परी ते अवघा ब्रह्मरस । स्वादीं सुरस परमानंदु ॥ ३८३ ॥
कडू, मधुर, इत्यादि जे अनेक रस आहेत ते रसना सावकाश सेवन करते, परंतु तो सारा ‘ब्रह्मरस’ असल्यामुळें त्याच्या स्वादांत सुरस असा परमानंदच प्रकट होतो ८३.

यापरी रसीं रसना । भोगें रतली कृष्णार्पणा ।
आतां स्पर्शविषयरचना । अर्पे ब्रह्मार्पणा तें ऐक राया ॥ ३८४ ॥
ह्याप्रमाणें रसना ही रसभोगद्वारा कृष्णार्पणांतच रत होते. आता हे राजा ! ‘स्पर्श’ विषयाची व्यवस्था ब्रह्मार्पणांत कशी होते तें ऐक ८४.

स्पर्श घे‍ईजे निजदेहीं । तंव देहींच प्रगटे विदेही ।
मग स्पर्शी जें जें कांहीं । तो तो भोगु पाहीं ब्रह्मार्पणें उठी ॥ ३८५ ॥
आपल्या देहानें स्पर्श घ्यावयास जावें, तो देहामध्यें विदेही परमात्माच प्रगट होतो. ह्यामुळें जे जे काही स्पर्शावयास जावें, तो तो स्पर्शभोग ब्रह्मार्पणानेंच उठू लागतो ८५.

स्पर्शास्पर्शें जें स्पर्शिजे । तंव स्पर्शावया नाडळे दुजें ।
तेणें एकपणाचेनि व्याजें । कृष्णार्पणवोजें भजन प्रगटे ॥ ३८६ ॥
स्पर्शास्पर्शानें म्हणजे त्वचेनें कशाला तरी स्पर्शावे म्हटलें, तर तेथे स्पर्श करण्यास दुसरें कांहींच लागत नाही. त्या ऐक्यरूपामुळें कृष्णार्पणरूपी भजनच प्रकट होते ८६.

तेथ जो जो घे‍ईजे पदार्थु । तो तो पदार्थु होय समर्थु ।
तेणेंचि भजनें परमार्थु । निजस्वार्थु निजभक्तां ॥ ३८७ ॥
तेव्हां जो जो पदार्थ म्हणून घ्यावयास जावें, तो तो पदार्थ सर्वसत्ताधीश परमात्माच होऊन राहतो; आणि तशा त्या भजनानें निजभक्ताचा स्वार्थ जो परमार्थ तोच पदरांत पडतो ८७.

द्यावया कांहीं देवा जाये । तंव देतां भजन कैसें होये ।
देतें घेतें दान स्वयें । देवोचि होये निजांगें ॥ ३८८ ॥
(आतां ‘हाता’ चे अर्पण सांगतात)- हात देवास काहीं द्यावयास जातात, तों तें देतांना भजन कसे घडते पाहा. तर देणारा, घेणारा व दान ही तिन्ही देव स्वतःच होऊन राहतो ८८.

जे‍उतें जे‍उतें चालवी पाये । तो तो मार्गु देवोचि होये ।
मग पा‍उला पा‍उलीं पाहे । निजभजन होये ब्रह्मार्पणेंशीं ॥ ३८९ ॥
(आतां ‘पाया’चे अर्पण सांगतात)-भक्त जिकडे जिकडे पाय चालवीत नेतात, तो तो मार्ग देव स्वतःच होऊन राहतो; त्यामुळें ब्रह्मार्पणत्वानें पावलोपावली निजभजन घडते ८९.

चरणा चरणा निजगती । तोचि निजांगें क्षितीची क्षिती ।
चालतां तैशिया युक्ती । सहज ब्रह्मस्थिति निजकर्में अर्पी ॥ ३९० ॥
चरणाच्या गतीला ज्याची चालना, तोच पृथ्वीची धारणाशक्ति आहे, अशा युक्तिधारणेनें चालतांना ते चालण्याचे कर्म सहज ब्रह्मस्थितीला पोंचते ३९०.

बोल बोलवितिया वदनीं भेटी । बोलणें लाजे त्याचिया दृष्टी ।
ते लाज गिळून बोलणें उठी । निजभजनपुष्टी ब्रह्मार्पणेंसी ॥ ३९१ ॥
(मागें ओंवी ३७० मध्यें ज्ञानेंद्रियांपैकी श्रोत्रेंद्रियाचा शब्दविषय सांगितला, आतां कर्मेंद्रियांपैकी वागिंद्रियाचा शब्दविषय सांगतात.) बोल आणि बोलविणारा यांची भेट वदनांत होते. त्याला पाहून बोल लाजतो. ती लाज गिळूनच मग बोलणे प्रगट होत असल्यामुळें ब्रह्मार्पणासह निजभजन वाढत असते ९१.

शब्द मावळे निःशब्दीं । निःशब्दचि बोलिजे शब्दीं ।
तोचि अर्पणाचा विधी । जाण त्रिशुद्धी समर्पितेनिशीं ॥ ३९२ ॥
निःशब्दामध्यें शब्द लय पावतो, निःशब्द वस्तुच शब्दांनी बोलली जाते. अर्पणकर्त्यासह खरोखरीचा अर्पणविधि हाच असे समज ९२.

बोलु बोलविता बोला‍आंतु । तो बोलु अर्पणेंसींच येतु ।
ऐसा शब्देंचि भजनार्थु । प्रकटे परमार्थु ब्रह्मार्पणेंसीं ॥ ३९३ ॥
बोल बोलविणारा तो बोलाच्या आंत आहे असे मानले, म्हणजे ते बोल कृष्णार्पणानेंच उठतात. असें शब्दरूपानेंच भजन होऊन ब्रह्मार्पणासह परमार्थ प्रगट होतो ९३.

ऐसा मनें-कर्में-वचनें । जो दृढावला भगवद्‍भजनें ।
तेंचि भजन अभिमानें । निजनिर्वाणें दृढ धरी ॥ ३९४ ॥
(आतां ‘अभिमानाचें’ अर्पण सांगतात)- वर सांगितल्याप्रमाणें मनाने, कर्मानें व वचनानें भगवद्‌भजनामध्यें जो दृढावला, तोच ते भजन अभिमानानें दृढतर धरून राहतो ९४.

तरंग समुद्रा‍आंतौता । म्हणे माझेनि मेघु तत्त्वतां ।
जगातें निवविता जीवविता । तृषा हरिता चातकांची ॥ ३९५ ॥
समुद्राच्या आंत असलेली लाट म्हणते की, खरोखर पाहिले तर जगाला शांत करणारा व पोसणारा, आणि चातकाची तृषा हरण करणारा जो मेघ, तो माझ्यापासूनच झाला आहे ९५.

माझेनि सस्यें पिकतीं । माझेनि सरिता उसळती ।
मागुती मजमाजीं मिळती । समरसती सिंधुत्वें ॥ ३९६ ॥
माझ्याच योगानें धान्ये पिकतात, माझ्याच योगानें नद्या भरून वाहतात, आणि पुन्हा त्या समुद्राशी ऐक्यता पावून मलाच येऊन मिळतात ९६.

तेवीं मुळींचें पूर्णपण । पावोनि भजे अभिमान ।
त्याचे भजनाचें लक्षण । सावधान अवधारीं ॥ ३९७ ॥
ह्या न्यायानें भगवद्‌भक्त हा मूळचें पूर्णत्व पावून त्या पूर्णत्वाच्या अभिमानानें भजूं लागतो. त्या भजनाचे लक्षणही चित्त देऊन ऐक ९७.

म्हणे मी सकललोककर्ता । कर्म करोनि अकर्ता ।
मी सर्वभोगभोक्ता । नित्य अभोक्ता मी एकु ॥ ३९८ ॥
तो म्हणतो की, त्रिभुवनाचा कर्ता तो मी; कर्म करून अकर्ता व सर्व प्रकारचे भोग भोगून नित्य अभोक्ता असणाराही मीच एक ९८.

सकळ लोकीं माझी सत्ता । सकळीं सकळांचा नियंता ।
सकळां सकळत्वें मी प्रकाशिता । होय मी शास्ता सकळिकांचा ॥ ३९९ ॥
सर्व लोकांमध्यें माझीच सत्ता आहे ; सर्वांमध्यें सर्वांचा नियंता तो मीच; सर्वांना सर्वपणानें प्रकाशविणाराही मीच ; तसाच सर्वांचा शास्ताही मीच होय ९९.

सकळां भूतीं मी एकु । मीचि व्याप्य व्यापकु ।
जनिता जनयिता जनकु । न होनि अनेकु जगद्‌रूप मी ॥ ४०० ॥
सर्व प्राणिमात्रामध्यें मी एकच आहे ; व्याप्य व व्यापक मीच ; उत्पन्न होणारा व उत्पन्नकर्ताही मीच ; एकत्व न मोडतां जगद्‌रूप होणारा मीच ४००.

मी देवांचा आदिदेवो । देवीं देवपणा माझाचि भावो ।
व्ययामाजीं मी अज अव्ययो । अक्षरीं अक्षरभावो माझेनि अंगें ॥ ४०१ ॥
देवांचा आदिदेव तो मी; देवांमध्यें देवपणा आहे तो माझाच भाव होय. विनाशी पदार्थात मी अव्यय व अज आहे. अक्षरामध्यें अक्षरधर्म जो दिसतो तो माझ्यामुळेच. १.

ईश्वरीं जे जे सत्ता । ते ते माझी सामर्थ्यता ।
भगवंतीं भगवंतता । जाण तत्त्वतां माझेनि ॥ ४०२ ॥
ईश्वराच्या ठायीं जी जी म्हणून सत्ता आहे, तें तें सर्व माझेच सामर्थ्य. भगवंतामध्यें भगवंतपणा म्हणून जो आहे तो खरोखर माझ्याचमुळें २.

मी आपरूपीं आपु । मी प्रकृतिपुरुषांचा बापु ।
सृष्टिरचनेचा संकल्पु । निर्विकल्पु पैं माझा ॥ ४०३ ॥
जलरूपामध्यें रसरूप मी ; प्रकृतिपुरुषांचा जनक तो मी; सृष्टिरचनेचा संकल्प तो माझा, पण वस्तुतः मी निर्विकल्प ३.

मी आदीची अनादि आदी । मी समाधीची निजसमाधी ।
निजशुद्धीसी माझेनि शुद्धी । यापरी त्रिशुद्धी अभिमानार्पण ॥ ४०४ ॥
सर्व कारणांचें अनादिकारण मी; समाधीची मूळ समाधि मी; आत्मशुद्धीला शुद्धि प्राप्त झाली ती माझ्याचमुळे. अभिमानाचें कृष्णार्पण होतें तें वस्तुतः अशा प्रकारे ४.

मी अजन्मा न जन्मोनि जन्में । मी अकर्मा न करोनि करीं कर्में ।
माझेनि योगें पुरुषोत्तमें । पाविजे महिमे उत्तमत्वाचे ॥ ४०५ ॥
मी अजन्मा असतां न जन्मतां जन्म घेतो. मी अकर्मा असून कर्म न करितां कर्मे करतो. पुरुषोत्तमाला उत्तमत्वाचा महिमा माझ्यामुळेच प्राप्त झाला आहे ५.

सच्छब्दें माझें अंग । चिच्छब्दें मीचि चांग ।
न होनिया तिन्ही भाग । आनंद निर्व्यंग तोचि मी ॥ ४०६ ॥
‘सत्’ शब्दानें माझ्याच अंगाचा बोध होतो; ‘चित्’ शब्दानें तर मीच स्पष्ट आहे; सत्, चित् व आनंद हे तीन भिन्न धर्म न होतां निर्व्यंग असा जो ‘आनंद’ तोच मी आहे ६.

माझेनि सूर्यदृष्टी डोळस । मजमाजीं चिदाकाशाचा अवकाश ।
माझेनि अंगें जगन्निवास । सावकाश नांदतु ॥ ४०७ ॥
माझ्यामुळेच सूर्याची दृष्टि डोळस झाली आहे. माझ्यामध्येंच चिदाकाशाचा अवकाश आहे. जगन्निवास हा माझ्यामुळेच जगांत आनंदानें नांदतो ७.

अजा अजपणें मी अज । निःशेष निर्बीजां मी बीज ।
माझेनि निजांगें निज । निजभोज स्वयें नाचे ॥ ४०८ ॥
मी अज आहे. माझ्या अजत्वानेंच मायेला अजत्व प्राप्त झाले आहे. निःशेष निर्बीज पदार्थाचे बीज मी आहे. माझ्याच स्वरूपानें आत्मस्वरूप प्रगट होऊन नाचत असते ८.

अधिष्ठाना मजमाजीं अधिवासु । मी जगदीशाचा पूर्ण ईशु ।
मी परम पुरुषाचाही पुरुषु । परेशा परेशु मीच स्वयें ॥ ४०९ ॥
अधिष्ठानाचे वास्तव्य माझ्यामध्येंच आहे. जगदीश्वराचा पूर्ण ईश्वर मी आहे. परमपुरुषाचा पुरुष मी आहे, आणि परेशाचा परेशही स्वतः मीच होय ९.

असंत माझेनि संत होये । अचित् माझेनि चिदत्व लाहे ।
निजानन्दासीही पाहें । आनंदु निर्वाहे माझेनि ॥ ४१० ॥
असत् वस्तु माझ्या योगानें सत्तावान होतात. अचित् म्हणजे जड वस्तूंना माझ्या योगानें सचेतनत्व मिळते. निजानंदालाही माझ्याच योगानें आनंदत्व प्राप्त होते ४१०.

मी सकळ सिद्धींची निजसिद्धी । मी सर्वांगदेखणी बुद्धीची बुद्धी ।
मोक्ष म्हणणें तोही उपाधी । जाण त्रिशुद्धी माझेनि ॥ ४११ ॥
मीच सर्व सिद्धींची मूळ सिद्धि; बुद्धीची सर्वांगदेखणी बुद्धि मीच; मोक्ष म्हणणे ही एक उपाधिच माझ्यामुळें सिद्ध होते ११.

मी साचार निजधर्म । मजमाजीं ब्रह्म विसरे कर्म ।
ब्रह्मसमाधीचें परब्रह्म । निजनिःसीम मीच मी ॥ ४१२ ॥
खरोखरीचा धर्म तो मी आहे. माझ्यामध्यें ब्रह्म हे कर्म विसरून जाते. ब्रह्मसमाधीची परमावधि असें जें परब्रह्म तें मीच आहे १२.

हरि-हर-ब्रह्मा निजनिर्धारीं । हेही माझे अंशांशधारी ।
मी दशावतारांचा अवतारी । माझी निजथोरी मीही नेणें । ॥ ४१३ ॥
ब्रह्मा, विष्णु, महेश्वर हेही खरोखर माझ्या अंशाचा अंश धारण करणारे आहेत. मीच दशावतारांचा अवतारी आहे. माझी खरी खरी थोरवी मलाही कळत नाहीं १३.

ऐशिया नाना विवंचना । अभिमानें भजे भगवद्‌भजना ।
“ब्रह्माहमस्मि” दृढभावना । आपण आपणा पूर्णत्वें अर्पी ॥ ४१४ ॥
अशा प्रकारे अनेक विचारांच्या अभिमानानें तो भगवद्‌भजन करतो, आणि ‘अहं ब्रह्मास्मि’ म्हणजे मी ब्रह्म आहे ह्या दृढभावनेनें आपणच आपल्याला पूर्णत्वानें समर्पण करतो १४.

जीव घालूनि पुर्णत्वा‍आंतु । जें जें अभिमान कल्पितु ।
तें तें साचचि स्वयें होतु । तेंही पूर्णत्व अर्पितु निजपूर्णत्वीं ॥ ४१५ ॥
पूर्णत्वामध्यें जीव घालून अभिमान ज्या ज्या कल्पना करतो तें तें खरोखर तो स्वतःच होतो, आणि तें पूर्णत्वही आपल्या मूळच्या पूर्णत्वांत अर्पण करतो १५.

“ब्रह्माहमस्मि” नुसधें वचन । ये अहंते नाम भगवद्‌भजन ।
मा हा तंव तद्‌रूप हो‍ऊन । भजे अभिमान ब्रह्मार्पणेंसीं ॥ ४१६ ॥
‘ब्रह्माहमस्मि’ असें जे नुसतें वचन आहे, त्या अहंतेला भगवद्‌भजन म्हणतात. मग हा तर तद्‌रूप होऊन आणि अभिमान ब्रह्मार्पण करूनच भजन करूं लागतो १६.

सांडूनि देहबुद्धीचा केरु । भजनें उठिला अहंकारु ।
तो अपरोक्ष निजसाक्षात्कारु । पावूनि पूर्ण निर्धारु पूर्णत्वें वर्ते ॥ ४१७ ॥
देहबुद्धीचा केर झाडून काढून अशा भजनानें जो अहंकार उठतो, तोच अपरोक्ष आत्मस्वरूपसाक्षात्कार होय. असा पूर्ण निर्धार पावून तो पूर्णत्वानें वागूं लागतो १७.

म्हणौनि मनना मीचि मनन । स्मरणा मीचि नित्य स्मरण ।
चित्तासी मी निजचिंतन । चिंत्यधर्मेंवीण सर्वदा ॥ ४१८ ॥
म्हणून मननाचे मनन ते मीच, स्मरणाचे नित्यस्मरण मीच; चित्ताला चिंतनधर्मावांचून आत्मचिंतन होतें तें मीच १८.

ज्याची सहसा प्राप्ति नव्हे । तें निजचित्तेंचि चिंतावें ।
तंव अप्राप्तीची प्राप्ति पावे । चित्त निजानुभवें सहज भजतां ॥ ४१९ ॥
ज्याची सहसा प्राप्ति होत नाही, ते निजचित्तानें चिंतावे; अशा प्रकारे चित्त स्वानुभवानें भजूं लागले असतां अप्राप्त म्हणून वाटते त्याची प्राप्ति होते १९.

तेव्हां निश्चितें जें जें चिंती चित्त । तें तें स्वयेंचि होय समस्त ।
या प्रतीतीं चित्त भजत । ब्रह्मार्पणयुक्त निजबोधें ॥ ४२० ॥
तेव्हां चित्त निश्चयेंकरून जे जे चिंत्तन करू लागते तें तें सारे स्वतः तेंच बनते. ह्या प्रतीतीनें चित्त निजबोधेंकरून युक्त होऊन भजू लागते ४२०.

नाथिलें चिंती ते “अतिचिंता” । आथिलें ते “निश्चिंतता” ।
आथी नाथी सांडिली चिंता । सहजें न भजतां भजन होये ॥ ४२१ ॥
नसलेल्याचे चिंतन करणे ती ‘अतिचिंता’ आणि असलेल्याचे चिंतन करणे ती ‘निश्चिंतता’ होय. पण आहे व नाहीं ह्या दोन्ही भावांचे चिंतन सोडून दिले म्हणजे न भजतांही भजन घडते २१.

चित्त चिंत्य आणि चिंतन । यापरी तिहींस जाहलें समाधान ।
तें समाधानही कृष्णार्पण । सहजी संपूर्ण स्वयें होये ॥ ४२२ ॥
चित्त, चिंत्य आणि चिंतन ह्या तिहींना समाधान (म्ह. त्रिपुटीचे ऐक्य) झाले असतां, तें समाधानसुद्धा पूर्णपणे सहज कृष्णार्पण होते २२.

ऐसिया भगवद्‌भजनविधीं । भजनशील झाली बुद्धी ।
तैं सकळ कर्मीं समाधी । जाण त्रिशुद्धी स्वयें झाली ॥ ४२३ ॥
अशा भगवद्‌भजनाच्या विधीनें बुद्धि भजनशील झाली म्हणजे सकल कर्मांमध्येंही निश्चयेंकरून आपोआप समाधि प्राप्त होते २३.

कर्माचरणीं समाधी । एक म्हणती न घडे कधीं ।
तें पावले नाहीं निजात्मबोधीं । जाण त्रिशुद्धी विदेहा ॥ ४२४ ॥
कोणी म्हणतात की, ‘कर्माचरणामध्यें समाधि कधीच संभवत नाही.’ त्यांना हे जनकराजा ! आत्मस्वरूपाचा बोध झालाच नाहीं असें तू खचित समज २४.

ताटस्थ्या नांव समाधी । म्हणेल त्याची ठकली बुद्धी ।
ते समाधी नव्हे त्रिशुद्धी । जाणावी नुसधी मूर्छा आली ॥ ४२५ ॥
जो तटस्थपणाला ‘समाधि’ हे नांव देतो, त्याची बुद्धि चकली म्हणावी; कारण ती खरोखरीची समाधि नसून केवळ ‘मूर्छा’ आहे असे समजावें २५.

ताटस्थ्यापासूनि उठिला । तैं तो समाधीस मुकला ।
तेव्हां एकदेशी भावो आला । मंदही या बोला न मानिती सत्य ॥ ४२६ ॥
तटस्थपणापासून उठला म्हणजे जागा झाला, की तो समाधीला मुकला. अर्थात् हा एकदेशी भाव झाला. मतिमंद लोक देखील हे भाषण खरे मानणार नाहींत २६.

समाधी आणि एकदेशी । बोलतां बोलणें ये लाजेसी ।
सत्य मानी ते शब्दपिशी । शुद्ध स्वरूपासी अनोळख ॥ ४२७ ॥
समाधि आणि ती एकदेशी, हे बोलणेसुद्धा लजास्पद आहे. असे असतांही ते जे खरें मानतील, ते केवळ शब्दपांडित्य करणारे , त्यांना शुद्ध स्वरूपाची ओळख नाहीं असे समजावें २७.

येथें प्राचीन अतिसमर्थ । तें मूर्च्छा आणोनि करी तटस्थ ।
वांचूनि चालते बोलते समाधिस्थ । जाण पां निश्चित वसिष्ठादिक ॥ ४२८ ॥
येथे प्राचीन म्हणजे प्रारब्ध अति समर्थ असल्यामुळें ते मूर्छा आणून निचेष्ट करते. खरोखर पाहिले असतां चालते बोलते समाधिस्थ वसिष्ठादिकच होत २८.

पाहें पां देवर्षि नारदु । विनोदें न मोडे समाधिबोधु ।
याज्ञवल्क्याचा समाधिसंबंधु । ऋषिप्रसिद्धु परिक्षा केली ॥ ४२९ ॥
देवर्षि नारदच पाहा. त्याच्या विनोदकर्मानेंही समाधीचा कधीच भंग होत नाही; (तो निरंतर चालता-बोलतांना व फिरतां-सवरतांनासुद्धा समाधिस्थितींतच असतो) याज्ञवल्क्याच्या समाधीसंबंधाची तर प्रसिद्ध ऋषींनी परीक्षासुद्धा पाहिली आहे २९.

स्वरूप देखोनि मूर्च्छित जाहला । तो आपणियां आपण तरला ।
स्वयें तरूनि जन उद्धरिला । तो बोधु प्रकाशिला शुकवामदेवीं ॥ ४३० ॥
स्वरूप पाहून मूर्छित होतो तो आपला आपण मात्र तरतो; परंतु स्वतः तरून दुसऱ्यासही तारणारे असे ज्ञान शुकवामदेवादिकांनीच प्रकट केले आहे ४३०.

यालागीं समाधि आणि व्युत्थान । या दोनी अवस्थांसहित जाण ।
बुद्धी होये ब्रह्मार्पण । अखंडत्वें पूर्ण परमसमाधि ॥ ४३१ ॥
ह्याकरितां समाधि आणि व्युत्थान ह्या दोन्ही अवस्थांसहवर्तमान बुद्धि ब्रह्मार्पण होते, तीच अखंड व परिपूर्ण समाधि होय ३१.

अर्जुना दे‍ऊनि निजसमाधी । सवेंचि घातला महायुद्धीं ।
परी तो कृष्ण कृपानिधी । ताटस्थ्य त्रिशुद्धी नेदीच स्पर्शों ॥ ४३२ ॥
श्रीकृष्णानें आत्मसमाधि देऊन लागलेंच घोर युद्धांत ढकललें. परंतु त्या करुणानिधि कृष्णानें त्याला तटस्थपणाचा स्पर्शसुद्धा होऊ दिला नाहीं ३२.

सकळ कर्मीं समाधी । हे सद्‌गुरुचि बोधी बुद्धी ।
तरी बुद्धींही त्रिशुद्धी । निजसमाधी न मोडे ॥ ४३३ ॥
सर्व प्रकारच्या कर्मामध्येंही समाधि असावी हें ज्ञान, बुद्धीला एक सद्गुरुच देतात; म्हणून खरोखर युद्धासारख्या ‘घोर’ कर्मांतसुद्धां आत्मसमाधीचा भंग होत नाहीं ३३.

बुद्धीं आकळलें परब्रह्म । तैं अहैतुक चाले कर्म ।
हेंचि बुद्धीचें अर्पण परम । इतर तो भ्रम अनुमानज्ञान ॥ ४३४ ॥
बुद्धीनें परब्रह्माचे आकलन केलें म्हणजे कोणतेंही कर्म आहेतुकच चालते; हेंच बुद्धीचे खरेखुरे अर्पण आहे. इतर जें आनुमानिक ज्ञान, तो भ्रम होय ३४.

स्वरूपीं दृष्टी निवधी । अनवच्छिन्न समानबुद्धी ।
कर्माकर्मीं अज्ञान न बाधी । “परमसमाधी” तिये नांव ॥ ४३५ ॥
स्वरूपांत पराकाष्ठेची तन्मय दृष्टि व कधीं न तुटणारी अशी सर्वत्र समबुद्धि ज्याची असते, त्याला कर्माकार्मांतही अज्ञानाची बाधा होत नाही. अशा स्थितीचेच नांव ‘परमसमाधि’ होय ३५.

निःशेष गेलिया देहबुद्धी । स्वरूपपणें फुंज न बाधी ।
कर्माकर्मीं अज्ञान न बाधी । ते ‘परमसमाधी’ निर्दुष्ट ॥ ४३६ ॥
देहबुद्धि निखालस गेली म्हणजे स्वस्वरूपानुभवानें अहंकाराची बाधा होत नाही. आणि कर्माकर्मांमध्यें अज्ञानाची बाधा होत नाही, हीच निर्दोष ‘परमसमाधि’ होय ३६.

ते स्वरूपीं निरवधी । भजनशीळ झाली बुद्धी ।
ते सकळ कर्मीं समाधी । निजार्पणविधी स्वयें जाहली ॥ ४३७ ॥
सदासर्वकाळ स्वस्वरूपामध्यें बुद्धि भजनशील झाली म्हणजे ती कोणत्याही कर्मामध्यें आपण स्वतःच श्रीकृष्णार्पण होते ३७.

जेथें शमली मनाची आधी । ते जाणावी ‘परमसमाधी’ ।
समाधी घेणें ते देहबुद्धी । काष्ठ तें त्रिशुद्धी मूर्च्छितप्राय ॥ ४३८ ॥
मनाची आधि म्हणजे तळमळ अगदी शांत होणे तिचेच नांव ‘परमसमाधि’. देहबुद्धि न सोडतां प्राणवायु कोंडून समाधि लावणे ती लाकडासारखी जड म्हणजे मूर्छावस्थेप्रमाणेंच स्थिति होय असें खास समजावे ३८.

मनासी ठा‍उकें नसे । इंद्रियीं व्यापारु तरी दिसे ।
कर्म निपजे जें ऐसें । तें जाणिजे आपैसें ‘कायिक’ ॥ ४३९ ॥
(आता ‘कायिक ‘ कर्माचे लक्षण सांगतात) मनास तर जाणीव नाही, पण इंद्रियांचा व्यापार तर चाललेला दिसतो. अशा प्रकारें जें जें कर्म निपजत असते, ते सहजच ‘कायिक’ म्हणजे नुसतें देहाचे कर्म असें जाणावें ३९.

श्वासोच्छ्वासांचे परिचार । कां निमेषोन्मेषांचे व्यापार ।
तेही नारायणपर । केले साचार निजस्वभावें ॥ ४४० ॥
श्वासोच्छ्‍वासांचे चलन किंवा डोळ्यांची उघडझाप करणें हेंही खरोखर त्यानें नारायणपरच केलेले असते ४४०.

तरी देहगेहवर्णाश्रमें । स्वभागा आलीं जीं जीं कर्में ।
तीं तीं आचरोनि निजधर्में । पूर्वानुक्रमें अनहंकृती ॥ ४४१ ॥
घरदार, शरीर व वर्णाश्रमधर्म यांच्यायोगे आपल्या वाट्यास जी जी कर्में आलेली असतात, तीं तीं तो कर्तव्यबुद्धीनें पूर्वी सांगितल्याप्रमाणें अभिमानरहित होऊन करीत असतो ४१.

साखरेचें कारलें प्रौढ । तें देठू-कांटेनशीं सर्वही गोड ।
तेवीं इंद्रियकर्मगूढ । स्वादिष्ठ सदृढ ब्रह्मार्पणें ब्रह्मीं ॥ ४४२ ॥
साखरेचे मोठे थोरलें कारले केलें, तरी त्याचा देंठ व कांटेसुद्धा जसे गोडच असतात; त्याप्रमाणें सारे इंद्रियांचे कर्म ब्रह्मार्पणाच्या योगानें ब्रह्मामध्यें गोडच गोड अर्थात् ब्रह्मरूपच होऊन जातें ४२.

कर्मकलापु आघवा । आचरोनि आणि गौरवा ।
परी कर्तेपणाचिया गांवा । अहंभावो स्पर्शेना ॥ ४४३ ॥
तो एकंदर कर्मसमूह यथास्थित आचरून त्याचा गौरव करतो, पण कर्तेपणाच्या अभिमानाच्या गांवांत पाऊलसुद्धां ठेवीत नाहीं ४३.

मजपासून झालें सत्कर्म । माझा आचार अति उत्तम ।
म्यां निरसिलें मरणजन्म । हा स्वभावें देहधर्म उठोंचि नेणे ॥ ४४४ ॥
माझ्याकडून सत्कर्म घडले; माझे आचरण अत्यंत उत्तम ; जन्ममरणाचे मी निरसन केलें; हा स्वाभाविक देहधर्म त्याच्यामध्यें कधी उठतच नाहीं ४४.

देहसंगें तरी वर्तणें । परी देहधर्म धरूं नेणे ।
देहस्वभाव लक्षणें । ब्रह्मार्पणें विचरिती ॥ ४४५ ॥
देहसंगानें तर वागत असतो, पण देहधर्म मात्र धरीत नसतो. त्याची सारी देहस्वभावाची लक्षणें ब्रह्मार्पणानेंच चालत असतात ४५.

देहधर्माचा नुठे फांटा । ज्ञानगर्वाचा न चढेचि ताठा ।
यालागीं सहज भजनामाजिवटा । झाला तो पैठां अनहंकृती ॥ ४४६ ॥
देहधर्माचा अंकुर त्याच्यांत उठत नाही, ज्ञानगर्वाचा ताठा त्याला चढत नाहीं, यामुळें सहजभजनामध्यें तो अनहंकृतीनेंच नेहमी वावरत असतो ४६,

त्यापासूनि जें जें निपजे । तें तें देवो म्हणे माझें खाजें ।
यालागीं ब्रह्मार्पणवोजें । त्याचे स्वभाव सहजें नार्पितां अर्पिती ॥ ४४७ ॥
त्याच्यापासून जें जें कांही उत्पन्न होतें, तें तें सारे माझे गोड खाद्य आहे असे देव म्हणतो. या प्रकारें ब्रह्मार्पणत्वामुळें तशा भक्ताचे सारे स्वभाव अर्पण न करितां सहजच अर्पण होत असतात ४७.

परिसाचे कसवटीवर्‍हें । जें जें लागे तें तें साडेपंधरें ।
तेवीं निपजे जें जें शरीरें । तें तें खरें परब्रह्म ॥ ४४८ ॥
परिसाच्या कसोटीवर जें हें लोखंड लागते, तें तें सारे साडेपंधराच्या दराचे म्हणजे अतीव शुद्ध बावनकशी सोनेंच बनते, त्याप्रमाणें त्याच्या शरीराकडून जें जें कर्म घडतें, तें तें खरेखुरे परब्रह्म असते ४८.

त्याचा खेळु तेंचि महापूजन । त्याची बडबड तेंचि प्रिय स्तवन ।
त्याचे स्वभावीं स्वानंदपूर्ण । श्रीनारायण सुखावे ॥ ४४९ ॥
त्याचा खेळ तेंच महापूजन; त्याची बडबड तेंच महास्तवन; याप्रमाणें त्याच्या स्वाभाविक कर्मानें स्वानंदपूर्ण श्रीनारायण सुखी होतो ४९.

तो जे‍उती वास पाहे । आवडीं देवो ते‍उता राहे ।
मग पाहे अथवा न पाहे । तरी देवोचि स्वयें स्वभावें दिसे ॥ ४५० ॥
तो ज्या वाटेकडे पाहतो, त्या वाटेकडे देव आनंदानें उभा राहतो; मग त्यानें पाहिले किंवा न पाहिले तरी, त्याला स्वाभाविकपणे देवच दिसतो ४५०.

तयासी चालतां मार्गें । तो मार्गु हो‍इजे श्रीरंगें ।
तो देवाचिया दोंदावरी वेगें । चाले सर्वांगें डुल्लत ॥ ४५१ ॥
तो ज्या मार्गानें चालतो, तो मार्गच श्रीरंग आपण होतो, अर्थात तो देवाच्या पोटावरूनच खुशाल सर्वांगांनी डुलत चालतो ५१.

जें जें कर्म स्वाभाविक । तें तें ब्रह्मार्पण अहेतुक ।
या नांव भजन निर्दोख । ‘भागवतधर्म’ देख या नांव ॥ ४५२ ॥
त्याजकडून स्वाभाविकपणे जें जें कर्म घडतें, तें तें अहेतुकपणे ब्रह्मार्पणच होतें; ह्यांचेंच नांव निर्दोष ‘भजन’ व याचेंच नांव शुद्ध ‘भागवत’ धर्म ५२.

स्वाभाविक जे वर्तन । तें सहजें होय ब्रह्मार्पण ।
या नांव शुद्ध आराधन । भागवतधर्म पूर्ण जाण राया ॥ ४५३ ॥
स्वाभाविक जें वर्तन होत असते, तें साहजिक ब्रह्मापर्णच होते; ह्याचेच नांव शुद्ध ‘आराधन.’ हे जनक राजा ! पूर्ण ‘भागवतधर्म’ म्हणतात तो हाच असे समज ५३.

यापरी भगवद्‌भजनपथा । भय नाहीं गा सर्वथा ।
‘अभय’ पुशिलें नृपनाथा । तें जाण तत्त्वतां भजनें होय ॥ ४५४ ॥
अरे ! अशा प्रकारच्या भगवद्‌भजनमार्गाला कधींच कशाचें भय नाही. हे नृपनाया ! तूं ‘अभय ‘ म्हणून विचारलेंस, तें या भजनानेंच निश्चयानें प्राप्त होते ५४.

येथें भयाचें कारण । राया तूं म्हणशील कोण ।
तेंही सांगों सावधान । ऐक श्रवणसौभाग्यनिधी ॥ ४५५ ॥
राजा ! ह्यांत भयाचे कारण कोणते, असे जर तूं विचारशील तर तेही सांगू. हे श्रवणसौभाग्यनिधे ! सावधान मनानें श्रवण कर ५५.

भयं द्वितीयाभिनिवेशतः स्यात्
ईशादपेतस्य विपर्ययोऽस्मृतिः ।
तन्माययातो बुध आभजेत्तं
भक्त्यैकयेशं गुरुदेवतात्मा ॥ ३७ ॥
श्लोक ३७- जो ईश्वराला विन्मुख झाला, त्याला त्याच्या मायेमुळे आपल्या स्वरूपाची विस्मृती होते आणि त्यामुळे देह म्हणजेच मी असा त्याला भ्रम होतो या आत्म्याखेरीज दुसरे काही मानण्यामुळे भय उत्पन्न होते म्हणून गुरूंनाच आपले आराध्यदैवत मानून अनन्य भक्तीने त्या ईश्वराचे भजन करावे. (३७)

आतां पूर्णत्वें सर्वत्र एक । तेथ जो म्हणे मी वेगळा देख ।
तेंचि अज्ञान भयजनक । दुःखदायक अतिद्वंद्वें ॥ ४५६ ॥
आत्मा पूर्णत्वेंकरून सर्वत्र एकच आहे, तथापि ‘त्याच्याहून मी भिन्न आहे’ असे म्हणणे सेंच भयजनक अज्ञान आहे. त्यांत द्वंद्व म्हणजे भेदभाव उत्पन्न होत असल्यामुळें ते अत्यंत दुःखदायक होते ५६.

भयाचें मूळ दृढ अज्ञान । त्याचें निवर्तक मुख्य ज्ञान ।
तेथ कां लागलें भगवद्‌भजन । ऐसा ज्ञानाभिमान पंडितां ॥ ४५७ ॥
दृढ अज्ञान हेंच जर भयाचे मूळ आहे आणि ज्ञान हेंच मुख्यतः त्या अज्ञानाचे निवर्तक आहे, तर मग तेथे भगवद्‌भजन कुठून लागले ? असा पंडित लोकांना ज्ञानाभिमान असतो ५७.

ऐक राया येचि अर्थी । ज्ञानासी कारण मुख्य भक्ती ।
हा कृतनिश्चयो आमुच्या मतीं । तेही उपपत्ती अवधारीं ॥ ४५८ ॥
याकरितां राजा ! तुला सांगतों ऐक. ज्ञानाला मुख्य कारण भक्ति आहे, असा आमचा ठाम सिद्धान्त आहे. त्याचेही कारण ऐक ५८.

अज्ञानाचें मूळ माया । जे ब्रह्मादिकां न ये आया ।
गुणमयी लागली प्राणियां । जाण ते राया अति दुस्तर ॥ ४५९ ॥
जी ब्रह्मादिकांनाहीं आवरत नाहीं ती माया हेंच अज्ञानाचे मूळ आहे. ती त्रिगुणात्मक असून प्राण्यांच्या मागे लागलेली आहे, आणि ती अत्यंत दुस्तर आहे असे तूं समज ५९.

त्या मायेचें मुख्य लक्षण । स्वस्वरूपाचें आवरण ।
द्वैतांचें जें स्फुरे स्फुरण । “मूळमाया” जाण तिचें नांव ॥ ४६० ॥
स्वस्वरूप झाकून टाकणे, हेंच त्या मायेचे मुख्य लक्षण आहे. द्वैताचे स्फुरण होणे यालाच ‘मूळमाया’ हें नांव आहे ४६०

ब्रह्म अद्वयत्वें परिपूर्ण । ते स्वरूपी स्फुरे जें मीपण ।
तेंचि मायेचें जन्मस्थान । निश्चयें जाण नृपनाथा ॥ ४६१ ॥
ब्रह्म हे अद्वैतपणानें परिपूर्ण आहे, हे राजा ! त्या अद्वैतस्वरूपामध्यें ‘मीपण’ म्हणून जें उत्पन्न होते, तेच खरोखर मायेचे जन्मस्थान असें तूं जाण ६१.

ते मायेच्या निजपोटीं । भयशोकदुःखांचिया कोटी ।
ब्रह्माशिवादींचे लागे पाठी । इतरांची गोठी ते कोण ॥ ४६२ ॥
त्या मायेच्या पोटामध्यें भय, शोक, आणि दुःखांच्या राशीच्या राशी भरलेल्या आहेत. ती ब्रह्मदेव व शंकर अशा सारख्यांच्यासुद्धा पाठीस लागते, मग इतरांची काय कथा ? ६२.

ते माहामायेची निवृत्ती । करावया दाटुगी भगवद्‌भक्ती ।
स्वयें श्रीकृष्ण येचि अर्थीं । बोलिला अर्जुनाप्रती गीतेमाजीं ॥ ४६३ ॥
त्या महामायेची निवृत्ति करावयाला एक भगवद्‌भक्तिच समर्थ आहे. गीतेमध्ये प्रत्यक्ष श्रीकृष्णांनी अर्जुनाला असेच सांगितले आहे ६३.

” मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते ” भ. गीता-७.१४
श्लोक – जे लोक मलाच शरण येतात, ते या मायेला तरून जातात. गीता-७.१४

माया म्हणिजे भगवच्छक्ती । भगवद्‌भजनें तिची निवृत्ती ।
आन उपाय तेथें न चलती । भक्त सुखें तरती हरिमाया ॥ ४६४ ॥
भगवद्‌गीतेचें तें वचन – “मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते” (ह्याचा अर्थ) माया म्हणजे भगवंताची शक्ति होय; तिची निवृत्ति करावयाला भगवद्‌भजनच पाहिजे; त्या ठिकाणी अन्य उपाय चालावयाचे नाहीत. भगवंताचे भक्त असतात तेच हरीची माया सुखाने तरून जातात ६४

हरीची माया हरिभजनें । हरिभक्तीं सुखेंचि तरणें ।
हें निजगुह्य अर्जुनाचेनि कारणें । स्वयें श्रीकृष्णें सांगितलें ॥ ४६५ ॥
हरीचे भक्त हरिभजनानेंच हरीची माया सुखानें तरून जातात, हे आपल्या अंत:करणांतील गुप्त स्वतः श्रीकृष्णांनी अर्जुनास प्रकट केले ६५,

मायेचि हेचि निजपुष्टी । स्वरूपीं विमुख करी दृष्टी ।
द्वैतभावें अत्यंत लाठी । भ्रमाची त्रिपुटी वाढवी सदा ॥ ४६६ ॥
मायेच्या अंगचा हाच गुण मोठा आहे की, ती जीवाची दृष्टि स्वरूपापासून विन्मुख करते, आणि द्वैतभावाने बलाढ्य होऊन सदासर्वकाल भ्रमाची त्रिपुटी (दृश्य, दर्शन, द्रष्टा अशी भावना) वाढवीत असते ६६.

भयाचें जनक द्वैतभान । द्वैतजनक माया जाण ।
मायानिवर्तक ब्रह्मज्ञान । हें संत सज्ञान बोलती ॥ ४६७ ॥
द्वैताचें भान हें भयाचें जनक व माया ही द्वैताची जनक असें तूं जाण. अशा त्या मायेचे निवर्तक ब्रह्मज्ञान होय, असें ज्ञानसंपन्न साधुसंत सांगतात ६७.

ऐसें श्रेष्ठ जें ब्रह्मज्ञान । तें भक्तीचें पोसणें जाण ।
न करितां भगवद्‌भजन । ब्रह्मज्ञान कदा नुपजे ॥ ४६८ ॥
पण असें श्रेष्ठ जें ब्रह्मज्ञान, ते भक्तीचे पोसकें मूल आहे, हें लक्षात ठेव. भगवद्‌भजन केलें नाहीं तर ब्रह्मज्ञान कधीही प्राप्त व्हावयाचे नाहीं ६८.

जरी जाहले वेदशास्त्रसंपन्न । तिहीं न करितां भगवद्‌भजन ।
मायानिवर्तक ब्रह्मज्ञान । तयांसीही जाण कदा नुपजे ॥ ४६९ ॥
वेदशास्त्रसंपन्न असले, आणि त्यांनी जर भगवद्‌भजन केलें नाही, तर मायेला परावृत्त करणारें ब्रह्मज्ञान त्यांनाही कधींच प्राप्त व्हावयाचें नाहीं ६९.

शब्दज्ञानाची व्युत्पत्ती । दाटुगी होय लौकिक स्थिती ।
मायानिवर्तक ज्ञानप्राप्ती । न करितां हरिभक्ती कदा नुपजे ॥ ४७० ॥
शब्दज्ञानाची व्युत्पत्ति ही लौकिक वाढवावयाला समर्थ होईल, पण मायेची निवृत्ति करणारे ज्ञान मात्र हरिभक्तीशिवाय कधींही प्राप्त व्हावयाचे नाही ४७०.

हरिगुणांची रसाळ कहाणी । ते ब्रह्मज्ञानाची निजजननी ।
हरिनामाचेनि गर्जनीं । जीव घे‍ऊनि माया पळे ॥ ४७१ ॥
हरिगुणांची रसाळ कथा, तीच ब्रह्मज्ञानाची खरी जननी होय. हरिनामाचा गजर ऐकला की, माया ही जीव घेऊन पळते ७१.

माया पळतां पळों न लाहे । हरिनामधाकें विरोनि जाये ।
यालागीं हरिमाया पाहें । बाधूं न लाहे हरिभक्तां ॥ ४७२ ॥
पण माया पळू लागली तरी तिला पळतां येत नाही. कारण, हरिनामाच्या धाकानें ती जेथल्या तेथे विरूनच जाते. ह्याकरितां हरीची माया ही हरिभक्तांना बाधूं शकत नाहीं ७२.

नामाची परम दुर्धर गती । माया साहों न शके निजभक्ती ।
हरिभक्त माया सुखें तरती । यालागीं श्रीपती बोलिला स्वयें ॥ ४७३ ॥
हरिनामाची शक्ति कांही विलक्षण आहे; तिच्यापुढें मायेचा जोर चालत नाही; म्हणून हरिभक्त आहेत ते सुखाने मायेला तरून जातात, असे प्रत्यक्ष श्रीपतींनी सांगितलें आहे ७३.

सायुज्याच्या चारी मुक्ती । अंकीं वाढवी भगवद्‌भक्ती ।
ते न करितां अनन्यगती । शास्त्रज्ञां मुक्ती न घडे कदा ॥ ४७४ ॥
सलोकता, समीपता, सरूपता व सायुज्यता या चारही मुक्तींना भगवद्‌भक्ति आपल्या मांडीवर वाढविते. अशी भक्ति जर अनन्यभावानें केली नाही, तर शास्त्रज्ञ लोकांना मुक्ति कधींही मिळावयाची नाहीं ७४.

हरिभजनीं जे विमुख । त्यांसी सदा द्वैत सन्मुख ।
महाभयेंसीं दुःखदायक । प्रपंचु देख दृढ वाढे ॥ ४७५ ॥
हरिभजनाला जे विमुख होतात, त्यांच्यापुढे द्वैत सदासर्वकाल उभे असते. त्यांच्या ठिकाणी महाभयासह दुःखदायक प्रपंच दृढत्वानें वाढतच राहतो ७५,

जेवीं एका‍एकीं दिग्भ्रमु पडे । तो पूर्ण म्हणे पश्चिमेकडे ।
तैसी वस्तुविमुखें वाढे । अतिगाढें मिथ्या द्वैत ॥ ४७६ ॥
ज्याप्रमाणें एकाएकी दिशाभूल झालेला मनुष्य पश्चिमेकडेच पूर्व आहे असे म्हणतो, त्याप्रमाणें परब्रह्माशी विमुख झाले म्हणजे मिथ्याद्वैत माजून राहते ७६.

द्वैताचिये भेदविहिरे । सुटती संकल्पविकल्पांचे झरे ।
तेथ जन्ममरणांचेनि पूरें । बुडे एकसरे ब्रह्मांडगोळ ॥ ४७७ ॥
द्वैताच्या भेदरूप विहिरीतून संकल्पविकल्पांचे झरे सुटतात आणि जन्ममरणांचा पूर येऊन त्यांत सरसहा ब्रह्मांडगोळ बुडून जातो ७७.

जन्ममरणांचिया वोढी । नाना दुःखांचिया कोडी ।
अभक्त सोशिती सांकडीं । हरिभक्तांतें वोढी स्वप्नींही न लगे ॥ ४७८ ॥
जन्ममरणाच्या ओढींनी नाना प्रकारच्या दुःखांच्या राशी व परोपरीची संकटें अभक्त लोकच सोशीत असतात. तशी ओढ हरिभक्तांना स्वप्नांतसुद्धा लागत नाहीं ७८.

भक्तीचें अगाध महिमान । तेथें रिघेना भवबंधन ।
तें करावया भगवद्‌भजन । सद्‌गुरुचरण सेवावे ॥ ४७९ ॥
भक्तीचा महिमा अगाध आहे. तिच्यांत संसारबंधन शिरत नाही. असें तें भगवद्‌भजन साधण्यासाठी सद्गुरुचरणाची सेवा करावी लागते ७९.

निजशिष्याची मरणचिंता । स्वयें निवारी जो वस्तुतां ।
तोचि सद्‌गुरु तत्त्वतां । येर ते गुरुता मंत्रतंत्रोपदेशें ॥ ४८० ॥
आपल्या शिष्याच्या मरणाची चिंता जो तत्त्वतः निवारण करतो, तोच खरा सद्गुरु होय. त्याशिवाय इतर प्रकारचा गुरुपणा, तो केवळ मंत्रतंत्रोपदेशापुरताच समजावा. ४८०.

मंत्रतंत्र उपदेशिते । घरोघरीं गुरु आहेत आ‍इते ।
जो शिष्यासी मेळवी सद्वस्तूतें । सद्‌गुरु त्यांते श्रीकृष्ण मानी ॥ ४८१ ॥
मंत्रतंत्रांचा उपदेश करणारे गुरु घरोघर आयते असतात; पण शिष्याला जो सद्‌वस्तूप्रत पोचवितो, त्यालाच श्रीकृष्ण हे सद्गुरु मानतात. ८१.

गुरु देवो गुरु माता पिता । गुरु आत्मा ईश्वर वस्तुतां ।
गुरु परमात्मा सर्वथा । गुरु तत्त्वतां परब्रह्म ॥ ४८२ ॥
गुरुच देव, गुरुच मातापिता, गुरुच आत्मा व ईश्वरही तोच. गुरु हा सर्वथैव परमात्माच आहे. तात्विक दृष्टीनें पाहिले असतां गुरु हा परब्रह्मच आहे ८२.

गुरूचे उपमेसमान । पाहतां जगीं न दिसे आन ।
अगाध गुरूचे महिमान । तो भाग्येंवीण भेटेना ॥ ४८३ ॥
गुरूच्या उपमेला शोभेसें जगांत पाहावयास गेले असतां दुसरे कांहीच मिळणार नाही. गुरूचा महिमा अगाध आहे. भाग्याशिवाय त्याची भेट व्हावयाची नाहीं ८३.

निष्काम पुण्याचिया कोडी । अगाध वैराग्य जोडे जोडी ।
नित्यानित्यविवेकआवडी । तैं पाविजे रोकडी सद्‌गुरुकृपा ॥ ४८४ ॥
निष्काम पुण्याच्या राशी व निस्सीम वैराग्याची जोड पदरी असावी, तशीच नित्यानित्यविवेकाची आवडही उत्पन्न व्हावी, तेव्हांच सद्गुरुकृपा साक्षात् हातास चढते ८४.

सद्‌गुरुकृपा हातीं चढे । तेथें भक्तीचें भांडार उघडे ।
तेव्हां कळिकाळ पळे पुढें । कायसें बापुडें भवभय ॥ ४८५ ॥
सद्गुरुकृपा हातास चढली की, भक्तीचे भांडार उघडते. तेव्हां तिच्यापुढे कलिकालसुद्धा पळत सुटतो, तेथें भवभय ते बिचारे काय करणार ? ८५.

गुरूतें म्हणो मातापिता । ते एकजन्मीं सर्वथा ।
हा सनातन तत्त्वतां । जाण पा वस्तुतां मायबापु ॥ ४८६ ॥
गुरूला मायबाप म्हणावे तर ती बिचारी एकाच जन्मापुरती असतात; पण गुरु हा खरोखर जन्मोजन्मींचा मायबाप असतो ८६.

अधोद्वारें उपजविता । ते लौकिकीं मातापिता ।
अधोद्वारा आतळों नेदिता । तो सद्‌गुरु पिता सत्यत्वें शिष्यां ॥ ४८७ ॥
अधोद्वारापासून जन्म देणारे ते लौकिक मातापिता होत, पण अधोद्वाराचा स्पर्श न होऊ देणारा म्हणजे गर्भवास चुकविणारा जो सद्गुरु तोच शिष्याचा खरा मायबाप होय ८७.

गुरूतें म्हणों कुळदेवता । तिची कुळकर्मींच पूज्यता ।
हा सर्व कामीं अकर्ता । पूज्य सर्वथा सर्वार्थीं ॥ ४८८ ॥
गुरूला कुलदेवता म्हणावे तर तिची पूज्यता फक्त कुलधर्माच्या कर्मामध्येंच असते; पण गुरु हा सर्व कर्मांमध्यें अकर्ता असल्यानें सदासर्वकाल आणि सर्वोपरीच पूज्य आहे ८८.

गुरु म्हणो देवासमान । तंव देवांसी याचेनि देवपण ।
मग त्या सद्‌गुरूसमान । देवही जाण तुकेना ॥ ४८९ ॥
गुरूला देवासमान म्हणावे तर, देवाला देवपण येते ते ह्याच्यामुळेंच येते; म्हणून देवाचीही सद्गुरूशी तुलना होत नाही. हे लक्षात ठेव ८९.

गुरु ब्रह्म दोनी समान । हेही उपमा किंचित न्यून ।
गुरुवाक्ये ब्रह्मा ब्रह्मपण । तें सद्‌गुरुसमान अद्वयत्वें ॥ ४९० ॥
गुरु आणि ब्रह्म ही दोन्हीं समान असे म्हणावें, तरी ही उपमाही किंचित् गौणच. कारण, ब्रह्माला ब्रह्मपण गुरुवाक्यानेंच येत असते. अद्वयत्वेंकरून मात्र ते सद्‌गुरूशी समान होईल ४९०.

यालागी अगाध गुरुगरिमा । उपमा नाहीं निरुपमा ।
ब्रह्मीं-ब्रह्मत्व-प्रमाण-प्रमा । हे वाक्यमहिमा गुरूची ॥ ४९१ ॥
ह्याकरितां गुरूची थोरवी अगाध आहे. तिला उपमा नाही. ती निरुपम आहे. ब्रह्माच्या ठिकाणी ब्रह्मत्व-प्रमाण-प्रमा-प्रमेय इत्यादि वाक्यमहिमा गुरूची आहे ९१.

ब्रह्म सर्वांचे प्रकाशक । सद्‌गुरु तयाचाही प्रकाशक ।
एवं गुरूहूनि अधिक । नाहीं आणिक पूज्यत्वें ॥ ४९२ ॥
ब्रह्म हे सर्वांचे प्रकाशक आहे, पण सद्गुरु त्याचाही प्रकाशक आहे. म्हणून गुरूहून अधिक पूज्य असें दुसरे कोणीच नाहीं ९२.

यालागीं गुरूतें मनुष्यबुद्धीं । पाहों नये गा त्रिशुद्धी ।
ऐशिये भावार्थबुद्धी । सहजें चित्तशुद्धी सच्छिष्यां ॥ ४९३ ॥
ह्याकरितां हे राजा ! गुरूला खरोखर मनुष्यभावनेनें कधीही पाहूं नये. अशा भावार्थबुद्धीनें राहिले तर सच्छिष्याची सहजच चित्तशुद्धि होते ९३.

ज्यांचा गुरुचरणीं निःसीम भावो । त्यांचा मनोरथ पुरवी देवो ।
गुरु‍आज्ञा देवो पाळी पहा हो । गुरुवाक्यें स्वयमेवो जड मूढ तारी ॥ ४९४ ॥
गुरुचरणांवर ज्यांची निस्सीम भक्ति असते, त्यांचे मनोरथ देव पूर्ण करतो. कारण गुरूची आज्ञा देवसुद्धा पाळतो. गुरूच्या वाक्यानें देव जडमूढांचाही उद्धार करतो ९४.

ब्रह्मभावें जे गुरुसेवक । देवो त्यांचा आज्ञाधारक ।
त्यांसी नित्य पुरवी निजात्मसुख । हे गुरुमर्यादा देख नुल्लुंघी देवो ॥ ४९५ ॥
ब्रह्मभावनेनें जे गुरूची सेवा करितात, त्यांचा देवही आज्ञाधारक होतो. त्यांना तो निजस्वरूपाचे सुख सदासर्वदा पुरवितो. अशी ही गुरुमर्यादा देवही उल्लंघन करीत नाहीत ९५.

देवो गुरु‍आज्ञा स्वयें मानी । तंव गुरु देवासी पूज्यत्व आणी ।
एवं उभयतां अभिन्नपणीं । भावार्थियांलागोनी तारक ॥ ४९६ ॥
गुरूची आज्ञा स्वतः देव मानतो व गुरूही देवाला थोरपणास चढवितो. म्हणून ते उभयतांही अभिन्नभावानें भावार्थी लोकांना तारक होतात ९६.

सद्‌भावो नाहीं अभ्यंतरीं । बाह्य भक्ति भावेंचि करी ।
ते भावानुसारें संसारीं । नानापरी स्वयें ठकती ॥ ४९७ ॥
अंतःकरणांत सद्‌भाव नसतां बाहेरून जे भक्तीचे सोंग करतात, ते आपल्या भावनेस अनुसरून संसारांत नाना प्रकारांनी गटंगळ्या खातात ९७.

ठकले ते मनुष्यगती । ठकले ते निःस्वार्थी ।
ठकले ते ब्रह्मप्राप्ती । दंभें हरिभक्ती कदा नुपजे ॥ ४९८ ॥
ते मनुष्यत्वाला मुकतात, आत्मत्वाला दुरावतात, आणि ब्रह्मप्राप्तीलाही ठकवतात. दंभानें हरिभक्ति कधीच उपजत नाहीं ९८.

येथ भावेंवीण तत्त्वतां । परमार्थु न ये हाता ।
सकळ साधनांचे माथां । जाण तत्त्वतां सद्‌भावो ॥ ४९९ ॥
येथे शुद्धभावावांचून परमार्थ कधीच हाताला लागत नाही. साऱ्या साधनांमध्यें सद्‌भाव हाच श्रेष्ठ साधन आहे हें तूं लक्षात ठेव ९९.

कोरडिये खांबीं धरितां सद्‌भावो । तेथेंचि प्रगटे देवाधिदेवो ।
मा सद्‌गुरु तंव तो पहा वो । स्वयें स्वयमेवो परब्रह्म ॥ ५०० ॥
कोरड्या खांबाच्या ठिकाणी सद्‌भाव ठेवतांच तेथे देवाधिदेव प्रगट झाला; मग सद्गुरु तर स्वतः प्रत्यक्ष परब्रह्म आहेत ५००.

यालागी गुरुभजनापरता । भजावया मार्गु नाही आयता ।
ज्ञान-भक्ति जे तत्त्वतां । ते जाण सर्वथा सद्‌गुरुभक्ति ॥ ५०१ ॥
ह्याकरितां गुरुभजनापरता भजावयाला दुसरा सोपा मार्ग नाही. खरोखरच ज्ञान-भक्ति म्हणून जी काही म्हणतात, ती सर्वथा सद्गुरुभक्तीच आहे १.

गुरुहूनि श्रेष्ठ ब्रह्म । म्हणतां गुरुत्वा आला कनिष्ठ धर्म ।
ऐसा भाव धरितां विषम । ब्रह्मसाम्य शिष्यां नुपजे ॥ ५०२ ॥
गुरूहून ब्रह्म श्रेष्ठ असे म्हटले तर गुरुत्वाला कमीपणा येतो. असा विषम भाव धरला तर, शिष्याच्या ठिकाणी ब्रह्मसाम्य उपजणार नाहीं २.

आम्हां सद्‌गुरु तोचि परब्रह्म । ऐसा नित्य निजभाव सप्रेम ।
हेचि गुरुसेवा उत्तमोत्तम । शिष्य परब्रह्म स्वयें होये ॥ ५०३ ॥
आम्हांला सद्गुरु तोच परब्रह्म आहे अशा प्रकारचा सप्रेम निजभाव ठेवणे हीच उत्तमोत्तम गुरुसेवा होय. अशा सेवेच्या योगे म्हणजे अशा निजभावानें शिष्य स्वतः परब्रह्म होतो ३.

ऐशिये गुरुसेवे‍आंत । प्रह्लाद झाला द्वंद्वातीत ।
नारद स्वानंदें गात नाचत । ब्रह्मसाम्यें विचरत सुरासुरस्थानें ॥ ५०४ ॥
अशाच गुरुसेवेनें प्रल्हाद द्वंद्वातीत झाला; व नारद परब्रह्माशी ऐक्य पावून निजानंदानें गात नाचत देवदानवांच्या स्थानामधून विहार करीत असतो ४.

ऐसीचि गुरुसेवा करितां । चुकली अंबरीषाची गर्भव्यथा ।
ते गर्भ जाहला देवोचि साहता । भक्ता भवव्यथा बाधों नेदी ॥ ५०५ ॥
अशीच गुरुसेवा करीत असतां अंबरीषाची गर्भव्यथा टळली. त्याचे गर्भ देव सोसता झाला. आपल्या भक्ताला त्यानें संसाराची व्यथा होऊ दिली नाहीं ५.

ऐशिया अभिन्न भावना । सुबुद्धी भजती गुरुचरणां ।
ते पढियंते जनार्दना । त्यांसी भवभावना शिवों नेदी ॥ ५०६ ॥
अशा अभिन्न भावनेनें जे सुबुद्धिमंत गुरुचरणांना भजतात, ते जनार्दनाला आवडते होतात, त्यांना तो संसारभावनेला स्पर्शूं देत नाहीं ६.

गुरु ब्रह्म दोनी एक । शिष्यही असे तदात्मक ।
जे भेदें मानिती वेगळिक । तेही मायिक कवि सांगे ॥ ५०७ ॥
गुरु व ब्रह्म दोन्ही एकच आहेत; तसाच शिष्यही तदात्मक म्हणजे तत्स्वरूपच आहे. जे कोणी भेदभावनेनें भिन्नता मानतात ते मायिक होत असें कवि सांगतो ७.

अविद्यमानोऽप्यवभाति हि द्वयोः
ध्यातुर्धिया स्वप्नमनोरथौ यथा ।
तत्कर्मसङ्कल्पविकल्पकं मनो
बुधो निरुन्ध्याद् अभयं ततः स्यात् ॥ ३८ ॥
श्लोक ३८- राजन ! हा द्वैतप्रपंच नसतानाही त्याची कल्पना करणार्‍याला तो भासतो ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये स्वप्न पाहाणार्‍याच्या कल्पनेमुळे किंवा जागेपणी निरनिराळ्या मनोरथांमुळे एक विलक्षण सृष्टी दिसू लागते त्याप्रमाणे म्हणून विवेकी पुरूषाने संसारातील कर्मांसंबंधी संकल्पविकल्प करणार्‍या मनाला आवरावे त्यामुळेच त्याचे भय नाहीसे होईल. (३८)

पुरुषासी जो प्रपंचु दिसे । तो नसतांचि मिथ्या आभासे ।
जेवीं कां एकला निद्रावशें । स्वप्नीं निजमानसें जग कल्पी ॥ ५०८ ॥
ज्याप्रमाणें कोणी एकादा मनुष्य निजला असतां स्वप्नामध्यें जगाची कल्पना करतो, त्याप्रमाणें पुरुषाला जो प्रपंच म्हणून दिसतो, तो खरोखर नसतांना मिथ्याच भासतो ८.

असोनि निद्रावश दिसे स्वप्न । जो जागा होवोनि आपण ।
करूं बैसे मनोरथध्यान । तो नसतेंचि जन वन एकत्वीं देखे ॥ ५०९ ॥
मनुष्य झोंप घेत असला म्हणजे स्वप्न पडतें, तोच जागा होऊन मनोरथ चिंतन करूं लागला की, एकीएक असूनही त्याला नसलेलें जन वन दिसू लागते ९.

हो कां घालोनि आसन । जो करी मूर्तिचिंतन ।
त्यासी ध्येय-ध्याता-उपचार-ध्यान । नसतेंच जाण कल्पित भासे ॥ ५१० ॥
किंवा आसन घालून जो मूर्तीचे चिंतन करतो, त्याला ध्येय, ध्याता, ध्यान, उपचार इत्यादि नसतेच कल्पित भासू लागते ५१०.

जेवीं धनलोभ्याचें हारपे धन । परी वासना न सांडी धनधान्य ।
धनातें आठवितां मन । धनलोभें पूर्ण पिसें होये ॥ ५११ ॥
ज्याप्रमाणें धनलोभ्याचें धन नाहीसे झाले तरी त्याची वासना कांहीं धनधान्याला सोडीत नाही, त्याचे मन द्रव्याचे स्मरण करूं लागतांच द्रव्यलोभानें पूर्ण वेडे होऊन जातें ११.

मन स्वयें जरी नव्हे धन । तरी धनकोश आठवी मन ।
तंव स्मृती वळघे वन । व्यामोहें पूर्ण पिसें होये ॥ ५१२ ॥
मन स्वतः जरी द्रव्य नव्हे, तरी ते द्रव्याच्या खजिन्याची आठवण करतें व स्मृतिलोप होऊन मोहानें वेडेपिसें होऊन बसतें १२.

तेवीं व्यामोहाचें पूर्ण भरित । मिथ्या भासे देहादि द्वैत ।
तें अहंभावें मानितां आप्त । भवभय निश्चित आदळे अंगीं ॥ ५१३ ॥
त्याप्रमाणें मोहानें पूर्ण ग्रासले म्हणजे मिथ्या देहादि द्वैत भासू लागते. ते अहंभावानें खरे मानले की, संसाराचे भय अचूक येऊन आंगावर आदळते १३.

भवभयाचे कारण । मनःकल्पना मुख्य जाण ।
त्या मनाचें करावया निरोधन । सद्‌गुरुवचननिजनिष्ठा ॥ ५१४ ॥
भवभयाचे मुख्य कारण आपली मनःकल्पना होय हे लक्षात ठेव. त्या मनाचा निरोध करावयाला सद्‌गुरूचे वचन व त्याच्या ठायीं दृढ निष्ठा हेंच पाहिजे १४.

हें जाणोनि सच्छिष्य ज्ञाते । गुरुवाक्यें विश्वासयुक्तें ।
विवेकवैराग्याचेनि हातें । निजमनातें आकळिती ॥ ५१५ ॥
हे लक्षात आणून जे कोणी ज्ञाते सच्छिष्य असतात, ते गुरुवाक्यावर विश्वास ठेवून विवेक व वैराग्य यांच्या बळानें आपल्या मनाला आवरून ठेवतात १५.

तेचि आकळती हातवटी । संक्षेपें राया सांगेन गोष्टी ।
सद्‌गुरुवाक्य परिपाटी । जे मनातें थापटी निजबोधें ॥ ५१६ ॥
राजा ! ते आवरावयाची हातोटी कशी असते, तो प्रकार तुला थोडक्यात सांगतो. सद्गुरुवाक्य हे आत्मबोधानें मनाला सावध करीत असते १६.

चंचळत्वें विषयध्यान । करितां देखे जें जें मन ।
तें तें होय ब्रह्मार्पण । सद्‌गुरुवचननिजनिष्ठा ॥ ५१७ ॥
सद्गुरूवर व त्याच्या वचनावर दृढनिष्ठा ठेवल्याने, चंचलपणानें विषयचिंतन करीत असतां मन जे पाहते, तें तें ब्रह्मार्पणच होत जाते १७.

धरूनियां विषयस्वार्थु । मनें जो जो घे‍इजे अर्थु ।
तो तो होय परमार्थु । हा अनुग्रहो समर्थु गुरुकृपेचा ॥ ५१८ ॥
विषयाचा स्वार्थ धरून मनानें जो जो पदार्थ घ्यावा, तो तो सारा परमार्थरूपच होतो, असें गुरुकृपेच्या अनुग्रहाचे सामर्थ्य आहे १८.

जो भु‍ईभेणें पळों जाये । तो जेथें पळे तेथें भू ये ।
मग येणेंजाणें स्वयें राहे । ठायीं ठाये पांगुळला ॥ ५१९ ॥
जमिनीच्या भयानें जो पळू लागेल, त्याला तो जिकडे जाईल तिकडे जमीनच भेटते. असे झाले म्हणजे येणे आणि जाणे आपोआपच बंद पडते व एकाच ठिकाणी तो थांबतो १९.

तैसें मनासी लाविजे वर्म । जें जें देखे तेंचि ब्रह्म ।
जें जें करूं बैसे कर्म । तेथ पुरुषोत्तम स्वयें प्रगटे ॥ ५२० ॥
त्याप्रमाणें मनाला एक वर्म दाखवून द्यावे. ते हेच की, ते ‘जे जे पाहीम्ल तें तें ब्रह्मच आहे.’ असे केले म्हणजे तो जें जें कर्म करावयाला लागेल तेथे तेथें पुरुषोत्तम सहज प्रगट होईल ५२०.

एवं इंद्रियवृत्ति‍उल्लाळे । मोडिले गुरुवाक्यप्रतीतिबळें ।
निजाधिष्ठानमेळें । कळासलें येके वेळे अखंड कुलुप ॥ ५२१ ॥
अशा प्रकारे गुरूपदेशाच्या अनुभवाच्या प्रभावानें इंद्रियवृत्तीच्या उसळ्या नाहीशा होतात व ब्रह्मरूप अधिष्ठानाशी ऐक्य होऊन बाह्य प्रवृत्तीला अखंड कुलूप ठोकल्याप्रमाणें होते २१.

ऐसें नेमितां बाह्य कर्म । मनाचा मोडे द्वैत भ्रम ।
तंव बाह्य परब्रह्म । पूर्ण चिद्व्योम कोंदाटे ॥ ५२२ ॥
अशा रीतीनें बाह्य कर्माचे नियमन केले असतां मनाचा द्वैतभ्रम मोडतो आणि बाहेरसुद्धा परब्रह्मरूप चिदाकाश सर्वत्र भरून राहते २२.

ऐसें भजनें मन नेमितां स्वयें । न रिघे कल्पांतकाळभये ।
भक्त हो‍ऊनियां निर्भयें । विचरती स्वयें निःशंक ॥ ५२३ ॥
अशा प्रकारच्या भजनानें मनाचा निरोध केला असता त्या भक्तांना कल्पांतकाळाचेही भय राहत नाही. ते निर्भय होऊन खुशाल फिरत असतात २३.

हे अगाध निष्ठा परिपूर्ण । भोळ्याभाळ्या न टके जाण ।
यालागी सुगम साधन । सांगेन आन तें ऐक ॥ ५२४ ॥
पण ही अगाध निष्ठा भोळ्या भाबड्यांना पूर्णपणे साधत नाही. ह्याकरितां दुसरें एक सोपे साधन सांगतों तें ऐक २४.

श्रृण्वन्सुभद्राणि रथाङ्गपाणेः
जन्मानि कर्माणि च यानि लोके ।
गीतानि नामानि तदर्थकानि
गायन्विलज्जो विचरेदसङ्गः ॥ ३९ ॥
श्लोक ३९- भगवंतांच्या जन्माच्या आणि लीलांच्या पुष्कळशा मंगलमय कथा या जगात प्रसिद्ध आहेत, त्या ऐकाव्यात तसेच त्यांच्याविषयीची नामे व स्तोत्रे संकोच सोडून गात राहावीत शिवाय प्रपंचामध्ये आसक्त न होता सर्व व्यवहार करावेत. (३९)

तरावया भाळेभोळे जन । मुख्य चित्तशुद्धीच कारण ।
जन्मकर्म हरीचे गुण । करावे श्रवण अत्यादरें ॥ ५२५ ॥
भोळे भाविक लोक तरावयाला मुख्य कारण चित्तशुद्धीच आहे. हरीचे जन्म, कर्म आणि गुण अत्यादरानें श्रवण करावेत २५.

चुकल्या पुत्राची शुद्धिवार्ता । जेणें सादरें ऐके माता ।
तेणें सादरें हरिकथा । सार्थकता परिसावी ॥ ५२६ ॥
चुकलेला पुत्र सांपडल्याची वार्ता आई जितक्या उत्कंठेनें ऐकते, तितक्याच उत्कंठेनें जिवाचें सार्थक करणारी हरिकथा श्रवण करावी. २६.

हरीचीं जन्मकर्में अनंत गुण । म्हणाल त्यांचें नव्हेल श्रवण ।
लोकप्रसिद्ध जें जें पुराण । तें श्रद्धा संपूर्ण ऐकावें ॥ ५२७ ॥
हरीची जन्मकर्मे व गुण अनंत आहेत, ते सारे ऐकावयास कसे मिळतील असे म्हणाल तर सांगतो की, लोकप्रसिद्ध जें जें पुराण असेल तेवढे तरी पूर्ण श्रद्धेनें ऐकावें २७.

बहु देव बोलिले पुराणीं । तेही लागती ज्याचे चरणीं ।
तो समर्थ चक्रपाणी । जो वेदपुराणीं वंदिजे ॥ ५२८ ॥
पुराणामध्यें पुष्कळ देव सांगितलेले आहेत. तेही सारे ज्याच्या चरणाला लागतात, वेदांनी व पुराणांनीही ज्याला वंदन केले आहे, तो चक्रपाणि असा श्रीकृष्णच एक समर्थ म्हणजे श्रेष्ठ आहे २८.

त्याचीं जीं जीं जन्मे अति‍अद्‌भुत । जीं जीं कर्मे परमार्थयुक्त ।
स्वमुखें बोलिला भगवंत । तीं तीं ज्ञानार्थ परिसावीं ॥ ५२९ ॥
त्याचे अत्यंत अद्‌भुत असे जे जे जन्म व परमार्थयुक्त जी जी कर्में भगवंतानें आपल्याच मुखानें सांगितली आहेत, ती ती ज्ञानप्राप्तीकरितां श्रवण करावी २९.

जें जें केलें पुराणश्रवण । तें तें व्यर्थ होय मननेंविण ।
यालागीं श्रवण-मनन । सावधान करावें ॥ ५३० ॥
परंतु जें जें पुराण श्रवण केले, त्याचे त्याचे मनन केल्याशिवाय ते व्यर्थ होते. ह्याकरितां श्रवण केलेल्याचे नीट मनन करीत असावें ५३०.

मोले घेतली जे गाये । दुभतें खातां विषय होये ।
तेचि दान देतां लवलाहें । दुभती होये परमामृतें ॥ ५३१ ॥
मोल देऊन जी गाय घ्यावी, तिचे दुभते आपण खाल्ले तर तो विषयभोग होतो; पण तीच दान देऊन टाकली तर ती परमामृताचे दुभते म्हणजे मोक्ष देते ३१.

तेवीं केले जें श्रवण । तें मननें परम पावन ।
तेंचि उपेक्षितां जाण । परिपाकीं पूर्ण वांझ होये ॥ ५३२ ॥
तद्वत् जे श्रवण करावे, ते मननानेंच परमपावन होते. तीच त्याची म्हणजे श्रवणाची उपेक्षा केली, तर परिणामी तें निष्फळ होतें ३२.

हरिनाम पडतां श्रवणीं । एकां गळोनि जाये वदनीं ।
एकां ये कानींचे ते कानीं । जाय निघोनि हरिनाम ॥ ५३३ ॥
हरीचें नाम कानांत पडले असतां कित्येकांच्या तें मुखांतून बाहेर पडते तर कित्येकांच्या ह्या कानांतले त्या कानांतून निघून जातें ३३.

हरिनाम पडतां श्रवणीं । ज्याचे रिघे अंतःकरणीं ।
सकळ पापा होवोनि धुणी । हरिचरणीं तो विनटे ॥ ५३४ ॥
परंतु हरीचें नाम कानांवर पडतांच ते ज्याच्या अंतःकरणांत शिरते, त्याचे सारे पाप धुतले जाऊन तो हरीच्या चरणीं लिगटून जातो ३४.

यापरी श्रवणीं श्रद्धा । मननयुक्त करितां सदा ।
तैं विकल्प बाधीना कदा । वृत्तिं शुद्धा स्वयें होये ॥ ५३५ ॥
ह्याप्रमाणें सदासर्वकाल श्रवणाच्या ठिकाणीं मननयुक्त श्रद्धा ठेवली, म्हणजे विकल्पाची कधीही बाधा न होतां चित्तवृत्ति आपोआपच शुद्ध होते ३५.

ऐसें मननयुक्त श्रवण । करितां वोसंडे हर्ष पूर्ण ।
तेणें हर्षें हरिकिर्तन । करी आपण स्वानंदें ॥ ५३६ ॥
ह्या प्रकारे मननयुक्त श्रवण केले असतां पूर्णानंद उचंबळू लागतो, आणि त्या आनंदाच्या भरांत तो हरिकीर्तन करूं लागतो ३६.

हरिचरित्रें अगाध । ज्ञानमुद्रा-पदबंध ।
कीर्तनीं गातां विशद । परमानंद वोसंडे ॥ ५३७ ॥
ज्ञानमुद्रा-पदबंधयुक्त हरीची अगाध चरित्रे कीर्तनामध्यें गाऊन त्यांचे ते विवेचन करूं लागले म्हणजे परमानंद ओसंडूं लागतो ३७.

वानिती अजन्मयाचीं जन्में । वानिती अकर्मयाचीं कर्में ।
स्मरती अनामियाचीं नामें । अतिसप्रेमें डुल्लत ॥ ५३८ ॥
ज्याला जन्म नाही, त्याच्या जन्मांचे वर्णन करतात; ज्याला कर्म नाही, त्याची कर्में म्हणजे लीला गातात; व ज्याला नाम नाही, त्याच्या नामाचे संकीर्तन करून प्रेमभरानें डुलत असतात ३८.

साधावया निजकाज । सांडूनि लौकिकाची लाज ।
कीर्तनी नाचती भोज । अतिनिर्लज्ज निःशंक ॥ ५३९ ॥
स्वहित साधण्यासाठी लौकिकाची लाज सोडून देऊन आवडीनें अत्यंत निर्लज्ज होऊन निःशंकपणानें नाचत असतात ३९.

कीर्तनें निर्दळिले दोष । जप तप ठेले निरास ।
यमलोक पाडिला वोस । तीर्थाची आस निरास जाहली ॥ ५४० ॥
कीर्तनाच्या योगानें दोषांचे निर्दलन होते; जप, तप, निराश होऊन जातात; यमलोक ओस पडतो व तीर्थांची आशा निष्फळ होते ५४०.

यमनियमां पडती उपवास । मरों टेंकले योगाभ्यास ।
कीर्तनगजरें हृषीकेश । निर्दळी दोष नाममात्रे ॥ ५४१ ॥
यमनियमांना उपवास पडतात, योगाभ्यास मरावयाला टेकतो, कीर्तनाचा गजर होऊ लागला की, श्रीकृष्णपरमात्मा नाममात्रेंकरूनच सर्व दोष नाहीसे करतो ४१.

कीर्तनाचा घडघडाट । आनंदु कोंदला उद्‌भट ।
हरुषें डोले वैकुंठपीठ । तेणें सुखें नीलकंठ तांडवनाचें नाचतु ॥ ५४२ ॥
कीर्तनाचा घडघडाट सुरू झाला की, जिकडेतिकडे आनंदच दुमदुमून राहतो. श्रीविष्णु आनंदानें डुलावयाला लागतो, व त्या आनंदाच्या भरांत शंकर तर तांडवनृत्य करूं लागतो ४२.

यापरी हरिकीर्तन । देत परम समाधान ।
हा भक्ति-राजमार्ग पूर्ण । ये मार्गीं स्वयें रक्षण चक्रपाणी कर्ता ॥ ५४३ ॥
ह्याप्रमाणें हरिकीर्तन हे मनाला अत्यंत समाधान देणारे आहे. हा भक्तीचा राजमार्ग आहे. ह्या मार्गात स्वतः चक्रपाणि संरक्षण करीत असतो ४३.

चक्र घे‍ऊनि भक्तांचे ठायीं । म्हणे तुझें कार्य कायी ।
मज जगीं वैरीचि नाहीं । भक्तद्वेषी पाहीं निजशस्त्रें नाशी ॥ ५४४ ॥
तो चक्र घेऊन त्याला म्हणतो की, “भक्ताच्या ठिकाणी तुझें काम काय ? मला तर जगामध्यें शत्रूच नाही; पण भक्तांचा द्वेष करणारा असतो त्याचा मी आपल्या शस्त्रानें नाश करतों” ४४.

चक्रें अभिमानाचा करी चेंदा । मोहममता छेदी गदा ।
शंखें उद्बोधी निजबोधा । निजकमळें सदा निजभक्त पूजी ॥ ५४५ ॥
चक्रानें अभिमानाचा चेंदा करतों; गदा ही मोहममतेला छेदून टाकते; शंखानें आत्मबोधाला जागृत करतो आणि कमलानें सदा सर्वकाळ आपल्या भक्तांची पूजा करतो ४५.

जेथें चक्रपाणी रक्षिता । तेथें न रिघे भवभयाची कथा वार्ता ।
यापरी कीर्तिवंता । हरि सर्वथा स्वयें रक्षी ॥ ५४६ ॥
चक्रपाणीच जेथें संरक्षण करणारा असतो, तेथे भवभयाची कथावार्ताही उरत नाही. श्रीहरि स्वतः कीर्तिवंताचे (कीर्ति गाणाऱ्यांचे) संरक्षण करीत असतो ४६.

ज्यांसी न करवे कथाश्रवण । अथवा न टके हरिकीर्तन ।
तिंहीं करावें नामस्मरण । राम-कृष्ण-गोविंद ॥ ५४७ ॥
ज्यांना कथाश्रवण करवत नसेल, किंवा हरीचे कीर्तन करतां येत नसेल, त्यांनी ‘राम, कृष्ण, गोविंद’ असें नामस्मरण करावे ४७.

अच्युत-नामाची निजख्याती । चेवल्या कल्पांतीं हों नेदी च्युती ।
त्या नामातें जे नित्य स्मरती । ते जाण निश्चितीं अच्युतावतार ॥ ५४८ ॥
‘अच्युत’ ह्या नामाची ख्यातीच अशी आहे की, तें गर्जिलें असतां कल्पांतीही ‘च्युति’ म्हणजे अधोगति होऊ देत नाही. त्या नामाचे जे निरंतर स्मरण करतात, ते खरोखर अच्युताचेच अवतार होत ४८.

रामकृष्णादी नामश्रेणी । अखंड गर्जे ज्यांची वाणी ।
त्यांसी तीर्थें येती लोटांगणीं । सुरवर चरणीं लागतीं स्वयें ॥ ५४९ ॥
ज्यांची वाणी रामकृष्णादि नामांचा अखंड जप करते, गर्जना करते, त्यांच्या पायांशी तीर्थे लोटांगणी येतात व मोठमोठे देवही स्वतः येऊन चरणी लागतात ४९.

बाप नामाचें निजतेज । यम वंदी चरणरज ।
नामापाशीं अधोक्षज । चतुर्भुज स्वयें तिष्ठे ॥ ५५० ॥
नामाचें तेजच काही विलक्षण आहे. ते घेणाराची पायधूळ यमसुद्धां मस्तकावर धारण करतो. नामाजवळ चतुर्भुज श्रीकृष्ण सदा सर्वकाळ तिष्ठत असतो ५५०.

नामाचेनि पडिपाडें । कायिसें भवभय बापुडें ।
कळिकाळाचें तोंड कोणीकडे । नामापुढें रिघावया ॥ ५५१ ॥
नामाच्या प्रभावापुढे भवभय तें बिचारें किती ? नामापुढे यावयाला कळिकाळाचे तोंड काय लागले आहे ? ५१.

जेवढी नामाची शक्ती । तेवढें पाप नाहीं त्रिजगतीं ।
नामापाशी चारी मुक्ती । जाण निश्चित्तीं विदेहा ॥ ५५२ ॥
नामाची जेवढी शक्ति आहे, तेवढे त्रैलोक्यांत पापसुद्धा नाही. हे जनकराजा ! नामापाशी खरोखर चारही मुक्ति असतात, हे तूं लक्षात ठेव ५२.

ऐक राया सावधान । नामापरतें सुगम साधन ।
सर्वथा नाहीं नाहीं आन । निश्चय जाण नेमस्त ॥ ५५३ ॥
हे राजा ! नीट लक्ष देऊन ऐक. नामापेक्षा सुगम असे दुसरें साधन नाहींच नाही, असें पक्केपणी जाण ५३.

जन्म-नाम-कर्में श्रीधर । श्रवणें उद्धरती पामर ।
यालागीं हरिलीला सुभद्र । शास्त्रज्ञ नर वर्णिती ॥ ५५४ ॥
श्रीधराच्या नामाचे, जन्मांचें व कर्माचे श्रवण घडले की पामराचाही उद्धार होतो. ह्याकरितां शास्त्रवेत्ते पुरुष हरीची लीला ही कल्याणकारक आहे म्हणून वर्णन करतात ५४.

ऐसा बाणल्या भक्तियोग । न धरी जाणपणाचा फूग ।
त्यजूनि अहंममतापांग । विचरती निःसंग हरिकीर्तनें ॥ ५५५ ॥
असा भक्तियोग ज्यांच्या अंतःकरणांत बाणतो, त्यांना जाणतेपणाचा ताठा राहात नाही. अहंममतेचा पांग टाकून देऊन ते निःसंगपणे हरिकीर्तन करीत संचार करीत असतात ५५.

करितां श्रवण स्मरण कीर्ति । तेणें वाढे सप्रेम भक्ति ।
भक्त विसरे देहस्फुर्ति । ऐक तेही स्थिति सांगेन राया ॥ ५५६ ॥
हरिकीर्तीचे श्रवण व हरिनामाचे स्मरण केले असतां सप्रेम भक्ति वृद्धिंगत होते, आणि भक्ताला देहाचें भानच राहात नाही. राजा ! तीही स्थिति सांगतों ऐक ५६.

एवंव्रतः स्वप्रियनामकीर्त्या
जातानुरागो द्रुतचित्त उच्चैः ।
हसत्यथो रोदिति रौति गायति
उन्मादवत् नृत्यति लोकबाह्यः ॥ ४० ॥
श्लोक ४० – जो हे व्रत घेतो, त्याच्या हृदयात, आपल्या प्रियतम प्रभूंच्या नामसंकीर्तनाने प्रेमाचा अंकुर उगवतो त्याचे चित्त द्रवते तो वेड्याप्रमाणे कधी खदखदून हसतो तर कधी मोठ्याने रडू लागतो कधी मोठ्याने भगवंतांना हाका मारतो तर कधी त्यांच्या गुणांचे गायन करू लागतो कधी कधी नाचतोसुद्धा अशा वेळी त्याला लोकांची मुळीच पर्वा नसते. (४०)

हरिनामगुणकीर्तनकीर्ती । अखंड आवडे जागृतीं ।
स्वप्नींही तेचि स्थिती । दृढ हरिभक्ती ठसावे ॥ ५५७ ॥
हरिनामाचे व गुणकीर्तनाचे वर्णन जागृतीमध्यें तर निरंतर आवडतेंच, पण स्वप्नांतसुद्धा तीच स्थिति झाली म्हणजे हरिभक्ति उत्तम प्रकारें मनांत ठसली म्हणून समजावें ५७.

ऐशियापरी भक्तियुक्त । दृढतर जाहलें ज्याचें व्रत ।
तंव तंव होय आर्द्रचित्त । प्रेमा अद्‌भुत हरिनामकीर्ती ॥ ५५८ ॥
अशा रीतीनें भक्तियुक्त होऊन ज्याचे व्रत जसजसे दृढतर होत जाते, तसतसे त्याचे चित्त अधिकाधिक द्रवून हरिनामकीर्तीविषयींचा प्रेमा अद्‌भुत रीतीनें वाढतो ५८.

आत्मा परमप्रिय हरी । त्याचे नामकीर्तीचा हर्ष भारी ।
नित्य नवी आवड वरी । सबाह्याभ्यंतरीं हरि प्रगटे ॥ ५५९ ॥
परमप्रिय असा जो आत्मा तोच हरि. त्याच्या नामकीर्तीचा अत्यंत हर्ष, व नित्य नवी आवड; ह्यायोगे अंतर्बाह्य हरीच प्रगट होतो ५९.

चुकल्या मायपूतां संकटीं । एकाकीं बहुकाळें जाहली भेटी ।
तेणें वोरडे घालोनि मिठी । चाले जेवीं पोटीं अनिवार रुदन ॥ ५६० ॥
एकाद्या संकटामध्यें मायलेकांची ताटातूट व्हावी, आणि पुष्कळ काळ लोटल्यावर अकस्मात् गांठ पडावी, त्या वेळी तो मुलगा हंबरडा फोडून आईला मिठी घालतो आणि हुंदके देऊन ओक्साबोक्शी रडू लागतो ५६०,

तेवीं जीवशिवां अवचटी । भक्तीचे पेठे जाहली भेटी ।
आत्मसाक्षात्कारें पडे मिठी । ते संधीमाजीं उठी अनिवार रुदन ॥ ५६१ ॥
त्याप्रमाणें भक्तीच्या पेठेत जेव्हां जिवाची व शिवाची भेट होते, आणि आत्मसाक्षात्कारानें मिठी पडते, तेव्हां त्या संधीत अनिवार रडें कोसळतें ६१.

परमात्मयासी आलिंगन । तेणें अनिवार स्फुंदन ।
रोमांचित रुदन । सप्रेम पूर्ण उसासोनि करी ॥ ५६२ ॥
परमात्म्याला आलिंगन दिले जाते, त्यायोगें अनिवार हुंदके येऊ लागतात; व प्रेमानें परिपूर्ण झाल्यामुळें रोमांचित होऊन मोठमोठ्यानें उसासे टाकून तो रुदन करूं लागतो ६२.

सवेंचि गदगदोनि हांसे । मानी मजमाजींच मी असें ।
चुकलों भेटलों हें ऐसें । देखोनि आपुलें पिसें हांसोंचि लागे ॥ ५६३ ॥
लगेच खदसदां हासतो व म्हणतो की, अहो ! मी तर माझ्यामध्येंच आहे. चुकलों, भेटलों असें म्हणणे हे आपलेच वेडेपण, असें मनांत आणून तो हासावयालाच लागतो ६३.

मी अखंडत्वें स्वयें संचलों । अभेदपूर्णत्वें अनादि रचलों ।
तो मी अव्ययो म्हणे जाहलों मेलों । येणें आठवें डोलडोलों हांसोंचि लागे ॥ ५६४ ॥
मी तर अखंडितपणानें स्वतः सर्वत्र भरलो आहे, पूर्ण अभेदामुळें मी अनादि आहे तसाच आहे. ह्याप्रमाणें मी अव्यय असतां जन्मलों व मेलों असें म्हणत होतो ह्याची आठवण करून मान डोलवून डोलवून तो हासूंच लागतो ६४.

पळतां दोराच्या सर्पाभेण । पडे अडखळे भयें पूर्ण ।
तोच दोरातें वोळखोन । आपणिया आपण स्वयें हांसे ॥ ५६५ ॥
दोराला साप समजून घाबऱ्या घाबऱ्या पळतांना अडखळतो व पडतो, तोच त्या दोराला ओळखून आपल्या आपणच हासूं लागतो ६५.

तेवीं संसाराचा अभावो । देहभाव समूळ वावो ।
तेथें नाथिली ममता अहंभावो । मज होता पहा वो म्हणूनि हांसे ॥ ५६६ ॥
तद्वत् संसार हा मिथ्या असून देहभाव समूळ खोटा आहे, असे असतां मला नसती ममता व अहंभाव होता की हो ! म्हणून हासतो ६६.

बाप गुरुवाक्य निजनिर्वाहो । देहीं असतां विदेहभावो ।
माझे चारी देह झाले वावो । येणें अनुभवें पहा वो गर्जों लागे ॥ ५६७ ॥
धन्य तें गुरुवाक्य ! तेच मला तारक झाले. देहांत असून मी विदेही बनलो. माझे चारी देह मिथ्या की हो झाले ! अशा अनुभवोद्‌गारानें गर्जना करूं लागतो ६७.

म्हणे धन्य धन्य भगवद्‌भक्ती । जिणें मिथ्या केल्या चारी मुक्ती ।
मी परमात्मा निजनिश्चितीं । येणें उल्हासें त्रिजगती गर्जवी गजरें ॥ ५६८ ॥
तो म्हणतो,”धन्य धन्य ती भगवद्‌भक्ति ! की जिनें चारी मुक्तीही मिथ्या करून सोडल्या ! परमात्मा तो मीच हे निश्चित आहे.” अशा उल्हासाच्या गजरानें त्रिभुवनही दणाणून सोडतो ६८.

धन्य भगवंताचें नाम । नामें केलों नित्य निष्काम ।
समूळ मिथ्या भवभ्रम । गर्जोनि निःसीम हाक फोडी ॥ ५६९ ॥
धन्य तें भगवंताचें नाम ! त्या नामानें मला नित्य निष्काम करून सोडलें ! भवभ्रम समूळ मिथ्या ठरला ! याप्रमाणें मोठमोठ्यानें गर्जना करून हांक फोडतो ६९.

आतां दुजें नाहींच त्रिलोकीं । दिसे तें तें मीच मी कीं ।
मीच मी तो एकाकी । येणें वाक्यें अलोलिकी हाक फोडी ॥ ५७० ॥
आतां त्रिभुवनांत दुसरे कांहींच नाहीं; जें जें दिसतें तें मीच मी; तो एकी एक मीच आहे असे बोलून मोठमोठ्यानें हांक फोडतो ५७०.

दुर्धर भवबंध ज्याचेनि । निःशेष गेला हारपोनी ।
त्या सद्‌गुरूच्या निजस्तवनीं । गर्जवी वाणी अलोलिक ॥ ५७१ ॥
ज्याच्यायोगें दुर्धर असा भवबंध नाहीसा होऊन गेला, त्या सद्गुरूच्या स्तवनामध्येंच आपली अलौकिक वाणी गर्जवितो ७१.

म्हणे संसार झाला वावो । जन्ममरणांचा अभावो ।
कळिकाळासी नाहीं ठावो । म्हणोनियां पहा वो हाक फोडी ॥ ५७२ ॥
‘अहो ! हा संसार मिथ्या झाला; जन्ममरणाचा अभाव झाला; कळिकाळाचा ठावच पुसून गेला’, असे म्हणून हाक फोडतो ७२.

ऐशा हांकावरी हाका । फोडूं लागे अलोलिका ।
सवेंचि गाये निजात्मसुखा । स्वानंदें देखा डुल्लतु ॥ ५७३ ॥
अशा एकावर एक हाका अपूर्व रीतीनें मारू लागतो. लगेच आत्मसुखाचे गाणे गातो, आणि स्वानंदानें डोलत राहतो ७३.

परम सख्याची गोड कथा । तृप्ती न बाणे स्वयें सांगतां ।
तेवीं निजानुभवें हरि गातां । धणी सर्वथा पुरेना ॥ ५७४ ॥
जिवलगाची गोड कथा स्वतः सांगू लागले असतां तृप्तीच होत नाहीं; त्याप्रमाणें आत्मानुभवानें हरीला गाऊं लागले म्हणजे काही केले तरी पुरेच वाटत नाहीं ७४.

त्याचें गाणें ऐकतां । सुखरूप होय सज्ञान श्रोता ।
मुमुक्षां होय परमावस्था । जरी तो अवचिता गावों लागे ॥ ५७५ ॥
त्याचे गायन श्रवण करतांना ज्ञानी श्रोता सुखरूप होतो; मुमुक्षूला त्याचे गाणे ऐकून प्रेमाचें भरतें दाटून येते ७५.

गातां पदोपदीं निजसुख । कोंदाटे अधिका‍अधिक ।
वोसंडितां परम हरिख । स्वानंदें अलोलिक नाचों लागे ॥ ५७६ ॥
ह्याप्रमाणें तो गाऊं लागला असतां पदोपदीं तें निजसुख दाटून येते, आणि हर्ष पोटांत मावेनासा झाला म्हणजे तो निजानंदानें अलौकिकपणे नाचूं लागतो ७६.

सारूनि दुजेपणाचें काज । निरसोनि लौकिकाची लाज ।
अहंभावेंविण सहज । आनंदाचे भोजें अलोलिक नाचे ॥ ५७७ ॥
दुजेपणाचे काम सोडून, लौकिकाची लाज टाकून देउन तो अहंभावाशिवाय सहज आनंदानें मोठ्या गमतीनें नाचतो ७७.

जो मोलें मदिरा खाये । तो मदिरानंदें नाचे गाये ।
जेणें ब्रह्मानंदु सेविला आहे । तो केवीं राहे आवरला ॥ ५७८ ॥
जो विकत घेऊन दारू पितो, तोसुद्धा दारूच्या गुंगीत गातो आणि नाचतो, मग ज्यानें ब्रह्मानंदरस सेवन केला, तो कह्यात कसा राहणार ? ७८.

यालागीं तो लोकबाह्यता । स्वये नाचे ब्रह्मउन्मादता ।
लोक मानिती तया पिशाचता । हा बोधु पंडितां सहजा न कळे ॥ ५७९ ॥
ह्यासाठी ब्रह्मानंदाच्या उन्मादांत लौकिक सोडून तो स्वतः गात व नाचत असतो. लोक त्याला वेडा म्हणतात. हे बोधाचे वर्म पंडिताना सहसा कळत नाहीं ७९.

त्याचिया निजबोधाची कथा । ऐक सांगेन नृपनाथा ।
एक भगवंतावांचून सर्वथा । त्यासी लौकिकता दिसेना ॥ ५८० ॥
राजा ! त्याला एका भगवंतावांचून दुसरा लोकाचार दिसतच नाही. त्याच्या निजबोधाची कथा सांगतों ऐक ५८०.

खं वायुमग्निं सलिलं महीं च
ज्योतींषि सत्त्वानि दिशो द्रुमादीन् ।
सरित्समुद्रांश्च हरेः शरीरं
यत्किंच भूतं प्रणमेदनन्यः ॥ ४१ ॥
श्लोक ४१- आकाश, वायू, अग्नी, पाणी, पृथ्वी, ग्रहनक्षत्रे, प्राणी, दिशा, वृक्षवनस्पती, नद्या, समुद्र हे सगळे, इतकेच काय, सारे चराचर भगवंतांचे शरीर समजून त्याला अनन्य भावाने नमस्कार करावा. (४१)

ब्रह्मउन्मादपरमानंदें । जंव जंव पाहे स्वानंदबोधें ।
तंव तंव चराचर पूर्णानंदें । देखे स्वानंदकंदें दुमदुमित ॥ ५८१ ॥
स्वानंदाच्या बोधानें आणि ब्रह्मोन्मादाच्या परमानंदानें तो जो जो पाहूं लागतो, तों तों त्याला हे चराचर पूर्णानंदानें भरलेले आणि स्वानंदानें दुमदुमलेलेंच दिसते ८१.

पृथ्वी आप तेज वायु नभ । देखे हरिरूप स्वयंभ ।
भूतां महाभूतांचें डिंभ । न देखे भिन्न कोंभ अभिन्नत्वें ॥ ५८२ ॥
पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश ही सर्व त्याला साक्षात हरिस्वरूप दिसूं लागतात. भूतांच्या किंवा महाभूतांच्या प्रतिभेचे भिन्न भिन्न कोंभ, त्याला सारे अभिन्न-एकरूपच भासूं लागतात ८२.

जेवीं न मेळवितां मेळा । पाहतां जैसा केळीचा कळा ।
स्वयें विकासे फळांदळां । तेवीं वस्तु हे पांचाला भूतभौतिकात्मक ॥ ५८३ ॥
ज्याप्रमाणें दुसरी सामग्री न मिळवितां केळीचा कोंब फळे व पानें ह्या रूपानें विकास पावतो, त्याप्रमाणे, परीक्षिति राजा ! परब्रह्म हें भूत-भौतिकात्मक रूपानें प्रगट होते ८३.

जेवीं कांतोनियां रंध्रसळे । स्फटिकदीपगृहअंगमेळें ।
चितारिलीं अश्वगजदळें । तीं भासती सोज्ज्वळें आंतुलेनि दीपें ॥ ५८४ ॥
किंवा स्फटिकगृहाच्या भिंतीवर कोरण्याच्या हत्यारानें हत्ती, घोडे व सैन्य इत्यादि कोरून काढलेली चित्रे, आंतील दिव्यामुळेंच अगदी हुबेहुब दिसतात ८४.

तेवीं सोमसूर्यादि तेजशक्ती । कां वन्हि नक्षत्रें जे लखलखिती ।
जननयनादि निजदीप्ती । देखे आत्मज्योती सतेज ॥ ५८५ ॥
त्याप्रमाणें तेजःपुंज असे सूर्यचंद्रादिक किंवा लखलखणारे अग्नि व नक्षत्रें यांच्यांतील लखलखीतपणा व प्राण्यांच्या नयनांतील तेज, ही सर्व आत्मज्योतीनेंच सतेज दिसतात ८५.

युक्तीं मेळवितां द्रव्यांतर । अग्नि परी भासे पुष्पाकार ।
तेवीं वस्तु स्वलीला साचार । रविचंद्राकारा नानात्वें भासे ॥ ५८६ ॥
जाळण्याच्या दारूचे पदार्थ (गंधक, सोरमीठ, कोळसा वगैरे) युक्तीनें मिश्रित केले म्हणजे (बाण, फुलबाजा, नळे वगैरेमधील) अग्नि हा फुलासारखा दिसू लागतो, त्याप्रमाणें परब्रह्म हे आपल्या लीलेनें सूर्यचंद्राकार होऊन नानात्वानें भासतें ८६.

पृथ्वी गंधरूपें स्वयें असे । तो गंधु कस्तूर्यादिकीं भासे ।
तेवीं भगवत्सत्ता सर्वत्र असे । परी सात्त्विकीं दिसे अतिप्रगट ॥ ५८७ ॥
पृथ्वी स्वतःसिद्ध गंधरूप आहे, पण तो सुगंध कस्तूरी इत्यादि पदार्थांमध्येंच प्रगट होतो; त्याप्रमाणें भगवंताची सत्ता ही सर्वत्र आहे, पण ती सात्त्विकामध्यें (अंतःकरणाच्या सत्त्ववृत्तीमध्यें) अतिशय स्पष्ट दिसते ८७.

यालागीं सात्त्विकाठायीं सत्त्व । तेथ देखे भवगत्तत्त्व ।
सत्त्वें सत्त्वंतां महत्त्व । अति मान्यत्व हरिरूपें ॥ ५८८ ॥
म्हणून सात्त्विकाच्या ठिकाणी जें सत्त्व असते, ते भगवत्तत्त्व आहे असे समज. सत्त्वस्थ वृत्तीच्या लोकांना सत्त्वामुळेच महत्त्व व हरिरूपानें मान्यत्व प्राप्त होते ८८.

पृथ्वीसी जळावरण आहे । तेंचि चतुःसमुद्र नांव लाहे ।
तैसें देवाचेंचि अंग पाहे । दिशात्वें वाच्य होये दशदिशां ॥ ५८९ ॥
पृथ्वीभोंवतीं जलाचे आवरण आहे, त्याला ‘चतुःसमुद्र’ असे म्हणतात. त्याप्रमाणें दशदिशांमध्यें असलेले देवाचेंच अंग ‘दिशा’ ह्या नांवानें बोलले जाते ८९.

पूर्वपश्चिमादि योग । दशदिशांचे दिग्विभाग ।
तेही देवाचेंचि अंग । तद्‌रूप श्रीरंग स्वयें भासे ॥ ५९० ॥
पूर्व-पश्चिम इत्यादि जे प्रकार आहेत, ते दशदिशांचेच भाग होत, ते देवाचेंच अंग. त्या रूपानें श्रीरंगच मूर्तिमंत भासतो ५९०.

तृण दूर्वा दर्भ द्रुम । देखोनि म्हणे हेही हरीचे रोम ।
अनोळखा हें अतिविषम । निजांगीं सर्व सम हरिरूप पाहतां ॥ ५९१ ॥
गवत, दूर्वा, दर्भ, झाडें ही पाहून हेही श्रीहरीचेच केस आहेत असे तो म्हणतो. आपल्या अंगांत सर्वत्र सम हरिरूप असतांही, न ओळखणाऱ्याला हे सर्व विषमच दिसते ९१.

जैशा आपुल्या अंगोळिया । गणितां दिसती वेगळालिया ।
परी असती लागलिया । स्वयें सगळिया अखंड अंगीं ॥ ५९२ ॥
आपली बोटे मोजू लागले म्हणजे ज्याप्रमाणें ती वेगळी वेगळी आहेत असे वाटते; पण ती मूळची साऱ्या आपल्या एका आंगालाच अखंड चिकटून राहिलेली असतात ९२

तेवीं वन-वल्ली-दर्भ-दांग । देखोनि म्हणे हे हरीचें अंग ।
अनन्यभावें लगबग । भिन्नभाग देखेना ॥ ५९३ ॥
त्याप्रमाणें वन, वेली, दर्भ, अरण्य इत्यादि पाहून हे सर्व हरीचेंच स्वरूप आहे असे तो म्हणतो. हे सारे तो ऐक्यभावानेंच पाहातो, त्याला त्यांत निराळा अंश दिसतच नाहीं ९३.

म्हणे दूर्व-द्रुम-वन-वल्ली । हेचि अनंत कोटि रोमावळी ।
हरीचेनि अंगें असे वाढली । त्या निजशोभा शोभली हरिरूपत्वें ॥ ५९४ ॥
दूर्वा काय, झाडेझुडपें काय, किंवा रानवेली काय, ही अनंत कोटि केसांची पंक्ति हरीच्या अंगावर वाढलेली आहे, आणि तिला त्या श्रीहरीच्याच स्वरूपानें शोभा आली आहे असें तो म्हणतो ९४.

जेवीं वटाच्या पारंबिया । लोंबोनि वाढती वेगळालिया ।
त्याही वटरूपें संचलिया । वटत्वा मुकलिया म्हणों नये ॥ ५९५ ॥
वडाच्या पारंब्या ज्याप्रमाणें लोंबत सुटून निरनिराळ्या वाढतात, तरी त्या वडाच्याच झाडाच्या असतात. त्या वटत्वाला मुकल्या असे म्हणता येत नाही. ९५.

तेवीं चैतन्यापासोनि वोघ । निघाले सरितारूप अनेग ।
तेही चैतन्यघन चांग । चिद्‌रूपें साङ्ग सदा वाहती ॥ ५९६ ॥
त्याप्रमाणें चैतन्यापासून हे नद्यांच्या रूपानें अनेक ओघ निघालेले आहेत, त्यांतही ओतप्रोत चैतन्यच भरलेले आहे, आणि त्या चिद्‌रूपानेंच निरंतर वाहात असतात ९६.

हो कां चंद्रबिंबीं अमृत जैसे । बिंबीं बिंबरूप हो‍ऊनि असे ।
तेवीं भगवंतीं संसारु भासे । भजनविश्वासें भगवद्‌रूप ॥ ५९७ ॥
किंवा चंद्रबिंबांतील अमृत जसे बिंबांत बिंबरूपच होऊन असते, त्याप्रमाणें भगवंतामध्यें संसार भासतो, व तो भजनविश्वासानें भगवद्‌रूपच होतो ९७.

ऐसे वेगवेगळे भाग । पाहतां उल्हासे जंव चांग ।
तंव अवघें उघडें जग । देवोचि साङ्ग स्वयें झाला ॥ ५९८ ॥
अशा प्रकारें सृष्टीतील वेगवेगळे भाग पाहतांना जसजसा उल्हास वाटत जातो, तसतसा यच्चयावत जग देवच पूर्णपणे नटला आहे असा त्याला अनुभव येऊ लागतो ९८.

यालागीं सर्व भूतांचे ठायीं । अनन्यशरण कैसा पाहीं ।
लवण जैसें सागरापायीं । ठायीं ठायीं जडोनि ठाके ॥ ५९९ ॥
ह्यासाठी तो सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी असा काही लीन होऊन जातो की, समुद्राच्या पाण्यामध्यें जणू काय मीठच अंशाअंशांनी मिळून गेलें आहे ९९.

तेथ मुंगीही देखोनि जाण । हरिरूपीं वंदी आपण ।
मशकासही अनन्यशरण । घाली लोटांगण भगवद्‌रूपें ॥ ६०० ॥
त्या स्थितीत तो मुंगीला पाहून तेही हरिस्वरूपच समजून वंदन करतो. हे तर काय, पण एकाद्या माशीला पाहूनसुद्धा तेही भगवंताचेंच स्वरूप म्हणून अनन्यभावानें शरण होऊन लोटांगण घालतो ६००.

गो-खर-चांडाळ-श्वान । अतिनिंद्य जे हीन जन ।
ते भगवद्‌रूप देखोनि पूर्ण । घाली लोटांगण अनन्यभावें ॥ ६०१ ॥
गाय असो की गाढव असो; चांडाळ असो की श्वान असो; लोकांत ज्यांना अत्यंत निंद्य व कनिष्ठ समजतात, त्यांनाहीं पूर्ण भगवद्‌रूप मानून अनन्यभावानें लोटांगण घालतो १.

हरिरूपें देखे पाषाण । भगवद्‌रूपें वंदी तृण ।
जंगमस्थावरादिकां शरण । घाली लोटांगण चिदैक्यभावें ॥ ६०२ ॥
पाषाणसुद्धा हरिरूपच समजतो. तृणालासुद्धा भगत्वस्वरूप मानून वंदन करतो. स्थावरजंगमादिकांनासुद्धां चिदैक्यभावानें लोटांगण घालतो २.

करितां हरिनामस्मरणकीर्ती । एका‍एकी एवढी प्राप्ती ।
झाली म्हणसी कैशा रितीं । ऐकें नृपती तो भावो ॥ ६०३ ॥
हरिनामस्मरणाच्या महिन्यानें एवढा लाभ कसा होतो म्हणशील तर, हे राजा ! त्यांतील मर्म ऐक ३.

करितां पूजाविधिविधान । कां श्रवण स्मरण कीर्तन ।
सर्वदा चिदैक्यभावना पूर्ण । “पूर्ण प्राप्ति” जाण त्यातेंचि वरी ॥ ६०४ ॥
विधिपूर्वक पूजाविधान किंवा श्रवण, स्मरण व कीर्तन करीत असतां ज्याची सर्वकाळ पूर्ण ‘चिदैक्यभावना’ असते, त्यालाच ‘पूर्णप्राप्ति’ साध्य होते असें हूं समज ४.

भक्तिः परेशानुभवो विरक्तिः
अन्यत्र चैष त्रिक एककालः ।
प्रपद्यमानस्य यथाश्नतः स्युः
तुष्टिः पुष्टिः क्षुदपायोऽनुघासम् ॥ ४२ ॥
श्लोक ४२- जसे जेवणार्‍याला प्रत्येक घासाबरोबर तृप्ती, जीवनशक्ती आणि भूक नाहीशी होणे असे तीन फायदे एकाच वेळी होतात, त्याचप्रमाणे जो मनुष्य भगवंतांना शरण जातो, त्याला भगवंतांबद्दल प्रेम, त्यांच्या स्वरूपाचा अनुभव आणि इतर सर्व वस्तूंविषयी वैराग्य, अशा तीनही गोष्टींची एकाच वेळी प्राप्ती होते. (४२)

आ‍इके विदेहा चक्रवर्ती । ऐशी जेथें भगवद्‌भक्ती ।
तीपाशीं विषयविरक्ती । ये धांवती गोवत्स न्यायें ॥ ६०५ ॥
हे चक्रवर्ती जनकराजा ! ऐक. अशी जेथें भगवद्‌भक्ति असते, तिच्यापाशी गोवत्सन्यायानें विषयविरक्तीही धावून येते ५.

हें असो जेवीं जावळीं फळें । हों नेणें येरयेरां वेगळें ।
तेवीं भक्ति विरक्ति एके काळें । भक्त तेणें बळें बळिष्ठ होती ॥ ६०६ ॥
हे असो. जुळी फळे असली म्हणजे ती एकमेकास सोडूं शकत नाहीत, त्याप्रमाणें भक्ति आणि विरक्ति या एकदमच उत्पन्न होतात आणि त्यांच्या सामर्थ्यावर भक्त हेही समर्थ होतात ६.

जेथ भक्ती आणि विरक्ती । नांदो लागती सहजस्थिती ।
तेथेंचि पूर्णप्राप्ती । दासीच्या स्थितीं सर्वदा राबे ॥ ६०७ ॥
जेथें भक्ति आणि विरक्ति या सहजस्थितीनें नांदूं लागतात, तेथेच पूर्ण-प्राप्ति ही सदासर्वकाल दासीसारखी राबते ७.

यापरी भगवद्‌भक्ती । पूर्ण दाटुगी त्रिजगती ।
भक्तांघरीं नांदे प्राप्ती । भक्तिविरक्तिनिजयोगें ॥ ६०८ ॥
याप्रमाणें भगवद्‌भक्ति ही त्रिभुवनामध्यें महान् समर्थ आहे. आणि भक्ति-विरक्तींच्या एकोप्यामुळें भक्तांच्या घरी प्राप्तीही नांदूं लागते ८.

भक्ति विरक्ति अनुभवप्राप्ती । तिन्ही एके काळें होती ।
ऐक राया तेही स्थिती । विशदोक्तीं सांगेन ॥ ६०९ ॥
आता भक्ति, विरक्ति आणि अनुभवप्राप्ति या तिन्ही एकाच काळी कशा उत्पन्न होतात, ती स्थितीही तुला विशद करून सांगतों ९.

जैसी कीजे भगवद्‌भक्ती । तैसीच होय विषयविरक्ती ।
तदनुसारें अनुभवस्थिती । ती भक्त पावती तेचि क्षणीं ॥ ६१० ॥
जशी जशी भगवद्‌भक्ति करावी, तशी तशी विषयामध्यें विरक्ति उत्पन्न होत जाते आणि तदनुसार अनुभवस्थितीही भक्तांना त्याच वेळी प्राप्त होते ६१०.

जेवीं कां भुकेलियापाशीं । ताट वाढिलें षड्रसीं ।
तो पुष्टि तुष्टि क्षुधानाशासी । जेवीं ग्रासोग्रासीं स्वयेंचि पावे ॥ ६११ ॥
भुकेलेल्या मनुष्यापुढे षड्‌रसान्नाचे ताट वाढून ठेवले म्हणजे त्याला प्रत्येक घांसाबरोबर पुष्टि, तुष्टि व क्षुधानाश आपोआप लाभतात . ६११.

जितुका जितुका घे‍इजे ग्रास । तितुका तितुका क्षुधेचा नाश ।
तितुकाचि पुष्टिविन्यास । सुखोल्लास तितुकाचि ॥ ६१२ ॥
जितका जितका घांस घ्यावा, तितका तितका क्षुधेचा नाश होतो, आणि तितकें तितकें पोट भरत येऊन सुख व समाधानही तितकेंच वाढत जातें १२.

पुष्टि तुष्टि क्षुधानाशनी । जेवीं एके काळें येती तिनी ।
भोक्ता पावे स्वयें भोजनीं । तेवीं भगवद्‌भजनीं भक्त्यादि त्रिकु ॥ ६१३ ॥
पुष्टि, तुष्टि व क्षुधानाश ही तिन्ही जशी जेवणाराला जेवणामध्यें एकदमच प्राप्त होतात, त्याप्रमाणें भगवद्‌भजनामध्यें भक्तीचे त्रिकूट म्हणजे भक्ति, विरक्ति व अनुभवप्राप्ति ही तिन्ही एकदमच उत्पन्न होतात १३.

सद्‌भावें करितां भगवद्‌भक्ती । भक्ति-विरक्ति-भगवद्प्राप्ती ।
तिनी एके काळें होती । ऐशिया युक्तीं जाणिजे राया ॥ ६१४ ॥
हे राजा ! सद्‌भावानें भगवद्‌भक्ति केली असतां भक्ति, विरक्ति आणि भगवत्प्राप्ति ही तिन्ही वरील न्यायानें एकसमयावच्छेदेंकरून प्राप्त होतात असें तूं जाण १४.

भक्ती म्हणिजे सर्व भूतीं । सप्रेम भजनयुक्ती ।
प्राप्ती म्हणिजे अपरोक्षस्थिती । भगवत्स्फूर्ती अनिवार ॥ ६१५ ॥
‘भक्ति’ म्हणजे सर्व प्राणिमात्रांच्या ठायीं सप्रेमभावना, आणि ‘प्राप्ति’ म्हणजे अपरोक्ष साक्षात्कार, अर्थात् भगवद्‌रूपाची अनिवार स्फूर्ति होय १५.

विरक्ति म्हणिजे ऐशी पहा हो । स्त्रीपुत्रदेहादि अहंभावो ।
समूळ जेथें होय वावो । विरक्ति निर्वाहो या नांव राया ॥ ६१६ ॥
आता ‘विरक्ति’ म्हणजे अशी की, माझी स्त्री, माझा पुत्र, माझा देह, इत्यादि जो ममकार व अहंकार असतो, तो जेथे समूळ मिथ्या होऊन जातो, राजा ! ह्याचेच नांव ‘विरक्ति’ असें तूं समज १६.

यापरी भजनाचे पोटीं । भक्ति-विरक्ति-प्राप्ति त्रिपुटी ।
ऐक्यभावें सद्‌भक्तां उठी । हरिभजनदिठी एकेचि काळीं ॥ ६१७ ॥
अशा प्रकारें भजनाच्या पोटी भक्ति, विरक्ति आणि भगवत्प्राप्ति ही त्रिपुटी ऐक्यभावानें सद्‌भक्ताच्या ठिकाणी भजनदृष्टीमुळें एकाच वेळी उत्पन्न होते १७.

यालागीं राया निजहितार्थीं । आदरें करावी हरिभक्ती ।
तेणें अवश्य भगवत्प्राप्ती । उपसंहारार्थी कवि सांगे ॥ ६१८ ॥
ह्यासाठी राजा ! स्वहिताकरितां अवश्यमेव हरीची भक्ति करावी. तेणेंकरून हटकून भगवत्प्राप्ति होते. असें उपसंहारार्थ ‘कवि’ (पुढील श्लोकांत) सांगतो १८.

इत्यच्युताङ्‌घ्रिं भजतोऽनुवृत्त्या
भक्तिर्विरक्तिर्भगवत्प्रबोधः ।
भवन्ति वै भागवतस्य राजन्
ततः परां शान्तिमुपैति साक्षात् ॥ ४३ ॥
श्लोक ४३- हे राजन ! अशा प्रकारे जो भक्त निरंतर भगवंतांचे भजन करतो, त्याला भगवंतांविषयी भक्ती, संसाराबद्दल वैराग्य आणि भगवंतांच्या स्वरूपाचे ज्ञान प्राप्त होते आणि तेव्हा तो परम शांतीचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ लागतो. (४३)

यापरी अनन्य भक्ती । जे सर्वदा सर्वभूतीं करिती ।
ते भक्ती-विरक्ती-भगवत्प्राप्ती । सहजें पावती अनायासें ॥ ६१९ ॥
ह्याप्रमाणें सदासर्वदा जे सर्व भूतांच्या ठिकाणी अनन्य भक्ति करतात, ते भक्ति, विरक्ति व भगवद्‌प्राप्ति अनायासें प्राप्त करून घेतात १९.

राया हरिभक्तिदिव्यांजन । तें ले‍ऊनि भक्त सज्जन ।
साधिती भगवन्निधान । निजभजनमहायोगें ॥ ६२० ॥
हे राजा ! हरिभक्ति हें एक उत्तम अंजन आहे. ते सद्‌भक्त आपल्या नेत्रांत घालून आपल्या भजनरूप महायोगानें भगवत्स्वरूपाचा ठेवा आपलासा करितात ६२०.

करितां ऐक्यभावें निजभक्ती । उत्कृष्ट उपजे पूर्ण शांती ।
तेणें होये असतांची निवृत्ती । भक्तां पूर्णप्राप्ति परमानंदें ॥ ६२१ ॥
ऐक्यभावनेनें निजभक्ति केली असतां सर्वोत्कृष्ट पूर्ण शांति प्राप्त होते, आणि तिच्या योगें असत् वस्तूंची निवृत्ति होऊन भक्तांना ब्रह्मानंदरूप भगवंताची पूर्ण प्राप्ति होते २१.

यालागीं धन्य भगवद्‌भक्त । इंद्रियीं वर्तता विषयी विरक्त ।
देहीं असोनि देहातीत । नित्यमुक्त हरिभजनें ॥ ६२२ ॥
म्हणून भगवद्‌भक्त हे मोठे धन्य होत ! ते इंद्रियांशी वावरत असूनही विषयांविषयीं विरक्त असतात, ते देहधारी असून विदेही असतात, आणि हरिभजनाच्या योगें नित्यमुक्त होऊन राहतात २२.

भावें करितां भगवद्‌भक्ती । भक्त मुक्तीही न वंछिती ।
तरी त्यांपाशी चारी मुक्ती । दास्य करिती सर्वदा ॥ ६२३ ॥
भक्त एकनिष्ठेनें भगवद्‌भक्ति करीत असता, तिच्या भरांत ते मुक्तीचीही इच्छा करीत नाहीत; तरी पण, त्यांच्यापाशी सदासर्वदा चारही मुक्ति दास्य करीत असतात २३.

हा भागवतांचा निजमहिमा । अनुपम नाहीं उपमा ।
भावें भजोनि पुरुषोत्तमा । परमात्मगरिमा पावले ॥ ६२४ ॥
हा भगवद्‌भक्तांचा महिमा निरूपम आहे. त्याला उपमा नाही. एकनिष्ठेनें पुरुषोत्तमाचे भजन करून ते श्रेष्ठ अशा परमात्मपदाला पोचलेले असतात २४.

अगाध भगवंताची भक्ती । भक्तांची उत्कृष्ट प्राप्ती ।
ऐकतां विदेहचक्रवर्ती । आश्चर्यें चित्तीं चमत्कारला ॥ ६२५ ॥
अशा प्रकारची भगवंताची श्रेष्ठ भक्ति आणि भक्तांना होणारी भगवद्‌प्राप्ति ऐकून चक्रवर्ती जनक राजाच्या चित्ताला मोठे आश्चर्य वाटले २५.

म्हणे धन्य धन्य भगवद्‌भजन । हरिखें कवीस लोटांगण ।
घालितां चालिलें स्फुंदन । रोमांचित नयन अश्रुपूर्ण जाहले ॥ ६२६ ॥
‘धन्य धन्य भगवद्‌भजन’ असें म्हणून आनंदानें कवीला तो लोटांगण घालू लागला, तेव्हां त्याचा कंठ भरून येऊन हुंदके आवरतनासे झाले, सर्वांगावर रोमांच उभे राहून अश्रूंनी नेत्र भरून आले २६.

आनंदस्वेदें कांपत । नावेक राहिला तटस्थ ।
सवेंचि जाहला सावचित्त । म्हणे झणीं महंत न पुसतां जाती ॥ ६२७ ॥
आनंदाचा घाम फुटून आंग थरथर कापू लागले व तो क्षणभर तटस्थ होऊन राहिला. पण लगेच देहभानावर आला. कारण न जाणों, हे महर्षि आपल्याला न विचारतां निघूनही जातील असें त्याला वाटले २७.

ऐशिया अतिकाकुलतीं । नेत्र उघडोनि पाहे नृपती ।
बैसली देखोनि मुनिपंक्ती । अतिशयें चित्तीं सुखावला ॥ ६२८ ॥
अशा अत्यंत काकुळतीनें राजानें डोळे उघडून पाहिले, तो ऋषिमंडळी बसलेली पाहून त्याच्या मनाला अत्यंत आनंद झाला २८.

तेणें संतोषें डोलत । म्हणे पूर्णप्राप्त भगवद्‌भक्त ।
जगीं कैसे कैसे विचरत । तीं चिन्हें समस्त पुसों पाहों ॥ ६२९ ॥
त्या आनंदाच्या भरांत तो डोलूं लागला आणि म्हणाला, ज्यांना ‘पूर्णप्राप्ति’ झालेली असते, असे भगवद्‌भक्त जगामध्यें कसकसे वागतात, ती सारी लक्षणे आतां ह्यांस विचारून पाहूं २९.

श्रीराजोवाच –
अथ भागवतं ब्रूत यद्धर्मो यादृशो नृणाम् ।
यथाचरति यद्ब्रूते यैर्लिङ्गैर्भगवत्प्रियः ॥ ४४ ॥
श्लोक ४४- राजाने विचारले आता आपण मनुष्यांपैकी भागवत कोणाला म्हणावे, ते सांगा त्याचे धर्म कोणते ? त्याचा स्वभाव कसा असतो ? तो माणसांशी कसा वागतो ? काय बोलतो ? आणि कोणत्या लक्षणांमुळे तो भगवंतांना प्रिय होतो ? (४४)

भक्तां ‘पूर्णप्राप्ति’ सुगम । ऐकतां राजा निवाला परम ।
तो भक्तचिन्हानुक्रम । समूळ सवर्म पूसत ॥ ६३० ॥
भक्ताला ‘पूर्णप्राप्ति’ होणे सुगम आहे हे ऐकून राजाला अतिशय संतोष झाला. म्हणून तो भक्तांच्या लक्षणांचा अनुक्रम व समूळ मर्म विचारूं लागला ६३०.

विदेह म्हणे स्वामी मुनी । पूर्ण प्राप्ति आकळोनी ।
ते भक्त कैसे वर्तती जनीं । तीं लक्षणें श्रवणीं लेववी मज ॥ ६३१ ॥
जनक राजा म्हणाला, महाराज ! मुनिवर्य ! पूर्ण प्राप्ति करून घेतलेले जे भगवद्‌भक्त असतात, ते जगामध्यें वागतात तरी कसे ? ती त्यांची सारी लक्षणे माझ्या कानांवर घालून माझे कान अलंकृत करा ३१.

भक्तलक्षणभूषण । तेणें मंडित करा श्रवण ।
सावध ऐकतां संपूर्ण । हो‍इजे आपण भगवत्प्रिय ॥ ६३२ ॥
भक्तांची लक्षणे हे एक प्रकारचे अलंकारच आहेत, ते घालून माझे श्रवण भूषणयुक्त करा. ती सारी लक्षणे जर लक्ष लावून श्रवण केली, तर आपणही भगवंताला प्रिय होऊ ३२.

त्यांचा कोण धर्म कोण कर्म । कैसे वर्तती भक्तोत्तम ।
हृदयीं धरोनि पुरुषोत्तम । त्यांचें बोलतें वर्म तें कैसें ॥ ६३३ ॥
त्यांचा धर्म कोणता ? त्यांचे कर्म कसे असते ? अंतःकरणामध्यें पुरुषोत्तमाला ठेवून ते कसे काय वागतात ? त्यांची बोलण्याची शैली कशी ? ३३.

कोणेपरी कैशा स्थितीं । हरिभक्त हरीस प्रिय होती ।
ऐशिया लक्षणांचिया पंक्ती । समूळ मजप्रती सांगिजे स्वामी ॥ ६३४ ॥
कोणत्या स्थितीनें आणि कोणत्या रीतीनें हरीचे भक्त हरीला प्रिय होतात ? स्वामी ! अशा लक्षणांच्या जितक्या मालिका असतील, तितक्या साऱ्या मला सांगाव्यात ३४.

विदेहाच्या प्रश्नावरी । संतोषिजे मुनीश्वरीं ।
कविधाकुटा जो कां हरी । तो बोलावया वैखरी सरसावला ॥ ६३५ ॥
ह्या जनक राजाच्या प्रश्नानें त्या सर्व मुनीश्वरांना मोठा संतोष झाला व कवीहून धाकटा असा ‘हरि’ नावाचा बंधु त्याच्या प्रश्नाचे उत्तर देण्यास पुढे सरसावला ३५.

श्रीहविरुवाच –
सर्वभूतेषु यः पश्येद् भगवद्‌भावमात्मनः ।
भूतानि भागवत्यात्मन्येष भागवतोत्तमः ॥ ४५ ॥
श्लोक ४५- हरी म्हणाला आत्मस्वरूप भगवान सर्व प्राण्यांमध्ये आत्मरूपाने राहिले आहते, असे जो पाहातो, त्याचबरोबर सर्व चराचर आत्मस्वरूप भगवंतांमध्येच आहेत, असे पाहातो, तो उत्तम भागवत समजावा. (४५)

हरि म्हणे रायाप्रती । अमित भक्तलक्षणस्थिती ।
एक दिगंबरत्वें वर्तती । एक स्वाश्रमस्थिती निजाचरें ॥ ६३६ ॥
राजाला हरि म्हणाला, “हे राजा ! भक्तलक्षणांचे अनेक प्रकार आहेत. कोणी दिगंबर म्हणजे नग्न स्थितीमध्यें राहतात, आणि कोणी आपला आश्रमधर्म पाळून आपल्याच आचारानें वागतात ३६.

एक सदा पडले असती । एकांची ते उन्मादस्थिती ।
एक सदा गाती नाचती । एक ते होती अबोलणे ॥ ६३७ ॥
कोणी सदासर्वदा स्वस्थ पडूनच राहातात, तर कोणी उन्मत्तासारखे वर्तन करतात. कोणी सर्वकाळ गातात व नाचतात, तर कोणी मौनच धरून राहतात ३७.

एक गर्जनीं हरिनामें । एक निर्दाळिती निजकर्में ।
एक भूतदयाळू दानधर्में । एक भजननेमें राहती ॥ ६३८ ॥
कोणी हरिनामाचा घोष करीत असतात ; कोणी आपली कर्मेच टाकून देतात ; कोणी प्राणिमात्राविषयीं दया ठेवून दानधर्म करीत राहतात व कोणी भजनाचा नियम धरून राहतात ३८.

ऐशा अनंत भक्तस्थिती । सांगतां सांगावया नाकळे वृत्ती ।
त्यांमाजीं मुख्य संकलितीं । राया तुजप्रती सांगेन ॥ ६३९ ॥
अशा भक्तांच्या स्थिति पुष्कळ आहेत. त्या साऱ्या सांगणे शक्य नाही. ह्याकरितां हे राजा ! त्यांपैकी मुख्य मुख्य आहेत त्या थोडक्यांत तुला सांगतों ३९.

पूर्णप्राप्तीचा मुख्य ठावो । सर्वां भूतीं भगवद्‌भावो ।
हाचि पूर्णभक्तीचा निजगौरवो । तोचि अभिप्रावो हरि सांगे ॥ ६४० ॥
सर्व भूतांमध्यें भगवंत भरलेला आहे असे पाहणें हेच पूर्णप्राप्तीचे मुख्य स्वरूप व साधन आहे ; हाच पूर्ण भक्तीचा निजगौरव आहे; अशा अभिप्रायानें हरि बोलतो ६४०.

सर्व भूतीं मी भगवंत । सर्व भूतें मजआंत ।
भूतीं भूतात्मा मीचि समस्त । मीचि मी येथ परमात्मा ॥ ६४१ ॥
मीच भगवत्स्वरूप असून सर्व भूतांमध्यें मीच व्यापलेलों आहे, माझ्यामध्येंच सर्व भूतें आहेत, आणि सर्व भूतांमधील भूतात्मा मीच असून परमात्मा तो मीच आहे ४१;

ऐसें जें पूर्णत्वाचें मीपण । तेणें वाढे आत्माभिमान ।
सहजें निजनिरभिमान । तें शुद्ध लक्षण ऐक राया ॥ ६४२ ॥
असें जें पूर्णत्वाचे मीपण असते, त्यानेंच आत्माभिमान वाढतो, व तो खराखरा निरभिमान सहज होतो. राजा तें शुद्ध लक्षण सांगतों ऐक ४२.

शुद्ध भक्तांचें निजलक्षण । प्रत्यगात्मयाचें जें मीपण ।
तेंही मानूनियां गौण । भावना पूर्ण त्यांची ऐसी ॥ ६४३ ॥
शुद्ध भक्तांचे मुख्य लक्षण असे आहे की, प्रत्यगात्माच आपण (प्रत्यगात्मा म्हणजे अवस्थात्रयसाक्षिचैतन्य; हेच मी आहे असें जें वेदान्ताचें निजगुह्य) तेसुद्धां गौण समजून त्यांची भावना पूर्णपणे अशी झालेली असते की ४३,

सर्वां भूती भगवंत । भूतें भगवंती वर्तत ।
भूतीं भूतात्मा तोचि समस्त । मी म्हणणे तेथ मीपणा न ये ॥ ६४४ ॥
सर्व प्राणिमात्रामध्यें भगवंत आहे आणि सर्व प्राणिमात्र भगवंतामध्यें आहेत; प्राणिमात्रामध्यें असणारा असा जो परमात्मा तोच मी आहे असे म्हटले म्हणून काही मीपणाचा दोष येत नाहीं ४४.

सर्व भूतीं भगवंत पाहीं । भूतें भगवंताचे ठायीं ।
हें अवघें देखे जो स्वदेहीं । स्वस्वरूप पाहीं स्वयें होय ॥ ६४५ ॥
सर्व प्राणिमात्रामध्यें भगवंत आहे, आणि भगवंतामध्यें सर्व प्राणिमात्र आहेत असें जो मानतो आणि हे सारें जो आपल्याच देहामध्यें पाहतो, तो स्वस्वरूपच बनून राहतो ४५.

तो भक्तांमाजीं अतिश्रेष्ठ । तो भागवतांमाजीं वरिष्ठ ।
त्यासी उत्तमत्वाचा पट । अवतार श्रेष्ठ मानिती ॥ ६४६ ॥
तो भक्तांमध्यें अत्यंत श्रेष्ठ, तोच भागवतांमध्यें वरिष्ठ, त्यालाच उत्तमत्वाचा मान देऊन श्रेष्ठ अवतार समजतात ४६.

तो योगियांमाजीं अग्रगणी । तो ज्ञानियांचा शिरोमणी ।
तो सिद्धांमाजीं मुगुटमणीं । हें चक्रपाणी बोलिला ॥ ६४७ ॥
योग्यांमध्यें अग्रगणी तोच; ज्ञान्यांमध्यें शिरोमणि तोच; आणि सिद्धांमध्यें मुकुटमणीही तोच. असें स्वतः श्रीकृष्णानें सांगितले आहे ४७.

जैशा घृताचिया कणिका । घृतेंसीं नव्हती आणिका ।
तेवीं भूतें भौतिकें व्यापका । भिन्न देखा कदा नव्हती ॥ ६४८ ॥
तुपाच्या कण्या असतात त्या तुपाहून जशा निराळ्या नसतात, त्याचप्रमाणें पंचमहाभूते व भौतिक पदार्थ-प्राण्यांचे शरीरादिक-हे सर्व, सर्वव्यापक परमात्म्याहून कधी भिन्न होत नाहीं ४८.

हे उत्तम भक्तांची निजस्थिती । राया जाणावी सुनिश्चितीं ।
आतां मध्यम भक्त कैसे भजती । त्यांची भजनगती ऐक राया ॥ ६४९ ॥
हे राजा ! ‘उत्तम’ भक्तांची स्थिति ही अशा भावनेची असते असें तूं निश्चयानें जाण. आतां ‘मध्यम’ भक्त कसे भजतात, त्यांचीही भजनपद्धति ऐकून ठेव ४९.

ईश्वरे तदधीनेषु बालिशेषु द्विषत्सु च ।
प्रेममैत्रीकृपोपेक्षा यः करोति स मध्यमः ॥ ४६ ॥
श्लोक ४६- जो भगवंतांवर प्रेम, त्यांच्या भक्तांशी मैत्री, दुःखी व अज्ञान्यांवर कृपा आणि भगवंतांचा द्वेष करणार्‍यांची उपेक्षा करतो, तो मध्यम प्रतीचा भागवत होय. (४६)

ईश्वर मानी उत्तमोत्तम । तद्‌भक्त मानी मध्यम ।
अज्ञान तो मानी अधम । द्वेषी ते परम पापी मानी ॥ ६५० ॥
ईश्वर हा उत्तमोत्तम; त्याचे भक्त हे मध्यम; अज्ञानी हे अधम; आणि द्वेषी हे अत्यंत पातकी असे तो मानतो ६५०.

ईश्वरी ‘प्रेम’ पवित्र । भक्तांसी ‘मैत्री’ मात्र ।
अज्ञानी तो कृपापात्र । उपेक्षा निरंतर द्वेषियांची ॥ ६५१ ॥
ईश्वरावर मात्र त्याचे शुद्ध प्रेम असते; भक्तांशी फक्त स्नेह असतो; अज्ञानी असतील त्यांच्यावर कृपा असते; आणि भूतांचा द्वेष करणारा असतो त्याची तो निरंतर उपेक्षाच करतो ५१.

हे मध्यम भक्तांची भक्ती । राया जाण ऐशिया रितीं ।
आतां प्राकृत भक्तांची स्थिती । तेही तुजप्रती सांगेन ॥ ६५२ ॥
हे राजा ! मध्यम भक्तांची भक्ति ती अशा रीतीची असते, हे ध्यानात ठेव. आता ‘प्राकृत’ भक्तांची स्थिति कशी असते, तेही तुला सांगतों ५२.

अर्चायामेव हरये पूजां यः श्रद्धयेहते ।
न तद्‌भक्तेषु चान्येषु स भक्तः प्राकृतः स्मृतः ॥ ४७ ॥
श्लोक ४७- आणि जो भगवंतांच्या मूर्तीचीच पूजाअर्चा श्रद्धेने करतो, परंतु त्यांचे भक्त किंवा अन्य लोकांवर प्रेम करीत नाही, तो कनिष्ठ भक्त होय. (४७)

पाषाणप्रतिमा हाचि देवो । तेथेंचि ज्याचा पूर्ण भावो ।
भक्त-संत-सज्जनांसी पहा वो । अणुमात्र देहो लवों नेदी ॥ ६५३ ॥
पाषाणाची मूर्ति हाच देव; तेथेच ज्याची सारी भक्ति. पण भक्त अथवा संत पाहून एक केसभरही देह वांकूं देत नाहीं ! ५३.

ते ठायीं साधारण जन । त्याची वार्ता पुसे कोण ।
त्यांसी स्वप्नींही नाही सन्मान । यापरी भजन प्राकृताचें ॥ ६५४ ॥
अशा ठिकाणी साधारण लोकांना कोण विचारतो ? त्यांना स्वप्नांतसुद्धा कधी सन्मान मिळावयाचा नाही. ह्याप्रमाणें प्राकृतांचे भजन असतें ५४.

ऐशिया स्थितीं जो जड भक्तु । तो जाणावा मुख्य प्राकृतु ।
प्रतिमाभंगें अंतु । मानी निश्चित्य देवाचा ॥ ६५५ ॥
अशा अज्ञान स्थितीमधील जो भक्त असतो, तोच मुख्य ‘प्राकृत’ भक्त होय. त्याच्या मूर्तीचा भंग झाला म्हणजे देवाचा अंत झाला असें तो समजतो ! ५५.

यापरी त्रिविध भक्त । सांगितले भजनयुक्त ।
परी उत्तमांचीं लक्षणें अद्‌भूत । ती सांगावया चित्त उदित माझें ॥ ६५६ ॥
अशा प्रकारे तीन प्रकारचे भजन करणारे लोक तुला सांगितले. पण उत्तम भक्तांची लक्षणे केवळ अपूर्व असतात. ती सांगावयास माझें मन अगदी उत्सक झाले आहे ५६.

गृहीत्वापीन्द्रियैरर्थान् यो न द्वेष्टि न हृष्यति ।
विष्णोर्मायामिदं पश्यन् स वै भागवतोत्तमः ॥ ४८ ॥
श्लोक ४८- जो इंद्रियांनी विषयांचे ग्रहण करतो, परंतु त्याबद्दल आवडनावड बाळगत नाही, ही सर्व भगवंतांचीच माया आहे, असे मानतो, तो उत्तम भागवत समजावा. (४८)

इंद्रियें विषयांतें सेविती । परी सुखदुःख नुमटे चित्तीं ।
विषय मिथ्यात्वें देखती । ते जाण निश्चितीं उत्तम भक्त ॥ ६५७ ॥
इंद्रियें विषयांचे सेवन करीत असतात, तरी ज्यांच्या चित्तामध्यें सुख-दुःख उत्पन्न होत नाही. कारण विषय मिथ्या आहेत असे ते मानतात; तेच खरोखर ‘उत्तम भक्त’ होत ५७.

मृगजळीं जेणें केलें स्नान । तो नाहतां कोरडाचि जाण ।
तेवीं भोगीं ज्यांसी अभोक्तेपण । ते भक्त पूर्ण उत्तमोत्तम ॥ ६५८ ॥
मृगजलामध्यें ज्यानें स्नान केलें. त्याचे स्नान झाले तरी तो कोरडाच असतो; त्याप्रमाणें भोग भोगण्यामध्येंही जे अलिप्त म्हणजे अभोक्ते असतात. तेच पूर्ण व उत्तमोत्तम भक्त होत ५८.

उत्तम भक्त विषय सेविती । हा बोलु रूढला प्राकृतांप्रती ।
त्यांसी विषयीं नाहीं विषयस्फूर्ती । त्यागिती भोगिती दोनी मिथ्या ॥ ६५९ ॥
उत्तम भक्त विषयसेवन करतात असा सामान्य लोकांचा बोलवा अथवा समजूत असते. पण त्यांना माहीत नसते की, तशा भक्तांना विषयामध्यें विषयस्फूर्तीच नसते. त्यांचे त्यागणे व भोगणे दोन्ही मिथ्याच असतात ५९.

स्वप्नींचें केळें रायभोगें । जागा हो‍ऊनि खावों मागे ।
तेणें हातु माखे ना तोंडी लागे । तेवीं विषयसंगें हरिभक्त ॥ ६६० ॥
स्वप्नामधील केळे अतिशय गोड लागले होते म्हणून जागे झाल्यावर तो तेच खावयास मागू लागला, तर ते हातालाही लागत नाही, आणि तोंडांतही जात नाहीं; त्याप्रमाणें विषयसंगांत हरिभक्त अलिप्तच असतात ६६०.

येथवरी मिथ्या विषयभान । तरी सेवावया त्यांसी काय कारण ।
येथ प्रारब्ध बळी पूर्ण । तें अवश्य जाण भोगवी ॥ ६६१ ॥
विषयभान जर इतकें मिथ्या आहे, तर त्यांनी त्याचे सेवन तरी का करावें ? (असें प्राकृत लोक म्हणतात त्याचे उत्तर असें की), प्रारब्धकर्म मोठे बलवत्तर असते, तेंच त्यांना विषय भोगण्यास भाग पाडते ६१.

परी मी एक विषयभोक्ता । ही स्वप्नींही त्यास नुमटे कथा ।
यालागीं उत्तम भागवतता । त्यासीच तत्त्वतां बाणली ॥ ६६२ ॥
परंतु मी एक विषयभोक्ता आहे, ही गोष्ट त्यांच्या स्वप्नांतसुद्धा येत नाहीं; म्हणूनच उत्तम भागवतपणा खराखुरा त्यालाच बाणला असे समजावे ६२.

यापरी विषयासक्तीं । वर्तिजे उत्तम भक्तीं ।
याहून अगाध स्थिती । सांगेन तुजप्रती ते ऐक ॥ ६६३ ॥
उत्तम भक्त विषयसेवनांत अशा रीतीनें वागतात. आता ह्याहूनही एक अगाध स्थिति आहे, तीही तुला सांगतों ऐक ६३.

देहेन्द्रियप्राणमनोधियां यो
जन्माप्ययक्षुत् भयतर्षकृच्छ्रैः ।
संसारधर्मैरविमुह्यमानः
स्मृत्या हरेर्भागवतप्रधानः ॥ ४९ ॥
श्लोक ४९- जन्ममृत्यू, तहानभूक, श्रम, भय आणि लालसा हे विकार क्रमशः शरीर, प्राण, इंद्रिये, मन आणि बुद्धी यांना होत असतातच जो भगवंतांचे स्मरण करण्यात इतका तन्मय झालेला असतो की, या प्रापंचिक गोष्टींनी त्रस्त होत नाही, तो उत्तम भागवत होय. (४९)

देह-इंद्रिय-मन-बुद्धि-प्राण । हेंचि बंधाचें पंचायतन ।
क्षुधा तृषा भय क्लेश पूर्ण । जन्ममरण इत्यादि ॥ ६६४ ॥
देह, इंद्रियें, मन, बुद्धि आणि प्राण हीच बंधाची पांच स्थानें आहेत. आणि त्यांत क्षुधा, तृषा, भय, क्लेश, जन्म, मरण इत्यादि भरलेली आहेत ६४.

या पांचां स्थानीं अपार श्रम । या नांव म्हणिजे संसारधर्म ।
निजभक्तां प्रसन्न आत्माराम । त्यांसी भवभ्रम स्वप्नींही नाहीं ॥ ६६५ ॥
ह्या पांचही ठिकाणी अत्यंत कष्ट असतात. ह्यालाच ‘संसारधर्म’ असें नांव आहे. परंतु श्रीआत्माराम आपल्या भक्तांवर सदासर्वदा प्रसन्न असतो, म्हणून त्यांना भवभ्रम स्वप्नांतसुद्धां शिवत नाहीं ६५.

क्षुधा लागलिया दारुण । आन्नआकांक्षें पीडे प्राण ।
भक्तां क्षुधेची नव्हे आठवण । ऐसें अगाध स्मरण हरीचें ॥ ६६६ ॥
अपरिहार्य क्षुधा लागली म्हणजे अन्नाच्या इच्छेनें इतरांचा प्राण व्याकुळ होतो, परंतु भक्त लोक हरिस्मरणांत इतके गढून गेलेले असतात की, त्यापुढे त्यांना क्षुधेची आठवणही होत नाहीं ६६.

भावें करितां भगवद्‌भक्ती । क्षुधेतृषेची नव्हे स्फूर्ती ।
एवढी पावले अगाध प्राप्ती । ते भवभयें निश्चितीं डंडळतीना ॥ ६६७ ॥
अंतःकरणपूर्वक भगवद्‌भक्ति केली असतां भूक व तहान ह्यांची आठवण होत नाही. एवढी थोर प्राप्ति ज्यांना झालेली असते, ते खरोखर संसारभयानें घाबरून जात नाहीत ६७.

मनामाजीं भवभयभरणी । तें मन रातलें हरिचरणीं ।
आतां भयातें तेथ कोण मानी । मन मनपणीं असेना ॥ ६६८ ॥
संसाराचे भय मनामध्यें असते, आणि त्यांचे मन तर हरिचरणामध्यें रंगून गेलेले असते; मग भयाला कोण मानणार ? कारण, तेथें मनाला मुळी मनोधर्मच राहत नाहीं ६८.

मनीं स्फुरे द्वैताची स्फूर्ती । तेथ भवभयाची दृढस्थिती ।
ते मनीं जाहली हरीची वस्ती । यालागीं भवभयनिवृत्ती द्वैतेंसीं ॥ ६६९ ॥
मनामध्यें द्वैताची भावना उत्पन्न होते व त्यामुळें संसारभय दृढावत जाते. अशा त्या मनामध्यें भगवंताची वस्ती झाली की, द्वैतासहवर्तमान भवभयाची निवृत्ति सहज होते ६९.

देहबुद्धीमाजीं जाणा । नानापरी उठती तृष्णा ।
ते बुद्धी निश्चयें हरीच्या स्मरणा । करितां परिपूर्णा विनटली स्वयें ॥ ६७० ॥
देहबुद्धीमध्यें नाना प्रकारच्या तृष्णा म्हणजे वासना उठतात; पण तीच बुद्धि निश्चयेंकरून हरीचे स्मरण करूं लागली, की तेथेंच पूर्णपणे जडून जाते ६७०.

जेथें जें जें स्फुरे तृष्णास्फुरण । तेथें स्वयें प्रगटे नारायण ।
तेव्हां तृष्णा होय वितृष्ण । विरे संपूर्ण पूर्णामाजीं । ६७१ ॥
त्या बुद्धीत मग जी जी तृष्णा स्फुरण पावते, त्या त्या तृष्णेत सहज नारायण प्रगट होतो. त्यामुळें तृष्णा वितृष्णा होते व पूर्णत्वांत विरून जाते ७१.

यापरी गा तृष्णारहित । हरिस्मरणें भगवद्‌भक्त ।
इंद्रियक्लेशां भक्त अलिप्त । तोही वृत्तांत ऐक राया ॥ ६७२ ॥
ह्याप्रमाणें भगवद्‌भक्त असतात ते हरिस्मरणानें तृष्णारहित होऊन जातात, त्यामुळें इंद्रियांच्या क्लेशांपासून ते अलिप्त राहतात. राजा ! तोही प्रकार ऐक ७२.

मुख्य कष्टाचें अधिष्ठान । इंद्रियकर्मीं राया जाण ।
ते इंद्रियकर्मीं ब्रह्मस्फुरण । हरिभक्तां पूर्ण हरिभजनें ॥ ६७३ ॥
कष्ट होण्याचे मुख्य बीज इंद्रियांच्या कर्मामध्यें असते. त्या इंद्रियकर्मामध्यें हरिभक्तांना हरिभजनाच्या योगें ब्रह्मस्फुरणच पूर्णपणे होत राहते ७३.

दृष्टीनें घे‍ऊं जातां दर्शन । दृश्यमात्रीं प्रगटे नारायण ।
श्रवणीं शब्द घेतां जाण । शब्दार्थीं पूर्ण विराजे वस्तु ॥ ६७४ ॥
दृष्टीनें पाहावयास जावें, तो जें जें ‘दृश्य’ दिसते त्या त्या दृश्य पदार्थात नारायणच प्रगट होतो. कानानें ‘शब्द’ ग्रहण करीत असतां, त्या शब्दाच्या ध्वनीमध्यें व अर्थामध्यें ब्रह्मच पूर्णपणे विराजमान होतें ७४.

घ्राणीं घेतां नाना वासु । वासावबोधें प्रगटे परेशु ।
रसना सेवी जो जो रसु । रसीं ब्रह्मरसु निजस्वादें प्रगटे ॥ ६७५ ॥
नाकानें अनेक प्रकारचे ‘गंध’ म्हणजे वास घेतांना त्या वासांच्या ज्ञानामध्यें परमेश्वरच प्रगट होतो. त्याचप्रमाणें जिव्हा जे जे ‘रस’ सेवन करते, त्या त्या रसांमध्यें स्वादरूपानें ब्रह्मरसच प्रगट होतो ७५.

देहीं लागतां शीत-उष्ण । अथवा कां मृदु-कठीण ।
तेथें स्पर्श ज्ञानें जाण । चिन्मात्र पूर्ण प्रगटे स्वयें । ६७६ ॥
देहाला काही शीत-उष्ण किंवा मृदु-कठिण लागले, तर त्या ‘स्पर्श’ ज्ञानानें त्यांच्यांत मूळचे चित्स्वरूपच पूर्णपणे प्रगट होते ७६.

आतां कर्मेंद्रियप्रवृत्ती । तेथही स्फुरे ब्रह्मस्फुर्ती ।
घेणें देणें गमनस्थिती । इंद्रियां गती आत्मारामें ॥ ६७७ ॥
आतां हस्तपादादि कर्मेंद्रियप्रवृत्तींत ही ब्रह्माचीच स्फूर्ति स्फुरत असल्यामुळें घेणे-देणे, किंवा जाणे-येणे इत्यादि इंद्रियांचें चलनवलन आत्मारामच करीत असतो, असा त्यांना अनुभव येतो ७७.

ऐसे करितां इंद्रियें कष्ट । ते कष्टीं होय निजसुख प्रगट ।
तेणें इंद्रियां विश्रांति चोखट । पिकली स्वानंदपेठ हरिभक्तां ॥ ६७८ ॥
अशा रीतीनें इंद्रियें कष्ट करूं लागली असता त्या कष्टांमध्येंही आत्मसुख प्रगट होते. तेणेंकरून इंद्रियांना उत्तम प्रकारची विश्रांति मिळते. ह्याप्रमाणें हरिभक्तांच्या वाट्यास स्वानंदाची पेठच पिकून राहाते ७८.

जेणें इंद्रियां कष्ट होती । तेणेंचि इंद्रिया सुखप्राप्ती ।
हे भगवद्‌भजनीं निजयुक्ती । भोगिजे हरिभक्ती हरीचेनि स्मरणें ॥ ६७९ ॥
इंद्रियांना ज्याच्यामुळें कष्ट घडतात, त्याच्यामुळेच त्या इंद्रियांना सुख होते, ही भगवद्‌भजनांमधील निजयुक्ति आहे. ह्याप्रमाणें हरिभक्त हरीच्या स्मरणानें नित्यमुक्ति भोगीत असतात ७९.

जन्म आणि मरण । हें देहाचे माथां जाण ।
भक्त देहीं विदेही पूर्ण । ध्यातां हरिचरण हरिरूप जाहले ॥ ६८० ॥
जन्म आणि मरण ही देहाच्याच कपाळी लागली आहेत. पण भक्त हे देहांत असून पूर्ण विदेही असतात. कारण हरिचरणांचें ध्यान करतां करतां ते हरिरूप होऊन जातात. ६८०.

यालागीं देहाची अहंता । कदा नुपजे भगवद्‌भक्तां ।
ते भक्तपूर्णतेची कथा । ऐक नृपनाथा सांगेन ॥ ६८१ ॥
ह्यामुळें भगवद्‌भक्तांना देहाची अहंता कधीच उत्पन्न होत नाही. हे राजाधिराजा ! त्या भक्ताच्या पूर्णतेचे वर्णन सांगतों, ऐक ८१.

देह धरिल्या पंचाननें । भक्त न डंडळी जीवें प्राणें ।
वंध्यापुत्र सुळीं देणें । देहाचें मरणें तेवीं देखे ॥ ६८२ ॥
देह हा वाघानें धरला तरी, भक्त असतो तो मनांत मुळीच डगमगत नाही. वांझेच्या मुलाला सुळी दिल्याप्रमाणेच देहाचे मरण आहे असें तो समजतो ८२.

छाया पालखीं बैसावी । ऐसें कोणी चिंतीना जीवीं ।
तैशी देहासी पदवी यावी । हा नुठी सद्‌भावीं लोभ भक्तां ॥ ६८३ ॥
पालखींत आपली छाया बसावी असे कधीच कोणाच्या मनात येत नाहीं; त्याप्रमाणें देहाला मोठी पदवी म्हणजे मानमान्यता प्राप्त व्हावी असा लोभ, भक्तांना स्वभावगत्याच उत्पन्न होत नाहीं ८३.

देहासी आलिया नाना विपत्ती । भक्तां खेदु नुमटे चित्तीं ।
जेवीं आकाश शस्त्रघातीं । न ये काकुळती तैसे ते ॥ ६८४ ॥
किंवा देहाला हव्या तितक्या विपत्ति प्राप्त झाल्या, तरी भक्तांच्या मनांत त्याविषयीं कधीं खेदही उत्पन्न होत नाही. आकाशावर तरवारीचा घाव केला तर, ते जसें कधी काकुळतीला येत नाही, त्यांतलाच तो प्रकार होय ८४.

जननीजठरीं देहो जन्मला । भक्तु न म्हणे मी जन्मा आला ।
रवि थिल्लुरीं प्रतिबिंबला । थिल्लुर मी जाहला कदा न म्हणे ॥ ६८५ ॥
देह हा आईच्या पोटी जन्मास आला, त्यायोगें ‘मी जन्मास आलों’ असें भक्त म्हणत नाही. डबक्यामध्यें सूर्याचे प्रतिबिंब पडले, तर मी डबकं झालों असें कांहीं सूर्य म्हणत नाहीं ८५.

सायंप्रातः सूर्य प्रकाशे । अभ्रीं गंधर्वनगर आभासे ।
देह प्रतिपाळी अदृष्ट तैसें । म्यां केलें ऐसें स्फुरेना ॥ ६८६ ॥
सकाळपासून संध्याकाळपर्यंत सूर्य प्रकाशतो; त्या प्रकाशानें ढगांमध्यें गंधर्वनगराचा भास होतो; (गंधर्वनगर मी उत्पन्न केले असें सूर्य म्हणत नाहीं); त्याप्रमाणें अदृष्ट आहे तेच देहाचा सांभाळ करते. तेथे मी करतों असें त्याच्या मनांत उठत नाहीं ८६.

भक्तदेहासी येतां मरण । हेतुरहित हरीचें स्मरण ।
यालागीं देह निमाल्या आपण । न मरतां पूर्ण पूर्णत्वें उरें ॥ ६८७ ॥
भक्ताच्या देहाला मरण प्राप्त झाले तरी, त्याला हेतुरहित हरीचे स्मरण असते. यामुळें देह पडला तरी आपण न मरतां तो पूर्णत्वाच्या योगें पूर्णत्वानेंच उरतो ८७.

थिल्लुरा समूळ नाशु झाला । तरी रवि न म्हणे तो निमाला ।
तेवीं देहो गेलिया भक्त उरला । सद्‌रूपें संचला हरिस्मरणें ॥ ६८८ ॥
डबके सारें आटून गेलें तरी, सूर्य कांहीं ‘मी नाहींसा झालों’ असे समजत नाहीं; तद्वत् देह गेला तरी भक्त हरिस्मरणाच्या योगें सद्‌रूपानें विश्वांत साठलेला असतो. ८८.

आधीं काय सर्पु मारावा । मग दोरातें दोरु करावा ।
तो न पालटतां निजगौरवा । दोरूचि अघवा दोररूपें ॥ ६८९ ॥
दोरावर भासणाऱ्या सर्पाला काय आधी मारून मग दोराला दोर करावा लागतो ? नाही. आपल्या मूळ स्वरूपानें न पालटतांच सारा दोर दोराच्या रूपानेंच अखंड असतो ८९.

तेवीं हरिभक्तां देहाच्या अभावो । मा काळ कवणा घालील घावो ।
आतां आम्ही ते आम्हीच आहों । तें आम्हीपणही वावो आमुचेनि आम्हां ॥ ६९० ॥
त्याप्रमाणें हरिभक्ताला देहाचा अभाव असतो. मग काळ घाव घालणार तरी कोणावर ? आतां आम्ही ते आम्हीच म्हणजे ब्रह्मरूप आहों, आणि त्या ब्रह्मत्वामुळें आमचा आम्हीपणा (देह हाच मी असा अभिमान) व्यर्थ झाला ६९०.

एत्यादि संसारदेहधर्म । ज्यासी स्पर्शों न शके कर्माकर्म ।
मोहें नव्हेचि भवभ्रम । तो भक्तोत्तम प्रधानत्वें ॥ ६९१ ॥
ह्याप्रमाणें संसारांतील जे देहधर्म आहेत ते, व कर्माकर्म, ही ज्याला शिवतसुद्धा नाहीत, मोहानें ज्याला भवभ्रम कधीच होत नाही, तोच मुख्यत्वेकरून ‘भक्तोत्तम’ होय ९१.

राया आणिकही एक खूण । तुज मी सांगेन संपूर्ण ।
ज्याचा काम होय नारायण । तें भक्तलक्षण अवधारीं ॥ ६९२ ॥
राजा ! तुला आणखीही एक खूण सांगतो. ज्याचा कामसुद्धा नारायण होतो असें भक्तलक्षण ऐक ९२.

न कामकर्मबीजानां यस्य चेतसि सम्भवः ।
वासुदेवैकनिलयः स वै भागवतोत्तमः ॥ ५० ॥
श्लोक ५०- ज्याच्या मनामध्ये विषयभोगांची इच्छा, कर्मप्रवृत्ती आणि त्यांचे बीज असणारी वासना यांचा उदय होत नाही आणि जो केवळ वासुदेवांच्या आश्रयानेच राहातो, तो उत्तम भागवत होय. (५०)

हृदयीं चिंतितां आत्माराम । तद्‌रूप जाहला हृदयींचा काम ।
त्यासी सर्व कर्मी पुरुषोत्तम । देवदेवोत्तम तुष्टोनि प्रगटे । ६९३ ॥
अंतःकरणांत आत्मारामाचे चिंतन करता करता हृदयांतील काम आत्माराम होतो. त्याला देवाधिदेव पुरुषोत्तम संतुष्ट होऊन सर्व कर्मांत प्रगट होतो ९३.

तेथें ज्या ज्या वासना हृदयवासी । त्याही पडकल्या हरिमुखासी ।
एवं वासना जडल्या हरिरूपाशीं । हरि आश्रयो त्यांसी दृढ जाहला ॥ ६९४ ॥
तेव्हां हृदयांत ज्या ज्या वासना असतात, त्या त्या सर्व हरिसुखालाच चिकटतात; अशा रीतीनें साऱ्या वासनाच हरिरूपाशी जडल्या म्हणजे त्याला हरि हाच दृढ आश्रय होऊन राहतो ९४.

तेथ जो जो भक्तांसी कामु । तो तो होय आत्मारामु ।
वासनेचा निजसंभ्रमु । पुरुषोत्तमु स्वयें होये ॥ ६९५ ॥
त्या वेळी भक्ताचा जो जो काम (विषयाभिलाष) असतो तो तो आत्मारामच होतो. त्याच्या वासनेचा निजसंभ्रम स्वतः पुरुषोत्तमच होतो ९५.

जगीं हरिभक्ति उत्तमोत्तम । भक्त कामेंचि करी निष्काम ।
चाळितां वासना-अनुक्रम । निर्वासन ब्रह्म प्रकाशे स्वयें ॥ ६९६ ॥
जगामध्यें हरीची भक्ति उत्तमांतील उत्तम आहे; ती भक्ताला कामानेंच निष्काम करते. एकामागून एक उद्‌भवणाऱ्या वासनांचा अनुक्रम न्याहाळू लागले म्हणजे निर्वासनारूप ब्रह्म आपोआप प्रकाशित होते. (एक वृत्ति नाहींशी झाली व दुसरी जोपर्यंत उठली नाहीं तोपर्यंत म्हणजे त्या संधिकालांत निर्विकल्प चैतन्य स्पष्ट भासूं लागते.)९६.

ग्रासोग्रासीं रामस्मरण । तें अन्नचि होय ब्रह्म पूर्ण ।
भक्त भोगी मुक्तपण । या रीतीं जाण विदेहा ॥ ६९७ ॥
घांसाघांसाला रामाचे स्मरण केले असतां तें अन्नच पूर्णब्रह्म होते. हे जनकराजा ! ह्या रीतीनेंच भक्त हा विषयांत मुक्तस्थिति अनुभवितो ९७.

ऐसा जो निष्कामनिष्ठ । तोचि भागवतांमाजीं श्रेष्ठ ।
त्यासीच प्रधानत्वपट । जाण तो वरिष्ठ उत्तमत्वें ॥ ६९८ ॥
असा जो निष्कामनिष्ठ असतो, तोच भागवतांमध्यें श्रेष्ठ होय. त्यालाच मुख्यत्वाचा मान देणे योग्य आहे. तो आपल्या उत्तमत्वानेंच श्रेष्ठ आहे असे समज ९८.

उत्तम भक्त कैसे विचरती । त्या भक्तांची विचरणस्थिती ।
ते सांगितली राया तुजप्रती । यथानिगुती तीं श्लोकीं ॥ ६९९ ॥
राजा ! उत्तम भक्त कसे वर्तत असतात, ती त्यांची वर्तनस्थिति तुला तीन श्लोकांनी सांगितली ९९.

उत्तम भक्त कोणें लिंगेंसी । आवडते जाहले भगवंतासी ।
तें लक्षण सांगावयासी । अति‍उल्हासीं हरि बोले ॥ ७०० ॥
ह्यानंतर उत्तम भक्त हे कोणत्या गुणांमुळें भगवंताला प्रिय होत असतात ते लक्षण सांगण्यासाठी अत्यंत उल्हासानें हरि बोलू लागला ७००.

न यस्य जन्मकर्मभ्यां न वर्णाश्रमजातिभिः ।
सज्जतेऽस्मिन्नहंभावो देहे वै स हरेः प्रियः ॥ ५१ ॥
श्लोक ५१ – ज्याला या शरीराचा, चांगल्या कुळात जन्मल्याचा, तसेच वर्ण, आश्रम आणि जातीचाही अहंकार नसतो, तोच भगवंतांना प्रिय असतो. (५१)

प्राकृतां देहीं देहाभिमान । तेणें गुरुकृपा करितां भजन ।
पालटे अभिमानाचें चिन्ह । अहं नारायणभावनायुक्त ॥ १ ॥
सामान्य लोकांना देहात्मभाव असतो. त्यानें गुरुकृपा संपादन करून भजन केले असता त्याच्या अभिमानाचे स्वरूप ‘मी स्वतः नारायणस्वरूप आहे’ ह्या भावनेंत पालटते १.

अहं देह हें समूळ मिथ्या । अहं नारायण हें सत्य सत्त्वतां ।
ऐशी भावना दृढ भावितां । ते भावना‍आंतौता अभिमान विरे ॥ २ ॥
‘मी देह’ ही भावना समूळ मिथ्या आहे; वस्तुतः ‘मी नारायण’ हेच खरे आहे. अशा भावनेचा अभ्यास दृढ झाला असता त्या भावनेमध्येंच अभिमान विरून जातो २.

अभिमान हरिचरणीं लीन । तेव्हां भक्त होय निरभिमान ।
तेंचि निरहंतेचें लक्षण । हरि संपूर्ण सांगत ॥ ३ ॥
देहाभिमान हरिचरणाच्या ठायीं लीन झाला म्हणजे भक्त निरभिमान होतो. तेंच निरहंतेचे लक्षण हरि पूर्णपणे सांगत आहे. ३.

निरहंकाराचीं लक्षणें । तो जन्मोनि मी जन्मलों न म्हणे ।
सुवर्णाचें केलें शुनें । तरी सोनें श्वान हों नेणे तदाकारें असतां ॥ ४ ॥
निरहंकाराची लक्षणें अशी की, तो जन्मून मी जन्मलों असें म्हणत नाहीं. सोन्याचे कुत्रे केले तरी, सोनें कुत्र्याच्या आकारांत असतांनाहीं कुत्रे होऊ शकत नाहीं ४.

तेवीं जन्मादि अहंभावो । उत्तम भक्तां नाहीं पहा हो ।
कर्मक्रियेचा निर्वाहो । अहंकर्ता स्वयमेवो मानीना ५ ॥
त्याप्रमाणें जन्मादिकाचा अहंभाव उत्तम भक्ताला असत नाही. तो कर्मक्रियेचा नित्यक्रम चालवितो, पण त्याचा ‘कर्ता मी’ असें मात्र म्हणत नाहीं ५.

तो कर्म करी परी न म्हणे मी कर्ता । जेवीं गगनीं असोनि सविता ।
अग्नि उपजवी सूर्यकांता । तेवीं करोनि अकर्ता निजात्मदृष्टीं ॥ ६ ॥
सूर्य ज्याप्रमाणें आकाशांत असूनही (पृथ्वीवरील) सूर्यकांतापासून अग्नि उत्पन्न करतो, त्याप्रमाणें उत्तम भक्त सर्व कर्में करूनही आत्मदृष्टीनें अकर्ता असतो ६.

सूर्ये सूर्यकांतीं अग्निसंग । तेणें होतु याग कां दाघ ।
तें बाधूं न शके सूर्याचें अंग । तेवीं हा चांग करूनि अकर्ता ॥ ७ ॥
सूर्यामुळें सूर्यकांतापासून अग्नि उत्पन्न होतो, त्या अग्नीनें मग यज्ञ होवोत की दावाग्नि भडको; त्यानें सूर्याचे अंग कांहीं भाजू शकत नाही, त्याप्रमाणें हाही सर्व करून शुद्ध अकर्ता असतो ७.

अचेतन लोह चुंबकें चळे । लोहकर्में चुंबक न मैळे ।
तेवीं हा कर्में करूनि सकळें । अनहंकृतिबळें अकर्ता ॥ ८ ॥
न हालणारे म्हणजे जड-अचेतन असे लोखंड लोहचुंबकामुळें हालू लागते; पण लोखंडाच्या त्या हालचालीपासून लोहचुंबकाला कसलीच बाधा होत नाही, तो क्रियावान् होत नाही. त्याप्रमाणें हाही सर्व कर्में करून निरभिमानपणाच्या जोरावर अकर्ता असतो ८.

देहींचीं कर्में अदृष्टें होती । मी कर्ता म्हणतां तीं बाधती ।
भक्तां सर्व कर्मीं अनहंकृती । परमात्मप्रतीती भजनयोगें ॥ ९ ॥
देहाची कर्में प्रारब्धानें होत असतात; त्यांचा कर्ता ‘मी’ असे म्हटले की, ती बाधक होतात. परंतु भजनाच्या योगें परमात्मप्रतीतीमुळें सर्व कर्मांत भक्त निरहंकारच असतो ९.

एवं देहींचीं कर्में निपजतां । पूर्णप्रतीती भक्त अकर्ता ।
कर्माकर्माची अवस्था । नेघे तो माथां अनहंकृती ॥ १० ॥
ह्या प्रकारे, देहाची कर्में चालली असतां पूर्ण प्रतीतीमुळें म्हणजे पूर्णत्वाच्या अनुभवामुळें भक्त अकर्ताच असतो. तो स्वाभाविक निरहंकृतीमुळें कर्माकर्मांचा भार माथ्यावर घेतच नाहीं ७१०.

जरी जाहला उत्तमवर्ण । तरी तो न म्हणे मी ब्राह्मण ।
स्फटिक कुंकुमें दिसे रक्तवर्ण । । “मी लोहीवा पूर्ण” स्फटिक न म्हणे ॥ ११ ॥
आपला जन्म उत्तम वर्णांत झालेला असला, तरी ‘मी ब्राह्मण’ असें तो म्हणत नाही. कुंकुमामध्यें ठेवलेला स्फटिक लाल वर्णाचा दिसतो, पण तो स्फटिक ‘मी लाल आहे,’ असे कधी म्हणत नाहीं ११.

ज्यासी नाही देहाभिमान । तो हाती न धरी देहाचा वर्ण ।
तैसाचि आश्रमाभिमान । भक्त सज्ञान न धरी कदा ॥ १२ ॥
ज्याला देहाचा अभिमान नसतो तो देहाचा वर्ण घेऊन बसत नाही, त्याचप्रमाणें ज्ञानसंपन्न भक्त आश्रमाचाही कधी अभिमान बाळगीत जाही १२.

अंगीं बाणला संन्यासु । परी तो न म्हणे मी परमहंसु ।
जेवी नटा‍अंगीं रजविलासु । तो राजउल्हासु नट न मानी ॥ १३ ॥
तो देहानें संन्यासाश्रमी झाला, तरी ‘मी परमहंस’ म्हणजे संन्यासी असे तो म्हणत नाही. नाटकांत नटाच्या अंगावर राजविलासी पोषाख चढविला, तरी तो नट ‘मी राजा झालों’ असें मानीत नाहीं १३.

तेवीं आश्रमादि अवस्था । भक्त न धरीच सर्वथा ।
तैशीच जातीचीही कथा । न घे माथां भक्तोत्तम ॥ १४ ॥
त्याप्रमाणें भक्त आश्रमादि अवस्थेचा अभिमान धरीत नाही. तसेंच उत्तम भक्त जातीचाही भार माथ्यावर घेत नाहीं १४.

जाती उंच नीच असंख्य । परी तो न म्हणे हे माझीचि एक ।
जेवीं गंगातीरीं गांव अनेक । परी गंगा माझा एक गांव न म्हणे ॥ १५ ॥
उंच-नीच अशा पुष्कळ जाती आहेत, परंतु त्यांतली अमकी एक जात ‘माझी,’ असे तो म्हणत नाही. ज्याप्रमाणें गंगेच्या तीरीं अनेक गांवे असतात, पण त्यांतला अमुक एक गांव ‘माझा’ असें गंगा म्हणत नाहीं १५,

तेवीं जन्म-कर्म-वर्णा-श्रम-जाती । पूर्ण भक्त हातीं न धरिती ।
चहूं देहांची अहंकृती । स्वप्नींही न धरिती हरिभक्त ॥ १६ ॥
त्याप्रमाणें पूर्ण भक्त असतात ते जन्म, कर्म, वर्णाश्रम व जाती ह्यांचा अभिमान बाळगीत नाहीत. ते स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण अशा चारी देहांचा अभिमान स्वप्नांतही धरीत नाहीत. १६.

आशंका ॥ तरी काय वर्णाश्रम-जाती । भक्त निःशेष सांडिती ।
त्यांत असोनि नाहीं अहंकृती । ते हे उपपत्ति बोलिलो राया ॥ १७ ॥
[आशंका-] तर मग भक्त असतात ते, वर्णाश्रम-जाती सर्वच टाकून देतात की, काय ? [उत्तर- तर तसे नव्हे; ते त्यांत असून त्यांचा अहंकार त्यांना असत नाही, अशी त्याची उपपत्ति तुला सांगितली १७.

तो जेव्हां पावे जन्मप्राप्ती । तेव्हां त्यासवें नाहीं वर्णाश्रम-जाती ।
जन्मअभिमानें माथां घेती । हे कुळगोत-जाति पैं माझी ॥ १८ ॥
जीव जेव्हां जन्मास येतो, तेव्हां त्याच्याबरोबर काही वर्णाश्रम-जात वगैरे येत नाही; तर जन्माभिमानानें कुल, गोत, जात ही माझी असें तो आपल्या माथीं घेतो १८.

ऐशा नाथिल्या अहंकृती । ब्रह्मादिक गुंतले ठाती ।
वाढविता वर्णाश्रम जाती । सज्ञान गुंतती निजाभिमानें ॥ १९ ॥
अशा नसत्या अभिमानानें ब्रह्मदेवादिकसुद्धा गुंतून पडतात. वर्णाश्रमधर्म व जाती वाढवून मोठमोठे विद्वानसुद्धा आपआपल्या अभिमानांत गुंतून राहतात १९.

ऐशी अहंतेची अतिदुर्धर गती । येथें ब्रह्मादिकां नव्हे निवृत्ती ।
सोडूं नेणे गा कल्पांती । सज्ञान ठाकिजेती निजाभिमानें ॥ २० ॥
अहंतेची अशी मोठी दुर्धर गति आहे. ब्रह्मादिकांचीसुद्धा त्यांतून सुटका होत नाही. कल्पांतीसुद्धा त्यांना ती सुटत नाही. मोठे ज्ञानसंपन्न असतात तेसुद्धां स्वाभिमानानें फसले जातात ७२०.

येथें भक्तांच्या भाविक स्थितीं । अभिमान तुटे भगवद्‌भक्तीं ।
ते निरभिमान भक्तस्थिती । राया तुजप्रती दाविली स्वयें ॥ २१ ॥
इकडे भक्तांच्या भाविक स्थितीत भगवद्‌भक्तीमळे अभिमान नाहीसा होऊन जातो. हे राजा ! ती भक्तांची निरभिमान स्थिति तुला दाखवून दिली २१.

समूळ देहाभिमान झडे । तो देहीचि देवासी आवडे ।
ते भक्त जाण वाडेकोडें । लळेवाडे हरीचे ॥ २२ ॥
ज्याचा देहाभिमान समूळ झडून जातो, तोच देहधारी देवाला प्रिय होतो. असे भक्तच देवाचे अत्यंत लाडके होतात, हे लक्षात ठेव २२.

ते जें जें मागती कौतुकें । तें देवोचि होय तितुकें ।
त्यांचेनि परम संतोखें । देव सुखावला सुखें दोंदिल होये ॥ २३ ॥
ते जें जें कौतुकानें मागतात, तें तें सर्व देवन स्वतः होतो. त्यांच्या परम संतोषानें देवही सुखी, संतुष्ट व पुष्ट होतो. २३.

तो जिकडे जिकडे जाये । देव निजांगें ते‍उता ठाये ।
भक्त जे‍उती वास पाहे । देव ते ते होय पदार्थ ॥ २४ ॥
भक्त जिकडे जिकडे जातो, तिकडे तिकडे देव स्वतःच उभा राहतो. भक्त ज्याची इच्छा करतो अथवा जे जे पदार्थ पाहतो, ते ते पदार्थ देवच होतो २४.

त्यासी झणीं कोणाची दृष्टी लागे । यालागीं देवो त्या पुढें मागें ।
त्या सभोवता सर्वांगें । भक्तीचेनि पंगें भुलला चाले ॥ २५ ॥
त्याला कदाचित् कोणाची दृष्ट लागेल, म्हणून देव त्याच्या मागें, पुढें व सर्वांगाच्या सभोंवतीं राहतो. भक्तीमुळें भक्तांचा पांगला होऊन व त्यांच्या भक्तीला भाळून त्यांच्याबरोबर चालत असतो २५.

निरभिमानाचेनि नांवें । देव निजांगें करी आघवें ।
जेवीं कां तान्हयाचेनि जीवें । जीवें भावें निजजननी ॥ २६ ॥
ज्याप्रमाणें तान्ह्या बाळाच्या प्रेमासाठी जीवाभावानें आई त्याची सेवा करते, त्याप्रमाणें भक्ताच्या निरभिमानामुळें देवच स्वतः त्याचे सर्व काही करतो २६.

एवं राखतां निजभक्तांसी । तरी देव धाके निजमानसीं ।
जरी हा मजसीं आला ऐक्यासी । तरी हे प्रीति कोणासीं मग करावी ॥ २७ ॥
ह्याप्रमाणें आपल्या भक्ताचे देव संरक्षण करीत असतांना त्याच्या मनांत एक धाक उत्पन्न होतो, तो हा की, हा जर माझ्याशी ऐक्य पावला, तर मग हे प्रेम मी कोणाशी करावें ? २७.

कोणासी पाहों कृपादृष्टीं । कोणापें सांगों निजगोष्टी ।
कोणासी खेवें देवों मिठी । ऐशी आवडी मोठी प्रेमाची ॥ २८ ॥
कृपादृष्टीनें कोणाकडे पहावें ? गुजगोष्टी कोणाला सांगाव्या ? चारी हातांनी कोणाला मिठी मारावी ? अशी त्याला प्रेमाची आवड मोठी विलक्षण असते २८.

या काकुळतीं श्रा‍अनंतु । ऐक्यभावें करी निजभक्तु ।
मग देवो भक्त दोहींआंतु । देवोचि नांदतु स्वानंदें ॥ २९ ॥
अशा काकुळतीनें त्याला श्रीअनंत ऐक्यभावानें आपला भक्त करून ठेवतो. मग देव आणि भक्त ह्यांमध्यें देवच स्वानंदानें नांदत असतो २९.

एवं आपुली आपण भक्ती । करीतसे अनन्यप्रीतीं ।
हेंचि निरूपण वेदांतीं । अद्वैतभक्ति या नांव ॥ ३० ॥
अशा प्रकारे तो अनन्य प्रीतीनें आपणच आपली भक्ति करीत असतो. हेच वेदांतामध्यें निरूपण केलेले आहे आणि याचंच नांव ‘अद्वैतभक्ति’ ७३०.

त्यासी चहूं भुजीं आलिंगितां । हांव न बाणेचि भगवंता ।
मग रिघोनियां आंतौता । परमार्थता आलिंगी ॥ ३१ ॥
तशा भक्ताला चारही भुजांनी बाहेरून आलिंगान देत असतां देवाला तृप्ति म्हणून होत नाही. मग तो त्याच्या आंत शिरून परमार्थतः आलिंगन देतो. (हेंच खरे अंतर्बाह्य ‘सर्वांगालिंगन’ होय) ३१.

ऐसें खेंवाचें मीस करी । तेणें भक्त आणी आपणाभीतरीं ।
मग आपण त्या‍आंतबाहेरी । अतिप्रीतीवरी कोंदाटे ॥ ३२ ॥
ह्याप्रमाणें आलिंगनाचे निमित्त करून भक्ताला आपल्यामध्यें आकर्षण करून घेतो व मग त्याच्या अंतर्बाह्य आपणच अत्यंत प्रेमानें भरून राहतो ३२.

नवल आवडीचा निर्वाहो । झणीं लागे काळाचा घावो ।
यालागीं निजभक्तांचा देहो । देवाधिदेवो स्वयें होये ॥ ३३ ॥
देवाच्या आवडीचे स्वरूप मोठ्या नवलाचे आहे. भक्ताला काळाचा घाव लागू नये म्हणून देवाधिदेव आपल्या भक्ताचा देहसुद्धा आपणच होतो ३३.

ऐसा जो पढियंता परम । तो भागवतांमाजीं उत्तमोत्तम ।
यापरी भागवतधर्म । पुरुषोत्तम वश्य करी ॥ ३४ ॥
असा जो देवाचा अत्यंत आवडता झाला असेल, तोच भागवतांमध्यें ‘उत्तमोत्तम’ होय. अशा प्रकारचा भागवतधर्म पुरुषोत्तमाला वश करून घेतो ३४.

ऐशिया उत्तम भक्ता । भेदाची समूळ नुरे वार्ता ।
हेचि अभेदभक्तकथा । ऐक नृपनाथा सांगेन ॥ ३५ ॥
अशा उत्तम भक्ताला भेदाची वार्ताही उरत नाही. हे राजा ! तीच भक्ताची अभेदभावाची कथा तुला सांगतों, ऐक ३५.

न यस्य स्वः पर इति वित्तेष्वात्मनि वा भिदा ।
सर्वभूतसमः शान्तः स वै भागवतोत्तमः ॥ ५२ ॥
श्लोक ५२- जो संपत्ती किंवा शरीर इत्यादींच्या बाबतीत “हे माझे आणि हे दुसर्‍याचे” असा भेदभाव मानीत नाही, सर्व पदार्थांमध्ये समस्वरूप अशा परमात्म्याला पाहात असतो, व त्यामुळे शांत राहातो, तो भगवंतांचा उत्तम भक्त होय. (५२)

अद्वैतभजनाचे वोजें । मी माझें तूं आणि तुझें ।
ज्यासी नुरेचि सहज निजें । तो भक्त मानिजे उत्तमत्वें ॥ ३६ ॥
अद्वैत भजनाच्या योगानें मी आणि माझें, किंवा तूं आणि तुझें हें ज्याच्यामध्यें शिल्लक उरत नाही, तोच ‘उत्तम भक्त’ मानला जातो ३६.

यापरी ज्याचे चित्ताचे ठायीं । भेदु निःशेष उरला नाहीं ।
तेथ माझें तुझें हें कांहीं । तें निमालें पाहीं जेथींच्या तेथें ॥ ३७ ॥
अशा रीतीनें ज्याच्या चित्तामध्यें भेद मुळीच उरत नाही, तेथे माझें तुझें हें काहीच राहात नाही. ते तेथल्या तेथेंच नाहीसे होऊन जातें ३७.

जेवीं अग्नीशीं जें जें टेंके । तें तें अग्नीचि हो‍ऊनि ठाके ।
तेवीं अभेदभक्त जें जें देखे । तें तें यथासुखें स्वस्वरूप होये ॥ ३८ ॥
ज्याप्रमाणें अग्नीला जें जें येऊन टेंकतें तें तें अग्निच होऊन जाते, त्याप्रमाणें अभेदरूप झालेला भक्त जें जें पाहतो तें तें स्वाभाविक रीतीनें आत्मस्वरूपच होऊन जातें ३८.

निजवित्त आणिकापाशीं देतां । आवांकू नुपजे त्याचिया चित्ता ।
न देखे पारकेपणाची वार्ता । विकल्प घालितां तरी उपजेना ॥ ३९ ॥
आपले द्रव्य दुसऱ्यापाशी देतांना त्याच्या चित्ताला शंका येत नाही, परकेपणाची वार्तासुद्धा त्याला दिसत नाही, व कोणी विकल्प घातला तरी त्याच्या मनांत तो उतरत नाहीं ३९.

डावे हातींचे पदार्था । उजवे हातीं स्वयें देतां ।
येथें कोण देता कोण घेता । तेवीं एकात्मता सर्वभूतीं ॥ ४० ॥
डाव्या हातांतील पदार्थ आपणच उजव्या हातांत दिला, तर त्यांत देणारा कोण ? आणि घेणारा कोण ? त्याप्रमाणें सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी त्याची एकात्मताच होऊन जाते ७४०.

आपणासकट सर्व देहीं । भक्तां भगवंतावांचूनि नाहीं ।
यालागीं शांति त्याचे ठायीं । स्वानंदें पाहीं निःशंक नांदे ॥ ४१ ॥
आपल्यासुद्धा सार्‍या देहांमध्यें भक्तांना भगवंताशिवाय दुसरे कांहीच दिसत नाहीं; म्हणून त्यांच्या ठिकाणी शांति ही निःशंकपणानें नांदत असते ४१.

ऐशिया निजसमशांतीं । भगवद्‌भक्त क्रीडा करिती ।
यालागीं उत्तमत्वाची प्राप्ती । सुनिश्चितीं पावले ॥ ४२ ॥
अशा आपल्याच समदृष्टिरूप शांतीमध्यें भगवद्‌भक्त क्रीडा करीत असतात; म्हणूनच त्यांना खरोखर उत्तमत्वाची प्राप्ति होते ४२.

हरिभक्तांची निरपेक्षता । ऐक सांगेन नृपनाथा ।
उत्तम भक्तांची सांगतां कथा । अति‍उल्हासता हरीसी ॥ ४३ ॥
हे राजा ! आतां हरिभक्तांची ‘निरपेक्षता’ सांगतों ऐक. उत्तम भक्तांची कथा सांगतांना हरीच्या मनाला अत्यंत उल्हास प्राप्त झाला होता ४३.

निरपेक्ष तो मुख्य भक्त । निरपेक्ष तो अति विरक्त ।
निरपेक्ष तो नित्यमुक्त । सत्य भगवंत निरपेक्षी ॥ ४४ ॥
(तो म्हणाला), निरपेक्ष असतो तोच ‘मुख्य भक्त’ होय. निरपेक्षच खरा ‘विरक्त’ व निरपेक्षच ‘नित्यमुक्त’ होय. कारण भगवंत हा खरोखर निरपेक्षच आहे ४४.

त्रिभुवनविभवहेतवेऽप्यकुण्ठ
स्मृतिरजितात्मसुरादिभिर्विमृग्यात् ।
न चलति भगवत्पदारविन्दात्
लवनिमिषार्धमपि यः स वैष्णवाग्र्यः ॥ ५३ ॥
श्लोक ५३- आपले अंतःकरण भगवन्मय करणार्‍या देवतासुद्धा भगवंतांचे जे चरणकमल धुंडाळीत असतात, त्यांच्यापासून अर्धे निमिषसुद्धा जो दूर होत नाही, मग त्यासाठी एखाद्याने त्याला त्रिभुवनाचे वैभव जरी दिले तरीसुद्धा तो त्यांचे स्मरण सोडीत नाही, तोच वैष्णवांमध्ये अग्रगण्य होय. (५३)

सप्रेमभावें करितां भक्ती । हरिचरणीं ठेविली चित्तवृत्ती ।
निजस्वार्थाचिये स्थितीं । अतिप्रीतीं निजनिष्ठा ॥ ४५ ॥
आपला खरा स्वार्थ साधण्याच्या अवस्थेत सप्रेम भक्ति करीत असतां अत्यंत प्रीतीनें व निजनिष्ठेनें भक्त आपली सारी वृत्ति हरीच्या चरणांवरच ठेवीत असतो ४५.

तेथें त्रिलोकींच्या सकल संपत्ती । कर जोडूनि वरूं प्रार्थिती ।
तरी क्षणार्ध न काढी चित्तवृत्ती । भक्त परमार्थी अतिलोभी ॥ ४६ ॥
तेव्हां त्रैलोक्याच्या संपत्ति हात जोडून प्रार्थना करीत त्याला वरण्यासाठी आल्या, तरीही तो आपली चित्तवृत्ति एक अर्धा क्षणसुद्धा हरिचरणांकडून काढण्यास तयार नसतो. इतका तो परमार्थाला लंपट असतो ४६.

क्षणार्ध चित्तवृत्ती काढितां । त्रिभुवनविभव ये हाता ।
एवढिया सांडूनि स्वार्था । म्हणाल हरिभक्तां लाभ कोण ॥ ४७ ॥
त्यानें एक अर्धा क्षण चित्तवृत्ति तेथून काढली, तर त्रैलोक्याची संपत्ति त्याच्या हातास चढेल, तर मग इतका स्वार्थत्याग करण्यांत हरिभक्ताला लाभ कोणता ? असे म्हणाल तर सांगतों ४७.

हरिचरणीं अपरोक्षस्थिति । तेथील क्षणार्धाची जे प्राप्ती ।
त्यापुढें त्रिभुवनसंपत्ती । भक्त मानिती तृणप्राय ॥ ४८ ॥
हरिचरणांच्या ठिकाणी रत असतां जो साक्षात्कार होतो, त्याच्या क्षणार्धाचा जो लाभ, त्याच्यापुढे हें त्रैलोक्याचे वैभव किंवा संपत्ति भक्तांना तृणप्राय वाटते ४८.

सकळ जगाचा स्रजिता । ब्रह्मा पितामहो तत्त्वतां ।
त्रैलोक्यराज्यसमर्थता । वोळगे वस्तुतां अंगणीं ज्याचे ॥ ४९ ॥
सर्व जग उत्पन्न करणारा ब्रह्मदेव पितामह; त्रैलोक्याचं ऐश्वर्य वस्तुतः त्याच्या अंगणांत लोळत असते ४९.

त्रिभुवनवैभवाचे माथां । ब्रह्मपदाची समर्थता ।
तो ब्रह्माही निजस्वार्था । होय गिंवसिता हरिचरण ॥ ५० ॥
त्रैलोक्याच्या वैभवाहूनही ब्रह्मदेवाची पदवी फार मोठी आहे. असा तो ब्रह्मदेवही आपल्या सुखस्वार्थासाठी हरीचे चरण धुंडीत असतो ७५०.

त्यागोनि ब्रह्मवैभवसंपत्ती । ब्रह्मा बैसोनि एकांतीं ।
अहर्निशीं हरिचरण चिंती । तरी त्या प्राप्ति सहसा नव्हे ॥ ५१ ॥
ब्रह्मलोकीची वैभवसंपत्ति झुगारून देऊन ब्रह्मदेवही एकांतांत बसून रात्रंदिवस हरीच्या चरणांचे ध्यान करीत असतो. तरी त्याला सहसा प्राप्ति होत नाहीं ५१.

सहसा न पवे हरिचरण । यालागीं ब्रह्मा साभिमान ।
तेणें अभिमानेंचि जाण । नेलीं चोरून गोपाल-वत्सें ॥ ५२ ॥
ब्रह्मदेवाला हरिचरण प्राप्त न झाल्यामुळेच तो अभिमानी झाला, आणि त्या अभिमानामुळेंच त्यानें गोकुळांतील गोपाळ व वासरे चोरून नेली हे लक्षात घे ५२.

तेथें न कष्टता आपण । न मोडतां कृष्णपण ।
गोपाल-वत्सें जाहला संपूर्ण । पूर्णत्वें पूर्ण स्वलीला ॥ ५३ ॥
त्या वेळी आपण कष्ट न करितां व आपलें कृष्णपणही मोडूं न देता, पूर्णत्वेकरून आपल्या लीलेनें सारे गोपाळ व त्यांची वत्से आपणच होऊन राहिला ५३.

अगाध हरिलीला पूर्ण । पाहतां वेडावलें ब्रह्मपण ।
तेव्हां सांडोनि पदाभिमान । अनन्यशरण हरिचरणीं ॥ ५४ ॥
ही हरीची अद्‌भुत लीला पाहून ब्रह्मदेव वेडा होऊन गेला आणि त्या वेळी आपल्या ब्रह्मपदाचा अभिमान सोडून देऊन अनन्यभावानें हरीच्या चरणीं शरण आला ५४.

कैलासराणा शूलपाणी । ब्रह्मा लागे ज्याचे चरणीं ।
तोहि निजराज्य सांडोनी । महाश्मशानीं हरिचरण चिंती ॥ ५५ ॥
ब्रह्मदेवही ज्याच्या चरणी लागतो असा कैलासाधिपति श्रीशंकर, पण तोही आपले कैलासाचे राज्य सोडून देऊन महाश्मशानामध्यें बसून हरिचरणांचें ध्यान करीत असतो ५५.

कौपीनभस्मजटाधारी । चरणोदक धरोनि शिरीं ।
हरिचरण हृदयामाझारीं । शिव निरंतरीं चिंतीत ॥ ५६ ॥
कमरेत कौपीन घालून, सर्वांगाला भस्म चर्चून, मस्तकावर जटा धारण करून हरिचरणांचे तीर्थ (गंगा) शिरावर घेऊन शंकर आपल्या हृदयामध्यें निरंतर हरिचरणांचेंच चिंतन करतो ५६.

एवं ब्रह्मा आणि शंकर । चरणांचे न पवती पार ।
तेथें त्रैलोक्यवैभव थोर । मानी तो पामर अतिमंदभाग्य ॥ ५७ ॥
ह्याप्रमाणें ब्रह्मदेव आणि शंकर यांनाहीं हरिचरणांचा ठाव लागत नाहीं; तेथें जो त्रैलोक्याचे वैभव थोर मानतो, तो पामर अत्यंत हतभागी समजला पाहिजे ५७,

हरिचरणक्षणार्धप्राप्ती । त्रैलोक्यराज्यसंपत्ती ।
भक्त ओंवाळूनि सांडिती । जाण निश्चितीं निंबलोण ॥ ५८ ॥
हरिचरणांच्या क्षणार्ध प्राप्तीपुढे भक्त लोक त्रैलोक्याची राज्यसंपत्ति ओंवाळून टाकतात, हे लक्षात ठेव ५८.

हरिचरणसारामृतगोडी । क्षणार्ध जैं जोडे जोडी ।
तैं त्रैलोक्यवैभवाच्या कोडी । करी कुरवंडी निजभक्त भावें ॥ ५९ ॥
हरिचरणसारामृताची गोडी एक क्षणार्धही मिळेल, तर त्या लाभावरून निजभक्त त्रैलोक्यवैभवाच्या राशीच्या राशी मनापासून ओंवाळून टाकील ५९.

एवं हरिचरणांपरतें । सारामृत नाहीं येथें ।
यालागीं चित्तें वित्तें जीवितें । जडले सुनिश्चितें चरणारविंदी ॥ ६० ॥
तात्पर्य, ह्या लोकी हरिचरणांहून दुसरें सारामृत कसलेच नाही. ह्याकरितां तनमनधनानें ते चरणारविंदालाच निश्चितपणे जडून राहतात ७६०.

निमिषार्ध त्रुटी लव क्षण । जे न सोडिती हरिचरण ।
ते वैष्णवांमाजीं अग्रगण । राया ते जाण “उत्तम भक्त” ॥ ६१ ॥
हे राजा ! डोळ्याची पापणी लवेपर्यंत किंवा चुटकीवाजेपर्यंतसुद्धा हरीचे चरण जे सोडीत नाहीत, तेच वैष्णवांमध्यें अग्रगण्य व उत्तम भक्त होत, हे लक्षात ठेव ६१.

जे त्रिभुवनविभवभोग भोगिती । तेही पावले अनुतापवृत्ती ।
त्यांच्या तापाची निजनिवृत्ती । हरिचरणप्राप्ती तें ऐक ॥ ६२ ॥
जे त्रैलोक्यवैभवाचे सुख भोगतात त्यांनाहीं अनुताप होत असतो. त्यांच्या तापाची निवृत्ति होण्याला हरिचरणप्राप्ति हेच काय ते एक साधन आहे. कसे ते सांगतों, ऐक ६२.

भगवत उरुविक्रमाङ्‌घ्रिशाखा
नखमणिचन्द्रिकया निरस्ततापे ।
हृदि कथमुपसीदतां पुनः स
प्रभवति चन्द्र इवोदितेऽर्कतापः ॥ ५४ ॥
श्लोक ५४ – भगवंतांच्या त्रिभुवनव्यापी चरणांच्या बोटांच्या नखरत्‍नांच्या चंद्रिकेने ज्या भक्तजनांच्या हृदयाचा त्रिविध ताप एक वेळ दूर केला, त्यांच्या हृदयामध्ये, जसा चंद्रोदय झाल्यावर सूर्याचा ताप जाणवत नाही, तसा तो ताप परत कसा आपला प्रभाव दाखवील ? (५४)

थोर हरिचरणाचा पराक्रम । पदें त्रैलोक्य आवरी त्रिविक्रम ।
ब्रह्मांड भेदोनि पदद्रुम । वाढला परमसामर्थ्यें ॥ ६३ ॥
हरिचरणांचा पराक्रम फार थोर आहे. त्या श्रीहरि त्रिविक्रमानें आपल्या पदानें त्रैलोक्य आकलन करून सोडले. तो चरणवृक्ष आपल्या अद्‌भुत पराक्रमानें ब्रह्मांड भेदूनही पलीकडे गेला ६३.

ते पदद्रुमींचिया दशशाखा । त्याचि दशधा दशांगुलिका ।
अग्रीं अग्रफळचंद्रिका । नखमणि देखा लखलखित ॥ ६४ ॥
त्या पादवृक्षाच्या दहा शाखा म्हणजे त्याच्या दोन्ही पावलांची दहा बोटें होत. शाखांच्या अग्रभागावर फळें शोभतात त्याप्रमाणें बोटांच्या अग्रभागी नखमणिचंद्रिका शोभते ६४.

ते नखचंद्रिकेचे चंद्रकांत । चरणचंद्रामृतें नित्य स्रवत ।
भक्तचकोर ते सेवित । स्वानंदें तृप्त सर्वदा ॥ ६५ ॥
त्या नखरूप चंद्रिकेचे चंद्रकांतमणि चरणरूप चंद्रामृताच्या योगानें नित्य स्रवत असतात; आणि तें अमृत भक्तरूपी चकोर सेवन करून सर्वकाळ स्वानंदानें तृप्त असतात ६५.

त्यांसी कामादि त्रिविधतापप्राप्ती । सर्वथा बाधूं न शके पुढती ।
जेवीं सूर्याची संतप्त दीप्ती । चंद्रबिंबा‍आंतौती कदा न रिघे ॥ ६६ ॥
सूर्याची प्रखरदीप्ति जशी चंद्रबिंबांत कधींच शिरत नाही, त्याप्रमाणें त्यांना कामादिक त्रिविध तापाची बाधा त्यानंतर कधींच होऊ शकत नाहीं ६६.

जे हरिचरणचंद्रचकोर । स्वप्नींही संसारताप न ये त्यांसमोर ।
ऐसा चरणमहिमा अपार । हरि मुनीश्वर हर्षें वर्णी ॥ ६७ ॥
जे हरिचरणरूप चंद्राचे चकोर असतात, त्यांच्यासमोर स्वप्नांतसुद्धां संसारताप येत नाही. ह्याप्रमाणें चरणाचा अपार महिमा ‘हरि’ नामक मुनि (नवयोग्यांपैकी द्वितीयबंधु) मोठ्या आनंदानें वर्णन करूं लागला ६७.

‘देहे वै स हरेः प्रियः’ । येणें श्लोकें गा विदेह्या ।
दाविली भक्तिलिंगक्रिया । जाण तू राया सुनिश्चित ॥ ६८ ॥
हे जनकराजा ! ‘देहे वै स हरेः प्रियः’ ह्या (५१ व्या) श्लोकानें भक्तांची लक्षणे व भक्तांची क्रिया निश्चितपणे दाखवून दिली ६८.

‘न यस्य स्वः पर इति’ । येणें त्याची धर्मस्थिती ।
राया सांगितली तुजप्रती । यथानिगुतीं यथार्थ ॥ ६९ ॥
तशीच ‘न यस्य स्वः पर इति’ ह्या (५२) श्लोकानें त्यांची धर्मस्थिति यथातथ्य रीतीनें तुला सांगितली ६९.

‘यादृश’ म्हणे कैसे असती । भगवद्‌भजनें स्वानंदतृप्ति ।
त्रिविध तापांची निवृत्ती । करोनि असती हरिभक्त । ७० ॥
‘यादृश’ म्हणजे ते कसे असतात, कसे वागतात ह्या (४४ व्या श्लोकांतील) तुझ्या प्रश्नाचे उत्तर दिले. भगवद्‌भजनानें आणि आत्मानंदानें त्यांची तृप्ति होते, आणि असे ते हरिभक्त त्रिविधतापांची निवृत्ति करून शांत राहतात, हे सर्व सांगितले ७७०.

आतां त्यांची बोलती परी । नामें गर्जती निरंतरीं ।
तेचि ते संक्षेपाकारीं । उपसंहारीं हरि सांगे ॥ ७१ ॥
आता त्यांच्या बोलण्याची पद्धति आणि निरंतर चाललेली नामाची गर्जना कशी असते, तेही संक्षेपानें शेवटीं हरिऋषि सांगत आहे ७१.

सकळ लक्षणांची सारस्थिति । प्रेमळाची परमप्रीती ।
उल्लंघूं न शके श्रीपती । तेही श्लोकार्थीं हरि सांगे ॥ ७२ ॥
प्रेमळ भक्कांचे जें निस्सीम प्रेम, तीच सर्व लक्षणांतील मुख्य स्थिति होय. श्रीपतीलासुद्धां तिचे उल्लंघन करता येत नाही. ह्याचेही वर्णन आतां पुढील उपसंहारात्मक श्लोकांत हरिः सांगत आहे.७२.

विसृजति हृदयं न यस्य साक्षात्
हरिरवशाभिहितोऽप्यघौघनाशः ।
प्रणयरसनया धृताङ्‌घ्रिपद्मः
स भवति भागवतप्रधान उक्तः ॥ ५५ ॥
इति श्रीमद्‌भागवते महापुराणे परमहंसायां संहितायां
एकादशस्कन्धे द्वितीयोऽध्यायः ॥ २ ॥
श्लोक ५५- अगतिक होऊन नामोच्चार केल्यावरसुद्धा संपूर्ण पापराशी नष्ट करणारे साक्षात भगवान श्रीहरी, प्रेमरज्जूने चरणकमल बांधून ठेवल्यामुळे ज्याचे हृदय एका क्षणापुरतेसुद्धा सोडीत नाहीत, तो भगवद्‌भक्तांमध्ये मुख्य होय. (५५)

अवचटें तोंडा आल्या हरी । सकळ पातकें संहारी ।
तें हरिनाम निरंतरीं । जे निजगजरीं गर्जती ॥ ७३ ॥
तोंडाला चुकून जरी हरीचें नाम आले, तरीसुद्धा ते सर्व पातकांचा नाश करते, असें तें हरीचे नाम भक्तजन निरंतर गर्जत असतात ७३.

ऐसें ज्यांचे जिव्हेवरी । नाम नाचे निरंतरीं ।
तें धन्य धन्य संसारीं । स्वानंदें हरि गर्जति ॥ ७४ ॥
ह्याप्रमाणें ज्याच्या जिव्हेवर नाम निरंतर नाचत असते, जे स्वानंदानें हरिनामाचा गजर करीत असतात, ते संसारामध्यें अत्यंत धन्य होत ७४.

सप्रेम सद्‌भावें संपूर्ण । नित्य करितां नामस्मरण ।
वृत्ति पालटती आपण । तेंही लक्षण ऐक राया ॥ ७५ ॥
पूर्णप्रेमानें व सद्‌भावानें नित्य नामस्मरण केले असतां वृत्ति आपोआप पालटून जातात. तेही लक्षण सांगतों ऐक ७५.

नामासरिसाच हरी । रिघे हृदयामाझारीं ।
तेणें धाकें अभ्यंतरीं । हों लागे पुरी हृदयशुद्धी ॥ ७६ ॥
नामाबरोबरच हृदयामध्यें हरि शिरतो. त्या धाकानें अंतरांत पूर्णपणे हृदयशुद्धि होऊ लागते ७६.

तेव्हां प्रपंच सांडोनि वासना । जडोनि ठाके जनार्दना ।
‘अहं’कारु सांडोनि अहंपणा । सोहं सदनामाजीं रिघे ॥ ७७ ॥
तेव्हां ‘वासना’ प्रपंचाला सोडून जनार्दनालाच चिकटते व अहंकार ‘अहं’ पणाला सोडून ‘सोहं’ (परब्रह्म तेंच मी) ह्या भावनेमध्यें शिरतो ७७.

चित्त विसरोनि चित्ता । जडोनि ठाके भगवंता ।
मनाची मोडली मनोगतता । संकल्प विकल्पता करूं विसरे ॥ ७८ ॥
‘चित्त’ हे चित्ताला विसरून भगवंताला जडून राहते, ‘मनाचे’ मनपणही मोडून ते संकल्पविकल्प करावयालाच विसरते ७८.

कृतनिश्चयेंसीं बुद्धी । हो‍ऊनि ठाके समाधी ।
ऐशी देखोनि हृदयशुद्धी । तेथोनि त्रिशुद्धी न रिघे हरी ॥ ७९ ॥
‘बुद्धि’ ही कृतनिश्चयानें समाधिरूपच होऊन राहते. अशी हृदयाची शुद्धि झालेली पाहिली म्हणजे तेथून खरोखरच हरि बाहेर निघत नाहीं ७९.

हरिनामप्रेमप्रीतीवरी । हृदयीं रिघाला जो हरी ।
तो रिघों विसरे बाहेरी । भक्तप्रीतिकरीं कृपाळू ॥ ८० ॥
हरिनामप्रेमप्रीतीनें हरि जो हृदयामध्यें शिरला, तो भक्तप्रीतीमुळें बाहेर निघावयाचेंच विसरून जातो ७८०.

भक्तें प्रणयप्रीतीची दोरी । तेणें चरण धरोनि निर्धारीं ।
निजहृदयीं बांधिला हरी । तो कैशापरी निघेल ॥ ८१ ॥
भक्तानें प्रणयप्रेमाची दोरी करून तिनें त्याचे चरण धरून हृदयामध्यें घट्ट बांधून ठेवले असतां तेथून तो कसा निघणार ? ८१.

भगवंत महा अतुर्बळी । अदट दैत्यांतें निर्दळी ।
तो कोंडिला हृदयकमळीं । हे गोष्टी समूळीं मिथ्या म्हणती ॥ ८२ ॥
परंतु भगवान् हा अनंत बलशाली असून तो बलिष्ठ दैत्यांचाही संहार करतो, असा तो महाबलिष्ठ हरि हृदयकमलामध्यें कोंडला ही गोष्ट समूळ मिथ्या असे कोणी म्हणतील ८२.

जो शुष्क काष्ठ स्वयें कोरी । तो कोंवळ्या कमळामाझारीं ।
भ्रमर गुंतला प्रीतीवरी । केसर माझारीं कुचंबो नेदी ॥ ८३ ॥
तर पहा, जो वाळलेले लाकूडसुद्धा कोरून टाकतो, तो भ्रमर कोवळ्या कमलामध्यें प्रेमामुळें गुंतून राहतो. त्यांतील केसरलाही तो कुचंबूं देत नाहीं ८३.

तेवीं भक्ताचिया प्रेमप्रीतीं । हृदयीं कोंडिला श्रीपती ।
तेथ खुंटल्या सामर्थ्यशक्ती । भावार्थाप्रती बळ न चले ॥ ८४ ॥
त्याप्रमाणें भक्ताच्या प्रेमातिशयामुळें हृदयामध्यें श्रीहरि कोंडला जातो. तेथे त्याचे सर्व सामर्थ्य व पराक्रम कुंठित होतात. कारण भावार्थापुढें बळ चालत नाहीं ८४.

बाळ पालवीं घाली पिळा । तेणें बाप राहे थोकला ।
तरी काय तो निर्बळ जाहला । ना तो स्नेहें भुलला ढळेना ॥ ८५ ॥
मूल बापाच्या पदराला पीळ घालते, त्यामुळें बाप जातांना थांबतो. म्हणून तो काय त्याच्यापेक्षा बळानें कमी झाला ? नाही. तो प्रेमानें भुलून गेल्यामुळें त्याच्यानें हालवत नाहीं इतकेंच ८५.

तेवीं निजभक्त लडेवाळ । त्याचें प्रेम अत्यंत गोड ।
निघावयाची विसरोनि चाड । हृदयीं सुरवाड हरि मानी ॥ ८६ ॥
त्याप्रमाणें लडिवाळ निजभक्ताचे प्रेम अत्यंत गोड असते; म्हणून तेथून निघावयाची गोष्ट विसरून श्रीहरि त्याच्या हृदयांतच आनंद मानून राहतो ८६.

ऐसें ज्याचें अंतःकरण । हरि न सांडी स्वयें आपण ।
तैसेचि हरीचे श्रीचरण । जो सांडिना पूर्ण प्रेमभावें ॥ ८७ ॥
असें ज्याचे अंतःकरण असते, त्याला श्रीहरि आपण होऊन कधी सोडीत नाहीं; तसेंच तोही पूर्णप्रेमामुळें हरीचे चरण सोडीत नाहीं ८७.

हरीचे ठायीं प्रीति ज्या ऐशी । हरीची प्रीति त्या तैसी ।
जे अनन्य हरीपाशीं हरि । त्यांसी अनन्य सदा ॥ ८८ ॥
हरीच्या ठिकाणी ज्याची जशी प्रीति असते, तशी हरीचीही प्रीति त्या भक्ताच्या ठिकाणी असते, हरीपाशी जे निरंतर अनन्य असतात, त्यांच्यापाशी श्रीहरिही निरंतर अनन्य असतो ८८.

ऐसे जे हरिचरणीं अनन्य । तेचि भक्तांमाजीं प्रधान ।
वैष्णवांत ते अग्रगण । राया ते जाण ‘भागवतोत्तम’ ॥ ८९ ॥
ह्याप्रमाणें जे श्रीहरीच्या चरणीं अनन्य भक्ति धरून राहतात, तेच भक्तांमध्यें मुख्य होत. हे राजा ! वैष्णवांमध्यें तेच अग्रगण्य व भागवतांमध्यें उत्तम भागवत ते तेच हें लक्षात ठेव ८९.

गौण करूनि चारी मुक्ती । जगीं श्रेष्ठ भगवद्‌भक्ती ।
त्या उत्तम भक्तांची स्थिती । संक्षेपें तुजप्रती बोलिलों राया ॥ ९० ॥
ह्याप्रमाणें चारही मुक्तींना गौणपणा आणून जगामध्यें श्रेष्ठ भगवद्‌भक्तीचा जो आश्रय करतो, त्या उत्तम भक्ताची स्थिति संक्षेपानें तुला सांगितली ७९०.

पूर्ण भक्तीचें निरूपण । सांगतां वेदां पडलें मौन ।
सहस्रमुखाची जिव्हा पूर्ण । थकोनि जाण थोंटावे ॥ ९१ ॥
भक्तीचे पूर्ण निरूपण करतांना वेदसुद्धा मौनावतात; सहस्रमुखी शेषाची जिव्हासुद्धा भक्तीचा महिमा वर्णन करतांना थकून जाते ९१.

ते भक्तीची एकांशता । तुज म्यां सांगितली हे कथा ।
यावरी परिपूर्णता । राया स्वभावतां तूं जाणशी ॥ ९२ ॥
हे राजा ! तुला मी एवढा वेळ जी कथा सांगितली, ती त्या भक्तींतील एक अंश मात्र आहे असे समज. ह्यावरून तिची परिपूर्णता तुझ्या सहज लक्षांत येईल ९२.

हरीसारिखा रसाळ वक्ता । सांगतां उत्तमभक्त कथा ।
तटस्थ पडिलें समस्तां । भक्तभावार्थता ऐकोनी ॥ ९३ ॥
हरिऋषीसारखा रसाळ वक्ता उत्तम भक्ताची कथा सांगत असतां भक्तभावार्थता ऐकून सर्व लोक अगदी तटस्थ झाले ९३.

तंव रावो रोमांचित जाहला । रोममूळीं स्वेद आला ।
श्रवणसुखें लांचावला । डोलों लागला स्वानंदें ॥ ९४ ॥
राजाची गोष्ट तर काय सांगावी ? त्याच्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले आणि त्या प्रत्येक रोमाच्या मुळाशी घाम फुटला. श्रवणसुखाला लुब्ध होऊन तो आत्मानंदानें डोलूं लागला ९४.

पूर्ण संतोषोनि मनीं । म्हणे भलें केलें मुनी ।
थोर निवालों निरूपणीं । श्रवणाची धणी तरी न पुरे ॥ ९५ ॥
मनामध्यें अत्यंत संतोष पावून राजा म्हणाला, मुनिवर्य ! आपण फार चांगले केलें ! आपले निरूपण ऐकून फारच समाधान झाले. पण तेवढ्यानें श्रवणांची तृप्ति मात्र होत नाहीं ९५.

ऐकोनि हरीचें वचन । राजा म्हणे हे अवघे जण ।
अपरोक्षज्ञानें ज्ञानसंपन्न । वक्ते पूर्ण अवघेही ॥ ९६ ॥
हरिमुनीचे भाषण ऐकून राजा मनांत म्हणाला, हे सारेच मुनि आत्मानुभवज्ञानानें परिपूर्ण आहेत. इतकेंच नव्हे, तर हे सारे उत्तम वक्तेही आहेत ९६.

भिन्न भिन्न करोनि प्रश्न । आकर्णूं अवघ्यांचें वचन ।
ऐशिया श्रद्धा राजा पूर्ण । अनुपम प्रश्न पैं करील ॥ ९७ ॥
ह्याकरितां ह्यांना निरनिराळे प्रश्न करून साऱ्यांचे भाषण श्रवण करूं या. अशा पूर्ण श्रद्धेनें तो राजा पुढे अनुपम प्रश्न करणार आहे ९७.

रायासी कथेची पूर्ण चाड । पुढां प्रश्न करील गोड ।
जे ऐकतांचि पुरे कोड । श्रोते वाड सुखावती ॥ ९८ ॥
राजाला कथेची अत्यंत आवड असल्यामुळें पुढे तो फार उत्तम प्रश्न विचारील. ते ऐकतांच इच्छा तृप्त होऊन श्रोत्यांना मोठा संतोष होईल ९८.

त्या प्रश्नाचें गुह्य ज्ञान । श्रवणीं पाववीन संपूर्ण ।
वदनीं वक्ता जनार्दन । यथार्थ पूर्ण अर्थवी ॥ ९९ ॥
त्या प्रश्नांतील गूढ ज्ञान मीही सर्वांस ऐकवीन. संपूर्ण अर्थानें व यथातथ्य रीतीनें श्रीजनार्दनच माझ्या मुखानें बोलणार आहे ९९.

पांवा नाना मधुर ध्वनी गाजे । परी तो वाजवित्याचेनि वाजे ।
तेवीं एका जनार्दनीं साजे । ग्रंथार्थवोजें कवि कर्ता ॥ ८०० ॥
मुरलीमधून अनेक प्रकारचे ध्वनि निघतात, पण तें कौशल्य त्या वाजविणाराचे असते. त्याप्रमाणें जनार्दनाच्या कृपेनें ‘एका’ हा कवि व ग्रंथकर्ता म्हणून पुढे येत आहे ८००.

इति श्रीमद्‌भागवते महापुराणे एकादशस्कन्धे परमहंस संहितायां
एकाकार टीकायां निमिजायंतसंवादे द्वितीयोऽध्यायः ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥ ५५ ॥ ओव्या ॥ ८०० ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु.