एकनाथी भागवत – अध्याय ३०

जय द्‍गुरु अनादी । जय जय सद्‍गुरु सर्वादी ।
जय जय सद्‍गुरु सर्वसिद्धी । जय जय कृपानिधि कृपाळुवा ॥ १ ॥
जय जय वेदवाचका । जय जय वेदप्रकाशका ।
जय जय वेदप्रतिपादका । जय जय वेदात्मका वेदाज्ञा ॥ २ ॥
जय जय विश्वप्रकाशका । जय जय विश्वप्रतिपाळका ।
जय जय विश्वनिवासका । अकर्तात्मका अव्यया ॥ ३ ॥
तुझी अव्यय अक्षर स्थिती । नाहीं नाम रूप व्यक्ती ।
तो तूं नांदसी जातिगोतीं । लोकस्थितीव्यवहारें ॥ ४ ॥
तुज जगीं नाही दुसरें । तो तूं गृहस्थ घरदारें ।
तूं नपुंसक साचोकारें । कीं स्त्रीपुत्रें नांदसी ॥ ५ ॥
अज आणि वंदिसी पिता । अजन्मा तो नमिसी माता ।
जगीं तुझी सर्वसमता । शेखीं अतिमित्रता चाळिसी ॥ ६ ॥
तूं जगन्नाथ जगचाळक । कीं एकाचा होसी सेवक ।
तूं परिपूर्ण पूर्णात्मक । कीं मागसी भीक रंकत्वें ॥ ७ ॥
तूं नैष्ठिक ब्रह्मचारी । कीं व्यभिचारें तारिसी नारी ।
तूं सर्वज्ञ कीं गुरूच्या द्वारीं । तृणकाष्ठें शिरीं वाहसी स्वयें ॥ ८ ॥
जो तूं कळिकाळतें ग्रासिसी । तो तूं बागुलाभेणें लपसी ।
तूं मायानियंता हृषीकेशी । शेखीं माया बांधिजशी उखळीं ॥ ९ ॥
तूं आत्माराम नित्यतृप्त । शेखीं गोवळांचा खाशी भात ।
तुझा ब्रह्मदिकां न कळे अंत । तो तूं उभा रडत यशोदेपाशीं ॥ १० ॥
त्रैलोक्य दाविसी उदरीं । तो तूं गोपिकांचे कडियेवरी ।
तूं जगाचा चाळक श्रीहरी । त्या तुज लेंकुरीं शिकविजे चालूं ॥ ११ ॥
जो तूं सर्ववंद्य सर्वेश्वर । तो तूं होसी पांढरा डुकर ।
एवं करितां तुझा निर्धार । वेदांसी विचार कळेना ॥ १२ ॥
वेदीं घेतलें महामौन । ज्ञाते झाले नेणें कोण ।
योगी वळंघले रान । तुझें महिमान कळेना ॥ १३ ॥
मुख्यत्वें जन्म नाहीं ज्यासी जाण । तो कृष्ण कैसें दावी मरण ।
तें ऐकावया निरूपण । परीक्षिती पूर्ण श्रद्धाळू ॥ १४ ॥
प्रथमाध्यायीं वैराग्यार्थ । मुसळ बोलिलें शापयुक्त ।
तेंचि ग्रंथावसानीं एथ । असे पुसत परीक्षिती ॥ १५ ॥

राजोवाच –
ततो महाभागवत उद्धवे निर्गते वनम् ।
द्वारवत्यां किमकरोद्‌भगवान् भूतभावनः ॥ १ ॥

जो पांडवकुळीं कुळरत्‍न । कीं कौरवकुळीं कुळभूषण ।
जो धर्माचें निजरक्षण । कलीचें निग्रहण जेणें केलें ॥ १६ ॥
ऐसा राजा परीक्षीती । धैर्यवीर्यउदारकीर्ति ।
तेणें स्वमुखें श्रीशुकाप्रती । केली विनंती अतिश्रद्धा ॥ १७ ॥
उद्धव पावोनि पूर्ण ज्ञान । तो बदरिकश्रमा गेलिया जाण ।
मागे द्वारकेसी श्रीकृष्ण । काय आपण करिता झाला ॥ १८ ॥
उत्पत्तिस्थितिनिदान । जो इच्छामात्रें करी जाण ।
तो स्वदेहाचें विसर्जन । कैसेनि श्रीकृष्ण करिता झाला ॥ १९ ॥

ब्रह्मशापोपसंसृष्टे स्वकुले यादवर्षभः ।
प्रेयसीं सर्वनेत्राणां तनुं स कथमत्यजत् ॥ २ ॥

ब्रह्मशापें श्रीकृष्णनाथ । निःशेष निजकुळासी घात ।
कैसेनि करविला एथ । हें सुनिश्चित सांगावें ॥ २० ॥
जननयना आल्हादकर । कृष्णतनु अतिसुंदर ।
जीसी देखतांचि त्रिनेत्र । हर्षें निर्भर स्वानंदें ॥ २१ ॥
ऐशी आल्हादकारक तनु । कैसेनि सांडी श्रीकृष्णु ।
ब्रह्मशापासी भिऊन । तो का निजतनु सांडिता झाला ॥ २२ ॥
कृष्ण परब्रह्म परिपूर्ण । त्यासी बाधीना शापबंधन ।
तोही सत्य करी ब्रह्मवचन । यादववंशीं तनु सांडूनी ॥ २३ ॥
दॄष्टीं देखतां श्रीकृष्ण । सुखें सुखावे जीवप्राण ।
त्याच्या सौंदर्याचें निरूपण । राजा आपण सांगत ॥ २४ ॥

प्रत्याक्रष्टुं नयनमबला यत्रलग्नं न शेकुः
कर्णाविष्टं न सरति ततो यत्सतामात्मलग्नम् ।
यच्छ्रीर्वाचां जनयति रतिं किं नु मानं कवीनां
दृष्ट्वा जिष्णोर्युधि रथगतं यच्च तत्साम्यमीयुः ॥ ३ ॥

ज्याची अकराही इंद्रियां सदा गोडी । भोगिजे तंव तंव प्रीती गाढी ।
कदा वीट नुपजे अनावडी । अवीट गोडी कृष्णाची ॥ २५ ॥
बाळा प्रौढा मुग्धा प्रगल्भा व्यक्ती । ऐशी चतुर्विधा स्त्रियांची जातीं ।
तिंहीं देखिल्या श्रीकृष्णमूर्ती । दृष्टी मागुती परतेना ॥ २६ ॥
ज्या धार्मिका धैर्यवृत्ती । ज्या पतिव्रता महासती ।
तिंहीं देखिल्या कृष्णमूर्ती । दृष्टि मागुती परतेना ॥ २७ ॥
ज्या का अबळा अभुक्तकामा । ज्या अतिवृद्धा अतिनिष्कामा ।
तिंहीं देखिल्या मेघश्यामा । नयन सकामा हरिरूपीं ॥ २८ ॥
जेवीं लवणजळा भेटी । तेवीं श्रीकृष्णीं स्त्रियांची दिठी ।
मिसळलिया उठाउठी । परतोनि मिठी सुटेना ॥ २९ ॥
एवं देखिलिया श्रीकृष्णमूर्ती । स्त्रियांचिया निजात्मशक्ती ।
दृष्टीं परतेना मागुती । ऐशी नयनां प्रीती हरिरूपीं ॥ ३० ॥
स्त्रिया बापुड्या त्या किती । जे का संत विरक्त परमार्थी ।
त्यांचे श्रवणीं पडतां कीर्ती । चित्तीं श्रीकृष्णमूर्ती ठसावे ॥ ३१ ॥
चित्तीं ठसावोनि श्रीकृष्णमूर्ती । चित्तचि आणी कृष्णस्थितीं ।
ऐशी कृष्णाची कृष्णकीर्ती । चित्तवृत्ती आकर्षी ॥ ३२ ॥
संतांची आकर्षी चित्तवृत्ती । हें नवल नव्हे कृष्णकीर्ती ।
कीर्ती ऐकतां असंतीं । तेही होती तद्‍रूप ॥ ३३ ॥
लागतां चंदनाचा पवन । खैर धामोडे होती चंदन ।
तेवीं कृष्णकीर्तीश्रवण । दे समाधान समसाम्यें ॥ ३४ ॥
भावें ऐकतां श्रीकृष्णकीर्ती । असंतही संतत्वा येती ।
मग संतासंत दोनी स्थिती । हारपती समसाम्यें ॥ ३५ ॥
महाकवि वर्णीतां श्रीकृष्णकीर्ती । पावले परम सौभाग्यस्थिती ।
ते कृष्णकीर्ती जे वर्णिती । तेही पावती ते शोभा ॥ ३६ ॥
कवीश्वरां नवरसिकु । नवरंगडा श्रीकृष्ण एकु ।
जो जो वर्णिजे रसविशेखु । तो तो यदुनायकु स्वयें होय ॥ ३७ ॥
महाकवि आदिकरूनी । कवीश्वरांची कीर्तिजननी ।
जे विनटले हरिकीर्तनीं । वंद्य वाणी तयांची ॥ ३८ ॥
श्रीकृष्णकीर्तिपवाडे । ज्याची वाणी अबद्धही पढे ।
ते वाचा वंदिजे चंद्रचूडें । त्याच्या पायां पडे यमकाळ ॥ ३९ ॥
जेथें श्रीकृष्णकीर्तिकीर्तन । तेथें कर्माकर्मांची उजवण ।
होय संसाराची बोळवण । जन्ममरणसमवेत ॥ ४० ॥
यापरी कीर्तीचें महिमान । सर्वार्थीं अगाध जाण ।
श्रीकृष्णकीर्तिकविता जाण । परम पावन तिंही लोकीं ॥ ४१ ॥
कवीश्वरांची श्रीकृष्णकीर्ति । ऐकतां वाढे श्रद्धा प्रीती ।
तेणें थोरावे कृष्णभक्ती । हें कविताशक्ती अगाध ॥ ४२ ॥
ऐशी अगाध श्रीकृष्णकीर्ती । मा त्या कृष्णाची कृष्णमूर्ती ।
जे अखंड ध्यानीं देखती । ते ते होती तद्‍रूप ॥ ४३ ॥
ज्यांसी अखंड ध्यानीं श्रीकृष्णमूर्ती । ते ते तद्‍रूप पावती ।
हें नवल नव्हे कृष्णस्थिती । जे द्वेषें देखती तेही मुक्त ॥ ४४ ॥
ज्याचे रथीं मेघश्याम । सारथी झाला पुरुषोत्तम ।
यालागीं पार्थाचा पराक्रम । मिरवी नाम विजयत्वें ॥ ४५ ॥
सदा जयशील संपूर्णु । यालागीं अर्जुना नाम ‘जिष्णु’ ।
ज्याचे युद्धींचा कठिण पणु । सिद्धी श्रीकृष्णु पाववी ॥ ४६ ॥
तो बैसोनि अर्जुनाचे रथीं । विचरतां युद्धक्षिती ।
जे जे देखती श्रीकृष्णमूर्ती । ते ते कृष्णस्थिती पावले ॥ ४७ ॥
जेथ कृष्णाचा पडे पदरेणु । तेथें चहूं मुक्तींसी होय सणु ।
ऐशी पावन कृष्णतनु । कैसेनि श्रीकृष्णु सांडिता झाला ॥ ४८ ॥
म्हणाल ब्रह्मशापाभेण । शरीर सांडी श्रीकृष्ण ।
हा बोलचि अप्रमाण । कृष्ण ब्रह्म पूर्ण परमात्मा ॥ ४९ ॥
हेळण छळण दुर्वचन । द्विजा न करावा अपमान ।
त्यांचा वाढवावया पूर्ण सन्मान । तनुत्यागें श्रीकृष्ण द्विजशाप पाळी ॥ ५० ॥
कृष्ण परमात्मा परिपूर्ण । तेणेंही निजकुळ निर्दळून ।
सत्य करी ब्राह्मणवचन । विप्रशापें आपण निजतनु त्यागी ॥ ५१ ॥
तो तनुत्यागप्रकार । साङ्ग समूळ सविस्तर ।
सांगताहे शुक योगींद्र । परिसे नरेंद्र त्यक्तोदक ॥ ५२ ॥
पांडवकुळीं कुळदीपक । जन्मला परीक्षितीच एक ।
जो होऊनि त्यक्तोदक । भागवतपरिपाक सेवित ॥ ५३ ॥
ब्रह्मानारदव्यासपर्यंत । भागवत-उपदेश गुह्य गुप्त ।
तो परीक्षितीनें जगाआंत । केला प्रकटार्थ दीनोद्धारा ॥ ५४ ॥
धर्मवंशीं अतिधार्मिक । जन्मला परीक्षितीच एक ।
भागवतरसीं अतिरसिक । अति नेटक श्रवणार्थी ॥ ५५ ॥
ऐसा जो कां परीक्षिती । तेणें अत्यादरें केली विनंती ।
शुक सुखावोनि चित्तीं । काय त्याप्रती बोलिला ॥ ५६ ॥

ऋषिरुवाच-
दिवि भुव्यन्तरिक्षे च महोत्पातान् समुत्थितान् ।
दृष्ट्वाऽऽसीनान् सुधर्मायां कृष्णः प्राह यदूनिदम् ॥ ४ ॥

शुक म्हणे परीक्षिती । उद्धव गेलिया वनाप्रती ।
मागें विघ्नभूत द्वारवती । त्रिविध उत्पातीं अतिव्याप्त ॥ ५७ ॥
दिवि-भुवि-अंतरिक्षगत । उठिले गा महोत्पात ।
दिवस उल्कापात होत । भूतें खाखात अंतरिक्षीं ॥ ५८ ॥
गगनीं उगवले त्रिविध केतु । दंडकेतु धूमकेतु ।
शिखाकेतु अति अद्‍भुतु । दिवसाही दिसतु सर्वांसी ॥ ५९ ॥
धरा कांपोनि अतिगजरीं । भूस्फोट झाला नगरद्वारीं ।
भूकंप तीन दिवसवरी । घरोघरीं आंदोळ ॥ ६० ॥
वारा सुटला अति झडाडें । समूळ उन्मळतीं झाडें ।
द्वारकेमाजीं धुळी उडे । डोळा नुघडे जनांचा ॥ ६१ ॥
अंतरिक्षीं नग्न भूतें । धांवती खाखातें खिंखातें ।
रुधिरवृष्टि होय तेथें । अकस्मातें निरभ्रीं ॥ ६२ ॥
रविचंद्राचें मंडळ । खळें करीत सर्वकाळ ।
ग्रह भेदिती ग्रहमंडळ । क्रूरग्रहमेळ शत्रुसदनीं ॥ ६३ ॥
सन्मुख आकाशाचे पोटीं । दिग्दाह देखती दृष्टीं ।
अभ्रेंवीण कडकडाटी । पडती वितंडी महाविजा ॥ ६४ ॥
घारी झडपिती सत्राणें । जेवितां पुढील नेती भाणें ।
दिवसा दिवाभीत घुंगाणे । राजद्वारीं श्वानें सैंघ रडती ॥ ६५ ॥
बैसल्या सुधर्मासभेप्रती । संकल्पविकल्पांची निवृत्ती ।
ते सभेसी वीर वोसणती । मारीं मारीं म्हणती परस्परें ॥ ६६ ॥
तें ऐकतांचि उत्तर । दचकती महाशूर ।
सुधर्मासभेसी चिंतातुर । यादववीर समस्त ॥ ६७ ॥
यादव बैसले सभेसी । छाया देखती वीणशिसीं ।
सुधर्मासभेपाशीं । अरिष्टें ऐशीं उठतीं ॥ ६८ ॥
ऐशीं अरिष्टें अनिवार । दुःखसूचकें दुस्तर ।
देखोनि यादव थोरथोर । विघ्नविचार विवंचिती ॥ ६९ ॥
द्वारकेचें विघ्ननिर्दळण । करूं ठेविलेंसे सुदर्शन ।
ते द्वारकेमाजीं महाविघ्न । काय कारण उठावया ॥ ७० ॥
जंव पातया पातें लवे । तंव चक्र एकवीस वेळा भंवे ।
ते द्वारकेसी विघ्न संभवे । देखोनि आघवे अतिचकित ॥ ७१ ॥
सर्व विघ्नांचें आकर्षण । करी या नांव म्हणिपे ‘कृष्ण’ ।
तो कृष्ण येथें असतां जाण । उत्पात दारुण कां उठती ॥ ७२ ॥
एवं विचाररूढ यादवांसी । चिंतातुर देखोनियां त्यांसी ।
बुद्धि सांगावया त्यांपाशीं । काय हृषीकेशी बोलत ॥ ७३ ॥

एते घोरा महोत्पाता द्वार्वत्यां यमकेतवः ।
मुहूर्तमपि न स्थेयमत्र नो यदुपुङ्गवाः ॥ ५ ॥

जो जगाचा सूत्रधारी । जो मायायंत्रींचा यंत्रकारी ।
तो यादवांप्रती श्रीहरी । आलोच करी विघ्नांचा ॥ ७४ ॥
यादवकुळासी आला प्रांत । हें जाणे श्रीकृष्णनाथ ।
यांचा द्वारकेसी होऊं नये घात । यालागीं समस्त प्रभासा धाडी ॥ ७५ ॥
द्वारवते सातवी पुरी । येथील मरण मोक्षोपकारी ।
यादव समस्त देवाधिकारी । यालागीं ते बाहेरी श्रीकृष्ण काढी ॥ ७६ ॥
कुळनाशाचें मूळ देखा । प्रभासीं निघालीसे एरिका ।
हाचि कृष्णाचाही आवांका । तो धाडी सकळिकां प्रभासासी ॥ ७७ ॥
यादवांसी ब्रह्मशाप । घडलासे घोररूप ।
यालागीं द्वारकेमाजीं संताप । उत्पातरूप उठती ॥ ७८ ॥
उत्पात उठले अनेक । हे अनिवार अरिष्टसूचक ।
अविलंबें तत्काळिक । परम दुःख पावाल ॥ ७९ ॥
यालागीं तुम्हीं आवश्यक । येथें न राहावें मुहूर्त एक ।
स्त्रिया पुत्र सुहृद लोक । तात्काळिक निघावें ॥ ८० ॥
म्हणाल यादववीर उद्‍भट । आम्हांसी काय करील अरिष्ट ।
येणें गर्वें अतिअनिष्ट । परम कष्ट पावाल ॥ ८१ ॥
ब्राह्माणाचे शापापुढें । कायसें शौर्य बापुडें ।
तुम्हीं न विचारितां मागेंपुढें । आतांचि रोकडें निघावे ॥ ८२ ॥
द्वारकेमाजीं आजि कोणी । सर्वथा पिऊं नये पाणी ।
स्त्रीपुत्रसुहृदजनीं । परिवारोनि निघावें ॥ ८३ ॥
कुळासी घडला ब्रह्मशाप । तेणें द्वारकेसी उठिला संताप ।
तें फेडावया कुळाचें पाप । क्षेत्र पुण्यरूप प्रभास ॥ ८४ ॥

स्त्रियो बालाश्च वृद्धाश्च शङ्खोद्धारं व्रजन्त्वितः ।
वयं प्रभासं यास्यामो यत्र प्रत्यक् सरस्वती ॥ ६ ॥

वस्तीसी अतिगूढ शंखोद्धार । तेथें ठेवावी स्त्रीवृद्धकुमार ।
आम्हीं समस्त यादववीर । निघावें सत्वर प्रभासेसी ॥ ८५ ॥
जेथें प्राची सरस्वती । मिळाली असे सागराप्रती ।
तेथें जाऊनि समस्तीं । करावें विध्युक्तीं तीर्थविधान ॥ ८६ ॥

तत्राभिषिच्य शुचय उपोष्य सुसमाहिताः ।
देवताः पूजयिष्यामः स्नपनालेपनार्हणैः ॥ ७ ॥

तेथें वेदोक्तविधान । करावें तीर्थीं तीर्थस्नान ।
तीर्थविध्युक्त उपोषण । करावें आपण निराहार ॥ ८७ ॥
तेथें सद्‍भावें शुचिर्भूत । राहोनियां समस्त ।
तीर्थदेवता विध्युक्त । निःशापार्थ पूजावी ॥ ८८ ॥
स्नान वस्त्रें अलंकार । चंदनादि पूजासंभार ।
समर्पूनि पूजा षोडशोपचार । श्रद्धा हरिहर पुजावे ॥ ८९ ॥

ब्राह्मणांस्तु महभागान् कृतस्वस्त्ययना वयम् ।
गोभूहिरण्यवासोभिर्गजाश्वरथवेश्मभिः ॥ ८ ॥

वेदवेदांगपारंगत । शमदमादितपयुक्त ।
ब्राह्मण जे स्वधर्मनिरत । विघ्नशांत्यर्थ पूजावे ॥ ९० ॥
व्हावया अरिष्टनिरसन । करिती शांत्यर्थ स्वस्तिवाचन ।
त्या ब्राह्मणांसी आपण । द्यावें दान श्रद्धायुक्त ॥ ९१ ॥
गोदान भूदान गजदान । अश्वदान सुवर्णदान ।
तिळदान वस्त्रदान । द्यावें गृहदान अतिश्रद्धा ॥ ९२ ॥
रथीं संजोगोनि अश्ववर । दान द्यावें रहंवर ।
द्विज सुखी होती अपार । तो तो प्रकार करावा ॥ ९३ ॥
जें जें ब्राह्मण अपेक्षित । तें तें द्यावें श्रद्धायुक्त ।
ब्राह्मण तुष्टमान जेथ । अरिष्ट तेथ रिघेना ॥ ९४ ॥

विधिरेष ह्यरिष्टघ्नो मङ्गलायनमुत्तमम् ।
देवद्विजगवां पूजा भूतेषु परमो भवः ॥ ९ ॥

जेथ हरीचें देवतार्चन । जेथ शालग्रामशिलार्चन ।
जेथ साधुसंतां सन्मान । ते अरिष्टनाशन महापूजा ॥ ९५ ॥
जेथ सद्‍भावें द्विजपूजन । जेथ भावार्थें गोशुश्रूषण ।
जेथ भूतदया संपूर्ण । तेथें कदा विघ्न रिघेना ॥ ९६ ॥
अंध पंगु अशक्त जन । जेथ पावती अवश्य अन्न ।
जेथ सुखी होती दीन । तेथ कदा विघ्न बाधीना ॥ ९७ ॥
जेथें भूतदया अलोलिक । ते सकळ अरिष्टच्छेदक ।
परममंगळप्रकाशक । सुखदायक सर्वार्थीं ॥ ९८ ॥

इति सर्वे समाकर्ण्य यदुवृद्धा मधुद्विषः ।
तथेति नौभिरुत्तीर्य प्रभासं प्रययू रथैः ॥ १० ॥

जो मधुकैटभमर्दन । जो मुरारी मधुसूदन ।
जो परमात्मा श्रीकृष्ण । तो करी प्रेरण प्रभास ॥ ९९ ॥
यादवांमाजीं वृद्ध सज्ञान । पुत्र मित्र सुहृद स्वजन ।
तिहीं श्रीकृष्णाचें वचन । बहुसन्मानें वंदिलें ॥ १०० ॥
सकळ समृद्धिसंभारा । स्त्रीवृद्धादि बाळकुमारा ।
नावा भरोनियां समग्रा । शंखोद्धारा न्या म्हणती ॥ १०१ ॥
पालाणोनि रथ कुंजर । चतुरंग सेनासंभार ।
कृष्णसहित यादववीर । निघाले समग्र प्रभासासी ॥ १०२ ॥

तस्मिन् भगवताऽऽदिष्टं यदुदेवेन यादवाः ।
चक्रुः परमया भक्त्या सर्वश्रेयोपबृंहितम् ॥ ११ ॥

यादव प्रभासा पावोन । जैसें होतें श्रीकृष्णवचन ।
त्याहूनि विशेष जाण । स्नानदान तिंहीं केलें ॥ १०३ ॥
यादव समस्त मिळोन । केलें पारणाविधिभोजन ।
मग महामद्य आणूनि जाण । मद्यपान मांडिलें ॥ १०४ ॥

ततस्तस्मिन्महापानं पपुर्मैरेयकं मधु ।
दिष्टविभ्रंशितधियो यद्द्रवैर्भ्रश्यते मतिः ॥ १२ ॥

करूनियां तीर्थविधान । करावें अरिष्टनिरसन ।
बाप अदृष्टाचें विंदान । तेथें मद्यपान मांडिलें ॥ १०५ ॥
ज्याची गोडपणें पडे मिठी । उन्मादता अतिशयें उठी ।
तें मद्यपान उठाउठी । वडिलींधाकुटीं मांडिलें ॥ १०६ ॥
ज्याचा वास येतांचि घ्राणीं । उन्माद चढे तत्क्षणीं ।
तैशिया मद्याचे मद्यपानीं । वीरश्रेणी बैसल्या ॥ १०७ ॥
’मैरेयक’ मद्याची थोरी । मधुरताता अतिशयें भारी
लागतांची जिव्हेवरी । भ्रांत करी सज्ञाना ॥ १०८ ॥
तें मद्यपान यादववीरीं । आदरिलें स्वेच्छाचारीं ।
आग्रह करूनि परस्परीं । लहानथोरीं मांडिलें ॥ १०९ ॥

महापानाभिमत्तानां वीराणां दृप्तचेतसाम् ।
कृष्णमायाविमूढानां सङ्घर्षः सुमहानभूत् ॥ १३ ॥

पूर्वीं अतिमित्रत्व पोटांत । ते महापानें झाले मत्त ।
वीर मातले अतिदृप्त । नोकूनि बोलत परस्परें ॥ ११० ॥
कृष्णमाया हरिला बोध । अवघे झाले बुद्धिमंद ।
सांडूनि सुहृदसंबंध । निर्वाणयुद्ध मांडिलें ॥ १११ ॥
नोकूनि बोलतां विरुद्ध । अतिशयें चढला क्रोध ।
शस्त्रें घेऊनि सन्नद्ध । सुहृदीं युद्ध मांडिलें ॥ ११२ ॥

युयुधुः क्रोधसंरब्धा वेलायामाततायिनः ।
धनुर्भिरसिभिर्भल्लैर्गदाभिस्तोमरर्ष्टिभिः ॥ १४ ॥

क्रोधें नेत्र रक्तांबर । वेगें वोढूनि हातियेर ।
समुद्रतीरीं महावीर । युद्ध घोरांदर ते करिती ॥ ११३ ॥
धनुष्यें वाऊनियां जाणा । बाण सोडिती सणसणां ।
खड्गे हाणिती खणखणां । सुहृदांच्या प्राणां घ्यावया ॥ ११४ ॥
एकीं उचलोनियां भाले । परस्परें हाणिते झाले ।
एकीं गदा उचलोनि बळें । वीर कलेंवरें पाडिती ॥ ११५ ॥
एक तोमरें लवलाहीं । राणीं खवळले भिडती पाहीं ।
एक टोणप्याच्या घायीं । वीर ठायीं पाडिती ॥ ११६ ॥
यापरी चतुरंगसेना । मिसळली रणकंदना ।
आपुलालिया अंगवणा । गज रथ रणा आणिती ॥ ११७ ॥

पतत्पताकै रथकुञ्जरादिभिः
खरोष्ट्रगोभिर्महिषैर्नरैरपि ।
मिथः समेत्याश्वतरैः सुदुर्मदा
न्यहञ्छरैर्दद्‌भिरिव द्विपा वने ॥ १५ ॥

पताकांसीं रथ कुंजर । रणीं पाडिले अपार ।
पाखरांसीं असिवार । मारिले खरोष्ट्र रणामाजीं ॥ ११८ ॥
म्हैसे मारूनियां रणीं । पाडिलिया वीरश्रेणी ।
जैसे उन्मत्त गज वनीं । दंतीं खणाणी भीडत ॥ ११९ ॥
यापरी यादववीर । रणीं मातले महाशूर ।
घाय मारोनि निष्ठूर । रणीं अपार पाडिले ॥ १२० ॥
कृष्णमाया केले भ्रांत । युद्धीं न देखतां स्वार्थ ।
परस्परें प्राणघात । व्यर्थ करित सुहृदांचा ॥ १२१ ॥
रणीं पाडिलें अपार । तंव खवळले कृष्णकुमर ।
ज्यांज्यांमाजीं प्रीति थोर । ते युद्धातुर चालिले ॥ १२२ ॥

प्रद्युम्नसाम्बौ युधिरूढमत्सरा-
वक्रूरभोजावनिरुद्धसात्यकी ।
सुभद्रसङ्ग्रामजितौ सौदारुणौ
गदौ सुमित्रासुरथौ समीयतुः ॥ १६ ॥

ज्यांज्यांमाजीं अतिप्रीती । ते ते निर्वाणयुद्ध करिती ।
बाप संहारक काळगती । सखे मारिती सख्यांतें ॥ १२३ ॥
प्रद्युम्न सांब अतिमित्र । त्यासीं युद्ध मांडले घोरांदर ।
अक्रूर भोज दोन्ही वीर । युद्धीं सत्वर मिसळले ॥ १२४ ॥
अनिरुद्ध आणि सात्यकी । उठावले क्रोधतवकीं ।
वाणीं वर्षोनि अनेकीं । एकामेकीं भीडती ॥ १२५ ॥
सुभद्र संग्रामजित दोनी । खवळले रणांगणीं ।
वर्षोनियां तीक्ष्ण बाणीं । उन्मत्त रणीं मातले ॥ १२६ ॥
कृष्णपुत्र कृष्णबंधु । दोंहीचेंही नाम गदु ।
त्यांसी समत्सर क्रोधु । युद्धसंबंधु परस्परें ॥ १२७ ॥
सुमित्र आणि सुरथ । या दोंहीसीं द्वेष अद्‍भुत ।
परस्परें करावया घात । युद्धाआंत मिसळले ॥ १२८ ॥

अन्ये च ये वै निशठोल्मुकादयः
सहस्रजिच्छतजिद्‍भानुमुख्याः ।
अन्योन्यमासाद्य मदान्धकारिता
जघ्नुर्मुकुन्देन विमोहिता भृशम् ॥ १७ ॥

यादवकुळीं बळें अधिक । निशठादि उल्मुकादिक ।
शतजित्सहस्त्रजिद्‍भानुमुख्य । हेही युद्धीं देख खवळले ॥ १२९ ॥
मद्यपानें अतिगर्वित । कृष्णमाया हरिलें चित्त ।
महामोहें केले भ्रांत । सुहृदां घात स्वयें करिती ॥ १३० ॥
ब्रह्मशापाची केवढी ख्याती । बंधु बंधुतें जीव घेती ।
कृष्णमाया पाडिले भ्रांतीं । युद्ध स्वयातीमाझारीं ॥ १३१ ॥

दाशार्हवृष्ण्यन्धकभोजसात्वता
मध्वर्बुदा माथुरशूरसेनाः ।
विसर्जनाः कुकुराः कुन्तयश्च
मिथस्ततस्तेऽथ विसृज्य सौहृदम् ॥ १८ ॥

यादवांची एक जाती । तेचि बारा नामीं नामांकिती ।
त्या बाराही ज्ञाती युद्धी भिडती । ऐक परीक्षिती तीं नामें ॥ १३२ ॥
दाशार्ह सात्वक अंधक जाण । अर्बुद माथुर शूरसेन ।
कुंती कुकुर विसर्जन । मधु भोज वृष्ण्य बारा नामें ॥ १३३ ॥
पूर्वील यादवांचें साजणें । ज्ञातीचें अल्पही ऐकतां उणें ।
जीवेंसीं सर्वस्व वेंचणें । परी वांचवणें स्वयाती ॥ १३४ ॥
तेचि यादव पैं गा आतां । सांडोनियां सुहृदता ।
ज्याचे चरणीं ठेविजे माथा । त्याच्या जीवघाता पेटले ॥ १३५ ॥

पुत्रा अयुध्यन्पितृभिर्भ्रातृभिश्च
स्वस्रीयदौहित्रपितृव्यमातुलैः ।
मित्राणि मित्रैः सुहृदः सुहृद्‌भि-
र्ज्ञातींस्त्वहन् ज्ञातय एव मूढाः ॥ १९ ॥

कृष्णमाया आकळिलें चित्त । अवघे झाले परम भ्रांत ।
न कळे आप्त अनाप्त । रणीं उन्मत्त मातले ॥ १३६ ॥
ज्याचे चरण वंदिजे भावार्था । श्रद्धा घेइजे चरणतीर्था ।
त्या निजपित्याचिया माथां । पुत्र शस्त्रघाता प्रवर्तले ॥ १३७ ॥
बंधु शिरकल्या रणांगणीं । बंधु बंधूंतें सोडवी निर्वाणीं ।
तेचि बंधु बंधूंतें रणीं । निर्वाणबाणीं खोंचिती ॥ १३८ ॥
जो लळे पुरवूनि खेळविता । जैसा बाप तैसा चुलता ।
त्यासी पुतण्या प्रवर्ते घाता । शस्त्रें माथां हाणोनी ॥ १३९ ॥
कन्येचा सुत दौहित्र । ज्यासी श्राद्धी अधिकार ।
तो आज्यासी करी मार । घाय निष्ठुर हाणोनी ॥ १४० ॥
मामाभाचे परस्परीं । प्रवर्तले महामारीं ।
सुहृद सुहृदांच्या शिरीं । सतेज शस्त्रीं हाणिती ॥ १४१ ॥
मित्र मित्रांच्या मित्रतां । वेंचिति अर्था जीविता ।
ते मित्र मित्रांच्या जीवघाता । सक्रोधता उठिले ॥ १४२ ॥
आयुष्य सरलें निःशेख । चढलें काळसर्पाचें विख ।
अवघे होऊनियां मूर्ख । ज्ञातीसी ज्ञाति देख वधिते झाले ॥ १४३ ॥

शरेषु क्षीयमाणेषु भज्यमानेषु धन्वसु ।
शस्त्रेषु क्षीयमाणेषु मुष्टिभिर्जह्रुरेरकाः ॥ २० ॥

युद्ध मांडिले घोरांदर । सरले भातडींचे शर ।
धनुष्यदंडें येरायेर । घायें निष्ठुर हाणिती ॥ १४४ ॥
घाय हाणितां अतिबळें । धनुष्ये मोडलीं तत्काळें ।
क्षीण झालीं शस्त्रें सकळें । हतियेर-बळें खुंटलीं ॥ १४५ ॥
ब्रह्मशापाची एरिका । तीरीं निघाली होती देखा ।
ते मुष्टीं घेऊनि क्रोधतवका । एकमेकां हाणिती ॥ १४६ ॥

ता वज्रकल्पा ह्यभवन् परिघा मुष्टिना भृताः ।
जघ्नुर्द्विषस्तैः कृष्णेन वार्यमाणास्तु तं च ते ॥ २१ ॥

ते एरिका घेतांचि हातीं । झाली वज्रप्राय धगधगिती ।
अतितीक्षण परिघाकृती । तेणें हाणीती परस्परें ॥ १४७ ॥
नाना शस्त्रें लागतां पाहीं । यादव न डंडळती कंहीं ।
तेही एरिकेच्या घायीं । पडती ठायीं अचेतन ॥ १४८ ॥
एरिकेच्या निजघायीं । यादवांसी उरी नाहीं ।
दुधड तोडूनियां पाहीं । पडती ठायीं परस्परें ॥ १४९ ॥
रणीं पाडूनियां इतर । यादव उरले महाशूर ।
जे कां नेटके जुंझार । निधडे वीर निजयोद्धे ॥ १५०॥
यादव उरले भद्रजाती । हे आणिकासि नाटोपती ।
त्यां निर्दळावया निश्चितीं । निवारणार्थीं हरि धांवे ॥ १५१ ॥
तो म्हणे ब्रह्मशापाची एरिका । हे सर्वथा हातीं धरूं नका ।
सांडा युद्धाचा आवांका । शिकविले ऐका तुम्ही माझें ॥ १५२ ॥
धर्मतां निवारी श्रीकृष्ण । त्यासीही मारूं धांवले जाण ।
हें कृष्णमायेचें विंदान । न चुकत मरण पैं आलें ॥ १५३ ॥
एक म्हणती श्रीकृष्णासी । आधीं झोडोनि पाडा यासी ।
ठकूं आला आम्हांसी । म्हणोनि एरिकेसीं धांविन्नले ॥ १५४ ॥
एक म्हणती धरा केशीं । एक म्हणती भीड कायसी ।
एक म्हणे मी श्रीकृष्णासी । एका घायेंसीं लोळवीन ॥ १५५ ॥

प्रत्यनीकं मन्यमाना बलभद्रं च मोहिताः ।
हन्तुं कृतधियो राजन्नापन्ना आततायिनः ॥ २२ ॥

पैल पैल तो बळिभद्रु । हाचि आमुचा मुख्य शत्रु ।
यासी चला आधीं मारूं । यादवभारु लोटला ॥ १५६ ॥
मदमोहें अतिदुर्मती । वज्रप्राय एरिका हातीं ।
घेऊनि बळिभद्रावरी येती । तेणें तोही निश्चितीं क्षोभला ॥ १५७ ॥

अथ तावपि सङ्क्रुद्धावुद्यम्य कुरुनन्दन ।
एरकामुष्टिपरिघौ चरन्तौ जघ्नतुर्युधि ॥ २३ ॥

शुक म्हणे कुरुनंदना । यादव टेंकले आत्ममरणा ।
ते मारावया रामकृष्णा । आततायी जाणा लोटले ॥ १५८ ॥
यादव उठले हननासी । देखोनि राम-हृषीकेशी ।
अतिक्रोध चढला त्यांसी । तेही युद्धासी मिसळले ॥ १५९ ॥
एरका जे कां परिघाकृती । वज्रप्राय धगधगिती ।
दोघीं जणीं घेऊनि हातीं । यादवां ख्यातीं लाविली ॥ १६० ॥
रामकृष्णांच्या निजघातीं । यादवांची जाती व्यक्ती ।
अवघेचि रणा येती । कृष्ण काळशक्तीं क्षोभला ॥ १६१ ॥
निजकुळाचें निधन । देखोनियां श्रीकृष्ण ।
कर्तव्यार्थ झाला पूर्ण । ऐसें संपूर्ण मानिले ॥ १६२ ॥

ब्रह्मशापोपसृष्टानां कृष्णमायावृतात्मनाम् ।
स्पर्धाक्रोधः क्षयं निन्ये वैणवोऽग्निर्यथा वनम् ॥ २४ ॥

ब्रह्मशापें छळिलें विधीं । कृष्णमाया ठकली बुद्धी ।
मद्यपानउन्मादमदीं । क्रोधें त्रिशुद्धी क्षया नेले ॥ १६३ ॥
वेळुवाच्या वेळुजाळीं । जेवीं कांचणीं पडे इंगळी ।
तेणें वनाची होय होळी । तेवीं यदुकुळीं कुलक्षयो ॥ १६४ ॥

एवं नष्टेषु सर्वेषु कुलेषु स्वेषु केशवः ।
अवतारितो भुवो भार इति मेनेऽवशेषितः ॥ २५ ॥

स्वकुळ नाशूनि श्रीधर । अवशेष धराभार ।
उतरला मानी चक्रधर । तेणें सुखें थोर सुखावे ॥ १६५ ॥
जेवीं कां आलें पेरी माळी । निजजीवनें प्रतिपाळी ।
शेखीं तोचि खणे समूळीं । तेवीं यदुकुळीं श्रीकृष्ण ॥ १६६ ॥
यादव निजबळें प्रतिपाळी । त्यातें स्वयें निजांगें निर्दळी ।
हें दाखवितां वनमाळी । ममतामेळीं अलिप्त ॥ १६७ ॥
कृष्ण पाळी यादवां समस्तां । त्यांची दाविली अतिममता ।
शेखीं करूनि कुळाचे घाता । निरभिमानता हरि दावी ॥ १६८ ॥
स्त्रीपुत्रेंसीं निजजीविता । सकळ कुळाच्या होतां घाता ।
ज्ञात्यासी नुपजे ममता । ते ‘नित्यमुक्तता’ हरि दावी ॥ १६९ ॥
ज्ञात्यासी नाहीं अहंममता । तेचि दावावया तत्त्वतां ।
कुळेंसी होतां पुत्रघाता । स्वप्नींहीं ज्ञाता ग्लानि नेणे ॥ १७० ॥
ब्राह्मणाचा शाप दारुण । अन्यथा हों नेदी श्रीकृष्ण ।
निजकुळ निर्दळी आपण । विप्रवचनसत्यत्वा ॥ १७१ ॥
करूनि कुळक्षयाचें काम । सुख मानी पुरुषोत्तम ।
तें देखोनि म्हणे बळराम । अवतारकर्म संपलें ॥ १७२ ॥

रामः समुद्रवेलायां योगमास्थाय पौरुषम् ।
तत्त्याज लोकं मानुष्यं संयोज्यात्मानमात्मनि ॥ २६ ॥

मग बळिभद्रें आपण । समुद्रतीरीं योगासन ।
दृढ घालोनियां जाण । निर्वाणध्यान मांडिलें ॥ १७३ ॥
आकर्षूनि देहींचा प्राण । निःशेष सांडिला देहाभिमान ।
मग परमपुरुषध्यान । करितांचि आपण तद्‍रूप झाला ॥ १७४ ॥
जेवीं घटामाजील गगन । सहजें महदाकाश पूर्ण ।
तेवीं सांडितां देहाभिमान । झाला संकर्षण बळराम ॥ १७५ ॥
होतें मनुष्यनाट्य अवलंबिलें । तें देह निःशेष त्यागिलें ।
जे कां पूर्वरूप आपुलें । तें होऊनि ठेलें बळिराम ॥ १७६ ॥
समुद्रतीरीं योगासन । तें देह ठेविलें अचेतन ।
हें रामनिर्याण देखोन । स्वयें श्रीकृष्ण सरसावला ॥ १७७ ॥

रामनिर्याणमालोक्य भगवान् देवकीसुतः ।
निषसाद धरोपस्थे तूष्णीमासाद्य पिप्पलम् ॥ २७ ॥

बळभद्र झाला देहातीत । हें देखोनि देवकीसुत ।
भगवान् श्रीकृष्णनाथ । स्वयें इच्छित निजधाम ॥ १७८ ॥
तेव्हां धरातळीं धराधर । मौनें अश्वत्थातळीं स्थिर ।
वीरासनीं शार्ङ्गधर । श्यामसुंदर बैसला ॥ १७९ ॥
ज्याच्या स्वरूपाचे आवडीं । शिवविरिंच्यादि झालीं वेडीं ।
ज्याच्या दर्शनाची गोडी । दृष्टी नोसंडी क्षणार्ध ॥ १८० ॥
दृष्टीनें चवी चाखिली गाढी । तंव तंव रसना चरफडी ।
तिणें कीर्तनरसें रसगोडी । चवी चोखडी चाखिली ॥ १८१ ॥
प्राशनेंवीण कृष्णरस । रसना सेवी अतिसुरस ।
तेव्हां विषयरस तो विरस । होय निरस संसार ॥ १८२ ॥
श्रवणीं पडतां श्रीकृष्णकीर्ती । त्रिविध तापां उपशांती ।
ज्याची वर्णितां गुणनामकीर्ती । चारी मुक्ती कामार्‍या ॥ १८३ ॥
चरणकमलमकरंद । तुळशीमिश्रित आमोद ।
सेवितां घ्राणीं परमानंद । इतर गंध ते तुच्छ ॥ १८४ ॥
ज्याचा लागतां अंगसंग । देहबुद्धीसी होय भंग ।
स्वानंदविग्रही श्रीरंग । अंगप्रत्यंगसुखकारी ॥ १८५ ॥
ज्याचें आवडीं वंदितां पाये । समाधि लाजिली मागें ठाये ।
तो अश्वत्थातळीं पाहें । बैसला आहे निजशोभा ॥ १८६ ॥
तें अंतकाळीचें कृष्णध्यान । शुकासी आवडलें संपूर्ण ।
तोही स्वानंदें वोसंडून । श्रीकृष्णध्यान वर्णित ॥ १८७ ॥

बिभ्रच्चतुर्भुजं रूपं भ्राजिष्णु प्रभया स्वया ।
दिशो वितिमिराः कुर्वन् विधूम इव पावकः ॥ २८ ॥

प्रांतींचें श्रीकृष्णध्यान । पांचां श्लोकीं निरूपण ।
श्रोता परीक्षिती सावधान । वक्ता ज्ञानघन शुकयोगींद्र ॥ १८८ ॥
पिंपळातळीं प्रकाशघन । ते काळींची मूर्ति जाण ।
निजतेजें देदीप्यमान । दिशा परिपूर्ण तेणें तेजें ॥ १८९ ॥
ना धूम ना इंगळ । आरक्ततेवीण अग्निज्वाळ ।
तैशी कृष्णमूर्ती तेजाळ । प्रकाश प्रबळ अतिदीप्त ॥ १९० ॥
कृष्णमूर्तीचे निजप्रभा । लोपली रविचंद्राची शोभा ।
शून्यत्वें ठाव नाहीं नभा । सच्चिदानंदगाभा साकार ॥ १९१ ॥
चैतन्यतेजें तनु मुसावली । शांतिरसाची वोतिली ।
चतुर्भुजत्वें रूपा आली । तेणें दिशांची गेली काळिमा ॥ १९२ ॥

श्रीवत्साङ्कं घनश्यामं तप्तहाटाकवर्चसम् ।
कौशेयाम्बरयुग्मेन परिवीतं सुमङ्गलम् ॥ २९ ॥
सुन्दरस्त्मितवक्त्राब्जं नीलकुन्तलमण्डितम् ।
पुण्डरीकाभिरामाक्षं स्फुरन्मकरकुण्डलम् ॥ ३० ॥

कृष्णमूर्ति स्वच्छ स्वयंभ । अंगीं प्रत्यंगीं बिंबलें नभ ।
तेणें घनश्यामता-शोभ । अतिसप्रभ साजिरी ॥ १९३ ॥
आधींच नेटका श्रीकृष्ण । वरी घनश्यामता बाणली पूर्ण ।
तेणें मुसावलें बरवेंपण । लागलें ध्यान नरनारी ॥ १९४ ॥
नरनारी बापुड्या किती । संन्यासी भुलोनि ठाती ।
विरक्त वेधले परमार्थी । देखोनि मूर्ती कृष्णाची ॥ १९५ ॥
देखतां श्रीकृष्णदर्शन । शिवासी लागलें नित्यध्यान ।
पार्वत्याही निजमन । कृष्णार्पण स्वयें केलें ॥ १९६ ॥
ऐसें अंगींचें बरवेंपण । त्याहीवरी हास्यवदन ।
साजिरें राजीवलोचन । आकर्ण पूर्ण आरक्त ॥ १९७ ॥
मस्तकींचे नीलालक । सुगंधसुमनीं गुंफिले चोख ।
कृष्णीं कृष्णरूप मधुक । कृष्णकेशीं देख विगुंतले ॥ १९८ ॥
स्फुरत्कुंडलें मकराकार । ऐसें वर्णिती कविवर ।
परी तीं आकारीं निर्विकार । श्रवणें विकार मावळती ॥ १९९ ॥
फावलिया कृष्णश्रवण । आकारविकारां बोळवण ।
ते श्रीकृष्णश्रवणीं पूर्ण । देदीप्यमान कुंडलें ॥ २०० ॥
तप्त सुवर्णासमान । उभय पीतांबर जाण ।
एक कासे विराजमान । दुजा प्रावरण शोभत ॥ २०१ ॥
ब्रह्मण्यदेवो श्रीकृष्ण । लक्ष्मी डावलूनि पूर्ण ।
दक्षिणांगीं विप्रचरण । श्रीवत्सलांछन गोविंद ॥ २०२ ॥

कटिसूत्रब्रह्मसूत्रकिरीटकटकाङ्गदैः ।
हारनूपुरमुद्राभिः कौस्तुभेन विराजितम् ॥ ३१ ॥
वनमालापरीताङ्गं, मूर्तिमद्‌भिर्निजायुधैः ।
कृत्वोरौ दक्षिणे पादमासीनं पङ्कजारुणम् ॥ ३२ ॥

कंठीं कौस्तुभ सोज्वळा । कटीं मिरवे रत्‍नमेखळा ।
ब्रह्मसूत्र रुळे गळा । आपाद वनमाळा शोभत ॥ २०३ ॥
माथां मुकुटाचें खेवणें । लखलखीत अनर्घ्य रत्‍नें ।
कीर्तिमुखें बाहुभूषणें । वीरकंकणें विचित्रें ॥ २०४ ॥
यंत्रउपास्ती उपासका । तैशा कराग्रीं करमुद्रिका ।
त्रिकोण षट्कोण कर्णिका । जडितमाणिका शास्त्रोक्त ॥ २०५ ॥
वैजयंतीचा सोहळा । पदक एकावळी गळां ।
नाना रत्‍नें हार मुक्ताफळा । तुळशीमाळा सुगंधा ॥ २०६ ॥
दोनी मोतीलग पदर । रत्‍नें जडित पीतांबर ।
किंकिणी क्षुद्रघंटिका विचित्र । मनोहर शोभती ॥ २०७ ॥
वांकीअंदुवांचा गजर । चरणीं नूपुरांचा झणत्कार ।
रुळे बिरुदांचा तोडर । मनोहर हरिचरणीं ॥ २०८ ॥
रातोत्पलां कठिणपण । त्यांहूनि सुकुमार चरण ।
घवघवीत श्रीकृष्ण । शोभा संपूर्ण शोभत ॥ २०९ ॥
शंख चक्र गदा कमळ । मूर्तिमंत आयुधें सकळ ।
आश्रऊनि पिंपळ । बैसला केवळ वीरासनीं ॥ २१० ॥
त्या वीरासनाचें लक्षण । तळीं सूनि दक्षिण चरण ।
त्याचि मांडीवरी जाण । वामचरण आलोहित ॥ २११ ॥
लाजवूनि संध्यारागासी । उणें आणोनि बाळसूर्यासी ।
चरणशोभा हृषीकेशीं । अतिदीप्तीसीं आरक्त ॥ २१२ ॥

मुसलावशेषायःखण्डकृतेषुर्लुब्धको जरा ।
मृगास्याकारं तच्चरणं विव्याध मृगशङ्कया ॥ ३३ ॥

करूनि निजकुळाची होळी । सरस्वतीतीरीं वनमाळीं ।
टेंकोनि बैसला पिंपळातळीं । चरणनवाळी आरक्त ॥ २१३ ॥
आरक्त श्रीकृष्णचरण । भावूनि मृगमुखासमान ।
जराव्याधें विंधिला बाण । अतिसत्राण भेदिला ॥ २१४ ॥
ब्रह्मशापाचें मुसल घन । यादवीं पिष्ट करितां जाण ।
उरला अवशेष लोहकण । तो समुद्रीं जाण टाकिला ॥ २१५ ॥
तो पडतांचि समुद्रजळीं । त्यातें मीन सगळेंचि गिळी ।
त्या मीनातें जराव्याध गळीं । जाळ्यामेळीं आकळित ॥ २१६ ॥
व्याध करी मीनविदारण । तंव निघाला तो लोहकण ।
त्याचा जरव्याधें केला बाण । तेणें कृष्ण चरण विंधिला ॥ २१७ ॥
मत्सयोदरींचा लोहघन । त्याचा केलिया दृढ बाण ।
थोर पारधी साधे संपूर्ण । व्याधें जाणोनि बाण तो केला ॥ २१८ ॥
भेदावया कृष्णचरण । मुळीं ब्रह्मशापचि कारण ।
यालागीं जराव्याधाचा बाण । कृष्णचरणीं पूर्ण खडतरला ॥ २१९ ॥
व्याधें अवचितें विंधिला । परी कृष्ण नाहीं दचकला ।
बाण सत्राणें खडतरला । तेणें सुखी झाला श्रीकृष्ण ॥ २२० ॥

चतुर्भुजं तं पुरुषं दृष्ट्वा स कृतकिल्बिषः ।
भीतः पपात शिरसा पादयोरसुरद्विषः ॥ ३४ ॥

बाण श्रीकृष्णचरणीं पूर्ण भेदला । जराव्याधाचा हात निवाला ।
म्हणे म्यां मोठा मृग विंधिला । म्हणोनि धांवला धरावया ॥ २२१ ॥
देखोनि चतुर्भुज पुरुषासी । भय सुटलें जराव्याधासी ।
म्हणे मज घडल्या महापापराशी । परमपुरुषासी विंधिलें ॥ २२२ ॥
म्हणे कटकटा रे अदृष्टा । आचरविलें कर्मा दुष्टा ।
ऐशिया मज महापापिष्ठा । दुःखदुर्घटा कोण वारी ॥ २२३ ॥
जगाचा परमात्मा श्रीहरी । तो म्यां विंधिला बाणेंकरीं ।
माझ्या पापासमान थोरी । नाहीं संसारीं आनासी ॥ २२४ ॥
भयें सुटला थोर कंप । मज घडलें महापाप ।
जगाचें जें ध्येय स्वरूप । त्यासी संताप म्यां दिधला ॥ २२५ ॥
ज्याचे अमर वंदिती चरण । ज्यासी संत येती लोटांगण ।
त्या श्रीकृष्णासी विंधिला बाण । पाप संपूर्ण मज घडलें ॥ २२६ ॥
अवचटें आत्महत्या घडे । तें पाप कदा न झडे ।
जगाचा आत्मा कृष्ण वाडेंकोडें । ते आत्महत्या पडे मस्तकीं माझे ॥ २२७ ॥
जगाचें आत्महनन । कर्ता मी एक पापी पूर्ण ।
त्या पापाचें पुरश्चरण । सर्वथा जाण दिसेना ॥ २२८ ॥
प्रमादें ब्रह्महत्या घडे । तेणें पापें तो समूळ बुडे ।
तें पूर्णब्रह्म म्यां मूढे । बाणें सदृढें विंधिलें ॥ २२९ ॥
पापकर्मा मी व्याधरूप । तेणें म्यां जोडलें पाप अमूप ।
कृष्ण परमात्मा चित्स्वरूप । त्यासीही संताप दिधला म्यां ॥ २३० ॥
येणें अनुतापें तप्त पूर्ण । धांवोनि घाली लोटांगण ।
श्रीकृष्णाचे श्रीचरण । मस्तकीं जाण दृढ धरिले ॥ २३१ ॥
मर्दी दैत्यांचा अभिमान । मधुद्वेष्टा जो मधुसूदन ।
त्याचे दृढ धरूनि चरण । करी रुदन अट्टहासें ॥ २३२ ॥
चरणीं घातली परम मिठी । उठवितां कदा नुठी ।
मज क्षमा करीं कृपादृष्टीं । कृपाळू सृष्टीं तूंचि एक ॥ २३३ ॥

अजानता कृतमिदं पापेन मधुसूदन ।
क्षन्तुमर्हसि पापस्य उत्तमश्लोक मेऽनघ ॥ ३५ ॥

अतिभीत जराव्याध । म्हणे मी पापात्मा अतिअशुद्ध ।
नेणतां घडला हा अपराध । लिंगभेद मज घडला ॥ २३४ ॥
जो ईश्वरप्रतिमा उच्छेदी । तो महापापी लिंगभेदी ।
त्या तुज ईश्वरासी म्यां दुर्बुद्धीं । अदृष्टविधीं विंधिलें ॥ २३५ ॥
ऐसा मी पापी पापाकर्मा । महापापी पापात्मा ।
माझा अपराध करावा क्षमा । पुरुषोत्तमा कृपाळुवा ॥ २३६ ॥
तूं कृपाळु त्रिजगतीं । गर्भीं राखिला परीक्षिती ।
गजेंद्राचें अतिआकांतीं । उडी कृपामूर्ती घातली ॥ २३७ ॥
पांडव जळतां जोहरीं । तुवां काढिले विवरद्वारीं ।
शेखीं अर्जुनाचा कैवारी । घेशी जुंझारी भीष्मासीं ॥ २३८ ॥
द्रौपदीचे अतिसांकडीं । धांवलासी लवडसवडीं ।
तिळभरी न दिसतां उघडी । नेसतीं लुगडीं तूं होसी ॥ २३९ ॥
ऐसी कृपाळुत्वाची ख्याती । श्रुतिपुराणें वाखाणिती ।
तुझी उत्तम श्लोककीर्ती । ऋषि वर्णिती महासिद्ध ॥ २४० ॥
नेणतां आचरलों दुष्कर्मा । तें मज करावया क्षमा ।
तूं कृपाळु परमात्मा । पुरुषोत्तमा क्षमाशीळ ॥ २४१ ॥
अजामिळ दुराचारी । पुत्रलोभें नाम उच्चारी ।
त्याचे पापाची झाली बोहरी । ऐशी निष्पाप थोरी नामाची ॥ २४२ ॥
नामें निष्पाप दुर्मती । नामें निष्पाप पितृघाती ।
नामें दुराचारी तरती । हे निष्पाप ख्याती नामाची ॥ २४३ ॥

यस्यानुस्मरणं नॄणामज्ञानध्वान्तनाशनम् ।
वदन्ति तस्य ते विष्णो मयासाधु कृतं प्रभो ॥ ३६ ॥

ज्या विष्णूचें नामस्मरण । कोटीजन्मांचें घन अज्ञान ।
नराचें निर्दाळी पूर्ण । सकळ कल्याणदायक ॥ २४४ ॥
ऐसें ज्याचे नामस्मरण । त्याचे स्वरूपासी म्यां जाण ।
निजबळें विंधिला निर्वाण बाण । अपराध पूर्ण हा माझा ॥ २४५ ॥
ज्याचें अगाध महिमान । सदा वर्णिती साधु सज्जन ।
जो स्वरूपें सच्चिद्‌घन । स्वामी श्रीकृष्ण जगाचा ॥ २४६ ॥
जगाचें जीवन श्रीकृष्ण । त्या कृष्णासही मी आपण ।
विंधिला निर्वाणींचा बाण । हा अपराध पूर्ण पैं माझा ॥ २४७ ॥
त्रैलोक्यराजा कृष्ण समर्थ । तो म्यां केला राजघात ।
जगाचा आत्मा श्रीकृष्णनाथ । तो आत्मघात म्यां केला ॥ २४८ ॥
श्रीकृष्ण जगाचा जनिता । त्या म्यां केलें पितृघाता ।
जगप्रतिपाळणीं श्रीकृष्णमाता । त्या मातृघाता म्यां केलें ॥ २४९ ॥
श्रीकृष्ण ब्राह्मण ब्रह्मबोध । तो म्यां केला ब्रह्मवध ।
याहीहोनि अगाध । जगीं अपराध असेना ॥ २५० ॥
राजघात आत्मघात । मातृपितृ-ब्रह्मघात ।
मजचि घडला समस्त । जे म्यां श्रीकृष्णनाथ विंधिला ॥ २५१ ॥

तन्माऽऽशु जहि वैकुण्ठ पाप्मानं मृगलुब्धकम् ।
यथा पुनरहं त्वेवं न कुर्यां सदतिक्रमम् ॥ ३७ ॥

ऐशिया मज पापरूपासी । कृपा करावी हृषीकेशी ।
निष्कृती होय पापासी । त्या उपायासी करीं वेगीं ॥ २५२ ॥
कोरडिये कृपेचा संबंध । तेणें न फिटे दोषबाध ।
माझा जेव्हां तूं करीसी वध । तेव्हां मी शुद्ध होईन ॥ २५३ ॥
मी लुब्धक पापबुद्धी । मृगलोभी पशुपारधी ।
त्या मज तूं निजहस्तें वधीं । तैं मी त्रिशुद्धी उद्धरलों ॥ २५४ ॥
जेणें देहें केलें पापकर्मा । तो देह निवटीं पुरुषोत्तमा ।
पुढती ऐशिया असत्कर्मा । न करीं अधर्मा तें करीं ॥ २५५ ॥
बाण विंधिला तुझिया पायां । हें अगाध पाप केलें काया ।
तीसी शीघ्र वधावें यदुराया । तैं महापापा या होय निस्तारु ॥ २५६ ॥
जेणें देहें केलें पापाचरण । त्याचें प्रायश्चित्त हेंचि पूर्ण ।
करीं निजहस्तें देहदंडण । म्हणोनि चरण दृढ धरिले ॥ २५७ ॥
देहें केलें पापाचरण । देहलोभी तो पापी पूर्ण ।
स्थूल लिंग आणि कारण । यांचें करीं छेदन निजतेजचक्रें ॥ २५८ ॥

यस्यात्मयोगरचितं न विदुर्विरिञ्चो
रुद्रादयोऽस्य तनयाः पतयो गिरां ये ।
त्वन्मायया पिहितदृष्टय एतदञ्जः
किं तस्य ते वयमसद्‌गतयो गृणीमः ॥ ३८ ॥

देहसंभवाचें मूळ जाण । स्थूल सूक्ष्म आणि कारण ।
यासी नातळतां तूं श्रीकृष्ण । चतुर्भुज संपूर्ण देह धरिसी ॥ २५९ ॥
स्थूल-सूक्ष्म-कारणता । ये तिन्ही त्रिगुणेसीं नातळतां ।
तूं योगमायेचिया सत्ता । नाना अवतारता देह धरिसी ॥ २६० ॥
नवल तुझा लीलाविग्रहो । मत्स्य कूर्म श्वेतवराहो ।
होतां न धरिसी संदेहो । जन्मभयो तुज नाहीं ॥ २६१ ॥
वोडवल्या जन्म एक । ब्रह्मादिक होती रंक ।
तो तूं अवतार अनेक । धरीसी निःशंक निजात्मतां ॥ २६२ ॥
अदृष्टाचिये निजगतीं । देहासी नाना भोग होती ।
तूं अदृष्टेंवीण श्रीपती । नाना भोगसंपत्ती भोगिसी ॥ २६३ ॥
आयुष्य तंववरी देहधारण । वेदें नेमस्त केलें जाण ।
नवल तुझें लीलाविदान । आयुष्येंवीण देह धरिसी ॥ २६४ ॥
काळसत्ता दुर्धर पूर्ण । ब्रह्मादिकां अलोट मरण ।
तुज काळ वेळ नसतां जाण । स्वलीला मरण दाविसी ॥ २६५ ॥
तुझे योगमायेची योगगती । लीलाविग्रहें देहस्थिती ।
अतर्क्य सर्वांसी सर्वार्थीं । तेही उपपत्ती निर्धारीं ॥ २६६ ॥
ब्रह्मा जगाचा आदिकर्ता । त्यासाही न कळे तुझी सत्ता ।
तूं नाना अवतारीं देह धरिता । त्याचा कर्ता नव्हे ब्रह्मा ॥ २६७ ॥
तूं स्वलीला देह कैसा धरिसी । अवतारचरित्रें कैसी करिसी ।
कैसेनि तो देहो सांडिसी । हें ब्रह्मादिकांसी कळेना ॥ २६८ ॥
ज्यासी तूं मानिसी अतिसन्मानीं । सदाशिव जो कां त्रिकाळज्ञानी ।
त्यासीही अतर्क्य तुझी करणी । शार्ङ्गपाणी श्रीकृष्णा ॥ २६९ ॥
सदाशिवाचे निजवचनीं । तूं दुजेन झालासी मोहिनी ।
ते शिवासी न कळे तुझी करणी । तत्क्षणीं तो भुलला ॥ २७० ॥
जाणोनि योग ज्ञान दोनी । सनकादिक ब्रह्मज्ञानी ।
जिंहीं मायापडळ छेदूनी । स्वानंदभुवनीं सुखरूप ॥ २७१ ॥
त्यांसीही तुझी स्वलीलाशक्ती । सर्वथा न कळेचि श्रीपती ।
ते जयविजयां शाप देती । सकोपस्थितीं वैकुंठी ॥ २७२ ॥
पारंगत वेदशास्त्रार्थीं । बृहस्पत्यादि वाचस्पती ।
त्यांसीही लीलाविग्रहस्थिती । न कळे निश्चितीं श्रीकृष्णा ॥ २७३ ॥
जे सज्ञान ज्ञाते परमार्थी । त्यांसीही अतर्क्य अवतारशक्ती ।
मा इंद्रादि देवांसी ते स्थिती । कैशा रीतीं कळेल ॥ २७४ ॥
इंद्रादि देवां दिविभोगनिष्ठीं । माया आच्छादी तयांच्या दृष्टी ।
त्यांसी तुझे लीलेची गोष्टी । न कळे जगजेठी निश्चित ॥ २७५ ॥
तेथ मायावी देहवंता । उद्बोध नव्हे पैं सर्वथा ।
तुझी लीला श्रीकृष्णनाथा । अतर्क्य सर्वथा सर्वांसी ॥ २७६ ॥
सुखें होईल ब्रह्मज्ञान । परी तुझें स्वलीलादेहधारण ।
याचें नेणती पर्यवसान । अतिसज्ञान साकल्यें ॥ २७७ ॥
तेथ मी तंव अधम जन । असद्‌गतीचें भाजन ।
त्या मज तुझें लीलावर्णन । सर्वथा जाण अतर्क्य ॥ २७८ ॥
आतां असो हें निरूपण । बहु बोलाचें काय कारण ।
माझ्या पापाचें पुरश्चरण । देहदंडण करीं कृष्णा ॥ २७९ ॥
तुझेनि हस्तें देहदंडण । तेणें सकळ पापांचें निर्दळण ।
मज उद्धरावया जाण । हे कृपा पूर्ण करावी ॥ २८० ॥
म्हणोनि घातलें लोटांगण । धांवोनि धरिले दोनी चरण ।
ऐकोनि व्याधाचें स्तवन । कृपा श्रीकृष्ण तुष्टला ॥ २८१ ॥

श्रीभगवानुवाच-
मा भैर्जरे त्वमुत्तिष्ठ काम एष कृतो हि मे ।
याहि त्वं मदनुज्ञातः स्वर्गं सुकृतिनां पदम् ॥ ३९ ॥

जो वेदार्थाचा मथित बोध । जो जगदादि-आनंदकंद ।
जो स्वरूपें स्वानंद शुद्ध । तो व्याधेंसीं गोविंद सकृप बोले ॥ २८२ ॥
तूं जीवघातक पारधी । भय मानिसी ममापराधीं ।
तुज अभय गा त्रिशुद्धीं । माझी कार्यसिद्धी त्वां केली ॥ २८३ ॥
कुमारीं सांब केला स्त्रीरूप । कपटें ब्राह्मणां आला कोप ।
कुळासी झाला ब्रह्मशाप । हा त्रिविध संकल्प माझाचि ॥ २८४ ॥
शापावशेष लोह जाण । त्याचा तुवां करोनि बाण ।
मृगलोभें विंधिला चरण । यासही कारण संकल्प माझा ॥ २८५ ॥
मी बुद्धीची अनादि बुद्धी । मी क्रियेची क्रिया त्रिशुद्धी ।
तेथें अहंकर्तृत्वाचे विधी । तूं वृथा अपराधी म्हणविसी ॥ २८६ ॥
मिथ्या धरूनि देहाभिमान । म्हणसी घडलें मज पाप पूर्ण ।
त्याही पापासी पुरश्चरण । माझें दर्शन मुख्यत्वें ॥ २८७ ॥
माझिया नामा एकासाठीं । जळती महापातकांच्या कोटी ।
त्या मज तुवां देखिलें दृष्टीं । परम भाग्यें भेटी घडली तुज ॥ २८८ ॥
माझी घ्यावया क्षणार्ध भेटी । एक रिघाले गिरिकपाटीं ।
एक योगयागसंकटीं । झाले महाहटी नेमस्त ॥ २८९ ॥
एवं नाना नेमआटाटी । शिणतांही कल्पकोटी ।
स्वप्नींही न लभे माझी भेटी । त्या मज त्वां दृष्टीं देखिलें ॥ २९० ॥
माझें होतांचि दर्शन । सकळ पातकां निर्दळण ।
तूं तंव पुण्यात्मा परिपूर्ण । पापाभिमान धरूं नको ॥ २९१ ॥
पापाभिमानें अधोगती । पुण्याभिमानें स्वर्गा जाती ।
निरभिमानें माझी प्राप्ती । सत्य वचनोक्ती पैं माझी ॥ २९२ ॥
तूं ऐसें मानिसी आपण । परब्रह्म परमात्मा श्रीकृष्ण ।
त्यासी विंधिला निर्वाणबाण । हें पाप दारुण अनिवार ॥ २९३ ॥
लोहपरिसा आलिंगन । तेणें लोह होय सुवर्ण ।
त्यासी फोडूं आल्या लोहघण । आघातें सुवर्ण तो होय ॥ २९४ ॥
तेवीं भक्तीं घेतल्या माझी भेटी । पातकें जातीं उठाउठी ।
का द्वेषे देखिल्या मज दृष्टीं । पातकां तुटी तत्काळ ॥ २९५ ॥
हो कां इतरांच्या अपराधतां । प्राणी पावे अधःपाता ।
तोचि अपराध माझा करितां । नित्यमुक्तता अपराध्यां ॥ २९६ ॥
ममापराधें नरक पावे । तैं माझें सामर्थ्य बुडालें आघवें ।
माझेनि अपराधें सुख पावे । मुक्तिवैभवें भयनिर्मुक्त ॥ २९७ ॥
विष म्हणोनि अमृतपान । केल्या अमरत्व न चुके जाण ।
तेवीं द्वेषेंही माझें दर्शन । करी पावन प्राण्यासी ॥ २९८ ॥
जाणोनि अग्नि लविला घरीं । तो जाळूनि सर्वही भस्म करी ।
मा नेणतांही ठेविला वळचणीवरी । तोही करी तैसेंचि ॥ २९९ ॥
तेवीं भावें अथवा द्वेषें पूर्ण । ज्यासी घडे माझें दर्शन ।
तो होय परम पावन । हें सत्य जाण जराव्याधा ॥ ३०० ॥
मज ठाकावया निजधाम । त्वां सिद्ध केलें माझें काम ।
तेणें तुष्टलों मी आत्माराम । तूं पावन परम तिंहीं लोकीं ॥ ३०१ ॥
ज्या नांव म्हणसी ‘पाप’ पूर्ण । जेणें देहें मज विंधिला बाण ।
तेणेंचि देहें तूं आपण । होसी स्वर्गभूषण सुरवंद्य ॥ ३०२ ॥
याग करूनि याज्ञिक । पावती सुख पतनात्मक ।
तैसें तुज न घडे देख । तूं अक्षय सुख पावसी ॥ ३०३ ॥
माझिया दर्शनाचें पुण्य । दिविभोगें नव्हे क्षीण ।
यालागीं अक्षय सुख संपूर्ण । तूं सर्वथा जाण पावसी ॥ ३०४ ॥
तूं विकल्प सांडोनियां पोटीं । जराव्याधा सवेग उठीं ।
मिथ्या नव्हती माझ्या गोष्टी । तूं अक्षय्य तुष्टी पावसी ॥ ३०५ ॥
तूं ऐसें जीवीं कल्पिसी । आपण निघालां निजधामासी ।
मागें अक्षय सुखासी । कोणापाशीं मागावें ॥ ३०६ ॥
जैसें बोलती इतर लोक । ममाज्ञा तैशी नव्हे देख ।
ठाकठोक आतांचि रोख । अक्षय सुख पावसी ॥ ३०७ ॥
माझे आज्ञेचें लाहोनि बळ । ध्रुव अद्यापि झाला अढळ ।
माझी आज्ञा वंदी कळिकाळ । कोणेपरी विकळ करूं न शके ॥ ३०८ ॥
ऐसें श्रीमुखें आपण । जंव बोलों नपुरे श्रीकृष्ण ।
तंव घवघवीत विमान । व्याधासी जाण उतरलें ॥ ३०९ ॥

इत्यादिष्टो भगवता कृष्णेनेच्छाशरीरिणा ।
त्रिः परिक्रम्य तं नत्वा विमानेन दिवं ययौ ॥ ४० ॥

जो सदा पूजिजे सुरासुरीं । जो परमात्मा चराचरीं ।
जो लीलाविग्रहदेहधारी । जो योगीश्वरीं वंदिजे ॥ ३१० ॥
ऐसा अतिवरिष्ठ श्रीकृष्ण । तेणें जराव्याध आज्ञापून ।
कृष्ण‍इच्छामात्रें विमान । देदिप्ययान जें आलें ॥ ३११ ॥
व्याधें देखोनि विमाना । हर्षें निर्भर झाला मना ।
तीन प्रदक्षिणा करूनि कृष्णा । नमूनि विमाना आरुढे ॥ ३१२ ॥
व्याध आरूढोनि विमाना । क्रमूनि इंद्रचंद्रग्रहगणा ।
अक्षय सुख स्वर्गभुवना । कृष्णकृपें जाणा तो पावला ॥ ३१३ ॥
जेणें अपकार केला पूर्ण । त्यासी उपकार करावा आपण ।
हें निज शांतिज्ञानलक्षण । स्वांगें श्रीकृष्ण स्वयें दावी ॥ ३१४ ॥
ब्रह्मज्ञानाचे बोल बोलती । तैसें नाहीं कृष्णनाथी ।
अंगीं दावूनियां स्थिती । व्याध निश्चितीं उद्धरिला ॥ ३१५ ॥
सकळ कुळाचें निर्दळण । झाल्याही मोह न धरी श्रीकृष्ण ।
जेणें निजांगें विंधिला बाण । तो व्याधही जाण सुखी केला ॥ ३१६ ॥
समुद्रतीरीं घेऊनि रथ । दारुक उभा होता तेथ ।
तेणें न देखतां श्रीकृष्णनाथ । गवेषणार्थ निघाला ॥ ३१७ ॥

दारुकः कृष्णपदवीमन्विच्छन्नधिगम्यताम् ।
वायुं तुलसिकामोदमाघ्रायाभिमुखं ययौ ॥ ४१ ॥

कृष्ण न देखतां दारुक । कासावीस झाला देख ।
शोधीत श्रीकृष्णपदांक । पृथ्वी सम्यक् अवलोकी ॥ ३१८ ॥
तंव कृष्णकंठींच्या तुळसीमाळा । त्यांचा आमोद दारुका आला ।
तेणें गंधाभिमुखें निघाला । तंव देखता झाला महातेज ॥ ३१९ ॥

तं तत्र तिग्मद्युभिरायुधैर्वृतं
ह्यश्वत्थमूले कृतकेतनं पतिम् ।
स्नेहप्लुतात्मा निपपात पादयो
रथादवप्लुत्य सबाष्पलोचनः ॥ ४२ ॥

तंव धगधगीत तेजागळा । दिव्य आयुधांचा मेळा ।
त्यांमाजीं घनसांवळा । श्रीकृष्ण डोळां देखिला ॥ ३२० ॥
अश्वत्थातळीं धरूनि स्थान । घालूनियां वीरासन ।
निजतेजें विराजमान । दारुकें श्रीकृष्ण देखिला स्वयें ॥ ३२१ ॥
कृष्ण देखतां लवडसवडीं । रथाखालीं घालूनि उडी ।
पोटींच्या सप्रेम आवडीं । धरिले तांतडीं हरिचरण ॥ ३२२ ॥
नेत्री अश्रूचिया धारा । अंग कांपे थरथरा ।
तुजवेगळें शार्ङ्गधरा । अंधतम नेत्रा दृढ दाटे ॥ ३२३ ॥

अपश्यतस्त्वच्चरणाम्बुजं प्रभो
दृष्टीः प्रनष्टा तमसि प्रविष्टा ।
दिशो न जाने न लभे च शान्तिं
यथा निशायामुडुपे प्रनष्टे ॥ ४३ ॥

ऐके स्वामी श्रीकृष्णा । न देखतां तुझिया श्रीचरणां ।
जगदांध्य पडे नयनां । दिशांची गणना गणी कोण ॥ ३२४ ॥
ज्ञानेंसी मावळला विवेक । अणुमात्र न लभे सुख ।
तुज न देखतां मी देख । जड मूढ मूर्ख होऊनि ठेलों ॥ ३२५ ॥
जेवीं नष्टचंद्राचिये रात्रीं । निबिड अंवसेचिये आंधारीं ।
तेवीं तुजवीण श्रीहरी । दृढ दाटे संसारीं अंधतम ॥ ३२६ ॥
तुझे देखतांचि श्रीचरण । अंधतमा निर्दळण ।
जेवीं प्रकटतां रविकिरण । अंधारेंसीं जाण निशा नासे ॥ ३२७ ॥

इति ब्रुवति सूते वै रथो गरुडलाञ्छनः ।
खमुत्पपात राजेन्द्र साश्वध्वज उदीक्षतः ॥ ४४ ॥

ऐसें विनवी जंव दारुक । तंव परमाश्चर्य कांहींएक ।
देखतां झाला अलोलिक । पाखेंवीण देख उडाला रथु ॥ ३२८ ॥
चहूं वारुवांसंयुक्त । गरुडध्वजेंसीं श्रीकृष्णरथ ।
ऊर्ध्वगतीं गगनाआंत । दारुकादेखत उडाला ॥ ३२९ ॥
शुक म्हणे परीक्षिती । निजधामा जातां श्रीपती ।
आपुली ऐश्वर्यसंपत्ती । स्वेच्छा ऊर्ध्वगती स्वयें नेत ॥ ३३० ॥
इहलोकीं ठेवूनि कीर्ती । निजवैभवविलाससंपत्ती ।
आवरूनियां निजशक्ती । स्वयें ऊर्ध्वगती स्वसत्ता नेत ॥ ३३१ ॥

तमन्वगच्छन् दिव्यानि विष्णुप्रहरणानि च ।
तेनातिविस्मितात्मानं सूतमाह जनार्दनः ॥ ४५ ॥

रथ जातां ऊर्ध्वमंडळ । शंख चक्र गदा कमळ ।
तदनुलक्षित तत्काळ । दिव्यायुधें सकळ निघालीं ॥ ३३२ ॥
ऊर्ध्वमंडळीं उडाला रथ । दिव्यायुधेंही समस्त ।
तें देखोनि अतिविस्मित । ठेला तटस्थ दारुक ॥ ३३३ ॥
धुरे बैसोनियां नित्य । मी वागवीं श्रीकृष्णरथ ।
तो रथ ऊर्ध्वगतीं कृष्ण नेत । मज कां एथ सांडिलें ॥ ३३४ ॥
मज सांडूनियां गोविंदें । नेलीं आपुलीं दिव्यायुधें ।
मी अभाग्य भाग्यमदें । त्यजिलों मुकुंदें निश्चित ॥ ३३५ ॥
म्यां उडी घातली रथाखालती । हेचि माझी मंदमती ।
येरवीं मीही जातों ऊर्ध्वगती । कां श्रीपती रुसला ॥ ३३६ ॥
जेणें चरणीं विंधिला बाण । तो व्याधही उद्धरिला जाण ।
मी भाग्यें अभागी पूर्ण । यालागीं श्रीकृष्ण मज त्यागी ॥ ३३७ ॥
नित्य कृष्ण दृष्टीं पुढें । धुरे बैसोनि वागवीं घोडे ।
तो मी कृष्णावेगळा पडें । भाग्य कुडें पैं माझें ॥ ३३८ ॥
मी श्रीकृष्णाचा सारथी । ऐशी त्रिलोकीं झाली ख्याती ।
तो मी वेगळा पडें अंतीं । कां श्रीपती रुसला ॥ ३३९ ॥
यावज्जन्म भोगिलें कृष्णसुख । त्या मज वोडवलें वियोगदुःख ।
कृष्णा कां झालासी विमुख । मी दीन रंक पैं तुझें ॥ ३४० ॥
माझा बोल अणुभरी । नाहीं अव्हेरिला हरी ।
त्या मज तूं श्रीहरी । अंतीं दुर्धरीं दुराविशी कां ॥ ३४१ ॥
अपराधिया तारिलें व्याधासी । अश्व-ध्वजेंसीं रथ नेसी ।
तो तूं मज उद्धरावयासी । कां उबगलासी गोविंदा ॥ ३४२ ॥
ऐसा अवस्थाभूत पूर्ण । पाहतां श्रीकृष्णाचें वदन ।
दारुकासी आलें रुदन । आसुवीं नयन लोटले ॥ ३४३ ॥
दीर्घस्वरें देऊनि हांक । दारुक रडे अधोमुख ।
अंतीं श्रीकृष्ण झाला विमुख । हें अतिदुःख मजलागीं ॥ ३४४ ॥
दुःखें चरफडीत मोठा । करें पिटीत ललाटा ।
मर मर विधातया नष्टा । वोखटें अदृष्टा काय लिहिलें ॥ ३४५ ॥
मग म्हणे श्रीकृष्णनाथा । तुजपुढें बापुडें विधाता ।
तुजवेगळा मी राहतां । अतिदीनता पावेन ॥ ३४६ ॥
तुझेनि बळें श्रीकृष्णा । म्यां कळिकाळा घातला आंकणा ।
तो मी काळाचा वोळंगणा । कां करिसी पोसणा जगाचा ॥ ३४७ ॥
ऐसें ऐकोनियां वचन । ‘ना भीं ना भीं’ म्हणे जनार्दन ।
मग आश्वासून पूर्ण । गुह्य आलोचन सांगत ॥ ३४८ ॥
आजिच्या काळाचे काळगतीं । तूं एक उरलासी निकटवर्ती ।
तुज म्यां राखिलें निजकार्यार्थीं । वेगीं द्वारावतीं तूं जाईं ॥ ३४९ ॥

गच्छ द्वारवतीं सूत ज्ञातीनां निधनं मिथः ।
सङ्कर्षणस्य निर्याणं बन्धुभ्यो ब्रूहि मद्दशाम् ॥ ४६ ॥
द्वारकायां च न स्थेयं भवद्‍‌भिश्च स्वबन्धुभिः ।
मया त्यक्तां यदुपुरीं समुद्रः प्लावयिष्यति ॥ ४७ ॥
स्वं स्वं परिग्रहं स्वर्वे आदाय पितरौ च नः ।
अर्जुनेनाविताः सर्व इंद्रप्रस्थं गमिश्यथ ॥ ४८ ॥

तूं जाऊनि द्वारकेआंत । यादवांचा निधनवृत्तांत ।
परस्परें कलहयुक्त । निमाले समस्त हें सांग ॥ ३५० ॥
बळिभद्रें निजात्मस्थितीं । देहो त्यजिला योगगतीं ।
माझीही दशा समस्तांप्रती । यथानिगुती सांगावी ॥ ३५१ ॥
तुवां जाऊनियां त्यांपाशीं । शीघ्र सांगावें समस्तांशी ।
कोणी न रहावें द्वारकेसी । निघावें वेगेंसीं ममाज्ञा ॥ ३५२ ॥
द्वारका त्यागावयाचें कारण । तुज मी सांगेन आपण ।
दारुका तूं अतिसज्ञान । विश्वास पूर्ण मज तुझा ॥ ३५३ ॥
यालागीं तुज राहवूनि एथ । अंतकाळींचें गुज सांगत ।
तुवां जाऊनि द्वारकेंत । बाहेर समस्त काढावे ॥ ३५४ ॥
बाहेर काढावयाचें कारण । म्यां द्वारका त्यागिल्या जाण ।
समुद्र येऊनि आपण । नगर संपूर्ण बुडवील ॥ ३५५ ॥
ठाव मागूनि समुद्रापाशी । म्यां वसविले द्वारकेसी ।
मज गेलिया निजधामासी । तो अवश्येंशी बुडवील ॥ ३५६ ॥
यालागीं सत्वर गमन । शीघ्र करावें आपण ।
माझीं माता पिता समस्त जन । द्वारकेहून काढावीं ॥ ३५७ ॥
जंव समुद्र बुडविना तो ठावो । तंव आपुलाला समुदावो ।
घेऊनि सकळ परिग्रहो । शीघ्रतर पहा हो निघावें ॥ ३५८ ॥
झालिया राज्यलोट । चोराकुळित होईल वाट ।
कोणीं नव जावें एकट । अवघीं एकवट करावीं ॥ ३५९ ॥
अर्जुनाचेनि सांगातें । एकत्र मिळूनि समस्तें ।
शीघ्र जावें इंद्रप्रस्थातें । तो मार्गीं त्यांतें रक्षील ॥ ३६० ॥
ऐसें ऐकतां श्रीकृष्णवचन । दारुकासी आलें रुदन ।
न वचे सांडूं पाहे प्राण । जळेंवीण मीन जैसा ॥ ३६१ ॥
निजकुळासी करूनि घात । गेला गेला रे श्रीकृष्णनाथ ।
मी काळमुखा द्वारकेआंत । जावों हा वृत्तांत सांगावया ॥ ३६२ ॥
गिळूनि श्रीकृष्णनिजसुखा । म्हणती हा आला काळमुखा ।
सकळ जगाचिया दुःखा । सूचक देखा मी होईन ॥ ३६३ ॥
ऐकतां माझिया वचनासी । प्राणान्त होईल सर्वांसी ।
एवढ्या द्यावया महादुःखासी । न वचें हृषीकेशी मी तेथें ॥ ३६४ ॥
ज्यासी म्यां सांगावी हे वार्ता । त्यांच्या करावें जीवघाता ।
एवढी घोर निष्ठुरता । नव्हे कृष्णनाथा माझेनीं ॥ ३६५ ॥
बहुतां मुंग्यांच्या विवरासी । जेवीं आगी लावावी हृषीकेशी ।
तेवीं हे वार्ता द्वारकेसी । म्यां सुहृदांपाशीं सांगावी ॥ ३६६ ॥
जेवीं फळते फुलते वनीं । भडकोनि लावावा दावाग्नी ।
तैसा भडका हा सुहृदांचे कानीं । कृष्णनिधनाग्नी कोण लावी ॥ ३६७ ॥
जेवीं बुडतयाचे माथां । पाषाण न देववे सर्वथा ।
तेवीं कृष्णसहित कुळाच्या घाता । मी नव्हें सांगता सुहृदांसी ॥ ३६८ ॥
सुख द्यावें सुहृदांसी । तें राहिलें हृषीकेशी ।
घेऊनियां महादुःखांचिया राशी । सुहृदांपाशी मी न वचें ॥ ३६९ ॥
आशंका ॥
म्हणसी जन्मवरी अवज्ञा । तुवां नाहीं केली अतिप्रज्ञा ।
तो तूं अंतकाळींच्या वचना । कां अवज्ञा करितोसी ॥ ३७० ॥
कृष्णा अंतकाळींचें तुझें श्रीमुख । पाहतां मज अत्यंत सुख ।
तें सांडूनि जनांसी दुःख । द्यावया देख मी न वचें ॥ ३७१ ॥
कुळनिधनाचें घोर दुःख । कृष्णनिधनें संतापक ।
माझे वचनमात्रें हें विख । जगासी देख न देववे ॥ ३७२ ॥
तुझे आज्ञेकरितां देख । जगासी द्यावें महादुःख ।
तुझे अवज्ञेचा उल्लेख । नरकदायक मज होय ॥ ३७३ ॥
मा आपणचि घेऊनि विख । तुजपुढें मरतां देख ।
उत्तम गति अलोलिक । मी निजनिष्टंक पावेन ॥ ३७४ ॥
ऐसें म्हणोनि आपण । दारुकें घातलें लोटांगण ।
मस्तकीं धरिले श्रीचरण । सर्वथा जाण सोडीना ॥ ३७५ ॥
देखोनि दारुकाचा भावो । कृपें द्रवला देवाधिदेवो ।
जेणें निर्दळे शोकमोहो । तों वर्म पहा हो सांगत ॥ ३७६ ॥

त्वं तु मद्धर्ममास्थाय ज्ञाननिष्ठ उपेक्षकः ।
मन्मायारचनामेतां विज्ञायोपशमं व्रज ॥ ४९ ॥

माझ्या धर्माचें निजलक्षण । दृढ आश्रयितां आपण ।
पावोनि माझें ज्ञान विज्ञान । तूं ब्रह्मसंपन्न स्वयें होसी ॥ ३७७ ॥
माझें धर्माचें निजलक्षण । तूं म्हणसी तें कोण कोण ।
ऐक दारुका सावधान । मद्धर्म पूर्ण ते ऐसे ॥ ३७८ ॥
हृदयीं नित्य माझें ध्यान । मुखीं माझें नामकीर्तन ।
श्रवणीं माझें कथाश्रवण । करें मदर्चन सर्वदा ॥ ३७९ ॥
नयनीं मम मूर्तिदर्शन । चरणीं मदालया गमन ।
रसनें मम तीर्थप्राशन । मत्प्रसादभोजन अत्यादरें ॥ ३८० ॥
साष्टांगें मजचि नमन । आल्हादें मद्‍भक्तां आलिंगन ।
सप्रेम माझे सेवेवीण । रिता अर्धक्षण जाऊं नेदी ॥ ३८१ ॥
ऐसी सेवा करितां पहा हो । सर्वभूतीं देखें मद्‍भावो ।
हा सर्वधर्मांमाजीं रावो । तेथें अपावो कदा न रिघे ॥ ३८२ ॥
सर्वभूतीं माझें दर्शन । तेव्हां ‘वैराग्य’ वोसंडे संपूर्ण ।
तेथ सहजें होय शुद्ध ज्ञान । देहाभिमानच्छेदक ॥ ३८३ ॥
देहाभिमान होतां क्षीण । अपेक्षेसी पडे शून्य ।
तेव्हां ‘निरपेक्षता’ पूर्ण । सहजें जाण ठसावे ॥ ३८४ ॥
निरपेक्षतेची दशा कैशी । विषय भेटलिया इंद्रियांसी ।
उपेक्षा करी त्यांसी । जेवीं मृगजळासी सज्ञान ॥ ३८५ ॥
या दृष्टीं पाहतां चराचर । समूळ मिथ्या व्यवहार ।
जेवीं दोराचा सर्पाकार । तेवीं भ्रमें संसार भासत ॥ ३८६ ॥
केवळ दोराचा सर्पाकार । तो श्वेत कृष्ण कीं रक्तांबर ।
तेवीं विषयीं विषयव्यवहार । मिथ्या संसार मायिक ॥ ३८७ ॥
जेवीं शुक्तिकेचा रजताकार । न घडे एकही अलंकार ।
तेवीं हा आभासे संसार । मिथ्या व्यवहार मायिक ॥ ३८८ ॥
मूळीं मिथ्या भवभान । त्याचें भ्रांतासीच बंधन ।
तेथील जें मुक्तपण । तोही भ्रम जाण सोलींव ॥ ३८९ ॥
आम्हीं सज्ञान पूर्ण । निर्दळूनि भवबंधन ।
दृढ साधिलें मुक्तपण । हेंही जल्पन मायिक ॥ ३९० ॥
संसार मायिक रचना । हें सत्यत्वें कळलें ज्याच्या मना ।
तैं मनचि लाजे मनपणा । ‘विज्ञान’ जाण त्या नांव ॥ ३९१ ॥
जागृति सुषुप्ति आणि स्वप्न । संसाराचें मिथ्या ज्ञान ।
हें ज्यासी ठसावलें संपूर्ण । ‘विज्ञान’ जाण त्या नांव ॥ ३९२ ॥
मुख्य विज्ञानाचें लक्षण । साधक होय ब्रह्म पूर्ण ।
जगीं न देखे मीतूंपण । ‘उपशम’ जाण या नांव ॥ ३९३ ॥
ऐसा उपशम ज्यासी पूर्ण । त्यासी मजसीं नाहीं भिन्नपण ।
दारुकें ऐकतां निरूपण । हृदयीं ते खूण चमत्कारली ॥ ३९४ ॥
अलंकार सोनें पाहूं गेला । तंव तोचि सोनें होऊनि ठेला ।
तेवीं मी तंव कृष्णरसें वोतला । वियोग नाथिला देहलोभें ॥ ३९५ ॥
मी कृष्णरूप आपण । मज कृष्णेंसीं नाहीं भिन्नपण ।
ऐशी चमत्कारली खूण । मी ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वें ॥ ३९६ ॥

इत्युक्तस्तं परिक्रम्य नमस्कृत्य पुनः पुनः ।
तत्पादौ शीर्ष्ण्युपाधाय दुर्मनाः प्रययौ पुरीम् ॥ ५० ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां एकादस्कन्धे त्रिंशोऽध्यायः ॥ ३० ॥

ऐसें ऐकोनि श्रीकृष्णवचना । शिरीं वंदूनि श्रीकृष्णाज्ञा ।
खेद सांडोनियां मना । कृष्णचरणां लागला ॥ ३९७ ॥
करूनि त्रिवार प्रदक्षिणा । पुनः पुनः लागोनि चरणां ।
चरणीं माथा ठेवूनि जाणा । घेऊनि कृष्णाज्ञा निघाला ॥ ३९८ ॥
ब्रह्म सर्वत्र परिपूर्ण । त्याचा बोधक श्रीकृष्ण ।
तो निजधामा गेला आपण । तेणें दुर्मन दारुक ॥ ३९९ ॥
पुढती श्रीकृष्णदर्शन । सर्वथा न लभे आपण ।
यालागीं अतिदुर्मन । करी गमन द्वारकेसी ॥ ४०० ॥
दारुक धाडिला द्वारकेसी । तंव मैत्रेय आला कृष्णापाशीं ।
तेचि काळीं हृषीकेशी । ब्रह्मज्ञान त्यासी उपदेशी ॥ ४०१ ॥
तो ब्रह्मज्ञानउपदेशविधि । शुक बोलिला तृतीयस्कंधीं ।
म्हणोनि तें निरूपण ये संधीं । न प्रतिपादीं पुनरुक्त ॥ ४०२ ॥
पाहावया कृष्णनिर्याण । उद्धव गुप्त होता आपण ।
तेणें ऐकोनि ज्ञाननिरूपण । संतोषें नमन करी कृष्णा ॥ ४०३ ॥
तेचि काळीं मैत्रेयासी । स्वमुखें बोलिला हृषीकेशी ।
विदुर येईल तुजपाशीं । त्यासी तूं उपदेशीं गुह्यज्ञान ॥ ४०४ ॥
उपदेशूनि मैत्रेयासी । देवें धाडिला तो स्वाश्रमासी ।
उद्धवेंही नमूनि हृषीकेशी । तोही बदरीसी निघाला ॥ ४०५ ॥
दारुक धाडिला द्वारकेसी । मैत्रेय धाडिला स्वाश्रमासी ।
उद्धव धाडिला बदरीसी । व्याधअधमासी धाडिलें स्वर्गां ॥ ४०६ ॥
निजरथसहित घोडे । निजायुधेंसीं धाडिलें पुढें ।
आतां आपणही वाडेंकोडें । निजधामाकडे निघेल ॥ ४०७ ॥
निजधामा निघतां श्रीपती । समस्त देव पाहों येती ।
ते सुरस कथासंगती । पुढिले अध्यायार्थी अतिगोड ॥ ४०८ ॥
अजन्मा तो जन्म मिरवी । विदेहाअंगीं देहपदवी ।
स्वयें अक्षयी तो मरण दावी । अतिलाघवी श्रीकृष्ण ॥ ४०९ ॥
ज्याचें निजधामगमन । शिवविरिंच्यादिकां अतर्क्य खूण ।
त्यांचे सांगेन उपलक्षण । श्रोता अवधान मज द्यावें ॥ ४१० ॥
एकादशाचा कळस जाण । श्रीकृष्णांचे निजनिर्याण ।
जेथ नाहीं देहाभिमान । तें ब्रह्म पूर्ण परिपक्व ॥ ४११ ॥
भय नाहीं जन्म धरितां । भय नाहीं देहीं वर्ततां ।
भय नाहीं देह त्यागितां । ‘हे ब्रह्म-परिपूर्णता’ हरि दावी ॥ ४१२ ॥
एका जनार्दना शरण । पुढें अचुंबित निरूपण ।
संतीं मज द्यावें अवधान । सांगेन व्याख्यान सद्‍गुरुकृपा ॥ ४१३ ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे एकादशस्कंधे परमहंससंहितायां
एकाकारटीकायां ‘स्वकुलनिर्दळणं’ नाम त्रिंशोऽध्यायः ॥ ३० ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ५० ॥ ओंव्या ॥ ४१३ ॥

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *